माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जून, २००९

मराठी गजल-गायनातला ध्रूवतारा!विवेक काजरेकर,गजलनवाज भीमराव पांचाळे आणि मी

काही दिवसांपूर्वी माझे मित्र संगीतकार विवेक काजरेकर त्यांच्या नवनिर्मित संकेतस्थळाबद्दल मला माहिती देत होते. आपल्या संकेतस्थळावर काय नावीन्य असेल ह्याची माहिती देताना त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला होता; तो म्हणजे मराठीतील नामांकित गायक/गायिका, संगीतकार वगैरेंच्या मुलाखतींसाठी एक खास विभाग निर्माण करण्याचा. काजरेकरांनी मला त्यांच्या संस्थचा दुवा दिलाच होता त्याप्रमाणे मी त्यावर फेरफटका मारून आलो आणि मला हे संकेतस्थळ खूपच आवडले. तरीही त्यावेळी ते जनतेसाठी खुले केलेले नसल्यामुळे मी त्याबद्दल माझ्या मित्रमंडळींमध्येही काही चर्चा केली नाही.

काजरेकर आणि माझ्या बोलण्यात बरेचदा मी माझे दुसरे एक मित्र आणि माझे आवडते मराठी गजल गायक गजलनवाज भीमराव पांचाळेंबद्दल बोलत असे. हाच धागा पकडून मी भीमरावांची मुलाखत घ्यावी असा प्रस्ताव काजरेकरांनी माझ्यासमोर मांडला. ही केवळ गंमत असावी असे समजून मी त्याला होकारही दिला. पण काजरेकरांनी ते विधान गंभीरपणे केलेले होते आणि त्यामुळेच मध्यंतरी ते सुट्टीवर भारतात आल्यावर त्यांनी लगेच भीमरावांची भेट घेण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला. मग मीही आधी भीमरावांशी बोलून घेतले आणि त्यांच्यासमोर काजरेकरांचा प्रस्ताव मांडला आणि भीमरावांनी तो आनंदाने मान्य केला. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ ठरवण्यासाठी मी सुत्र काजरेकरांच्या हाती दिली आणि त्यांनी मे महिन्यातल्या एका शनिवारची संध्याकाळी पाचची वेळ निश्चित केली.

गंमती गंमतीतला हा खेळ असा अंगाशी येईल असे मुळीच वाटले नव्हते पण एकदा मुलाखतीची तारीख आणि वेळ पक्की ठरल्यावर मी देखिल मनापासून तयारीला लागलो. खरे सांगायचे तर मला बोलायला खूप आवडते आणि कुणाशीही नव्याने ओळख झाली की मी त्या व्यक्तीला त्याच्यासंबंधीची माहिती विचारण्यासाठी बरेच प्रश्न विचारत असतो. म्हणजे ती देखिल एक जीवंत मुलाखतच असते,त्यामुळे भीमरावांची मुलाखत घ्यायची ठरल्यावर मला निश्चितच आनंद झाला. माझ्या मनातले प्रश्न त्यांना विचारावे असे कैक वेळेला मला वाटले असूनही भीमरावांची गजल गायन,प्रचार आणि प्रसारातली व्यस्तता पाहून मी नेहमीच माझे तोंड बंद ठेवलेले होते; आणि आता तर मला हे सर्व करण्यासाठी अधिकृत परवानगी आणि भरपूर वेळ मिळालेला होता. तेव्हा ही संधी मी कशी बरं सोडेन?

तर आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीकडे वळूया.

१९७२ सालापासून आजतागायत अखंड ३७ वर्षे भीमराव मराठी गजल-गायनाची आणि गजल प्रसाराची ध्वजा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहून नेत आहेत.अशा भीमरावांना मी मराठी गजल गायनातला ध्रुवतारा असे मानतो.भीमराव आणि मी

भीमराव,तुमच्याबद्दलची थोडी वैयक्तिक माहिती द्या...उदा. तुमचे बालपण,शालेय शिक्षण,महाविद्यालयीन शिक्षण तसेच संगीताचे शिक्षण वगैरे.

माझा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या एका अशा छोट्या खेड्यात झाला की जिथे शालेय शिक्षणाची सोय नव्हती.जिथे रेडिओ ऐकायला मिळत नव्हता आणि लोकगीतांव्यतिरिक्त मनोरंजनाचे कोणतेही साधन नव्हते. मी एका शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातला आहे. गावापासून शाळा तीन किलोमीटरवर होती आणि तिथे चालतच जावे लागायचे.त्यामुळे रोज ६किलोमीटरची पायपीट करावी लागायची. अशा बिकट परिस्थितीतच प्राथमिक शिक्षण झाले. संगीताची पार्श्वभूमी तशी घरातच होती. माझ्या आईचा आवाज अतिशय मधुर होता. तिच्याकडूनच मला आवाजाची देणगी मिळाली. माझे वडीलही अतिशय उत्तमपणे गायचे. हीच संगीताची शिदोरी घेऊन पुढचा प्रवास केला.

पुढे माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती त्यासाठी अमरावती गाठावी लागली. इथेच मी शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण गांधर्व महाविद्यालयात घेतले. इथे पंडीत भय्यासाहेब देशपांडे ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढचं गाण्याचे शिक्षण अकोल्याला पंडीत एकनाथबुवा कुलकर्णी ह्यांच्याकडे घेतले.

शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण अमरावतीत झाले. माझे एक हितचिंतक आणि माझ्या गाण्याचे चाहते श्री. किशोरदादा मोरे ह्यांनी माझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि मला अकोल्याला बोलावले.त्यांच्याकडे राहूनच मग मी माझे महाविद्यालयीन आणि सांगितिक शिक्षण पुरे केले.

सुरेश भट ह्यांची तुमची पहिली भेट कधी झाली?
सुरुवातीला मी सर्व पद्धतीची गाणी गायचो. त्यात शास्त्रीय,नाट्यगीत,ठुमरी,दादरा वगैरे सर्व प्रकार गायचो. तसंच उर्दू गजलाही गायचो. माझे मित्र आणि आजूबाजूचे वातावरणच असे होते की मी नववी-दहावी पर्यंत उर्दू लिहा-वाचायला शिकलो. पण एक प्रसंग असा घडला की त्यामुळे मी मराठी गजलकडे वळलो. ती गोष्ट सांगतो.अमरावतीला राजकमल चौकात सुरेश भट असे सायकल रिक्षात बसलेले असत. आजुबाजुला असंख्य रसिक त्यांचे गजल-गायन ऐकायला जमलेले असत. त्यात माझ्यासारखे विद्यार्थी,रिक्षावाले,टांगेवाले,डॉक्टर,वकील असे सर्व थरातील लोक असायचे. भटसाहेब आपल्या खड्या आवाजात गजला पेश करायचे. त्यातली एक गजल मला अजूनही आठवतेय.... तीच गजल मी माझ्या पहिल्या कार्यक्रमात पहिल्यांदा पेश केली.
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही.

भटसाहेबांची आणि तुमची प्रत्यक्ष मुलाखत कधी झाली ते आठवतंय का?

अमरावतीला मी त्यांना भेटायचो पण खरी भेट माझी अकोल्याला किशोरदादांकडे झाली.ते किशोरदांचे मित्रच होते. भटसाहेब आले की किशोरदा मला बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे, सुरेश आलाय(ते त्यांना एकेरी संबोधत) त्याला काहीतरी गाऊन दाखव. मग मीही म्हणून दाखवायचो तेव्हा भटसाहेब मला म्हणायचे...आवाज चांगला आहे बरं का तुझा. मेहनत कर,रियाज कर,गजलचा अर्थ,मर्म समजावून घे.
गजल कशी गायची ते गप्पा गप्पांमधून समजावून सांगत.

गजल गायकी कशी असावी?...बद्दल बोलताना भीमराव म्हणाले...
त्याकाळी मी पाकिस्तान रेडिओ ऐकायचो. त्यात एकदा मेहदी हसन ह्यांनी गायलेली एक गजल ऐकली आणि गजल गायन कसे असावे ह्याचा मला साक्षात्कार झाला.गजल लेखन हे जसे इतर गीतप्रकारांहून वेगळे असते तसेच गजल पेश करण्याची पद्धतही वेगळी असायला हवी आणि ती कशी हे मला मेहदी साहेबांच्या गजल गायनावरून समजले.
ती गजल अशी होती...

देख तो दिल के जहॉंसे उठता है
ये धुवॉंऽऽऽ कहॉंसे उठता है

तो ’धुवॉ’...धुर असा नजरेसमोर दिसला. अशा तर्‍हेने गजल कशी गायची ह्याचा साक्षात्कार झाला.
दोन ओळींचा शेर म्हणजे पूर्ण कविता असते असे भट साहेब म्हणत. म्हणजे त्या दोन ओळीत आशयाचा सागर असतो...गागरमे सागर. मग हा सागर बाहेर कसा आणायचा? ते मला ती गजल ऐकली आणि कळले.


सलग दीड तास ही मुलाखत सुरु होती. इथे फक्त ह्या मुलाखतीचा हा एक नमुना पेश केलाय.संपूर्ण मुलाखत लेखाच्या स्वरूपात सादर करणे फारच किचकट काम आहे. त्यातून अधून मधून भीमरावांनी पेश केलेली गान प्रात्यक्षिके ही निव्वळ ऐकण्या/पाहण्याची बाब आहे. म्हणून दृक्‌श्राव्य स्वरूपातली संपूर्ण मुलाखत ऐकायची/पाहायची असेल तर ती खालील दुव्यावर दहा भागात पाहता येईल. रसिकांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा ही विनंती.
ह्या मुलाखतीचे चित्रीकरण खुद्द विवेक काजरेकरांनी केलंय.

मी एक किंचित बिरबल!

माझ्यावर अनपेक्षित ओढवलेला एक प्रसंग आणि त्यातून मी कशी सुटका करून घेतली हे ऐकायचंय? तर ऐका.

२९ जून, २००९

स्वगत!

आपली दोन मनं असतात असे म्हटले जाते. तर अशा ह्या दोन मनांचा आपापसातला संवाद म्हणजेच स्वगत...तेच सादर करतोय. ऐकून सांगा कसे वाटतंय.


२८ जून, २००९

माझे संगणकीय आणि महाजालीय उपद्व्याप!

माझा आणि महाजालाचा संबंध सर्वप्रथम २००० साली आला. तसे त्याआधी महाजालासंबंधी बरेच काही ऐकून होतो पण प्रत्यक्ष असा परिचय नव्हता. कार्यालयात प्राथमिक अवस्थेतल्या संगणकांपासून ते पी३ पर्यंतचे संगणक हाताळले होते पण ते कुठेही महाजालाला जोडलेले नव्हते त्यामुळे जरी महाजालासंबंधी एक प्रकारचे कुतुहल होते तरी ते शमवण्याची तशी सोय नव्हती. बाहेर सायबर कॅफेत जाऊन काही करावे तर तशी हिंमतही नव्हती आणि तासाला ३०-४० रुपये देऊन तिथे जाणे म्हणजे निव्वळ पैसे फुकट घालवणे असेही वाटत होते.

२००० साली एका स्थानिक संस्थेतर्फे संगणक बनवण्याचे प्रशिक्षण देण्याबद्दलची एक जाहिरात वाचली आणि मग ठरवले की आपणही हे शास्त्र शिकून घ्यायचे. त्याप्रमाणे तिथे २५०० इतके नाममात्र शुल्क भरून नाव नोंदवले. तिथे संगणक ओळख,त्याची अंतर्गत रचना आणि कार्य,तसेच जोडणी आणि दुरुस्तीचे जुजबी ज्ञान मिळाले. त्या भांडवलावर मग मी हिंमत करून माझा पहिला संगणक बनवला .
माझ्या कार्यालयातील एका तरूण पण ह्या क्षेत्रातल्या माझ्यापेक्षा अनुभवी मित्राला साथीला घेऊन मी हा संगणक बनवला. माझ्या संगणकाची प्रमूख तांत्रिक वैशिष्ठ्ये अशी होती.
१)प्रोसेसरः इंटेलचा पी३-८६६मेगाहर्ट्झ
२)मदरबोर्डः इंटेल ८१५ चिपसेट आधारित
३)रॅमः १२८एम्बी
४)१.४४ फ्लॉपी ड्राईव्ह
५) सीडी रॉम,
६)२०जीबी हार्डडिस्क
तसेच स्पीकर्स,माऊस्,कीबोर्ड,अंतर्गत मॉडेम वगैरे जरूरीच्या गोष्टी.

संगणक जोडणी तर व्यवस्थित झाली. त्यानंतर त्यावर विंडो९८ चढवणे आणि इतर जरूरी प्रणाल्या चढवताना अनंत तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. एक तर तुटपुंजे ज्ञान आणि त्यात योग्य सल्ला देऊ शकतील असेच कुणीच आजुबाजुला नसल्यामुळे संगणक जोडणीनंतर प्रत्यक्ष संगणक व्यवस्थितपणे सुरु होईपर्यंत जवळ जवळ १५-२० दिवस मी त्याच्याशी झगडत होतो. त्याचा फायदा असा झाला की बर्‍याच गोष्टी ज्या शिकताना कळल्या नव्हत्या त्या अनुभवाने शिकलो. नुसताच शिकलो नाही तर त्याचा फायदा माझ्यानंतर ह्या क्षेत्रात पडलेल्यांना मी देऊ शकलो.

संगणकावर विंडो ९८ चढवताना आलेले अनुभव जर त्यावेळी लिहून ठेवले असते तर नवशिक्यांसाठी एक छानसे पाठ्यपुस्तक तयार झाले असते असे आज मागे वळून पाहताना वाटते. कितीतरी साध्या साध्या गोष्टी असतात ज्या अतिशय महत्वाच्या असतात पण त्याबद्दल फारसे कुणालाच माहीत नसते. मी प्रशिक्षण घेतले होते तेव्हा मलाही हे सर्व खूप सोपे वाटले होते पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर योजायचे उपाय ह्याबद्दल दूरान्वयानेही काहीही शिकवले गेलेले नव्हते किंबहुना अशा अडचणी त्या शिक्षकांनाही कधी आलेल्या नव्हत्या. त्यामुळे मी जेव्हा त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलो होतो तेव्हा ते देखिल भांबावलेले दिसले. असो.
तरीदेखिल मी माझ्या नेहमीच्या सहजासहजी हार न मानण्याच्या स्वभावामुळे त्यावर मात केली आणि एकदाचा माझा संगणक सुरु केला. त्यानंतर तो महाजालाला जोडतानाही काही अडचणी आल्या पण त्याबाबतीत मात्र मला इतरांची मदत झाली आणि एकदाचा माझा संगणक सर्वांग परिपूर्ण स्थितीत पोचला. त्यावेळचा आनंद काही और होता.

सुरुवातीला जालजोडणी होती ती एमटीएनएलच्या डायलअप प्रणालीच्या सहाय्याने होत होती. जालावर जाण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे जे जे दिसत होते ते सगळे वाचण्याचा,पाहण्याचा अट्टाहास होता. त्यामुळे तासंतास जालावर खिळून असायचो. त्यातच मधेच उगवणार्‍या चित्रविचित्र,हलत्या-नाचर्‍या जाहिराती वगैरेंच्या भूलभूलैयात मी असा अडकत गेलो की मला खाण्यापिण्याचेही भान नसायचे. त्यात अजून एक गोष्ट मोहमयी वाटायची...फसव्या जाहिराती. आपण नशीबवान ठरला आहात,आपल्याला अमूक इतके बक्षीस लागलेले आहे,मिळवण्यासाठी इथे टिचकी मारा. झाले,मग काय मारायची टिचकी. पुढे जो काही फॉर्म वगैरे असेल तो भरायचा आणि असेच गुंतत जायचे. प्रत्यक्ष बक्षीस तर कधीच मिळाले नाही पण महिना पूर्ण झाल्यावर एमटीएनएलचे बील आले ते पाहून डोळे पांढरे झाले होते....
बील होते निव्वळ रूपये ५०००+......

२३ जून, २००९

छोमा!

एक त्रिकोणी कुटुंब! आई-बाबा आणि त्यांची छोटी... वय वर्षे ३ ते ४.
बाबांनी छोटीचे लाडाने ठेवलेले नाव आहे.. छोटी माऊ म्हणजेच छोमा.
तर हे नाव आपल्या छोमाला इतके आवडले की तिने लगेच आपल्या आई-बाबांनाही नावं ठेवली.
बाबांचे नाव बाबा बोका...बाबो आणि आईचे नाव मोठी माऊ...मोमा. आहे ना छोमा हुशार!छोमाला बाबोने एक युट्युबवरचे गाणे दाखवले. ....एका माकडाने काढले दुकान. ते गाणे तिला इतके आवडले की ती आता ते साभिनय म्हणू शकते. पण पुढची गंमत म्हणजे तशा प्रकारचा खेळ खेळण्यासाठी छोमाने बाबोला दुकानदार बनवले ....माकड बनवले . त्यातल्या मनीमाऊसारखी ऐटीत पर्स घेऊन येते , पैसे देते आणि बाबोकडे उंदिर मागते. तर कधी अस्वल बनून येते आणि मध मागते.

छोमाची अजून एक गंमत सांगतो.
बाबो फोनवर त्याच्या बायकोशी म्हणजे मोमाशी बोलताना छोमा विचारायची की तू कोणाशी बोलतोय?
तर कधी बाबो सांगायचा की मी तुझ्या मंमुली मम्माशी बोलतोय तर कधी सांगायचा की मी माझ्या बायकुली बाईशी बोलतोय.
आपली मम्मा ती बाबोची बायकुली हे चाणाक्ष छोमाच्या लक्षात आले. त्याचा वापर तिने कसा केला पाहा.
बाबोच्या आधी मोमा कामावर निघाली की बाबो छोमाला बोलावून सांगायचा...आता खिडकीतून बघ तुला तुझी मंमुली मम्मा दिसेल. त्यावर छोमा मिस्किलपणे बाबोला सांगते...आणि तुला तुझी बायकुली बाई दिसेल.

तिला नावावरून कोणते नाव मुलीचे,कोणते मुलाचे ह्याचा अंदाज येतो.
तर एकदा बाबोने तिला 'स्वार्थी मगर' ही गोष्ट इंग्रजीतून सांगितली ज्यात मगर पुल्लिंगी आहे.
मग छोमा बाबोला म्हणाली, त्या गोष्टीमधील मगर मुलगा आहे ना? मग त्याला स्वार्थी नाही म्हणायचे...स्वार्थ म्हणायचे.
स्वार्थी...म्हणजे गर्ल आणि स्वार्थ म्हणजे बॉय.

छोमाला बाबोने मराठी मुळाक्षरे शिकवायला सुरुवात केली.
अ..अननस, आ..आई वगैरे.
मग छोमाशी बोलताना बाबो असे बोलायचा... आ आ आम्ही ,बो बो बोलतो , अ अ असेच, का का काहीही....अशा तर्‍हेने शिकवायला सुरुवात केली . त्या तशा बोलण्याची छोमालाही गंमत वाटायला लागली.
मग एकदा तिला नात्यांबद्दल अशीच माहिती देताना बाबो म्हणाला...आ आ आजी, आ आ आजोबा, मा मा मावशी ....
छोमाला सख्खा काका किंवा मामा नाहीये.
तेव्हा आ आ आजी, आ आ आजोबा, मा मा मावशी च्या पुढे का का काका असे म्हटल्यावर तिने विचारले..
कु कु कु कुठला का का काका?
बाबोला हसावे की रडावे ते कळेना.
मग बाबो म्हणाला...आ आ आपण अ अ असे ने ने नेहमी बो बो बोललो त त तर तो तो तोतरे हो हो होऊ.
ह्यावर छोमा फक्त मिस्किलपणे हसते.

सद्या इतकेच. छोमा आवडली तर तिच्या आणखी काही गमती-जमती सांगेन

१० जून, २००९

बंगलोरच्या आठवणी!

ऑफिसच्या कामानिमित्त मी १९७३ साली माझ्या दोन सहकार्‍यांसह बंगलोरला गेलो होतो. तिथे महिनाभर आमचे वास्तव्य होते. त्या दरम्यानच्या काही गंमतीदार आठवणी ऐका माझ्याच आवाजात.


९ जून, २००९

ऐसपैस गप्पा!

गप्पा मारायला जशा आवडतात तशाच त्या इतरांनी मारलेल्या ऐकायला आवडतात....असे जर तुमचेही असेल तर मग इथे ऐका माझ्या गप्पा. गप्पा आवडल्या/नावडल्या  तरी ऐकल्यावर सांगायला विसरू नका/संकोच करू नका.
तर ऐका ह्या ऐसपैस गप्पा!

८ जून, २००९

शब्दबंध!

आंतरजालावर स्वत:ची जालनिशी लिहीणारे काही तरूण/तरूणी एकत्र आले आणि झाला एका इ-संमेलनाचा जन्म! त्याला नाव देण्यात आले ’शब्दबंध!’ प्रशांत मनोहर,नंदन होडावडेकर आणि अजून काहीजण ह्यात सामील झाले. वर्ष होते २००८. ह्यावर्षी शब्दबंधचे पहिले इ-संमेलन झाले. भाग घेणार्‍या प्रत्येक सदस्याने आपल्या जालनिशीवरील एखाद-दुसर्‍या लेखाचे/कवितेचे अभिवाचन करायचे ही ती संकल्पना. पहिल्या वर्षी हा प्रयोग लहान प्रमाणात राबवला गेला.

ह्यावर्षी म्हणजे दिनांक ६/७जून २००९ ला हेच संमेलन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त जणांच्या सहभागाने यशस्वी झाले. ह्यावर्षी शब्दबंधचे ६० च्या वर सभासद होते. पण प्रत्यक्ष सहभाग २९ सभासदांनीच घेतला. अर्थात पहिल्या संमेलनाच्या तुलनेत ह्यावर्षी अडीचपट जास्त उपस्थिती होती. त्यामुळे हे यश निश्चितच सुखावणारे आहे.

शब्दबंधसारख्या इ-संमेलनासाठी स्काईप हे माध्यम वापरले गेले. स्काईप हा देखिल इतर संवादकांसारखाच(मेसेंजर)एक संवादक आहे ज्यात एकाचवेळी जास्त लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला इ-सभेचं स्वरूप प्राप्त होऊ शकतं. ह्यावेळी स्काईपचा उपयोग करताना बर्‍याच अडचणी आल्या. तसे बहुतेकजण हे माध्यम पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे त्यात असणार्‍या सोयी/अडचणी काही अपवाद वगळता बहुतेकांना नीटशा माहीत नव्हत्या. ह्यासाठी शब्दबंधच्या संमेलनाआधी स्काईपची चांचणी घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण कार्यबाहुल्यामुळे म्हणा अथवा काही वैयक्तिक अडीअडचणींमुळे म्हणा त्याला खूपच कमी सभासदांकडून प्रतिसाद मिळाला.

ह्या इ-संमेलनाच्या दृष्टीने विचार केल्यास आलेल्या प्रत्यक्ष अडचणी अशा होत्या.
१)एकावेळी जास्त सभासद एकत्र आल्यावर होणारा गोंधळ...एकजण बोलत असताना इतरांनी शांत राहणे अपेक्षित असते.पण ओसंडून जाणार्‍या उत्साहाच्या भरात ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही. अर्थात त्यावर उपाय होताच. प्रत्येक सत्राच्या सूत्रसंचालकाने अनुमती देईपर्यंत सर्वांनी आपापले माईक बंद(म्यूट) ठेवणे आणि ह्या पद्धतीने प्रत्येक सत्रात शिस्त राखण्याचा प्रयत्न बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल.

२)प्रत्येक सभासदाच्या जालजोडणीची बॅंडविड्थ वेगळी असल्यामुळे बर्‍याच वेळा संभाषण तुटक तुटक ऐकू येणे.एकाच वेळी जास्त खिडक्या उघडल्यामुळे देखिल बर्‍याचदा बॅंडविड्थ कमी पडत असते. अशा वेळी सभासदाचे सभेतून आपोआप बाहेर फेकले जाणे होत असते. अशावेळी यजमानाने(जो ह्या सभेत इतरांना आमंत्रित करत असतो...ही व्यक्ती सूत्रसंचालक असू/नसू शकते)लक्ष ठेवून त्या सभासदाला पुन्हा आत घेणे वगैरे गोष्टी सातत्याने करायच्या असतात.
३)स्काईपचे व्हर्जन वेगवेगळे असणे की ज्यामुळेही एकमेकांशी संवाद साधण्यात काही अडचणी येत होत्या. स्काईपवर देवनागरीतून लेखी संवाद साधण्यातही काही सभासदांना अडचण जाणवत होती...ज्यावर अजूनही तोडगा सापडलेला नाहीये.


वरील सर्व अडचणींशी सामना करत शब्दबंधचे इ-संमेलन ४ सत्रात पार पडले. प्रत्येक सत्रात अभिवाचक आणि श्रोते मिळून सरासरी १५ जण होते. हे संमेलन अतिशय रंगतदार झाले. एरवी वाचलेले लेख/कविता वगैरे त्या त्या लेखक/कवींच्या तोंडून ऐकताना एक वेगळीच मजा येते आणि ती ह्या संमेलनात मला प्रत्यक्ष अनुभवता आली.पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही मोठ्या संख्येने लोक भाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून हे छोटेखानी मनोगत संपवतो.

ह्या सभेत मी वाचलेला लेख आणि सादर केलेली कविता

२ जून, २००९

प्रणयगंध!

नव्या पिढीतील ताज्या दमाचे संगीत दिग्दर्शक श्री. विवेक काजरेकर ह्यांच्या संगीत दिग्दर्शन कारकीर्दीतील दुसर्‍या ध्वनी-गीतसंचाचे (ऑडियो अल्बम) ’प्रणयगंध’चे प्रकाशन सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ संगीतकार श्री. यशवंत देव ह्यांच्या शुभहस्ते दिनांक ३१मे २००९ ह्या दिवशी प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे प्रतिष्ठानच्या भरत नाट्यम्‌ सभागृहात झाले.
ह्या संचातली दोन गीते ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके ह्यांची आहेत, तसेच नव्या दमाच्या आणि आजच्या पिढीतील नव्या कवी/कवयित्रींपैकी वैभव जोशी(३),अरूण सांगोळे(१),प्रसन्न शेंबेकर(१) आणि क्षिप्रा(१) ह्यांचीही गीते ह्यात आहेत.
ह्या ध्वनी-गीतसंचातील गाणी वैशाली सामंत आणि अमेय दाते ह्यांनी गायलेली आहेत.


प्रणयगंधच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलची माहिती देतांना श्री. विवेक काजरेकरप्रणयगंधच्या प्रकाशनानंतर ध्वनी-गीतसंचासह (डावीकडून) श्री.विवेक काजरेकर, समारंभाचे अध्यक्ष,उद्घाटक आणि सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव,गायिका वैशाली सामंत,गायक अमेय दाते, प्रणयगंधच्या निर्मात्या सौ. वैशाली काजरेकर आणि वैभव काजरेकर


ध्वनी-गीतसंचाबद्दलचे आपले विचार व्यक्त करताना यशवंत देव


अमेय दाते एक गीत सादर करताना


प्रकाशन सोहळ्याला उपस्थित रसिकगण

ह्या ध्वनी-गीत संचात असणारी सर्व गीते अतिशय श्रवणीय झालेली आहेत. आजवर आपण वैशाली सामंतची जी गाणी ऐकत आलोय त्यापेक्षा खूपच वेगळी गाणी गायची तिला इथे संधी मिळाली आहे आणि तिने त्याचे सोने केले आहे. अमेय दातेनेही त्याच्या सहजसुंदर आवाजात गायलेली गीते ऐकल्यावर ’ह्या मुलाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे’ असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. रसिकांनी प्रत्यक्ष ऐकूनच खात्री करावी.

हा छोटेखानी पण अतिशय रंगलेला समारंभ जवळपास दोन तास चालला होता. समारंभाचे सूत्रसंचालन सद्याचे आघाडीचे निवेदक श्री. भाऊ मराठे ह्यांनी अतिशय सराईतपणे केले होते.
प्रणयगंधचे कर्ते-धर्ते श्री विवेक काजरेकरांचे मनोगतही रंगतदार झाले.
कवी-कवयित्रीं,तसेच गायक-गायिका अमेय दाते आणि वैशाली सामंत ह्यांनाही त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाने आपापल्या परीने समारंभातली रंगत वाढवत नेली. अमेय दाते आणि वैभव काजरेकर(विवेक काजरेकर ह्यांचे चिरंजीव) ह्यांनी एकेक गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
ज्येष्ठ संगीतकार आणि समारंभाचे अध्यक्ष श्री. यशवंत देवांनी त्यांच्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत आपले विचार व्यक्त केले .
श्री विवेक काजरेकर अशाच श्रवणीय आणि कर्णमधुर चाली ह्यापुढेही आपल्याला ऐकवत राहतील अशी मी खात्री बाळगतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यकालीन कार्यात सुयश चिंतितो.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते ह्या वचनाचे प्रात्यक्षिक म्हणजे इथे सौ. वैशाली काजरेकर ह्या आहेत. त्यांनी प्रणयगंधच्या निर्मितीपासून ते त्याच्या प्रकाशनापर्यंत अफाट मेहनत घेतलेय तेव्हा त्यांचा उल्लेख इथे अनुचित ठरू नये.

तर मित्रहो अशा तर्‍हेने एका रंगतदार संगीतमय सोहळ्याला हजेरी लावण्याची सुवर्णसंधी मला मिळाली त्यात तुम्हाला सामील करून घ्यावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे.