माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२१ ऑगस्ट, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!९

सहावीत जे नवे सर शाशि साठी आले होते ते जसे आम्हाला समरगिते-समूहगीते शिकवत तसेच योगासनं शिकवत. पावसाळ्यात मैदान ओले असले की आणि एरवीही ते आम्हाला योगासनं आणि मलखांब करायला प्रवृत्त करत. माझ्या वयाची बहुतेक मुले ही चणीने लहान असल्यामुळे म्हणा अथवा नैसर्गिक कोवळेपणामुळे म्हणा योगासनं पटापट शिकत गेली. तरीही माझे त्यातील प्रावीण्य सरांच्या नजरेत भरले आणि त्यांनी मला योगासनाच्या प्रात्यक्षिकासाठी निवडले. माझ्या कडून आधी ते काही कठीण वाटणारी आसने करून घेत. त्यांचे त्यात समाधान झाले की मगच ते मला सर्वांसमक्ष ते आसन करायला लावत आणि मग माझे बघून आणि सरांच्या आदेशाप्रमाणे इतर मुले तसे करत.

त्या वर्षात आम्हाला पद्मासन,बद्धपद्मासन,कुक्कुटासन,आकर्णधनुरासन,शलभासन,सर्वांगासन,ताडासन ही आणि अशीच सहजसाध्य वाटणारी आसने शिकवली. त्याच बरोबर सूर्यनमस्कार देखिल शास्त्रोक्त पद्धतीने कसे घालायचे तेही शिकवले.मलखांब करायला खूपच मजा येत असे.पण मलखांबावर माझ्यापेक्षा सहजतेने वावरणारी काही मुले होती त्यांना त्यातली प्रात्यक्षिके करण्यासाठी निवडले. ती दोन-तीन मुले इतक्या सहजतेने आणि चपळतेने त्या मलखांबावर वरखाली होत असत की आम्ही ते बघण्यातही दंग होत असू. एक प्रकारची लय त्यात असायची. आणि किती विविध प्रकारच्या कसरती त्यावर सादर केल्या जात ते आठवून आजही अंगावर काटा येतो.

मी शाळेतल्या स्पर्धांमध्ये (वक्तृत्व इत्यादी) भाग घेऊन बक्षिसे मिळवत होतो तरी शारीरिक खेळात नेहमीच मागे असे. हुतुतू-कबड्डी,लंगडी-खोखो,धावणे अथवा इतर मैदानी खेळ खेळण्यात इतरांच्या तुलनेत मागासलेलाच होतो. शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे ह्यापैकी कशातही प्रावीण्य सोडा पण बर्‍यापैकी खेळणे देखिल जमत नसे. मात्र एक होते की निरीक्षणामुळे मला त्यातल्या युक्त्या,बारकावे माहीत झाले होते पण त्याचा काय उपयोग होणार? कारण शारीरिक क्षमता नसेल तर आपण हे ताकदीचे खेळ खेळू शकत नाही आणि मग खेळलोच नाही तर त्या युक्त्या कधी वापरणार? पण माझा नैसर्गिक स्वभाव म्हणा की अन्य काही म्हणा मी कधीही सहजासहजी हार मानत नसे आणि म्हणून माझ्यापेक्षा ताकदीने जास्त असलेल्या मुलांच्यात मुद्दामहून खेळायचा प्रयत्न करत असे. त्यांच्या दृष्टीने मी लिमलोणचा असे‍. ज्या संघात एखादा गडी कमी पडतोय असे दिसले की मग माझी वर्णी लागायची. पण मला तेवढी संधीदेखील चालत असे. मग कबड्डी खेळताना मी माझे प्रयोग करत असे आणि बर्‍याच वेळा तोंडघशी पडत असे. ढोपरं फोडून घेणे हा प्रकार तर नित्याचाच होऊन गेला होता.पण खेळण्याची आग काही शांत होत नसे.ह्यातनंच मी माझी अशी एक खास 'पकड' तयार केली आणि त्याचा वापर करून बर्‍याच वेळा हातपाय जायबंदी देखिल करून घेतले होते.

ह्या कबड्डीची नशा दिवसेंदिवस अशी काही चढत गेली की त्यापुढे खरचटणे,लागणे,मुरगळणे असले प्रकार क्षुद्र वाटायला लागले.मग मी आमच्या वाडीतल्या मुलांच्यात कबड्डी खेळायला सुरुवात केली. तिथेही तेच! पण जिद्द हरलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा आमच्या वाडीचा कबड्डीचा संघ बनवला गेला तेव्हा मलाही त्यात सामील केले होते.ह्या आमच्या संघाचा सामना दुसर्‍या एका वाडीच्या संघाशी घ्यायचे ठरले. त्या संघात आमच्यासारखेच सामान्य दर्जाचे खेळाडू होते. मात्र त्यांचा संघनायक खूपच धष्टपुष्ट असा राजस्थानी मारवाडी होता. त्याला खेळातले तंत्र विशेष असे अवगत नव्हते तरीही त्याच्या ताकदीच्या जोरावर त्याने आमचा धुव्वा उडवला. तो जेव्हा स्वारी करत असे तेव्हा एकदोघांना बाद केल्याशिवाय कधीच जात नसे. त्याला हात लावायला देखिल सगळे घाबरत असत. कारण? आमच्यापैकी ज्याने म्हणून त्याला धरायचा प्रयत्न केला होता त्याला त्याने अक्षरश: फरफटत नेले होते. परिणामी सगळ्यांचीच ढोपरे आणि कोपरे फुटली. मी देखिल माझ्या त्या खास पकडीचा प्रयोग त्याच्यावर केला आणि परिणाम असा झाला की पुरता सोलवटून निघालो. त्या माणसात काही रेड्यांची शक्ती असावी असा तो आम्हाला सहज लोळवत आणि फरफटवत नेत असे.

ह्यानंतर आठवडाभर तरी आम्ही कबड्डीचे नाव काढले नाही.मात्र डोक्यात किडा वळवळतच होता. ह्याचा वचपा कसा काढायचा?विचार करता करता करता मला एकदम युक्ती सुचली आणि मी इतरांना ती सांगितली.पण इतरांनी त्यात विशेष रस दाखवला नाही. मग मी मनाशी ठरवले की आता जे करायचे ते न बोलता. आम्ही पुन्हा जेव्हा कबड्डी खेळायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्याच वर्गातल्या एका बाळसेदार मुलाला आमच्यात खेळायला आमंत्रित केले होते.त्याचा खेळ आणि ताकद बघून माझे म्हणणे मग इतरांना पटले. हा माझा मित्र(विजय) एक जैन मारवाडी होता आणि त्याच्याकडे निव्वळ शक्ती नव्हती तर खेळातले कसब देखिल होते.आम्ही सगळ्यांनी दोन दिवस कसून सराव केला आणि मग पुन्हा एकदा त्या दुसर्‍या वाडीच्या संघाशी सामना घेण्याचे निश्चित करून टाकले.

प्रतिस्पर्धी संघनायक तर हुशारीतच होता. त्याला आमच्याकडून कोणताच विरोध होणार नाही असे वाटत होते म्हणून त्याने आमचे आव्हान सहज स्वीकारले. ठरलेल्या दिवशी आमचे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले.प्रतिस्पर्धी संघनायकाने ओलीसुकी जिंकून पहिली स्वारी केली आणि आमचे दोन गडी बाद करूनच तो परतला.मग माझा मित्र त्यांच्यावर चाल करून गेला. त्याने खोलवर मुसंडी मारून दोघांना बाद केले आणि परतीच्या प्रवासात अजून एकाला म्हणजे एकूण तिघांना बाद करून तो आला. आम्ही सगळे आनंदाने नाचायलाच लागलो. लागलीच तो मारवाडी चाल करून आला आणि त्याने पुन्हा आमच्यातल्या दोघांना बाद केले.परत जात असताना त्याला माझ्या मित्राने हूल दिली म्हणून त्याला बाद करण्यासाठी मारवाडी पुन्हा जोरात माघारी फिरला आणि तो मोका साधून मी माझी खास पकड केली.पण मारवाडी मला खेचत न्यायला लागला आणि त्याच वेळी विजयने त्याच्या पटात शिरून त्याला तिथेच दाबून टाकला. हे पाहून बाकीचे सगळे त्याच्या अंगावर झोपले आणि अशा तर्‍हेने आम्ही त्या मारवाड्याला बाद केले.

नुसता जल्लोष!!! काही मिनिटे आम्ही तिथे नाचून थयथयाट करून आमचा आनंद व्यक्त केला.मग विजयने स्वारी करून त्यांची दाणादाण उडवली. बघता बघता त्यांच्यावर लोण चढला. आता मारवाडी त्वेषाने आक्रमण करता झाला;पण आमचे त्याच्याबद्दलचे भय संपलेले होते त्यामुळे त्याच्या त्वेषाचा आम्हाला फायदाच झाला. आम्ही त्याला खोलवर घुसायला प्रवृत्त करत होतो आणि तो देखिल बिनधास्तपणे आत घुसला होता. आता मला माझ्या पकडीविषयी खात्री(आणि विजयचे पाठबळ)असल्यामुळे मी त्याच्यावर समोरून उडी मारून त्याचे दोन्ही खांदे पकडून त्याला खाली बसवण्याचा प्रयत्न केला.त्याने नेहमीच्या सवयीने मला झिडकारण्याचा प्रयत्न केलाच पण त्याच वेळी विजयसकट सगळ्यांचा त्याच्याभोवती गराडा पडला आणि पुन्हा सगळ्यांनी त्याला पार दाबून टाकले.

आता खेळाची सगळी सूत्रे आमच्या कडे होती. दोन वेळा पकडीची नामुष्की पत्करल्यामुळे मारवाडी हबकला आणि हळूहळू त्याचा जोष कमी पडायला लागला आणि मग जे व्हायचे तेच झाले. अत्यंत दारुण असा पराभव पदरी पाडून मारवाडी मान खाली घालून चालता झाला. सगळ्यांनी विजयला डोक्यावर घेतले आणि त्याची मैदानभर मिरवणूक काढली. मी देखिल जाहीरपणे आणि मनातल्या मनात देखिल खूश होतो.काट्याने काटा काढण्यात यशस्वी झालो होतो त्याचा एक आसुरी आनंदही उपभोगत होतो.

क्रमश:

१५ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या! ८... १५ऑगस्ट १९५८

१९५८ च्या १५ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन! त्याच्या शालेय आयुष्यातील पहिलाच! मालाड मधील समस्त शाळेच्या मुलांना मालाडमधीलच एका नामांकित शाळेच्या मैदानावर जमायचे होते. विद्यार्थ्यांच्या नेण्या-आणण्याची जबाबदारी ज्याच्या त्याच्या पालकांवर सोपवण्यात आलेली होती. तोही आपल्या वडिलांबरोबर मैदानावर येऊन दाखल झाला. तिथे वर्गशिक्षिका चाफेकर बाईंकडे त्याला सोपवून त्याचे वडील काही कामानिमित्त निघून गेले. कार्यक्रम कधी संपू शकेल ह्याची पूर्वकल्पना माहीत करून घेऊन त्यावेळी आपण उपस्थित राहू असे आश्वासन जाताना त्यांनी त्याला आणि बाईंना दिले. आपल्या शाळकरी सवंगड्यात तो मिसळला आणि समारंभ सुरू होण्याची वाट पाहू लागला.

सरतेशेवटी समारंभ सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मग त्या डौलदारपणे फडकणाऱ्या झेंड्याला सामुदायिकपणे वंदन करून झाले. राष्ट्रगीत झाले. मोठ्या वर्गातील स्काउटच्या मुलामुलींनी सामुदायिकपणे संचलन सादर केले. त्यांनी ध्वजाला प्रणाम केला आणि मग पाहुण्यांना मानवंदना दिली. देशभक्तिपर गीते आणि स्फूर्तिदायक गीतांचे गायन सादर करताना मुलांबरोबर शिक्षक आणि पाहुणेही भारावून गेले. मग पाहुण्यांनी मार्गदर्शनपर चार शब्द सांगितले आणि तो रंगलेला कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मुलांना पेढे वाटले गेले.

त्याच्या शालेय आयुष्यातील(इयत्ता १ली) तो पहिलाच स्वातंत्र्यदिन असल्यामुळे तोही इतरांसारखाच भारावून गेला होता. कधी एकदा घरी जातो आणि हे सगळे आई-वडिलांना सांगतो असे त्याला झाले होते. ज्यांचे पालक हजर होते ते आपापल्या मुलांना घेऊन जाऊ लागले. एकेक करत आपली मित्रमंडळी घरी जाताहेत हे पाहून त्यालाही त्याच्या वडिलांची तीव्रतेने आठवण व्हायला लागली. होता होता शेवटी मैदान रिकामे झाले आणि तो चाफेकर बाईंचा हात घट्ट धरून (घाबरला होता)आपल्या बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आता त्याला ते वाट बघणे असह्य व्हायला लागले आणि त्याने रडायला सुरुवात केली. आधी हळूहळू स्फुंदत मग त्याने चांगलाच 'आ'कार लावला. त्याच्या ह्या रडण्याने बाईदेखील भांबावून गेल्या. त्यांनी त्याच्या त्या 'आ' केलेल्या तोंडात एक पेढा टाकला. पेढा चावण्याच्या निमित्ताने त्याचे रडणे क्षणभर थांबले आणि पेढा संपल्यावर पुन्हा सुरू झाले. बाईंना काय करावे काही सुचेना. त्यांना त्याचे घरही माहीत नव्हते आणि त्यालाही ते कुठे आहे हे नीट सांगता येत नव्हते. त्या त्याची समजूत घालायचा आणि रडणे थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याने आ वासला की बाई तोंडात पेढा भरवत होत्या. तो तेवढा वेळ गप्प की मग पुन्हा रडगाणे सुरू करी. बाईंच्या हातातील पेढ्याच्या खोक्यातले पेढे संपत आले तरी त्याचे रडणे थांबत नव्हते. बाईदेखील रडकुंडीला आल्या. त्याला ओरडावे असे बाईंना क्षणभर वाटून गेले पण त्या गोंडस (खरेच तेव्हा तो तसा होता!  खोटं नाही सांगत. हवं तर हरितात्यांना विचारा!!) मुलाला ओरडणे त्या आई इतक्याच प्रेमळ बाईंना शक्यच नव्हते. आता ह्याला कसे आवरायचे हे काही त्यांना कळेना.पण त्यांचे नशीब थोर म्हणून दूरून घाईघाईत येणारे त्याचे वडील त्यांना दिसले आणि एकदाची त्यांची ह्या गंभीर प्रसंगातून सुटका झाली.

वडिलांनी जवळ येताच उशीर झाल्याबद्दल बाईंची क्षमा मागितली आणि मग आपल्या मुलाने दिलेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागितली. इतका वेळ रडकुंडीला आलेल्या बाई आता सावरल्या होत्या. त्यांनी उलट त्याचे कौतुकच सांगायला सुरुवात केली. तो कसा रडत होता; मध्ये मध्ये पेढा भरवल्यावर कसा गप्प व्हायचा आणि मग पुन्हा कसा रडे सुरू करायचा, आणि रडतानादेखील किती गोड दिसत होता वगैरे वगैरे. आधीच सर्व मुलांच्या आवडत्या असलेल्या बाई त्या तसल्या अवस्थेतही त्याला अधिक आवडून गेल्या. बाईंकडे पाहून त्याने एक स्मितहास्य केले आणि त्यांचा निरोप घेऊन आपल्या बाबांचा हात धरून तोंडाची टकळी चालवत, उड्या मारत मारत तो मार्गस्थ झाला.

मित्रहो आपण ओळखले असेलच त्याला! मग मी कशाला सांगू त्याचे नाव!

क्रमश:

१२ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या! ७

आम्हाला शारीरिक शिक्षणाला आधीपासून एक देशपांडे नावाचे सर होते.त्यांच्या चेहर्‍यावर कधीही पाहिले तरी स्थितप्रज्ञाचे भाव असत.क्वचितच कधी तरी हसत.पण शिस्तीला अतिशय कडक होते.शाशि च्या तासाला मुलांना मैदानात कवायतीसाठी ८-१० रांगात उभे करून मग ते मोठ्या आवाजात आज्ञा देत असत.एडी मिलाव(हा उच्चार समजायला आणि त्यातल्या ’एडी’चा अर्थ समजायला आम्हाला त्याआधी बराच मार खावा लागला होता) आणि कदम-खोल! ह्या आज्ञा देताना त्यांचे बारीक लक्ष असे. एखादाही विद्यार्थी थोडासा ढिला दिसला रे दिसला की ते पटकन रांगेत घुसत आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या पोटरीवर एक सणसणीत फटका मारत. त्या फटक्याचा आवाज सर्व मैदानभर गाजे. पुन्हा, काहीच झाले नाही असा चेहरा करून ते पुढच्या कारवाईला सुरुवात करत. कवायतीचे हात आणि पायांचे प्रकार करताना ते शिटीचा वापर करत. त्या शिटीच्या तालावर कदम-ताल करताना खूप मजा येत असे. सगळे व्यवस्थित जमल्यास एखादी पुसटशी स्मितरेषा त्यांच्या चेहर्‍यावर उमटत असे.

सांघिक कवायतीच्या(मास ड्रिल)वेळी ढोल,ड्रम,झांजा,बिगुल,बासरी असा मोठा जामानिमा असे. ही वाद्ये वाजायला लागली की अंगात एक प्रकारचा जोष येत असे.त्या वेळी सरांचे हातवारेही प्रेक्षणीय असत.हा प्रकार जसा मुलांना आवडे तसा सरांचाही तो खास आवडीचा प्रकार होता.दर शुक्रवारी ह्यासाठी एक तासिका राखून ठेवलेली असे. मुले-मुली मैदानावर येताना कोण रांग मोडतंय ह्याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. खरे तर एकदा त्यांचा मार खाल्ल्यावर कुणाची काय बिशाद होती दुसर्‍यांदा तीच चूक करण्याची. तरीदेखील एखादा गाफील प्राणी त्यांच्या तावडीत सापडत असे.मग त्याला फटके तर पडतच वर मैदानात सगळ्यांसमोर(विशेष करून मुलींसमोर म्हणजे मानहानीच मानली जायची)उठाबशा काढण्याची शिक्षा भोगावी लागे.

पावसाळ्यात मैदान ओले असले की मग शाशिचा तास होत नसे.मग त्यावेळी वर्गातल्या वर्गातच काही बैठे खेळ खेळायला मिळत.कधी कधी त्या तासाला देशपांडे सरच आमच्या वर्गात येत.आले की ते खुर्चीवर बसत नसत. टेबलावरच बसत.कधी दोन पाय खाली सोडून तर कधी एक पाय दुसर्‍या पायावर ठेवून(साईबाबासन)बसत.आमच्या वर्गातल्या हुशार मुलांना ते कोडी घालायला प्रवृत्त करत. मग कधी विनायक,मोहिनीसारखे हुशार लोक आम्हाला कोडी घालत आणि आम्ही त्याची काही विक्षिप्त उत्तरे दिली की(कैक वेळा आम्ही मुद्दाम तसे करायचो) सगळ्यांबरोबर सरही हसत. त्यांचे ते हास्य खूपच केविलवाणे वाटे.हसण्याची सवय नसल्यावर हसावे लागल्यास हे असेच होते असे माझे तेव्हापासूनचे निरीक्षण आहे.(मी किती हुशार ना!!!!)

मग सर एक कोडे घालत. हे त्यांचे खास ठरलेले कोडे होते.कितीतरी वेळा त्यांनी ते घातले असेल.पण मुलेही अशी व्रात्य होती की मुद्दाम चुकीची उत्तरे देत. ’सर हासतात’ हे बघण्यातच मुलांना आनंद मिळत असे. कारण एरवी हा प्राणी अतिशय कडक आणि गंभीर असायचा. तर आता सरांचे ते सुप्रसिद्ध कोडे. हे त्यांनीच बनवलेले होते. कसे ते पाहा.

एक होता चौपाई.....(ह्यातला ’च’ हा चहातल्या च सारखा उच्चारायचा)
त्यावर बस(श)ला दुपाई...(सर 'स' चा उच्चार नेहमी 'श' असा करत.)
मासा(शा) दिस(श)ला
चटकन गिळून टाकला......(ह्यातला च देखिल चहातला बरंका)

तर ह्याचे साधे उत्तर होते ’म्हशीच्या पाठीवर बसलेला बगळा’! पण आम्ही मुद्दाम कावळा,चिमणी,पोपट,मैना,गरूड,घार ,कुत्रा, मांजर,घोडा,गाढव असे काहीही उत्तर देत असू आणि ह्या प्रत्येक उत्तराबरोबर सर गालातल्या गालात हसत. ते हसणे बघायला आम्हाला आवडायचे आणि ह्या चावटपणात सगळेजण समजून उमजून भाग घ्यायचे. मग कुणालाच उत्तर येत नाही असे समजून सर स्वत:च त्याचे उत्तर देत.ते उत्तर देण्याचीही त्यांची खास पद्धत होती.

आमचा वर्ग तळमजल्यावर होता. वर्गासमोरच छोटे मैदान(मैदान कसले अंगणच ते)आणि पुढे शाळेचे प्रवेशद्वार होते.प्रवेशद्वारातून आत शिरण्यासाठी जो रस्ता होता त्याच्या दुसर्‍या अंगाला एक लांबलचक मैदान होते.ह्या मैदानात एक सदैव भरलेली विहीर होती आणि ह्या विहिरीभोवतीचा थोडासा भाग सोडला तर बाकी सगळी दलदल माजलेली असे.पावसाळ्यात तिथे पाणी साठे आणि मग तिथे ढोपरभर गवत उगवे. अशा त्या दलदलीत काही म्हशी(खर्‍या म्हशी बरंका! वर्गातल्या नव्हे!)डुंबत असत.मनसोक्त डुंबायला पाणी होतेच आणि खायला गवतही होतेच. त्या पाण्यात मासेही असायचे आणि ते खायला बगळेही हजर असत. मग म्हशीच्या पाठीवर बसलेला(सहलीला निघालेला) बगळा(ह्यावरून पक्षांनाही कधी कधी उडण्याचा कंटाळा येतो.... इथे हे पुलंचे वाक्य आठवते) हे दृश्य तर रोजचेच होते. ह्या सर्व निरीक्षणातून सरांनी ते कोडे रचले होते आणि मग त्याचे उत्तर म्हणून आम्हाला तिथे घेऊन जात आणि ते प्रात्यक्षिक दाखवत. ते दाखवताना त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळीच खुशी जाणवायची.
मैदानावर कवायतीच्या वेळी करडी शिस्त पाळणारे ते हेच का? असा प्रश्न मला राहून राहून पडत असे.

पुढे हेच मैदान त्याच्या मूळ मालकाकडून शाळेला नाममात्र मोबदल्यात मिळाले आणि मग ती विहीर बुजवून आणि योग्य अशी मातीची भर घालून ते मैदान आमच्यासाठी खेळण्यालायक बनवण्यात आले.

क्रमश:

८ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या! ६

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला हे मुलांविरुद्ध मुली प्रकरण खूपच तापायचे.मुलींमध्ये बर्‍याच जणी अशा होत्या की त्या चांगल्या गाऊ शकत. मुलांमध्ये मी आणि अजून एकदोन जण गाणारे होते. कधी कधी गाण्याच्या भेंड्या लावल्या जायच्या. त्यात इतकी अटीतटीने लढत व्हायची की काही विचारायची सोय नाही. विनायक आणि मोहिनी ह्या दोघांचे आवाज खणखणीत होते मात्र त्या दोघांना गाण्याचे अंग नव्हते. तरीदेखील ते ती कसर श्लोक,आर्या,ओव्या वगैरे म्हणून भरून काढत. दोघांचे पाठांतर इतके जबरदस्त होते की आमची गाणी राहायची बाजूला आणि त्या दोघातच जुगलबंदी चालायची आणि कुणीही त्यात हार जात नसे.तास संपेपर्यंत हा धुमाकूळ चालत असे.

वर्गात मला शिक्षकांसकट सगळेजण 'बाप्पा' म्हणायचे(देवबाप्पा चे लघुरूप).पहिल्या पहिल्यांदा मला ह्याचा राग येत असे. पण हळूहळू ते पचनी पडायला लागले. तरीही जमेल तिथे आणि जमेल तसे मी प्रत्युत्तर देत असे. मी देखिल इतरांना नावे ठेवण्यात मागे नसे.कुलकर्णी नावाच्या मुलाला सगळेजण 'अप्पा' म्हणत.अर्थात हे नाव मीच ठेवले आणि सगळ्यांना ते आवडले(कुलकर्णी सोडून). तेव्हा आमची अप्पा-बाप्पाची जुगलबंदी लागत असे. त्याने मला बाप्पा म्हटले की त्याला अप्पा म्हणायचे हे ठरलेले होते. त्यामुळे तो चिडायचा आणि मला मारायला धावायचा. तो माझ्यापेक्षा चांगलाच उंच आणि दणकट होता. त्यामुळे मी सहज त्याच्या हातात सापडायचो आणि मला मार पडायचा. पण मी त्याला अप्पा म्हणणे सोडले नाही.एकदा मला कुणीतरी एक म्हण सांगितली आणि ती मलाही खूप आवडली. मग मी त्याचा प्रयोग अप्पावरच केला आणि अप्पा एकदम गारच झाला. ती म्हण आता सगळ्यांनाच माहीत असेल.
"सोनार,शिंपी,कुलकर्णी अप्पा,त्यांची संगत नको रे बाप्पा!"
आधी तो रागावला पण मग त्याच्या लक्षात आले की माझ्यात शारीरिक ताकत नसली तरी माझी मौखिक ताकत प्रचंड आहे आणि त्यात तो कमी पडत असे. म्हणून मग त्याने माझ्याशी दोस्ती करायला सुरुवात केली आणि अशी ही आमची अप्पा-बाप्पाची जी जोडी जमली ती आजतागायत टिकून आहे.

ह्या अप्पाच्या घरी मी जात असे तेव्हा त्याच्या घरातील सगळेजण माझ्याकडे अगदी कुतूहलाने पाहत असत. कारण?सांगतो. अप्पाच्या घरात सगळेच उंच होते. मी तर त्याच्या लहान बहिणींहूनही बुटका होतो त्याचीही त्यांना खूप गंमत वाटत असे.पहिल्यांदाच मी जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा माझ्या बुटकेपणावर त्यांचे बरेच हसून झाले. मग अप्पाने त्याच्या आईला जेव्हा सांगितले की मी गातो तेव्हा त्याच्या आईने मला लगेच आपल्या जवळ बसवून घेतले आणि गाणं म्हणायला सांगितले. मीही आढेवेढे न घेता एक भावगीत गाऊन दाखवले तेव्हा ती माझ्यावर विलक्षण खूश झाली आणि तिने माझ्या हातावर खाऊ दिला.

माती सांगे कुंभाराला,पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी

असे ते गीत होते. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गोविंद पोवळे ह्यांनी गाऊन गाजवलेले ते भावगीत माझ्या तोंडून ऐकताना अप्पाची आई आणि घरातील इतर इतके तल्लीन झाले होते की माझे गाणे संपल्यावर क्षणभर सगळे नि:स्तब्ध बसून होते. ते शब्द आणि ती चाल एकमेकांना इतके अनुरूप आहेत की कुणाही श्रोत्याची अशीच अवस्था त्या गाण्यामुळे होत असे.त्या दिवसापासून मी त्यांच्या घरातलाच एक झालो. मग त्या माउलीला नेहमीच मी गाणे म्हणून खूश करत असे.हल्लीच अप्पाच्या घरी गेलो होतो तेव्हा ही आठवण निघाली.
त्याची आई नेहमी त्याला माझ्याबद्दल विचारत असे, " अरे कसा आहे तो देवबाप्पा? अजून तसाच बुटका आहे काय रे? आणि गाणी म्हणतो का अजून?"
अप्पा हसून उत्तर देत असे, " अगं आता तो पूर्वीचा बुटका बाप्पा राहिला नाही. बराच उंच झाला आहे आणि त्याचे केसही पिकलेत आता. हल्ली गाणी म्हणतो की नाही माहीत नाही पण म्हणत असावा.तो भेटला ना की मी सांगेन हं त्याला."
हे सगळे मला सांगताना त्याचा स्वर गहिवरला होता. साहजिकच होते ते कारण आज ती माउली ह्या जगात नाही. हे ऐकून मलाही वाईट वाटले.
तिला माझ्या तोंडून पुन्हा तेच "माती सांगे कुंभाराला" ऐकायचे होते.
कुणाचा जीव कशात गुंतून पडेल काही सांगता येत नाही हेच खरे.

क्रमश:

७ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या!५

ह्याच सहावीच्या वर्षात शेवटी शेवटी मला एक संधी मिळाली ती आकाशवाणीवर सादर होणार्‍या एका रूपकामध्ये. स्वामी विवेकानंदांचे स्मारक कन्याकुमारी येथे उभारावयाचे ठरत होते आणि शाळांशाळांतून त्यासाठी निधी उभा केला जात होता. त्यासाठीच मुंबई आकाशवाणीतर्फे विवेकानंदांच्या कार्यावर आधारित एक रूपक सादर करण्याचे आमच्या शाळेला आमंत्रण मिळाले. आमचे एक शिक्षक आणि चार विद्यार्थी असा एक गट स्थापन केला गेला(त्यात माझाही समावेश होता). शिक्षकांनी एक संवादवजा रूपक लिहिले आणि त्यांच्यासकट आम्ही इतर चौघांनी त्याची कसून तयारी केली.

ठरलेल्या दिवशी मरीन लाईन्सला आम्ही सर्वजण आकाशवाणी केंद्रावर पोचलो. आधी तिथे रंगीत तालीम झाली. त्यावेळी ध्वनिग्राहक(मायक्रोफोन) मध्ये ठेवून त्याच्या आजूबाजूला उभे राहणे, आपला संवाद म्हणून झाला की तिथून चटकन बाजूला होऊन दुसर्‍याला जागा देणे ह्यासंबंधीचे प्रात्यक्षिक झाले. हा कार्यक्रम ध्वनिमुद्रित न करता तसाच्या तसा(लाइव्ह) प्रसारित करायचा होता त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये म्हणून आम्ही सगळे केंद्रसंचालकांच्या सूचनेनुसार वागण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. खाकरायचे नाही,खोकायचे नाही वगैरे वगैरे सूचना पाळणे नाही म्हटले तरी खूपच जड जात होते. माझ्यासारख्या अशक्त मुलाला त्या अती-वातानुकूलित कक्षात थंडी वाजत होती. घशात खरखर सुरू झालेली होती आणि त्यामुळे बोलण्याआधी नाही म्हटले तरी खाकरावे लागत होते नाहीतर आवाज नीट घशाबाहेर पडत नव्हता. हे सगळे बघून मग आम्हाला एक दहा मिनिटांची चहा -कॉफी पिण्यासाठी सुट्टी देण्यात आली. गरम गरम कॉफी घशाखाली उतरली आणि मग आम्हा सगळ्या मुलांना अंगाभोवती गुंडाळायला शाली देण्यात आल्या. अशा त्या 'शालीन' अवस्थेत आमचा कार्यक्रम एकदाचा निर्विघ्नपणे पार पडला तेव्हा सगळ्या आकाशवाणी कर्मचार्‍यांसकट आम्हीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

हा कार्यक्रम शालेय कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रसारित झाल्यामुळे तो दिवसातून दोन वेळा प्रसारित होणार होता. पण दु्सर्‍या वेळी सकाळच्या कार्यक्रमाचेच ध्वनिमुद्रण पुन:प्रसारित होणार असल्यामुळे आम्हाला घरी जाता आले आणि आमचा आवाज आकाशवाणीवरून कसा येतोय हे ऐकण्याची संधीदेखील मिळाली. पण खरे सांगू का आमच्या शिक्षकांव्यतिरिक्त आम्हा सगळ्याच जणांचा आवाज एकसारखाच वाटत होता. प्रत्येकाला त्याचे संवाद माहीत असल्यामुळेच केवळ हा मी, हा तू, असे आम्ही एकमेकांना म्हणत होतो;पण इतरांना तो फरक जाणवत नव्हता. हा माझ्यासारख्याला एक नवाच अनुभव होता.त्या कार्यक्रमाची एक आठवण म्हणून आम्हा सगळ्यांना एक सोनेरी रंगाचा स्वामी विवेकानंदांची छबी असलेला बिल्ला देण्यात आला. काही दिवस आम्ही तो ऐटीत छातीवर मिरवत असू.

माझ्या ह्या विविध गोष्टीत भाग घेणे आणि त्यात पारितोषिके मिळवण्यामुळे उगीचच सगळेजण मला खूप हुशार समजायला लागले. तसा मी हुशार मुळीच नव्हतो आणि नाही ही वस्तुस्थिती आहे. अभ्यासात मी मध्यममार्गी होतो.दहा ते वीस मध्ये माझा क्रमांक येत असे.पण एकदा अशी प्रतिमा तयार झाली की मग ती पुसणे कठीण होऊन बसते.मलाही ह्या गोष्टीचा बराच त्रास होत असे. माझ्या वर्गातल्या पहिल्या पाच क्रमांकात ज्यांचा समावेश होत असे अशी मुले नेहमी मला त्यांच्यापासून कटाक्षाने दूर ठेवीत. मी देखिल माझ्या बरोबरीच्या(बौद्धिक) मुलांमध्ये राहणे पसंत करत असे. ह्या हुशार मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीत विशेष प्रावीण्य नसल्यामुळे वर्गात नाही म्हटले तरी मलाच जास्त भाव मिळत असे. अर्थात मला मात्र त्यांच्या हुशारीबद्दल नेहमीच कौतुक मिश्रित आदर वाटत असे. ही मुले इतके भरभरून गुण कसे मिळवतात? शिक्षकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ह्यांचे हात नेहमीच वर कसे? अशा वेळी मला माझ्या सुमार बुद्धीचे वैषम्य वाटत असे.पण काय करणार अक्कल अशी विकत थोडीच घेता येते? ती तर उपजतच असते.

ह्याच वर्षी आमच्या वर्गात एक विनायक नावाचा अत्यंत हुशार मुलगा दाखल झाला. गोरापान,नाकी डोळी नीटस,खणखणीत आवाज आणि माझ्यासारखाच छोट्या चणीचा हा मुलगा आल्या आल्या आमच्यातलाच एक होऊन गेला आणि बघता बघता तो आमचा नेता देखिल झाला. अतिशय कुशाग्र बुद्धी,आपले म्हणणे ठासून मांडणे आणि ते समोरच्याच्या गळी उतरवणे ह्यातही तो पटाईत होता. त्याचे हे गुण लवकरच दिसायला लागले.तो येईपर्यंत आम्ही प्रत्येक बाकावर एक मुलगा एक मुलगी असे बसत असू.आम्हा मुला-मुलीमध्ये तसा काही भेद असतो हे आमच्या मनात देखिल नव्हते. एकमेकांशी वागण्यात कोणत्याही प्रकारचा वेगळेपणा नव्हता. एकमेकांच्या गळ्यात गळे घालणे,वेळप्रसंगी मारामारी करणे,चिडवणे,रागावणे-रुसणे वगैरे सगळे प्रकार चालत आणि त्यात आप-पर भाव नव्हता.पण विनायक आला आणि बघता बघता त्याने आम्हा मुला-मुलींचे दोन तट केले. मुली वेगळ्या बसायला लागल्या.मुला-मुलींमधला सुसंवाद बघता बघता विसंवादात परिवर्तित झाला. मुलांचे नेतृत्व साहजिकच विनायकाकडे तर मुलींचे नेतृत्व मोहिनीकडे गेले. विनायक येईपर्यंत आमच्या वर्गात मोहिनीचाच पहिला क्रमांक अबाधित होता त्याला आता ग्रहण लागले आणि ती दुसर्‍या क्रमांकावर ढकलली गेली. त्या सहावीच्या वर्षात विनायकाने आपला पहिला क्रमांक काही सोडला नाही.

मुलीना नावे ठेवण्यात विनायक पटाईत होता. तो मुलींविषयी बोलताना 'म्हशी' असे विशेषण लावून बोलायला लागला. आम्हालाही ते विशेषण आवडले आणि सगळेचजण त्याचा मुक्त वापर करायला लागले.साहजिकच मुलीही चिडल्या आणि आम्हाला 'रेडे' संबोधायला लागल्या. पण आमच्यावर त्याचा परिणाम शून्य झाला हे पाहून मुली वैतागल्या. त्यांनी आमच्या वर्गशिक्षकांकडे तक्रार केली की मुले आम्हाला 'म्हशी' असे चिडवतात.त्यावर विनायकाने लगेच "मग त्या आम्हाला रेडे म्हणतात ते का नाही सांगितले?" असा प्रतिप्रश्न केल्यावर ते शिक्षक हसायला लागले. ते हसणे पाहून मुली अजून चिडल्या आणि त्यांनी शिक्षकांना म्हटले, "सर, तुम्ही हसता का? मुलांना तुम्ही शिक्षा का करत नाही?"
सर म्हणाले, "शिक्षा कशाकरता करायची? तुम्हाला ते 'म्हशी' म्हणतात आणि तुम्ही त्यांना 'रेडे' म्हणता. मग झाली की फिटंफाट. एक गोष्ट मात्र मला तुम्हा दोघांची आवडली."
आमच्या प्रश्नार्थक चेहर्‍यांकडे बघून सर म्हणाले, "तुम्ही एकमेकांना चिडवताना का होईना एका जातीचे समजताय हेही काही कमी नाही!"
सरांचे उत्तर ऐकून आमचे सगळ्यांचेच चेहरे पाहण्यालायक झाले होते.

क्रमश:

१ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या!४

वक्तृत्व स्पर्धेनंतर घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेतही मी भाग घेतलेला होता. त्या स्पर्धेतही ज्या लोकांनी भाग घेतला होता त्यांनी नेहमीची सगळ्यांना माहीत असलेली नामांकित गायक-गायिकांनी गायलेली गाणी गायली. मी मात्र एक अगदी कुणालाच माहीत नसलेले बालगीत गायले. त्या गीताला चालही मीच दिली होती. ती चाल तशी साधीच होती;पण हे गीत गाताना मी दोन कडव्यांच्या मध्ये तोंडानेच वाद्यसंगीत वाजवत असे. त्यामुळे त्या गाण्याचा श्रोत्यांवर एक वेगळाच परिणाम झाला. ते गीतही फार गमतीशीर होते.

अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली॥धृ॥
कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली ॥१॥
असे बरेचसे काही गमतीशीर वर्णन पुढे होते.आता ते पुढचे सगळे विस्मरणात गेले. पण ह्या गाण्याने लहानथोर सर्व श्रोत्यांना मनसोक्त हसवले,डोलवले.एकूण सगळ्यांनाच ते गीत आवडले. हे गीत कुणी रचलेले होते हे काही मला आजतागायत माहीत नाही. मात्र ते माझ्यापर्यंत आले ते आमच्या वाडीत पाहुणे म्हणून आलेल्या एका लहान मुलीकडून. तिने ते गाणे आम्हा सर्व सवंगड्यांना म्हणून दाखवले आणि मला ते इतके आवडले की मी ते लगेच लिहून घेतले आणि त्याला चाल लावली.

त्यानंतर निबंध स्पर्धा झाली. निबंधाचा विषय अर्थातच टिळक आणि त्यांचे कार्य ह्या संबंधी होता आणि तो आधीच जाहीर करण्यात आलेला होता. तेव्हा त्याचीही तयारी सगळे घरूनच करून आलेले होते. माझ्यासाठी हा निबंधही माझ्या मोठ्या बहिणीनेच लिहून दिलेला होता आणि मी तो तोंडपाठ करून आलो होतो. तसाच्या तसा मी माझ्या(सुवाच्य पण वळणदार नव्हे) हस्ता़क्षरात लिहिला.

संध्याकाळी सर्व स्पर्धांचा निकाल घोषित झाला. त्यात माझ्या गटात मला मी भाग घेतलेल्या पठण,वक्तृत्व,गीतगायन आणि निबंध ह्या चारही स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक मिळालेला होता. हे कळताच माझ्या मित्र मंडळींनी शाबासकी देण्याच्या निमित्ताने माझी पाठ बुकलून काढली. मी एका दिवसात ’शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी’ म्हणून प्रसिद्ध झालो. सर्व शिक्षकांनी माझे विशेष कौतुक केले. अर्थात ह्या मध्ये वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेतले यश हे निव्वळ माझ्या पाठांतराचे नसून ते माझ्या बहिणीच्या कसदार लेखणीचे होते हे मी कसे विसरू. मला एरवी निबंधामध्ये दहापैकी साडेतीन अथवा चार गुणच मिळत असत आणि इथे स्पर्धेत चक्क पहिला क्रमांक!काहीतरीच! वक्तृत्व स्पर्धेतल्या माझ्या गोष्टीच्या वेगळेपणाचे श्रेयही तिचेच होते. नाहीतर मी देखिल त्या शेंगा-टरफलं,शुद्ध लेखन(संत,सन्त,सन् त(हा शब्द इथे लिहिता येत नाहीये)) वगैरेमध्येच अडकलो असतो. असो. त्या दिवशी मोठ्या जोश्यातच मी घरी आलो.

दुसर्‍या दिवशी म्हणजे १ऑगस्ट रोजी बक्षीस समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि साप्ताहिक मार्मिकचे संपादक श्रीयुत बाळ ठाकरे(त्यावेळी ’बाळ’म्हणुनच ओळखले जात. बाळ चे बाळासाहेब व्हायला अजून बरीच वर्षे जायची होती. त्यावेळेला शिवसेनेचा जन्मही झालेला नव्हता.).चार वेळा बक्षीस घ्यायला मी त्यांच्यासमोर गेलो तेव्हा न राहवून ते म्हणाले, " अरे ह्याने एकट्यानेच भाग घेतला होता काय स्पर्धेत?"
मी गीता-पठणाचे बक्षीस घ्यायला गेलो तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होती. माझ्या ’देव’ ह्या आडनावाचा त्यांनी मोठ्या खुबीने असा संबंध जोडला.
बाळ ठाकरे म्हणाले, "संस्कृत ही तर देववाणी म्हणजे देवांचीच भाषा. तेव्हा ह्या ’देवाला’ गीता पठणात पहिले बक्षीस मिळाले त्यात नवल ते काय?" ह्यावर श्रोत्यांमध्ये खसखस पिकली.
असाच प्रसंग दुसर्‍या ’गोरे’ नामक मुलाच्या बाबतीत घडला.आदल्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत त्याला इंग्लिश विषयात त्याच्या इयत्तेत सर्वाधिक गुण मिळालेले होते. तेव्हा त्याला त्याचे बक्षीस देतानाही ते म्हणाले, "इंग्लिश ही बोलून चालून गोर्‍यांचीच भाषा! तेव्हा इंग्लिश मधले पहिले पारितोषिक ह्या ’गोरे’ला मिळणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या ह्या कोटीलाही हशा आणि टाळ्यांनी श्रोत्यांनी दिलखुलास दाद दिली.

मित्रहो ती चारही बक्षिसे घेऊन नाचत नाचत मी घरी आलो. प्रथेप्रमाणे ते सगळे देवासमोर ठेवले,त्याला नमस्कार केला आणि गीता पठणाचे बक्षीस जरा जाडजूड वाटत होते म्हणून सर्वप्रथम तेच उघडले. त्यातल्या पुस्तकावरचे चित्र बघून खूश झालो. लेखकाचे(साने गुरुजी) नाव पाहून अजून खूश झालो. त्या पुस्तकाचे नाव होते गीता-हृदय. चला साने गुरुजींनी लिहिलेल्या छान गोष्टी वाचायला मिळणार ह्या आनंदात मी पुस्तक उघडून आत पाहिले तो काय? पुन्हा गीता?म्हणजे भगवद्गीता हो. अहो तुरुंगात असताना विनोबा भाव्यांनी कैद्यांसमोर केलेले गीतेचे निरूपण साने गुरुजींनी स्वत:च्या शब्दात उतरवून काढलेले होते. मी डोक्याला हात लावला. पुन्हा गीतेने माझा पोपट केला होता.

मी असा हतोत्साहित होऊन बसलेलो असताना माझ्या भावाने दुसरे बक्षीस उघडून बघितले आणि तो आनंदाने ओरडला. "अरे हे बघ काय! मस्तपैकी गोष्टीचे पुस्तक! सॅम्सन आणि दलायला!"मी पटकन त्याच्या हातून ते पुस्तक हिसकावून घेऊन बघितले तर त्यावरच्या सुंदरशा रंगीबेरंगी मुखपृष्ठाने मी एकदम खूश झालो आणि मग घरभर नाचत सुटलो.राहिलेली दोन बक्षिसे काय आहेत हे बघण्याची तसदी न घेता सरळ ओट्यावर जाऊन पुस्तक वाचायला सुरुवात केली.ती दोन बक्षिसे नंतर उघडली तेव्हा त्यातही छोटी गोष्टींची पुस्तके होती.त्याक्षणी त्या गोष्टीच्या पुस्तकांची कमाई ही मला जगातल्या सर्वात अनमोल अशा खजिन्यापेक्षाही मोलाची वाटत होती.

मित्रहो ही बक्षिसे कमी होती म्हणूनच की काय मला त्याच वर्षी(टिळक पुण्यतिथीनिमित्तच) स्थानिक वाचनालयात आणि ब्राह्मण सभेत झालेल्या दोन वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेतही पहिल्या क्रमांकाची पारितोषिके मिळाली. ’घबाडयोग’ म्हणतात तो हाच असावा बहुधा. वाचनालयातर्फे मला मिळालेले बक्षीस तर मी कधी स्वप्नातही इच्छिलेले नव्हते.ते बक्षीस म्हणजे एक चामड्याचे सुबक असे पेटीसारखे दफ़्तर होते. त्याकाळी अतिश्रीमंत मुलेच ते वापरत असत. आम्ही निम्नस्तर मध्यमवर्गीय कापडाच्या पिशव्यांच दफ़्तर म्हणून वापरत असू(ती तसली दफ़्तरे आम्हाला अप्राप्यच होती). ते बक्षीस पाहून तर माझा आनंद गगनात मावेना. माझ्या वर्गातीलच नव्हे तर समस्त शाळेतील(काही गर्भ श्रीमंत मुले सोडून)मुलांनी त्या दफ़्तराचे आणि माझेही भरभरून कौतुक केले. ते दफ़्तर मी चांगले नववी पर्यंत वापरले. पायात चपला असायच्या-नसायच्या,गणवेशही सामान्य दर्जाच्या कापडांचा आणि खांद्यावर हे महागडे आणि सुंदर दफ़्तर असा सगळा विजोड मामला होता.पण ते माझ्या गावीही नव्हते.
ब्राह्मण सभेकडून मिळालेले बक्षीस होते एक पैसे साठवण्याची पेटी(सेविंग बँक-पिगी बँक). तीही अतिशय रंगीबेरंगी होती. त्या पेटीत पाच रुपए घालून बक्षीस म्हणून दिल्यामुळे त्याचेही मोल माझ्यासाठी खूपच होते. अर्थात आजवर कधी आम्हा मुलांना स्वतंत्रपणे खर्चायला एक पैसाही दिला गेलेला नसल्यामुळे पुढे त्या पेटीत कसलीच भर पडली नाही. घरात कमावणारा एक आणि खाणारी तोंडे सात! त्यामुळे बचत वगैरेसाठी तर सोडा पण महिन्याची दोन टोके जुळवणे कठीण होऊन बसे. मात्र माझ्या आई-वडिलांचे आहे त्यात समाधान मानण्याचे धोरण असल्यामुळे आम्हाला जे मिळत होते तेही खूप वाटत होते.त्यामुळे त्या पेटीत पैसे टाकण्यासाठी मी कधी हट्ट केला नाही.

अशा तर्‍हेने माझे हे इयत्ता सहावीचे वर्ष अतिशय संस्मरणीय ठरले.

क्रमश:

आठवणी! शालेय जीवनातल्या!३

ह्या सहावीच्या वर्षी मी शाळेत टिळक पुण्यतिथीच्या झालेल्या विविध स्पर्धांत भाग घेतला. पाठांतर स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आणि गीतगायन स्पर्धा . ह्यावेळी पाठांतर स्पर्धेत आम्हाला गीतेचा बारावा अध्याय म्हणायचा होता जो आम्ही रोज प्रार्थनेनंतर म्हणत असू त्यामुळे त्याबद्दल मला काळजी नव्हतीच. "एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते" अशी काहीशी त्याची सुरुवात होती(मित्रहो आता ह्याच्या पुढचे काही आठवत नाही. माफ करा).

नेहमी प्रमाणे मी माझे पठण दणदणीतपणे सादर केले. बक्षीस मिळणे न मिळणे हा वेगळा भाग होता.त्याचा विचार केला नाही कारण त्याची घोषणा इतर सर्व स्पर्धा झाल्यावर होणार होती. मला चिंता होती ती वक्तृत्व स्पर्धेची! कारण आयुष्यात पहिल्यांदाच ह्या स्पर्धेत मी भाग घेत होतो. विषय अर्थातच टिळक आणि त्यांच्याबद्दलची माहिती. आता तुम्हाला माहीत आहेच की ह्या अशावेळी टिळकांच्या त्याच त्याच गोष्टी सांगितल्या जातात(शेंगा,टरफले,शुद्धलेखन वगैरे वगैरे) आणि स्पर्धक ,श्रोते आणि परीक्षक ह्या सगळ्यांच्या संयमाची कसोटी लागते. पण माझे भाषण ह्या सगळ्यांपासून वेगळे होते.मी टिळकांबद्दल सांगितलेली गोष्ट ह्या आधी कुणीच म्हणजे अगदी मी देखिल ऐकलेली नव्हती. ही गोष्ट म्हणजे हे भाषण मला माझ्या मोठ्या बहिणीने लिहून दिले होते. त्यासाठी तिने वाचनालयातून एक पुस्तक शोधून आणलेले होते आणि त्या आधारेच तिने ते भाषण मला लिहून दिले. मी ते मन लावून पाठ केले होते पण आता इथे सभागृहात आल्यावर नाही म्हटले तरी दडपण आलेच होते. सुदैवाने माझा क्रमांक बराच मागे होता म्हणून मी थोडासा शांत होतो आणि त्याच वेळी अस्वस्थही होतो.

शेवटी एकदाचे माझे नाव पुकारले गेले आणि मी यंत्रवत मंचावर पोचलो. हातपायाची थरथर जाणवत होतीच. समोर इतके सगळे जण बसलेले होते तरी त्यांचे चेहरे देखिल दिसत नव्हते इतका डोळ्यासमोर काळोख दाटला होता आणि घशाला कोरड पडली होती. काही क्षण मी त्याच अवस्थेत उभा होतो. परीक्षकांनी घंटी वाजवून मला त्या अवस्थेतून बाहेर काढले आणि भाषण सुरू करण्याची सूचना केली. मी उगीच इथे-तिथे पाहिले आणि माझी नजर टेबलावर ठेवलेल्या तांब्या-भांड्याकडे गेली. मला त्याक्षणी पाण्याची अतिशय निकड भासत होती म्हणून अतिशय करुणार्द्र मुद्रेने परीक्षकांकडे पाहून पाणी हवे असल्याचे सूचित केले आणि त्यांनीही अतिशय उदारपणे मला ते पिण्याची अनुमती देऊ केली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी एक भांडंभर घटाघट पाणी प्यायले आणि माझ्या जीवात जीव आला. मी एक आवंढा गिळला आणि मनातल्या मनात देवाचे स्मरण करून धाडदिशी सुरुवात केली. "अध्यक्ष महोदय आणि माझ्या मित्रमंडळींनो आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो".
त्यानंतर राजधानी एक्सप्रेसच्या वेगात आणि डौलात मी ती गोष्ट सांगितली. शेवटी सगळ्यांचे आभार मानले आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात जागेवर जाऊन बसलो. अध्यक्षांसकट सगळेच खूश झालेले दिसत होते कारण त्या सगळ्यांना मी शेंगा,टरफले आणि शुद्धलेखनाच्या दलदलीतून बाहेर काढले होते. काय होती ती गोष्ट? आता आठवते तशी थोडक्यात सांगतो.

टिळक त्यावेळी महाविद्यालयात शिकत होते. व्यायामाने बलदंड शरीर बनवलेले टिळक 'बाळ' ह्या नावाऐवजी आता 'बळवंतराव' ह्या नावाने ओळखले जात होते. आपल्या मित्र-मंडळींसह त्यांच्या वाड्याच्या गच्चीवर गप्पा-टप्पा चालू होत्या. विषय अर्थातच इंग्रजांची गुलामगिरी आणि भारताचे स्वातंत्र्य हाच होता. टिळक आणि त्यांची ही मित्र-मंडळी ही जहाल मतवादी म्हणून ओळखली जात आणि म्हणूनच त्यांच्या हालचालींवर इंग्लिश पोलिसांचे बारकाईने लक्ष होते.बोलता बोलता टिळकांनी मित्रांना प्रश्न केला, "आता ह्या क्षणी जर का पोलीस आपल्या सगळ्यांना पकडायला आले तर कोण कोण काय करेल?कुणी म्हणाले, "मी दारामागे लपेन." कुणी म्हणाले, "मी त्यांच्याशी वाद घालेन."कुणी काय आणि कुणी काय. ज्याला जे सुचले त्यांनी ते उत्तर दिले. शेवटी मित्रांनी टिळकांना विचारले, "बळवंतराव,तुम्ही काय करणार?"
क्षणाचाही विचार न करता टिळक म्हणाले, "मी हेच करीन." आणि त्यांनी गच्चीवरून थेट खाली उडी मारली. मित्र घाबरले . बळवंतरावांना कुठे लागले तर नसेल ना ह्या काळजीने ते सगळे खाली येण्यासाठी जिन्याजवळ आले आणि पाहतात तो काय? स्वत: टिळक हसत हसत वर येताना दिसले. टिळकांना हसताना पाहून मित्रांचीही कळी खुलली आणि ते देखिल त्यांच्याबरोबर हास्यात सामील झाले.
एका मित्राने टिळकांना विचारले, "बळवंतराव काय हे धाडस? अहो कुठे लागले असते तर? ह्यापुढे असा अविचार करू नका."
टिळक म्हणाले , "बाबांनो, आपण देशसेवेच्या गोष्टी करतो मग असे जीवाला घाबरून कसे चालेल?देशासाठी तन-मन-धन अर्पण करण्याची आपण प्रतिज्ञा केलेली आहे मग आता मागे हटून कसे चालेल?"
दुसरा मित्र म्हणाला, "बळवंतराव, अहो तुम्ही चक्क पळून गेलात! ह्याचे तुम्ही कसे समर्थन कराल?"
टिळक म्हणाले, "बचेंगे तो और भी लढेंगे" हे दत्ताजी शिंदेचे वचन विसरलात काय? पोलीस कोठडीत पिचून मरण्यापेक्षा हे धाडस केव्हाही चांगलेच. अशा प्रसंगी लागणारे शारीरिक बळ असावे म्हणून तर आम्ही वर्षभर कसून व्यायाम केला मग त्याचा उपयोग कधी करणार? म्हटलंच आहे ना 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम'!"
ह्या उत्तराने मित्रांचे समाधान झाले आणि त्यांनीही शरीर बळकट करण्यासाठी व्यायाम करण्याची शपथ घेतली.(मित्रांनो टिळक नेमके काय म्हणाले ते आता शब्दश: आठवत नाहीये(आत्ता इथे हरितात्या हवे होते म्हणजे त्यांनी माझी सुटका केली असती). तरीही जसे आठवले तसे लिहिले आहे.काही चूक असल्यास माफ करावे.)

क्रमश: