माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ मे, २०१२

पत्ता सांगा हो जरा...

मला एक अनुभव हटकून येतो....मी सद्द्या राहातो ती इमारत सात मजली आहे आणि मी सहाव्या मजल्यावर राहतो...इथे एका मजल्यावर पाच सदनिका आहेत...माझ्या मजल्यावर माझ्या सदनिकेचे दार नेहमीच बंद असतं...इतर दोन ठिकाणी घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात....तरीही आमच्या ह्या मजल्यावर कधी कुणी व्यक्ती पहिल्यांदाच आली तर पत्ता विचारण्यासाठी माझ्या बंद दरवाज्याची घंटीच वाजवली जाते...समोर दारं उघडी दिसत असूनही त्यातल्या कुणालाही पत्ता विचारावासा  का वाटत नाही हे मला कोडंच आहे....कारण बहुतेक करून आलेली व्यक्ती ही माझ्या व्यतिरिक्त इतर चार जणांपैकी कुणाकडे तरी आलेली असते...मग तो वाणसामान घेऊन आलेला हमाल असो, हॉटेलातून काही खाद्य पदार्थ घेऊन आलेला पोरगा असो किंवा कुणी पाहुणा असो....
हे कमी म्हणून की काय कैक वेळेला आलेला मनुष्य केवळ इमारतीचे आणि ज्याच्याकडे जायचंय त्याचे नाव इतक्याच भांडवलावर आलेला असतो आणि तो इतर कोणत्याही मजल्यावर न जाता थेट माझ्या मजल्यावर येऊन मलाच पत्ता विचारत असतो.....माझ्या इमारतीत मी सोडून बाकी सगळे गुजराथीच  आणि येणारी व्यक्ती ही त्यांच्यापैकीच कुणाकडे तरी आलेली असते....इमारतीत येतांना इमारतीच्या रखवालदारालाही ते लोक पत्ता विचारू शकतात ना...किंवा खाली असलेली नावांची पाटीही वाचू शकतात ना....पण नाही..थेट माझ्याकडेच येतात....आता तुम्ही म्हणाल की थेट माझ्याकडे कशावरून येतात...इतरांकडेही जात असतीलच..तुम्हाला काय माहीत?
मुद्दा बरोबर आहे तुमचा....मलाही आधी तसंच वाटलं होतं...पण बरेचदा मी असं पाहिलंय की येणारी व्यक्ती ज्यांच्याकडे येते असे लोक समोर असूनही त्यांना पत्ता न विचारताच माझा बंद दरवाजा खटखटवला जातो... आणि मी त्यांना समोरच उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे  निर्देश करतो...आता बोला.
हाच अनुभव मला ह्यापूर्वी जिथे मी राहात असे तिथेही यायचा....
अहो पत्ता विचारण्याबद्दल किंवा चौकशी करण्याबद्दल तक्रार नाही..पण त्याला काही वेळकाळ? ह्या आधी मी जिथे राहायचो तिथे मी तळमजल्यावर राहायचो... एकदा रात्री अडीच वाजता एकाने माझ्या घराची घंटी वाजवली होती आणि मीही अतिशय सहजतेने कोण आहे हे न पाहताच दार उघडले होते...सुदैवाने ते कुणी चोर-दरवडेखोर नव्हते... समोरच्या घरात राहणारे लोक कुठे गेलेत म्हणून चौकशी करणारे त्यांचे नातेवाईकच होते...अर्थात त्या आलेल्या लोकांची आणि माझी साधी तोंडओळखही नव्हती...पण मी आपला सद्गृहस्थ म्हणून त्यांची चौकशी करून उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं आणि वाटेला लावलं....आलेले लोक आमच्याच गावातले म्हणजे स्थानिकच होते...पण त्यांचे नातेवाईक कुठे गेले ते मला माहीत नव्हतं....चौकशीत कळलं की ते लोक असेच सहज फिरत फिरतच आले होते...एका गाण्याच्या कार्यक्रमाहून घरी परत जातांना  आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी....म्हणजे त्यांच्याकडे असे काही गंभीर कारणही नव्हतं अशा अवेळी कुणाचाही दरवाजा ठोठवण्यासाठी...
मी त्यांना विचारलं की अहो, तसं काही गंभीर कारण नव्हतं तर का उगाच मला त्रास दिलात...तर म्हणाले की तुमच्या घरातला दिवा चालू दिसला, म्हणून म्हटलं जागे असाल...आता नाईट लँपच्या प्रकाशामुळेही जर कुणाला असं वाटत असेल की घरातले लोक जागे असतील तर अशा लोकांबद्दल काय बोलणार?
काही नाही, मी कपाळाला हात लावून घेतला.
दुपारच्या झोपेचं खोबरं तर किती तरी लोक करतच असतात...माझ्या झोपेशी लोकांचं काय वाकडं आहे माहीत नाही..पण भली पहाट, टळटळीत दुपार, मध्यरात्र...वेळ कोणतीही असो...मला जेव्हा कमालीची झोप येत असेल तेव्हाच नेमकी घंटी वाजते....
कुणीसं म्हटलंय ना हो...देवाचिये द्वारी,उभा क्षणभरी,त्याने मुक्ती साधियेल्या!  ;)
मला आता माझ्या दरवाज्यावरची माझ्या नावाची पाटीच काढून टाकावी लागणार आहे.. बहुदा देव आडनावाचा दोष असावा हा सगळा...दुसरं काय असू शकतं! 

२७ मे, २०१२

आपलीच भाषा परकी वाटायला लागलेय.....१

बाई!
हा शब्द आपण किती रूपात वापरत आलोय?
बाई म्हणजे स्त्री...असा सरळ एक अर्थ म्हणा,प्रतिशब्द म्हणा!
कोणत्याही स्त्रीच्या नावापुढे बाई लावणं...जसे की लक्ष्मीबाई,पार्वतीबाई,जिजाबाई....इथे बाई हे मानाचे लक्षण समजलं जातं. शाळेतल्या शिक्षिकांनाही आम्ही ’बाई’च म्हणत असू...हल्ली म्हणतात की नाही माहीत नाही.
एकूणच स्त्रीचे नुसते नाव न घेता त्यापुढे बाई हा शब्द जोडणे म्हणजे तिला मान देणे, मोठेपणा देणे हे अभिप्रेत असते असे माझ्या अल्पमतीप्रमाणे मी म्हणू शकतो.
आता घराघरात काम करायला येणार्‍या मोलकरणींनाही बाई म्हणतात...तेही मानानेच.... अमूक बाई बाई,तमूक बाई किंवा नुसतेच बाई इत्यादि एकेरी उच्चारही आपण करत असतो...पण तिथे बाई ह्या शब्दाचा वापर स्त्रीच्या संदर्भातच केला जातो...बाई ह्या शब्दामुळे कुठे उणेपणा आलाय असे आजवर कुणाला वाटले नव्हते.... पण आमच्या घरात जेव्हा इंग्रजी-हिंदी ह्या भाषा घुसल्या तेव्हा ह्या बाई शब्दाची पार अवहेलना सुरु झाली.
बाई शब्द उच्चारताच बर्‍याचशा नवशिक्षित ललना....शीऽऽऽ! बाई कसलं म्हणता? अगदीच गावंढळ वाटतं...त्यापेक्षा नुसत्या नावानेच हाक मारा किंवा मॅडम म्हणा!
आता काय बोलायचं?
हिंदीमध्ये सगळीकडे मान देण्यासाठी नावापुढे जी वापरतात...त्यामुळे जर एखाद्या बाईचा उल्लेख करायचा असेलच तर तो बायजी किंवा बाईजी असा करतात....इंग्लिशमध्ये सरळ नाव घेतात किंवा मान देण्यासाठी मॅडम म्हणतात....
हल्ली मराठी लोकांतही हे शब्द जास्त प्रचलित झालेत....बाईजी म्हटलेलंही हल्ली काही लोकांना चालत नाही हो....तेव्हा आता फक्त मॅडम म्हणा बरं का!
शाळेतल्या शिक्षिकांना हल्ली टिचर, मिस,मॅडम वगैरे म्हणावे लागते.... बाई  शब्द आता फक्त स्त्री शिपाई,सेविकांसाठी वापरला जातो...किती ही प्रगती!  ;)
आपल्याला इतर भाषा थोड्याफार कळायला लागल्या की आपलीच भाषा कशी परकी आणि कम अस्सल वाटायला लागते त्याचे हे एक छोटे उदाहरण!

गुरूजी...हा असाच एक शब्द! आपल्याला शिकवणार्‍या शिक्षकांसाठी आपण हा वापरत असू....पण आता त्याची जागा सर ह्या शब्दाने घेतलेय.
गुरुजी म्हणणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण वाटतं हल्ली....गुरुजींनाही ते आवडत नाही हो!
शिक्षक हा शब्दही आता जाऊन त्याजागी टिचर हा शब्द स्थानापन्न झालाय.
तसे गुरुजी हा शब्द आपण भटजींसाठीही वापरतो...अजून तो तिथे चालतोय बरं का..पण जुन्याकाळचा भटजी(भडजी) हा शब्द कालौघात बाद झाला...आज कुणाला भडजी हा शब्द शिवीसमानही वाटू शकतो....तरी नशीब अजून कुणी त्याला ’फादर म्हणत नाहीये.  ;)

आता महाविद्यालयात...माफ करा कॉलेजात शिकवतात ते प्रोफेसर...अध्यापक,प्राध्यापक इतिहासजमा झालेत.

७ मे, २०१२

’सत्यमेव जयते’च्या निमित्ताने!

अमिरखानचा कालचा कार्यक्रम पाहिला....त्यात माझ्या दृष्टीने दोन गोष्टी धक्कादायक वाटल्या.  त्यातली एक म्हणजे... कुटुंबनियोजनाच्या नावाखाली सरकारनेच स्त्री-भ्रूण हत्येला चालना दिली होती....अर्थात नंतर सामाजिक संस्थाच्या दबावाने सरकारला माघार घ्यावी लागली हे अलाहिदा...पण तिथून ते लोण खाजगी क्षेत्रात जे पसरले ते आज बंदी घालूनही चोरून मारून नव्हे तर राजरोसपणे सुरु आहे...फक्त सांकेतिक भाषेत...आणि आज आपण सारे त्याचे सामाजिक दुष्परिणाम भोगतोय.

दुसरी अशी की हरयाणा.दिल्ली,पंजाब इत्यादि ठिकाणी विवाहयोग्य अशा मुलींची चणचण असल्यामुळे ह्या ठिकाणचे लोक कर्नाटक,आंध्र,बिहार वगैरेसारख्या ठिकाणाहून मुलींना विकत घेऊन त्यांची जबरदस्तीने तिथल्या पुरुषांशी लग्नं लावत आहेत...ह्यात काही ठिकाणी एका स्त्रीवर त्या घरातले सगळे पुरुष अत्याचार करतात तर कधी तिला पत्नीचा दर्जा न देता मोलकरणीचा दर्जा दिला जातो असे निदर्शनाला आलेले आहे.

मंडळी सद्द्याचा स्त्री-भ्रूण हत्येचा प्रकार जर आपण वेळीच थांबवला नाही तर मग...एकेका मुलीशी तीन-चार जणांना विवाह करावा लागेल..महाभारतात द्रौपदीची जी परवड झाली होती तीच परवड आताच्या मुलींना भोगावी लागेल....आताही स्थिती काही फारशी वेगळी नाहीये म्हणा.

बाकी, गरीब लोकांच्यातच हे स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे ,सुशिक्षित वर्गात तेवढे नाही इत्यादि गैरसमजांबद्दल मला आधीच कल्पना होती...नियमित वृत्तपत्रवाचन आणि डोळे/कान उघडे ठेवून समाजात वावरलं तर हे असे गैरसमज कधीच निर्माण होत नाहीत...पण आपले सर्वसाधारण वर्तन असे असते की...आपल्याला काय करायचंय? आपण तर असं काही करत नाही ना? आपल्याला त्रास होत नाही ना..इत्यादि...ह्या आधुनिक तपासण्या नव्हत्या तेव्हाही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीला  कधी दुधात बुडवून तर कधी तिच्या तोंडावर उशी ठेऊन तिला गुदमरून टाकून जीव घेण्याचे प्रकार आपण कथा कादंबर्‍यातही वाचल्याचे आठवत असेलच...ते बहुतेक सगळे प्रकार उच्च वर्णीय , जमीनदार, मालदार वर्गातच होत असत....आजही होतात. ही असली कामं परस्पर दाई अथवा सुईणींच्या हस्ते, त्यांना मोठी बिदागी देऊन करवली जातात. गरीबांकडे कधी असे प्रकार होत नाहीत...त्यांचं एकच म्हणणं असतं...देवाची इच्छा...जे मिळालंय ते स्वीकारण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते.

स्त्री-भ्रूण हत्येमूळे स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळला हे तर निर्विवादच आहे...आणि त्यामुळेच हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार वाढले आहेत असे माझे मत आहे आणि  थोपुवरच्या एका चर्चेत मी ते मांडलेही होते....पण लोकांना ते तितकेसे पटले नाही...कालच्या कार्यक्रमात हरियाणातल्याच एका स्त्री समाजसेविकेने माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलाय...तिने म्हटलंय मुलींची संख्या कमी झाल्यामुळे गावातल्या लग्नेच्छु युवकांची संख्या बरीच वाढलेय पण त्यांच्यासाठी बायको म्हणून मुलीच मिळेनाशा झाल्यामुळे आता तेच युवक आपल्याच ओळखी-पाळखीतल्या स्त्रियांची छेडछाड करायला लागलेत.

कालच्या त्या कार्यक्रमामुळे, ज्या गोष्टींबद्दल कुजबूज ह्या स्वरूपात चर्चा चालत होत्या त्या आता उघड प्रमाणात होतील हे नक्की आणि समाजमनाच्या दडपणामुळे  स्त्री-भ्रूण हत्येच्या संख्येत निश्चितच घट होईल अशी आशा आपण करूया.
जयहिंद!