माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२५ फेब्रुवारी, २००९

सहल: किल्ले रायगड आणि शिवथरघळची!


क्षत्रिय कुलावतंस,गोब्राह्मणप्रतिपालक,हिंदूपदपातशाही संस्थापक,सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराज!


रायगडाच्या पायथ्याशी.


रायगडाकडे कूच!


अचानकपणे रायगड दर्शनाचा योग चालून आला आणि त्याबरोबरीनेच समर्थांच्या शिवथरघळीचेही दर्शन घडले. आमच्या मालाड मधील ’प्रयोग’ ह्या नाट्यकलाप्रेमी संस्थेने दिनांक २०-२१ फेब्रुवारी २००९ ह्या दोन दिवसांसाठी हा योग जुळवून आणला होता. जावे की न जावे ह्याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. कारण होते दुखावलेले पाऊल,जे अधून मधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. पण रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सोय आहे हे कळले आणि मग मी जाण्याचा निर्णय नक्की केला. आम्ही सर्व मिळून ३०-३५ जण होतो. आम्हाला रायगड आणि शिवथरघळीची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी डोंबिवलीहून एक खास व्यक्ती येणार होती. त्यांचे नाव होते श्री. सुरेश ग. वाडकर(गायक वाडकर नव्हेत!). मालाडहून खास बसने आम्ही सकाळी ६.३०ला निघालो. वाटेत नागोठणे येथे कामत ह्यांच्या उपाहारगृहात न्याहारी केली आणि मग तिथून रायगडाकडे प्रयाण केले. वाटेत माणगावला रहदारीची कोंडी झाल्यामुळे आम्ही नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीरा पोचलो.
रायगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर आमच्यापैकी फक्त पाचजण(मी धरून)रोपवेने वर चढले,तर बाकीचे सर्वजण पायी चढून आले.
दूपारचे जेवण झाल्यावर मग आम्ही जेव्हा रायगड दर्शनाला निघालो तेव्हा संध्याकाळचे ४ वाजून गेले होते,म्हणून फक्त महत्वाच्या गोष्टीच पाहण्याचे ठरवले. त्यात मुख्य म्हणजे महाराजांच्या राण्यांच्या राजवाड्याची जागा,बाजारपेठ,राज्यारोहण जिथे झाला ती जागा,जगदीश्वर मंदीर वगैरे ठिकाणे होती. त्यानंतर आम्ही महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मुजरा केला. प्रत्येक जागेचे ऐतिहासिक महत्व आणि त्याबद्दलची माहीती सुरेश वाडकर देत होते. हे सगळे करेपर्यंत सुर्यास्त झालेला होता. त्यामुळे मग आम्ही आमच्या निवासस्थानाकडे निघालो. वाटेत अंधारात पायर्‍या उतरतांना मधेच एका ठिकाणी माझे पाऊल पुन्हा दुखावले गेले पण सुदैवाने फारसे नुकसान नाही झाले. माझ्या मुलीच्या आधाराने आणि इतर लोकांच्या सहकार्याने मी इच्छित स्थळी सुखरूप पोचलो.
त्या रात्री आमचा मुक्काम रायगडावरच होता. रात्री जेवणं झाल्यावर विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यात माझ्यासकट बर्‍याच जणांनी आपले गुण प्रकट केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून,न्याहारी उरकून मग आम्ही रायगड उतरलो आणि शिवथरघळीकडे प्रस्थान केले.

दोरखंड मार्ग म्हणजेच रोप-वे!
फक्त चार मिनिटात वर पोचलो आणि नंतर तसाच खालीही उतरलो. ;) अशी चढ-उतार करण्यासाठी शुल्क आहे रुपये १५०/-(एकतर्फी रु.७५/-). ह्या यानातून वर-खाली करतांना खालचे विहंगम दृष्य नुसते पाहातच राहावे असे वाटते. पण ज्यांना चक्कर(व्हर्टिगो) वगैरेचा त्रास असेल त्यांनी मात्र ह्यात बसू नये.


रोपवे मधून दिसणारे खालच्या परिसराचे विहंगम दृष्य!आमच्यातले पायी चढून येणारे विश्रांतीसाठी एका ठिकाणी टेकलेत तो क्षण!


रायगडावरून टिपलेला सुर्यास्त!


मेघडंबरीच्या मखरात टिपलेले सुर्यास्त-बिंब!एक अवलिया...रायगडचा वारकरी आणि आमचे मार्गदर्शक श्री. सुरेश ग. वाडकर.
ह्यांनी १००८ वेळा पायी रायगडारोहण करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आमच्या बरोबर ते आले ती त्यांची ६५४वी खेप होती.
ही व्यक्ति रायगड प्रेमाने वेडी झालेय. हे गृहस्थ डोंबिवलीत राहतात आणि त्यादिवशी ते डोंबिवलीहून सतत पायी प्रवास करून रायगडावर पोचले होते. रायगडाचा इतिहास त्यांना मुखोद्गत आहेच पण त्यांच्या बरोबरीने यथासांग रायगड जर बघायचा असेल तर किमान ५-६ दिवस रायगडावर वास्तव्य कराबे लागेल. त्यांना पक्षांची भाषा कळते असे त्यांच्याकडून कळते. आमच्यातले जे लोक वाडकरांबरोबर पायी चढले त्यांना प्रात्यक्षिकही पाहायला मिळाले. ह्या सद्गृहस्थाचे हस्ताक्षर पाहून थक्क व्हायला होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी पाहिली तेव्हा त्यातील हस्ताक्षर अगदी छापल्यासारखे सुंदर होते. कोणतेही पान उघडले तरी त्यावरील अक्षरात अजिबात फरक दिसत नाही इतके ते अचूक आणि नेमके होते. ह्यांचे छायाचित्रणही अतिशय देखणे असते. तसेच चित्रकला,काव्य वगैरेमध्येही त्यांची गती विलक्षण आहे. इतकेच नाही तर क्रिकेटमध्येही ते पारंगत आहेत. यष्टीरक्षणात त्यांना विशेष प्रावीण्य आहे असे त्यांनीच सांगितले. आमच्या चमूतील सगळे आबाल-वृद्ध त्यांच्या उपस्थितीने भारावून गेलेले होते. त्यांच्या सततच्या रायगड आणि इतर दूर्ग भ्रमणामुळे मी त्यांना त्यांचे वाडकर हे आडनाव बदलून त्याऐवजी गडकर असे आडनाव करावे अशी सूचना केली. :) बालचमूने तर त्यांचे नामकरण ’रायगडकाका’ असेच केले आहे.


गड चढताना...खाली दिसणारे विहंगम दृष्य!


रायगडच्या बाजारपेठेत!


बाजारपेठेतून फेरफटका!शिवथरघळीच्या तोंडाशी!


शिवथरघळ!


घळीच्या बाजूचा धबधबा. सद्या कोरडा पडलाय. पावसाळ्यात मात्र हा ओसंडून वाहतो असे आमचे मार्गदर्शक सांगत होते. इथेच समर्थांनी तपश्चर्या केली. त्यावेळी घनदाट जंगल होते. तसेच तिथे वाघ सिंहांसारखी हिंस्र श्वापदे,तसेच सरपटणारे विषारी प्राणी ह्यांचेही वास्तव्य होते. ह्या ठिकाणी आता समर्थ आणि त्यांचा पट्टशिष्य कल्याणस्वामी ह्यांचे पुतळे आहेत. समर्थ दासबोध सांगताहेत आहेत आणि कल्याणस्वामी तो लिहीण्याचे काम करताहेत असे दृष्य आहे.
विशेष म्हणजे बाहेर प्रचंड उकाडा होता तरी घळीच्या आत मात्र मस्तपैकी थंडगार वातावरण होते.


टीप: आजवर हजारो लोकांनी रायगडाची विविध कोनातून काढलेली छायाचित्रे महाजालावर प्रकाशित केलेली असल्यामुळे तशा प्रकारची छायाचित्रे मी जाणीवपूर्वक प्रकाशित करत नाहीये.कारण त्यात वेगळेपणा असा काही जाणवणार नाही असे मला वाटते.

८ फेब्रुवारी, २००९

शंकरराव! २

बापूशेठ आणि गोविंदराव ह्या दोघांना आमच्या कार्यालयात चहा बनवायला ठेवल्यामुळे साहजिकच चंदूशेठकडचा आमचा चहा पिणे बंद झाले. त्यामुळे शंकररावाचे आमच्या इथे येणे कमी झाले. पण अचानक एक संधी अशी आली की शंकरराव आमच्या कार्यालयात कायमचा चिकटला.
त्याचे असे झाले. आमच्याकडच्या झाडूवाल्याने कायमची नोकरी सोडून गाव गाठला. मग आयत्या वेळी त्याची जागा कोण घेणार? बापूशेठने शंकरमामाचे नाव सुचवले. आम्ही त्याला विचारले तर म्हणाला.... झव,मी कुनबी हाय! मी नाय झाडू मारन्यासारखी हलकी कामं करनार!(कोणत्याही वाक्याची सुरुवात...झव...ह्या शब्दाने होत असे. त्या शब्दाला काही अर्थ मात्र नव्हता.)
मग बापूशेठ म्हणाला.... मामा,उगाच नाटक करू नुको. ही नोकरी पर्मनंट हाय. चंदूशेठकडं मिलतो त्येच्यापेक्षा रगड पगार मिलेल,सुट्टीबी मिलेल. तवा आता नाय म्हनू नुको. आपन आपल्या घरात झाडू मारतो का नाय? तसा हिथं मारायचा. हाय काय आनि नाय काय?
तरी शंकरराव तयार होईना. पण आम्ही ह्यावेळी त्याला सोडायचेच नाही असे ठरवले होते. त्याची मुख्य हरकत होती ती संडास साफ करण्यासाठी. त्याबद्दल त्याची खात्री करून दिली की त्याच्या कामात संडास सफाई येत नाही. त्यासाठी एक वेगळा माणूस नेमलाय वगैरे. तेव्हा कुठे शंकरराव एकदाचा तयार झाला.

शंकरराव अशिक्षित होता पण त्याने काढलेला मुद्दा बिनतोड होता. कारण खरे तर झाडूवाला(स्वीपर) च्या कामात संडास सफाई देखिल येत असे. पण ह्यातली गोम अशी होती की झाडूवाला(स्वीपर) आणि फरशी साफ करणारा(फराश) अशी दोन पदं आमच्या कार्यालयात होती तरी सर्वप्रथम ती जेव्हा भरली गेली होती तेव्हा तत्कालीन कारकुनाने त्याच्या भाषिक अज्ञानामुळे पार उलटापालट केलेली होती. दोन्ही पदांसाठी पगार जरी तेवढाच होता तरी कामाचे स्वरूप मात्र वेगवेगळे होते. पण झाले काय की आता फराशला संडास सफाई करावी लागत होती आणि झाडूवाल्याला फक्त कार्यालयीन साफसफाई करावी लागत होती. पूर्वापार चालत आलेली ही चुकीची प्रथा कुणीही मोडायची तोशीस घेतली नाही आणि ती आजही तशीच सुरु आहे.

शंकररावाची खात्री झाली आणि त्याने पदभार स्वीकारला. शंकरराव कामाला एकदम वाघ निघाला. एका आठवड्यातच त्याने कार्यालयाचे स्वरूपच पालटून टाकले. साफसफाई इतकी की आमचे साहेबही त्याच्या कामावर खूश झाले. जेवणाची सुट्टी सोडली तर शंकरराव सदोदित कामात असायचा. आमचा आधीचा झाडूवाला सकाळी आल्या आल्या एकदा कार्यालय झाडून घ्यायचा,मग लादी पुसायचा आणि मग दिवसभर गप्पा ठोकत बसायचा. पण शंकरराव मात्र सतत कार्यमग्न असायचा. तासातासाने कचर्‍यासाठी ठेवलेल्या बादल्या साफ करत बसायचा (त्यात कचरा असो नसो). कुठे टेबल साफ कर,कुठे पंखा साफ कर तर कुणाला पाणी आणून दे, बाहेरून कुणासाठी विडी-काडी,पोस्टाची कार्ड-पाकिटे आण,हॉटेलातून जेवण आणुन दे असली सगळी कामं हसतमुखाने करायचा. त्याची विश्रांती म्हणजे जेवल्यावर जेमतेम दहा मिनिटाची बसल्या बसल्या काढलेली डुलकी. त्या दहा मिनिटात तो गाढ झोपायचा आणि चक्क घोरायचाही. पण त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला तयार असायचा.

साधारण सव्वा पाच फूट उंची,काटक बांधा,गालफडं बसलेली आणि खपाटीला गेलेले पोट अशा शंकररावाच्या पोटाची भूक मात्र जबरी होती. कोंकणी असल्यामुळे बसल्या बैठकीला ढीगभर भात सहज हादडत असे. वर चपात्या-भाजी, दोनचार केळी असली तर मग तो अजून खूश असायचा. घरून चपाती-भाजीचा डबा बरोबर आणायचा. कुणाच्यातले काही खाणे नाही आणि कुणाला काही देणे नाही. शंकरराव जात-पात मानणारा असल्यामुळे एखाद्याने कितीही आग्रह केला तरी सुरुवातीला त्याच्याकडचे खाणे अजिबात घेत नसे. पण पुढे पुढे जसजशी ओळख वाढत गेली आणि अमूक एक आपल्या किंवा आपल्यापेक्षा उच्च जातीचा आहे हे कळल्यावर मग त्याच्याकडचे खाणे खाऊ लागला होता. शंकररावाच्या भूकेची आणि जबरदस्त पचनशक्तीची एकदा आम्हाला योगायोगाने प्रचिती आली त्याचा एक किस्सा आहे.

आमच्या कॅंटीनमध्ये हल्ली चहा-कॉफी बरोबरच मधल्या वेळचे जेवणही बनवायला सुरुवात झालेली होती.असाच एके दिवशी शंकररावाने घरून डबा आणलेला नव्हता. त्या दिवशी कॅंटीनमध्ये डाळ-भाताचा बेत होता. शंकररावाची भूक जबरदस्त असल्यामुळे त्याने चांगला चार मुदी भात खाल्ला(थाळीत फक्त दोन मोठ्या मुदी आणि वाडगाभर डाळ मिळत असे).हात धूवून शंकरराव विश्रांतीसाठी खुर्चीवर टेकला नाही तोच तिथे आमचे सुरक्षारक्षक साबळे हवालदार त्यांचा भला मोठा डबा घेऊन जेवायला आले. हा गडी अंगा-पिंडाने मजबूत होता. सहा फूट उंची आणि भरदार देहयष्टीच्या त्या माणसाने आपला डबा उघडला आणि त्याने आणलेल्या कालवणाने शंकररावाच्या तोंडाला पाणी सुटले; पण तो नुसते डोळे मिटून बसला. साबळे हवालदारांनी औपचारिकपणे शंकररावाला..या जेवायला.. असे म्हटले. त्यावरचे शंकररावाचे उत्तर ऐकून साबळे हवालदार पार उडालेच.
शंकरराव म्हणाला.. झव,मी खाल्लं तर तुम्हाला काय उरणार नाय.
अरे शंकर्‍या, चांगल्या बारा चपात्या आहेत. तू खा. मला काय कमी नाय पडणार. तू खाणार आहेस काय ह्या सगळ्या चपात्या?
खाईन की! पर,तुमी उपाशी र्‍हाल त्याचं काय?

एक य:कश्चित कोंकण्या एका घाट्याला, तेही साबळ्यांसारख्या बलदंडाला आव्हान देतोय? साबळेंना हे सहन होणारे नव्हते.
ते म्हणाले...तू माझी काळजी करू नकोस. पण एक अट आहे, ह्या सगळ्या चपात्या खायच्या. काहीही उरवायचे नाय. कबूल असेल तर बोल.
अवो पण तुमी उपाशी र्‍हाल ना...
तुला एकदा सांगितले ना की माझी काळजी करू नकोस म्हणून. हिंमत असेल तर बोल.
ह्या गोष्टीची कुणकुण मला लागली. मी तिथे गेलो. माझ्या समोर आताच शंकरराव जेवलेले होते. मी शंकररावांना म्हटलं..
आत्ता तर तुम्ही पोटभर जेवलात आणि पुन्हा ह्या १२ चपात्या खाणार?(खरे तर त्यांना रोट म्हटले पाहिजे इतक्या त्या जाड होत्या. मी तर रिकाम्या पोटी फारतर दोन खाऊ शकलो असतो.)काय वेड-बिड लागलंय काय?

झव,त्यात काय हाय? मी पंधरा मिनिटात खाईन ह्ये सगलं!
बघ हं शंकर्‍या, पंधरा मिनिटात कशाला? हवे तर २५ मिनिटे घे.पण सगळे खायला हवे....आता साबळेही इरेला पेटले होते.
शंकररावही इरेला पेटला होता. मग काय मी शिरलो पंचाच्या भूमिकेत आणि सुरु झाली खाद्य-स्पर्धा.
इथे घड्याळाचा काटा सरकत होता आणि शंकररावाचे रवंथही सुरु होते. साबळे सारखे शंकररावाला वेळेची जाणीव देत होते पण तो अतिशय चवीचवीने खात होता. सुरुवातीला त्याचा वेग जास्त होता तरी हळूहळू तो कमी होत गेला. तरीही मोजून साडे चवदाव्या मिनिटाला त्याने शेवटचा घास घेतला आणि मग वर पाण्याचा घोट घेऊनच तो थांबला.
साबळे आश्चर्याने पाहातच राहिले. शंकररावाला आता काही त्रास तर नाही ना होणार ही मला काळजी.पण शंकरराव शांतपणे उठला, हात-तोंड धूवून आला आणि साबळेंना म्हणाला...झव,कालवन मस्त होतं तुमचं. पुना कवा आनाल तेव्हा मला सांगा.
साबळेंचा ’आ’ अजून वासलेलाच होता. त्यांनी शंकररावापुढे केळी ठेवली. अर्धा डझनातली तीन केळी शंकररावाने मुखशुद्धी म्हणून खाल्ली आणि मग एक मोठी ढेकर दिली. बाकीची तीन साबळेंना देऊन म्हणाला...आता तुमीच खावा.तुम्हाला बी भूका लागल्या असतील.
आणि शांतपणाने तो आपल्या कामाला निघून गेला.