माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ जुलै, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १४

माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.

हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्‍यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्‍याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्‍या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.

एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्‍या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."

हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्‍यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्‍या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.

मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: