माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जुलै, २००९

गंमत!

परवा रस्त्याने जाताना एक गंमत पाहिली. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी दूध आणायला गेलो होतो. दूधवाल्याला पैसे दिले आणि दूध घेऊन पुन्हा घरी येण्यासाठी निघालो तो काय? त्या दूधवाल्याच्या दुकानासमोर एक खाजगी गाडी येऊन उभी राहिली आणि .....

दूधवाला चांगला श्रीमंत माणूस आहे आणि तितकाच माजोरडाही आहे.त्याच्या दुकानासमोर दूधाची ने-आण करणारी त्याचीच वाहने नेहमी उभी असतात त्यामुळे रस्त्याचा तो भाग आपल्याच बापाचा असल्याच्या आविर्भावात तो नेहमी वावरत असतो.
अशा ठिकाणी एक खाजगी गाडी येऊन थांबली म्हटल्यावर त्याची काकदृष्टी तिथे गेली. त्या गाडीतून दोनजण उतरले आणि बाजूलाच असलेल्या इस्पितळात निघून गेले. चालक महाशय आपल्या जागेवरच बसून राहिले.हे सर्व इतका वेळ पाहणारा दूधवाल्याचा एक चमचा त्या गाडीजवळ जाऊन तावातावाने त्या चालकाला गाडी पुढे नेऊन लाव असे सांगायला लागला; पण चालकाने त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलं. ते पाहून तो चमचा आगाऊपणाने त्या गाडीचा दरवाजा उघडायला लागला.
इतका वेळ शांत असलेला चालक स्वतःच दार उघडून बाहेर आला. त्याच्याकडे पाहताच त्या चमच्याची वाचाच बसली. सहा-साडेसहा फूट उंच आणि चांगला धष्टपुष्ट असा तो देह पाहून चमच्याने चार पावलं माघार घेतली.

चमच्याला बधत नाही म्हटल्यावर दूधवाला आपल्या बसल्या जागेवरूनच ट्यँव ट्यँव करायला लागला आणि त्या चालकाला सुनावू लागला. पण त्या चालकाने त्याच्याकडेही काणाडोळा केला आणि शांतपणे आपली गाडी पुसू लागला.
आता मात्र दूधवाला,त्याचा चमचा आणि दूधवाल्याच्या दुकानात काम करणारी काही मंडळी संतापली. त्या चालकाच्या जवळ जाऊन त्याने गाडी अजून थोडी पुढे नेऊन लावावी असे फर्मावू लागली.

इतका वेळ शांत बसलेल्या चालकाने तोंड उघडले आणि....
इथेच एक गंमत घडली. एक कुणी तरी स्त्री उच्चरवाने भांडते आहे असा काहीसा आवाज ऐकू यायला लागला. मला पहिल्यांदा काहीच कळले नाही की हा बाईचा आवाज कुठून येतोय पण नीट लक्ष दिल्यावर लक्षात आले की तो आवाज त्या तगड्या देहातूनच येत होता. इतका वेळ भडकलेली डोकी त्या आवाजाने किंचित शांत झाली. माझ्यासारखीच आजूबाजूला असणारी बघे मंडळी हसायला लागली. इतक्या बलदंड देहाला हा असा आवाज? निसर्गाची पण काय एकेक किमया असते म्हणतात ती ही अशी.

पुढे? पुढे काय, मंडळी त्याच्या आवाजाने भांडणाचा नूरच बदलला. मग समजावणीच्या गोष्टी झाल्या आणि एकूण प्रकरणावर पडदा पडला.

२६ जुलै, २००९

माझी ’चाल’पन्नाशी!

मंडळी एक आनंदाची बातमी आहे. महाजालावरील नामांकित कवि/कवयित्रींनी रचलेल्या कवितांना चाली लावण्याच्या छंदाचे फलस्वरूप म्हणजे नुकतीच मी ’पन्नासावी’ चाल लावली.
ह्या निमित्ताने मागे वळून पाहतांना जे काही मनात आले ते आपल्यासमोर मांडतोय.

चाल लावण्याचा छंद कधी लागला म्हणाल तर तो लहानपणीच लागला असे आता सांगितले तर कदाचित तुम्ही हसाल;पण वस्तुस्थिती तशीच आहे. मी चौथीत असताना आम्हाला एक केणी आडनावाचे गुरुजी होते. त्यांनी कविता शिकवताना पारंपारिक चालींऐवजी स्वत:ची अशी चाल लावून आम्हाला जी पहिली कविता शिकवली होती ती म्हणजे...जा हासत खेळत बालनिर्झरा आनंदाने गात.
ह्या चालीने माझ्यातला ’चाल’क जागा झाला आणि त्यानंतर मात्र मी देखिल मला आवडणार्‍या कवितांना चाल लावायला सुरुवात केली. पण ते सर्व हौस ह्या सदरात होते आणि मुख्य म्हणजे त्या चाली कोणत्याही स्वरूपात मी जतन करू शकलो नाही.पण तरीही हे चाली रचण्याचे काम माझे अखंडपणे सुरु होते.

साधारण वर्षभरापूर्वी महाजालावर ओळख झालेल्या माझ्या एका संगीतकार मित्राशी म्हणजेच श्री विवेक काजरेकरांशी बोलणे सुरु होते तेव्हा अर्थात विषय होता संगीत. त्या दरम्यान त्यांना मीही ’चाल’क आहे असे सांगितले आणि त्यांनी मला एक चाल करण्यासाठी एक कविता सुचवली. मी तिला चालही लावली पण ती त्यांना ऐकवणार कशी? म्हणून त्यांनी मग ती ध्वनीमुद्रित करायला मला भाग पाडले आणि तिथूनच सुरु झाला माझ्या चाली ध्वनीमुद्रित करण्याचा उपक्रम.

ती माझी पहिली चाल होती सुप्रसिद्ध कवि श्री.प्रसाद शिरगांवकर ह्यांच्या हे गजवदना ह्या भक्तिगीताची.म्हणजे चाली ध्वनीमुद्रणाचा श्रीगणेशाच अशा रितीने झाला असे म्हणता येईल.
आणि आता ५०वी चाल ध्वनिमुद्रित स्वरूपात सादर केलेय ती आहे सुप्रसिद्ध ज्योतिषी,साहित्यिक आणि समर्थ कवि श्री. धोंडोपंत आपटे ह्यांची एक गजल...जिथे तिथे मी हर्ष पेरला जाता जाता.

आजवर ज्यांच्या कवितांना चाली लावलेल्या आहेत ते सर्वजण महाजालावरच नियमितपणे आपले लेखन करत असतात.मी ज्यांच्या कवितांना चाली लावल्या आहेत त्यांची यादी आता दिवसेंदिवस वाढत चाललेय. वर उल्लेख केलेल्या दोन कविं व्यतिरिक्त ज्यांच्या कवितांना चाली लावल्या आहेत त्यांची नावे असी आहेत....
अनिरुद्ध अभ्यंकर,अरूण मनोहर,कुमार जावडेकर,क्रान्ति साडेकर,जयंत कुलकर्णी,जयश्री कुलकर्णी-अंबासकर,तुषार जोशी,दीपिका जोशी,पुष्कराज,प्रशांत मनोहर,प्राजक्ता पटवर्धन,चक्रपाणि चिटणीस,मनीषा,मिलिंद फणसे,राहुल पाटणकर,रामदास,रेमी डिसोजा,विशाल कुलकर्णी,कामिनी केंभावी,सुमति वानखेडे आणि सोनाली जोशी.

मंडळी,खरे तर ही कविता पन्नाशी म्हणायला हवे कारण मी ज्या कवितांना चाली लावून त्या माझ्या जालनिशीवर चढवल्या आहेत त्या कवितांची संख्या पन्नास झालेय आणि त्याच वेळी काही कवितांना दोन-दोन,प्रसंगी तीन चाली लावलेल्या आहेत. त्यामुळे तसे पाहिले तर चाली पन्नास पेक्षा जास्तच होतील. :)
तरीही पन्नास कविता इथे चढवल्या म्हणून त्यांच्या पन्नास चाली असा साधा हिशोब मी केलाय.

मी वर ’आनंदाची बातमी’ असे जरी म्हटलेले असले तरी कदाचित माझ्या परिचयातील आणि नेहमीच्या संपर्कातील काही व्यक्तींना ही बातमी आनंदाची वाटणार नाही. ;) कारण?
कारण हक्काने मी त्यांचे कान खाण्याचे पाप केलेय आणि केवळ सौजन्य म्हणून त्यांनी ते सहन केलेले असू शकते. :)
तेव्हा हा लेख त्या सर्व सौजन्यमूर्तींना अर्पण करतो.

१ जुलै, २००९

गजलनवाज!

मराठी गजल-गायन,गजलेचा प्रचार आणि प्रसार अव्याहतपणे गेल्या ३७ वर्षांपासून करणार्‍या गजलनवाज भीमराव पांचाळेंशी माझी पहिली भेट साधारणपणे १२-१३ वर्षांपूर्वी झाली. ती कशी झाली, ऐकायचंय? मग ऐका इथे.