माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जानेवारी, २००८

छप्पन पावसाळे!

पाहिले छप्पन पावसाळे
भोगिले तितुकेच हिवाळे
सोशिले पहा मी उन्हाळे
तरिही म्या काही नाकळे

मित्रहो आज २८ जानेवारी २००८ म्हणजे लौकिकार्थाने माझा वाढदिवस!वयाची ५६ वर्षे पूर्ण करून सत्तावनाव्या वर्षात पदार्पण करत आहे. कालपासून इथल्या महाजालावरच्या माझ्या समस्त पुतणे-पुतण्या आणि मित्र मंडळींनी जाहीरपणे आणि खाजगीमध्ये माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव चालवून मला गुदमरवून टाकलेले आहे. हे पाहून खचितच आनंद झालाय; माझ्यासारख्या एका सामान्य माणसाबद्दल आपण हे जे प्रेम व्यक्त करता आहात ते पाहून मला मी कुणीतरी ’मोठ्ठा माणूस’ झाल्यासारखे वाटायला लागलंय. त्याबद्दल त्यांचे उपचार म्हणून आभार न मानता त्या सदिच्छा मी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडेच जपून ठेवतोय. तरीही माझ्या मूळ चिकित्सक(शुद्ध मराठीत खुसपटं काढणे ) स्वभावाप्रमाणे मनात काही विचार आले ते तुमच्या समोर मांडतोय.(ह्यात कुणाच्याही भावनांचा उपमर्द करण्याची भावना नाहीये हे कृपया लक्षात घ्यावे ही नम्र विनंती).

तारखेप्रमाणे(अथवा तिथीप्रमाणे) दर वर्षी आपला प्रत्येकाचा एक जन्मदिवस असतो. अशा वेळी शुभेच्छा देण्याचा रिवाज आहे(हा प्रथम कधी सुरु झाला हा एक संशोधनाचा विषय आहे).पण हल्ली त्याचे प्रस्थ खूपच वाढलेय हे नक्की.
मित्रमंडळी आप्तेष्ट असे सगळे जमून त्या दिवसाच्या ’उत्सवमूर्तीला’ आशीर्वाद-शुभेच्छा वगैरे दिल्या जातात. महनीय व्यक्ती, राजकारणी, नेते,बडे कलाकार वगैरेंसारख्या मोठ्य़ा लोकांच्या जन्मदिवसाला ’जयंती’ असे भारदस्त नामाभिधान आहे तर सर्वसामान्य लोक त्यालाच जन्मदिवस,वाढदिवस(माझ्यासारखे काही वात्रट ’काढदिवस’), बर्थडे(हल्लीच्या भाषेत म्हणायचे झाले तर ’हॅप्पी बर्डे) वगैरे म्हणतात.

माझ्या लहानपणी अशा उत्सवमूर्तीला कपाळाला गंधाक्षता लावून तबकात पेटते निरांजन ठेऊन त्याने ओवाळले जाई, सुपारी,अंगठी त्याच्याभोवती आलटून पालटून फिरवून त्याची जणू दृष्ट काढली जाई, डोक्यावर कापूस ठेऊन ’म्हातारा/म्हातारी हो’म्हणजे ’औक्षवंत हो’ असा आशीर्वाद देऊन हातावर काहीतरी गोड ठेवले जाई. काहीतरी भेटवस्तू दिली जायची. घरात पुरणा-वरणाचा स्वयंपाक व्हायचा. त्या दिवशी(निदान) त्या उत्सवमूर्तीला ओरडायचे नाही असा अलिखित नियम असायचा. मग काय त्याला मस्ती करायला रान मोकळे असायचे.
आता जरा प्रथा बदललेली दिसतेय. आजूबाजूच्या मित्र मंडळींना बोलावून त्या दिवशी ’केक’ कापतात आणि एका सुरात ’हॅप्पी बर्थडे(बरडे!) असे गाऊन त्यांच्यातर्फे आशीर्वाद दिले जातात. ’मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे’ अशा शुभेच्छा दिल्या जातात.भेटी दिल्या जातात.

मोठ्या म्हणजेच महनीय व्यक्तींच्या जन्मदिवशी म्हणजे जयंतीच्या दिवशी त्यांच्या कार्याचा गौरवोल्लेख करून त्यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या जातात; त्यांच्या नावाने गरिबांना भेटवस्तू वाटल्या जातात; काही ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मिरवणुका काढल्या जातात वगैरे. एकूण हा सगळा कार्यक्रम जाहीर स्वरुपाचा असतो.
हयात नसलेल्या अशा आदरणीय व्यक्तींची जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने त्यांच्या विशिष्ट कार्याचा परिचय नवोदितांना करून देतात. त्यापासून तरूणांनी प्रेरणा घ्यावी असा त्या मागचा उद्देश असतो.
असो. हे सगळे आपल्याला माहितच असेल. तेव्हा त्याबद्दल इतकेच पूरे. आता मला काय वाटतंय त्याबद्दल थोडेसे (पुराण लावतो).

वाढदिवस! खरंच का हो? की काढदिवस? नक्की काय म्हणायचे ह्याला?
तसे पाहायला गेले तर रोज आयुष्यातला एकेक दिवस कमी होत जात असतो. मग गेलेल्या दिवसांबद्दल हळहळ व्यक्त करायची की आपण अनुभवाने वाढलो(खरेच का?हा एक गंभीर प्रश्नच आहे) असे मानून आनंद मानायचा? ह्या जगात येऊन आपण नेमके काय केले? किती समाजोपयोगी काम केले? की निव्वळ खायला काळ आणि धरणीला भार असे आयुष्य घालवले?
गदिमांनी एका गाण्यात म्हटलंय, "उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला" असेच तर आजपर्यंतचे आयुष्य आपण जगत आलोय असे नाही वाटत काय? मी आणि माझे कुटुंब ह्यापलीकडे फार फार तर माझे आप्तेष्ठ-मित्रमंडळी असे धरून इतर कितीशा लोकांचा विचार केलाय? जन्मभर कुपमंडूक वृत्तीने जगण्यातच धन्यता मानली आणि आलेला दिवस अक्षरश: ’उपभोगला’ असे म्हटले तर खोटे कसे म्हणावे?
आता ह्यावर कुणी म्हणेल "ग्लास पाण्याने अर्धा रिकामा आहे" असे म्हणण्या ऐवजी "अर्धा भरलेला आहे" असे म्हणावे. म्हटले तर दोन्हीही गोष्टी बरोबर आहेत. पण त्यातला आपला स्वत:च्या आयुष्याबद्दलचा नेमका अर्थ काय आहे हे देखिल आपल्याला कळायला नकोय का?
काही लोक म्हणतात की नेहमी आशावादी असावे. पण आशा आणि निराशा ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरून कसे चालेल?
केशवसुतांनी एके ठिकाणी असे म्हटलंय, "जुने जाऊ द्या मरणालागूनी" मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? आजवर जे काही केले/झाले ते विसरून जाऊन येणार्‍या उद्या साठी नवा संकल्प करा असा घ्यायचा? की आपण आता जुने झालो तेव्हा आता ’मरणाची’ वाट पाहायची.

इथे मीच कधी काळी रचलेल्या दोनओळी उद्घृत करतो:
रडता येत नाही म्हणून हसत आहे।
मरता येत नाही म्हणून जगत आहे॥


माझ्या नक्की काय भावना आहेत ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे(तसा क्षीण प्रयत्न केला आहे) पण खरंच आपण सगळे ’वाढदिवस’ का साजरे करतो बरे?कुणी सांगेल काय?

२६ जानेवारी, २००८

आर्थिक बात-चीत!

दोन गृहस्थांमधला हा संवाद आहे.(फार गंभीरपणे घेऊ नका बरं का! जरा गंमत म्हणूनच ऐका.) शेयरबाजाराबद्दल बोलताहेत. ऐकू या काय म्हणताहेत ते. एक आहे सखाराम साने(ससा); ह्यांनी बरेच चढ-उतार पाहिलेत आणि दुसरा आहे माधव साठे(मासा); नुकताच ह्या क्षेत्रात शिरलाय.

ससा: सुप्रभात.
मासा: सुप्रभात.आज कितीने खाली जाईल आणि वर येईल? की वरच जाईल?
ससा: कुणास ठाऊक? ते सांगणे तसे कठीण आहे.

मासा: तुम्ही असे बरेच चढ-उतार पाहिले असतील ना?
ससा: होय. आज बरीच वर्षे बाजारात आहे. तेव्हा चढ-उतार हे बरेच पाहिलेत.
मासा: एल अँड टी, भेल हे खूप खाली आलेत. घेण्याची हीच वेळ आहे की अजून खाली येतील? सुझलॉन इतका कसा खाली आला?
ससा: होय. एल ऍंड टी, भेल ह्या भावात घेण्यासारखे आहेत. सुझलॉनचा १० रूचा शेयर २रु.च्या पाच शेयरमध्ये विभागला गेलाय.म्हणून तो खाली आल्यासारखा वाटतोय.

मासा: बघा कसे सगळे घडवून आणल्यासारखे वाटते की नाही?
नेमका सुझलॉन आणि जिंदल काल स्प्लिट होतो आणि बाजार इतका कोसळतो. हेज-फंड्स वाले मुद्दाम करत आहेत की काय? की आपल्या जवळचे विकून टाकून मग पुन्हा खाली गेले की स्वतःच पुन्हा घ्यायचे असे करत असतील?
ससा: त्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांच्याकडे एकाच कंपनीचे एकगठ्ठा शेयर्स असतात आणि त्यांनी ते तसे एकदम विकले तर बाजार खाली येऊ शकतो हे नक्की. पण ह्यात चुकीचे असे काहीच नाही. शेवटी कधी खरेदी करायचे आणि विकायचे ह्याचा निर्णय प्रत्येकाने घेताना स्वत:चे हित बघायचे असते.त्याला हेज-फंड देखिल कसे अपवाद असतील?
मासा: हं! फार्मा कोणता चांगला आहे? रॅनबॅक्सी, डॉ. रेड्डी, अपोलो की ग्लॅक्सो?
ससा: खरे तर बरेच दिवसात तिथे लक्षच दिले नाही मी. पण हे सगळेच शेयर्स तसे चांगलेच आहेत. पण माझ्या मते सद्या रिलायन्स घ्यायला हरकत नाही.तो पुन्हा फार लवकर वर जाईल.
मासा: तुम्ही रिलायन्स म्हणजे रिलायन्स कॅपिटल म्हणताहात काय?

ससा: नाही. रिलायन्स इडस्ट्रीज.
मासा: अच्छा! बरं मला सांगा की टाटाची कोअर कंपनी कुठली? टाटा सन्स ना? म्हणजे टाटाचा मेन शेयर कुठला? की टाटा सन्स प्रायव्हेट आहे?
ससा: टाटा सन्स हीच मुख्य कंपनी असली तरी तिचे शेयर्स बाजारात नाहीत. सद्या टाटाच्या टीसीएस,टाटा मोटर्स आणि टाटा स्टील ह्या प्रमुख कंपन्या आहेत. टाटाच्या अजूनही बर्‍याच कंपन्या आहेत.
मासा: अच्छा! वाटलेच. मी विचारायचे कारण की रिलायन्स,टाटा, बिर्ला आणि टॉपच्या फार्मा कंपन्या असे चार कोअर घ्यावे असे मनात आहे. तर मग नक्की कुठले घ्यायचे ते विचारावे म्हणतो.रिलायन्सचा मुख्य शेयर... रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटाचा मुख्य शेयर तुम्ही वर म्हणालात त्या तीन कंपन्या. ह्या चार मुख्य कंपन्या अशाकरता की बी लावून विसरून जायचे; पुढच्या पिढीसाठी त्याचा वृक्ष होईल अशी अपेक्षा.
बरे ह्याच बरोबर मुख्य टेलेकॉमच्या कंपन्यांचे पण शेयर्स पाहिजेत कारण मोबाईलला मरण नाही.

ससा: सद्या भारती एयरटेल, टाटा टेलेसर्व्हिसेस्(महाराष्ट्र) ह्या मोबाईल कंपन्या घ्यायला हरकत नाही. तसेच ए ग्रुप मधल्या एबीबी, महिन्द्र आणि महिन्द्र, स्टेट बँक, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर ह्या कंपन्याही घ्यायला हव्यात.
मासा : महिन्द्र आणि महिन्द्र चा शेतीशी संबंध आहे काय?
ससा:होय. महिन्द्र ट्रॅक्ट्रर साठी प्रसिद्ध आहे.
मासा: कुठल्या कंपन्या ह्यात मुख्य आहेत? किंवा कोणत्या कंपन्यांना शेतीसंबंधातून जास्त फायदा आहे?
ससा: तसे लगेच सांगता येणार नाही.कारण खरे सांगायचे तर मी असा कधी अभ्यास केलाच नाही. पण ढोबळमानाने सांगायचे तर वर सांगितलेल्या महिंद्र आणि महिन्द्र,आयटीसी,हिंदुस्थान युनिलिव्हर, तसेच टाटा टी वगैरे कंपन्या चांगल्या आहेत.
मासा: अच्छा. पण माझी विचारसरणी योग्य आहे ना;म्हणजे सगळ्या क्षेत्रातील आघाडीवर असणार्‍या कंपन्या निवडण्याची?

ससा: तुमची विचारसरणी चुकीची मुळीच नाही.उलट चांगली आहे.विचारपूर्वक निर्णय घेणे केव्हाही चांगले. मी स्वत: जरी तसे काही करत नसलो तरी पण तुम्ही करता आहात तोच खरा योग्य मार्ग आहे.
पण एक लक्षात असू द्या नुसते टॉप घेऊन चालत नाही. कारण त्यांची वाढ कुंठीत होऊ शकते म्हणजे त्यांना आता वाढीस विशेष जागाच उरलेली नसू शकते. तेव्हा नवे आणि भविष्यात वाढ होईल असे क्षेत्रही निवडायचे असते.
मासा: हो.खरे आहे. म्हणून मी काही अगदी मुलभूत क्षेत्रातील आणि नव्यानेच स्थापन झालेल्या परंतु लवकर गाशा गुंडाळणार नाहीत अशा कंपन्यांपासून सुरुवात करावी असे म्हणतोय.
ससा: अगदी योग्य निर्णय आहे.

मासा
: तुमच्या मते गुंतवणुक किती आणि कशी करावी?
ससा: म्हणजे? कळले नाही. नेमके काय हवे आहे?
मासा: म्हणजे बघा की तुमच्याकडे १००रू. आहेत तर ते कशा प्रमाणात गुंतवावे? उदा. घर-जागा खरेदी,सोने.शेयर्स,मुदतठेवी वगैरे. सगळेच कोणत्याही एका गोष्टीत टाकून चालणार नाही ना?
ससा: बरोबर. माझ्या मते २५% शेयर्समध्ये आणि बाकी ७५% इतर गोष्टीत वाटायचे. ते आपापल्या जरूरीप्रमाणे.
मासा: कमीत कमी धोका आणि जास्तीत जास्त वृद्धी असेल ह्या हिशोबाने त्यांचे प्रमाण निश्चित कसे करता येईल?
ससा: त्यासाठी आपल्याला रोजच्या जगण्यासाठी किती % लागतात हे पाहिले पाहिजे. आपली मिळकत किती आणि रोजचा खर्च किती. बचत होते का? होत असल्यास किती?
जर बचत होत असेल तर बचतीच्या २५% शेयर्समध्ये,५०टक्के एफडी,सोने वगैरे आणि २५ टक्के बचत खात्यात. अर्थात हे निकष अंतिम नाहीत. प्रत्येकाची वैयक्तिक गरज आणि प्राधान्य बघून त्यात हवा तसा योग्य बदल करता येईल. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणेही त्यात बदल करता येतील. नुकसान सोसण्याची आर्थिक आणि मानसिक कुवत असणार्‍या आणि नसणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळे पर्याय योजता येतील.
.

१९ जानेवारी, २००८

फु बाई फू!

बालपणी इच्छा असूनही आणि शिक्षण देण्याची बाची परिस्थिती असतानाही फक्त बाला जडलेल्या दारूच्या व्यसनापायी शिक्षण घेता आलं नाही. अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं. तिथूनच सुरू झालेली जीवनाची ओढाताण शेवटपर्यंत टिकली. तरीही आयुष्यात आपण काहीतरी करायचंच, कोणीतरी मोठ्ठं बनायचं ही जिद्द ठेवली. त्यासाठी झटत राहिलो. दारूपायी घराची झालेली परवड बघितल्यामुळे आयुष्यभर दारूला शिवलो नाही.
अनेकांनी हिडीसफिडीस केले, पण परत परत खेटे मारत राहिलो. त्यात काही चांगली माणसे भेटली. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि माझ्यातली शाहिरी कला बहरली. कलेच्या आवडीमुळे कधी कधी गाण्याच्या कार्यक्रमात जास्त पैसे मिळत असतानाही फक्त २० रुपयांसाठी नाटकात कामं केली. घरी उपासतापास करावे लागले. बोटावर मोजण्याइतके कलाकार सुखवस्तू जीवन जगले, बाकीचे कलाकार खडतर जीवनाशी झुंजतच राहिले. खडतर जीवन जगत रहाणार्‍या कलाकारांपैकी मीही एक...........

मित्रहो हे मनोगत आहे सुप्रसिद्ध लोकशाहीर श्री विठ्ठल उमप ह्यांचे. "जांभूळ आख्यान" मुळे संपूर्ण महाराष्टाला परिचित असलेले शाहीर विठ्ठल उमप ह्यांचे "फु बाई फू " हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. छोट्या छोट्या किश्शांच्या स्वरूपात लिहिलेले हे आत्मचरित्र आपल्याला शाहीरांच्या समग्र जीवनाचे दर्शन घडवते. गरिबी, अपमान, कौतुक,मानसन्मान वगैरे गोष्टींनी भरलेले प्रसंग वाचतांना शाहीरांच्या मोठेपणाची आणि त्याचवेळी अंगी असलेल्या विनम्रपणाची साक्ष पटते. लहान-थोर साहित्यिक, संगीतकार,गायक, नाट्य-चित्रपट कलावंत, राजकारणी, समाजकारणी, मंत्री वगैरे मोठ्या लोकांकडून भरपूर कौतुक होऊनही ह्या माणसाचे पाय जमिनीवरच आहेत.

लोकगीत गायक म्हणून ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेतच. त्यांच्या काही मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहेत पण त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातील " फु बाई फू फुगडी फू, ये दादा आवार ये,बाजीराव नाना तुमडीभर देना,माझी मैना गावाकडे राहिली, हे खरंच आहे खरं श्री भीमराव आंबेडकर, फाटकी नोट मना घेवाची नाय, प्रथम नमू गौतमा चला हो प्रथम नमू गौतमा " ही गाणी विशेषत्वाने सांगता येतील.

लोककला सादर करून आपल्या सारख्या रसिकांना रिझवणार्‍या एका सच्चा कलाकाराचे वास्तवातले जीवन किती हलाखीचे असते हे कळण्यासाठी तरी प्रत्येकाने हे चरित्र वाचलेच पाहिजे.

ह्या छोटेखानी आत्मचरित्राला सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंत श्री निळू फुले ह्यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
प्रकाशक आहेत : शिवा घुगे, प्रभात प्रकाशन, वरळी, मुंबई
किंमतः १००रुपये.

थोडक्यात जांभूळ आख्यान शाहीरांच्याच शब्दात

एकदा कर्ण द्रौपदीच्या रंगमहाली आला. त्याला पाहून द्रौपदी मोहीत झाली. तिच्या मनी पाप आलं. द्रौपदीने कर्णाला भोजनासाठी बोलावलं. हे द्रौपदीचे वागणं कृष्णदेवानं अंतरमनानं ओळखलं. द्रौपदीचे हे पाप उघड करण्यासाठी कृष्ण द्रौपदीसह पांडवांना घेऊन वनभोजनाकरिता जांभूळ वनात जातो. भोजन झाल्यावर कृष्णाला फळं खायची इच्छा होते. कृष्ण फळं आणण्यासाठी भीमाला जांभूळ वनात पाठवतो, पण त्या जांभूळ वनातल्या सर्व झाडांची फळं कृष्णदेव आपल्या मायावी शक्तिनं गडप करतो आणि एकाच झाडाला एकच जांभूळ ठेवतो. भीम जांभूळ वनात गेल्यावर त्याच्या दृष्टीला एका झाडाला एकच जांभूळ दिसतं. भीम ते जांभूळ तोडून आणतो. मोठ्या आनंदानं कृष्णाला सांगतो, "देवा वनात हे एकच जांभूळ होतं तेच तोडून आणलं."
कृष्ण भीमाला म्हणतो, " अरे भीमा हे तू काय केलंस? अरे! या जांभूळ वनात एक महान ऋषी तपाला बसलाय. तो रोज सकाळी हे जांभूळ खाऊन दिवस काढतो. भीमा आता तो महाकोपिष्ट ऋषी येईल, त्याला जांभूळ तोडल्याचे कळेलच. तो आपल्या सर्वांना शाप देईल. आपण सगळे मरून जाऊ."
"देवा-देवा! आता याला काही उपाय सांगा" अशी प्रत्येक जण कृष्णाची विनवणी करतो. द्रौपदीही विनवणी करते.
"आपण हे जांभूळ जसं तोडलं तसंच ते त्या झाडाला लावून द्यावं" असे कृष्णदेव सगळ्यांना सांगतो.
मग धर्म,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव हे सर्वजण जांभूळ झाडाला लावण्याचा प्रयत्न करतात, पण काही केल्या ते जांभूळ झाडाच्या देठी लागत नाही. शेवटी कृष्ण द्रौपदीला म्हणतो, " द्रौपदी, हे पाच पांडव तुझे भ्रतार. तुझ्या सत्वाच्या पुण्याईनं हे फळ लाव देठी."
तिच्या हातूनही ते जांभूळ देठी लागत नाही. द्रौपदी खिन्न मनानं लज्जीत होऊन उभी रहाते.
द्रौपदी म्हणते, " भगवंत असं का अघटीत झालं? माझ्या मनी तर कसलंबी पाप आलं नाही. माझं पाच भ्रतार हे पाच पांडव सोडून इतर समदे पुरूष मला पित्याप्रमाणे आहेत."
कृष्ण म्हणतो, " पण मनी खळबळ झालीच ना?"
द्रौपदी म्हणते, " काय सांगू देवा, रूप त्याचं आनंदाहून इशेस दिसं, लागला नजरेचा बाण त्याचा, काळजाला लागलं पिसं. पाच पुरूषोत्तम भ्रतार पांडव माझं सहावा असता कर्ण, सहा वार झाले असते पूर्ण. सहाव्या वारी भोग घेतला असता त्याच्या प्रितीचा."

झाडाची उडविली फळं,केली देवगत
एका झाडाला एक फळ लईच निर्मळ
देठी गाभुळलं
कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं

हे जांभूळ आख्यान मधील मी गायलेलं गाणं रसिकांच्या मनात घर करून राहिलं.

१८ जानेवारी, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ३

माझी मोठी बहीण माझ्या पेक्षा माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. मला पुरती समज येईपर्यंत मी तिचे शेपूट म्हणून नेहमी तिच्या मागे-मागे असायचो. ती ही मला तिच्या बरोबर खेळायला घेऊन जायची. तिला लहान व्हायला लागलेले फ्रॉक मी एकदोनदा घालून गेल्याचेही मला अजून आठवतेय. मला कपडे घालणे, पावडर लावणे वगैरे माझा नट्टापट्टाही ती मोठ्या आवडीने करायची. त्यावेळी खेळले जाणारे मुलींचे खेळ म्हणजे सागरगोटे, काचा-पाणी, दोरीवरच्या उड्या, मातीत घरं आखून आणि लंगडी घालून खेळला जाणारा खेळ(नाव आठवत नाही पण त्यात दोन्ही पाय टेकवण्यासाठी एक मामाचे घर असायचे), लंगडी, खेचाखेची, पकडापकडी,डबा ऐसपैस, मागे रुमाल लपवणे वगैरे वगैरे अजून बरेच खेळ असत.

त्यात अजून भर म्हणजे मंगळागौरीला आणि हादग्यात खेळले जाणारे फुगडी, बसफुगडी, रिंगण, खुर्ची का मिर्ची, कोंबडा, पकवा, ऐलमा-पैलमा वगैरे बरेच खेळ होते. आता तितकेसे नीट आठवतही नाही.ह्या सगळ्यामुळे नाही म्हटले तरी मी थोडा बायल्या झालो होतो. हळूहळू मी देखिल हे खेळायला लागलो. त्यात प्रावीण्य मिळवायला लागलो. माझ्या बरोबर हे खेळणार्‍या सगळ्या मुलीच असत. ह्या खेळाच्या अनुषंगाने येणारे शब्द आणि गाणी मला मुखोद्गत होऊ लागली.

त्यातले एक गाणे थोडेसे आठवतेय ते खेचाखेची करण्यासाठी दोन संघ बनवण्यासाठी गायले जाणारे गाणे.....आधी त्यातल्या त्यात मोठ्या असणार्‍या मुली एकमेकींचे हात असे उंच पकडून त्याची कमान करून उभ्या राहत आणि बाकीच्या इतरांनी त्या कमानी खालून जात राहायचे. मग त्या दोघीजणी ते गाणं म्हणत....

संत्रं लिंबू पैशा पैशाला
शाळेतल्या मुली आल्या शिकायला....असेच काहीसे होते. आता नीटसे आठवत नाहीये.पुढे......
खाऊन खाऊन खोकला झाला
पीं पीं पिठलं.......असे म्हणून झटकन दोन्ही हात खाली करून त्यावेळी कुणाला तरी त्यात पकडले जायचे. मग तिला काही सांकेतिक शब्द विचारले जाऊन त्यातला एक शब्द निवडायला सांगितला जाई. उदा. दोन फुलांची नावे... गुलाब आणि मोगरा. खरे तर ही दोन संघांची नावे असत पण आधी उघडपणे सांगितली जात नसत त्यामुळे आयत्या वेळी जो शब्द निवडला जायचा त्या संघात तिला जावे लागे. असे पुन:पुन्हा करून दोन संघ तयार होत आणि त्यांच्यात मग खेचाखेची व्हायची. त्यात मी ज्या संघात असायचो तोच संघ सहसा जिंकत असे कारण शेवटी काही झाले तरी माझ्यात निदान त्या मुलींपेक्षा जास्त शक्ती असायची. अर्थात मी बहुदा माझ्या बहिणीच्या संघातच असायचो. ते कसे ते एक गुपित आहे. ती मला नेत्रपल्लवीने सांगत असे हे गुपित मात्र मी तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये.

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा......एकमेकींचे हात धरून आणि रिंगण करून म्हटले जाणारे असे बरेच काहीसे लांबलचक गाणे होते. त्यावेळी माझेही ते पाठ होते पण आता अधले मधले थोडे फार आठवते. पण सलगपणे असे काही आठवत नाही.

माझी बहीण रांगोळ्या पण खूपच छान काढायची. दिवाळीत तिला प्रचंड मागणी असे. आमची वाडी खूप मोठी होती आणि प्रत्येकाच्या घरापुढे प्रशस्त जागा असायची. मग तिथे झाडून, स्वच्छ सारवून वगैरे त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढली जायची. दिवाळीचे वेध लागले की मग प्रथम रांगोळीची पुस्तके शोधली जात; नंतर ठिपके पाडण्यासाठी भोके पाडलेले कागद बनवले जात. ८-१० ठिपक्यांपासून ४०-५० ठिपक्यांपर्यंत असे कागद आखून आणि उदबत्तीने त्यात भोके पाडून हे कागद तयार करावे लागत. बहिणीचे बघून बघून पुढे पुढे मी देखिल तिला ह्यात मदत करायला लागलो.रांगोळी काढण्यात माझा हात विशेष चालत नसायचा पण माझी बहीण खूपच झटपट आणि तरीही उत्कृष्ट रांगोळी काढत असे. जवळ जवळ १०-१५ घरांपुढे ती रांगोळ्या काढायची. मी रंग भरताना तिला मदत करत असे. रंगसंगती तीच ठरवत असे. तिच्या त्या रंगसंगतीवर सगळेच खूश असत. कधी कधी तिच्याकडून मी एखाद्या घरची छोटी रांगोळी स्वतंत्रपणे रंगवायला घ्यायचो आणि माझ्या मनाप्रमाणे रंग भरायचो. माझी रंगांची आवडही जरा 'हटके'च होती. त्यामुळे तशी रंगसंगती पाहिली की सगळेजण फिदीफिदी हसत असत. मग माझी बहीण येऊन त्यात काही जुजबी सुधारणा करायची आणि तीच रंगसंगती एकदम मस्त दिसायला लागायची. ती नजर मला कधीच आली नाही. आजपर्यंत मला आयुष्यात कधीच न जमलेले हे एक काम आहे.

तसे बघायला गेले तर मी मुलांचेही खेळ खेळत होतो. गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे,खो-खो, लंगडी, पकडापकडी आणि असे अनेक खेळही खेळत असायचो पण जास्त करून बायकी खेळच खेळायचो आणि मुलींच्यातच असायचो. जिथे सहज जिंकता येते तिथेच जास्त रमायचो. मुलगा आणि मुलगी ह्यांच्या केश आणि वेष ह्यामध्ये असलेला दृश्य फरक सोडला तर इतर काही फरक असतो हे मला अजिबात माहीत नव्हते. आज ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण ही त्यावेळची वस्तुस्थिती होती. ह्यामुळेच माझ्या संपूर्ण आयुष्यावर कायमचा परिणाम घडवणारी एक घटना माझ्या भाबडेपणामुळे त्यावेळी घडली त्याबद्दल पुढील वेळी.

६ जानेवारी, २००८

माझंही एक स्वप्न होतं....

"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो. मला मुख्यत्वेकरून फिजिक्स आणि मेटलर्जी या विषयात रस होता. परंतु दुग्धव्यवसाय अभियांत्रिकीमध्ये पुढचं शिक्षण घ्यावं लागलं. तो एकापरीनं जुलमाचा रामराम होता. त्यानंतर आणंद इथल्या सरकारी 'लोणी संशोधन प्रक्रिया संस्थे' मध्ये कराराचा भाग म्हणून मला जबरदस्तीनं नोकरी करावी लागली आणि त्यानंतर जेव्हा मी दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेत दाखल झालो, तेव्हा या क्षेत्राबाबत माझं काही फारसं प्रशिक्षण झालेलं नव्हतं.
ग्रामीण भारताशी काहीही सोयरसुतक नसलेला मी एक शहरी तरुण होतो. माझी शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी होती, परंतु शेतकरी आणि शेतीविषयक ज्ञान यथातथाच होतं. त्यानंतर अनेक घटना घडत गेल्या. या एका मागोमाग एक घडणार्‍या अपघाती प्रसंगांमुळे भारतातला दुग्धव्यवसाय पूर्वी होता तसा राहिला नाही, असं आज मागं वळून पाहताना मी म्हणू शकतो. आज ज्या प्रमाणात दुग्धव्यवसायाचा विकास झाला आहे, त्याला कारणीभूत या 'अपघाती घटना' आहेत आणि मीही आज जो आहे तो तसा नसतो, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही."

हे मनोगत आहे भारतातील 'धवलक्रांतीचे जनक' वर्गीस कुरियन ह्यांचे. त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती,अविरत मेहनत,जीवघेणा संघर्ष आणि आपल्या कामावरील निष्ठेच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. जे 'अमूल' हे नाव आता जगभरच्या दुग्धव्यवसायात प्रसिद्ध आहे त्या अमूलच्या निर्मितीमागची कहाणी म्हणजेच 'माझंही एक स्वप्न होतं' हे वर्गीस कुरियन ह्यांचे आत्मचरित्र आहे.

हे स्वप्न साकार करताना जशी त्यांना बर्‍याच भल्या माणसांची मदत झाली तसाच टोकाचा विरोधही झाला. हा विरोध करणारे लोक कुणी सामान्य नव्हते. तर ह्या धंद्यातले प्रस्थापित लोक, 'नेस्ले' सारख्या परदेशी कंपन्या, बडे सरकारी अधिकारी आणि मातब्बर राजकारणी. पण ह्या सगळ्यांना कुरियन पुरून उरले. वेळच्या वेळी नेमकी उपाययोजना करून त्यांनी ह्या बड्या विरोधकांचा विरोध मोडून काढला.
कुरियन ह्यांची काम करण्याची पद्धत अतिशय आदर्श अशी आहे. आधी ते आपली योजना अतिशय काळजीपूर्वक बनवतात. त्यानंतर आपल्या सहकार्‍यांना विश्वासात घेऊन ते ती नीट समजावून देतात. त्यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणतात आणि एकदा ती सगळ्यांकडून संमत झाली की मग धडकपणे अमलात आणण्यासाठी अक्षरशः आपल्या जीवाचे रान करतात. आपल्या बरोबर काम करणारे सहकारी देखिल त्यांनी अगदी पद्धतशीरपणे निवडलेले आहेत. योग्य माणसांची पारख करण्यात ते पटाईत आहेत. त्यांच्या बेधडक काम करण्याच्या वृत्तीमुळे जसे त्यांनी असंख्य शत्रू निर्माण केलेत तसेच काही हमखास उपयोगी पडतील असे मित्रही जोडलेले आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा विश्वास आणि नि:संदिग्ध पाठिंबा मिळवण्यातही ते यशस्वी ठरलेले आहेत.

हे आत्मचरित्र वाचताना आपल्याला जागोजागी धक्के बसतात. कारण अतिशय परखडपणे आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेले हे कथन आपल्यालाही आत्मसंशोधन करण्यास प्रवृत्त करते. कुरियनसाहेबांच्या परखडपणाचा एकच नमुना इथे पेश करतो त्यावरून आपल्याला त्याची कल्पना येईल.

"आणंदला भेट द्यायला न्यूझीलंडच्या उच्चायुक्त आल्या होत्या. त्यांनी कुरियनना सांगितले, "तुम्ही दूध उत्पादन करता, दुधाची भुकटी बनवता हे कौतुकास्पद आहे. पण जिथे आम्ही माल पुरवतो त्या परदेशातही आपण आपला माल निर्यात करता असे आम्हाला कळलंय. तेव्हा तुम्ही ते करता कामा नये."
खरे तर असा उद्धटपणा आणि तोही एका परदेशी व्यक्तीकडून सहन करणे हे कुरियन ह्यांच्या स्वभावात नव्हते पण एक स्त्री दाक्षिण्य म्हणून ते सौम्यपणे म्हणाले, "बाईसाहेब,अगदी खरं सांगायचं तर जागतिक बाजारपेठ ही तुमची खाजगी मालमत्ता आहे हे मला माहीत नव्हतं."
त्यावर त्या बाई उखडल्या आणि कुरियनना अद्वातद्वा बोलू लागल्या. त्यावर साहजिकच कुरियन ह्यांचा संयम सुटला आणि ते म्हणाले, "बाईसाहेब, तुम्ही न्यूझीलंड नावाच्या एका टीचभर देशाच्या प्रतिनिधी आहात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही सगळ्या भारतीयांनी एक होऊन तुमच्या देशावर थुंकायचं ठरवलं, तर तुमचा देश आमच्या थुंकीत बुडून जाईल."हे ऐकताच त्या बाई ताबडतोब तिथून निघून गेल्या."

तेव्हा मंडळी हे पुस्तक जरूर वाचलेच पाहिजे असे आहे.

इंग्लिश आवृत्ती आय टू हॅड अ ड्रीम... निवेदनः वर्गीस कुरियन; शब्दांकनः गौरी साळवी.मराठी आवृत्तीः माझंही एक स्वप्न होतं..... अनुवादः सुजाता देशमुखराजहंस प्रकाशन.किंमतः २०० रुपये.

५ जानेवारी, २००८

आठवणी!शालेय जीवनातल्या!१६

माझ्या ह्या हावरट मित्राचे नाव होते गोपाळ; पण आम्ही त्याला गोप्याच म्हणत असू. तर एकदा अचानकपणे ह्या गोप्याचे आईवडील,गोप्या आणि त्याचा तीनचार वर्षांचा असलेला लहान भाऊ असे सगळे जण संध्याकाळच्या वेळेला आमच्या घरी आले. त्यांच्या येण्याचे प्रयोजन काय असावे हे आधी माहीत नव्हते पण आल्यावर त्याच्या आईने ते(गोप्याची मुंज करायची होती) माझ्या आईला सांगितले. माझी मुंज सामुदायिक पद्धतीने झालेली असल्यामुळे त्यात खर्च खूपच कमी येतो हे त्यांना कुठुनसे कळले होते आणि म्हणून ह्याबद्दलची नेमकी माहिती घेण्यासाठी ते उभयता आपल्या दोन्ही मुलांसह आलेले होते.

मला कळायला लागले त्याच्या आधीपासूनच आमच्या घरात वीज नव्हती त्यामुळे रात्री आम्ही कंदील आणि चिमणीचा वापर करत असू. त्याप्रमाणे स्वयंपाकघरात एक मोठी चिमणी आणि बाहेरच्या खोलीत एक कंदील असा आम्ही वापरत असायचो.

ही मंडळी आल्यानंतर आधी मोठ्यांचा आपापसात एकमेकांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम झाला. तशी गोप्याची आई आधी आमच्या घरी एकदा येऊन गेलेली होतीच पण त्याचे वडील आमच्याकडे पहिल्यांदाच येत होते. त्यामुळे ती औपचारिकता उरकल्यावर मग गप्पा सुरू झाल्या. चहा-पाण्याची तयारी करायला आई आणि तिच्याबरोबर गप्पा मारायला गोप्याची आई दोघी स्वयंपाकघरात गेल्या. आमच्या दोघांचे वडील आपापसात गप्पात रंगले. माझे वडील तसे गप्पिष्ट होतेच आणि त्यात गोप्याचे वडीलही तसेच होते. त्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या. गोप्या आणि माझी इतर भावंडे आम्ही ओट्यावर बसून आपापसात शाळेतील गमतीजमतीवर गप्पा हाणायला लागलो.

ह्या सर्वात एकटा पडला तो गोप्याचा लहान भाऊ. तो आमच्यापेक्षा खूपच लहान असल्यामुळे इकडे धाव तिकडे धाव असे करत होता आणि मधनं-मधनं कंदिलाजवळ जाऊन त्याच्या काचेला हात लावायचा प्रयत्न करत होता. आम्हा मुलांपैकीच कोणी तरी मग त्याचे बकोट पकडून त्याला बाहेर घेऊन जात असू.थोड्या थोड्या वेळाने हे घडत होते. त्याचे वडील हे सगळे बघत असूनही अतिशय शांत होते पण माझ्या वडिलांच्या मनात भिती होती की एखादे वेळेस त्याने खरोखरच त्या काचेला हात लावलाच तर खूपच अनर्थ होईल. म्हणून चटकन उठून त्यांनी तो कंदील उचलला आणि वर दाराच्या खिळ्याला टांगला.

चहापाणी,खाणेपिणे झाले आणि मग गोप्याच्या बाबांनी नेमका मुद्द्याला हात घातला. सामुदायिक मुंजीबद्दलची माहिती ते माझ्या वडिलांकडून जाणून घ्यायला लागले. मग वडिलांनी त्याबद्दलचे एक पत्रक काढून त्यांना वाचायला दिले. कंदील वर असल्यामुळे पत्रक वाचण्यासाठी लागणारा प्रकाश अपुरा होता म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना कंदील खाली घ्यायला सांगितले. कंदील खाली घेताना माझ्या वडिलांनी त्यांना मुलाला आवरण्यासंबंधी सूचना दिली पण त्यांनी ते हसण्यावारी सोडून दिले.

कंदिलाच्या प्रकाशात त्या पत्रकाचे वाचन सुरू असताना गोप्याच्या लहान भावाला त्याच्या आईने धरून ठेवले होते; पण कसे कुणास ठाऊक त्याने तिच्या हातांची पकड सोडवली आणि एकदम कंदिलाकडे धाव घेतली आणि कोणी काही करण्याआधी जाऊन तडक दोन्ही हातांनी कंदिलाची काच पकडली. जोराचा चटका बसताच त्याने भोकांड पसरले. जे होऊ नये असे वाटत होते तेच झाले होते. त्या चिमुकल्या जीवाचे हात चांगलेच पोळले होते. रंगाचा बेरंग झाला होता आणि मग त्या चिमुकल्या हातांवर उपचार सुरू झाले. माझ्या आईने चटकन एक तसराळे भरून थंड पाणी आणून त्यात त्याचे हात बुडवले. वडिलांनी ते निळ्या शाईसारखे असणारे औषध फडताळातून शोधून काढले आणि मग तेही त्याच्या हातांवर ओतले. पण इतक्या नाजूक जीवाला त्याचा काही खास फायदा झाला नाही.

हे सगळे रामायण घडले तरी ते दोघे आईबाप आश्चर्यकारकरीत्या कमालीचे शांत दिसत होते. शेवटी माझ्या वडिलांना राहवले नाही आणि त्यांनी गोप्याच्या वडिलांना जरा कठोरपणे सुनावले, "अहो,हा लहानसा जीव इतका तळमळतोय तरी तुम्ही इतके शांत कसे? चला, उठा आणि लगेच त्याला डॉक्टरकडे न्या बघू ." पण तरीही ते शांतच होते. मग माझ्या आईनेही गोप्याच्या आईला तेच सुनावले आणि मग मोठ्या नाईलाजाने तरीही कोणत्याही प्रकारची घाई न करता अतिशय थंडपणाने त्या दोघांनी त्या मुलाला डॉक्टरकडे नेले.

त्यांच्या जाण्यानंतरही माझ्या आई-वडिलांना बसलेला मानसिक धक्का ओसरलेला नव्हता.ते दोघे सख्खे आईबाप असूनही आपल्या मुलाच्या बाबतीत असे का वागले? हे कोडे मात्र कधीच उलगडले नाही.