माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१४ मे, २०१०

हमखास वजन कमी करायचंय?

खूपच सोप्पं आहे वजन कमी करणं...अर्थात मनात आणलं तर..
.पण हे मनात कोण आणणार?

कोण म्हणजे काय? ज्याला/जिला वजन कमी करायचे असेल त्या व्यक्तीने तसे मनात आणायला हवंय.

अहो,पण नुसतं मनात आणून असं वजन कमी झालं असतं तर काय हवं होतं?

नाही,म्हणजे तुमचं बरोबर आहे हो...नुसतं मनात आणून काही होणार नाही हे मलाही माहित आहे.

माहित आहे ना...मग मघापासून का म्हणताय की मनात आणलं तर...वगैरे.   आम्ही मनात लाख आणतो हो,पण वजन वगैरे काही कमी होत नाही...झालंच तर..चांगलं बारीक झाल्याचं स्वप्नही पाहातो...पण काहीऽऽही होत नाही....आणि तुम्ही उगीच शब्दांचे बुडबुडे सोडताय.

अहो नाही हो...मी स्वत: कमी केलंय माझं वजन.

काय सांगताय काय? खरंच की उगाच आमची फिरकी घेताय?

अगदी खरं...ऐकायचंय?तर मग ऐका.

मंडळी,साधारण जानेवारीच्या शेवटी माझा पाय मुरगळला होता, त्यानंतर तो सतत तीन आठवडे एकाच स्थितीत बांधून ठेवावा लागला होता....साहजिकच त्या काळात माझा रोजचा सकाळचा व्यायाम,संध्याकाळची फेरी इत्यादि हालचाली बंद झाल्या...खाणं मात्र तेवढच होतं...किंबहुना थोडं वाढलं होतं असंच म्हणा ना..त्यामुळे आपोआप वजनही वाढायला लागलं...पाय अगदी व्यवस्थित बरा झाल्यावर जेमतेम मी एक आठवडा व्यायाम केला आणि पुढे तो आपोआप बंद पडला. बंद पडायला कारण होते....रात्रीची अपूरी झोप..ज्यामुळे सकाळी वेळेवर उठणे होत नसे आणि व्यायाम केला तर सकाळीच...हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे तोही आपोआप बंद पडला.

पाय दुखावण्याआधी माझे वजन साधारणपणे ६६ किलो होते...ते ह्या मधल्या काळात ७० किलोपर्यंत वाढले...झालंच तर पोटाचा घेरही दोन ते अडीच सेंमीने वाढला होता...हे सगळं मला आवडत नव्हतं पण तरीही पुन्हा व्यायामाला जाण्याचा मुहूर्त लागत नव्हता...मग आता काय करावे..असा मनात विचार करतांना एक साधा सोपा  मार्ग दिसला...तोच करून पाहायचे असे ठरवले.


एप्रिलच्या सुरुवातीला, माझा दिवसभराचा आहार काय असतो ह्याची एकदा खानेसुमारी केली...
सकाळी एक कप दूध आणि दूपारी एक कप चहा किंवा कॉफी...दोन्हींबरोबर ५ ते ६ पार्लेजीची बिस्किटे.
तसं माझं जेवण काही फारसं नाही...जेवणात भात- आमटी किंवा पोळी-भाजी..ह्यापैकी एकच जोडगोळी. भात असेल तर फक्त एकदाच घेतलेला मला पुरतो....तोही  फार नाही...तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगतो...माझ्या माहितीतले एक   पंचाहत्तरी पार केलेल गृहस्थ आहेत....त्यांचे नेहमीचे जेवण कसे आहे तर...एकूण तीन वेळा ते भात घेतात...मधे दोन-चार पोळ्या...आता त्याच्या अनुषंगाने येणारे भाजी-आमटी हे तोंडी लावणे वगैरे  गोष्टी  आल्याच...बाकी ताक/दही वगैरे.....तर त्यांचा एकवेळचा भात...हे माझे पूर्ण जेवण...विश्वास बसत नाही ना....जाऊ द्या...द्या सोडून.  हं, तर जेवणात केवळ पोळ्या असतील त्या ४ ते ५ ...एखादे वेळेस भाजी खूपच छान झाली असली तर ६वी पोळीही खाऊ शकतो.....असो...तर सांगायचा मुद्दा काय तर जेवणही यथातथाच......
जेवणा व्यतिरिक्त दिवसातून एकदोन वेळा कधी केळी,चिवडा,लाडू,तळलेली डाळ,खाकरे इत्यादिंपैकी काहीतरी असायचेच.
ह्या सगळ्यांचा विचार केल्यावर आता कोणत्या आहारात कपात करायची ह्याचा विचार सुरु केला. जेवण तर माझं सामान्यंच होतं...तेव्हा त्यात बदल  करण्याचा अथवा कपात करण्याचा प्रश्नच नव्हता. मग सर्वप्रथम पार्लेजीची बिस्किटे बंद केली.....तीन चार दिवसात त्याची सवय सुटली....म्हणून मग जेवणाव्यतिरिक्त आहारात हळूहळू कपात सुरु केली....हे करतांना भूक तर भागत नसायची...म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले...भूक लागली की पाणी प्यायचे...असे काही दिवस मोठ्या नेटाने सुरु ठेवले....पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी एकदा  नुसतंच व्यायामशाळेचं दर्शन घेऊन आलो....तिथल्या काट्यावर वजन केलं...ते थोडे म्हणजे साधारण ६०० ग्रॅमने कमी झालेले दिसले...त्यामुळे लगेच उत्साह वाढला आणि दुसर्‍या दिवशी सकाळपासून पुन्हा व्यायामाला सुरुवात करायची असा मनाशी दृढनिश्चय केला....
दुसर्‍या दिवसापासून खरंच व्याशात जाऊ लागलो....अर्थात व्यायाम मात्र चाखत माखतच करत होतो...साधारण एक आठवड्याने शरीरातील सगळे सांधे मोकळे झाल्याचे लक्षात आल्यावर मग जरा नेटाने व्यायाम सुरु केला...बरोबर आहार नियंत्रण  कसोशीने सुरुच ठेवलेले होते...त्यानंतर पुन्हा एकदा वजन पाहिले...आता ते दीड किलो कमी झाले होते.....आणि आजच पुन्हा एकदा वजन केले...तेव्हा ते तीन किलोने कमी भरल्याचे दाखवते आहे....पोटावर वाढलेली ती दोन-अडीच सेंमीची चरबी आता दीड सेंमीने कमी झालेय....

मंडळी...हे सर्व घडायला साधारण एक-दीड महिन्याचा कालावधी जावा लागला...पण मी जाणीवपूर्वक करत असलेल्या प्रयत्नांना  निश्चितच फळ येत आहे....माझे वजन अजूनही आदर्श वजनाच्या तुलनेत साधारणपणे तीन किलो जास्त आहे....माझी खात्री आहे की...महिन्याभरात तेही निश्चितच  तेवढे खाली येईल....

खरं तर अतिशय काटेकोरपणे आहार नियंत्रण आणि त्याच बरोबर योग्य असा व्यायाम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला तर अजून चांगला परिणाम मिळू शकतो....पण माझे वजन आदर्श वजनापेक्षा खूप जास्त नसल्याने..मी स्वत:हून जे काही करतोय तेवढे परिश्रमही माझ्यासाठी पूरेसे आहेत.

म्हणूनच म्हणतो....वजन कमी करायचंय.....मग आधी तसे मनात आणा....आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी  पुढे जे काही करावे लागेल ते इमाने इतबारे एखाद्या व्रताप्रमाणे करा....पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते.... तर मग आता लागा तयारीला....
अरे हो, एक सांगायचेच राहिले...मंडळी हा उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे....तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच...तेव्हा व्यायाम करा आणि जास्त घाम गाळा...पाणी भरपूर प्या  मात्र खाणं कमी करा.......

इतकं केलंत की तुम्ही हलके झालात म्हणून समजा!!!
..

१९ टिप्पण्या:

सागर म्हणाले...

ज्यांना जास्त वजन नको आहे कृपया माझ्या कडे पाठवावे... :))))))))))))))))))))))))))

Suhas Diwakar Zele म्हणाले...

सागरा माझ्याकडून घेऊन जा बाबा...:D
देवा, तुम्ही सांगितला तसा मनावर आणि तोंडावर ताबा ठेवायचा नक्की प्रयत्‍न करेन :)

Mahendra म्हणाले...

माझे दहा किलो घेउन जा रे बाबा हवे असतील तर.. च्यायला कालच बार्बेक्युनेशनला जाउन आलो. नक्कीच दोन किलो तरी वाढलं असेल वजन काल!

पाषाणभेद म्हणाले...

काका, बाकी लेख मात्र एकदम चुरचुरीत झालाय बघा!

- पाषाणभेद

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

मला माझी ऑफीसच्या जीम मधली कसरत आठवली. वजन कमी करण्यासाठी मी जवळ जवळ एका वेळेस किमान २५० ते ३०० कॅलरीज जाळत असे धावून आणि सायकल चालवून. भात कमीच खाणे, ज्वारीची भाकरी खाल्यावर वजन खूपच कमी होते आणि हलके वाटते.

प्रमोद देव म्हणाले...

*सागर*,वजन वाढवण्यासाठीदेखिल आपल्याकडे उपाय आहेत...घाबरू नकोस.
*सुहास*, आपल्याला आंतून वाटायला हवं...दुसर्‍यांनी सांगितल्यावरही आपण करतो...पण ते जास्त दिवस टिकत नाही.
*श्रीमंत*, आपल्याला आता मनावरच घ्यावे लागेल...असे किती दिवस ’तना’वर काढणार...शूभस्य शीघ्रम्‌!
*पाषाणभेद* भाऊ, अरे इथेही आलास...स्वागत आहे तुझं
*अपर्णा*...मग आता तुही लिही तुझे अनुभव.

THE PROPHET म्हणाले...

झकास काका!
माझं वजन फारच व्हेरिएबल असतं...फार चंचल आहे मी कदाचित म्हणून. पण आता तुम्ही दिशा दाखवलीत. आता थोडी कन्सिस्टन्सी आणायला हवी.

प्रमोद देव म्हणाले...

विद्याधर यश मिळवणे जितके कठीण त्याहीपेक्षा ते टिकवणे महाकर्म कठीण...म्हणून सातत्याला महत्व आहे...ते टिकवलंत तर मग अजून काय हवं..तसा प्रयत्न करून पाहा...सातत्याने. ;)

आनंद पत्रे म्हणाले...

काका वजन वाढवायचे उपास सुद्धा लिहा ना...
म्हणजे केवळ वेफर्स वगैरे खाउन तसे नाही.. उत्तम उपाय..

प्रमोद देव म्हणाले...

आनंद तुझ्यासारख्यासाठी वजन वाढवण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे..लग्न करणे...एकदा बायकोच्या हातचे प्रेमाने बनवलेले पदार्थ खायला लागलास की मग वजन भराभर वाढेल. :D

Meenal म्हणाले...

हे हे आनंद, सल्ला तुझ्या पथ्यावरच पडला आहे..
काका,धन्यवाद! हे पोस्ट वाचून पुन्हा नविन सुरवात कराविशी वाटते आहे. देव करो आणि हा प्रयत्न केविलवाणा न ठरो.. उद्यापासून सुरु!

प्रमोद देव म्हणाले...

मीनल,जरूर प्रयत्न कर...मी तथास्तू म्हणतो. :)

सोनाली केळकर म्हणाले...

हा लेख वाचुन मलाही मनापासुन काहितरी करायला हवे असे वाटयला लागले आहे. जेवणा व्यतिरीक्त जे खाणे आहे ते नक्कीच कमी करता येण्यासारखे आहे. गोड पण खूप खाते मी. आंबे पण कमी खायला हवेत.

अनामित म्हणाले...

kaka tumcha lekh kharach khup chatpatit zala aahe tumhi sangitalela upay kharac interesting aahe mi nakki prayuatn karun pahin. i hope mi mazya jibhevar control karun tumhi sangitalya pramane karu shaken.

अनामित म्हणाले...

kaka majha vajan aata 114 kilo aahe aani maj vay 24 varsh aahe. nuktich mi jim pan lavliy. pan manatun vatat nahi ho mi barik hoen mhanoon. tya tragyatun net var sahaj surfing kel aani tumcha lekh vachanat aala. bar vatal vachun thoda dhir milala. thank u.

अनामित म्हणाले...

Kaka maze vajan 15 kg vadhale aahe te kami karanyaasaathi madat kara . plzzzzzzzz

ashish16 म्हणाले...

तुम्ही देव हो, काय मनात आणाल ते कराल :)

अनामित म्हणाले...

Majhe Vajan 100 aahe mla khup kami vhayche aahe

erererer म्हणाले...

khup chan avadala

marathi ukhane