माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ सप्टेंबर, २००७

मी एक पुलकित! १

पु. ल. देशपांडे हे नाव माहित नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही असे म्हणणे थोडे अतिशयोक्तीचे होईल; पण संगीत,साहित्य,नाटक,सिनेमा वगैरे गोष्टींची आवड असलेल्या मराठी माणसाला हे नाव नुसते माहितच आहे असे नव्हे तर ते त्याचे दैवत आहे असे म्हणणे मात्र कुणीही मान्य करेल. पु.ल.देशपांडे ह्यांना लोक विविध नावाने ओळखतात. पीएल,पीयल,पुलं,भाई,भाईकाका,वगैरे वगैरे नावाने ते ओळखले जातात. मी मात्र त्यांना पुलं ह्याच नावाने संबोधतो कारण त्यामुळे माझ्यासारख्या त्यांच्या पंख्यांना 'पुलकित' असे विशेषण लावता येते.

पुलं आणि माझी पहिली ओळख(साहित्यिक ओळख बरं का!) शालेय जीवनात झाली. अपूर्वाई ह्या त्यांच्या पश्चिमी देशांच्या प्रवासवर्णनापैकी एक प्रकरण आम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात धडा म्हणून होता. त्यात इंग्लंडच्या पोलिसाचे 'बॉबी' चे वर्णन आलंय जे मला स्वतःला खूपच भावले होते. त्याचे ते तोंडातल्या तोंडात "गुम्माँग" असे पुटपुटणे,तरंगत चालणे वगैरे वर्णन मला खूपच आवडले होते. आपल्या साजूक तुपातल्या इंग्रजीचा अभिमान तिथे कसा कुचकामी ठरतो हे देखिल पुलंनी अतिशय प्रांजळपणे नोंदवलाय. ट्युब रेल्वेवरील एका स्टेशनचे तिकिट मागताना तिकिट क्लार्क आणि पुलं ह्यांच्यातला संवाद बरेच काही सांगून जातो. इथेच मी पुलंच्या प्रेमात पडलो.

मी शाळेत असताना पुलंचे नाव वृत्तपत्रात येत असे ते त्यांच्या एकपात्री प्रयोगांबद्दल. त्यावेळी ते प्रयोग धो धो चालत असे ऐकल्याचे आठवतेय. मात्र मला ते प्रयोग पाहण्याचे भाग्य लाभले नाही. कारण पुलंच्या लौकीकाबरोबरच त्यावेळी पुलंचा एका विशिष्ट गोष्टीबद्दल दुर्लौकीक होता. तो म्हणजे त्यांच्या प्रयोगाला लहान मुलांना प्रवेश नसायचा. त्याबाबतचे त्यांचे कारण आज पटण्यायोग्य असले तरी त्या काळात जेव्हां एकेका घरात किमान अर्धा डझन मुले असत(आम्ही भावंडे चौघेच होतो) अशा आई-बापांना पुलंचे प्रयोग कधीच पाहता आले नाहीत अथवा आम्हा मुलांना दाखवता आले नाहीत. माझ्या आईचा ह्या बाबतीत पुलंवर आरोपच होता. ती त्यांना 'शिष्ट' म्हणायची. वृत्तपत्रात त्यांच्या प्रयोगाबद्दल भरभरून लिहून येत असे मात्र तरीही त्यांचे प्रयोग आपल्याला पाहता येत नाहीत, तेही त्यांच्या ह्या विचित्र अटीमुळे ह्या गोष्टीचे तिला खूप वाईट वाटे आणि त्याचा राग ती त्यांना 'शिष्ट' म्हणून व्यक्त करत असे.मात्र तरीही त्यांच्या साहित्यिक,सांगितिक,नाट्यीय गुणांबद्दल आई-वडिलांना प्रचंड कुतूहल मिश्रित कौतुक वाटायचे. दैनिक मराठ्यामध्ये आलेली छायचित्रे( स्वतः आचार्य अत्रे पहिल्या रांगेत बसून मनसोक्त हसून दाद देत आहेत) , त्यातील पुलंच्या एकेक लकबी वगैरेंचे सचित्र वर्णन आणि त्यांच्यावर आचार्यांनी लिहिलेला अग्रलेख हे सगळे वाचून आणि पाहून जीव तीळ तीळ तुटत असे. एका कोटीभास्कराने दुसर्‍या कोटीभास्कराला दिलेली ती मनमोकळी दाद पाहून आपले जीवन कृतकृत्य झाल्यासारखे वाटायचे. तरीही प्रत्यक्ष दर्शन घडणे नशिबात नव्हते.

मी मोठा होईपर्यंत पुलंचे हे प्रयोग बंद होत गेले आणि एका मोठ्या आनंदाला मुकल्याचे दूर्भाग्य माझ्या नशिबी आले. पण दूधाची तहान ताकावर का होईना भागावी तद्वत त्यांच्या ध्वनिफिती बाजारात आल्या आणि मग त्या ऐकूनच समाधान मानावे लागले. मी पुलंची पहिली ध्वनीफीत ऐकली ती 'म्हैस' ह्या कथेची. ती कथा त्यांच्याच तोंडून ऐकताना मला पुन्हा एकदा साक्षात्कार झाला की आपण किती मोठ्या आनंदाला मुकलोय ते. ती गोष्ट ऐकताना झालेला आनंद हा त्यांच्याच भाषेत सांगायचा तर अगदी 'उन्मनीय' अवस्थेत पोचवणारा होता.त्याच्या पाठोपाठ मग पानवाला,हरितात्या,अंतू बर्वा,रावसाहेब असे एकेक येत गेले आणि मी शब्दशः 'पुलकित ' झालो. ह्या ध्वनीफितींची आजवर किती पारायणे केली असतील ह्याची गणती नाही. तरीही कंटाळा येत नाही. प्रत्येक वेळी त्यात नवीन काहीतरी सापडते आणि वैशिष्ट्य म्हणजे वेळोवेळी त्यांच्या त्यातील वाक्यांची अनुभूती प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारात घेता येते.

क्रमशः

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

पुलंवर लेख लिहून एकदम हृदयातच हात घातला:-)
मझा आया! :-)

दिपक म्हणाले...

नमस्कार अत्यानंद

हा लेख आवडला, पु.ल. चा मी पण भक्त आहे.
�अपुर्वाई� पुस्तक वाचुनच मी त्यांच्या साहित्याच्या
प्रेमात पडलो. पोलिसाचे 'बॉबी' चे वर्णन,त्याचे ते तोंडातल्या तोंडात "गुम्माँग" असे पुटपुटणे,तरंगत चालणे .. हिच वाक्ये आजही आठवतात.

पु.ल. वर जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे..
आपल्याला शुभेच्छा..
धन्यवाद..

vivek म्हणाले...

आमच्या पुलंवरच्या श्रद्धेबद्दल आपणांस काही सांगावयास नकोच. आमच्या दैवतावर लेखमाला चालू केल्याचं पाहून (की वाचून ?) आनंद झाला. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

आमच्या स्वत:च्या खाजगी वाचनालयात पुलंनी लिहिलेली बरीच पुस्तके आहेत. (आता ती सर्व आम्ही वाचली आहेत की नाही असा अडचणीत आणणारा प्रश्न आपण विचारणार नाही याची खात्री आहे)

वरील अभिप्रायातील "माझ्या" अशा शब्दाच्या जागी "आमच्या" अशा शब्दाची पेरणी करण्याचे प्रयोजन आपल्या लक्शात आले असेलच. स्वत:ला "आम्ही" म्हणून कधीतरी "आम्हीच" "आमचा" गौरव करुन घेत असतो. "तुम्ही" ("आपण"?) करत नसल्यामुळे :-)

Nikhil Joshi म्हणाले...

नमस्कार अत्यानंद
तुमचा लेख वाचून अत्यानंद झाला असेच अजुन बरेच छान लेख पुढे ही वाचाईला आम्हाला मिलोट ही ईचा.

धन्यवाद
निखील जोशी

Nikhil Joshi म्हणाले...

नमस्कार अत्यानंद
तुमचा लेख वाचून अत्यानंद झाला असेच अजुन बरेच छान लेख पुढे ही वाचाईला आम्हाला मिलोट ही ईचा.

धन्यवाद
निखील जोशी

अनामित म्हणाले...

अतिशय सुरेख लेख जमलाय,पुलं वरचा लेख पाहिल्या पाहिल्या लगेच वाचायला घेतला
आणि योगायोगाची गोष्ट अशी की आपल्या दोघांच्या पुलं वाचनाची सुरूवात अपूर्वाई पासून ज़ाळी

मला वाटत या ई कटटा वर सगळे पुलं प्रेमी जमले तर आपण बरेच उपक्रम पार पडू शकू

किंवा तुमचा तसा काही प्रयत्न चालू असल्यास नक्की कळवा

पुलं गेले त्यावेळी मी सोळा वर्षांचा होतो अन् पुण्याजवळ एका छोट्या गावात राहत होतो
त्यामुळे पुलंची भाषणे,नाटके,एकपात्री प्रयोग कसालाच आनंद घेता आला नाही.

पुलंना फक्त एकदा पहाव अशी फार इच्छा होती पण ती पूर्ण ज़ळी नाही
इथे कोणी पुलं ना एकदा भेटालेले पाहिलेले असेल तर त्यांनी आपला अनुभव लिहावा ही विनंती

या ब्लॉग विश्वात मी नवीन आहे त्यामुळे काही चुक असल्यास आगाउ दिलगिरी व्यक्ता करतो

ब्लॉग्स वर माज़ीही काही धडपड चालू आहे

हळू हळू शिकिन....

अच्छा
निरंजन बासरकर