भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.
त्याचं काय झालं की परवा सकाळी मी व्यायामशाळेतून परत घरी येत होतो. रस्त्याच्या कडेकडेने चालत होतो आणि तेही उजव्या बाजूने.म्हणजे कसं, येणारी वाहने आपल्या नजरेसमोर दिसत असतात. अपघात होण्याचा कमीत कमी धोका.
हं, तर काय सांगत होतो की रस्त्याच्या कडेकडेने चालत येत होतो. एवढ्यात एक सायकलस्वार दूधवाला मला जवळ जवळ घासूनच पुढे गेला. मी त्याला आवाज दिला(तो आवाज नव्हे हो...हाक मारली म्हणा) आणि थांबवले. थोडंसं त्याचं बौद्धिक घेतलं. घंटीचा उपयोग का करत नाहीस असंही विचारलं; पण तो उलट माझ्यावरच गुरकावला. अंगापिंडाने मजबूत तर होताच आणि त्यात तरूणही होता. त्यामुळे माझे उपदेशपर बोलणे त्याला काही फारसे रुचले नाही.
आपको लगा तो नही ना?..असे उद्धटपणे बोलून त्याने पुन्हा सायकलवर टांग टाकली आणि सायकल दामटली. पण काही पावले पुढे जात नाही तोच त्याने एका शाळकरी मुलाला सायकल जवळ जवळ ठोकलीच आणि तो मुलगा,सायकलवाला असे दोघेही खाली पडले.
जाणारे येणारे लगेच जमले. त्या दोघांना उचलले. सुदैवाने त्या मुलाला काहीच लागले नव्हते पण तो चांगलाच घाबरलेला दिसला. त्याच्या मित्रमंडळींनी त्याला आधार देत शाळेकडे कूच केले. दूधवाल्याचे सगळे दूध सांडून गेले. सायकलचे हॅंडल वाकडे झाले. लोक त्याला चांगलेच फैलावर घेत होते आणि तो चूपचापपणे सगळे ऐकून घेत होता.
मीही तिथे पोचलो आणि त्याला सुनावले... देखो,मेरी बात मानते तो ऐसा नही होता था. जरा संभालकर चलाया करो.
बस्स. इतका वेळ निमूटपणे लोकांचे ऐकून घेणारा तो दूधवाला माझ्यावर खवळला आणि चवताळून माझ्या अंगावर आला आणि म्हणाला....
ये,सब आपकी वजहसे हुवा. ना आप मुझे रोकते,ना ही ऐसा कुछ होता.
मी म्हणालो....अरे भाई, इसमे मेरा क्या कसूर है? पहले तो तेरी सायकिलका धक्का लगते लगते मैं बच गया और अभी इस छोटे बच्चेको सीधा ठोक दिया. मैंने समझाया था न की सायकिल संभालकर चलाया करो और घंटीका भी इस्तेमाल करो. इसमे मैंने क्या गलत बताया?
हे ऐकताच त्या दूधवाल्याने मागचा पुढचा कोणताच विचार न करताच मला एक ठोसा लगावला आणि मला आडवा पाडला.
तसा आजवरचा माझा जीवनक्रम हा मार खाण्याचाच आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे अशा वेळी नको तेव्हा माझी सद्सद्विवेकबुद्धी अतिशय जागृत होत असते. त्याने मला मारले,मग मी त्याला मारले. मग पुन्हा त्याची पाळी मग माझी. नेमके काय साधतो आपण ह्यातून.....वगैरे वगैरे. असलेच विचार मी करत असतो. त्यामुळे स्वत:हून कधीच हल्ला करायचा नाही आणि केवळ स्वसंरक्षणापुरतीच आपली शक्ति वापरायची..असाच विचार आणि आचार माझा असतो.
त्यामुळे त्या दूधवाल्याच्या ठोशाचं इतकं काही वाटलं नाही; पण राग एका गोष्टीचा आला की...चूक त्याचीच आणि त्यासाठी शिक्षा मात्र मला होत होती.
इतर लोकांनी त्या दूधवाल्याला कसेबसे आवरले. मी धूळ झटकत उभा राहिलो आणि म्हणालो....उलटा चोर कोतवालको डाटे! गुन्हा तुने किया और उपरसे मुझेही मार रहा है?
माझे ते बोलणे ऐकून तो अजून पेटला आणि आणखी त्वेषाने माझ्या अंगावर आला. आता मी सावध होतो. त्याचे दोन सणसणीत फटके कसेबसे चुकवले. मनात म्हटलं, आता काहीतरी करायला हवंय. चूप बसलो तर हा आपला मुडदाच पाडायचा. इतक्यात त्याने तिसर्यांदा माझ्यावर हल्ला केला. मी तोही चुकवला आणि त्याच्या श्रीमुखात काडकन् बजावली.
काय होतंय हे कळायच्या आत हे सगळं घडलं आणि तो आडदांड तरूण धाडकन जमिनीवर पडला. हे पाहताच बघ्यांनी टाळ्या वाजवल्या.
तो दूधवाला जमिनीवर अगदी निपचित पडून राहिला. ते पाहून माझे मात्र धाबे दणाणले.
माझं स्वगत सुरु झालं पुन्हा... काय हे? माझ्याकडून नकळत हे काय झाले? तरी नेहमी स्वत:ला बजावत असतो की असे काही नाही करायचं मग आज कसा काय संयम सुटला? हा आता मेला-बिला तर नाही ना?.
इतक्यात लोकांनी कुठून तरी पाणी आणलं,त्याच्या तोंडावर मारलं आणि हुश्शऽऽऽऽऽऽऽ
तो भानावर आला. माझ्याकडे पाहात आणि हात जोडत मला म्हणाला....अंकलजी,माफ किजिये. गलती मेरीही थी और मैं खामखा आपके उपर गुस्सा उतारा. अच्छा हुवा, जो की आपने मुझे चाटा मारा, मेरी अकल ठिकाने आई.
आयंदासे ऐसी गलती दुबारा फिर ना होगी.
मी त्याला माफ केलं आणि आपला रस्ता सुधारला.
मंडळी,माझ्या लहानपणी देखिल मी नेहमीच मार खायचो.कधीच कुणाला मारायचो नाही. कारण क्षमा करण्यातच मोठेपणा असतो असं माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं. पण असाच एक प्रसंग तेव्हा घडला होता. त्या प्रसंगी खूप मार खाल्ल्यावर मी माझा हात उचलला होता आणि एका फटक्यातच प्रतिस्पर्ध्याला गार केलं होतं. कितीतरी वेळ तो बेशुद्धावस्थेत होता. त्यावेळी त्या मुलाचा अपराध विसरून सगळेचजण मला सुनावत होते. माझ्या आईने तर मला सक्त ताकीदच दिली होती की तू कुणाच्या वाटेला जाऊ नकोस आणि कुणी जरी तुझ्या वाटेला गेलं तरी फक्त स्वत:चा बचाव कर. आक्रमण करू नकोस. तुझ्या हातात भलताच जोर आहे. तुझा टोला म्हणजे भीमटोला आहे रे बाबा. अशाने तू कुणाला तरी जीवे मारशील आणि अपेशाचा धनी होशील. तेव्हा सावध राहा. वादविवाद,भांडणं आणि मारामार्यांपासून चार हात दूर राहा.
तेव्हापासून कान पकडले होते. आजतागायत ते पाळत आलो होतो पण परवा संयम सुटला आणि भीमटोला वर्मी बसला. थोडक्यात वाचलो तेव्हा आता पुन्हा काळजी घ्यायला हवी.
८ टिप्पण्या:
काही नाही हो, रोक बाय ठोक हाच न्याय हवा असल्या लोकांसाठी. तुमच्या भीम टोल्याचा वापर करायला कचरु नका. लातो के भूत बातो से नाही मानते.
aho tumhi uttam kelat. Tya murkhala kalayla hava hota ki tyane chuk keli aahe ani tya prantaat to vahavat chalala aahe. parat tumhi tyachya hun vayane mothe aahat. phar masta kelat tumhi. tumcha ulat abhinandan karayla hava.
प्रवीण आणि व्युत्पन्न, तुम्हा दोघांचे मन:पूर्वक आभार.
aapalyaa bheemtolyaalaa salaam!!
aapalyaa samaajaat ashyaa anke bheemTolyaanchee garaj aahe.
Parag
धन्यवाद पराग!
chaan
धन्यवाद कोहम !
Surprised, why not Marathi fonts?
Time and Day was in your favor.
First time on this page, liked the style of your page and arrangement.
More after gone through the rest of the topics.
VK
टिप्पणी पोस्ट करा