माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जानेवारी, २००८

छप्पन पावसाळे!

पाहिले छप्पन पावसाळे
भोगिले तितुकेच हिवाळे
सोशिले पहा मी उन्हाळे
तरिही म्या काही नाकळे

मित्रहो आज २८ जानेवारी २००८ म्हणजे लौकिकार्थाने माझा वाढदिवस!वयाची ५६ वर्षे पूर्ण करून सत्तावनाव्या वर्षात पदार्पण करत आहे. कालपासून इथल्या महाजालावरच्या माझ्या समस्त पुतणे-पुतण्या आणि मित्र मंडळींनी जाहीरपणे आणि खाजगीमध्ये माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव चालवून मला गुदमरवून टाकलेले आहे. हे पाहून खचितच आनंद झालाय; माझ्यासारख्या एका सामान्य माणसाबद्दल आपण हे जे प्रेम व्यक्त करता आहात ते पाहून मला मी कुणीतरी ’मोठ्ठा माणूस’ झाल्यासारखे वाटायला लागलंय. त्याबद्दल त्यांचे उपचार म्हणून आभार न मानता त्या सदिच्छा मी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडेच जपून ठेवतोय. तरीही माझ्या मूळ चिकित्सक(शुद्ध मराठीत खुसपटं काढणे ) स्वभावाप्रमाणे मनात काही विचार आले ते तुमच्या समोर मांडतोय.(ह्यात कुणाच्याही भावनांचा उपमर्द करण्याची भावना नाहीये हे कृपया लक्षात घ्यावे ही नम्र विनंती).

तारखेप्रमाणे(अथवा तिथीप्रमाणे) दर वर्षी आपला प्रत्येकाचा एक जन्मदिवस असतो. अशा वेळी शुभेच्छा देण्याचा रिवाज आहे(हा प्रथम कधी सुरु झाला हा एक संशोधनाचा विषय आहे).पण हल्ली त्याचे प्रस्थ खूपच वाढलेय हे नक्की.
मित्रमंडळी आप्तेष्ट असे सगळे जमून त्या दिवसाच्या ’उत्सवमूर्तीला’ आशीर्वाद-शुभेच्छा वगैरे दिल्या जातात. महनीय व्यक्ती, राजकारणी, नेते,बडे कलाकार वगैरेंसारख्या मोठ्य़ा लोकांच्या जन्मदिवसाला ’जयंती’ असे भारदस्त नामाभिधान आहे तर सर्वसामान्य लोक त्यालाच जन्मदिवस,वाढदिवस(माझ्यासारखे काही वात्रट ’काढदिवस’), बर्थडे(हल्लीच्या भाषेत म्हणायचे झाले तर ’हॅप्पी बर्डे) वगैरे म्हणतात.

माझ्या लहानपणी अशा उत्सवमूर्तीला कपाळाला गंधाक्षता लावून तबकात पेटते निरांजन ठेऊन त्याने ओवाळले जाई, सुपारी,अंगठी त्याच्याभोवती आलटून पालटून फिरवून त्याची जणू दृष्ट काढली जाई, डोक्यावर कापूस ठेऊन ’म्हातारा/म्हातारी हो’म्हणजे ’औक्षवंत हो’ असा आशीर्वाद देऊन हातावर काहीतरी गोड ठेवले जाई. काहीतरी भेटवस्तू दिली जायची. घरात पुरणा-वरणाचा स्वयंपाक व्हायचा. त्या दिवशी(निदान) त्या उत्सवमूर्तीला ओरडायचे नाही असा अलिखित नियम असायचा. मग काय त्याला मस्ती करायला रान मोकळे असायचे.
आता जरा प्रथा बदललेली दिसतेय. आजूबाजूच्या मित्र मंडळींना बोलावून त्या दिवशी ’केक’ कापतात आणि एका सुरात ’हॅप्पी बर्थडे(बरडे!) असे गाऊन त्यांच्यातर्फे आशीर्वाद दिले जातात. ’मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे’ अशा शुभेच्छा दिल्या जातात.भेटी दिल्या जातात.

मोठ्या म्हणजेच महनीय व्यक्तींच्या जन्मदिवशी म्हणजे जयंतीच्या दिवशी त्यांच्या कार्याचा गौरवोल्लेख करून त्यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या जातात; त्यांच्या नावाने गरिबांना भेटवस्तू वाटल्या जातात; काही ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मिरवणुका काढल्या जातात वगैरे. एकूण हा सगळा कार्यक्रम जाहीर स्वरुपाचा असतो.
हयात नसलेल्या अशा आदरणीय व्यक्तींची जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने त्यांच्या विशिष्ट कार्याचा परिचय नवोदितांना करून देतात. त्यापासून तरूणांनी प्रेरणा घ्यावी असा त्या मागचा उद्देश असतो.
असो. हे सगळे आपल्याला माहितच असेल. तेव्हा त्याबद्दल इतकेच पूरे. आता मला काय वाटतंय त्याबद्दल थोडेसे (पुराण लावतो).

वाढदिवस! खरंच का हो? की काढदिवस? नक्की काय म्हणायचे ह्याला?
तसे पाहायला गेले तर रोज आयुष्यातला एकेक दिवस कमी होत जात असतो. मग गेलेल्या दिवसांबद्दल हळहळ व्यक्त करायची की आपण अनुभवाने वाढलो(खरेच का?हा एक गंभीर प्रश्नच आहे) असे मानून आनंद मानायचा? ह्या जगात येऊन आपण नेमके काय केले? किती समाजोपयोगी काम केले? की निव्वळ खायला काळ आणि धरणीला भार असे आयुष्य घालवले?
गदिमांनी एका गाण्यात म्हटलंय, "उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला" असेच तर आजपर्यंतचे आयुष्य आपण जगत आलोय असे नाही वाटत काय? मी आणि माझे कुटुंब ह्यापलीकडे फार फार तर माझे आप्तेष्ठ-मित्रमंडळी असे धरून इतर कितीशा लोकांचा विचार केलाय? जन्मभर कुपमंडूक वृत्तीने जगण्यातच धन्यता मानली आणि आलेला दिवस अक्षरश: ’उपभोगला’ असे म्हटले तर खोटे कसे म्हणावे?
आता ह्यावर कुणी म्हणेल "ग्लास पाण्याने अर्धा रिकामा आहे" असे म्हणण्या ऐवजी "अर्धा भरलेला आहे" असे म्हणावे. म्हटले तर दोन्हीही गोष्टी बरोबर आहेत. पण त्यातला आपला स्वत:च्या आयुष्याबद्दलचा नेमका अर्थ काय आहे हे देखिल आपल्याला कळायला नकोय का?
काही लोक म्हणतात की नेहमी आशावादी असावे. पण आशा आणि निराशा ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरून कसे चालेल?
केशवसुतांनी एके ठिकाणी असे म्हटलंय, "जुने जाऊ द्या मरणालागूनी" मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? आजवर जे काही केले/झाले ते विसरून जाऊन येणार्‍या उद्या साठी नवा संकल्प करा असा घ्यायचा? की आपण आता जुने झालो तेव्हा आता ’मरणाची’ वाट पाहायची.

इथे मीच कधी काळी रचलेल्या दोनओळी उद्घृत करतो:
रडता येत नाही म्हणून हसत आहे।
मरता येत नाही म्हणून जगत आहे॥


माझ्या नक्की काय भावना आहेत ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे(तसा क्षीण प्रयत्न केला आहे) पण खरंच आपण सगळे ’वाढदिवस’ का साजरे करतो बरे?कुणी सांगेल काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: