माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

५ जून, २००७

मैत्री-कट्टा संगीत महोत्सव!

अतिशय रंगलेल्या मैत्री-कट्टा संगीत महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. मैदान चारी बाजूंनी तुडुंब भरलेले आहे.आज ह्या महोत्सवाची सांगता न्हाणी घराण्याचे बुजुर्ग गायक पं. मोदबुवा मालाडकर ह्यांच्या घनगंभीर आणि पहाडी आवाजातील गायनाने होणार आहे.त्यांच्या बरोबर तबल्याची साथ करायला खास परदेशातून त्यांचे मित्र उस्ताद विकीखां कुवेती आलेले आहेत आणि पेटीवर साथ करायला पंडित ऍशवीन डोंबिवलीकर सज्ज झालेले आहेत.

त्या आधी पहिल्या दिवशी पं.दिगण्णा भाईंदरकर ह्यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी त्यांचे आवडते आणि हुकुमी असे 'भैरव(दुख दूर करो हमारे) आणि अहिर भैरव(अलबेला सजन आयो रे) हे राग अतिशय सफाईने पेश केले. अतिशय मृदू आणि मधुर अशा त्यांच्या आवाजाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला . लडिवाळ हरकती,मुरक्या आणि बकरीतानांनी त्यांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यांना तबल्यावर मदन मिश्रा आणि सारंगीवर मसीदखां ह्यांनी साथ केली होती. तंबोऱ्याची साथ त्यांचे पट्टशिष्य सुरेश आणि रमेश ह्यांनी केली होती.
दुसऱ्या दिवशी पं. संजीवप्पा पुणेकर ह्यांचे सुगम गायन झाले. त्यांच्या गाण्याने तर रसिक श्रोत्यांनी मैदान डोक्यावर घेतले.त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निवडलेली गीते. काही गंभीर तर काही उडत्या चालीतील सिनेगीते पेश करून त्यांनी माहोल एकदम धुंद करून टाकला. त्यांचे लाडके कवी गुलजार,साहिर वगैरे अनेक दिग्गज कवींच्या आणि मदनमोहन पासून ते आजच्या ए.आर रेहमान पर्यंतच्या सगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या रचना गाऊन श्रोत्यांना स्वरसागरात डुंबवले. त्यांच्या बरोबर त्यांच्या साथीला त्यांचे पट्टशिष्य केशव आणि योगेश हे पुणेकर बंधू होते. ह्या दोघांनी खूप मोठ्या वाद्यवृंदाचे समर्थपणे संचालन केले.
तिसऱ्या दिवशी अखिल भारतीय कीर्तीचे गायक आणि किराणा घराण्याचे अध्वर्यू श्री. चंदूतात्या ठाणेकर ह्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने रसिकांची मने जिंकली. त्यांनी त्यांचे आवडते "बिहाग,यमन आणि मालकंस" हे राग मोठ्या तयारीने गायले(ह्याचे बोल मात्र नीट समजू शकले नाहीत.कदाचित ती त्यांच्या घराण्याची पद्धती असावी!)मधनं मधनं ते रागाचे चलन,वादी-संवादी वगैरेंबद्दल निरूपणही करत आणि श्रोत्यांना त्या त्या रागातील नेहमीच्या परिचयाची गाणी सांगून चकित करून सोडत.मध्येच ते अण्णांची अथवा बाबूजींची एखादी आठवण सांगून श्रोत्यांशी संवाद साधत आणि त्यातून आपले गाणे फुलवत फुलवत समेवर येताना त्यांना साथ करणाऱ्या प्रख्यात तबलजी उस्ताद झाकीर हुसेन कडे मिश्किल कटाक्ष टाकत तेव्हा जी बहार उडत असे तिला तोड नाही. पंडितजींना पेटीवर साथ करायला तुळशीदास बोरकर होते आणि तंबोऱ्याची साथ त्यांच्या लाडक्या शिष्या शिल्पा आणि ऐश्वर्या ह्यांनी केली.

आणि ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो मोदबुवांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला बुवांची ओळख समस्त रसिकवृंदाला करून देण्याचे काम खुद्द पं. ठाणेकरांनीच केले. ते म्हणाले...... बुवांचे मूळ घराणे हे सुप्रसिद्ध न्हाणी घराणे. हे अतिप्राचीन घराणे होय. ह्या घराण्यातूनच आजच्या किराणा,जयपूर,ग्वाल्हेर वगैरे वगैरे घराण्यांचा जन्म झाला.ह्या न्हाणी घराण्याचे गाण्यातील रागांचे आणि तालांचे नियम मात्र अतिशय मोकळे ढाकळे. त्यामुळे ह्या असल्या नियमात म्हणण्यापेक्षा बेशिस्तीत गाणं बसवणं हे भल्या भल्या कलाकारांना आजवर जमलेले नाही.म्हणून त्यांनी आपले गाणे व्याकरणात बंदिस्त केले. कुठल्या रागात काय 'वादी' आणि काय 'संवादी' आणि कुठल्या तालात किती 'मात्रा' वगैरेंनी गाणं असं घट्ट बांधून ठेवलंय की गाणारा आणि वाजवणारा (आणि अर्थातच ऐकणाराही!) एका जागी घट्ट बांधल्यासारखा असतो! पण ह्या न्हाणी घराण्याचे गाणे कसे अगदी मोकळे,बेशिस्त ,स्वैर,बेधुंद,बेताल,बेसूर वगैरे 'बे'च्या पाढ्यासारखे आहे.इथे श्रोते बुवांचे गाणे ऐकायला आतुर झालेले होते आणि पं.ठाणेकरांचे बुवांचा परिचय करून देणे संपत नव्हते‌. सरतेशेवटी छायाचित्रकार बलुशेठ ठाणेकर हळूच पंडितजींच्या कानात जाऊन काही तरी सांगते झाले आणि मग पंडितजींनी आपले भाषण आवरते घेतले.

बुवांनी गायला सुरुवात करण्यापूर्वी घसा खाकरून इथे तिथे पाहिले. काही ओळखीच्या रसिकांशी नेत्रपल्लवी,नमस्कार-चमत्कार झाले आणि खाली मान घालून सुर लावला. अतिशय घनगंभीर असा सुर ऐकून काही रसिकांनी 'वा! वा!' चे उद्गार काढले. बुवांनी प्रेक्षकांचा अंदाज घेत 'अडाण्या'तील(श्रोत्यांना अडाणी समजत होते की काय?कुणास ठाऊक!) एक द्रुत चीज सुरू केली. बोल होते "महंमद शाह रंगेल"!साक्षात अमीरखां साहेबांनी गाऊन गाजवलेली चीज होती ती.पण अमीरखां पडले नियमांच्या बंधनात जखडलेले गायक. त्यामुळे त्यांच्या गाण्यावर मर्यादा पडत;पण मोद बुवा मात्र असे कोणतेच बंधन मानणारे नसल्यामुळे त्यांना हवे तसे गाऊ शकत होते.
(इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की न्हाणी घराण्याची गाण्याची पद्धती जरी स्वैर असली,गाण्यातले पारंपारिक नियम मानणारी नसली तरी सर्व पारंपारिक राग(फक्त रागांची नावे) आणि त्यातील चीजा मात्र तशाच्या तशा उचलल्या होत्या. त्यांचे वादी-संवादी असे काही स्वर नव्हते किंवा आरोह अवरोह वगैरे भानगड नव्हती. पारंपारिक ताल तर त्यांनी केव्हाच बाद केलेले होते.एकताल,तीनताल,झपताल,आडा चौताल वगैरे सारखे सगळ्यांना परिचित असणारे ताल ह्या घराण्याला मुळी मान्यच नाहीत. कारण कुणाच्याही तालावर नाचायला आणि गायला ह्या मंडळींना मान्यच नाही.त्यांचे तालही बेताल. त्याचे नियम(ते नाहीतच),कायदे (आता हा काय प्रकार आहे?) वगैरे सगळेच स्वैर,मुक्त! गाणं कसं स्वच्छंद(बेसूर) असलं पाहिजे. त्याला ह्या तालाची उगीच आडकाठी नको असा प्रशस्त विचार ह्या घराण्यातल्या ज्येष्ठांनी मांडला आणि ह्या सर्व गोष्टीचे आजचे चालते बोलते उदाहरण म्हणजे मोदबुवांचे चतुरस्र गायन.अहो हे बुवा काय गातात ह्यापेक्षा काय गात नाहीत असे विचारा! ख्याल म्हणू नका,ठुमरी,दादरा,कजरी,होरी म्हणू नका;झालंच तर भावगीत,भक्तिगीत,गजल,कव्वाली म्हणू नका,एव्हढेच नाही तर समरगीते,पाळणागीते,कोळीगीते,पोवाडे,लावण्या....... हुऽऽऽऽश्श! सांगता सांगता दमलो. बाकी पुन्हा कधी तरी. सद्या इतकेच पुरे. आपण बुवांचे गाणे ऐकू या.)
त्या उडत्या चालीतील चिजेचे शब्द नेमके काय होते ते बहुधा बुवांनाही माहीत नसावे;पण ह्या अशा प्रकारच्या गाण्यात लोक त्याकडे विशेष लक्ष देत नाही हे माहीत असल्यामुळे ते काहीही उच्चार करत होते. ताना, पलटे, हरकती घेताना मधनं मधनं आपल्या साथीदारांकडे मिश्किलपणे पाहत होते आणि पेटीवाले पं. ऍशवीन आणि तबलजी विकिखां मात्र गोंधळलेल्या अवस्थेत होते. तबलजी बिचारे सम जवळ आलेली आहे असे दर्शवीत पण ते बुवांच्या गावीही नव्हते. ते दाखवतील ती सम असा सगळा आनंदी आनंद होता.गाणं नेमक्या कोणत्या तालात आणि पट्टीत चाललंय हेच त्या दोघांना कळत नव्हते(इथे काय आहे की चूक तबलजी -पेटीवाल्यांची नव्हती. कारण ते पडले नियमबद्ध वादक. त्यांना बुवांच्या घराण्याची तालीम थोडीच मिळाली होती?).पण थांबला तो संपला ह्या न्यायाने तेही रेटतच होते.
शेवटी एकदाची ती 'चीज' संपली. तबलजींनी हळूच एक शंका विचारली."बुवा हे गाणं कोणत्या तालात होते? आडा चौताल होता काय?"अतिशय मिश्किलपणे बुवा त्यांना म्हणाले, "मियां! फसलात ना! अहो हा आडा चौताल नव्हता काही! हा होता"आड-तिडा चौताल ."ऐकून तबलजींची तर बोलतीच बंद झाली.पण सगळा धीर एकवटून त्यांनी पुढचे गाणे कुठल्या तालात आहे असे विचारले तेव्हा बुवांनी अतिशय दयार्द्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, " मियां!तीन ताल माहीत आहे ना? १६ मात्रांचा असतो तुमच्यात!पण तुम्ही तीन ताल च्या ऐवजी "तीन ताड" वाजवा. साडे अठरा मात्रांचा तीन ताड वाजवा. बघा कसे छप्पर उडून जाईल. आणि लक्षात ठेवा आमचे सगळे ताल हे वेगळे आहेत. तुमचा झप ताल तर आमचा 'झाप ताल'! कळले का?(तेव्हढ्यात तबलजीला 'झाप'ले)
तबलजींनी असहायपणे पेटीवाल्याकडे पाहिले(देवा! मागच्या जन्मी काय पाप केले होते म्हणून ही शिक्षा... असे भाव) . त्याच्याही डोळ्यात तेच भाव होते. पण आता अर्धी मैफल सोडून कसे जाणार? तेव्हा आता जमेल तसे वाजवायचे ,म्हणण्यापेक्षा रेटायचे! तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात तबलजीच्या मनात आले की बुवांचा 'झाप ताल' म्हणजे बहुधा श्रोत्यांचा "झोप ताल " असावा आणि कुणी सांगावे?त्यानंतर बहुधा "चोप ताल" ही असेल. आपले आपण सांभाळून राह्यला हवे.(ह्या क्षणिक विनोदी विचाराने त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकले आणि दोन्ही बाहू सरसावून त्याने नव्या जोमाने तबला कुटायला सुरुवात केली.

बुवांनी प्रेक्षकांची एकूण आवड निवड जोखलीच होती(असे बुवांना वाटत होते). प्रेक्षकांना कशी जोऽऽरकस आणि द्रुत लयीतली गाणी आवडतात. त्यात तबला असा छप्पर उडवणारा असला म्हणजे मग काय बघायलाच नको.त्यामुळेच पुढचे गाणे त्यांनी मेघ मल्हार रागातले निवडले. शब्द "का रे बदरा"(तुला देखिल वेठीस धरले म्हणून रडतो आहेस... ) असे काहीसे ऐकू येत होते.बुवा आपल्याच तंद्रीत गात होते. तबलजी त्यांचा पाठलाग करताना धापा टाकत होता.मधनंच रागाने तबल्यावर हातोडी मारत होता. अशा वेळी बुवा कौतुकाने त्याच्याकडे पाहत आणि "जियो" असे काहीसे म्हणत. पेटीवाल्याची तारांबळ तर बघवत नव्हती. कारण बुवा कुठे दमसास टिकवणार आणि कुठे छोटीसी तान घेऊन सम(त्यांची... बरं का!) साधणार ह्याचा अजिबात पत्ता लागत नव्हता.तो तर आपला सूरच हरवून बसला होता.
समोर बसलेले पं. ठाणेकर,पं.भाईंदरकर वगैरे एकमेकांकडे बघून सारखे चुकचुकत होते.खूप मोठा अपेक्षाभंग झाल्याचे त्यांच्या त्रासिक चेहऱ्यावरून सूचित होत होते.

इथे बुवा आणि त्यांच्या साथीदारांची अशी 'पकडापकडी-लपाछपी' चाललेली असताना अनपेक्षितपणे कुठूनतरी एक दगड माईकवर येऊन आदळला आणि अतिशय मोऽऽठ्ठा आवाज झाला. त्या आवाजाने बुवांची तंद्री भंग पावली आणि त्यांनी गाणे बंद केले.त्या दगडा पाठोपाठ एक १०-१२ जणांचे टोळके व्यासपीठाच्या दिशेने कुच करीत निघाले. ते बघताच तबलजी आणि पेटीवाल्यांनी आपापली वाद्य घेत तिथून पळ काढला आणि गाफिलपणे बुवा त्या टोळक्याच्या तावडीत सापडले. त्या टोळक्याने बुवांना 'चोप' तालातच बुकलून काढले. बुवांना पडलेल्या प्रत्येक फटक्याला तबलजी पडद्या आडून तबल्यावर थाप मारून साथ देत होता आणि पेटीवाल्याने लेहरा धरला होता. दोघे आपापल्या घराण्याचा अपमान अशा तऱ्हेने भरून काढत होते.
बुवांचा चष्मा एकीकडे,गाण्याची वही दुसरीकडे अशा उन्मनीय अवस्थेत काही वेळ गेला. मारण्याचा भर ओसरल्यावर मग बरीच प्रतिष्ठित मंडळी पुढे आली आणि त्यांनी त्या टोळक्याला व्यासपीठावरून हुसकावले. कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला(तो आधीच झाला होता.. इति: अंतुशेठ)होता.

बुवा गुढघ्यात मान घालून बसले होते आणि मनोमन भैरवीचे सुर आळवत होते ......
"धाव घाली विठू आता,चालू नको मंद
ब(भ)डवे मज मारिती ऐसा काय केला अपराध"!

वैधानिक इशारा: हा एक काल्पनिक कार्यक्रम होता. ह्यात आलेली नावेही काल्पनिक आहेत. दुरान्वयानेही एखाद्याला कुठे साधर्म्य जाणवले तर तो निव्वळ योगायोग समजावा.

५ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

बुवा त्यांना म्हणाले, "मियां! फसलात ना! अहो हा आडा चौताल नव्हता काही! हा होता"आड-तिडा चौताल ."
धम्माल........!!
कल्पनाशक्तीचा आविष्कार जबरी :)

vivek म्हणाले...

य़ॆ हुई ना बात अब उस्तादजी. काय झकास समीक्षण केलं आहेत आपण.कुठे बसला होतात आपण ? पहिल्या रांगेत का? (म्हणजे पहिला दगड भिरकावला तो आपणच कां असं विचारायचंय मला)

तो तबलजी भेटला होता. मोद बुवांना अशा शिव्या हासडल्या त्याने. आयुष्यात परत साथ करणार नाही बुवांना असं म्हणत होता.आणि हो, बुवांनी मान्य केलेली बिदागीदेखील दिली नाही म्हणाला. बुवांनी बहुतेक हॉस्पिटलचा खर्च तबलजीच्या बिदागीतून वळता केला असावा.

त्या मोद बुवांपेक्षा पुढच्या संमेलनात तुमचंच गाणं ठेवूया कां ? २-४ दगडांचा आस्वाद तुम्हीही घेऊन बघा की जरा :-) त्या तबलजीला मी गळ घालीन. माझ्या शब्दाखातर तो नक्की तुम्हाला साथ करेल. फक्त आधी त्याला विमा उतरवायला सांगणार आहे. त्या XXXXX तबलजीची काळजी नाही हो मला.माझी बायको विमा एजंट आहे. तिला २-३ पॉलिसीज कमी पडताहेत या वर्षीचा कोटा पूर्ण करण्यासाठी.

जाता जाता विचारतो ..... तुमचा विमा उतरवलाय का हो तुम्ही ?

अनामित म्हणाले...

मी बुवांसाठी टांग्याची व्यवस्था करण्यात गुंतलो होतो, त्यामुळे मला काही मैफलीचा आस्वाद घेता आला नाही. पण प्रस्तुत लेखामधून तो हरवलेला आनंद गवसला! धन्यवाद! :-)

तुमची कल्पनाभरारी म्हणजे राघोभरारी आहे:-)

MilindB म्हणाले...

मोदबुवा,

अहो पहिल्या रांगेत बसून आपल्या गाण्याचा आस्वाद घेणारा सरकेश्वर नागपूरकर आपण विसरलात !

- मिलिंद

Kamini Phadnis Kembhavi म्हणाले...

शब्द "का रे बदरा"(तुला देखिल वेठीस धरले म्हणून रडतो आहेस... ) असे काहीसे ऐकू>>>

वा... मजा आली वाचायला
धम्माल लिहीलयत एकुणच :)