माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ सप्टेंबर, २००७

स्वगत! ३

हां! ऐक तर आता दुसरा चिमित्कार!असाच एकदा मी रस्त्याने चाललो होतो. माझ्याच नादात होतो.रस्त्यातली गर्दी चुकवीत चाललो होतो. ते गाणं आहे ना वसंतरावांचे "वाटेवर काटे वेचीत चाललो,वाटते जसा फुला-फुलात चाललो" अगदी तसाच आपल्याच नादात चालत होतो.बाकी वसंतराव म्हणजे एकदम जंक्शन माणुस बरं का! आपण तर त्याचा पंखाच आहे. त्यांचे ते अनुनासिक बोलणे आणि आणि दमदार गाणे हे दोन्हीही मला आवडते. कधी तरी त्यांच्या गाण्याची नक्कल करायची पण हुक्की येते. माझ्या नरड्यातून वसंतराव जेव्हा गातात तेव्हा मला कळते की ते गाणं किती कठीण आहे ते.पण तरी मजा येतो.त्या वेळी आपल्याला कुणी "किंचित वसंतराव" म्हटले ना तरी आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटेल. पण लोकांना पारख नाही ना असली गोष्टींची.

अरे तू कुठे भरकटलास? तुझी पावर दाखवत होतास ना ? मग असा मध्येच रस्ता सोडून त्या बाबा बर्व्यांसारखा (ते कसे मध्येच वेदकालीन जंगलात घुसायचे) संगीताच्या जंगलात घुसलास! मूळ मुद्यावर ये! हां! तर तू रस्त्याने चालला होतास, आता पुढे बोल.

तर काय झालं? माझ्या बाजूने एक बस धडधडत गेली.

आता रस्त्यावरनं तुझ्या बाजूने एक बस धडधडत गेली ह्यात काय विशेष? बसऐवजी काय रणगाडा जायला हवा होता काय?

तू असा मध्ये मध्ये हाल्ट करू नको हां(काय आरडरलीचा रुबाब होता नाय!) सांगून ठेवताय. मंग लिंक तुटतेय ना. तर ती बस जेव्हा माझ्या बाजूने गेली तेव्हाच माझ्या मनात विचार आला की "ही बस काय शेवटपर्यंत पोचणार नाही"!

म्हणजे?

सांगतो. तशी ती माझ्यापासून पुढे ५० पावलांवर(म्हणजे तिच्या चाकांवर म्हणू या) जाऊन थांब्यावर थांबली. त्यातनें एक-दोन प्रवासी उतरले आणि पाच-सहा चढले. बस पुन्हा सुरु झाली आणि मोजून १० पावले पुढे गेली आणि पुन्हा थांबली. एक-एक करून लोक खाली उतरत होते. तोपर्यंत मी देखिल तिथे पोचलो. कुतुहल म्हणून एकाला विचारले की हे सगळे लोक खाली का उतरताहेत? अजून तर खूप लांब जायचंय ह्या बसला. मग हा प्रकार काय आहे?

काय झालं होतं?

काय होणार? बस "बंद" पडली होती. डायवर साहेबांनी सांगितले की आता बस अजिबात हल्याची नाय तवा मुकाटपणे खाली उतरा समद्यांनी.आता बोल. हाय का नाही माझी पावर?

विचार करावा लागेल. तरीपण हे देखिल "बोला फुलाला गाठ " असेच म्हणता येईल.अजून आहे काय एखादा किस्सा?असेल तर बोल.

आहे ना. सांगतो. पण हा किस्सा माझ्या पावरचा आहे असे म्हणावेसे मला वाटत नाही. पण माझ्या तोंडून निघाले आणि दुर्दैवाने ते खरे झाले. हा किस्सा सांगताना मला मुळीच आनंद होत नाहीये.पण काहीतरी पूर्वसूचना मला मिळत असावी असे वाटते म्हणून हाही किस्सा ऐक.

सांग. आता माझेही औत्सुक्य वाढलंय!

मी नववीत असतानाची ही गोष्ट आहे(१९६६ सालची). त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते लाल बहाद्दुर शास्त्री. नुकतेच पाकिस्तान विरुद्धचे युद्ध आपण जिंकले होते. "जय जवान,जय किसान" असा नारा देत शास्त्रीजींनी जनमानसात एक नवे स्फुल्लिंग चेतवले होते.म्हणूनच शास्त्रीजींना आजवर भारताला लाभलेला सर्वात कार्यक्षम आणि लोकप्रिय पंतप्रधान असे मी मानतो. "मूर्ती लहान पण किर्ती महान" ही म्हण सार्थ करणारा हा माणूस अकाली जाण्याने भारताचे नशीबच फिरले असेही मला वाटते. असो. तर पुढे ऐक. मी नागरिक शास्त्राचा अभ्यास करत होतो. त्यात कुठे तरी असा संदर्भ आला की "कै.शास्त्रींनी अमूक अमूक ठराव मांडला(की काय. नक्की आठवत नाही ते वाक्य)". हे वाचताच मी सहजपणे आईला म्हटले, "आई! शास्त्री तर जीवंत आहेत.ते आपले पंतप्रधान आहेत आणि सद्या ताश्कंदमध्ये आहेत. मग त्यांचा उल्लेख असा "कै." म्हणून का केला?
आई म्हणाली, " अरे ते दुसरे कुणी असतील. हे कसे असतील? इतके साधे तुला कळू नये म्हणजे कमाल झाली. मुर्खासारखे काही तरी बोलू नकोस".
दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी रेडिओ लावला तेव्हा रोजच्या मंगलमय सनईचे सूर ऐकू येण्याऐवजी रडकी सारंगी वाजत होती. तिथेच लक्षात आले की काही तरी गडबड आहे. कुणी तरी मोठा माणूस "गेला" असावा. सारंगीचे रडणे संपले आणि निवेदकाने अतिशय व्यथित स्वरात जे सांगितले त ऐकून मी तर हतबुद्धच झालो. तो सांगत होता "भारताचे पंतप्रधान श्री. लाल बहाद्दुर शास्त्री ह्यांचे ताश्कंद येथे दु:खद निधन"! पुढचे मला काहीच ऐकू आले नाही.

खरेच! प्रसंग मोठा मन विषण्ण करणारा होता हे मान्य आहे आणि तुझ्या तोंडून नकळत का होईना त्या अभद्राची सूचना मिळाली होती हे आता पटतंय! पण तरीही असे वाटतेय की हा देखिल निव्वळ योगायोग असावा.

तू म्हणतो आहेस ते मलाही पटतेय किंबहुना तो प्रसंग अथवा आधी सांगितलेल्या घटना हा निव्वळ योगायोगच होता असेच माझेही मत आहे.फक्त एक गंमत म्हणून तुला हे सगळे सांगितले. कैक वेळेला सामान्य माणसेही अशा घटनांची पूर्वसूचना देतात(त्यातला मीही एक) हेच मी सिद्ध करायचा प्रयत्न करत होतो. मात्र काही धुर्त लोक अशा गोष्टींना चमत्काराचे लेबल लावून त्याचा जनमानसात प्रचार करतात आणि एखाद्याला बाबा बनवून स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेतात. गंमत म्हणजे लोकही चक्क फसतात.म्हणून म्हणतो "बोल! बनू का बाबा? आहे की नाही पावर?"

बाबा की जय हो!

समाप्त!

२८ सप्टेंबर, २००७

स्वगत! २

ते मलाही माहित आहे. तू सांगायची काही जरूर नाही. आपले नेते नाही का नेहमी सांगतात की "देशासाठी त्याग करा"! पण स्वतः मात्र लाभाची पदे लाटण्यात अगदी पुढे असतात. ते बाबा-बुवा लोकही तसेच स्वतः मात्र ऐश्वर्यात लोळतात आणि लोकांना सांगतात सत्ता,संपत्तीचा मोह सोडा. संपत्ती दान करा(कुणाला? तर ह्यांना)! संसार करून कुणाचे भले झालेय(ह्यांचे अंग रगडून द्यायला मात्र ह्यांना सुंदर सुंदर स्त्रिया लागतात)? त्यापेक्षा आमच्या चरणावर लीन व्हा! आम्ही तुम्हाला सन्मार्ग दाखवतो.परमार्थ साधा भक्तानो आणि मुक्ती मिळवा.

हे बाकी तुझे पटले बरं का! मी सुद्धा विचार करतो कधी कधी "बाबा" बनण्याचा! मागे माझा मित्र दादा मला म्हणाला होता की "तू बाबा हो. मी तुझा चेला बनतो आणि तुफान प्रसिद्धी करतो".

अरे पण बाबा बनणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी काहि गोष्टींचा दांडगा अभ्यास लागतो. पहिले म्हणजे लोकांना आकर्षित करेल अशी बोलबच्चनगिरी करता आली पाहिजे. झालंच तर चमत्काराच्या नावाखाली काही हातचलाखीचे प्रकारही करता आले पाहिजेत. तुझ्याकडे काय आहे? कधी आरशात पाहिले आहेस का आपले मुखकमल(थोबाडच म्हणणार होतो;पण जाऊ दे काही झाले तरी आपला मराठी माणूस आहेस म्हणून सोडून देतो)?

माझे पराक्रम ऐकायचेत? अरे एकापेक्षा एक असे चमत्कार केलेत मी. तू आपली झूकझूक गाडी कधी थांबवू शकतोस? अरे हट! तुला जमणार नाही. त्याला माझ्यासारखा पॉवरबाज माणुस पाहिजे.

काय तरी फेकू नकोस. कधी आणि कशी थांबवलीस तू गाडी? काय ते स्पष्ट बोल. उगाच तोंडची वाफ फुकट घालवू नकोस. काय समजले?

अस्सं! तर मग ऐक! मी आणि माझा एक मित्र अंत्या(अनंत) चर्चगेटहून घरी यायला निघालो. अंत्याला पालघरला जायचे होते आणि मी मालाडला जाणार होतो. साहजिकच मी बोरिवली लोकलची वाट पाहात होतो आणि अंत्या विरार लोकलची. आधी विरार लोकल फलाटावर आली. अंत्याने चपळाईने त्यात शिरकाव करुन खिडकीजवळची जागा पटकावली. त्याची गाडी गेल्यानंतर त्याच फलाटावर माझी गाडी येणार होती म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारत उभा राहिलो. खरे तर अंत्याने माझ्याबरोबर बोरिवली लोकलने यावे आणि मग पुढे गाडी बदलून जावे असे वाटत होते म्हणून मी त्याला सारखे सांगत होतो की "अंत्या! लेका ही गाडी आज रद्द होणार आहे. आता बघ ही गाडी यार्डात जाईल. तू उतर आणि माझ्या बरोबर चल. पण एक नाही आणि दोन नाही. बराच वेळ झाला. गाडीची निघण्याची वेळही टळून ५ मिनिटे झाली(लोकलच्या वेळापत्रकात पाच मिनिटे म्हणजे पाच तासांसारखी वाटतात) तरी गाडी हलायचे लक्षण दिसेना आणि मी पुन्हःपुन्हा त्याला सांगतोय की "अरे बाबा अंत्या उतर ह्या गाडीतून! ही गाडी इथून हल्याची नाय"!माझे हे बोलणे इतर लोकही ऐकत होते. त्यापैकी काही लोकांनी रेल्वेला आणि मला शिव्या द्यायला सुरुवात केली. शेवटी अंत्या कंटाळून डब्याच्या बाहेर पडला आणि उद्घोषणा झाली , "तीन नंबरकी विरार जानेवाली गाडी कुछ तकनिकी खराबीके कारण यार्डमे(भाडमे!) जायेगी!"
मी आणि अंत्या तिथून दूर पळालो. लोक मला शोधायला लागले. कुठे आहे तो काळतोंड्या म्हणून.तेव्हा, समजली माझी पावर! अरे असे अजून किती तरी चिमित्कार आहेत. मी सांगता सांगता आणि तू ऐकता ऐकता आपण दोघेही थकून जाऊ. आता बोल आहे की नाही बाबा बनायची पावर?

हॅ! हे तर "कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ" अशा प्रकारचे आहे. अजून काही असेल तर बोल!

सांगतो . अजून एक किस्सा सांगतो पण वाईच दम खाऊ दे!

क्रमश:

२६ सप्टेंबर, २००७

स्वगत!१

काय झालंय ह्या लोकांना? एव्हढ्या तेव्हढ्यावरून का चिडतात? का मारामार्‍या करतात?उठसुठ बाबा-बुवांच्या भजनी का लागतात? का स्वतःची आणि दुसर्‍याची अशी फसवणुक करतात? का पैसा,मानमरातबाच्या मागे लागतात? शांत ,स्वस्थ आयुष्य जगण्या ऐवजी एकमेकांशी सतत स्पर्धा का करतात. हार झाली तर रडत बसतात. जिंकले की प्रतिस्पर्ध्याला चिडवतात. हे सगळे असे का होते? एकमेकांवरचा विश्वास का उडालाय लोकांचा? का,का आणि का? हे असले जीवघेणे प्रश्न सारखे सतावत असतात.

पण मी कशाला ह्या सगळ्याचा विचार करतोय? जो तो समर्थ आहे की त्यांचा त्यांचा विचार करायला. मग मी कशाला उगीच काथ्याकुट करतोय? सगळ्या जगाचे ओझे माझ्याच एकट्याच्या शिरावर कुणी दिलेय?
नाही ना! मग गप बसायला काय घेशील? तू कधी पासून असा विचार प्रवण झालास? तुला आठवतेय! त्या कदमकाकांनी काय सांगितले होते?
कोण कदमकाका? मला तर काहीच आठवत नाहीये.
अरे ते नाही का तुमच्याच वाडीत राहायचे एका छोट्याश्या झोपडीत? त्यांचा मुलगा 'उपा' तुझा मित्र नव्हता का? आणि त्याचा मोठा भाऊ 'दादा'! तो मिलिटरीवाला! विसरलास सगळे? लहानपणी तू त्यांच्या घरी गेला होतास तेव्हा नाही का तुझा हात पाहून ते म्हणाले होते की तू तुझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त वृत्तीचा होशील म्हणून?
हॅ! असल्या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नाही. ते आपले गमतीने म्हणाले. तसे तर काय माझ्या पत्रिकेत 'राजयोग' होता; पण मी राजा सोड, साधा प्रधानही बनलो नाही कधी नाटकातला. सांगणारे काय काहीही सांगतात. अजून एक गंमत सांगतो. माझ्या जन्म पत्रिकेप्रमाणे मी माझ्या वयाच्या २२ ते २५ ह्या वर्षात बाप बनणार होतो.अरे पण माझे लग्नच मुळी ३५व्या वर्षी झाले तर मी कसा बनणार होतो बाप त्याआधी? हे कसे सांगता आले नाही त्या ज्योतिषांना? काही तरी आकडेमोड करतात आणि फेकतात तुमच्या थोबाडावर! माझा तर ह्या असल्या गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही बरं का!
असं? मग रोज वर्तमानपत्रातले राशी भविष्य कशाला रे पाहतोस?
हॅ! त्यात काय! जरा गंमत म्हणून बघतो झाले. अरे त्यातली गंमत तुला सांगतो. ऐक! हल्लीच एकदा काय लिहिले होते तर 'आज बायकोपासून सुख मिळेल'! आहे की नाही गंमत! आता बायकोच नाही हयात तर तिच्यापासून सुख कसे मिळणार?पण हे बेटे मनाला येईल ते लिहितात.कधी कधी हे लोक काय लिहितात ते त्यांना तरी कळत असेल की नाही ह्याची मला शंका येते.
काय ते नीट बोल! उगीच फेकाफेक करु नकोस! रोज सगळ्या राशींचे भविष्य न चुकता वाचतोस ते कशाला रे आणि तुझी रास कुठली बरं?तशी पत्रिकेप्रमाणे म्हणजे चांद्र रास म्हटलीस तर कुंभ आहे आणि सुर्यरास(इंग्रजी जन्म तारखेप्रमाणे) पण कुंभच आहे. मला हे कळत नाही की एक सकाळी उगवतो(म्हणजे तो उगवला की सकाळ होते असे म्हणू या)आणि एक रात्री. मग तरीही माझ्या दोन्ही राशी कुंभ कशा?
हे असले प्रश्न मला विचारू नकोस(हवे तर एखाद्या ज्योतिषाला विचार)!उगीच माझं डोकं खाऊ नकोस. विषय कुठे सुरु झाला आणि तू कुठे पोचलास. मी तुला कदमकाकांनी सांगितलेले भविष्य सांगत होतो. मी आता विचारीन त्या प्रश्नाची सरळ उत्तरे निमूटपणे दे. जास्त पकपक करू नकोस! काय? हां,आता तुझे उत्तरायुष्य सुरु झालेय! बरोबर?
बरोबर आहे बाबा! बोल पुढे!
तर हल्ली तुझ्या मनात कसले कसले विचार येतात ते तू मगाशीच बोललास. ते विचार सामान्य माणसाला कधी सुचतात काय मला सांग? माझ्या मते असले विचार नेहमी तत्वज्ञानी आणि संन्यस्त माणसांनाच पडतात.
अरे पण मी पण चारचौघांसारखाच आहे ना! मलाही ते तुम्ही काय म्हणता, त्या षडरिपुंनी वेढलंय ना! मी कुठे त्या मोठ्या लोकांसारखा वागतो? हां! आता कधी कधी नाटक करतो मोठेपणाचे. कुणी फसतं ! कुणी हसतं! पण मी आपला साधा,सरळ आणि सामान्य माणूस आहे. आता रिकामा वेळ असतो म्हणून कदाचित उगीचच हाय-फाय विचार करत असेन. बाकी अजून कसलाही मोह सुटलेला नाहीये. उगीच तू सुतावरून स्वर्गाला जाऊ नकोस! ह्या जगात सगळ्यात सोपे काय आहे? तर ते म्हणजे तत्वज्ञान सांगणे,उपदेश करणे! आपण फक्त सांगायचे असते! तसे वागायचे कधीच नसते! आणि मी तरी वेगळे काय करतोय? काय समजलास बेंबट्या???

क्रमशः

२५ सप्टेंबर, २००७

टॉवर्स: एक पुस्तक परिचय!

Towवर्स
Towवर्स(टॉवर्स) ह्या नावाचे पुस्तक हल्लीच वाचनात आले. अग्रलेखांचे स्वयंघोषित बादशहा नीलकंठ खाडिलकर(नवाकाळ चे माजी संपादक) ह्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नवाकाळचा खप कसा वाढवला,तत्कालीन भांडवलशाही वृत्तपत्रे(मटा,लोकसत्ता वगैरे) ह्यांच्यापेक्षा जास्त खप व्हावा(हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेय) म्हणून काय काय नवे प्रकल्प राबवले,कसे कष्ट उपसले ह्या बद्दलची अतिशय रोमहर्षक कहाणी ह्या पुस्तकात वर्णन केलेली आहे.पुस्तक एकदा हातात घेतले की खाली ठेववत नाही असे प्रभावी आणि प्रवाही लेखन आहे.सत्याची कास धरूनही पत्रकाराला केवळ यशस्वीच नव्हे तर दैदिप्यमान यश कसे प्राप्त करता येते ह्याबद्दलचे आपले जीवंत अनुभव त्यांनी इथे मांडले आहेत.

नीलकंठ खाडिलकर म्हणजे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे नातु . ह्या पुस्तकात नाट्याचार्य खाडिलकर, आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बालगंधर्व, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, कॉ.जी.एल.रेड्डी, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, शरद पवार, सत्यसाईबाबा, मोरारजी देसाई इत्यादि मोठ्या लोकांच्या आठवणी आणि मुलाखतींबद्दल सविस्तर वाचता येईल.

तसेच वासंती,जयश्री आणि रोहिणी ह्या (बुद्धिबळातल्या तिघी आंतर्राष्टीय महिला मास्टर्स )नीळूभाऊंच्या मुलींच्या बुद्धिबळ खेळातील कामगिरीबद्दलही वाचायला मिळेल.

Towवर्स: लेखक:नीलकंठ खाडिलकर
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मंदिर; किंमत: ४००रुपये.

२० सप्टेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!११

मी घरी पोचायच्या आधीच ही बातमी घरी पोचली होती. वाडीतली काही मुले माझ्याच शाळेत मागच्या-पुढच्या इयत्तेत होती. त्यांनी ती बातमी जरा जास्तच तिखट-मीठ लावून माझ्या आईला सांगितली होती. आई दारात सचिंत मुद्रेने उभी होती. मी दिसताच ती लगबगीने पुढे आली. माझ्या हातातले दप्तर घेऊन मला तिने आत नेले. कपडे बदलून हात-पाय धुवून मी खायला बसलो. सगळे होईपर्यंत तिने मला काहीच विचारले नाही पण तिचे निरीक्षण चालूच होते.

माझे खाणे आटोपल्यावर मी हात धूवून खेळायला पळणार इतक्यात तिने मला थांबवले आणि झाल्या प्रकाराबद्दल विचारले. मी जे काही घडले ते तिला सांगितले. एकीकडे मुलावरचा विश्वास(कारण तिने केलेले संस्कार) आणि दुसरीकडे शिक्षकांबद्दलचा आदर(त्या काळात 'छडी लागे छम छम,विद्या येई घम घम' ह्या उक्तीवर पालक-शिक्षक ह्या दोघांचाही विश्वास होता) अशा विचित्र कात्रीत ती सापडली होती.तिने काहीच मतप्रदर्शन केले नाही पण माझ्या अंगाला हळुवार हाताने तेल चोळुन दिले.

मी जरी वर वर शांत दिसत होतो तरी मनातुन खूप चिडलो होतो. मला येत असतील नसतील त्या सर्व शिव्या सरांना देऊन (मनातल्या मनातच) झाल्या होत्या. कैक वेळेला 'बेडकी,बेडकी' असे देखिल बोलून झाले होते.पण तरीही भर वर्गात झालेला अपमान(तोही मुलींसमोर!) मी विसरू शकत नव्हतो. माझे विचारचक्र चालूच होते. मी ताकतवान असतो तर "भेंडी! ह्या बेडकीला चेचून टाकले असते. यंव केले असते आणि त्यंव केले असते" असे मनातल्या मनात धुमसत होतो.पण बाहेर खेळायला गेलो,तिथला गार वारा अंगाला लागला आणि हळूहळू खेळात रमलो. खेळून पुन्हा येईपर्यंत सगळे विसरलो होतो. मात्र आता अंग चांगलेच ठणकायला लागले होते. आईकडे तशी तक्रार केल्यावर तिने पुन्हा अंगाला हळुवार हाताने तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने अंग शेकून काढले. त्यानंतर थोडे बरे वाटले. मग जेवण,थोडा गृहपाठ करून झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी जाग आली तेव्हा पुन्हा अंग ठणकत होते. अंगही चांगलेच तापले होते. त्या दिवशी आईने मला शाळेत पाठवलेच नाही. ती आपली दिवसभर माझी सेवा सुश्रुशा करण्यातच गुंतली होती. संध्याकाळपर्यंत ताप उतरला होता. अंगदुखी देखिल कमी झाली होती. तेव्हा कुठे तिने नीट श्वास घेतला. हा सगळा प्रकार वडिलांच्या कानावर घातलेलाच नव्हता.तिचे तीच एकट्याने सगळे निस्तरत होती. तसेही आमच्या घरात दिवसभर मुलांनी काय खोड्या केल्या,कुणाला मारले,कुणाकडून मार खाल्ल्ला असल्या तक्रारी वडिलांपर्यंत कधीच पोचत नसत. आईच काय तो सगळ्याचा सोक्ष-मोक्ष लावत असे. तीच आम्हाला शिक्षा करत असे आणि तीच आमची गार्‍हाणी सोडवत असे. आमच्या सबंध वाडीत संध्याकाळी सर्व घरातून मारझोड,रडारडीचे आवाज येत त्याला अपवाद फक्त आमचे घर होते. वाडीतल्या इतर बायका आल्या आल्या आपल्या मुलाचे दिवसभराचे प्रताप सांगून आपल्या नवर्‍याला हैराण करत. मग ती बाप-माणसं आपापल्या मुलांना धोपटीत तरी नाहीतर त्याचे बखोट पकडून ज्याने त्यांच्या मुलाला मारले असेल त्यांच्याकडे भांडायला तरी जात. असे सगळे गोंगाटमय वातावरण तेव्हा समस्त वाडीत असे. त्याउलट आमच्या घरी शुभंकरोती,परवचा वगैरे चालत. ह्या सगळ्याचे श्रेय आईकडे होते. कार्यालयातून दमून थकून आलेल्या आपल्या नवर्‍याला घरी आल्यावर तरी आराम मिळावा अशी शुद्ध भावना त्यामागे होती.घरातली कर्ती सवरती स्त्री खमकी असली की त्या घरातल्या पुरुषाला देखिल सुख मिळू शकते हा फार मोठा धडा माझ्या लहानपणीच आईकडून आम्हा सर्व भावंडांना मिळाला.

मी तिसर्‍या दिवशी शाळेत गेलो तेव्हा सर्व वर्ग-बंधुंनी माझी विचारपूस केली आणि सरांना भरपूर दूषणे दिली. पण आता माझा राग केव्हाच शांत झाला होता. त्या दिवशीही बेडेकर सरांचा तास होता. ते नेहेमीप्रमाणे वर्गात आले. त्यांनी शिकवलेही.मात्र त्यांचे शिकवण्यात लक्ष नव्हते. माझ्या दिशेला ते नजर देखिल टाकत नव्हते. कदाचित त्यांची चूक त्यांनाच कळली असावी असे वाटत होते(पण हा माझा भ्रम होता हे पुढे कित्येक वर्षांनी कळले).त्यानंतर विशेष असे काहीच घडले नाही.

हा प्रसंग घडून गेला.पुढे मी शालांत परीक्षा पास झालो.पुढचे शिक्षण घेऊन नोकरीला देखिल लागलो.असेच एकदा उपनगरी रेल्वेतून प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक गृहस्थ येऊन उभे राहिले. मी त्यावेळी पुस्तक वाचनात दंग होतो. दादर की काहीसे स्थानक आले आणि मी पुस्तकातून डोके बाहेर काढले आणि वर पाहिले तर समोर बेडेकर सर उभे होते. मी पटकन उठून त्यांना जागा दिली. त्यानंतर त्यांना माझी ओळख दिली कारण आता मी बराच उंच झालो होतो. दाढी-मिशाही उगवल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मला ओळखणे शक्यच नव्हते.बर्‍याच खाणखुणा पटवल्यानंतर त्यांनी मला ओळखले.

मग मी हळूच म्हणालो, "सर! आठवतं? तुम्ही मला एकदा बेदम मारले होते आणि तेही माझी काहीही चूक नसताना"!क्षणभर त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. मला वाटले. ते म्हणतील. " अरे हो! आठवलं! खरेच माझी चूक झाली! तुला मी निष्कारण मारले होते. मला खूप वाईट वाटले नंतर! असा कसा रे मी वागलो"?मग मी म्हणेन, " सर! जाऊ द्या हो! त्याचे काय एव्हढे! वगैरे वगैरे"!

पण कसलं काय नी कसलं काय! त्याही परिस्थितीत सर मला म्हणाले, "तू खूप व्रात्य होतास त्यावेळी आणि तो आवाजही तूच काढला होतास हे मला पक्के माहित होते.म्हणून मी तुला शिक्षा केली होती.मी कधीच चूक करत नाही. काय समजलास"?
मी पुढे काहीही बोललो नाही. उपयोग तरी काय होता म्हणा!इथे मला नेहमीच्या वापरातली एक म्हण थोडीशी बदलून सांगावीशी वाटते. ती म्हणजे "गाढवापुढे वाचली गीता आणि वाचणारा गाढव होता"!

आजही सर मला नियमितपणे दिसतात. वय झालं असलं तरी तब्येत राखून आहेत.स्वत:च्या नादातच रमत-गमत रस्त्यातून फिरत असतात. मीच त्यांच्यापुढे म्हातारा दिसतो. आता तर ते मला ओळखत देखिल नाहीत.तरी वाटते,पुढे व्हावे,नमस्कार करावा आणि आपली ओळख पटवावी.पण आता मात्र मी त्या भानगडीत पडत नाही.मला पाठमोरे होऊन गजगतीने दूर दूर जाणार्‍या सरांकडे मी नुसतेच पाहत बसतो.

मनातल्या नीरगाठी वरून ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी सोडवू शकेल असे आता वाटत नाही.

क्रमश:

१७ सप्टेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१०

स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवत असल्यामुळे मी बर्‍याच शिक्षकांचा लाडका होतो. अभ्यासात मध्यम असूनही हुशारपणाचा शिक्का माझ्यावर बसला होता.वर्गात माझे वागणे अगदी आदर्श मुलासारखे नसले तरी एक प्रामाणिक,सरळमार्गी मुलगा असा नावलौकीक होता. तसा मी वर्गबंधूंमध्येही प्रिय होतो. अजून काय हवे असते आपल्याला! तसा मी मस्ती करत असे,खोड्याही काढत असे;पण ते सर्व वर्गात शिक्षक नसताना. शिक्षक वर्गात शिकवताना मात्र मी ते काय शिकवताहेत ह्या कडे लक्ष देत असे. गणित हा माझा तसा नावडता विषय आणि त्यातही अंकगणित हे तर अत्यंत नावडते होते. पण इंग्लिश हा विषय माझ्या विशेष आवडीचा विषय होता.

पाचवीपासूनच आम्हाला इंग्रजी हा विषय होता. तो विषय शिकवणारे घैसास गुरुजी दिसायला अतिशय खडूस असे होते. त्यातून त्यांच्या लाल काड्यांच्या चश्म्यामुळे ते अजूनच रागीट दिसत. पण दिसते तसे नसते हेच खरे! हे गुरुजी इतके सुंदर शिकवत की आम्हा मुलांच्या इंग्रजीचा पाया एकदम भक्कम झाला. एरवी रागीट चर्या असणारे गुरुजी शिकवायला लागले की एक विलक्षण तेज त्यांच्या चेहर्‍यावर विलसत असे. ह्या जगाच्या पलीकडल्या जगात ते पोचत. त्यांच्या त्या भावमुद्रा टीपण्यात आणि त्यांचे ते ओजस्वी शब्द कानात साठवण्यात आम्ही सगळे इतके तल्लीन होत असू की तासिका संपल्याची घंटा देखिल कधी कधी ऐकू येत नसे;पण पुढच्या तासाचे शिक्षक येऊन आम्हा सगळ्यांना त्या भावमुद्रेतून जागे करत आणि नाईलाजाने आम्ही वर्तमानात प्रवेशत पुढच्या विषयाकडे वळत असू.

आमच्या सुदैवाने आम्हाला इंग्लिश ह्या विषयाला ८वी पर्यंत एकापेक्षा एक चांगले गुरुजी मिळत गेले आणि त्याचाच परिणाम म्हणजे आमचे इंग्लिशचे व्याकरण अगदी पक्के झाले. ६वीला ओगले नावाचे गुरुजी आम्हाला इंग्लिश शिकवायला आले. ५फुटाच्या आतबाहेर उंची,काळा वर्ण,डोक्यावरले केस अतिशय विरळ झालेले,लाल काड्यांचा चश्मा(त्या वेळी लाल काड्यांची फॅशन होती की काय न कळे) धोतर, सदरा आणि कोट असा त्यांचा वेष होता. दिसायला तसे अतिशय सामान्य असे हे गृहस्थ आम्हाला ज्या दिवशी पहिल्यांदाच वर्गात आले तेव्हा आमचे त्यांच्याबद्दलचे मत फारसे अनुकूल असे नव्हते. पण त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि आम्ही कधी त्यांच्या अधीन झालो हे देखिल आम्हाला कळले नाही इतके ते सुंदर शिकवत होते. शब्दांचे उच्चार कसे करायचे, कुठे आघात करायचा,कुठे हलकेच उच्चार करायचा हे ते प्रात्यक्षिकासहित दाखवत त्यामुळे आम्हाला हे गुरुजी अधिकच आवडू लागले. कविता शिकवताना तर त्यांची तंद्रीच लागायची. कवितेत कवीने ज्या भावना व्यक्त केलेल्या असत त्या आमच्यापर्यंत पोचवण्यात ते अतिशय कुशल होते. वेळ प्रसंगी उड्या मारून,माकडचेष्टा करत ते आम्हाला हसवत, करूण प्रसंगात ते आम्हाला रडवतही. कवितेतल्या भावविश्वात आम्हाला ते सहजपणे रममाण करत असत. हे शिकवणे इतके जीवंत होते की त्या तुलनेत मराठी विषय शिकवताना त्यातल्या कविता आमच्या पर्यंत पोचवण्यात मराठी विषयाचे शिक्षक कमी पडत. त्यामुळे इंग्लिश हा आमच्या सर्वांच्याच आवडीचा विषय झाला ह्यात नवल ते कसले.

७वीत बेडेकर सर नावाचे शिक्षक इंग्रजीसाठी आले. तेही तसे उंचीने सामान्यच होते.पण लख्ख गोरे आणि घारे डोळे हे त्यांचे वैशिष्ठ्य! खणखणीत आवाज(ह्या आधीच्या दोन्ही गुरुजींचाही आवाज असाच खणखणीत होता). अतिशय मिस्किल स्वभाव. विषयाला धरून शिकवणे होतेच पण त्याव्यतिरिक्त बाहेरचे देखिल शिकवीत. शिस्तीला कडक होते तितकेच मऊ देखिल होते;पण एक विक्षिप्तपणाची झांक त्यांच्या स्वभावात होती. कधी हसतील,कधी खूश होतील,कधी चिडतील सांगणे कठीण होते. त्यांच्या ह्या स्वभावाचा मला आलेला हा अनुभव पाहा.....

ह्या सरांना मुले 'बेडकी' असे चिडवत. तसे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येक शिक्षक-शिक्षिकेला नावे ठेवली जातच असत. तर त्या दिवशी सर अतिशय समरसून एक धडा शिकवत होते. वर्ग अगदी चित्रासारखा स्तब्ध होता. सरांच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक शब्दाचे जीवाचे कान करून श्रवण चालले होते. एक कठीण शब्द फळ्यावर लिहिण्यासाठी म्हणून सर वळले आणि कुठूनतरी दबक्या आवाजात "ए बेडकी"! अशी हाक आली. सरांपर्यंत ती हाक गेली आणि ते चमकून मागे वळले. त्यांचा गोरापान चेहरा लालबुंद झाला होता. "कुणी हाक मारली" असा करडा सवाल त्यांनी केला पण कुणीच काही बोलेना. सरांनी करडेपणाने वर्गावरून एक नजर फिरवली आणि ती नजर माझ्यावर येऊन स्थिर झाली. मी शहारलो पण मी तसे काही केले नसल्यामुळे खात्री होती की तो निव्वळ योगायोग होता.

मी पहिल्याच बाकावर बसत असे. हळूहळू सर माझ्यापर्यंत आले. मला आता मात्र भीती वाटू लागली आणि ती बहुधा माझ्या चेहऱ्यावर दिसली असावी. सरांनी मला उभे राहायला सांगितले आणि प्रश्न केला, "बोल! कोणी हाक मारली"?
"सर! मी नाही मारली! मला माहित नाही कुणी मारली ते"!
टिळकांबद्दलची भाषणे देऊन आणि त्यांच्या निर्भीडपणाबद्दल जनमानसात असलेल्या कौतुकाच्या भावनेचा त्यावेळी माझ्यात संचार झाला असावा! पण सरांवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. त्यांनी एक सणसणीत मुस्कटात ठेऊन दिली माझ्या आणि मी तिरिमिरी येऊन खाली पडलो. सरांनी माझे बखोट पकडून मला पुन्हा उभे केले आणि पुन्हा तोच प्रश्न केला, "आता तरी बोल! कोणी हाक मारली"! मी खरे तेच बोलत होतो पण सरांचा का कुणास ठाऊक माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी मला अजून दोनचार थपडा लगावल्या. हेची फल काय मम तपाला! असे बोलण्याची माझ्यावर पाळी आली होती. माझी इतक्या वर्षांची उजळ प्रतिमा एका क्षणात नष्ट झाली होती. सरांचा मार इतका जोरकस होता की मला रडू फूटणार होते पण मुलींच्या देखत रडणे म्हणजे नामर्दपणा ठरेल म्हणून मी कसे तरी स्वतःला रोखले होते. सुरुवातीला मुली गालातल्या गालात हसत होत्या(का कुणास ठाऊक) पण जेव्हा सरांनी मला पुन्हा पट्टीने मारायला सुरुवात केली आणि मला रडू रोखणे अशक्य झाले तेव्हा मी अगदी मनसोक्त (सूर लावून) रडू लागलो आणि मग मुलींनाही रडू आवरेना. सर बेभानपणे मला मारत होते. मीच ती हाक मारली होती असा त्यांचा आरोप होता आणि वर मी खोटेही बोलतोय हा अजून दुसरा आरोप होता. आणि माझ्या रडण्या-भेकण्याकडे संपूर्ण दूर्लक्ष करून मिळेल तिथे त्यांचे फटके मारणे चालू होते. त्यांच्या डोळ्यात खून उतरला होता. मी निपचित पडेपर्यंत त्यांनी मला मारले आणि थोडावेळ ते जाऊन स्वस्थपणे खूर्चीवर बसले.

मी जशी पुन्हा हालचाल करू लागलो तसे ते पुन्हा पट्टी घेऊन आले पण आता त्यांनी मला न मारता अंगठे धरून उभे केले आणि पाठीवर पट्टी ठेवली. ती पट्टी खाली पडली तर पुन्हा मार मिळेल असे दरडावून खूर्चीवर जाऊन बसले. ह्या सगळ्या तमाशात तासिका संपल्याची घंटा झाली आणि पुढच्या विषयाचे शिक्षक वर्गाबाहेर येऊन उभे राहिले. त्यांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि चटकन पुढे होत माझ्या पाठीवरची पट्टी उचलून मला नीट उभे केले. हे पाहताच बेडेकर सर पुन्हा भडकले आणि त्यांनी मला बखोटीला धरून वर्गाबाहेर काढले आणि मारत मारत मुख्याध्यापकांच्या दालनाकडे कूच केले.

मला काहीच कळत नव्हते. मी आज असे काय केले,सकाळी सकाळी कुणाचे तोंड पाहिले म्हणून ही इतकी भीषण शिक्षा मला मिळतेय.तसा बघायला गेले तर मी बेडेकर सरांचाही लाडका होतो. मग आज हे काय घडतंय? माझी ती 'वरात' बघणार्‍या बर्‍याच शिक्षकांनी वाटेत मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण सरांनी कुणालाच धूप घातली नाही. सर नुसते शिक्षक नव्हते तर पर्यवेक्षकही होते. त्यामुळे इतर शिक्षकांच्या मध्यस्थीचा काहीही उपयोग झाला नाही. मला पुन्हा मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर अंगठे धरून उभे केले आणि पाठीवर पट्टी आणि माझ्यावर देखरेख ठेवायला एका शिपायाला ठेऊन दुसऱ्या वर्गावर निघून गेले.

ह्या गोष्टीची खबर मुख्याध्यापकांकडे गेली. तेही त्यांच्या कक्षातून बाहेर आले आणि स्तिमितच झाले. माझ्यासारख्या सरळमार्गी मुलाला ही शिक्षा कुणी केली आणि का ह्या प्रश्नाचे उत्तर 'बेडेकर सरांनी' इतकेच मिळाले. का ते कोण सांगू शकणार? मुख्याध्यापकांनी शिपाया मार्फत सरांना ताबडतोब बोलावून घेतले आणि कारण विचारले. बेडेकर सरांनी माझ्या विरुद्धच्या आरोपाचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले ह्याला आज शाळा सुटेपर्यंत असाच उभा ठेवायचंय! मुख्याध्यापकांनी त्यांना समजावण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला पण सर आज कुणाचेच ऐकणार नव्हते आणि एका विद्यार्थ्यापायी मुख्याध्यापक त्यांच्याशी उगाचच संबंध बिघडवायला देखिल तयार नव्हते. त्यामुळे मला त्यादिवशी शाळा सुटेपर्यंत ती शिक्षा भोगणे क्रमप्राप्तच झाले.

शाळा सुटण्याची घंटा झाली. घरी परतणारी सगळी मुले माझ्याकडे बघत बघत, हसत-चिडवत,चुकचुकत निघूनही गेली. सगळा शिक्षकवर्गही एकएक करून चुकचुकत गेला. मी वाट पाहत होतो की कधी एकदाचे सर येताहेत आणि ह्यातून माझी सुटका करताहेत. पण कसले काय? मुख्याध्यापक जेव्हा घरी जायला त्यांच्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मला त्या स्थितीत पाहिले आणि धावत येऊन माझी सुटका त्यांनी केली आणि घरी जा असे सांगितले;पण मी सरांचा इतका धसका घेतला होता की त्यांनी घरी जा म्हटल्याशिवाय जाणार नाही असे म्हणालो. त्यावर सरांना बोलावण्यासाठी शिपाई गेला तेव्हा त्याला कळले की सर जाऊन अर्धा तास झालाय. मग माझी समजूत काढून मुख्याध्यापकांनी मला पाणी पाजले. हात-तोंड धूऊन यायला सांगितले. वर्गातून माझे दप्तर शिपायाकडून मागवून घेतले आणि मला बरोबर घेऊनच शाळेतून बाहेर पडले.

क्रमश:

मी एक पुलकित! १

पु. ल. देशपांडे हे नाव माहित नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही असे म्हणणे थोडे अतिशयोक्तीचे होईल; पण संगीत,साहित्य,नाटक,सिनेमा वगैरे गोष्टींची आवड असलेल्या मराठी माणसाला हे नाव नुसते माहितच आहे असे नव्हे तर ते त्याचे दैवत आहे असे म्हणणे मात्र कुणीही मान्य करेल. पु.ल.देशपांडे ह्यांना लोक विविध नावाने ओळखतात. पीएल,पीयल,पुलं,भाई,भाईकाका,वगैरे वगैरे नावाने ते ओळखले जातात. मी मात्र त्यांना पुलं ह्याच नावाने संबोधतो कारण त्यामुळे माझ्यासारख्या त्यांच्या पंख्यांना 'पुलकित' असे विशेषण लावता येते.

पुलं आणि माझी पहिली ओळख(साहित्यिक ओळख बरं का!) शालेय जीवनात झाली. अपूर्वाई ह्या त्यांच्या पश्चिमी देशांच्या प्रवासवर्णनापैकी एक प्रकरण आम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात धडा म्हणून होता. त्यात इंग्लंडच्या पोलिसाचे 'बॉबी' चे वर्णन आलंय जे मला स्वतःला खूपच भावले होते. त्याचे ते तोंडातल्या तोंडात "गुम्माँग" असे पुटपुटणे,तरंगत चालणे वगैरे वर्णन मला खूपच आवडले होते. आपल्या साजूक तुपातल्या इंग्रजीचा अभिमान तिथे कसा कुचकामी ठरतो हे देखिल पुलंनी अतिशय प्रांजळपणे नोंदवलाय. ट्युब रेल्वेवरील एका स्टेशनचे तिकिट मागताना तिकिट क्लार्क आणि पुलं ह्यांच्यातला संवाद बरेच काही सांगून जातो. इथेच मी पुलंच्या प्रेमात पडलो.

मी शाळेत असताना पुलंचे नाव वृत्तपत्रात येत असे ते त्यांच्या एकपात्री प्रयोगांबद्दल. त्यावेळी ते प्रयोग धो धो चालत असे ऐकल्याचे आठवतेय. मात्र मला ते प्रयोग पाहण्याचे भाग्य लाभले नाही. कारण पुलंच्या लौकीकाबरोबरच त्यावेळी पुलंचा एका विशिष्ट गोष्टीबद्दल दुर्लौकीक होता. तो म्हणजे त्यांच्या प्रयोगाला लहान मुलांना प्रवेश नसायचा. त्याबाबतचे त्यांचे कारण आज पटण्यायोग्य असले तरी त्या काळात जेव्हां एकेका घरात किमान अर्धा डझन मुले असत(आम्ही भावंडे चौघेच होतो) अशा आई-बापांना पुलंचे प्रयोग कधीच पाहता आले नाहीत अथवा आम्हा मुलांना दाखवता आले नाहीत. माझ्या आईचा ह्या बाबतीत पुलंवर आरोपच होता. ती त्यांना 'शिष्ट' म्हणायची. वृत्तपत्रात त्यांच्या प्रयोगाबद्दल भरभरून लिहून येत असे मात्र तरीही त्यांचे प्रयोग आपल्याला पाहता येत नाहीत, तेही त्यांच्या ह्या विचित्र अटीमुळे ह्या गोष्टीचे तिला खूप वाईट वाटे आणि त्याचा राग ती त्यांना 'शिष्ट' म्हणून व्यक्त करत असे.मात्र तरीही त्यांच्या साहित्यिक,सांगितिक,नाट्यीय गुणांबद्दल आई-वडिलांना प्रचंड कुतूहल मिश्रित कौतुक वाटायचे. दैनिक मराठ्यामध्ये आलेली छायचित्रे( स्वतः आचार्य अत्रे पहिल्या रांगेत बसून मनसोक्त हसून दाद देत आहेत) , त्यातील पुलंच्या एकेक लकबी वगैरेंचे सचित्र वर्णन आणि त्यांच्यावर आचार्यांनी लिहिलेला अग्रलेख हे सगळे वाचून आणि पाहून जीव तीळ तीळ तुटत असे. एका कोटीभास्कराने दुसर्‍या कोटीभास्कराला दिलेली ती मनमोकळी दाद पाहून आपले जीवन कृतकृत्य झाल्यासारखे वाटायचे. तरीही प्रत्यक्ष दर्शन घडणे नशिबात नव्हते.

मी मोठा होईपर्यंत पुलंचे हे प्रयोग बंद होत गेले आणि एका मोठ्या आनंदाला मुकल्याचे दूर्भाग्य माझ्या नशिबी आले. पण दूधाची तहान ताकावर का होईना भागावी तद्वत त्यांच्या ध्वनिफिती बाजारात आल्या आणि मग त्या ऐकूनच समाधान मानावे लागले. मी पुलंची पहिली ध्वनीफीत ऐकली ती 'म्हैस' ह्या कथेची. ती कथा त्यांच्याच तोंडून ऐकताना मला पुन्हा एकदा साक्षात्कार झाला की आपण किती मोठ्या आनंदाला मुकलोय ते. ती गोष्ट ऐकताना झालेला आनंद हा त्यांच्याच भाषेत सांगायचा तर अगदी 'उन्मनीय' अवस्थेत पोचवणारा होता.त्याच्या पाठोपाठ मग पानवाला,हरितात्या,अंतू बर्वा,रावसाहेब असे एकेक येत गेले आणि मी शब्दशः 'पुलकित ' झालो. ह्या ध्वनीफितींची आजवर किती पारायणे केली असतील ह्याची गणती नाही. तरीही कंटाळा येत नाही. प्रत्येक वेळी त्यात नवीन काहीतरी सापडते आणि वैशिष्ट्य म्हणजे वेळोवेळी त्यांच्या त्यातील वाक्यांची अनुभूती प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारात घेता येते.

क्रमशः