माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ डिसेंबर, २००६

प्रिया आज माझी!!!

१९डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील अतिशय संस्मरणीय दिवस आहे. ह्याच दिवशी १९८६ साली माझे वयाच्या पस्तिशीत दोनाचे चार हात झाले. माझ्या जीवनात 'सुप्रियाने' (पूर्वाश्रमिची नयना) माझी पत्नी म्हणून प्रवेश केला. अतिशय मनस्वी व्यक्तिमत्वाच्या ह्या स्त्रीने आपल्या वागण्याने मला आमूलाग्र बदलून टाकले. मी तसा कोरड्या स्वभावाचा माणूस होतो. प्रेम वगैरे गोष्टी कशाशी खातात हे मला अजिबात माहीत नव्हते. तिने मला प्रेम करायला शिकविले. माझ्या हट्टासाठी स्वत:ला आवडणार्‍या बर्‍याच गोष्टींचा त्याग केला. त्यात क्षुल्लक वाटणार्‍या लिपस्टिक लावण्यापासून ते अगदी साडी व्यतिरिक्त इतर पोशाखांचा माझ्या हट्टापायी त्याग केला(हा त्याग काय असतो हे केवळ बायकाच जाणे. आम्हा पुरुषांना ते कधी कळणारच नाही).

पाच बहिणीपैकी चौथी. तिच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांना नोकरीत बढती मिळाली म्हणून शुभशकुनी असणार्‍या(तिच्या आई-वडीलांच्या मते) तिलाच फक्त तिला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घातले. तिथल्या कडक ईस्त्रीच्या वातावरणामुळे तिचे एकूण वागणेच अतिशय नीटनेटके होते. कलेविषयी अतिशय आवड आणि पारंगतता अशा सर्वगुणांनी युक्त अशा ह्या माझ्या पत्नीने काही दिवसातच माझे स्वत्व मला विसरायला लावले. ती जरी इंग्लिश माध्यमात शिकली तरी आपले सणवार,व्रतवैकल्ये वगैरे साग्रसंगीत साजरे करण्यात तिला अतीव आनंद मिळत असे.

मी स्वत: नास्तिक म्हणून तिने मला कधी बळजबरी अथवा हट्टही केला नाही; पण तिला जे काही धार्मिक कार्य करावेसे वाटेल ते करण्याची मुभा तिने माझ्याकडून गोडीगुलाबीने मिळवली. मी देखिल सशर्त (मी त्यात कोणताही भाग घेणार नाही...पूजेला बसणे इत्यादी) मान्यता दिली. तिच्या पूजेची कच्ची तयारी करणे,आल्यागेल्यांचे स्वागत करणे वगैरे कामे मी एक गृहस्थ म्हणून करू लागलो. त्यामुळे आमच्यात ह्या असल्या गोष्टींवरून कधी वाद झाला नाही(अर्थात हे तिचेच श्रेय आहे).

माझे लग्न झाले आणि काही महिन्यातच माझी दिल्लीला बदली झाली, त्यावेळी पत्नी गरोदर होती. म्हणून मी एकटाच दिल्लीला गेलो. २६डिसेंबर१९८७(बॉक्सिंग डे) ला माझ्या मुलीचा जन्म झाला. मात्र बाळंतपणात पत्नीला शत्रक्रियेला(सिझेरीयन) सामोरे जावे लागले. माझ्या उपस्थितीने(मी तेव्हढ्यासाठी सुट्टीवर आलो) तिला धीर आला(हे तिनेच सांगितले) आणि ह्या अवघड परिस्थितीतून ती सही सलामत पार पडली. मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला मी पुन्हा मुंबईत आलो(बदलीवर). मुलीच्या बाललीला आणि पत्नीच्या सुखद सहवासात माझे दिवस सुखा-समाधानात जाऊ लागले. बघता बघता मुलगी पाचवीत गेली.

मे १९९७ पासून सुप्रियाची तब्येत अचानक बिघडली. औषधोपचारांनी ती तात्पुरती बरी झाली; पण दिवसेंदिवस तिचे वजन घटू लागले. एक वेगळीच डोकेदुखी सुरू झाली. अधनंमधनं तिला चक्कर यायला लागली. ७२ किलो वरून वजन ६०किलोवर आले आणि हा काही तरी गंभीर आजार असावा म्हणून पुन्हा एकदा तिची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली. त्यात असे आढळून आले की तिची दोन्ही मूत्रपिंडे खराब झालेत. मग त्यावर औषधोपचार सुरू झाले पण दुखणे वाढतच होते. ऍलोपाथी,होमिओपाथी,आयुर्वेद,निसर्गोपचार सगळे झाले पण दुखणे वाढतच होते.

डॉ.(नेफ्रोलॉजिस्ट) नी सांगितले म्हणून मग डायलिसिस(रक्ताचे यंत्राद्वारा शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया) सुरू केले. आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करणे सुरू झाले. चार-चार तास चालणार्‍या या प्रक्रियेत कैक वेळेला तिला खूपच त्रास भोगावा लागत होता पण मोठ्या धैर्याने ती ते सहन करत होती. दर डायलिसिस नंतर वजन २-३ किलोने कमी होत होते. माझ्या डोळ्यादेखत माझी सुदृढ पत्नी अशी दिवसेंदिवस खंगत जात होती आणि मी अगतिकतेने पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हतो. तिचे शारीरिक दु:ख मी माझ्या अंगावर घेऊ शकत नव्हतो. फक्त मानसिक आधार देण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हते.
डायलिसिस च्या दरम्यान डॉ.नी मला तिच्यावर मूत्रपिंड रोपणासाठी मुत्रपिंडदाता शोधण्याची जबाबदारी टाकली. अशा तर्‍हेने मूत्रपिंड मिळणे कठीण आहे ह्या वस्तुथितीची जाणीव झाल्याने मी स्वत:च मुत्रपिंडदाता बनायचे ठरवले. मग डॉ.नी त्यासाठी आमच्या दोघांच्या रक्ताची तपासणी करवून घेतली. त्यात पत्नीच्या रक्तात 'हेपॅटीसीस सी' चे रोगजंतु आढळल्यामुळे हे सर्व सोपस्कार अजून ६ महिन्यांनी पुढे ढकलले.

१५ डिसेंबर१९९९ रोजी डायलिसिस करून तिला घरी आणले. आज वजनकाट्यावर वजन भरले मात्र ३५किलो! दिवसभर सुप्रिया ठीक होती पण रात्री ११वाजता तिचे डोके प्रचंड दुखायला लागले. मी तिचा रक्तदाब तपासला. तो २००च्या वर होता. लगेच जिभेखाली गोळी दिली पण रक्तदाब उतरेना. डॉ.ना(रुग्णालयाचे) दूध्व.केला. त्यांनी एक इंजेक्शन द्यायला सांगितले. ते जाऊन घेऊन आलो. आमच्या नेहमीच्या डॉ.रांकडील परिचारिकेने येऊन इंजेक्शन दिले. पण तोपर्यंत सुप्रिया गाढ झोपली होती. पण मग माझ्या लक्षात आले की ती झोपली नव्हती तर बेशुद्ध झाली होती. मी पुन्हा रुग्णालयात डॉ.रांशी संपर्क साधला. त्यांना मला वाटणारी शंका बोलून दाखवली. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मी लगेच रुग्णवाहिका मागवून घेतली. मधल्या काळात सुप्रियाच्या मोठ्या बहिणीला बोलावून घेतले.

रात्री अडीच वाजता आम्ही रुग्णालयात पोचलो. परिस्थितीचे गांभीर्य बघून डॉ.नी लगेच तिचा एम.आर.आय काढला. त्याच्या वरून हे कळले की तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झालाय. लागलीच न्युरो सर्जनला बोलावले गेले. त्यांनी एम.आर.आय बघून लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले पण तरी देखिल झालेले नुकसान भरून येणार नाही असेही सांगितले. त्यांच्या परिभाषेत मेंदू अशा ठिकाणी फुटला(बर्स्ट) होता की जिथे शस्त्रक्रिया करणे अवघडच नव्हे तर अशक्य होते. मग ते कसली शस्त्रक्रिया करणार होते? मला नीट काहीच कळले नाही. अर्थात नंतर शस्त्रक्रियेचा निर्णय रद्द झाला.

मग मला डॉ.नी एका बाजूला नेले आणि माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितले,"यंग मॅन बी ब्रेव्ह! ईट्स टू लेट नाऊ! इट्स अ ब्रेन डेथ! ऍज पर अमेरिकन स्टँडर्डस इट इज अ डेथ बट आवर इंडियन स्टँडर्ड कन्सिडर्स हार्ट डेथ(ब्रेक) ऍज डेथ. देअर्फोर वुइ हॅव केप्ट हर ऑन व्हेंटीलेटर. नाउ इट्स अ मॅटर ऑफ टाइम! प्रे गॉड! मे गॉड ब्लेस यू!"

मी सुन्न झालो. हातपाय गारठले. काय करावे सुचेना. डोळ्यात अश्रू येत होते पण मी मोठ्या मुश्किलीने ते थोपवले होते.

शिस्त आहे लावलेली,मी अशी दु:खास माझ्या
आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे......

मनोहर रणपिसे.

गेल्या अडीच वर्षात ऐकलेल्या भीमरावांनी गायलेल्या गज़लांमधील एका गज़लेतील हा एक शेर माझ्यावर जबरदस्त प्रभाव टाकून गेला होता आणि मी तो तसा जगत होतो. ह्या अडीच वर्षांच्या काळात मला आणि सुप्रियाला जर खर्‍या अर्थाने कुणी साथ केली असेल तर ती पुलं आणि भीमरावांनी. पुलंनी हसवत हसवत दु:ख विसरायला लावले आणि भीमरावांनी जखमा सुगंधी केल्या. ह्या दोघांच्या साथीत आम्ही दोघे पतिपत्नी स्वत:ला हरवून बसत असू आणि प्रत्येक क्षण आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असू.

देव वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नव्हताच. त्यामुळे त्यांची प्रार्थना करण्याचा प्रश्नच नव्हता. समोर तिचा मृत्यू दिसत होता पण माझ्या मनात अजूनही कुठेतरी आशा होती की ती कदाचित ह्यातनंही सहीसलामत बाहेर येईल.

सकाळपर्यंत बरेचसे नातेवाईक,आप्तेष्ट,मित्रमंडळी जमली. जो तो हा अंगारा लाव. अमुक स्तोत्र वाच असे सल्ले देत होता. मी कुणालाही कसलाही प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या १३ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा चित्रपट झरझर उलगडत होता. लोक येत होते. मला भेटत होते. सुप्रियाला बघत होते आणि जात होते. कोण आले कोण गेले ह्याची मला जाणीव देखिल नव्हती.

१९डिसेंबर १९९९!!! संध्याकाळी सहा वाजता सगळं संपलं होतं! माझ्या जीवनातला वसंत कायमचा संपला होता. त्यावेळची माझी मन:स्थिती वर्णन करणार्‍या काही ओळी...(खरे तर त्या भावना शब्दातीत आहेत.)

हजार दु:खे मनास माझ्या,हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या

तुझ्याविना ही जगावयाचे जरी इथे शेकडो बहाणे
असे खरा रंग जीवनाचा तुझ्यामुळे जीवनात माझ्या...

समोर मृत्यू उभा तरीही,नसे तुझे वेड सोडिले मी
तुझीच गाणी अजून असती थरारणार्‍या स्वरात माझ्या
..
खावर.

माझ्या जीवनात प्रवेश करण्यासाठी आणि जीवनातून निघून जाण्यासाठी माझ्या प्रियेने एकच दिवस निवडला होता. १९डिसेंबर!

श्री‌. सुधीर फडके ह्यांनी गायलेले 'प्रिया आज माझी नसे साथ द्याया' हे गीत माझे प्रथमपासूनच आवडते होते. त्यातली आर्तता थेट हृदयाला भिडणारी आहे. ह्या प्रियेची प्राप्ती होईपर्यंत ते गाणे माझ्या ओठावर सदैव असे; पण आता मला ते गीतच जीवनभर साथ करणार आहे. तिची जागा भरून काढेल अशी व्यक्ती निदान ह्या जन्मात तरी भेटणे अशक्य आहे.

प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद तारे नको चांदण्या ह्या!