मी आता ठरवलंय की ह्या महाजालावरचा इ-कचरा वाढवायचा नाही..... अहो पण हा इ-कचरा काय असतो?
सांगतो. जरा थांबा.
सर्वसाधारण इ-कचरा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे जुन्या-पुराण्या, पुन्हा न वापरता येणार्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु,त्याचे सुटे भाग वगैरे असे येते. बरोबर आहे. तो सगळा इ-कचराच आहे. त्याची विल्हेवाट कशी लावावी,त्यातल्या कोणत्या गोष्टी पुनर्वापरात आणता येतील,ज्या तशा वापरता येणार नसतील तर त्याचे काय करावे...वगैरे प्रश्न सद्द्या आपल्याला भेडसावत आहेतच.
ह्या सगळ्याबरोबरच आता महाजालावर आपण जो काही विदा(डेटा) चढवतो आणि तिथून उतरवून घेतो....त्याचा साठा आता इतक्या प्रचंड प्रमाणावर होत चाललाय की त्यातूनही ह्या इ-कचर्याची समस्या निर्माण होणार आहे असे मला वाटतंय. आता हा विदा कोणकोणत्या स्वरूपात आपल्याला दिसतो?
१)लेखन...त्यात लेख आले,खरडी आल्या,व्यक्तीगत निरोप आले,विरोप(इ-मेल) आले,गप्पा(चॅटिंग) आलं,जाहिराती आल्या,ढकलपत्र आली(ह्यांना तर सुमारच राहिलेला नाहीये)... आता हा दिवसेंदिवस वाढत चाललेला लेखनसाठा कुठवर जाणार आहे? त्याला कोणती मर्यादा आहे का?
२)ध्वनीमुद्रण..ह्यात गाणी,संवाद वगैरे येतात. लेखनापेक्षा ह्याला जास्त जागा लागते. रोज लाखोंनी लोक अशा तर्हेने गाणी महाजालावर चढवत असतात/उतरवून घेत असतात.
३) ध्वनीचित्रमुद्रण...ह्याला सगळ्यात जास्त जागा लागते....इथेही तेच.
४)चित्र,छायाचित्रं....ह्यांनाही भरपूर जागा लागते...इथेही तेच.
अशा तर्हेने निरनिराळ्या माध्यमातून आपण महाजालावर/घराघरातून विदा साठवत चाललेलो आहे. एका लेखाच्या/गाण्याच्या,दृष्याच्या,छायाचित्राच्या अनेक आवृत्त्या..वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आपण पाहत असतो..आपणही चढवत/उतरवत असतो. त्यामुळे तोच तोच विदा भरमसाठ वाढत जातोय. विदा वाढतोय म्हणून बँडविड्थ वाढवावी लागतेय,साठवण क्षमता वाढवावी लागतेय. त्यामुळे विजेचा खर्च वाढतोय. त्यामुळे उष्णतेचं उत्सर्जन वाढतंय...हवेतला कार्बन वाढतोय. जीवनावश्यक गोष्टींकडचा खर्च इथे वळवला जातोय...वगैरे वगैरे. खूप जास्त बोलतोय का मी? बरं सद्द्या इथेच थांबतो. :)
ह्या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत...ह्याच्यात माझाही काही वाटा आहेच आणि तो वाटा पूर्णपणे बंद करणे मला जमणार जरी नसले....कारण? व्यसन लागलंय महाजालाचं आणि व्यसन असं सहजासहजी सुटत नाही म्हणून निदान काही प्रमाणात तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सद्द्या मी ठरवलंय की माझे लेखन मी फक्त माझ्या जालनिशीवरच करेन. त्याचीच आवृत्ती पूर्वीसारखी इतरत्र कोणत्याही संकेतस्थळावर चढवणार नाही. आलेले व्यनी, खरडी,विरोप वगैरे वाचून होताच पुसून टाकणार आहे. कुणी म्हणेल ही तर दर्यामे खसखस आहे.. असेलही. नाकारतंय कोण. मी देखिल म्हणतोय की ही एक छोटीशी सुरुवात आहे. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. हळूहळू त्यातही प्रगती होऊ शकतेच की. बहुतेकांना हे म्हणणे पटणार नाही. काहीतरी नवीन फॅड आहे म्हणूनही संभावना होईल. होऊ द्या. पण कदाचित काही लोकांना हे म्हणणे पटेलही,ते देखिल त्यांच्या परीने प्रयत्न करतील आणि कालांतराने ही एक मोठी चळवळ होईल.
हसलात ना? मी दिवास्वप्नं पाहतोय असं वाटतंय ना?
खरं तर मलाही तसंच वाटतंय. पण हे स्वप्न भलतंच रम्य वाटतंय मला त्यामुळे त्यातच हरवून जायला आवडतंय. :)
पाहूया ह्यातनं काय साध्य होतंय ते.
सद्द्या तरी उद्दिष्ट मर्यादित आहे...त्यावर अंमल करू शकलो तर ....
सांगेन पुढच्या वेळी.
४ टिप्पण्या:
हा लेख छापण्याची सोय करून देऊन तुम्ही कागदाचा वापर पर्यायाने झाडांची कत्तल वाढवलीत त्याचे काय ?
प्रथमदर्शनी विचार केल्यास तू म्हणतेस ते पटतंय; पण जरा नीट विचार केला तर मात्र तुझे म्हणणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्यांना संगणकाच्या पडद्यावर वाचायला त्रास होतो असे लोकच ही सोय वापरतील ह्याची खात्री आहे. दुसरे म्हणजे कागद हा पुनर्वापरात(रिसायकलिंग) येऊ शकतो. :)
देव साहेब, काय चाल्लंय हे असं सध्या ?
कशाचा इ-कचरा आन कशाचं काय ! मस्त लिहित राहा......!
आपल्या ब्लॉगवरील पोस्टांचे आपल्याकडे बॅक-अप असलं की झालं. बाकी एकच पोस्ट अनेक संकेतस्थळांवर प्रकाशित करणे मलाही पटत नाही फारसं. तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो व मीही तसे आचरण्याचा प्रयत्न करतो.
टिप्पणी पोस्ट करा