माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ जानेवारी, २००७

डिमॅट खाते कसे उघडायचे?

डिमॅट खाते उघडणे हे सेविंग्ज बँक खाते(बचत खाते) उघडण्याइतके सोपे आहे. बर्‍याचशा राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका आणि शेअर दलाली करणार्‍या संस्थांच्याकडे आपण हे डिमॅट खाते उघडू शकता.
हे खाते उघडण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्या अशा....
१) २०रु. च्या स्टँप पेपरवर खाते उघडण्याचा अर्ज करणे(हा अर्ज छापील स्वरूपात वरील सर्व संस्थांमध्ये मिळतो). त्या सोबत काही कागदपत्र जोडावी लागतात. ती म्हणजे १) घराच्या पत्त्याविषयीचा पुरावा(हल्ली रेशन कार्डाच्या ऐवजी टेलेफोन बील,विजेचे बील, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट वगैरेपैकी कोणत्याही गोष्टींची प्रमाणित(अटेस्टेड)प्रत लागते). २) पॅन कार्डाची प्रमाणित प्रत(ही अत्यंत जरूरीची आहे).३)ज्या बँकेत आपले बचत खाते आहे त्या बँकेकडून आपल्या 'सही'चे प्रमाणीकरण(अटेस्टेशन)करणे.
२)हे खाते उघडण्यासाठी काही संस्था त्याचा मोबदला घेतात तो चेकच्या(धनादेश) स्वरूपात असतो. अर्ज भरून(सर्व जरूरी कागदपत्रांसह) तो संस्थेकडे सुपूर्द केल्यापासून साधारण एक आठवड्यात आपले खाते उघडले गेल्याबद्दलचे सुचनापत्र आपल्याकडे पोचते केले जाते. ह्या खात्याची सेवा देणारी संस्था ह्यासाठी वार्षिक मोबदला घेते. तसेच ह्या खात्यात शेअर जमा करण्यासाठी प्रथम ते डिमॅट करावे लागतात. त्यासाठीची सर्व प्रक्रिया आपणाला ह्या ठिकाणी समजावून दिली जाते आणि डिमॅट च्या प्रक्रियेसाठी देखील काही मोबदला द्यावा लागतो. ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला खाते उघडताना लेखी स्वरूपात दिली जाते तसेच ती व्यवस्थित समजावून सांगितली जाते.
नम्र विनंतीः ही प्रक्रिया लेखी स्वरूपात वाचत असताना आपल्या डोक्यात बर्‍याच शंका-कुशंका येणे स्वाभाविक आहे( अशा गोष्टींचे लेखन किचकट असते आणि त्याहून ते वाचून समजणे जास्त क्लिष्ट असते.) तेंव्हा मी आज इथेच थांबतो आणि ज्या काही शंका आपल्या मनात असतील त्या आपण विचारल्यास मी त्यांना यथामती उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. ह्या पुढच्या प्रक्रिया म्हणजे शेअर्स विकायचे/विकत घ्यायचे कसे, पैशांची देवाणघेवाण कशी करायची वगैरे वगैरे गोष्टी लेख स्वरूपात मांडण्याऐवजी मला असे वाटते की त्या प्रश्नोत्तरे स्वरूपात झाली तर ते जास्त सोपे (माझ्यासाठी आणि आपल्यासाठी)होईल असे मला वाटते.

समभाग आणि त्यासंबंधाने काही! भाग ३

समभागात गुंतवणक करण्यासाठी आपल्याला अजून एक पर्याय आहे तो म्हणजे शेअर बाजार. ह्या बाजारात व्यवहार करण्यासाठी आपल्याला काही प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्याची माहिती थोडक्यात , खालील प्रमाणेः
१)डिमॅट अकाउंट २) सेविंग्ज अकाउंट ३) ट्रेडींग अकाउंट अशा तर्‍हेची तीन अकाउंट्स(खाती )उघडावी लागतात. आता ह्या खात्यांचे वैशिष्ट्य आणि गरज आपण जाणून घेऊ.
१) डिमॅट अकाउंट: हल्ली शेअर बाजारात होणारा सर्व व्यवहार हा काँम्प्युटर आणि ऑनलाईन(इंटरनेट मार्फत ) होत असतो. आपल्याकडे असणारे शेअर्स हे कागदाच्या सर्टीफिकेटच्या स्वरूपात असतात. ते त्या स्वरूपात विकणे/विकत घेणे हे आता अवैध ठरवले आहे. त्यासाठी ह्या कागदी स्वरूपातील शेअर्स(मटेरिअलाइज्ड)चे रुपांतर इलेक्ट्रॉनिक(डिमटेरिअलाइज्ड) शेअर्स मध्ये करणे बंधनकारक आहे. असे करण्यासाठी आपल्याला एक खाते उघडावे लागते त्या खात्याला डिमॅट अकाउंट म्हणतात. डिमॅट हे डिमटेरिअलाइज्ड ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. ह्या खात्याची सुविधा पुरवणार्‍या व्यापारी संस्था/बँका वगैरेंना डीपी(डिमॅट प्रोव्हायडर) असे म्हणतात. अशा ठिकाणी एखाद्याने डिमॅट खाते उघडले की आपल्याकडे असणारी शेअर्स सर्टिफिकेट्स ह्या डीपींच्यामार्फत डिमॅट स्वरूपात करून मिळतात‍ म्हणजेच आपल्या खात्यात जमा होतात.
२)ट्रेडींग अकाउंटः आपल्या खात्यातले शेअर्स आपल्याला शेअर बाजारात विकायचे असतील अथवा अजून काही खरेदी करायचे असतील तर ते आपल्याला शेअर दलाला मार्फत करावे लागते. ह्याठिकाणी आपल्याला खरेदी/विक्री करण्याची सोय मिळवण्यासाठी शे.द.कडे एक खाते उघडावे लागते त्याला ट्रेडींग अकाउंट असे म्हणतात. आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे काही शेअर्स विकतो तेंव्हा आपल्याला आपल्या डिमॅट खात्यातील त्या कंपनीचे तेव्हढेच शेअर्स आपल्या ट्रेडींग अकाउंट मध्ये जमा करावे लागतात जेणे करून आपला शेअर दलाल पुढील कारवाई करून आपल्याला विक्रीची किंमत (दलाली कापून ) देतो. ह्याच्या उलट जर आपण काही शेअर्स विकत घेतले तर त्यांची किंमत (अधिक दलाली )आपल्याला दलालाला द्यावी लागते. त्यानंतर दलाल ते शेअर्स आपल्या डिमॅट खात्यात जमा करतो. खरेदी-विक्रीचा हा व्यवहार चेक(धनादेश)द्वारेच होतो आणि म्हणूनच त्यासाठी एक सेविंग्ज खाते असणे जरूरीचे आहे. ही पध्दत(वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी खाती उघडणे आणि त्यातून व्यवहार करणे) थोडीशी किचकट आणि वेळखाऊ आहे. म्हणुनच अशा तर्‍हेच्या तीनही खात्यांची सुविधा एकत्र देणार्‍या(उद. आयसीआयसीआय बँक) ठिकाणी ही खाती उघडावीत.
(ह्या संबंधीची विस्तृत माहिती इथे तसेच http://www.nse-india.com ह्या ठिकाणी पहावी.

समभाग आणि त्यासंबंधाने काही! भाग २

भाग भांडवल(इक्विटी कॅपिटल) उभारण्याचे अनेक पर्याय आहेत. ते कोणते ते आपण बघू या.
१) जाहीर समभाग विक्री.. फक्त भारतीय आणि अनिवासी भारतीयांसाठी (पब्लिक इश्यु अथवा इनिशिअल पब्लिक ऑफर).
ह्यामधे दोन प्रकार आहेत १) मूळ दर्शनी किमतीला समभाग विकणे २) दर्शनी किंमत अधिक वाढीव किंमत(प्रिमियम)
२)जाहीर समभाग विक्री...परदेशांतील लोकांसाठी. ह्यातील काही प्रकार असे १) ग्लोबल डिपॉसिटरी रिसीट्स २)अमेरिकन डिपॉसिटरी रिसीट्स वगैरे वगैरे (ही माहिती कितपत योग्य आहे ह्या बद्दल शंका आहे. कृपया तज्ञांनी खुलासा करावा).
३)कर्जरोखे(डिबेंचर्स)ह्यात तीन प्रकार आहेत १)पूर्ण परिवर्तनीय(फ़ुल्ली कनव्हर्टीबल) २) अंशतः परिवर्तनीय(पार्टली कनव्हर्टीबल) आणि अपरिवर्तनीय(नॉन कनव्हर्टीबल). हे कर्जरोखे विक्रीला काढताना कंपनीला काही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावे लागते. ते असे.... व्याज दर,परिवर्तन कसे आणि कधी करणार आणि अपरिवर्तनीय रक्कम परत (रिडम्शन)कधी आणि कशा पद्धतीने करणार. ह्या कर्जरोख्यांतील परिवर्तनीय भाग (कनव्हर्टीबल पोर्शन) हा समभागात (इक्विटी शेअर) रुपांतरित होतो. उदा. १००० रूपयांच्या एका कर्जरोख्याला द‌.सा.द‌. शे. १०% असे व्याज देण्याचे ठरले तर हे व्याज(सरळ व्याज असते) दर सहा महिन्याने देण्यात येते. जर हा कर्जरोखा पूर्ण परिवर्तनीय असेल तर परिवर्तनाच्या अटींप्रमाणे(उदा. कर्जरोखा प्रदान करतानाच(अलॉटमेंट) ५०० रूपयांचा एक भाग हा १०रु. दर्शनी मूल्याच्या ५० समभागात परिवर्तीत होईल आणि राहिलेला ५०० रु. चा दुसरा भाग हा १०रू. दर्शनी मूल्याच्या ५० समभागात ६ महिन्याने(तारीख जाहीर करावी लागते) परावर्तित होईल.) त्याचे समभागात परिवर्तन होईल. जर कर्जरोखा अंशतः परिवर्तनीय असेल तर त्याचा कोणता आणि किती अंश केंव्हा परिवर्तनीय आणि कोणता आणि किती अंश अपरिवर्तनीय आहे हे देखील जाहीर करावे लागते.

समभाग आणि त्यासंबंधाने काही! भाग१

मराठी माणूस आणि भांडवल बाजार(शेअर बाजार) ह्याचे नाते हल्ली बरेच जवळिकीचे होत आहे हे बघून खूप बरे वाटते. भांडवल बाजार म्हणजे सट्टाबाजार असे सर्वसाधारण समीकरण आपल्या मनांत घट्ट बसलेले होते. त्या मनोवृत्तीत आता आशादायक बदल होत आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे. तरी देखील अजूनही काही लोकांच्या मनात काही मूलभूत प्रश्न असण्याची शक्यता आहे आणि म्हणून अशा लोकांसाठी काही प्राथमिक स्वरूपाची माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.(सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे, बघू किती जमते ते. विषया संबंधी काही चुका आढळल्यास तज्ञ व्यक्तीकडून त्यात सुधारणा अपेक्षित आहेत)
समभाग(शेअर) म्हणजे काय?
समभाग म्हणजे सरळ साधा जो अर्थ आपल्या सगळ्यांना माहीत आहे तोच इथे देखील अभिप्रेत आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा समान भाग. इथे शेअर म्हणजे सुद्धा समभागच होय पण तो कसला? तर एखाद्या व्यापारी कंपनीच्या (पब्लिक लिमिटेड)भांडवलाचा. कसा ? आपण उदा.बघू या..समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १कोटी रूपयांचे असेल तर भांडवलाची वाटणी छोट्या छोट्या भागात करायची. ह्यासाठी १कोटी रुपयांची समान वाटणी प्रत्येकी १०रुपये मूल्याच्या भागात केली तर अशा तर्‍हेने १०लाख समान भाग(सम भाग) होतील. इथे एका समभागाचे दर्शनी मूल्य(फेस व्हॅल्यू) १० रुपये इतके आहे. हे दर्शनी मूल्य १रु; २रु; ५रु; १०रु; ५०रु;आणि १००रु. ह्या स्वरूपात देखिल असू शकते. दर्शनी मूल्य किती असावे हे कंपनीच्या ध्येय धोरणावर ठरत असते त्यामुळे सगळ्याच कंपन्यांचे दर्शनी मूल्य एकच नसते.
भागधारक म्हणजे काय?
ज्या व्यक्तीकडे अशा तर्‍हेचे(वरील उदा.प्रमाणे) एखाद्या कंपनीचे समभाग असतील तर तो त्या कंपनीचा भागधारक ठरतो. म्हणजे त्याच्याकडे असणार्‍या समभागाच्या प्रमाणात त्याचा मालकी हक्क सिद्ध होतो. ह्याला सार्वजनिक मालकी म्हणतात. अशा ह्या भागधारकाला काही हक्क प्राप्त होतात. ते पुढील प्रमाणे......
मतदानाचा हक्कः कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत(ऍन्युअल जनरल मीटिंग) तसेच विशेष बैठकीत(एक्स्टॉ ऑर्डिनरी मीटिंग) मांडलेल्या ठरावांवर मतप्रदर्शन करण्याचा हक्क असतो.
लाभांश(डिव्हिडंड); कंपनीला फायदा झाला आणि कार्यकारी मंडळाने(बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) निर्णय घेतल्यास लाभांश(फायद्यातील अंश) घोषित होतो आणि वा.स.बै. त भागधारकानी संमती दिल्यास तो मिळण्याचा हक्क.
बक्षीस समभाग(बोनस शेअर्स) ; कंपनीला खूप मोठा फायदा झाल्यास आणि गंगाजळी(रिझर्व अँड सरप्लस) मोठ्या प्रमाणात असेल तर का.मं. बक्षीस समभागांची घोषणा करते आणि भागधारकांच्या विशेष बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर ते भागधारकांना त्यांच्याकडे असणार्‍या समभागाच्या प्रमाणात वाटले जातात. उदा. एकास एक म्हणजे भागधारकाकडे असणार्‍या एका समभागासाठी अजून एक समभाग त्याला मिळेल.
हक्क भाग(राईटस्) ; कंपनीला व्यापार वाढविण्यासाठी अधिक भांडवलाची जरूर निर्माण झाल्यास ते भागधारकांना(त्यांचा हक्क म्हणून) ठराविक एक किमतीला नवे समभाग विकते.