माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ ऑक्टोबर, २०१४

दिवाळी गीतांकदिवाळी अंक....छपाईच्या स्वरूपातले आणि इथले महाजालावरचे इ-दिवाळी अंक आपण खूप पाहिले आणि वाचले आहेतच आणि पुढे वाचालही....पण मी ह्यावर्षी एक नवा प्रयोग केलाय...बहुदा हा जगातला पहिलाच प्रयोग आहे असे म्हणायला कुणाची हरकत नसावी...कोणता बरं तो प्रयोग?
मी  काही निव्वळ ’दिवाळी गीते’ इथे ध्वनीचित्रफितीच्या रूपात सादर करतोय...त्याच्या मागची माझी भूमिका दिवाळी अंकासारखे काही तरी असावे हीच आहे..मात्र लेखनाच्या ऐवजी हा गीतांचा अंक असल्यामुळे मी ह्याला ’दिवाळी गीतांक’ असे नाव दिलंय...एकूण सात दिवाळी गीते ह्या अंकात आहेत..एका पाठोपाठ एक ती आपल्याला ऐकता येतील...जरूर ऐका आणि आपला अभिप्रायही कळवा बरं का!

आपणा सर्वांना, ह्या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा!

४ सप्टेंबर, २०१४

पावसाशी संवाद..

ह्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल वगैरे अशा तर्‍हेचे वेधशाळेचे सगळे अंदाज नेहमीप्रमाणेच चुकले...जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून पाऊस जो सुरु झालाय तो सतत पडतोच आहे  आणि ह्यावर्षी तर चांगला भरभरून पडतोय...पाऊस सुरु झाल्यापासून  एकही दिवस कोरडा असा गेलेला नाहीये..अगदी रिमझिम म्हणा किंवा दिवसभरात एखादी सर का होईना...पण अशा पद्धतीने तो रोज हजेरी लावतोच आहे....अर्थात हे मी फक्त मुंबईबद्दल बोलतोय...

तेव्हा मी पावसालाच विचारायचं ठरवलं.
हा आमच्यात घडलेला संवाद....

मी: का रे बाबा, नेहमी त्या वेधशाळेचे अंदाज चुकवतोस? यंदाही तेच केलंस.

पाऊस:.त्याला मी नाही, निदान ह्यावर्षी तरी तूच जबाबदार आहेस.

मी: ( आश्चर्यचकित होऊन म्हटलं)मी? मी काय वरूण देव आहे काय? मी तर प्रमोद देव आहे.

पाऊस: उगाच फालतू विनोद करू नकोस...पण तूच जबाबदार आहेस.

मी: कसा काय बुवा?

पाऊस: ते तुझ्या लहानपणीचे गाणे...ये रे ये रे पावसा, मल्हारमध्ये कुणी गायले आणि तेही एकदा नाही...रोज आपलं तुझं ते दळण सुरुच असतं.

मी: बरं मग, त्याचं काय? तो तर एक गमतीचा भाग होता आणि आहेही.

पाऊस: मग इतकी आळवणी केलीस...तीही मल्हारात..तर यावंच लागलं ना मला.

मी: ह्यॅ! उगाच काहीही फेकू नकोस! मल्हार आणि मल्हाराचे अनेक प्रकार नेहमीच गायले जातात आणि तेही एकापेक्षा एक सरस अशा गायकांकडून...तेव्हा का बरं येत नाहीस तू? मी काही तरी इकडचं तिकडचं ऐकून गायलो तर तू म्हणे आलास आणि नुसता आलासच नाहीस तर इथे मुक्कामही ठोकलास....कोण विश्वास ठेवेल तुझ्या बोलण्यावर?

पाऊस: अरे बाबा, खरंच सांगतोय मी!

मी: बरं ! मग मला सांग, तुला गाणं आवडलं म्हणून तू आलास की....

पाऊस नुसता गालातल्या गालात हसला आणि म्हणाला...तुला जे काही समजायचं ते समज!   ;)

१६ ऑगस्ट, २०१४

गणपती गजानना!

एक छोटीशी कविता...अशीच काही अक्षरं जोडून केलेली.  :)
 मी आधी जी रचना केली होती ती अशी होती...

गजानना, गजानना
स्वीकारावी अमुची वंदना

मोरेश्वरा गौरीकुमरा
आम्हावरी सदैव कृपा करा

त्यानंतर मला ह्याच गीताला गुजराती पद्धतीने चाल  लावाविशी वाटली म्हणून थोडा बदल करून काही ओळीही मी त्यात वाढवल्या.


गणपती, गजानना,
हेरंबा, भालचंद्रा
स्वीकारावी आमुची वंदना

गिरिजाकुमरा, मोरेश्वरा
गणनाथा, सिद्धेश्वरा
आम्हावरी सदैव कृपा करा


थोडीशी गुजराती भजनाच्या धाटणीची अशी ही चाल तयार करण्यासाठी  खरे तर गुजराती पद्धतीचा ढोल मला हवा होता...पण त्याऐवजी जालावर ’पुणे ढोल’ मिळाला...त्यामुळे ही चाल ऐकतांना मराठी आणि  गुजराती...अशा दोन्हींचा मिलाफ त्यात आढळून येईल असे मला वाटते.

इथे चाल ऐका....आणि जमल्यास प्रतिक्रियाही नोंदवा.१४ जून, २०१४

प्रभातफेरी....


सुप्रभात मंडळी.
रोज सकाळी हा माणूस फेर्‍या मारता मारता अचानक मध्येच असा का थांबतो , भटक्याच्या प्रग्रातून आकाशाकडे पाहात नेमकं काय टिपतो...ह्याचं नाही म्हटलं तरी किंचित कुतुहल आजूबाजूच्या लोकांना असावं असं वाटतंय खरं...कारण कधी ..वेडाच दिसतोय हा, तर कधी विक्षिप्तच दिसतोय. इतकं काय अगदी त्या आकाशात पाहाण्यासारखे आणि टिपण्यासारखे आहे? अश्या त्यांच्या नजरा सांगतात.  :)
अर्थात अजून कुणी थांबून किंवा थांबवून विचारलेलं नाहीये मला...बहुतेक लोक आपापल्या मस्तीत चालत असतात, फिरत असतात. कुणी ध्यानमग्न असतात, कुणी प्राणायामात गुंग असतात तर कुणी कंपू करून गप्पा मारत असतात किंवा  अगदीच काही नाही तर इथे-तिथे पाहात हात-पाय हालवत बसलेले/उभे असतात...ह्या सगळ्यांना आजूबाजूच्या निसर्गाशी, त्याच्या सतत बदलणार्‍या स्वरूपाशी काहीही देणेघेणे नसते...सूर्य काय रोजच उगवतो..त्यात काय पाहाण्यासारखे असतं बॉ? फार तर उन्हात बसावे, कोवळे ऊन खावे इतपतच ठीक... असाच एकूण सगळ्यांचा आव असतो.

कदाचित तुम्हालाही तसेच वाटत असेल...पण ढगांचे हे वेगेवगळे आविष्कार, सूर्यप्रकाशाचा हा इतका अवर्णनीय खेळ पाहतांना मी तर देहभान हरपून त्यात गुंग होतो...मला अजून एका गोष्टीचे कौतुकही वाटते आणि कमालही वाटते...वारा! ढगांचे सतत बदलणारे आकार तयार करण्याचे काम वारा करत असतो...खरा चित्रकार तोच असावा असेही वाटते...
हिंदीत एक गाणं होतं...ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार....मला वाटतं की हा वाराच ’तो चित्रकार’ असावा...सतत, काही तरी नवे रेखाटणारा.
१३ जून, २०१४

पाऊस म्हणाला...

पाऊस सुरु होऊन काही तास उलटले तरी अजूनही एकही पावसावरची कविता कशी आली नाही ह्याचे आश्चर्य वाटतंय...मग म्हटले आपणच  करून टाकूया एखादी कविता...हं तर, वाचा...

पाऊस म्हणाला, येऊ का रे
मी म्हणालो, बिनधास्त ये रे

तो म्हणाला, भिजशील तू
आणि आजारीही पडशील तू

मी म्हणालो, हरकत नाही,
आपण पहिल्यांदा भेटण्याची
गंमत काही औरच असते, नाही!