माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.

14 सप्टेंबर 2010

आणि गणपती मोदक बनवतो !

अहो उठा!
अहो,म्हटलं उठावं महाराजांनी!
आज एका माणसाचा वाढदिवस आहे ना, मग उठा बघू.

अरे वा,म्हणजे लक्षात आहे तर तुझ्या?

का नसणार? सगळं जग...विशेषेकरून भारतवासी..त्यातही विशेष करून महाराष्टीय लोक हा तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे करतात...आणि इतकं सगळं माहीत असूनही मी बरी विसरेन. त्यातून हल्ली सगळ्या दिनदर्शिकांमधूनही ठळकपणे तुमच्या वाढदिवसाच्या दिनांकावर लाल रंग असतो...म्हणजेच सुट्टी असते सगळ्या लोकांना. का तर म्हणे वाढदिवस कसा झोकात व्हायला हवा ना!

आज माझा वाढदिवस? पण मग माघात झाला तो काय?

सगळ्याच महापुरुषांच्या जयंतीबाबत वाद असतात...म्हणून मग ज्याला जे सोयिस्कर वाटेल तो ते साजरे करतो. आपल्याला काय,दोनदोनदा भेटवस्तू मिळतात हे काय कमी आहे.

अच्छा, म्हणजे त्या बेंबट्या जोश्यासारखेच झाले माझे म्हणायचे?

कोण हो तो बेंबट्या?

अगं तो गं..कडमड्याचा बेंबट्या जोशी...त्याच्या आईवडिलांचाही ह्यावरून वाद...एक म्हणे की आषाढी एकादशीला तर दुसरा म्हणे की कार्तिकी एकादशीला...तसेच काहीसे.

ते काहीही असो...पण दोन्ही एकादश्याच होत्या ना मग झाले तर! अय्या, आठवलं! तुमचाही जन्म चतुर्थीचाच की हो..अगदी दोन्ही वेळी.

ए पुन्हा बोल ना अय्या !

इश्श्य! काहीतरीच काय बाई?

घ्या! अय्या म्हणायला सांगितलं तर इश्श्य म्हणून मोकळी झालीस. पण काहीही म्हण हं ह्या महाराष्ट्र देशीच्या बायका लाजतात मात्र सुंदर आणि दिसतातही.....

हं!पुरे,पुरे!जास्त पुढे जाऊ नका! उठा आता लवकर!कितीतरी कामं उरकायचेत! त्यात ते मोदकही बनवायचेत!किती कष्टदायक प्रकार आहे बाई! कशा त्या बायका बनवत असतील कुणास ठाऊक!
अगं मग घे की शिकून, तुला काय कठीण आहे ते?

म्हणे कठीण नाही.कठीण नाही? बोला, तुम्ही बनवताय का?

अगं,मी कुठून बनवणार आणि कसे बनवणार?

कुठून म्हणजे काय? स्वयंपाकघरात जाऊन...इथे आपल्याच घरात!

पण मी कधीच बनवलेले नाहीत.

मी आहे ना! तुम्हाला बनवण्याची सगळी रीत समजावून सांगते.

अगं,पण हे बायकांचं काम आहे ना? पुरुष कुठे करतात असली कामं? आणि मी आजवर कुठे काय केलंय?

काही तरी बोलू नका. घरात सोडले तर इतरत्र कुठेही सार्वजनिक ठिकाणी खायला जा...आचारी,महाराज वगैरे काही नावं द्या..तिथे जेवण बनवणारे सगळे पुरुषच असतात ना!

अहो हे तर सोडाच...आत्ताच मी वाचलं...

काय वाचलंस? कुठे वाचलंस? (स्वगत) कशाला वाचलंस?


दाखवते थांबा. अगदी सचित्र दाखवते.

(स्वगत) मेलो ठार! ही म्हणजे अगदी त्या म्हैस कथेतल्या मास्तरासारखी आहे....धोतरावर ऑर्डरली थुंकला म्हणून दाखवणारा..एक्झिबिट नंबर वन !

काय बोललात?

नाही, काही नाही! तू काय दाखवते आहेस ते दाखव असे म्हणत होतो.

हं तर हे पाहा आता....मुळच्या महाराष्ट्र देशीच्या पण आता इटलीत कामानिमित्त गेलेल्या विद्याधराने पाहा कसे सुबक मोदक बनवलेत. नाही तर तुम्ही?

अरे वा! हा पण विद्याधर का? (स्वगत)माझा कितवा अवतार हा? पण आता माझ्यावरच संकट आणलंय ह्यानं. चला, विघ्नहर्ता,उठा आता. पाहा आता, हे स्वत:वरचं संकट तरी दूर करता येतंय की नाही?

पाहा,पाहा ह्या मर्त्य लोकातल्या विद्याधराला जर इतके सुबक मोदक बनवता येत असतील तर तुम्हाला ते अशक्य कसे असेल. शेवटी तुम्ही पडलात ६४ कलांचे अधिपती....काय कळलं का गणेश महाराज...आपलं विद्याधर!

कौतुकास्पदच आहे गं ह्या मुलाचं काम. पण उगाच मला भरीला पाडू नकोस हं. मला आता तयार होऊन जायचंय भक्तांच्या भेटीला.

तुमचं बाई बरं आहे, जो तो तुम्हाला बोलावतो,मग तुमच्या आईलाही बोलावतो. पण मेलं आम्हाला कधीच कुणी बोलावत नाही.

नाही कसं? अगं दसर्‍याला तुझा मान असतोच ना!

ते खरंय रे ! पण तुझ्यासारखं आमचं खास कौतुक नाही ना!

आता ह्या वेळेला मी खाली जाईन ना तेव्हा समस्तांना तशी बुद्धी देईन. आता झालं समाधान? मी करू माझ्या जाण्याची तयारी?

ए असं रे काय विद्याधरा,हेरंबा,अमेया.....नाही नाही चुकले. गणूऽऽ!

ही तुझी गणूऽऽ हाक मला नेहमीच मोहात टाकत असते. बरं चल बनवूया आपण मोदक.

अं हं ! आपण नाही...तू एकटाच बनवणार आहेस. मी हवं तर त्या दूरदर्शनवरल्या ठक्यांसारखी प्रग्रासमोर माना वेळावत उभी राहीन तुझ्या बाजूला...चल चल चल! आता उशीर नको...नाहीतर तिथे भक्त रागावतील.

तू म्हणजे ना....

12 सप्टेंबर 2010

गप्पा - टप्पा !

रोज आपण निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारतच असतो आपापल्या मित्रांशी... तसेच त्यांची सुरुवात कुठून होते आणि संपते कुठे हेही कैक वेळेला कळत नाही. अशाच काही खर्‍या/काल्पनिक गप्पा आपल्याला इथे एकत्रपणे वाचता येतील. :)

11 सप्टेंबर 2010

किस्से !

आजवर लिहिलेले सगळे किस्से एकत्र स्वरूपात वाचा ह्या इ-पुस्तकात.

10 सप्टेंबर 2010

ते रम्य दिवस !

माझ्या नोकरीच्या काळातील सुरुवातीचे ते मंत्रभारलेले रम्य दिवस आपण बर्‍याच जणांनी वाचले असतीलच...पण ज्यांनी नसतील वाचले त्यांच्यासाठी ते एकत्र स्वरूपात..पुस्तकाच्या स्वरूपात इथे वाचता येतील.


8 सप्टेंबर 2010

मराठी सुगम संगीतातील नररत्ने !

सुधीर फडके,श्रीनिवास खळे , स्नेहल भाटकर , यशवंत देव आणि दत्ता डावजेकर ह्या मराठीतील गाजलेल्या संगीतकार/गायक नररत्नांची ही थोडक्यात ओळख....वाचा.

6 सप्टेंबर 2010

मुक्काम पोस्ट मद्रास !

मद्रासच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यातील काही मजेशीर आठवणी वाचा एकत्रितपणे ह्या पुस्तकात.


माझे सांगितिक आयुष्य !

संगीत विषयक माझ्या काही गंमतीदार आठवणी एकत्रपणे वाचा ह्या पुस्तकात.


5 सप्टेंबर 2010

स्वगत !

स्वगत मालिकेतील तीनही लेख एकत्रपणे वाचता येतील ह्या इ-पुस्तकात.

4 सप्टेंबर 2010

मुक्काम पोस्ट अहमदाबाद !

माझ्या अहमदाबाद वास्तव्याची कहाणी वाचा आता पुस्तकरूपात.

3 सप्टेंबर 2010

जालरंग प्रकाशन आणि त्याचे ओळखचिन्ह !

मंडळी आम्ही काही जणांनी मिळून ह्यापूर्वी काही इ-अंक प्रकाशित केले...जसे की शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवाऋतू हिरवा आणि जालवाणी ...इत्यादि. आता आम्ही दिवाळी अंकही काढत आहोत. तेव्हा काही जणांनी असे सुचवले की आपल्या ह्या अंकांसाठी अमूक एक प्रकाशन असे काही  ओळखचिन्ह असावे...आणि प्रकाशनाचेही काही तरी वैषिष्ठ्यपूर्ण नाव असावे. म्हणून मग आम्ही आमच्या प्रकाशनासाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले...त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला...साधारण १४-१५ सुचवलेल्या नावातून मग बहुमताने निवड झाली ती...जालरंग प्रकाशन ह्या नावाची.

आता त्या नावाचे ओळखचिन्ह बनवायला हवे होते....मग पुन्हा त्यासाठी आवाहन केले गेले आणि एकूण २७ अशी रंगीबेरंगी  ओळखचिन्ह जमली...त्यातून एकाच ओचिची निवड करणे खूपच कठीण काम होते..म्हणून आम्ही पुन्हा त्यासाठी मतदान घेतले आणि त्यात बहुमताच्या जोरावर विशाल कुलकर्णी निर्मित एका ओचिची निवड नक्की केली.....त्याबद्दल विशालचे मन:पूर्वक अभिनंदन!

                                हेच ते ओळखचिन्ह
आता ह्यापुढे आम्ही  जालरंग प्रकाशन ह्या नावाने आणि वर दिलेल्या ओळखचिन्हाने पुढचे अंक प्रकाशित करू ह्याची वाचकांनी/रसिकांनी कृपया नोंद घ्यावी.