माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२१ नोव्हेंबर, २००८

नानुचे इंग्लीश!

ही व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहे. योगायोगाने कुणाशीही,कोणतेही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

नानु माझा लहानपणचा खास सवंगडी. अभ्यासात तसा यथातथाच होता. अंगाने बर्‍यापैकी जाडसर, उंच म्हणता येईल इतपत उंची, कुरळे केस आणि डोळ्यांना जाड भिंगांचा चश्मा हे त्याचे पहिल्या नजरेत भरणारे रूप होते. ह्या जाड्याचा आवाज मात्र त्याच्या रुपाला अजिबात शोभणार नाही इतका किरटा होता. त्या आवाजात तो बोलायला लागला की समोरचा आश्चर्याने आ वासून राहायचा. इतक्या जाड माणसाचा आवाज असा? की कुणी त्याच्यासाठी बोलतंय आणि हा आपला नुसते तोंड हलवतोय? अशा भावना त्या समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर दिसत असत. पण अर्थात विश्वास ठेवावाच लागे कारण कितीही विचित्र वाटले तरी ते खरेच होते. असो.

तर हा नानु खूप गमतीशीर प्राणी होता. तशी जाडी माणसं विनोदी असतातच हा माझा आजवरचा अनुभव आहे. कारण लहानपणी किशोर की तत्सम कोणत्याश्या एका मासिकात एक सदर यायचे. त्याचे नाव होते "हंसा आणि हंसवा!"
तर हा नानु त्या अनुस्वारांचा उच्चार करीत ते वाचायचा. त्याचे ते वाचणेही आम्हाला हसायला कारणीभूत व्हायचे. तसेच अजून एक सदर यायचे. त्याचे नाव होते "हंसा आणि लठ्ठ व्हा!" त्यामुळे माझा असाही एक समज झाला होता की सतत हसणारी व्यक्ती ही लठ्ठच असते आणि त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणून सदैव नानु समोर असायचाच.

ह्या नानुचे इंग्लीश बाकी खास असायचे. त्याचे इंग्लीश ऐकून समस्त इंग्लीश शिकवणार्‍या शिक्षकांचा तो नेहमीच बकरा व्हायचा आणि आमच्यासारख्यांचे मस्त मनोरंजन व्हायचे. अर्थात नानुला ह्या गोष्टीचे अजिबात वैषम्य वाटत नसे. तो आपला फिदीफिदी हसत असायचा. शेवटी ते मास्तर/बाईलोक कंटाळायचे अणि त्याचा नाद सोडायचे. एकदा नानुने निबंधात एक वाक्य लिहीले...."आय स्टडी हार्डली देअरफोर आय गेट गुड मार्क्स!" नानुच्या त्या निबंधात शिक्षकांनी लाल पेनाने "हार्डली" भोवती मोठ्ठा गोळा काढला. त्यावर नानुने शिक्षकांशी हुज्जत घातली. माझे काय चुकले? असा संतप्त प्रश्न करतच तो भर वर्गात उभा राहिला. हार्डली म्हणजे क्वचित, कधी कधी, असा शब्दाचा अर्थ शिक्षक त्याला किती तरी वेळ समजावून सांगत होते तरी त्याचा आपला एकच धोशा होती की हार्डली म्हणजे व्हेरी हार्ड! शेवटी शिक्षकांनी त्याच्यासमोर डिक्शनरी ठेवली. आता नानुला मानणे भागच होते. तरीही खाजगीत नानु मला म्हणाला , च्यायला ह्या इंग्रजांच्या! कुठे काय वापरतील काहीही सांगू शकत नाही. ब्रेव्ह-ब्रेव्हली, हेवी-हेविली वगैरे रुपं बनवणारे हेच ना ते! मग हार्ड-हार्डली कुठे चुकते?"
नानु, जाऊ दे! तू मनावर नको घेऊस, तसेही इंग्लीशमध्ये सगळे काही अनियमितच असते. आपली नाही ती भाषा. शेवटी राज्यकर्ते होते म्हणून लादलेली भाषा आहे ती. तुला जसे पटेल तसे बोल तू.
हे बाकी बरोबर बोललास तू भटा! तिच्यायला, टीओ-टू, डीओ-डू असे म्हणायचे तर एसओ-सो, जीओ-गो, एनओ-नो असे का म्हणायचे? तेही गो च्या ऐवजी गू म्हटले तर कुठे बिघडते.
एकदम बरोबर! अरे ह्या इंग्लीश लोकांनी आपल्या इथल्या जागांची, लोकांची नावंही बदलली आहेत..मी.
तुला सांगतो भटा, अरे शीव म्हणजे वेस, आपल्या मुंबईची वेस रे! त्याचे ह्या साहेबाने काय केले तर सायन? आरे तिच्या! शीव कुठे आणि सायन कुठे? काय साम्य आहे काय दोघात? वांद्रेचे बॅन्ड्रा, भायखळाचे बायकुला...तुला सांगतो की मीही आता ठरवलंय इंग्लीशची अशीच वाट लावयची म्हणून मी असे इंग्लीश बोलणार आहे की साहेब ते इंग्लीश ऐकून थक्कच झाला पाहीजे, पण ह्या आपल्या शिक्षकांना स्वाभिमानच नाहीये. बसतात आपले साहेबाची लाल म्हणत. असेल! त्याची लाल असेलही. पण आपली भाषा काय कमी आहे काय?
इथे नानुचा चेहरा लालेलाल झालेला असतो.

चक्रवर्ती चे चक्रबोर्ती, मुखोपाध्यायचे मुखर्जी, चट्टोपाध्यायचे चॅटर्जी, ठाकूरचे टागोर....असे कसली कसली वाट लावली रे ह्या लोकांनी आपल्या देशी नावांची. आता मीही त्यांच्या नावांची वाट लावणार आहे.
म्हणजे कसं रे? जरा उदाहरण दे ना!
नानुला क्रिकेटचा भलताच नाद त्यामुळे मग त्यातलीच नावे त्याने लगेच पुढे केली. आता बघ हं. आपला गावस्कर आहे ना..त्याला ती लाल माकडॆ गवास्कर,गॅवास्कर,गवॅस्कर असे काहीही म्हणतात. विश्वनाथ हे नाव त्यांना उच्चारता येत नाही म्हणून नुसताच विशी असा उच्चार करतात. म्हणून मी आता त्यांची नावे सांगतो ती ऐक.....
मार्टीन क्रो...मार्तिकेचा कावळा
जॉन स्नो.....बर्फाळ जानू
जॉन एम्बुरी....शेंबड्या जानू
अशी कितीतरी नावं तो सटासट सांग गेला. सगळीच आता लक्षात नाही.

नानुचे बोली इंग्लीश खास त्याचे असेच होते. कम हियरच्या ऐवजी "इकडे कम." मग तो जो कुणी असेल तो "इकडे आला" की हा म्हणणार...कमला!
मग म्हणणार सीट! तो बसला की हा म्हणणार सीटला. कोणत्या तरी एका मराठी सिनेमात ’लक्षा’च्या तोंडी असले शब्द घातलेले मी ऐकलेत. ते पात्र बहुदा नानुवरूनच बेतलेले असणार.

नानुने मला एक कोडे घातले....
ए भटा, ह्याचे इंग्लीश भाषांतर कर बघू......एकेका बाकावर दोन-दोन मुले बसतील.
हॅ! सोप्पे आहे...टू बॉईज विल सिट ऑन इच बेन्च!
साफ चूक!ह्याचा अर्थ काय होतो माहीतेय?
काय?
दोन मुले प्रत्येक बाकावर बसतील. आता हे कसे शक्य आहे? :)
मी म्हटलं,आयला हो रे! मग? तूच सांग आता उत्तर!
मग नानुने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला.....टू-टू बॉईज विल सिट ऑन इच-इच बेंच! ;)
कशी जिरवली! असे भाव डोळ्यात घेऊन नानू माझ्याकडे मिश्कीलपणाने पाहात होता.


अरे भटा मला सांग...एलओडीजीइ चा उच्चार सांग?
लॉज!
नाही.
नाही? मग?
लोडगे! हाहाहा.
मग डीओडीजीइ म्हणजे काय? दोडगे?
बरोब्बर! च्यायला भटा! तू पण लय हुशार आहेस बरं का!
मग चेला कुणाचा आहे?तुझाच ना?
ह्यावर नानु मोठ्या खुशीत येऊन पाठीत एक रट्टा घालतो.

मंडळी असे नानु तुमच्याही आसापास असतील तर सांगा त्यांचे किस्से!

१३ नोव्हेंबर, २००८

मामा-भाचा!

आमच्या कार्यालयात मामा-भाच्याच्या तीन जोड्या होत्या. त्यातील एका जोडीच्या काही मजेशीर आठवणी मी लिहीणार आहे.
ही जोडी म्हणजे पुनेजा(मामा) आणि वालेचा(भाचा) ह्या दोन सिंध्यांची होती. हे दोघेही जवळपास एकाच वयाचे होते आणि एकाच वेळी लघुलेखक(स्टेनो) म्हणून आमच्या कार्यालयात चिकटले. ह्यातला मामा खूप जाडजूड आणि पावणेसहा फूट उंच होता तर भाचा त्याच्यापेक्षा एक इंचाने उंच असावा मात्र अंगाने अगदीच किरकोळ होता. दोघेही त्यांच्या कामात अगदी हुशार होते. पुनेजा हा सदैव हसतमुख होता तर वालेचा हा अतिशय धुर्त होता. समोरच्याकडून आपले काम कसे करून घ्यायचे हे तो बरोबर ओळखत असायचा. मग त्या त्या वेळी करावी लागणारी सोंगंढोंगं तो करायचा.
ह्यातल्या पुनेजाला मी नेहमी म्हणायचो....तुझे नाव पुनेजा आहे ना ? मग तू उल्हासनगरला का जातोस. पुने(पुण्याला) जा!तर खळखळून हसायचा. वालेचाला मी नेहमी चा वाले(चहावाले) असे म्हणायचो. चहा विकायचा सोडून तू इथे काय करतो आहेस? असे विचारले की तो फक्त स्मित करायचा. गंमत म्हणजे हे दोघे सिंधी मराठी बोलू शकत नव्हते पण बर्‍यापैकी समजू मात्र शकत होते.
पुनेजाची एक खास लकब अशी होती की तो नेहमी हसत हसतच बोलायचा आणि बोलण्याची सुरुवात भकाराने आणि शेवट मकाराने सुरु होणार्‍या शिवीने करायचा. पहिल्या प्रथम आम्हाला हे पचवणे जरा जडच गेले पण नंतर लक्षात आले की हे त्याचे पालूपदच आहे.अगदी साहेबांशीही बोलायचे झाले तरी तो तसाच बोलायचा. ह्याचे एक उदाहरण म्हणजे.....
भेंचोद, हाहाहाहाहा साब वो रिपोर्ट बन गया मादरचोद. हाहाहाहा!
हे नेहमी असेच चालायचे. ह्यातल्या शिव्या साहेबाला असायच्या की कामाला की आणखी कशाला ह्याचा विचार करण्यात काहिच मतलब नसायचा. कुणाशीही तो तितक्याच सहजतेने बोलताना भें.. हाहाहाहाहा....................... मा.... हाहाहाहाहा असे बोलायचा. त्याचीच नक्कल करून त्याला मी एकदा काहीतरी सांगितले तर आधी तो चकित झालेला दिसला. एक क्षणभर थांबून मग त्याने माझ्या पाठीत धपाटा घातला आणि वर बोलला... भें.. हाहाहाहा तू भी सीख गया मेरी भाषा मा.... हाहाहाहा!
वालेचाच्या तोंडातही भरपूर शिव्या असायच्या. पण त्या देतांना तो कधी हसायचा नाही आणि त्यातल्या बर्‍याचशा शिव्या ह्या कुणाला तरी उद्देशून दिलेल्या असायच्या तर बाकीच्या निव्वळ गाळलेल्या जागा भरल्यासारख्या यायच्या.
ह्या दोघांना शोभतील असे आमचे एक मराठी भाषिक साहेब होते. ते मूळचे नागपूरचे होते आणि महाराष्ट्र पोलिसातुन आमच्या कडे आलेले होते. त्यांच्याही तोंडात प्रचंड शिव्या असायच्या.पण ह्या साहेबांची एक गंमत म्हणजे की ते कुणालाच त्याच्या तोंडावर शिव्या देत नसत,उलट अतिशय गोड बोलत. पण त्याची पाठ वळली रे वळली की त्याच्या अपरोक्ष त्याचा उद्धार करताना मात्र आपला शिव्यांचा बटवा मुक्तपणे उधळत असत. त्या साहेबांबरोबर पुनेजा-वालेचा ह्या मामा भाच्यांचा जो प्रेमळ संवाद चालायचा तो ज्यांनी कुणी ऐकला असेल ते सगळे धन्य होत(माझ्यासकट)!

हे मामा-भाचे जातीने सोनार होते. त्यांच्या अंगावर नेहमीच सोनसाखळी, अंगठ्या वगैरे चमकणारे दागिने असत.कुणाला दागिने बनवायचे असल्यास आम्ही स्वस्तात बनवून देऊ असे ते सांगायचे. ह्याच बरोबरीने शर्टाचे-पॅंटचे कापड,साड्या वगैरे गोष्टीही ते विकायला आणत असत. पण उल्हासनगर आणि सिंधी जमात ह्यांच्याबद्दल आमच्या म्हणजे मुंबईकरांच्या मनात एकूणच अशी एक अढी होती की तिथे सगळा बनावट माल बनत असतो. मेड इन युएसए असे कुणी म्हटले की खात्रीने ते उल्हासनगर सिंधी असोसिएशन(युएसए) ने बनवलेला माल आहे हे समीकरण इतके पक्के झाले होते की आमच्यापैकी कुणीही कधीही ह्या मामा-भाच्यांकडून कोणताही माल विकत घेतलेला नव्हता.पण आमच्या कार्यालयात भारतातल्या सर्व प्रांतातले लोक काम करत असत आणि ह्यातले काही ह्या मामा-भाच्यांकडून फसवलेल देखिल गेले होते. बरीचशी फसवणूक कपड्यांच्या बाबतीत झालेली असायची पण कुणीही फारशा गंभीरपणे ह्याबाबत तक्रार केलेली नसल्यामुळे त्यांचा धंदा बिनबोभाट चालायचा. एकदा मात्र त्यांचा हा फुगा फुटला आणि धंदा कायमचा बंद झाला. त्याचे असे झाले......

नवीनच बदलून आलेल्या एकाने ह्या दोघांकडून आपल्या मुलीच्या लग्नासाठी काही दागिने बनवून घेतले होते. त्या व्यक्तीला उल्हासनगर,तिथले बनावट धंदे, हे मामा-भाचे आणि त्यांच्या व्यवहाराबद्दल फारशी काहीच माहीती नव्हती; पण आपल्याच कार्यालयातील लोक आहेत तेव्हा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही असे समजून इतर कुणाचाही सल्ला न घेता त्या दोघांना ते काम दिले. दागिने बनवून आणल्यावर सगळे पैसेही त्याने रोखीने दिले आणि मोठ्या आनंदात तो ते दागिने घरी घेऊन गेला.एक-दोन दिवसांनी अतिशय घाबर्‍या-घुबर्‍या अवस्थेत तो आला तेव्हा कळले की त्या दागिन्यांच्या संदर्भात तो पार फसवला गेलेला आहे. त्या दागिन्यांना पाणी लागताच ते चक्क काळे पडत होते. काय करावे हे त्याला समजेना म्हणून त्याने मामा-भाच्याला ही गोष्ट सांगितली. त्यांनीही काही तरी गोलमाल कारणे सांगून त्याला गप्प बसवले.पण तो गृहस्थ खूपच अस्वस्थ झाला होता. त्याच्या वागण्यातील बदल मला जाणवला. मी त्याला सहजपणे विचारले की काही त्रास आहे काय? मी काही मदत करू शकतो काय? तेव्हा त्याने घडाघडा झालेला सगळा प्रसंग सांगितला आणि ते ऐकून मलाही धक्का बसला. मी त्याला धीर दिला आणि आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू असे सांगून त्याला कसेबसे शांत केले.
नंतर मी वालेचाशी बोललो तर तो काहीच बोलेना म्हणून पुनेजाशी बोललो. दोघांच्यात पुनेजा त्यामानाने मवाळ होता म्हणून त्याने मला त्याची बाजू सांगितली पण दागिने काळे का पडतात ह्याचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. तो इतकेच म्हणत होता की हा सगळा व्यवहार वालेचाने केलाय. तेव्हा जे काही असेल ते त्यालाच माहीत.
मग मी आमच्या कार्यालयातील दादाची मदत घेतली आणि वालेचाला कोपच्यात घेतले.( दादाबद्दल ह्या आधी मी बरेच लिहीलेय)
हो ना करता करता वालेच्याने आपण फसवणूक केल्याचे कबूल केले आणि साहेबांपर्यंत ह्या गोष्टी न नेण्याची हातापाया पडून विनवणी केली. शेवटी सगळेच्या सगळे पैसे एकरकमी परत करण्याच्या बोलीवर आम्ही त्याला माफ केले. दुसर्‍या दिवशी वालेचाने त्या गृहस्थाचे सगळे पैसे परत केले. त्या सगळ्या नोटाही आम्ही नीट तपासून घेतल्या. कुणी सांगावे? त्याही बनावट असल्या तर?
त्या दिवसांपासून कार्यालयातला त्यांचा धंदा आम्ही कायमचा बंद करवला आणि भविष्यात कुणाचीही होणारी फसवणूक अशा तर्‍हेने टाळली.

३० ऑक्टोबर, २००८

राडा!

ही गोष्ट आहे साधारणपणे ३० वर्षांपूर्वीची. मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या मालाडमध्ये आणि आजच्या मालाडमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा वस्ती जेमतेम काही हजारात होती. आज ती दहा लाखांच्याही वर आहे.तर अशा त्या विरळ वस्ती असणार्‍या,घनदाट वनराई असणार्‍या काळातील ही घटना आहे.

त्या काळी मी दूरचित्रवाणीसंच दुरुस्तीची कामं करायचो. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच अशी सरकारी नोकरी आणि नंतर पूर्ण संध्याकाळ ते साधारण रात्री दहा-साडेदहा पर्यंत दूचिसंच दुरुस्ती असा एकूण माझा त्यावेळचा रोजचा कार्यक्रम असे. नोकरीसाठी मी रोज चर्चगेटला जात असे, मात्र दूचिसंच दुरूस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि मध्य रेल्वेवर कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत कुठेही जात असे.त्यामुळे मला घरी पोचायला बर्‍याचदा रात्रीचे १२ वाजत असत. त्या काळात दूरचित्रवाणीवर फक्त दोनच वाहीन्या होत्या.एक म्हणजे डीडी१ आणि दुसरी डीडी २. ह्या दोन्ही सरकारी वाहिन्या होत्या आणि त्याकाळात रात्री दहा-साडे दहाला बंद होत असत. त्यानंतर घरी पोचायला साहजिकच उशीर होत असे.

असाच एकदा मी माझ्या कामगिरीवरून परत येत होतो. दिवस थंडीचे होते. रात्री बाराचा सुमार होता. थंडीही मस्त पडलेली होती.(हो! तेव्हा मुंबईत थंडीही बर्‍यापैकी पडायची!)गाडीतून उतरलो आणि स्थानकाबाहेर आलो.सगळीकडे नीजानीज झालेली होती. नुकताच चित्रपटाचा शेवटचा खेळ संपून गेलेला असल्यामुळे स्थानकाच्या आसपास थोडीफार गर्दी होती. दूचिसंच दूरुस्तीसाठी लागणारे साहित्य असलेली साधारण ७ किलो वजनाची ब्रीफकेस सावरत आणि तोंडाने गाणे गुणगुणत माझी स्वारी मी राहात असलेल्या गल्लीपाशी पोचली. गल्लीत चिटपाखरूही नव्हते पण गल्लीच्या टोकाला लांबवर आमच्या वाडीच्या प्रवेशद्वारी बरीच माणसे जमलेली दिसत होती. इतक्या रात्री ही गर्दी कसली असा अचंबा व्यक्त करत मी हळूहळू तिथे पोहोचलो. जवळ गेल्यावर लक्षात आले की तिथे काही तरी खेळ सुरु असावा. कारण लोक दाटीवाटीने रिंगण करून उभे होते आणि जे काही चालू होते ते त्या रिंगणाच्या आत चालू होते. पण हे सर्व लोक अत्यंत भयभीत झालेले दिसत होते आणि सगळे जण पुढे काय होणार हे पाहात स्तब्धपणे उभे होते.
मी आत पाहण्याचा एक दोन वेळा निष्फळ प्रयत्न केला पण मला तर काहीच दिसले नाही. मग मी त्यातल्याच एक दोघांना विचारण्याचा प्रयत्न केला पण मला कुणीच उत्तर दिले नाही.माझ्या वाडीत शिरण्याचा रस्ताच ह्या गर्दीने रोखलेला असल्यामुळे मला वाडीतही शिरता येईना. मग मी माझ्या जड ब्रीफकेसचा वापर करत एकदोघांना ढोसले आणि कसेबसे स्वत:ला गर्दीत घुसवले.
गर्दीत घुसून मी आता अशा ठिकाणी आलो की जिथून त्या रिंगणात काय चाललंय ते मला स्पष्टपणे दिसत होते. ते दृष्य पाहून माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. माझ्यापासून दहा-पंधरा पावलावर एक माणूस भर रस्त्यात झोपलेला होता आणि त्याच्या पोटावर पाय दिलेला आणि हातात लखलखता रामपुरी चाकू घेतलेला त्यावेळच्या मालाडमधला नामचीन गुंड संभादादा उभा होता. गर्दीतल्या एकाचीही संभादादाच्या तावडीतून त्या माणसाची सुटका करण्याची हिंमत नव्हती. आमच्या वाडीच्या तोंडाशीच नगरपालिकेने नव्यानेच लावलेल्या मर्क्युरी व्हेपर लॅंपच्या शुभ्र प्रकाशात तर ते पाते विलक्षण चमकत होते. ते पाहूनच माझेही पाय लटलट कापू लागले. इतका वेळ त्या माणसाच्या नुसते पोटावर पाय ठेऊन उभ्या असलेल्या संभादादाने जोरात आवाज दिला आणि त्या माणसाला उद्देशून तो काही तरी बोलला. तो माणूस अतिशय लीनदीन होऊन हात जोडून संभादादाकडे अभय मागत होता पण दादा काही त्याचे ऐकत नव्हता. काही तरी देण्या-घेण्यावरून त्या दोघांच्यात बोलणे झाले आणि अत्यंत संतप्त होऊन संभादादाने तो रामपुरी असलेला हात उंच उचलला आणि वेगात खाली आणला....

त्याच वेळी त्या लखलखत्या पात्याने भयभीत होऊन माझ्या तोंडून क्षीणपणे(?) शब्द उमटले...पोलिस! पोलिस! पोलिस! आणि संभादादा त्या माणसाला सोडून समोरच्या दिशेला पळाला. लोकांचीही पांगापांग झाली. तो रस्त्यावर पडलेला माणूसही ही संधी साधून नेमका आमच्या वाडीत पळाला. क्षणार्धात तो आसमंत एकदम निर्मनुष्य झाला. वास्तवतेचे भान आल्यावर मी घाबरत घाबरत वाडीत पाऊल टाकले. एकतर वाडीत काळामिट्ट अंधार होता आणि अंधारात पळालेल्या त्या माणसामुळे वाडीतले यच्चयावत कुत्रे पार पेटलेले होते. भुंकून भूकून त्यांनी वाडी डोक्यावर घेतलेली होती. मला भिती अंधाराची नव्हती तर त्या पळालेल्या माणसाची आणि भुंकणार्‍या कुत्र्यांची होती. अंधारात त्यांनी(कुत्र्यांनी) मला ओळखले नसते तर माझी काही खैर नव्हती. आणि त्या माणसाला मारण्यासाठी संभादादा पुन्हा येणारच नाही ह्याची काय शाश्वती? तो माणूसही नेमका आमच्याच वाडीत लपण्यासाठी पळालेला असावा ना! पण माझे सुदैव हे की कुत्र्यांच्या त्या प्रचंड भुभुत्कारामुळे अर्धी अधिक वाडी जागृत झाली होती आणि काही घरातले दिवेही फटाफट लागले होते. माझ्याकडे विचित्र नजरेने पाहणार्‍या वाडकरांकडे दूर्लक्ष करत आणि त्यांच्या घरातल्या दिव्यांच्या बाहेर येणार्‍या थोड्याफार उजेडात त्या कुत्र्यांना चुचकारत चुचकारत मी कसाबसा एकदा घरात पोचऽऽलो.

१ ऑक्टोबर, २००८

शंकरराव! १

नाव काय तुमचं?
शंकर!
चहा घेऊन आलेला पोर्‍या नवीनच दिसत होता. चंदूशेठ चहावाल्या कडे आजवर कितीतरी मुलं काम करून गेली होती. ती बहुतेक सगळीच त्याच्या गावची असायची. शंकरही त्यातलाच.
किती शिकलात?
नाय! काय बी नाय शिकलो.
मग गावात इतकी वर्ष काय करत होता?
म्हशी चर्‍याला नेयाचा. सकाली भाकरी बांधून घेयाची आनि म्हशींना घेऊन चर्‍याला जायाचे.
वय किती तुमचे?
काय म्हाईत!
अहो तुमची जन्मतारीख कोणती?
जनमतारीक?त्ये काय आस्ते?
कमाल आहे. तुम्हाला जन्मतारीख माहीत नाही? बरं मला अंदाजाने सांगा तुमचं वय किती असेल?
माला काय म्हाईत? तुमीच समजून घ्या आता.
अहो, पण तुमचा जन्म कधी झाला हे मला माहीत नाही तर तु्मचे वय तरी मी कसे ओळखणार?
त्ये आमच्या अप्पाच्या म्हैशीला वासरु झालं व्हतं नाय का?
मग त्याचं काय ?
त्येला लई वर्स झाली. त्येच्या दुसर्‍या दिवशी मी जलमलो..आसं माजी आय सांगायची.
कधी झालं त्ये वासरू सांगु शकाल काय? म्हणजे साधारण किती वर्षांपूर्वी झालं?
वासरू ना? माझ्या जलमाच्या आदी एक दिस झालं.
मी कपाळाला हात लावला. ह्या माणसाशी ह्या विषयावर जास्त बोलण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यात तिथे बापूशेठ आला. हा बापू चंदूशेठकडे बर्‍याच वर्षांपासून कामाला होता.
मामा,अरे किती येल हिथंच बसला हाईस? जा. चंदूशेठ बलावतोय.
अच्छा. म्हणजे हा शंकर बापूचा मामा तर...मी स्वत:शीच बोललो.
ओ बापूशेठ, इकडे या जरा. हा शंकर तुमचा खराच मामा आहे काय?
व्हय. माझ्या दुसर्‍या आईचा चुलत भाव हाय त्यो. म्हंजी मामाच न्हवं काय?
बरोबर,मामाच आहे तुमचा. पण ही दुसरी आई काय भानगड आहे?
माझ्या बापाची पहीली बायकु ..म्हंजी माजी सक्की आय. माजा बाप लई जंक्शान मानूस. एका बायकुने भागंना म्हनून बापाने पाट लावला त्यो ह्या शंकर मामाच्या भैनीशी.
अच्छा. म्हणजे ही तुझी सावत्र आई आहे तर आणि हा मामाही सावत्रच आहे ना?
बरोबर. पन माज्या सक्क्या आयपेक्षा हीच आय माज्यावर जास्त प्रेम करते आनि हा मामा बी लई भोळा हाई.
बरं मला सांगा हा तुमचा शंकरमामा किती वर्षांचा असेल?
मामा ना? ३०वर्सांचा तरी आसेल. मीच आता २५ वर्सांचा हाय. माज्या पेक्षा मोटा हाय त्यो.

ही माझी आणि शंकरची पहिली भेट.

आमच्या कार्यालयात चहा बनवण्यासाठी दोनजणांना भरती करायचे होते असे कळले. कुणी ओळखीतले असतील तर या घेऊन..असे साहेबांनी मला सांगितले. सर्वात आधी मी चंदूशेठ आणि त्याचा धाकटा भाऊ नामदेवलाच विचारले. पण ते दोघे नाही म्हणाले. इथे मी ’चंदूशेठ’ असा उच्चार करतोय म्हणून असे समजू नका की चंदू हा खरोखरीचाच शेठ होता म्हणून. चहाची टपरी चालवून कसेबसे आपले आणि आपल्या कुटुंबाचे तो पोट भरत होता इतकेच. मला कुणालाही एकेरी हाक मारणे सहजासहजी जमत नाही म्हणून मी चंदूला चंदूशेठ म्हणत असे आणि माझे ऐकून हळूहळू सगळेच त्याला चंदूशेठ म्हणायला लागले. नामदेवाला मी नामदेवराव आणि बापूला बापूशेठ म्हणायचो.
नंतर मी बापूशेठ आणि शंकरमामाला विचारले. त्यात बापूशेठनी तयारी दाखवली आणि शंकरमामानी शेपटी घातली म्हणून मग त्याच वेळी आमच्याकडे हंगामी सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या गोंविंदाला पुढे केले आणि त्या चहावाल्याच्य़ा दोन जागा भरल्या गेल्या. सरकारी पगार आणि चंदूशेठकडे मिळणारा पगार ह्यात जमीन अस्मानाचे अंतर होते. चंदूशेठ पोरांना एकवेळचे जेवण आणि दिवसातून दोन चहा व्यतिरिक्त फक्त ५००रूपये पगार देत असे. अर्थात तो त्याच्यासाठी जास्तच होता म्हणा. पण इथे आमच्या कार्यालयात पोरं भरती झाली तीच मुळी २०००+पगारावर. त्यामुळे बापूशेठ तर मला अन्नदाताच समजायला लागला. शंकरमामाला नंतर जेव्हा बापूशेठला मिळणारा पगार कळला तेव्हा त्याला खूपच चुटपुट लागून राहीली. पण हातची संधी केव्हाच गेली होती.

२८ सप्टेंबर, २००८

अजि म्या परब्रह्म पाहीले!

दरवाज्यावरील पाटी वाचून घंटी वाजवली. दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला. अर्धवट दरवाजा उघडून त्या व्यक्तीने विचारले कोण हवंय आपल्याला?
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इथेच राहतात काय?..माझा सवाल!
होय! तशी पाटी इथे दिसतेय ना?...त्यांनी थोडेसे चिडून विचारले.
काय आहे, की हल्ली दारावरची पाटी आणि आत राहणारी माणसे एकच असतील असा काही भरवसा राहीलेला नाहीये. म्हणून विचारले. कृपया रागावू नका. मला भाईकाकांना भेटायचंय. मी पाऽऽर मुंबईहून इतक्या लांब आलोय त्यांना भेटायला...मी.
आपण कोण? आपले काय काम आहे? हल्ली भाईला बरं नसतं तेव्हा त्याला उगाच त्रास द्यायला कशाला आलात?..सुनीताबाई बोलल्या.
ह्या सुनीताबाई आहेत हे इतक्या वेळात माझ्या लक्षात आलेच होते. तेव्हा मी जास्त घोळ न घालता म्हटले..काकी, अहो मला ओळखले नाही काय तुम्ही? अहो मी मोद! इतक्यात विसरलात?
खरे तर मला त्यांनी ओळखावे असा मी कुणीच नव्हतो आणि ह्याआधी कधी त्यांना भेटलेलो देखिल नव्हतो. पण जरा जवळीक दाखवावी म्हणून हा गुगली टाकला.
त्याही जराशा गोंधळल्या. आठवायचा प्रयत्न करत होत्या इतक्यात...ते, समस्त महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे खुद्द भाईकाका भिंतींचा आधार घेत घेत तिथे आले.
ह्याची देही ह्याची डोळा माझे परब्रह्म मला पाहायला मिळत होते म्हणून मी देखिल हरखून गेलो.

कोण गं सुनीता? कुणाशी इतका वेळ बोलते आहेस?
अहो,हे.....
सुनीताबाई पुढचं काही बोलण्याच्या आधीच मी चटकन पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हटले..भाईकाका,अहो मी मोद. ओळखले नाही काय मला?...मी स्वत: कुणी शेक्सपीयर वगैरे असल्याच्या आविर्भावात म्हणालो.
भाईकाकांनी मला नीट न्याहाळले आणि म्हटले...हं! नाव ऐकल्यासारखे वाटतेय. अरे हो! मोदबुवा नाही काय तुम्ही! ओहोहो! या या! अलभ्य लाभ!
आणि सुनीताबाईंकडे वळून डोळे मिचकावीत म्हणाले...अगं तू ओळखत नाहीस ह्या महाभागाला?
सुनीताबाईंचा अजूनही प्रश्नार्थक चेहरा पाहून भाईकाका त्यांना म्हणाले...अगं, हेच ते मोदबुवा! स्वरभास्कराची आणि आधुनिक तानसेन सैगलसाहेबांची भेट घालून देणारे ’महान(?)व्यक्तीमत्व’ आठवतंय काय?
आता मात्र सुनीताबाईंच्या चेहर्‍यावरचा अनोळखीपणाचा भाव जाऊन त्याजागी किंचित स्मित उमटले.
या,या! म्हणत त्यांनी मला घरात घेतले.

मी इथे विचारात पडलो होतो की भाईकाकांना कसे कळले त्या भेटीबद्दल?  मी तर कधीच त्यांना त्याबद्दल बोललेलो नव्हतो. मग त्यांनाच विचारलेलं बरं म्हणून मी धीर करून विचारले...भाईकाका, भीमसेन अण्णा आणि सैगलसाहेबांच्या भेटीबद्दल तुम्हाला कसे कळले हो? ती भेट तर अगदीच खाजगी स्वरुपाची होती.
अरे वा! अशा गोष्टी कधी लपून राहतात काय? पण एक सांगतो, मी तुझ्यावर रागावलोय...भाईकाका.
का बरं? माझ्याकडून असा कोणता प्रमाद घडला?...गोंधळून जाऊन मी जरा गटणेच्या भाषेत प्रश्न केला.
अरे बाबा, त्या भेटीच्या वेळी मला का नाही बोलावलेस? मीही त्या दोघांना पेटीवर साथ करून तेवढेच माझे हात साफ करून घेतले असते. ती संधी तू मला नाकारलीस. म्हणून मी तुझ्यावर रागावलोय....भाईकाका लटक्या रागाने म्हणाले.
भाईकाका, एक डाव माफ करा ना! पुढच्या वेळी नाही विसरणार. नक्की बोलावीन तुम्हाला आणि वसंतरावांनाही बोलवीन. तेही मस्तपैकी तबला बडवतील आणि ..
माझे बोलणे अर्धवट तोडत भाका म्हणाले...अरे, नाही रे. गंमत केली तुझी. आता ह्या हातात अजिबात ताकद नाही राहीली. गेले कैक महिने ह्या हाताला साधा पेनचा स्पर्शही नाही झालाय तर पेटी कसली वाजवतोय?
भाईकाका, एक सांगु?..मी
अरे बोल मोदबुवा! तुला हवे ते बोल. त्यात परवानगी कशाला मागतोस?
भाईकाका, तुम्ही हरितात्या आणि अंतु बर्वा ही पात्रं काय जीवंत उभी केलेत. त्यांची एकेकाची तत्वज्ञानं ऐकली ना की कसे भरून येते. पण भाईकाका, अहो तुम्ही अजून एक करा ना. ह्या दोन्ही पात्रांना एकमेकांशी संवाद साधताना ऐकायला आम्हाला आवडेल...मी.
ते कसे? त्याने काय होईल?...भाका
म्हणजे बघा आता, तुमचा तो अंतु बर्वा म्हणतो ना की, "आला नेहरू, आणि त्याने इथे येऊन काय केले? तर, भाषण! अरे भाषणं कसली करतोस? त्याऐवजी तांदूळ दे! आणि रत्नांग्रीस त्यास काय दाखविले तर, टिळकांचा जन्म झाला ती खोली. दाखवली कुठली तरी बाज आणि दिले ठोकून की टिळकांनी इथे पहिले ट्यांहा केले. अरे पुरावा काय? टिळकांच्या आयशीचे बाळंतपण करणारी सुईण होती काय तिथे?......म्हणजे अंतु पुरावा मागतो की नाही?
हो. बरोबर. मग? ...भाका
आता त्या उलट तुमचे हरितात्या. पुराव्याने शाबित करतात ते सगळ्या गोष्टी. मग मला सांगा आता की ह्या दोघांना एकमेकांना तुम्ही समोरासमोर आणलेत तर काय बहार येईल? त्यांचा सवाल-जबाब अगदी ऐकण्यासारखा होईल...मी
मिस्कीलपणे हसत आणि चश्म्यातुन माझ्यावर आपले बोलके डोळे रोखत भाईकाका म्हणाले...खरंच की! मोदबुवा,तुझ्या बोलण्यात पाईंट आहे बरं का! माझ्या कसे हे लक्षात नाही आले?
मग, भाईकाका, कधी घेताय मनावर? कधी लिहाल?..मी लगेच, ती संधी हातातुन सुटू नये म्हणून म्हटले.
अरे, नाही रे! आता हातात ताकत नाही उरली.
भाईकाका, असे म्हणू नका हो. तुम्ही नुसते सांगत जा. मी लिहीतो. तुम्ही व्हा व्यास आणि मी होतो गणपती. चालेल?
चालेल? अरे धावेल! आता किती जमेल ते माहीत नाही पण प्रयत्न करून बघू या...भाईकाकांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच स्मित झळकू लागले.
जरासा विचार करून भाईकाका सांगु लागले....हं, लिही....
काय हो हरितात्या......
इतक्यात दारावरची घंटी वाजली.भाईकाका मला म्हणाले, मोदबुवा जरा बघा बघू. कोण आलंय तडमडायला ह्या भलत्या वेळी?
मी धडपडत जाऊन आधी दार उघडले. दारात कुणी तरी विक्रेता उभा होता. त्याला वाटेला लावले. चला, आपण आपलं ते भाईकाका काय सांगताहेत ते लिहून घेऊ या असा विचार केला आणि वळलो. पाहतो तो काय?....

अरेच्चा! भाईकाका कुठे गेले? आणि हे काय? मी माझ्याच घरात कसा? छ्या! म्हणजे? इतका वेळ मी स्वप्न तर बघत नव्हतो? काहीच उलगडा होईना. इतका वेळ जे काही घडले ते खरे नव्हते? माझा तर माझ्यावरच विश्वासच बसेना.जे काही घडले ते साक्षात डोळ्यासमोर अजूनही दिसत होते तरी ते खरे नव्हते? कसं शक्य आहे?

हळूहळू एकेक गोष्ट आठवायला लागली. मी आपला नेहमीप्रमाणे भाईकाकांच्या आवाजातली ध्वनीफीत लावून पलंगावर पडून मस्तपैकी ऐकत होतो आणि बघता बघता केव्हा झोपलो ते कळलेच नाही. काय मस्त स्वप्न होते ते..त्यातनं बाहेर पडूच नये असे वाटतंय. पण त्या दुष्ट लोकांना पाहवले नाही आणि त्यांनी मला त्या दुनियेतून जबरदस्तीने बाहेर काढले. पण तिथे भाईकाका माझी वाट पाहत असतील. मला गेलंच पाहीजे. चला पुन्हा झोपू या.
ढुर्रर्रऽऽऽऽऽऽऽ! ढुर्रर्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!

११ सप्टेंबर, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १५

माझ्या लहानपणी मी कितीतरी प्रकारचे खेळ खेळलोय.मैदानी खेळात कुस्ती,हुतूतू,लंगडी,खो-खो,आट्या-पाट्या,डब्बा ऐसपैस,पकडापकडी,लगोरी,आबादुबी,तारघुसणी(हा खेळ फक्त पावसाळ्यातच खेळू शकतो),विटी-दांडू,भोवरेबाजी,बिल्ले,गोट्या वगैरे असे खास भारतीय खेळ तर क्रिकेट,व्हॉलीबॉल,फूटबॉल,बॅडमिंटन,टेबल-टेनिस वगैरे विदेशी खेळही भरपूर खेळलोय.त्याच प्रमाणे बैठे खेळ आठवायचे म्हटले तर प्रामुख्याने बुद्धीबळ,कॅरम,पत्ते,सापशिडी,ल्युडो,व्यापार-डाव,कवड्या,सागरगोटे,काचापाणी वगैरे अनंत खेळ आठवतील. ह्यापैकी बैठ्या खेळातल्या पत्त्यांच्या खेळाबद्दलच बोलायचे झाले तरी त्याचे कैक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी आता चटकन आठवताहेत ते म्हणजे तीन-पत्ती,रमी, सात-आठ,पाच-तीन-दोन,मुंगूस,भिक्कार-सावकार,एकपानी झब्बू,गड्डा झब्बू,गुलामचोर,बदामसत्ती,मेंडीकोट,नॉट ऍट होम,लॅडीस,गेम ऑफ पेशन्स(हा एकट्याने खेळायचा प्रकार आहे)वगैरे वगैरे. ह्यातले तीन-पत्ती आणि रमी हे सामान्यत: जुगार समजले जातात कारण हे खेळ खेळताना काही तरी पणाला लावावे लागते.एकेकाळी मी तीन-पत्तीमध्ये अतिशय निष्णात होतो.पण एक प्रसंग असा घडला की मी तो खेळ त्यानंतर कधीच खेळलो नाही(एकवेळचा अपवाद सोडून).आज त्याबद्दल ऐका.

आमच्या वाडीत मराठी,गुजराथी अशी संमिश्र वस्ती होती. ह्यातले गुजराथी लोक त्यांच्या काही विशिष्ठ सणांना सहकुटुंब जुगार खेळतात हे आधी ऐकले होते पण त्यानंतर प्रत्यक्ष पाहिले देखिल. त्या जुगारात बरंच काही जिंकता येते हे पाहून मलाही त्यात रस निर्माण झाला. पण आमच्या आईची करडी नजर चूकवून हे असले उद्योग करणे कधीच शक्य नसायचे. पण ही गुजराथ्यांची मुले एरवीही हा जुगार सर्रासपणे खेळायची. त्यात पैसे न लावता गोट्या,बिल्ले(शीतपेयांच्या बाटल्यांची पत्र्याची बुचे),सिगारेटची पाकिटे,काजू वगैरे गोष्टी पणाला लावत. हे त्यांचे खेळ आम्ही चूपचाप बसून पाहायचो पण खेळायची हिंमत नसायची. त्याचे एक कारण आईची जरब आणि दुसरे म्हणजे ही सर्व मुले त्यात पटाईत होती आणि आम्हाला त्यातले जुजबी ज्ञानच होते तेही पाहून पाहून झालेले त्यामुळे सर्वस्व हरण्याची शक्यता होती.

ह्या सर्व मुलांच्यात भानू नावाचा एक मुलगा खूपच पोचलेला होता. त्याचा गोट्या,बिल्ले वगैरे खेळातला नेम अचूक असायचा आणि त्यात तो नेहमीच जिंकायचा. तसेच ह्या तीन-पत्तीमध्येही तो चांगलाच सराईत होता. त्याचा हात धरेल असा कुणी दुसरा खेळाडू आमच्या वाडीत नव्हता.ह्या भानूच्या बाजूला बसून मी तीन-पत्तीचा खेळ नुसता बघत असे.गंमत अशी की भानू जात्याच हुशार असल्यामुळे ह्या खेळात जिंकत असे पण त्याचा असा समज असायचा की मी त्याच्या बाजूला बसतो म्हणून तो जिंकतो.कमाल आहे ना? हा खेळ खेळणार्‍यांच्यातली अंध:श्रद्धा तरी किती ते आठवले तरी आजही हसू येते.

समजा एखादा खेळाडू हरायला लागला तर मग त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलांना तो सांगणार की पाणी पिऊन या. ती दोन्ही मुले पाणी पिऊन येईपर्यंत खेळ तहकूब केला जाई. तसेच आपल्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलापैकी कुणी मागे हात टेकून बसला तरी त्याला तसे बसण्यापासून परावृत्त करणे.कारण काय तर नरटी लागते. कोपर मांडीवर टेकून आणि हनुवटी तळहातावर टेकून कुणी बसलेले त्या खेळाडूंना चालायचे नाही. ह्याचेही कारण ..नरटी लागते.
ज्याच्यावर पिशी असेल तो त्याच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलाला आपल्या पत्त्यांना हात लावायला सांगणार म्हणजे पानं चांगली येतात अशी धारणा असते.काय काय अंध:श्रद्धा होत्या तेव्हा. आता सगळंच आठवत नाही.

तर अशा ह्या भानूजवळ मी नेहमी प्रेक्षक म्हणून बसत असे आणि त्याचे खेळण्यातले कौशल्य जाणून घेत असे.भानू केवळ हुशारच नव्हता तर तो धुर्तदेखिल होता. हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले तर अगदी बोलबच्चन होता.स्वत:ला आलेली पाने कितीही रद्दड असली तरी समोरच्याला बोलून गार करायचा आणि डावामागून डाव जिंकायचा. एखादा खेळाडू जरा जास्त वेळ टिकला की त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जाणून घेऊन भानू तो डाव त्याला बहाल करायचा.मात्र एरवी सहजासहजी हार मानायचा नाही.पण लावायची देखिल एक भाषा होती. म्हणजे कसे? डाव सुरु होण्याआधी समजा की प्रत्येकाने दोन-दोन गोट्या मध्ये ठेवलेल्या आहेत. मग डाव सुरु झाला की कुणी म्हणेल...एक आलो...म्हणजे अजूनएक गोटी मध्ये ठेवायची. की दुसरा म्हणणार..दोन आलो.
हे ’आलो’ प्रकरण आणि गोट्यांची संख्या वाढत जायची की भानू हळूच आपली पानं बघितल्यासारखी करायचा आणि त्याच्या आधीच्याने जितक्या गोट्या आलो असे म्हटले असेल त्याच्यापेक्षा एकदम दूप्पट गोट्या आलो असे म्हणून जोरात हात आपटून त्या गोट्या मध्यभागी ठेवायचा. त्याचा तो आविर्भाव बघूनच बहुतेक लोक माघार घ्यायचे आणि त्याला डाव बहाल करायचे. ह्यात कैक वेळेला प्रतिस्पर्ध्यांकडे चांगली पाने असूनसुद्धा भानू जिंकायचा. हे सगळे मी नीट पाहात होतो आणि हळूहळू मलाही त्यात भाग घ्यावासा वाटू लागले.

एक दिवस हिंमत करून मीही त्या खेळात उतरलो पण एकदोन डाव जिंकलेले सोडले तर सरतेशेवटी खिशात असलेल्या सगळ्या गोट्या हरलो आणि चेहरा पाडून तिथेच इतरांचा खेळ पाहत बसलो.तसा मी सहजासहजी हार मानणारा नसल्यामुळे दुसर्‍या दिवशी थोड्या(१०) उसन्या गोट्या घेऊन पुन्हा त्या जुगारात सामील झालो आणि पुन्हा सपशेल आडवा पडलो. आज मी नुसताच हरलेलो नव्हतो तर अंगावर कर्जही झालेले होते. त्यामुळे आज अजूनही खट्टू झालो होतो. आता पुन्हा कुठून गोट्या पैदा कराव्यात ह्या विवंचनेत होतो कारण आमच्या कडे लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत नव्हती मग मी गोट्या तरी कुठून आणणार?

मी मग एक शक्कल शोधली. रोजच्याप्रमाणे भानू मला त्याच्या बाजूला बसायचा आग्रह करायला लागला तेव्हा मी त्याला सरळ सांगितले....प्रत्येक जिंकलेल्या डावामागे मला तू १ गोटी बक्षीस द्यायची. कबूल असेल तर सांग.
तो कबूल झाला आणि गंमत म्हणजे योगायोगाने त्यादिवशी तो सगळे डाव जिंकला. त्याच्या विरुद्ध खेळणारे सगळे प्रतिस्पर्धी कफल्लक होऊन निघून गेले.भानूने त्याचा गल्ला मोजला तर एकूण २०० गोट्या जमलेल्या होत्या त्याच्याकडे. त्यादिवशी भानूने मला कबूल केल्याप्रमाणे जिंकलेल्या १५ डावांच्या प्रत्येकी एक अशा १५ आणि अधिक ५ खास बक्षीस अशा २० गोट्या दिल्या. मी तर एकदम मालामाल होऊन गेलो.त्या गोट्या मिळताच मी कर्जाऊ घेतलेल्या १० गोट्या परत केल्या आणि सुटकेचा श्वास घेतला आणि मनात ठरवले की ह्यापुढे कधीच कर्ज काढायचे नाही.

त्यानंतर मग मी ह्या जुगारात भाग घेताना सावधपणे खेळायचा पवित्रा घेत काही दिवस ना नफा ना तोटा ह्या तत्वावर टिकून राहिलो.प्रेक्षक म्हणून बाहेर बसून इतरांचा अंदाज घेणे आणि त्यांचाच एक प्रतिस्पर्धी बनून त्यांच्या डावपेचांचा अंदाज घेणे हा अतिशय वेगळाच अनुभव होता. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढायला लागला आणि भानूच्या खालोखाल जास्त डाव जिंकण्यात माझा क्रमांक लागायला लागला. एकदोनदा तर मी भानूलादेखिल पूरून उरलो. पण भानू हा त्यातला किडा असल्यामुळे त्याने वेळीच माझा धोका ओळखला आणि मला एकदा बाजूला घेऊन मांडवली केली. ती अशी की...दोघांनी एकाच वेळी खेळात उतरायचे नाही. जेव्हा भानू खेळत असेल तेव्हा मी फक्त त्याच्या बाजूला बसून राहायचे आणि प्रत्येक जिंकलेल्या डावासाठी त्याने मला २ गोट्या द्यायच्या. भानूच्या आधी जर मी खेळात उतरलो असेन तर मग भानूने तिथे अजिबात थांबायचे नाही...वगैरे वगैरे.

त्याप्रमाणे काही दिवस सुरळीत गेले आणि माझ्या लक्षात आले की माझ्या समोर कुणाचीच डाळ शिजेना. प्रत्येकवेळी मीच जिंकायला लागलो. एक भानू सोडला तर मला कुणीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उरलेला नव्हता आणि तो तर माझ्याशी तह करून बसलेला होता. पण माझ्या मनात भानूलाही हरवायचे होते आणि आता मी त्या दृष्टीने तयार देखिल झालो होतो. दुसरे म्हणजे भानूच्या सगळ्या क्लुप्त्या मी इतके दिवस अगदी जवळून पाहात आलेलो होतो त्यामुळे साहजिकच मी त्याला भारी पडेन ह्याची मला पूर्ण खात्री झाली होती. पण त्याच्याशी लढत जुळवून कशी आणायची?

मी एकदा भानूला सहज म्हटले देखिल...आता ह्या चिल्लर पिल्लर लोकांशी खेळण्यात मला मजा नाही वाटत. एकदा तुझ्याशी खेळायचे आहे; तर कधी बसू या आपण?
तो फक्त हसला आणि त्याने खांदे उडवले. तो विषय तात्पुरता तिथेच संपला.

त्या दिवशी देखिल मी नेहमीसारखाच जिंकत होतो. खेळ अगदी रंगात आला होता आणि इतक्यात आईची हाक आली.नेहमीप्रमाणे मी चटकन ओ दिली नाही कारण आईच्या अचानक आलेल्या हाकेने मी भांबावलो होतो.आई निवांतपणे झोपलेली आहे हे पाहून मी निश्चिंत होत्साता हळूच खेळात भाग घेतला होता. दुसरे म्हणजे आज आम्ही जिथे बसलो होतो ती जागा अगदी माझ्या घरासमोरच होती त्यामुळे आज पकडला जाईन अशी भिती होतीच. आईने दोनतीन हाका मारल्या तरी मी ओ दिली नाही तेव्हा ती घरातून अंगणात आली आणि तिने पुन्हा दोनतीन हाका मारल्या. खरे तर मी आईपासून अगदी जवळच होतो पण तिला दिसू शकत नव्हतो कारण आम्ही सगळे एका दाट झुडूपात बसून हे सगळे उपद्व्याप करत होतो.
तेवढ्यात तिथेच खेळणार्‍या एका लहान मुलाला आईने विचारले की..प्रमोदला कुठे पाहिलेस काय?
त्यावर त्याने त्या झुडूपाकडे बोट दाखवले आणि मग काय विचारता...आमचा खेळ पाऽऽर संपला.

जुगार खेळताना आईने मला अगदी रंगेहात पकडले आणि मग असा काही चोप दिलाय की काही विचारू नका. वर त्या दिवशी रात्रीचे जेवणही नाही दिले. हे कमी म्हणून की काय मी जिंकलेल्या जवळ १००-१५० गोट्या बाहेर अंगणात फेकून दिल्या ज्या त्या सगळ्या मुलांनी आनंदाने लुटल्या आणि मला चिडवत चिडवत एकेक जण तिथून सटकला. त्या दिवशी आईने निर्वाणीचा इशारा दिला की ...पुन्हा जर असा जुगार खेळलास तर तू माझा मुलगा नाहीस असे समजेन.
हा झटका सगळ्यात जबरी होता.त्या दिवशी मी शपथ घेतली की.. असा जुगार मी पुन्हा कधीच खेळणार नाही म्हणून.. जी आजवर पाळलेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळचा अपवाद आहे.तोही एक योगायोग म्हणून घडला. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.

७ सप्टेंबर, २००८

जयहिंद राव!

"देवसाहेब! हे बघा कोण आलेत!"
कार्यालयात प्रवेश करताक्षणीच आमच्या सुरक्षा रक्षकांनी माझे लक्ष वेधले. खरं तर मी साहेब वगैरे काही नाही; पण त्या अर्धशिक्षित सुरक्षारक्षकांपेक्षा जरा दोन बुकं जास्त शिकलेलो असल्यामुळे मला ते साहेब म्हणतात इतकेच. तर सांगायचा मुद्दा इतकाच की त्यांनी माझे लक्ष वेधले तेव्हा त्यांच्या जवळ एक मध्यमवयीन व्यक्ती बसलेली दिसली. मी माझ्या नेहमीच्या सवयीने "वंदे मातरम्‌" असे त्याला म्हणून अभिवादन केले.त्यावर लगेच त्याने "जयहिंद" असे म्हणून मला प्रतिसाद दिला. :)
त्याची चौकशी केल्यावर जी माहीती कळली ती अशी.... त्याचे नाव ’ जे.एच.राव’ असे होते आणि आधी तो एकवायुदल अधिकारी होता. आता तिथून सेवानिवृत्ती घेऊन आमच्या कार्यालयात एक अधिकारी म्हणून दाखल झालेला आहे. सुरुवातीची दोन वर्ष त्याने दिल्लीत काढल्यावर तो आता मुंबईत बदलीवर आलाय. मी त्याचे यथोचित स्वागत केले आणि त्याला आमच्या वरीष्ठांकडे घेऊन गेलो. ही आमची पहिली मुलाखत!

राव माझ्यापेक्षा वरचा अधिकारी होता हे त्याला नंतर माझ्या वरीष्ठांकडून कळले पण तरीही त्याच्या वागण्यात तसे काहीच आढळले नाही. वागण्यात तो अतिशय सरळ होता आणि कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तो प्रत्येकाला अहो-जाहो करत असायचा.राव जसजसा रुळत गेला तसतसे हळूहळू त्या अहो-जाहोचे एकेरी संबोधनात रुपांतर झाले. आम्ही त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने लहान लोकंही मित्रत्वाच्या अधिकारात त्याला अरे-तुरे करू लागलो. बघता बघता तो आमच्यातलाच एक झाला.आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तो नेहमी ’जयहिंद’ असे म्हणून समोरच्याला अभिवादन करायचा. त्यामुळे त्याचे नाव आपोआपच ’जयहिंद राव’ असेच झाले.(त्याच्या नावातली आद्याक्षरं देखिल योगायोगाने जे.एच अशीच होती. पण त्याचे पूर्ण रूप वेगळे होते.)

साधारण साडेपाच फूट उंची,काळा-सावळा वर्ण,तेल चोपडलेले चपचपीत केस आणि त्यांचा व्यवस्थित पाडलेला भांग, दिसायला नाकी-डोळी नीटस असे काहीसे रावचे रुपडे होते. बोलताना नेहमी प्रत्येक वाक्याची सुरुवात ’भ’काराने सुरु होणार्‍या शिवीने आणि वाक्याचा शेवट ’म’काराने सुरु होणार्‍या शिवीने होत असे. सुरुवातीला आम्हाला ते जरा विचित्र वाटले पण नंतर नंतर त्याचे काहीच वाटेनासे झाले कारण एरवी रावचे बोलणे अतिशय सभ्य असेच होते.

राव हा माजी सैनिक असल्यामुळे त्याला मिलिटरी कॅंटीनमधून सवलतीच्या दरात सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळत. आमच्या कडे रावसारखेच इतरही काही माजी सैनिक होते. पण केवळ राव हाच सर्वांना त्याच्या कार्डावर अशा वस्तु एकही जास्तीचा पैसा न घेता आणून देत असे. अशा वेळी समोरचा माणूस झाडूवाला आहे की आपला वरीष्ठ आहे हे तो बघत नसे. सगळ्यांना आपल्याला मिळणार्‍या सोयी-सवलतींचा लाभ देत असे.मात्र एक गोष्ट तो कुणालाही कधीच देत नसे आणि ती म्हणजे ’दारू!’
महिन्याला एका विशिष्ठ प्रमाणातच त्याला ती मिळत असे आणि ती त्याला स्वत:लाच कमी पडायची. जे इतर माजी सैनिक स्वत: पीत नसत ते, ही अशा तर्‍हेने त्यांना मिळणारी दारू चक्क बाजार भावाने विकत आणि राव ती त्यांच्याकडून बाजारभावाने विकत घेत असे.

राव त्याच्या कामात हुशार होताच पण त्या व्यतिरिक्त तो बहुश्रुतही होता. रावची आणि माझी विशेष मैत्री जमली ती कशी? हे मलाही तसे एक कोडेच आहे.कारण एक माणूस म्हणून राव जरी लाख माणूस होता तरी रावचे दारू आणि सिगरेटचे व्यसनही मला माहित होते आणि मी एरवी अशा लोकांपासून चार हात दूरच राहातो. रावच्या लेखी मात्र मी एक सच्चा माणूस होतो आणि दिलेल्या शब्दाला जागणारा होतो..हे मला त्याच्याचकडून कळले होते.ह्या गोष्टीचे कारण असे की मी रावला वेळोवेळी उसने पैसे देत असे. आश्चर्य वाटले ना? अहो वाटणारच! कारण माझ्यापेक्षा जास्त पगार त्याला होता. मग अशा रावला मी कशी मदत करत असे आणि का?....

त्याचे काय आहे की आमच्या कार्यालयात आधी गजा नावाचा एक सहकारी ’फंड’ चालवायचा. दर महिन्याला अमूक एक रक्कम प्रत्येकाकडून त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे गोळा करून ती गरजवंताला/ना मासिक दोन रूपये व्याजाने देऊ केली जायची.
ह्यातून मिळणारे व्याज वर्षाच्या शेवटी सर्व सभासदांना त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वाटले जाई. ह्या योजनेमुळे बर्‍याच जणांची सोय होत असे.पण गजा फंड बंद करून अचानक नोकरी सोडून गेला आणि अशा गरजवंतांना पैशाची चणचण जाणवू लागली. गजानंतर एक दोघांनी पुढाकार घेऊन हे फंड प्रकरण हाताळायचा प्रयत्न केला पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण हे लोक ते पैसे गरजवंतांना देण्याऐवजी स्वत:च वापरू लागले. ह्यातून जी गरज निर्माण झाली ती एका प्रामाणिक व्यवस्थापकाची जी इतरांच्या मते मी पूर्ण करू शकत होतो आणि म्हणून सगळ्यांनी मला गळ घातली फंड सुरु करण्याची.मला खरे तर ह्या भानगडीत पडायची अजिबात इच्छा नव्हती. विशेष करून लोकांकडून पैसे मागण्याच्या बाबतीत माझा भिडस्तपणा मला त्रासदायक व्हायचा. कैक वेळेला कर्जाऊ दिलेले माझेच पैसे मी परत मागताना मलाच अजिजी करायला लागायची. माझे पैसे गेले तरी ते नुकसान एक वेळ मी सोसू शकत होतो पण सार्वजनिक पैशाबाबत असे करून चालणार नव्हते. तिथे माझ्या सचोटीबद्दल शंका निर्माण होऊ शकली असती आणि ते मला कधीच आवडले नसते त्यामुळे मी आधी नकारच दिला. पण माझ्या जवळच्या मित्रांपैकी ’दादा’ने देखिल गळ घातली आणि पैसे वसुलीचे माझ्यावर सोपव असे सांगून धीर दिला. दादा हा नावाप्रमाणेच दादा होता त्यामुळे मी मग जास्त आढेवेढे न घेता फंड सुरु केला.(दादाबद्दल सविस्तर ह्या लेखांमध्ये वाचा.)
ह्या फंडाचा फायदा खर्‍या गरजवंतांना द्यायचा असे माझे तत्व होते आणि त्याप्रमाणे मी वागत होतो. प्रत्येकाची परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन मी कर्ज देत असे.त्यामुळे कुणा एकाला अवाच्या-सवा कर्ज दिले असे होत नसे. त्यामुळे जमा रकमेपैकी पाच दहा टक्के रक्कम माझ्याकडे नेहमी शिल्लक राहात असे ज्याचा उपयोग आयत्या वेळी कुणाला पैसे लागले तर होत असे. ह्या गोष्टीचा फायदा बर्‍याच वेळेला रावला होत असे कारण महिन्याच्या शेवटी शेवटी त्याला पैश्यांची तंगी जाणवत असे आणि माझ्याकडून वेळेवर खसखस न करता पैसे मिळत असल्यामुळे तोही खुश असायचा.एक तारखेला पगार झाला की आठवणीने तो ते पैसे आणून देत असे. हा त्याचा गुण फारच थोड्या लोकांच्यात होता. अशा ह्या रावला मी नेहमी दारू-सिगरेट सोडण्याचा सल्ला देत असे पण त्याचा त्यावर काडीमात्रही परिणाम होत नसायचा. तो आपल्याच नशेत असायचा.त्याची ही सवय सुटावी म्हणून मी कधी कधी त्याला कर्जाऊ पैसे द्यायला नकार देखिल दिला होता पण राव माझं बारसं जेवलेला होता. तो इतर कुणाला तरी पुढे करून पैसे घ्यायचा आणि आपला शौक पुरवायचा.असो.

सुरुवातीला राव कार्यालयात आणि कार्यालयाच्या वेळेत दारू कधीच पीत नसे.पण कसे कुणास ठाऊक पण तो हळूहळू गुपचुपपणे कार्यालयातही थोडी थोडी पिऊ लागला हे माझ्या नजरेतून सुटले नाही. मी त्याला त्याबद्दल चांगलेच झाडत असे पण त्याने ते कधीच मनावर घेतले नाही.(हे मी कोणत्या अधिकारात करत असे मला माहीत नाही आणि रावने देखिल मला कधी उलट उत्तर कसे केले नाही हे कोडे देखिल कधीच उलगडले नाही)उलट वेळप्रसंगी तो मलाच आग्रह करायचा आणि माझा अपेक्षित नकार ऐकून पुन्हा आपल्या नशेत धुंद राहायचा.मग मी त्याला टाळायला लागलो. मला भिती एकाच गोष्ठीची वाटत होती की हे जर वरिष्ठांना कळले तर रावची नोकरी जाईल. एरवी चांगला असलेला एक माणूस निव्वळ ह्या दारूपायी फुकट जातोय हे मला बघवत नव्हते पण मी काहीच करू शकत नव्हतो कारण मी त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकारानेही छोटा होतो.

रावचे दारू पिणे हळूहळू वाढू लागले. आधी तो कार्यालयात असताना अतिशय मर्यादित पीत असे आणि ते फारसे कुणाच्या लक्षात येत नसे.अशा वेळी राव अतिशय शांत दिसत असे. पण जसजसे त्याचे दारुचे प्रमाण वाढायला लागले तसे त्याचे वर्तन बदलायला लागले.जसजशी दारू चढायला लागायची तसतसा तो भांडखोर व्हायला लागायचा. एरवी देवभोळा असणारा राव अशावेळी समस्त ३३कोटी देवांची यथेच्छ निंदानालस्ती करायचा. क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढवायचा.

मधल्या काळात आम्ही काही जणांनी त्याला सुधारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.म्हणजे तो थोडाफार सुधारला देखिल. नाशिक की कुठे तरी जाऊन विपश्यना शिबिरात हजेरी लावून आला. काही दिवस छान गेले आणि एक दिवस पुन्हा रावने भर ऑफिसात राडा केला. त्या दिवशी तो अक्षरश: ’फुल्ल’ होता. त्याला स्वत:च्या देहाचीही शुद्ध नव्हती.बसल्या जागीच पॅंट ओली केली त्याने. दारूचा वास आणि त्यात त्याच्या मुताच्या वासाने एक संमिश्र वास धारण करून सगळ्यांच्या नाकातले केस जाळले. त्याच्या आसापासही कुणी जायला तयार होईना. अशात त्याने रडायला सुरुवात केली. अक्षरश: धाय मोकलून रडायला लागला तो...जणू काही त्याची कुणी प्रिय व्यक्ती मरण पावली असावी.
दारू प्यायल्यावर एरवी आक्रमक होणारा हा प्राणि आज इतका धाय मोकलून का रडतोय हे कुणालाच कळेना. लोक आपापसात तर्क लढवत होते पण कुणीच त्याला त्याबद्दल काही विचारण्यासाठी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. त्याचे कारण असे की एकदोघांनी त्याला समजवण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचे धाडस केलेही होते पण तो त्यांच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा तेही मागे हटले.

हा हा म्हणता ही बातमी आमच्या साहेबांपर्यंत पोचली आणि रावची खबर घ्यायला खुद्द साहेब येताहेत असे कळले तेव्हा सगळीकडे पांगापांग झाली. मनात आले, ’गेली आता रावची नोकरी!कोण वाचवणार ह्याला आता?’
आणि खरंच साहेब आले. त्यांनी रावची अवस्था पाहिली आणि ते हतबुद्धच झाले. इतका जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो? पण डोकं शांत ठेवून आधी झाडूवाल्याकडून ती जागा साफ करवून घेतली आणि मग रावजवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागले.

रावने साहेबांनाही मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला हळूच दूर केले.मग हळूहळू त्याच्याकडून माहीती करून घ्यायला लागले. मधे मधे राव खिशातली ’चपटी’ काढून साहेबाच्या देखतच आचमनं करत होता. वर साहेबालाही घेण्याचा आग्रह करत होता. तसे साहेबही ’घेणार्‍यातले’ होते;नाही असे नाही, पण स्थळं-काळाचं भान ठेऊन. इतकंच कशाला,राव आणि साहेब एकत्र बसूनही पीत असत...पण ते साहेबांच्या घरी. ऑफिसात कधीच नाही.... आणि इथे राव साहेबांना घ्यायचा आग्रह करत होता. साहेबांनी हळूच त्याच्या हातातून बाटली काढून घेतली आणि झाडूवाल्याकडे देऊन त्याला संडासात ओतून टाकायला सांगितली.

रावच्या असंबद्ध बडबडीतून शेवटी असे लक्षात आले ते असे.. सहा एक महिन्यापूर्वीच हैद्राबादमध्ये त्याची लग्न झालेली मोठी मुलगी एका मुलीला जन्म देऊन बाळंतपणातच वारली होती . रावचा जावई देखिल हैद्राबादेतच नोकरी करत होता आणि त्याच्या घरी त्या तान्ह्या मुलीला सांभाळणारे कुणीच नसल्याने ती जबाबदारी रावच्या बायकोवर येऊन पडली होती. ह्या गोष्टीचा परीणाम म्हणून रावला इथे मुंबईतएकटेच राहावे लागत होते. मुलीच्या अकाली निधनाचे दु:ख आणि त्यात पुन्हा पत्नी जवळ नसल्याने येणारा एकटेपणा..ह्यामुळे तो पूर्ण गांजून गेलेला. अशा अवस्थेत दारू हाच एक जवळचा मित्र असे समजून राव त्याच्या जास्तच आहारी गेला होता.

साहेबांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आणि रावला काही दिवसांची सुटी देऊन हैद्राबादला पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. पटापट सुत्र हलली आणि तिकीट वगैरेची व्यवस्था झाल्यावर साहेबांनी दादाला पाचारण केले आणि रावला हैद्राबादच्या गाडीत बसवायची आज्ञा दिली. सोबत कार्यालयाची गाडी आणि चालक देखिल दिला. दादाने रावला बाबापुता करून समजावले आणि मोठ्या मुश्किलीने हैद्राबादच्या गाडीत बसवले. त्याही अवस्थेत राव दिसेल त्याच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करत होता.दादालाही सोडायला तो तयार नव्हता त्यामुळे नाईलाजाने दादादेखिल त्याच्या बाजूला बसून राहीला. शिट्टी वाजली,गाडी सुरु झाली. बाहेरून येणार्‍या थंडगार हवेमुळे आणि दिवसभराच्या थकव्यामुळे राव आडवा झाला आणि पाहता पाहता झोपेच्या आधीन झाला.तो शांत झोपलाय हे पाहिले आणि दादा दादरला उतरला आणि कार्यालयात त्याने दूरध्वनी करून साहेबांना हा वृत्तांत कळवला. साहेबांनी त्याला शाबासकी दिली आणि तिथूनच घरी जायची परवानगी दिली.

महिन्याभराने सुटी संपवून राव बायको आणि नातीसह मुंबईत आला.बायको महिनाभर राहून नातीसह पुन्हा हैद्राबादला गेली. बायको मुंबईत असेपर्यंत रावचे रूप पाहण्यासारखे होते. सकाळी पूजा करून,कपाळावर गंध लावून येणार्‍या रावचे प्रसन्न रूप पाहून खूप बरे वाटायचे. ह्या काळात सिगरेटचे सेवन खूपच मर्यादित झालेले होते आणि दारूदेखिल संपूर्णपणे बंद होती.
पण बायको गेल्यावर पुनः राव पूर्वपदावर आला. सिगरेटचे प्रमाण वाढले आणि दारुदेखिल पुन्हा सुरु झाली.

रावच्या व्यसनाची ही गोष्ट न संपणारी आहे पण शेवटी एक दिवस तिचाही शेवट झालाच.
असेच व्यसनात राहून कशीबशी नोकरी करत राव एके दिवशी सेवानिवृत्त झाला. त्या दिवशी त्याने त्याच्या पठडीतल्या लोकांना दारूने आंघोळ घातली आणि अतिशय आनंदाने तो हैद्राबादला गेला.दोनतीने महिन्यांनी राव काही वैयक्तिक कारणांसाठी मुंबईत येऊन आम्हाला भेटून गेला तेव्हाचा राव आजही नजरेसमोरून हटत नाही. तेव्हा रावच्या चेहर्‍यावर एक विलक्षण असे सात्विक तेज विलसत होते. त्याच्या बायकोत काय जादू होती माहीत नाही, पण तिच्या सहवासात असताना राव सर्व व्यसनं विसरायचा.रावची बायको खूपच धार्मिक होती आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा पगडा राववर पडल्यामुळे रावमध्ये होणारा सकारात्मक बदल पाहून नेहमीच असे वाटत आलंय की जर रावला पत्नीचा सहवास अखंडपणे लाभला असता तर...

आणि काही दिवसातच बातमी आली...रावची बदली झाली...त्याला वरचे बोलावणे आले....देवाज्ञा झाली.
ऐकून खूप वाईट वाटले. आत्ता कुठे त्याच्या जीवनात चांगले दिवस येत होते आणि अचानक हे असे का व्हावे?
इश्वरेच्छा बलियसी! दुसरे काय?

३ सप्टेंबर, २००८

संगीत चिवडामणी स्वर’बास’कर पंडीत मोदबुवा!

संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.म्हणजेच, एकूण काय तर, संगीत सगळ्यांना आवडतं. हां,आता त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत,सुगमसंगीत,चित्रपटसंगीत वगैरे करत करत अगदी हल्ली तरुणांच्यात प्रचलित असलेले पॉप/रॅप पर्यंत असे कोणतेही प्रकार असतील.ह्यातला एक तरी प्रकार आवडत असलेला माणूस माझ्या दृष्टीने संगीत रसिकच आहे. तर सांगायचा मुद्दा काय की संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि संगीतकार,गायक,वादक वगैरेंना चांगल्या प्रकारची प्रतिष्ठाही आहे.

आता नमनाला घडाभर नाही तरी वाटीभर तेल गेलंय तेव्हा मूळ मुद्याकडे वळतो. आधी माझी ओळख करून देतो. हो,हल्ली अशी प्रथाच आहे. आपणच आपली ओळख द्यावी लागते त्याशिवाय लोक हिंगं लावूनही विचारत नाहीत.तर, मी आहे न्हाणी घराण्याचा गायक आणि संगीतकार मोद. पण ’पंडीत मोदबुवा’ अशी पदवी मला खुद्द अण्णांनी दिलेय.(आता अण्णा कोण ते विचारू नका. महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला अण्णा आणि बाबूजी कोण ते माहीत नसेल तर मग तुम्ही खरे मराठी असूच शकत नाही.)तेव्हा ती मला माझ्या नावापुढे लावणे क्रमप्राप्तच आहे. मला लहानपणापासून संगीताची(मुलगी नव्हे! ;))आवड आहे. तेव्हा माझा आवाजही चांगला होता पण मला संगीत शिकण्याची संधी मात्र मिळाली नाही. असं असलं तरी श्रवण मात्र भरपूर केलंय. आकाशवाणी हे सर्वात प्रभावी माध्यम आहे आणि ह्या माध्यमाद्वारेच माझी अनेक गायक कलाकार आणि संगीतकारांशी ओळख झाली ती त्यांच्या शैलीची. ऐकलेल्या प्रत्येक गाण्याची नक्कल तर मी हुबेहुब करत असे. मात्र माझा आवाज सर्वच प्रकारच्या गाण्यांना अनुकुल नव्हता त्यामुळे माझ्या पहाडी आवाजाला अनुकुल असणारे गायन प्रकारच मी जास्त निवडू लागलो. त्यात मुख्यत्वे समरगीतं,स्फुर्तीगीतं,पोवाडे वगैरे प्रकार असतच पण मा.दिनानाथ,श्रीपादराव नेवरेकर,वसंतराव देशपांडे ह्यासारख्यांची दणदणीत आवाजातली नाट्यगीतं गायला मला फारच आवडायची.
इतरांची गाणी गाता गाता मला गाण्यांना चाली देण्याचाही नाद लागला. शालेय अभ्यासक्रमात त्या वेळी आम्हाला कवि बा.भ बोरकर,कुसुमाग्रज,पाडगावकर,वसंत बापट,अनिल वगैरे सगळ्या दिग्गज कवींच्या कविता असत.त्या कविता शाळेत म्हणण्याची तेव्हा एक विशिष्ट पद्धत असे. बहुतेक सगळ्या कविता त्या पद्धतीने आम्ही म्हणत असू. पण चौथीला आम्हाला एक केणी नावाचे गुरुजी होते त्यांनी एक कविता स्वत: चाल लावून आम्हाला शिकवली. ती कविता कुणाची होती ते आता आठवत नाही पण त्याचे बोल साधारण असे होते.... जा हासत खेळत बाल निर्झरा आनंदाने गात...
ती चाल नेहेमीच्या कविता गायनापेक्षा नक्कीच वेगळी होती आणि त्यावरून मग स्फुर्ती घेऊन मी मला आवडणार्‍या कवितांना चाली लावू लागलो.
माझ्या आठवणी प्रमाणे माझी पहिली चाल होती कवि मंगेश पाडगावकरांच्या ’सत्कार’ ह्या कवितेला.... पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.....असे त्याचे शब्द होते. मला संगीतातल्या रागांची,तालांची नुसती नावं माहीत आहेत पण ते ओळखता येत नाहीत त्यामुळे ती चाल कोणत्या रागातली होती हे माहीत नाही पण आज आठवायचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की ती चाल त्यावेळी गाजणार्‍या एका सिनेगीतासारखी होती. अगदी जरी हुबेहुब नव्हती तरी देखिल साधारण तसा भास होईल अशी होती. अर्थात चाल लावताना माझ्या नजरेसमोर ती प्रसिद्ध चाल नव्हती पण नंतर त्यातलं साम्य लक्षात आलं आणि गंमतही वाटली. माझा नैसर्गिक कल हा रागदारीकडे असल्यामुळे माझ्या चालीही तशाच प्रकारे रागानुवर्ती असतात असा माझा अनुभव आहे. पण तो कोणता राग असतो हे मला नका विचारू कारण तेवढंच मला जमत नाही. :)
आता जेव्हा मी त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की मला आवडणारी जी काही खास गाणी आहेत ती साधारणपणे दरबारी,मल्हार आणि त्याचे प्रकार,भैरवी,हमीर,यमन,मालकंस...वगैरे रागातली असतात. तेव्हा ही माझी पहिली चाल बहुतेक करून दरबारीच्या अंगाने जाणारी असावी असा तर्क आहे.
मी अशीच एका कवितेला चाल लावली होती जी ’रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ ह्या भीमसेनांनी गायलेल्या गाण्याच्या अंगाने जाणारी होती. कारण जरी मला भीमसेनांची गायकी कळत नव्हती तरी अनुकरणीय नक्कीच वाटायची आणि माझ्या आवाजाला अनुकुल देखिल होती. आता माहीत झालंय की तो राग हिंडोल आहे म्हणून. पण तेव्हा हे माझ्या ध्यानी-मनी देखिल नव्हतं.

आज ह्या आठवणी येण्याचं कारण असं की हल्लीच, माझं, माझ्या एका संगीतकार मित्राशी बोलणं सुरु होतं. विषय अर्थातच संगीत हा होता.नेहमीप्रमाणे मी त्यांना विचारलं की.. सद्या काय सुरु आहे?
तेव्हा एका भक्तीगीतावर ते काम करताहेत असं कळलं. लगेच मी म्हटलं की... ऐकवा की मग त्याची चाल.
ते म्हणाले की.. अजून पूर्ण नाही झालं काम.
मी आपलं उगीच त्यांना चिडवण्यासाठी म्हटलं तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. मी लावतो चाल.
त्यांनीही मला गंमत म्हणून लगेच गीताचा दुवा दिला आणि म्हणाले..तिथे जावून वाचा आणि लावा चाल.
मी लगेच त्या दुव्यावर जाऊन शब्द वाचले आणि मला लगेच चाल सुचली. त्यांना म्हटलं की ...झाली की चाल तयार.
तर म्हणाले...पाठवा ध्वनिमुद्रित करून.
आता आली का पंचाईत? इतके दिवस मी जे काही करत होतो ते सगळं स्वान्त सुखाय होतं. आता ध्वनिमुद्रण करायचं म्हणजे पीडाच की. त्यातून आता माझा आवाज साफ खलास झालेला.एकेकाळी मला माझ्या आवाजाचा सार्थ अभिमान होता पण आज मात्र तो घशातल्या घशातच अडकतो. आता काय करणार?
मी आपलं आता नाही,मग करू म्हणून टाळायला लागलो आणि ते माझ्या पाठी लागले..करा,करा..म्हणून.
मग काय केली हिंमत आणि एकदाचं केलं ध्वनीमुद्रण. मग त्याचे मप३ रुपांतर कसं करायचं तेही त्यांनीच सांगितलं आणि शेवटी सगळे सोपस्कार होऊन एकदाची चाल त्यांच्याकडे रवाना केली. मला खात्री होती की आता ह्यानंतर पुन्हा काही ते आपल्याशी ह्या विषयावर बोलणार नाहीत. पण...
अहो आश्चर्य म्हणजे त्यांना ती चाल आवडली आणि ती चक्क ’यमन’ रागातली निघाली. आता बोला.
अजून एक दोघा जणांना चाल ऐकवली. त्यानाही आवडली असं त्यांनी सांगितलं. मग काय हो, मी मुद्दाम कविता वाचायला सुरुवात केली आणि बघता बघता आठ-दहा कवितांना चाली लावल्या.
सर्वात आधी आमच्या ह्या गुरुवर्यांना ऐकवायच्या आणि मग काही खास मित्रांना...असा प्रकार सुरु झाला. आमचे गुरुवर्य अगदी चिकाटीचे निघाले. न कंटाळता ते नित्यनेमाने माझी चाल ऐकून त्यांचे स्पष्ट मत त्यावर द्यायचे. इथे एक गंमत सांगण्यासारखी आहे.

चाल लावली,ती ध्वनिमुद्रित केली,ती मप३ मध्ये रुपांतरीत केली की गुरुवर्यांना पाठवायचो. मग गुरुवर्य मिस्किलपणे सांगायचे...ही तुमची चाल आधीच अमूक अमूक संगीतकाराने चोरलेय बरं का! ;)
आणि त्याचा पुरावाही सादर करायचे.
आता आली का पंचाईत? तद्माताय मी आपला मेहनत करून इतकी मस्त चाल लावतोय आणि ती गुरुवर्यांकडे पोचण्याआधीच कैक वर्ष आधी कुणी तरी चोरलेली असायची? ;) बरं ते संगीतकारही कुणी ऐरे-गैरे नसायचे. चांगले नावाजलेले आणि मलाही जे आवडत असत.पण म्हणून त्यांनी चक्क माझ्या चाली चोरायच्या म्हणजे काय? छे छे! हे भलतंच!त्याऐवजी माझ्याकडे एखादी चाल मागितली असती तर मी अशीच दिली असती आनंदाने ! जाऊ द्या झालं, असं म्हणून मग मी त्याच गीताला अजून वेगळ्या चाली लवायचो. तरीही तीच बोंब! कुणी तरी माझी नवी चाल देखिल आधीच चोरलेली निघायची. मग मीही मनात म्हटलं...आपण मनातच म्हणू शकतो... जाऊ द्या. आपल्यामुळे कुणाचं भलं होत असेल तर कशाला त्रागा करा. करा लेको मजा. चोरा माझ्या चाली.
मग काय मी कोण माझ्या चाली चोरतोय वगैरे बघायचं सोडूनच दिलं.आपण आपलं चाली रचत राहायच्या इतकंच ठरवलं आणि तेव्हापासून गुरुवर्यांनाही सांगितलं....ह्या पुढे मला सांगत जाऊ नका कुणी कोणती चाल चोरली ते. बिनधास्त चोरू द्या त्यांना. हवं तर तुम्हीही चोरा. ;)

आता चाली लावून गायल्यावर त्या गुरुवर्यांव्यतिरिक्त ज्या इतर काही लोकांना ऐकवायला लागलो त्यांचेही मजेशीर अनुभव आले.
एक प्रातिनिधिक अनुभव पाहा...शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तशी.
आमचा एक महाजालावरील दूरस्थ पुतण्या आहे. त्याला जेव्हा पहिली रचना पाठवली तेव्हा त्याचा उत्साह असा काही होता की यंव रे यंव. म्हणाला...काका,चाल पण मस्त आहे आणि आवाजही मस्त आहे.
मनात म्हटलं..चला,कुणाला तरी आवडतंय.
मग त्याला दुसरे गाणं पाठवलं. ह्यावेळी प्रतिसाद जरा थंड होता तरी आवडलं असं म्हणाला पण मग तो मला टाळायला लागला.महजालावर मी उगवताना दिसलो रे दिसलो की तो अंतःर्धान पावायला लागला.माझ्या लक्षात आला सारा प्रकार. असे दोनचार दिवस गेले. मग एक दिवस एका गाफील क्षणी पकडलं त्याला आणि म्हटलं....बाबा रे, असं तोंड चुकवू नकोस. ह्यापुढे तुला माझ्या चाली आणि गाणी कधीच ऐकवणार नाही असा शब्द देतो. तेव्हा कुठे त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याचा तो "हुश्शऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" म्हणून सोडलेला सुस्कारा इथपर्यंत ऐकायला आला मला. ;)

अजून एक छान आणि बोलकी प्रतिक्रिया मिळाली ती एका छोट्या मुलीकडून. तिचे बाबा माझं कुठलंतरी गाणं ऐकत होते आणि त्यामुळे साहजिकच त्या मुलीनेही ते ऐकलं. ती चटकन आपल्या बाबांना म्हणाली....हे असं फाटकं फाटकं गाणं बंद करा. :)

माझ्या एका मित्राने माझं गाणं ऐकून तर मला एक फार मोठी पदवीच देऊन टाकली. "संगीत चिवडामणी" अशी आणि त्याला पुढे अजून एक शेपूटही जोडलं.. स्वर खेच......रं! संगीतात चिवडा-चिवड करतो म्हणून ’संगीत चिवडामणी’आणि स्वर खेचत खेचत गातो म्हणून ’स्वर खेच....रं’ असे त्याचं स्पष्टीकरणही देऊन टाकलं.
दुसर्‍या मित्राने त्यात थोडा बदल करून म्हटलं.... "संगीत चिवडामणी स्वर’बास’कर "(आता तरी बास कर रे!) किंवा "संगीत चिवडामणी स्वर खरखर" (आवाजात इतकी खरखर आहे की...)ह्यापैकी जी हवी ती पदवी घे . मग मी विचार केला कोणती पदवी आपल्याला जास्त शोभेल? आणि पक्कं करून टाकलं.

तेव्हा आजपासून मी आहे "संगीत चिवडामणी स्वर’बास’कर-खरखर-खेच...रं पंडीत मोदबुवा!"
कसं वाटतंय माझं नवं नाव? भारदस्त आहे ना? उच्चारायला जड जातंय? मग असं करा. नुसतं "संचिस्वबाखखे पंडीत मोदबुवा" म्हणा!
जमेल ना हे? ;)

१७ जुलै, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १४

माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.

हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्‍यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्‍याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्‍या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.

एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्‍या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."

हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्‍यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्‍या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.

मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

८ जुलै, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ५ दत्ता डावजेकर!


दत्ता डावजेकर! संगीतातले डाव जे सहज करतात.. ते डावजेकर ! सिनेमा क्षेत्रात ते डीडी ह्या नावाने ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून सर्वात प्रथम गानकोकिळा लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी देणारा संगीतकार! हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागुं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ . डीडींनी त्यानंतर आशा मंगेशकर(भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली.

डीडींचे वडील बाबुराव, तमाशात आणि उर्दु नाटकात तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डीडींनी तबला तर शिकून घेतलाच पण पेटी वादनही आत्मसात करून घेतले. इथनं मग सुरु झाली त्यांची संगीत यात्रा. तबला-पेटी वादना बरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डीडींना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तर हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे डीडींना मासिक २०रूपये पगार मिळत असे.

त्यानंतर डीडींनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डीडींचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें ज्यात लता दीदींनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे डीडींच्या संगीत दिग्दर्शनात झाले हा एक मणिकांचन योग समजला जातो.

त्यानंतर आपकी अदालत हा वसंत जोगळेकरांचा चित्रपट आणि कैदी गोवलकोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथचा हिंदी-इंग्लीश चित्रपट केला. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.

दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. राजा परांजपे, गजानन जागिरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादि निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादि चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले.

डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थॅंक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम गीतकारही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत.
१)आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी- गायिका : लता मंगेशकर
२)कुणि बाई, गुणगुणले। गीत माझिया ह्रुदयी ठसले॥ -गायिका: आशा भोसले
३)गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना। गेला कुठे माझा राजा, राजा येईना॥ - गायिका: लता मंगेशकर
४)थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी । बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती ॥ - गायिका: आशा भोसले
५)तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला ! गायिका: लता मंगेशकर

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
डीडींची अजून काही गाजलेली गाणी अशी आहेत.
१)ऊठ शंकरा सोड समाधी-चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर
२) अंगणी गुलमोहर फुलला- गायिका : माणिक वर्मा
३)आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही- चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर
४)गोमू माहेरला जाते हो नाखवा-चित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी
५)गंगा आली रे अंगणी- चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई
६)या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती- चित्रपट पाठलाग- गायिका: आशा भोसले
७)तुझे नि माझे इवले गोकुळ - चित्रपट: सुखाची सावली. गायक-गायिका: लता आणि हृदयनाथ मंगेशकर
८)संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट: संथ वाहते कृष्णामाई- गायक: सुधीर फडके
९)रामा रघुनंदना,रामा रघुनंदना - चित्रपट: सुखाची सावली - गायिका: आशा भोसले
१०)बाई माझी करंगळी मोडली- चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले
डीडींची अजून कितीतरी श्रवणीय गाणी आहेत की ज्यांचा नुसता उल्लेख करायला गेलो तर पूर्ण पान भरून जाईल.
चित्रपटांच्या बरोबरीनेच डीडींनी बर्‍याच अनुबोधपटांचेही(डॉक्युमेंटरीज) संगीत,पार्श्वसंगीतही तयार केलेले आहे.

१९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला. त्यानंतर ते जवळजवळ विजनवासातच गेले
वार्धक्याने डीडींच्या स्मरणशक्तीवर बराच परिणाम केलेला होता त्यामुळे शेवटच्या काळात मात्र डीडींचा चित्रपट सृष्टीशी म्हणावा तितका संबंध राहिला नाही. वयाच्या नव्वदाव्या वर्षी डीडींचे १९ सप्टेंबर २००७ रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

आज डीडी आपल्यात त्यांच्या अजरामर चालींच्या स्वरुपात जीवंत आहेत.

(सर्व माहिती,दुवे आणि छायाचित्र महाजालावरून साभार!)

३० जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ४ यशवंत देव!स्वरांच्या दुनियेतला देव! कवी, शब्द-प्रधान गायक आणि संगीतकार यशवंत देव. गेल्या ४०पेक्षा जास्त वर्षे ज्यांनी आपल्या विविध गीतांनी रसिकांना डोलायला लावले असे हे मराठी सुगम संगीतातले मातबर व्यक्तिमत्व.
कधी बहर-कधी शिशिर, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, अशी एकापेक्षा एक सुरेल गीते आपण सुधीर फडके उर्फ बाबुजींच्या मधाळ आवाजात ऐकलेली असतील...ह्या गीतांना स्वरबद्ध केलेले आहे यशवंत देवांनी. कवि मंगेश पाडगावकरांचे काव्य,यशवंत देवांचे संगीत आणि बाबुजींचा स्वर असा समसमा योग कैक गाण्यात सुरेलपणे जुळून आलाय. ही गाणी ऐकत ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. आज इतक्या वर्षांनंतरही ह्या गाण्यांची गोडी अवीट आहे.

यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रुपातच गाणं होतं. तेच त्यांचे पहिले गुरु. देवांचे वडील विविध वाद्यं वाजवण्यात पटाईत होते पण त्यातही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम. त्यांच्याचकडून देवांना तालाचे जे बाळकडू मिळाले त्यामुळे देवांचा जीवनातला ताल कधीच चुकला नाही. घरामध्ये मोठमोठ्या कलाकारांचा राबता असे. मैफिली तर जवळपास रोजच असत. अशाच संगीतमय वातावरणात देव वाढले त्यामुळे सूर-ताल-लय ह्या गोष्टी त्यांच्या रक्तात सहजपणे भिनल्या. सुगमसंगीताकडे देव वळले ते मात्र जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच.

गीतातल्या शब्दातूनच त्याची चाल सहजपणे उलगडत येते म्हणून शब्द अतिशय महत्वाचे असतात असे देवसाहेब म्हणतात. देवसाहेबांच्या चालींचे हेच मर्म आहे. गाण्याचे मर्म समजण्यासाठी आधी त्यातल्या शब्दांचा अर्थ नीटपणे समजून घेतला पाहिजे असेच ते नेहमी होतकरू संगीतकारांना मार्गदर्शन करताना सांगत असतात. केवळ कानाला गोड लागते म्हणून ती चाल चांगली असे ते मानत नाहीत. ह्याचे एक उदाहरण देवसाहेबांनी दिलंय ते म्हणजे..बहरला पारिजात दारी,फुले का पडती शेजारी...ह्या गाण्याचे. ह्याची चाल अतिशय उत्कृष्ट अशी आहे पण देवसाहेब म्हणतात की गाण्याचा अर्थ असा आहे , "ती स्त्री तक्रार करते आहे की पारिजात जरी माझ्या दारात लावलेला असला तरी फुले सवतीच्या दारात का पडताहेत? हा अर्थ त्या चालीत कुठे दिसतोय? म्हणजे, चाल म्हणून एरवी जरी श्रवणीय असली तरी गीतातल्या भावना श्रोत्यांपर्यंत पोचवायला ती असमर्थ आहे.
तेव्हा संगीतकार म्हणजे लग्नात आंतरपाट धरणार्‍या भटजीसारखा असतो हे पक्के लक्षात ठेवून संगीतकारांनी कवी आणि रसिकांच्या मध्ये लुडबुड करू नये असे ते बजावतात.

देवसाहेब जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवी देखिल आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. १)जीवनात ही घडी अशीच राहू दे २)श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे ३) अशी धरा असे गगन कधी दिसेल का? ४)कोटी कोटी रुपे तुझी कोटी सुर्य चंद्र तारे ५) तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी ६)प्रिया आज माझी नसे साथ द्याया ७)स्वर आले दुरुनी,जुळल्या सगळ्या त्या आठवणी ८)अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात,कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात ९) अशी ही दोन फुलांची कथा,एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी रचलेत तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत.

देवसाहेबांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलंय, तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी,घन:श्याम नयनी आला... अशासरख्या जवळपास ३०-४० नाटकांनाही संगीत दिलंय. कै. सचिन शंकर बॅले ग्रुपसाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेले आहे. गदिमांचे गीतरामायण जसे बाबुजींनी संगीतबद्ध केले तसेच गदिमांचे "कथा ही रामजानकीची" ही नृत्यनाटिका सचिनशंकर बॅले ग्रुपने सादर केली होती आणि त्याचेही संगीतकार देव साहेब होते.

देवसाहेबांच्या जडणघडणीत आकाशवाणीचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीला सतारवादक म्हणून रुजु झालेल्या देवांनी पेटी कधी जवळ केली हे त्यांनाच कळले नाही. आकाशवाणीवरील संगीतिका,भावसरगम सारखे भावगीतांचे कार्यक्रम,नभोनाट्यांचे पार्श्वसंगीत असे कैक प्रकार त्यांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शानाच्या क्षेत्रात हाताळलेले आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री. अरुण दाते ह्यांचे नामकरणही त्यांनी ह्याच कालावधीत केले. त्याची गंमत अशी...अरूण दाते ह्यांचे मूळ नाव अरविंद असे आहे पण ते त्या काळी ए.आर दाते ह्या नावाने गात असत आणि देवसाहेब जेव्हा दात्यांच्या घरी गेले होते तेव्हा घरातील सगळी मंडळी दात्यांना अरू,अरू असे म्हणत होती. हे ऐकून ए म्हणजे अरूण असे समजून देवांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा अरूण दाते अशी केली आणि तेव्हापासून अरविंद दाते संगीताच्या विश्वात अरूण दाते म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

अरूण दाते
कवि मंगेश पाडगावकर,संगीतकार यशवंत देव आणि गायक अरूण दाते ही त्रिमुर्ती त्यानंतर कैक गाण्यात आपल्याला एकत्र आढळते. त्यातली काही गाणी अशी आहेत.
१)६)भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

२)मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको

३)अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
४)डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
५)दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
६) दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
७)धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास
८)भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
९)या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
१०)जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

यशवंत देवांनी सुरुवातीच्या काळात संगीताच्या शिकवण्याही केलेत. त्यामधून कितीतरी गायक-गायिका तयार झालेले आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव आहे सुमन कल्याणपुर. देवसाहेबांनी संगीत दिलेली कैक गाणी सुमनताईंनी गाऊन अजरामर केलेत.त्यातली आठवणारी ही काही गाणी.
१)मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम !
२)रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा
३)श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे

देवसाहेब स्वत: जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करतात तेव्हा त्यांना त्यांच्या गाजलेल्या गाण्यांबरोबरच इतर संगीतकारांची गाजलेली गाणी गाण्याचाही आग्रह होत असतो.साधारणपणे कोणताही कलाकार ही मागणी मान्य करत नसतो.पण देवसाहेब श्रोत्यांची मागणी मात्र वेगळ्या पद्धतीने पुरी करतात. ती गाणी ज्या गायक-गायिकेनी गायलेली असतात तशीच हुबेहुब ती गायली तरच लोकांना आवडतील आणि अशी गाणी आपल्या गळ्यातून तशीच्या तशी येणार नाहीत हे लक्षात घेऊन देवसाहेब इथे एक गमतीदार प्रयोग करतात आणि लोकांनाही तो आवडतोय. ते ती गाणी न गाता त्या गाण्यांचे विडंबन त्याच चालीत सादर करतात. हा प्रकारही श्रोत्यांना आवडतो. तसेच अजून एक नवा प्रकार देवसाहेबांनी सुरु केलाय तो म्हणजे समस्वरी गाणी.गाजलेल्या मूळ हिंदी-मराठी गाण्यांच्या चालींना आणि मतितार्थाला अजिबात धक्का न लावता नवीन रचना ते त्या चालीत सादर करतात. इथे आधीच रचलेल्या लोकप्रिय चालींमध्ये नेमकेपणाने काव्य रचण्याचे त्यांचे कौशल्य दिसून येते. शास्त्रीय संगीतातही त्यांनी प्रयोग करून एक नवा देवांगिनी नावाचा राग जन्माला घातलाय. ह्या रागाचा वापर त्यांनी घन:श्याम नयनी आला ह्या नाटकातील गाण्यात केलाय.

देवसाहेबांबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. आता शरीर थकलेलं असले तरी अजूनही त्यांचे संगीतातले नवनवीन प्रयोग चालूच असतात. त्यांना ह्या कार्यात अधिकाधिक प्रयोग करता यावेत आणि आपल्याला नवनवीन रचना ऐकण्याचे भाग्य लाभावे म्हणून आपण त्यांना दीर्घायुरोग्य चिंतूया.
जीवेत शरद: शतम्‌!

सर्व माहिती,छायाचित्रे आणि दुवे महाजालावरून साभार.

२८ जून, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!

आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.

शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. :)

मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्‍याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.

अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.

रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! ;) )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले)

२७ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ३ स्नेहल भाटकर!


स्नेहल भाटकर,भाटकर बुवा,व्ही.जी.भाटकर,वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक नावे. ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर.त्यांचे पूर्ण नाव आहे वासुदेव गंगाराम भाटकर .आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. ह्यातील स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव.त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले.अतिशय साध्या सरळ आणि सुश्राव्य अशा चाली देण्यात त्यांचा हातखंडा होता.

भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे.

भाटकरांचा जन्म १७ जुलै १९१९ मध्ये मुंबईच्या प्रभादेवी येथे झाला.गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. आईलाच ते आपला पहिला गुरु मानतात. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि "ह्यातूनही आपण बरेच शिकलो" असे ते प्रांजळपणे नमूद करतात.ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते.

१९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.

केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.

नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय.

सी. रामचंद्र उर्फ रामचंद्र तथा अण्णा चितळकर हे बुवांचे खास मित्र होते. एकदा अण्णांनी बुवांना आयत्या वेळी बोलवून घेतले आणि त्यांच्या बरोबरीने एका कव्वालीचे ध्वनिमुद्रण केले. खरे तर ही कव्वाली अण्णा महंमद रफीच्या साथीने गाणार होते पण ऐन वेळी रफीसाहेब येऊ न शकल्यामुळे त्यांनी ती बुवांच्या साथीने गायली.ही कव्वाली संगीता चित्रपटातील आहे ज्याचे संगीत सी. रामचंद्र ह्यांचे होते. सी. रामचंद्र ह्यांच्याबरोबरच्या गमती जमती आणि अजूनही काही खास गोष्टी इथे वाचा.

भाटकर बुवांच्या संगीताने नटलेली आणि विशेष गाजलेली मराठी गाणी अशी आहेत.
१) झोंबती अंगा जललहरी,आमुची वसने दे श्रीहरी
२)तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती
३)दहा वीस असती त्या रे, मने उद्धवा !
एक मात्र होते ते मी दिले माधवा
४)एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !
५) मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा ! गायिका: सुमन कल्याणपुर; चित्रपट : अन्नपुर्णा


६)तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, धुंडित तूज आले. गायिका: लता मंगेशकर; चित्रपट: चिमुकला पाहुणा
७)प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बागदिलाचा दरवळला. गायिका:लता आणि आशा भोसले; चित्रपट: या मालक

८)खेळेल का देव माझिया अंगणी ?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी ? गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक: राधामाई

९)मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो ।

१०)सुखद या सौख्याहुनि वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥ गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक : भूमिकन्या सीता

स्वत: भाटकरबुवांनी गायलेले असंख्य अभंग आहेत.त्यातले काही चटकन आठवणारे....
१)आपुल्या माहेरा जाईन मी आता
२)काट्याच्या आणिवर वसले तीन गाव
३)जववरी रे जववरी,जंबूक करी गर्जना
४)वारियाने कुंडल हाले,डोळे मोडित राधा चाले
५)काय सांगु देवा ज्ञानोबाची ख्याती
अशा ह्या असामान्य कलाकाराचे वयाच्या ८८ व्या वर्षी २९मे २००७ रोजी निधन झाले. आज भाटकर साहेब आपल्यात नसले तरी त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यातले शब्द उसने घेऊन म्हणता येईल....
"कभी तनहाईमें तुमको हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी!"

(सर्व माहिती आणि छायाचित्रं महाजालावरून साभार.)

२२ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! २ श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे! एक प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व! त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं!
जन्म १०जून १९२५. मुळचे बडोद्याचे. तिथल्याच सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसुदन जोशी ह्यांच्याकडे गाण्याचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर तिथेच आतांहुसेनखाँ,निस्सारहुसेनखाँ आणि फैयाजहुसेनखाँ सारख्या दिग्गजांकडूनही तालीम मिळाली. पुढे काही वर्षे त्यांनी बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून नोकरी केली.
त्यानंतर काही घरगुती अडचणीमुळे खळेसाहेब मुंबईत आले पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले.

'गोरी गोरी पान'च्या ध्वनीमुद्रणप्रसंगी खळे साहेब,आशा भोसले आणि वाद्यवृंद

१९५२ साली त्यांची पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्या एका बाजुला होते गोरी गोरी पान,फुलासारखी छान आणि दुसर्‍या बाजुला होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख . ह्या दोन्ही रचना ग.दि माडगुळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही.पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.

१मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतं लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंय शाहीर साबळे ह्यांनी आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीय. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिल आहे हे निश्चित. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय,महाराष्ट्र जय,जय जय राष्ट्र महान, हे देखिल खूपच गाजले.

खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय..त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत.
यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?

खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत.
खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.ह्या गायक-गायिकांनी गायलेल्या गीतांचा नुसता उल्लेख करायचा म्हटला तरी पानेच्या पाने भरतील.
लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा अथवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननीळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंयअसोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.

१९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.

राम-श्याम गुणगानच्या वेळी पंडित भीमसेन आणि लतादीदींना चाल गाऊन दाखवताना खळेसाहेब.

खळे साहेबांनी दिलेल्या चाली वरवर जरी सोप्या वाटल्या तरी त्या गाताना विशेष श्रम घ्यावे लागतात.स्वर आणि लय सांभाळताना भल्याभल्यांना कठीण जातं. त्याबद्दल बाबुजी म्हणतात की खळे साहेबांच्या काही गाण्यातल्या जागा आपल्याला कधीच जमणार नाहीत.बाबुजींसारख्या सिद्धहस्त गायक-संगीतकाराने असे म्हटल्यावर अजून कोणते वेगळे शिफारसपत्र हवे?

आयुष्यभर केलेल्या खडतर वाटचालीमुळे आणि वेळोवेळी आलेल्या आजारपणांमुळे आज वयाच्या ८३व्या वर्षी खळे साहेब शरीराने खूपच थकलेत. हात थरथर कापतात म्हणून लिहिता येत नाही अशी परिस्थिती आहे;पण पेटी समोर येताच सगळी थरथर थांबते आणि आपले आजारपण विसरून खळे साहेब संगीताच्या विश्वात रंगून जातात.आजही त्यांची संगीतसाधना अव्याहतपणे सुरु आहे.अशा ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!

सर्व माहिती आणि छायाचित्रे महाजालावरून साभार!

१८ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! १...सुधीर फडके!
मराठी सुगम संगीताचा विषय निघाला की सर्वप्रथम जे नाव ओठावर येते ते म्हणजे सुधीर फडके ह्यांचे! गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द विलक्षण गाजली. संगीत जगतात ते बाबुजी ह्या टोपण नावाने ओळखले जातात. तेव्हा बाबूजींच्या संगीत प्रवासाचा थोडक्यात परिचय करून घेऊ या.

२५ जुलै १९१९ रोजी कोल्हापुरात जन्म झाला. सुधीर फडके ह्यांचे मूळ नाव रामचंद्र विनायक फडके. वयाच्या सातव्या वर्षापासून वामनराव पाध्ये ह्यांच्याकडून संगीत शिकायला सुरुवात केली. साधारण १९२९ मध्ये शालेय शिक्षण आणि पुढील संगीत शिक्षणासाठी बाबुजी मुंबईत आले. त्याच वेळी मुंबईतल्या सरस्वती संगीत विद्यालयातर्फे झालेल्या अभिजात संगीत स्पर्धेत बाबूजींनी पहिला क्रमांक पटकावला.

१९३४ मध्ये बाबुजी पुन्हा कोल्हापुरला गेले आणि तिथे त्यांनी श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गायन-शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. ह्या संगीत विद्यालयाचे प्रमुख होते श्री. न. ना. देशपांडे. ह्या विद्यालयातर्फे दरवर्षी एक मेळा आयोजित केला जायचा. त्यात सादर होणार्‍या गाण्यांचे संगीत दिग्दर्शन करण्याची जबाबदारी बाबूजींवर पडली. न. ना. देशपांड्यांनी बाबूजींचे रामचंद्र नाव बदलून सुधीर असे नामकरण केले. इथूनच पुढे ते संगीतकार आणि गायक सुधीर फडके म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाचा एक प्रचारक म्हणून बाबुजीं बर्‍याच ठिकाणी हिंडले.मधल्या काळात त्यांचे वडिल निवर्तले. त्यामुळे कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांना अर्थप्राप्ती करणे भाग पडले. ह्या काळात त्यांची झालेली जेवणा-खाणाची परवड, प्रकृतीची आबाळ, त्यातून उद्भवलेली क्षयरोगासारखी आजारपणं हा त्यांच्या जीवनातला अक्षरश: खडतर काळ होता. पुढे गावोगाव वणवण फिरत गायनाचे कार्यक्रम करत, मिळेल ती बिदागी स्वीकारून बाबूजींनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, कलकत्ता, दिल्ली, राजस्थान, पंजाब पर्यंत धडक मारली. ठिकठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करत असतानाच तिथल्या स्थानिक गायक-गायिकांचे गाणेही ते आवर्जून ऐकत. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गाण्यातही तो ढंग आणण्याचा ते प्रयत्न करत. ह्या अशा ठिकाणी फिरत असताना गया येथल्या एका मंदिरात बाबूजींनी सादर केलेल्या गायनाने प्रभावित होऊन तिथल्या मुख्य पुजार्‍याने देवीच्या गळ्यातला हार बाबूजींना घालून त्यांचे कौतुक केले आणि इथून मग बाबूजींनी कधीच मागे फिरून पाहिले नाही. त्यांचा संगीताच्या अश्वमेधाचा वारू चौखूर उधळला आणि त्याने अवघा भारत आपलासा केला.

त्यानंतर बाबूजींना प्रभात कंपनीकडून संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि बाबूजींनी तिचे सोने केले. १९४६ साली गोकुल ह्या चित्रपटाचे संगीत त्यांनी केले. त्यानंतर मग एका पाठोपाठ रुक्मिणी स्वयंवर, आगे बढो, सीता स्वयंवर, अपराधी इत्यादी चित्रपटांना सुमधुर संगीत देऊन प्रभातच्या गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर इत्यादी नामांकित संगीतकाराची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे चालवली.

बालगंधर्व आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातील आदर्श होते. ह्या दोघांच्या गाण्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून बाबूजींनी त्यांचे गुण एकलव्याच्या निष्ठेने आत्मसात केले.त्याचाच परिणाम म्हणून कोमल तरीही सुस्पष्ट शब्दोच्चार, सूर आणि तालावरील हुकमत आणि शब्दांना न्याय देणार्‍या चाली ही बाबूजींची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला त्यांच्या गाण्यात आणि संगीत दिग्दर्शनात दिसून येतात.

गीत-रामायण आणि गदिमा-बाबुजी हे एक अतूट असे समीकरण होऊन बसलेय. आधुनिक वाल्मिकी असे आपण ज्यांना म्हणतो त्या कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकरांनी गीतांतून रामायण कथन केले आणि बाबूजींनी त्या गीतांना उत्तमोत्तम चाली लावून श्रोत्यांसमोर ते साक्षात उभारले. नुसती ही कामगिरी जरी जमेस धरली तरी बाबूजींचे संगीत अजरामर आहे हे आपल्या लक्षात येईल.

बाबूजींनी चित्रपटसंगीत, भावगीत, भक्तिगीत, लावणी, लोकगीतं, भारूड असे कितीतरी गायनप्रकार एक गायक आणि संगीतकार म्हणून समर्थपणे हाताळलेले आहेत. वंदे मातरम्, हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, प्रपंच, मुंबईचा जावई, झाला महार पंढरीनाथ, चंद्र होता साक्षीला ह्या आणि अशा कैक चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत गाजलंय.
बाबुजींनी संगीत दिलेल्या मालती-माधव ह्या हिंदी चित्रपटातील लताबाईंनी गायलेली ही दोन गाणी ऐका. मन सौंप दिया अनजाने में आणि कोई बना आज अपना

ज्योतीकलश छलके ह्या लतादीदींनी गायलेल्या हिंदी गीताचे संगीतकार होते बाबुजी आणि त्यासाठी त्यांना सुरसिंगारचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अशाच तर्‍हेचे अनेक मानसन्मान त्यांना वेळोवेळी प्राप्त झाले होते त्यापैकी एक होता.. संगीत नाटक अकादमी पुरस्कार.

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, अशी पाखरे येती, अंतरीच्या गुढगर्भी, कधी बहर कधी शिशिर, दिसलीस तू फुलले ऋतू.... अशी कितीऽऽतरी भावगीते आपल्या सुमधुर आवाजाने बाबूजींनी अजरामर करून ठेवलेत.


बाबुजी जसे उत्तम संगीतकार होते तसेच ते एक उत्तम गायकही होते. बाबूजींनी इतर संगीतकारांचीही गाणी गायलेत. त्यात यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, राम फाटक, राम कदम ह्यांच्यासारख्या अनेक जुन्या-जाणत्या संगीतकारांपासून ते हल्लीच्या संगीतकारांपैकी त्यांचेच चिरंजीव श्रीधर फडके, अनिल-अरुण अशांचीही गाणी तितक्याच तन्मयतेने गायलेली आहेत.
बाबूजींचा एक विलक्षण गुण असा आहे की ते जेव्हा इतरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गातात तेव्हा त्या संगीतकाराला अपेक्षित असलेल्या अगदी बारीक सारीक जागादेखील आपल्या गळ्यांतून निघत नाहीत तोवर समाधान मानत नाहीत. त्यासाठी लागेल तितका वेळ देण्याची आणि मेहनत करण्याची त्यांची तयारी असते.

बाबुजी जसे थोर गायक आणि संगीतकार होते तसेच कट्टर हिंदुत्ववादी आणि देशभक्त होते. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सशस्त्र भाग घेतलेला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यावरचा चित्रपट बनवण्यासाठी बाबूजींनी गीतरामायणाच्या कार्यक्रमांचा धडाका लावून लोकवर्गणी जमवली आणि निष्ठेने स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पूर्ण केला. ह्या दरम्यान बाबुजी खूप आजारी पडले होते; पण त्यांनी प्रतिज्ञा केली होती की हा चित्रपट पूर्ण केल्याशिवाय मी मरण पत्करणार नाही आणि ती त्यांनी जिद्दीने खरी करून दाखवली. ह्या चित्रपटाच्या प्रकाशनानंतर काही दिवसातच म्हणजे २९जुलै २००२ रोजी त्यांचे देहावसान झाले.

आज बाबुजी जरी देहाने आपल्यात नसले तरी त्यांचे सूर आपल्या सोबत अखंड राहणार आहेत. त्यांनीच गायलेल्या एका गीताचा आधार घेऊन म्हणता येईल.....

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती ॥

(सर्व माहिती आणि छायाचित्र महाजालावरून साभार!)

१५ जून, २००८

पंडित जितेंद्र अभिषेकी!

पंडित जितेंद्र अभिषेकी! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक प्रमुख व्यक्तीमत्व. आवाजाची उपजत देणगी नसली तरी परिश्रमाने त्यावर मात करून ग्वाल्हेर,आग्रा आणि जयपूर अशा तीन विविध घराण्याची गायकी पचवलेल्या पंडितजींनी त्यातून स्वत:ची अशी एक वेगळी गायकी परंपरा निर्माण केली. अभिषेकी बुवा म्हणूनच ते जास्त प्रसिद्ध आहेत! गोव्यातल्या मंगेशी इथला जन्म. वडिल कीर्तनकार.इथेच,वडिलांकडेच त्यांचे संगीताचे आद्य शिक्षण झाले. त्यांनतर उस्ताद अझमत हुसेन खाँ,गिरिजाबाई केळकर,जगन्नाथबुवा पुरोहित आणि गुलुभाई जसदनवाला अशा विविध घराण्याच्या दिग्गजांकडे पुढचे धडे गिरवले. तसेच काही अनवट रागांची दिक्षा खुद्द बडे गुलाम अली खाँ ह्यांच्याकडूनही मिळाली.
आपण सामान्य रसिक अभिषेकींना एक शास्त्रीय गायक म्हणून ओळखण्याऐवजी ऐवजी एक समर्थ संगीतकार म्हणून जास्त ओळखतो.मत्स्यगंधा,ययाति आणि देवयानी,कट्यार काळजात घुसली वगैरे नाटकातल्या पदांना त्यांनी दिलेल्या चाली विलक्षण गाजल्या. काटा रुते कुणाला,सर्वात्मका-सर्वेश्वरा वगैरे सारखी त्यांनी गायलेली कैक गीतेही ज्याच्या त्याच्या ओठी आजही आहेत.तंबोरा जुळवण्यात तल्लीन.


गानमग्न अवस्थेतील काही भावमुद्रा!
मैफिलीतले अभिषेकी बुवा!
सर्वात्मका सर्वेश्वरा ऐका आणि पाहा.

सर्व छायाचित्रं जितेंद्र अभिषेकी.कॉम वरून साभार!