माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जानेवारी, २०१०

वाढदिवसाची भेट!!!!!!!

रविवारी दिनांक २४ रोजी स्टार माझाच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला गेलो होतो. परतताना एका ठिकाणी ठेचकाळलो आणि डावं पाऊल जबरदस्त दुखावलं....त्याबद्दल आधीच लिहून झालंय.
दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी पाय चांगलाच ठणकत होता म्हणून सकाळी बाहेर कुठेच गेलो नाही. संध्याकाळी मात्र जरा बरं वाटत होतं म्हणून आमच्याच इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील क्ष-किरण तपासणी केंद्रातून पायाची तपासणी करून घेतली.
संगणकावर प्रतिमा पाहून हे नक्की झालं की हाडाला कुठेही दुखापत झालेली नव्हती, पायाच्या घोट्याभोवतीचे स्नायु मात्र खूपच ताणले गेलेले दिसले. तरीही हाड मोडलं नाही हा एक दिलासा मिळाला. हुश्श. दुसर्‍या दिवशी २६ जानेवारी..म्हणजे सार्वजनिक सुट्टी म्हणून कागदोपत्री तपासणी अहवाल २७ला मिळणार होता. त्यानंतरच तो अहवाल घेऊन डॉक्टरांकडे जायचं ठरवलं.

आज २७ जानेवारी. सकाळी तपासणी अहवाल घेण्यासाठी घरातून बाहेर पडलो तर लक्षात आलं की लिफ्ट बंद आहे. मला सहाव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर दुखर्‍या पायानं उतरवेना म्हणून परत घरात आलो. अर्थात कसाबसा उतरलो असतो तरी परत वर पाच मजले चढून येणं कठीणच होतं. दुपारी कन्या तिच्या कार्यालयात गेली तेव्हा लिफ्ट सुरु झालेली. डॉक्टरांची वेळ संध्याकाळची म्हणून संध्याकाळी मी जामानिमा करून घराच्या बाहेर पडलो. लिफ्टमधून पहिल्या मजल्यावरच्या केंद्रातून तपासणी अहवाल घेऊन बाहेर आलो तो कळलं की पुन्हा लिफ्ट बिघडली. :(
मग हळूहळू पायर्‍या उतरत एक मजला खाली उतरलो आणि माझ्या घरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर असणार्‍या हाडांच्या डॉक्टरांकडे(ऑर्थोपेडीक सर्जन)कडेकडेनं पोचलो. परत घरी येताना दूध आणि भाजी आणायची होती म्हणून बरोबर पिशव्याही घेतलेल्या होत्या.

डॉक्टरांकडे गेलो. त्यांना तपासणी अहवाल दाखवला. माझा पाय आणि तो अहवाल तपासल्यावर त्यांनी हाड मोडले नसल्याबद्दल खुशी जाहीर केली मात्र त्याच वेळी माझ्या घोट्याच्या बाजुचे स्नायु चांगलेच दुखावले गेल्याचेही सांगितले. त्यावर औषधयोजना करण्याबरोबर, पाय लवकर बरा व्हायचा असेल तर तो प्लास्टरमध्ये बांधावा लागेल असेही ते म्हणाले. अर्थात प्लास्टर लावायचे की नाही ते ठरवण्याचा पर्याय मला होताच..पण त्यामुळे पाय वारंवार हलणार आणि दुखणं बरं व्हायला कितीही वेळ लागू शकतो हे लक्षात आणून दिल्यावर मी पाय प्लास्टरबंद करण्यासाठी राजी झालो.
प्लास्टरमध्येही दोन प्रकार सांगितले गेले. एक, प्लास्टर ऑफ पॅरिसयुक्त आणि दुसरं फायबरयुक्त. पहिलं सहा आठवडे पायाबरोबर बाळगावं लागणार होतं तर दुसरं फक्त तीन आठवडे...इति. डॉक्टर. मात्र दुसर्‍याची किंमत पहिल्यापेक्षा दुप्पट होती. दुप्पट किंमत देऊन जर लवकर बरं होणार असेल तर तेच करा असं मी डॉक्टरांना म्हटलं.

झालं. मला शस्त्रकियागृहात नेलं गेलं. मग दोन परिचारिकांच्या साथीने डॉक्टरांनी माझा पाय प्लास्टरबद्ध केला आणि....

मी भानावर आलो. अहो भानावर आलो म्हणजे बेशद्ध वगैरे नव्हतो हो, मी पूर्ण शुद्धीतच होतो. मात्र पाय प्लास्टरमध्ये बांधावा लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मी मागचा पुढचा असा कोणताही विचार न करता तसं करायला राजी झालो होतो आणि आता अचानक लक्षात आलं की.. अरेच्चा! आता तर मला चपलाही घालता येणार नाहीत. गच्च रहदारीच्या अशा हमरस्त्यावरून मी हा असा पाय घेऊन घरी कसा जाणार? ह्याक्षणी माझ्या बरोबर कुणीच नाही हे आत्ता लक्षात आलं. त्यातून लिफ्ट बंद आहे आणि अशा अवस्थेत सहा मजले चढून जायचं कसं? हा प्रश्न आधीच मनात यायला हवा होता तो आता आ वासून उभा राहिला. :(

क्षणभर माझ्या मनात विचार आला की डॉक्टरांना सांगावं की तुमचे जे काही पैसे असतील ते घ्या पण हे प्लास्टर आत्ताच काढा. पण मी तसं केलं नाही. मात्र डॉक्टरांना माझी अडचण सांगितली...की मी आता चार पावलंही चालू शकत नाहीये आणि ह्या भर रहदारीत मी घरी कसा जाऊ? त्यातून लिफ्टही बंद आहे आणि मला जायचंय सहाव्या मजल्यावर?
तेव्हा डॉक्टर म्हणाले की...अहो मग इथेच राहा आजची रात्र.
मी म्हटलं..नको. त्यापेक्षा तुमच्या कुणा माणसाला माझ्या बरोबर पाठवलंत तर ते जास्त बरं होईल.त्यामुळे दोन कामं होतील. मला आधारही मिळेल आणि त्या माणसाच्या हातात मी राहिलेले पैसेही पाठवून देईन.
डॉक्टर खूपच दिलदार स्वभावाचे आहेत. मुळात प्लास्टरसाठीचे पूर्ण पैसेही माझ्याकडे नव्हते. माझ्याकडे त्यातले जेमतेम १/६ पैसेच होते. तरी राहिलेले पैसे मी नंतर देईन ह्या भरवशावर त्यांनी प्लास्टर चढवलेलं होतं. त्यांनी लगेच त्यांच्याकडच्या एका सहाय्यकाला माझ्या बरोबर पाठवलं..पैशांची घाई नाही,तुम्ही आमच्याकडे ह्या आधीही आलेला होता आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे तेव्हा पैसे नंतर दिलेत तरी चालेल. मात्र जपून जा .

इस्पितळाच्या आवारातून कसाबसा खरडत खरडत रस्त्यापर्यंत आलो. रस्ता वाहनांनी नुसता ओसंडून वाहत होता तरीही एकही रिक्षा रिकामी दिसत नव्हती. खरं तर तिथून माझं घर इतकं जवळ आहे की कोणताही रिक्षावाला इतक्या कमी अंतरासाठी येण्यासाठी तयार होण्याची शक्यता नव्हती....आणि अचानक एक रिकामी रिक्षा कडेकडेने माझ्या दिशेने येताना दिसली. मी माझ्याबरोबरच्या सहाय्यकाला रिक्षावाल्याला अडवायला सांगितले. सुदैवाने पुढच्या नाक्यावरील लाल दिव्यामुळे त्याच वेळी रहदारी थांबली. रिक्षावाला आधी तयारच होईना पण मग मी माझा प्लास्टरयुक्त पाय त्याला दाखवला आणि त्याला कणव आली. हुश्श! रिक्षात बसलो आणि तीनचार मिनिटात इमारतीच्या आवारात पोचलो.

आता इथून पुन्हा माझी कसोटी होती. हळूहळू,खुरडत खुरडत पण जिद्दीने मी कसाबसा पाचव्या मजल्यावर पोचलो आणि अचानक लिफ्ट सुरु झाल्याचा चमत्कार झाला.
आमच्या इमारतीत एकच लिफ्ट आहे आणि ती कधी बंद पडेल ह्याचा भरवसा नसतो. त्यामुळे तो एक मजला लिफ्टनं वर चढावा की पायीच चढावा ह्या दुविधेत क्षणभर पडलो. कुणी सांगावं...लिफ्ट तेवढ्यातल्या तेवढ्या मधेच कुठे बंद पडली तर? तर काय, लटकलोच समजा.. पण मनातले विचार बाजुला सारले आणि बिनधास्तपणे राहिलेला एक मजला लिफ्टने वर गेलो. :)

मित्रहो, उद्या २८ जानेवारी. माझा वाढदिवस. माझ्या वाढदिवसाची ही अनोखी भेट कशी वाटली? आता ती तीन आठवडे मला जवळ बाळगायची आहे. :D
डॉक्टरांकडे जाईपर्यंत मलाही माहीत नव्हतं की मला अशी काही भेट मिळणार आहे..पण एका क्षणात सगळं बदललं आणि पायावर मणभर जड असं प्लास्टर घातलं गेलं

१५ टिप्पण्या:

देवदत्त म्हणाले...

काका, आताच वाचले तुमच्या पायाबद्दल :(. काळजी घ्या.

आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रोहन... म्हणाले...

काका काळजी घ्या ... आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ... :)

Unknown म्हणाले...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रशिस्तपत्र मिळणे, पाय मुर्गळणे, प्लॅस्टर, मग बसण्याचा गोंधळ. वर्षाची खर्चिक सुरुवात.

माझी दुनिया म्हणाले...

वाडदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! तुमच्या बक्षिसाला नजर लागली की काय कुणाची ? ;-) काळजी घ्या मात्र, आता तीन आठवडे इतरत्र भटकायची सोय नाही, महाजालावरच भटका काय ते.

प्रमोद देव म्हणाले...

देवदत्त,रोहन चौधरी,रानडेसाहेब आणि माझी दुनिया शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
बाकी पायाचे म्हणाल तर काय...आलिया भोगासी असावे सादर, रखडत चालावे बांधून प्लास्टर! ;)

संवेदना म्हणाले...

मी पण आत्ताच वाचले तुमच्या अपघाताविषयी.:( सध्या विश्रांती घ्या.जास्त चालु नका.अन वाढदिवस मात्र आनंदातच साजरा करा.:)

माझी दुनिया म्हणाले...

आलिया भोगासी असावे सादर, रखडत चालावे बांधून प्लास्टर!

वा ! वा ! क्या बात है, चाल नाही का लावली ? आणि आता शीघ्रकवींच्या पोटावर पाय की काय ?

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद संवेदना.
मादु,आता चाल कसली लावतोय?
आता ’चाल’ रखडलेय.

मदनबाण म्हणाले...

हे काय मोदबुवा...कांदळकर काकांबरोबर आता तुम्ही सुद्धा !!!
काळजी घ्या...

सुधीर कांदळकर म्हणाले...

भानावर आलांत म्हणजे? बहुधा दोनदोन नर्सेसकडे पाहातांना देहभान विस्रलां होतांत त्यातून कां?

असो. वाढदिवसाच्या उशिरां काहोईना, लक्ष लक्ष शुभेच्छा. मला वाततें आपण ताबडतोब फुटबॉलची मॅच खेळूंया. तुम्हीं विरुद्ध मीं.

सुधीर कांदळकर

प्रमोद देव म्हणाले...

मदनबाण आणि कांदळकर साहेब आपल्या शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
कांदळकरसाहेब,फुटबॉलचा सामना कुठे ठेवू या? पुणे की मुंबई?
नाहीतर असे करू या,तुम्ही पुण्यातून खेळा मी मुंबईतून खेळतो म्हणजे आपल्यासारखे अजून काही लंगडधिन मधल्या पट्ट्यात सामील होतील. ;)
आपण दोघे गोलरक्षक होऊ या.
कशी वाटतेय आयडियाची कल्पना? :)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, काळजी घ्या. औषधं वेळेवर घेत चला. सध्या मीसुद्धा याच अवस्थेतून जात आहे. हाताचा स्नायू दुखावला आहे. जवळ जवळ बरा झाला होता पण माझ्याच चुकीमुळे हात पुन्हा बॅन्डेजमधे अडकला आहे.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

मलाही जास्त नेट सर्फिंग करता येत नव्हतं, त्यामुळे ब्लॉग वाचला नव्हता. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, काका! लवकर बरे व्हा!

नीरजा पटवर्धन म्हणाले...

श्या... जिप्सीला चलण्याबद्दल आग्रह केल्यामुळे मला आता जामच गिल्टी वाटायला लागलं... :(

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद कांचन(आदिती). अगं मी काळजी घेतोच आहे.(न घेऊन कुणाला सांगू? ;) )
तुही तुझ्या हाताची काळजी घे.


नीरजा, तसं मुळीच वाटून घेऊ नकोस.
आता ह्या वयात 'पाऊल घसरलं' तर तो दोष असलाच तर माझाच किंवा माझ्या वयाचा...असंच म्हणू या. ;)