माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ९

आमचे दिवस मजेत चालले होते. भर उन्हाळ्यात मद्रासमध्ये आणि मजेत हे जरा विचित्र वाटते ना? पण दिवसभर आम्ही कामात गढून गेल्यामुळे आम्हाला बाहेरच्या वातावरणाची विशेष फिकीर वाटली नाही. आणि प्रकें चा तो पट्टा सोडला तर मद्रासमध्ये ठिकठिकाणी फळांचे ताजे रस मिळत असत. १ रुपयात पूर्ण ग्लास(विश्वास बसत नाही ना?). त्यामुळे आम्ही, एक सकाळ सोडली तर एरवी जेव्हा इच्छा होईल तेव्हा फळांचा रसच पीत असू. ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे चिंटूचे वजन जवळजवळ ७ किलोने कमी झाले . योगासने,शाकाहार आणि रसप्राशन अशा त्रिसूत्रीमुळे तो जरा बारीक(तुलनात्मक) दिसायला लागला. त्याचा फायदा त्याला योगासनं करण्यात व्हायला लागला आणि त्याची त्यातील रुची वाढली.

अगोदर सांगितल्या प्रमाणे ह्या प्रकें मध्ये भारतातील निरनिराळ्या भागातून आणि निरनिराळ्या सरकारी खात्यातून(राज्य सरकार आणि केंद्र सरकार) प्रशिक्षणार्थी आले होते. एकमेकांची हळूहळू ओळख व्हायला लागली. मग कोण कुठले वगैरे चौकश्या झाल्या. आमच्या सारखेच मुंबईहून दोन जण विदेश संचार निगम मधून आले होते आणि ते दोघे चक्क मराठी होते. पण त्यांनी आमच्यात खास रस दाखवला नाही. नंतर त्याचे कारण कळले. मुंबई आणि मुंबईतील एकूणच सर्व गोष्टी म्हणजे सिनेमा जगत आणि त्यासंबंधीच्या दंतकथा, मुंबईतील मोकळे वातावरण(स्त्री-पुरुष संबंध)वगैरे गोष्टींचे मुंबईबाहेरील लोकांना जबरदस्त आकर्षण होते. अनायासे मुंबईची माणसे भेटली तेव्हा त्यांच्याकडून आपले कुतूहल शमवून घेण्यासाठी ह्या दोघांच्या भोवती नेहमीच इतरांचा गराडा पडलेला असे. त्यातून ते दोघे अगदी नीटनेटके राहत आणि शक्य तो इंग्लिशच बोलत. आम्ही सुध्दा त्यांना त्यांच्या ह्या गराड्यातून बाहेर काढायचा कधी प्रयत्न केला नाही.

आम्ही देखिल त्यांच्यासारखे मुंबईकर आहोत हे कळल्यामुळे काही जण आमच्या भोवती जमत. चित्रपटातील नटनट्यांबद्दल त्यांना प्रचंड कुतूहल होते. रामालिंगम आणि मंडळींचे प्रकरण अगोदर सांगितले आहेच. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे ह्या सर्वांचे प्रश्न होते आणि उत्तरं द्यायला चिंटूसारखा फेकसम्राट असल्यानंतर तर काय मैफल रंगली नाही असे होणे शक्यच नव्हते. त्या लोकांचे ते भाबडे प्रश्न ऐकून मी एकदा बोललो सुध्दा की तुम्हाला जसे वाटते तसे काही नसते. पण माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून ते चिंटूचे रसभरित प्रवचन मोठ्या भक्तिभावाने ऐकत. हळूहळू तो त्या सर्व लोकांच्यात लोकप्रिय झाला. आमचे ते दुसरे दोन मुंबईकर बघता बघता एकटे पडले. कारण त्यांच्या भोवतीची गर्दी आता चिंटूभोवती एकवटली. हे कमी म्हणून की काय आम्हाला शिकविणारे प्रशिक्षक, ते देखील त्याच्या भजनी लागले. चिंटूचा अगदी 'चिंटू महाराज' होऊन गेला.

हे सगळे बघून मी देखील ठरवले की आता आपला प्रामाणिकपणा बस्स झाला, म्हणून मी चिंटूची री ओढायला सुरुवात केली. मधून जरा उगीचच, अरे चिंटू ती धर्मेंद्रची फजिती सांग ना! अशी फर्माइश पण करत असे.
तुम्हाला सांगतो अहो मी आपलं काय तरी बोलायचं म्हणून बोलत असे पण चिंटू अजिबात बिचकत नसे. लगेच तो आजपर्यंत खाजगी असलेली (कधीही न घडलेली) गोष्ट, आपण (त्या सर्वांना कुठे बोलायचे नाही असे बजावून ) केवळ त्यांनाच सांगत आहोत असा आव आणून बिनधास्तपणे कुठेही न अडखळता सांगत असे. त्यामुळे लोकं एकदम खूश होत आणि मला पण जरा भाव देत(अगदीच काही गया गुजरा नाही, ह्यालाही बरीच माहिती दिसतेय,ह्या अर्थाने). खोलीवर आल्यावर चिंटू मला म्हणत असे, आयला,तू पण काय कमी नाहीस. एकदम गुगलीच टाकलास? खरे तर काय बोलावे मलाही माहीत नव्हते पण फेकत सुटलो. पण ,मला एक कळत नाही, हे लोक एव्हढे भोळे कसे? की आपली फिरकी घेताहेत स्वत:चा टाईमपास करण्यासाठी?
मी म्हटले, नाही. मला तरी तसे वाटत नाही. तुझे बोलणे ते एकाग्र चित्त करून ऐकत असतात. त्यांचे डोळे सांगतात की तू जे जे बोलतो आहेस ते त्यांच्यासाठी अद्भुत आहे!

ह्या सर्व लोकांच्या कुतूहलाचा अजून एक विषय म्हणजे मुंबईतील स्त्री-पुरुष संबंधातील मोकळेपण. मला काही जणांनी विचारले, तुला किती गर्लफ्रेंड्स आहेत ?
मी खरे खरे उत्तर दिले. मला एक पण गर्लफ्रेंड नाही आणि मी मुलींशी बोलत नाही आणि त्यांच्याकडे बघायची सुध्दा माझी हिंमत नाही!
त्यांना हे उत्तर खोटे वाटले. त्यांच्या मते मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला एक तरी गर्लफ्रेंड असतेच आणि हे सगळे लोक(स्त्री-पुरुष) नेहमी समुद्रकिनारी उघडपणे प्रेम करत बसतात. आणि हे सगळे म्हणे त्यांना त्यांच्या गाववाल्यांनी सांगितलंय जे कधीकाळी मुंबईला जाऊन आले होते. ह्यावर मी काय बोलणार, कप्पाळ! पण चिंटूने त्यांची निराशा केली नाही. त्याने सांगितले, दिवसातून तो तीन गर्लफ्रेंडना वेगवेगळ्या वेळी फिरायला नेतो. खाण्या-पिण्याचा खर्च त्या मुलीच करतात. तशा त्याच्या बर्‍याच गर्लफ्रेंड्स आहेत पण खास अशा तीनच आहेत आणि त्या फिल्मलाईन मधल्या आहेत वगैरे. ह्या गोष्टीने त्यांचे समाधान तर झालेच पण त्यांच्या लेखी तो आता एकदम सुपरस्टारच बनला आणि मी बीग झिरो.

खर्‍याची दुनिया नाही हेच खरे असे म्हणून(मनातल्या मनात) मी पण त्यांच्या त्या आनंदात सामील झालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: