माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ जानेवारी, २०१०

ब्लॉग माझा-पारितोषिक वितरण समारोह.

शेवटी एकदाचा झाला बुवा पारितोषिक वितरण समारंभ. देर आये,दुरुस्त आये...असं म्हणतात तसंच.
जवळजवळ दोन महिने ह्या समारंभाला उशीर झाल्याबद्दल मी स्टार माझाच्या प्रसन्न जोशीला जाबच विचारला असं म्हणता येईल. पण खिलाडूपणाने आपली चूक मान्य करतानाच त्याने त्याच्या आणि ह्या स्पर्धेचे परीक्षक श्री. अच्युत गोडबोले ह्यांच्या व्यस्ततेची योग्य प्रकारे जाणीवही करून दिली...त्यामुळे मी अशा तर्‍हेने त्याच्याशी बोलायला नको होतं असंही वाटून गेलं.
स्टार माझाच्या वतीने प्रसन्न जोशींनी आमची खूपच छान बडदास्त ठेवली होती. माणूस एकदम आवडून गेला मला.
असो.समारंभ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. त्याबद्दल वैयक्तिक प्रसन्न जोशीचे आणि एकूणच स्टार माझाचे मन:पूर्वक आभार. तसेच परीक्षक श्री,अच्युत गोडबोले ह्यांचेही मन:पूर्वक आभार.


परीक्षक , संगणक तज्ञ श्री. अच्युत गोडबोले आणि स्टार माझाचे प्रसन्न जोशी


पारितोषिकं स्वीकारण्यासाठी आलेल्या श्री.आनंद घारे(आनंदघन), नीरजा पटवर्धन(नीधप), दीपक कुलकर्णी, अनिकेत समुद्र(भुणभुणणारा भुंगा), दीपक शिंदे(भुंगा), देवदत्त गाणार, हरिप्रसाद भालेराव(छोटा डॉन),
मीनानाथ धसके, सलील चौधरी ह्या विजेत्यांना मी ह्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटू शकलो.
प्रत्यक्ष हजर राहू न शकलेल्या मेधा सकपाळ  ह्यांच्या वतीने विक्रांत देशमुख, राजकुमार जैनच्या वतीने निखिल देशपांडे आणि विजयसिंह होलाम ह्यांच्या वतीने त्यांचे मेव्हणे श्री.नीलेश पाटील ह्यांनी पारितोषिक स्वीकारले. ह्या प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तींचीही त्या निमित्ताने खास ओळख झाली.
श्री. सुनील तथा लक्ष्मीनारायण हट्टंगडी हे नव्याने ब्लॉगिंग सुरु करणारे ६७ वर्षाचे तरूण गृहस्थ खास परवानगी काढून ह्या समारंभाला उपस्थित होते. त्यांचीही ओळख झाली.




छायाचित्रात डावीकडून..अच्युत गोडबोले,छोटा डॉन,निखिल देशपांडे,देवदत्त गाणार,सौ. देवदत्त,आनंद घारे आणि अनिकेत समुद्र.



छायाचित्रात डावीकडून...नीरजा पटवर्धन, श्री नीलेश पाटील, सौ. देवदत्त (खिडकीजवळ कॅमेरासहित),सौ. नीलेश पाटील, विक्रांत देशमुख आणि दीपक शिंदे
(काही जण माझ्या कॅमेरातून सुटलेत त्याबद्दल क्षमा मागतो.)

श्री अच्युत गोडबोले ह्यांच्याबरोबर एकत्र बसून सर्वांनी आपापली ओळख करून दिली. त्याचप्रमाणे आपण का लिहितो,काय लिहितो वगैरेबद्दल औपचारिक माहिती दिली. श्री अच्युत गोडबोले ह्यांनी परीक्षक म्हणून नेमके काय पाहिले हे थोडक्यात सांगितले.तसंच ब्लॉगमध्ये अजून कोणकोणते विषय यायला हवेत ह्याबद्दलही काही मौलिक सुचना केल्या. त्यानंतर अल्पोपहार झाला.
नंतर प्रत्यक्ष पारितोषिक समारंभ आणि त्याचे चित्रिकरण पार पडले. ह्या कार्यक्रमाचे निवेदन अश्विन बापट ह्या उमद्या तरूणाने अतिशय सराईतपणे केले. त्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही सगळे स्टार माझाच्या कार्यालयाबाहेर पडलो.

कार्यक्रमाचे प्रक्षेपण केव्हा होईल ते नंतर कळवले जाईल.

पुढे आम्ही काही जण म्हणजे नीरजा, मी, आनंद घारे, हट्टंगडी, निखिल देशपांडे, छोटा डॉन, श्री व सौ. देवदत्त आणि दीपक कुलकर्णी असे सगळे मिळून शिवाजी पार्कजवळच्या जिप्सी हॉटेलात गेलो. तिथे प्रवेश करण्याआधीच मी माझा पाय मुरगळून घेतला. :(
तिथून खानपान करून मग सगळे आपापल्या मार्गाला लागले.
नीरजाच्या गाडीतून मी मग माहीम बस आगारामध्ये गेलो.
तिथे मला दीड तास बसची वाट पाहावी लागली. संध्याकाळी सात वाजता बसमध्ये बसलो ते रात्री नऊ वाजता घरी पोहोचलो. (तरी बरं की नीरजा मला घरापर्यंत सोडायला तयार होती पण माझा संकोची पणा नडला.  :D )

अशा तर्‍हेने  आजचा दिवस साजरा झाला.
आता बसलोय तंगडं धरून.  :D
ह्या वयात दुसर्‍यांदा पाऊल घसरलं! ;)



माहिम बस आगारात बसल्या बसल्या टिपलेला सुर्यास्त!
.....सर्व छायाचित्रं माझ्या भ्रमणध्वनीच्या कॅमेर्‍यातून टिपलेली आहेत....

१० टिप्पण्या:

नरेंद्र गोळे म्हणाले...

पुरस्कार प्रत्यक्ष पदरात पडल्याखातर पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

सोबतच सर्व विजयी स्पर्धकांचेही मन:पूर्वक अभिनंदन!!

माझी दुनिया म्हणाले...

"पुरस्कार प्रत्यक्ष पदरात पडल्याखातर पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

सोबतच सर्व विजयी स्पर्धकांचेही मन:पूर्वक अभिनंदन!!"

असेच म्हणते, आता पार्टी लागू झाली ;-)

प्रशस्तीपत्रकाचा फोटो मोठा करता येत नाहिये का ?

अनामित म्हणाले...

मन:पूर्वक अभिनंदन!

सचित्र वृत्तांत खासच!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, वृत्तांत छान लिहिला आहे. आवडला. पुरस्कार प्रत्यक्ष मिळाल्याबद्दल अभिनंदन!

जयश्री म्हणाले...

पुन्हा एकदा अभिनंदन देवकाका :)
वृत्तांत छानच !!
पाय पुन्हा मुरगळला.........काळजी घ्या हो !!

प्रमोद देव म्हणाले...

गोळेसाहेब,माझी दुनिया,अनामिक,कांचन कराई आणि जयश्री आपणा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.

Minanath Dhaske म्हणाले...

देव काका, तुमचा हजर जबाबी पणा भावला. सगळ्या स्पर्धकांच्या मध्ये तुम्ही , घारे काका आणि हत्तंगडी काका सारखे "तरूण" लोक जास्त इम्प्रेस्सीव वाटले. तुमच्या या उत्साह बद्दल तुमचे अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. शक्य असल्यास तुमचे दोन चार हसरे फोटो पाठवा ( शक्यतो सगळे दात दिसेपर्यंत हसताना ). तुमचे अर्कचित्र काढण्याचा विचार आहे .
लोभ असावा
Minanath

TravelwithSagar म्हणाले...

अभिनंदन काका,
अशीच प्रगती करत राहा. आणि ह्या वयात पाऊले जपून टाका [:P]

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

देव साहेब, वृत्तांत झकास...!
एक सर्वांचा मिळून फोटो पाहिजे होता, असे वाटले.
पुन्हा एकदा ’स्टार माझा’च्या बक्षीसाबद्दल अभिनंदन...!!!

रस्त्यावरुन चालतांना दुकानाच्या पाट्या वाचायचा नाद सोडा आता म्हणजे पाय मुरगळणार नाही. ;) [ह.घ्या]

प्रमोद देव म्हणाले...

मिनानाथ,सागर आणि बिरुटेसाहेब धन्यवाद.