माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२२ ऑगस्ट, २००९

गोल असे ही दुनिया आणिक...

मित्रांनो गाणी ऐकताना त्यात जुनं नवीन असं काही नसतं असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे. जुनी काय आणि नवीन काय..ही गाणी बनतात, ती ज्या रागांमध्ये, ते सगळे राग तर जुनेच आहेत मग गाण्यात नवीन जुने असे आपण का म्हणतो बरं? मला असं वाटतं की त्याचंही एक बहुदा कारण असावे ते म्हणजे गोडवा....जुन्या काळात गाण्यातला गोडवा जपला जायचा जो आज वाद्यमेळामध्ये पार हरवला गेलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे पूर्वी वाद्यमेळा नव्हता काय? होता ना..नव्हता असं कसं म्हणता येईल? पण त्याचा उपयोग बराच मर्यादित प्रमाणात होत होता आणि त्याच वेळी गाण्याचे शब्द,त्यातल्या भावना ह्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जायचं...ज्यामुळे आजही ती जुनी अवीट गोडीची गाणी ऐकली की मन चटकन भूतकाळात जातं.

आता असं मी म्हटल्यावर तुम्हीही जुनी आणि अवीट गोडीची गाणी आठवायला लागला असाल आणि त्याच बरोबर त्या गाण्यांबद्दलच्या तुमच्या आठवणीही मनात रुंजी घालायला लागला असाल. ह्या अशा गाण्यांबरोबरच काही जुने गायक-गायिका,त्यांचे आवाज,त्यांच्या गाण्याच्या लकबी वगैरे गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या असतील..खरं ना?

आज अशाच एका मला आठवलेल्या जुन्या गाण्याबद्दलची आठवण मी सांगणार आहे. ते गाणं गायलं होतं सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गोविंद पोवळे ह्यांनी. संगीतही त्यांचेच होते. ते गाणं असं आहे....

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते दुनिया रुपयाभवती
रुपयाभवती दुनिया फिरते....

पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा मी बहुदा पाचवी सहावीत होतो. नुकतंच तेव्हा भुगोलात वाचलं होतं की.... पृथ्वी सुर्याभवती फिरते....आणि इथे ह्या गाण्यात चक्क उलट लिहिलंय....हट,हट,हट. हे असं नाहीच आहे. काय वेडा आहे का हा कवी? असं काय बोलतोय ते? फार फार वर्षांपूर्वी लोक असं समजत होते हे खरं आहे पण ते लोक अडाणी होते; पण आता सिद्ध झालंय की पृथ्वी सुर्याभवती फिरतेय मग लोक अशी गाणी लिहितातच का आणि वर ती हे गायक लोक गातातच का? हे कमी म्हणून की काय ...पाडगांवकरांनी लिहिलंय...शुक्रतारा मंद वारा...... छे,छे,छे. ...वार्‍याला यमक जुळायला हवं म्हणून शुक्राला तारा बनवलं. छ्या. मजा नाही. अशाने कसं होणार आपलं.

हं, तर काय सांगत होतो मित्रांनो, अशा प्राथमिक विचारांनी मी ते गाणं त्या वेळी पूर्णपणे ऐकलंच नाही.पण आकाशवाणीवरून ते गाणं पुन:पुन्हा लागायचं आणि नाही म्हटलं तरी कानावरून जायचं. हळूहळू मला ते आवडायला लागलं,कारण....
कारण ते पहिलं विधान....सूर्य फिरे हा पृथ्वीभवती... सोडलं तर बाकी गाणं मस्तच होतं. त्याची चालही साधी-सोपी होती आणि गोविंद पोवळेंचा आवाजही अतिशय मधुर होता. ज्यामुळे गाणं आवडावं असे सगळे गुण त्या गाण्यात होते.
मग काय ते गाणं केवळ माझं आवडतं गाणंच राहिलं नाही तर जिथे जिथे मला गाणं म्हणण्याचा आग्रह होत असे तिथे तिथे मी ते गात गेलो आणि लोकांनाही ते आवडत गेलं.ते पूर्ण गीत नाही पण जे आता आठवतंय तसं देतोय.

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते रुपयाभवती दुनिया
रुपयाभवती दुनिया फिरते

मजूर राबती,हुजूर हासती घामावरती दाम वेचिती
तिकिटावरती अश्व धावती,पोटासाठी करिती विक्रय
अबला अपुली काया,रुपयाभवती दूनिया फिरते

नाण्यावरती नाचे मैना,अभिमानाच्या झुकती माना
झोपडीत या बाळ भुकेले,दूध तयाला पाजायास्तव
नाही कवडी माया, रुपयाभवती दूनिया फिरते

अजून एक कडवं असावं...पण आता ते अजिबात आठवत नाहीये.

ह्या गीतातले शब्द किती सार्थ आहेत हे काय सांगायला हवं..आजही ते पदोपदी अनुभवाला येतात.

ता.क. मित्रहो हा लेख लिहायला घेतला आणि लक्षात आलं की हे गीत पूर्णपणे आठवत नाहीये आणि जे आठवतंय त्यातही काही शब्दांबद्दल शंका आहेत. मग काय विचारलं काही जुन्या-जाणत्या लोकांना. पण दूर्दैवाने त्यापैकी हे गीत कुणीच ऐकलेलं नव्हतं. योगायोगाने मिपावरची सिद्धहस्त कवयित्री क्रान्ति साडेकरशी बोललो. तिलाही नेमकेपणाने सांगता येईना पण तिच्याकडे गोविंद पोवळेंचा दूध्व होता. तो तिने मला दिला आणि...आणि काय मंडळी..मी दस्तुरखुद्द पोवळेसाहेबांशी बोललो आणि गाण्यातले शब्द तपासून घेतले. माझ्या दृष्टीने हा अलभ्य लाभ आहे. इतकी वर्ष ज्या व्यक्तीची गाणी मी मोठ्या भावभक्तीने ऐकली त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला मिळाला...अजून काय हवे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: