माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१० जानेवारी, २०१०

वडिलांची माया!

असं म्हटलं जातं की वडिल हे फक्त रागावण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी असतात. माया करण्याचा मक्ता फक्त आईकडेच असतो. वरवर पाहता हे बरोबर वाटते. पण वडिलांच्यात देखिल मायाळूपणा असतो ह्याची काही कमी उदाहरणे नाहीत. आता हेच पाहा ना!
मी रोज सकाळी व्यायामशाळेतून परत येत असतो त्यावेळी शाळा भरण्याची वेळ झालेली असते. शाळकरी मुलं आपापल्या पालकांच्या बरोबर शाळेत जात असताना दिसतात. त्या पालकांच्यात आई-वडिल,आजी-आजोबा,मोठा भाऊ-मोठी बहीण वगैरेंपैकी कुणी ना कुणी एकजण असतंच. ह्यापैकी दोन प्रातिनिधिक चित्रं आपल्यासमोर सादर करतोय. एक तिसरी-चौथीतली मुलगी. दिसायला तरतरीत. नेहमी आपल्या वडिलांचा हात धरून निमूटपणे चाललेली असते. रस्त्याने चालताना पिता-पुत्रीत कोणताही संवाद नसतो पण दोघेही रमत गमत चाललेले असतात. शाळा जवळ आल्यावर वडिल आपल्या मुलीचा हात सोडून तिला टाटा करतात आणि परत फिरतात. चार पावले चालून गेल्यावर पुन्हा मागे वळून पाहतात..मुलगी तिथेच उभी असते. पुन्हा टाटा होतो. वडिल पुन्हा चार पावले चालतात..पुन्हा वळून पाहतात...पुन्हा टाटा. वडिल वळणावरून दिसेनासे होईपर्यंत ती मुलगी तिथेच उभी असते आणि तोपर्यंत वडिलांनी किमान दहावेळा मागे वळून टाटा केलेला असतो.
कुणी म्हणेल पहिला-दुसरा दिवस असावा मुलीला सोडण्याचा...म्हणून असेल. पण मी गेली जवळजवळ २ वर्ष हे चित्र पाहतोय आणि आजही तेच चालू आहे....मागील पानावरून पुढे सुरु.
एक मतीमंद आणि शारिरीक तसेच वाचा-व्यंग असलेली बारा-तेरा वर्षांची मुलगी आणि तिचे वडिल रोज सकाळी भेटतात. त्या मुलीला नीट चालता येत नाही पण वडिल तिला अतिशय मायेने हात धरून चालवत तिच्या चालीने अतिशय संथपणे चालत असतात. अधून मधून तिच्याशी गप्पाही मारत असतात. मुलगी मधेच हसते...त्यावरून असे वाटते की बहुधा काही हास्यविनोद होत असावेत. हे चित्रही मी रोज पाहतो. वडिलांच्या चेहर्‍यावर नेहमी स्मितहास्य असते. कधीही चेहरा दुर्मुखलेला दिसत नाही. मधेच एकदोनदा वडिलांच्या ऐवजी त्या मुलीची आई तिला शाळेत सोडायला आलेली पाहिली पण वडिलांच्या वागण्यातली सहजता तिच्या वागण्यात दिसली नाही. ती आपल्या मुलीला ओढत ओढत चाललेली दिसली आणि चेहराही त्रासिक दिसत होता. रोज वडिलांबरोबर असताना त्या मुलीच्या चेहर्‍यावर असणारे हास्य अशावेळी अभावानेच दिसते.
पुरुष आपल्या भावना सहजपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करत नसतो म्हणून कदाचित त्याला माया-ममता वगैरे गोष्टींचे वावडे असावे असा आपल्या सगळ्यांचा ग्रह होतो असे मला वाटते. पण खरे काय आहे?
आपल्याला काय वाटते ते जाणून घ्यावे म्हणून ही दोन उदाहरणं दिलेत.

४ टिप्पण्या:

Sharvani Khare - Pethe म्हणाले...

मस्त. मला एक अनुभव share करवासा वाटतो. नेहमी कडक, शिस्तप्रिय वाटणारे वडिल आपल्या मुलिच्या लग्नाच्या वेळी कसे हळवे होतात हे मी ताईच्या लग्नात बघितल आहे. आयुष्यात प्रथमच मी त्यांच्या डोळ्यात पाणि आलेल बघितल. कन्यादानाच्या वेळी जे बाबा मी बघितले ते शब्दात सांगूच नाही शकत.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद शरवू(अमला)!

snehal s. kute म्हणाले...

मुलगी
देव माणूस मोठा.............
लाभे पिता हा................
मंदिर उजळे घरी ...................
करी आपल्याचसाठी जे सोसले ते,
विसरू नका हो कधी..........

पिता
साथ लाभे युगांची, म्हणुनीच आलो
या सौख्याशिखारावारी................
घ्या कुठेहीभरारी घरट्यातून , हि नाती जपा अंतरी............
मी माझ्यापरीने..... जे जे दिले हे ...गोड मानुनी घ्या..........

प्रमोद देव म्हणाले...

वा! स्नेहल,छानच आहेत तू व्यक्त केलेल्या भावना!