माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ जानेवारी, २००७

समभाग आणि त्यासंबंधाने काही! भाग २

भाग भांडवल(इक्विटी कॅपिटल) उभारण्याचे अनेक पर्याय आहेत. ते कोणते ते आपण बघू या.
१) जाहीर समभाग विक्री.. फक्त भारतीय आणि अनिवासी भारतीयांसाठी (पब्लिक इश्यु अथवा इनिशिअल पब्लिक ऑफर).
ह्यामधे दोन प्रकार आहेत १) मूळ दर्शनी किमतीला समभाग विकणे २) दर्शनी किंमत अधिक वाढीव किंमत(प्रिमियम)
२)जाहीर समभाग विक्री...परदेशांतील लोकांसाठी. ह्यातील काही प्रकार असे १) ग्लोबल डिपॉसिटरी रिसीट्स २)अमेरिकन डिपॉसिटरी रिसीट्स वगैरे वगैरे (ही माहिती कितपत योग्य आहे ह्या बद्दल शंका आहे. कृपया तज्ञांनी खुलासा करावा).
३)कर्जरोखे(डिबेंचर्स)ह्यात तीन प्रकार आहेत १)पूर्ण परिवर्तनीय(फ़ुल्ली कनव्हर्टीबल) २) अंशतः परिवर्तनीय(पार्टली कनव्हर्टीबल) आणि अपरिवर्तनीय(नॉन कनव्हर्टीबल). हे कर्जरोखे विक्रीला काढताना कंपनीला काही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावे लागते. ते असे.... व्याज दर,परिवर्तन कसे आणि कधी करणार आणि अपरिवर्तनीय रक्कम परत (रिडम्शन)कधी आणि कशा पद्धतीने करणार. ह्या कर्जरोख्यांतील परिवर्तनीय भाग (कनव्हर्टीबल पोर्शन) हा समभागात (इक्विटी शेअर) रुपांतरित होतो. उदा. १००० रूपयांच्या एका कर्जरोख्याला द‌.सा.द‌. शे. १०% असे व्याज देण्याचे ठरले तर हे व्याज(सरळ व्याज असते) दर सहा महिन्याने देण्यात येते. जर हा कर्जरोखा पूर्ण परिवर्तनीय असेल तर परिवर्तनाच्या अटींप्रमाणे(उदा. कर्जरोखा प्रदान करतानाच(अलॉटमेंट) ५०० रूपयांचा एक भाग हा १०रु. दर्शनी मूल्याच्या ५० समभागात परिवर्तीत होईल आणि राहिलेला ५०० रु. चा दुसरा भाग हा १०रू. दर्शनी मूल्याच्या ५० समभागात ६ महिन्याने(तारीख जाहीर करावी लागते) परावर्तित होईल.) त्याचे समभागात परिवर्तन होईल. जर कर्जरोखा अंशतः परिवर्तनीय असेल तर त्याचा कोणता आणि किती अंश केंव्हा परिवर्तनीय आणि कोणता आणि किती अंश अपरिवर्तनीय आहे हे देखील जाहीर करावे लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: