माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ जानेवारी, २००७

समभाग आणि त्यासंबंधाने काही! भाग ३

समभागात गुंतवणक करण्यासाठी आपल्याला अजून एक पर्याय आहे तो म्हणजे शेअर बाजार. ह्या बाजारात व्यवहार करण्यासाठी आपल्याला काही प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्याची माहिती थोडक्यात , खालील प्रमाणेः
१)डिमॅट अकाउंट २) सेविंग्ज अकाउंट ३) ट्रेडींग अकाउंट अशा तर्‍हेची तीन अकाउंट्स(खाती )उघडावी लागतात. आता ह्या खात्यांचे वैशिष्ट्य आणि गरज आपण जाणून घेऊ.
१) डिमॅट अकाउंट: हल्ली शेअर बाजारात होणारा सर्व व्यवहार हा काँम्प्युटर आणि ऑनलाईन(इंटरनेट मार्फत ) होत असतो. आपल्याकडे असणारे शेअर्स हे कागदाच्या सर्टीफिकेटच्या स्वरूपात असतात. ते त्या स्वरूपात विकणे/विकत घेणे हे आता अवैध ठरवले आहे. त्यासाठी ह्या कागदी स्वरूपातील शेअर्स(मटेरिअलाइज्ड)चे रुपांतर इलेक्ट्रॉनिक(डिमटेरिअलाइज्ड) शेअर्स मध्ये करणे बंधनकारक आहे. असे करण्यासाठी आपल्याला एक खाते उघडावे लागते त्या खात्याला डिमॅट अकाउंट म्हणतात. डिमॅट हे डिमटेरिअलाइज्ड ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. ह्या खात्याची सुविधा पुरवणार्‍या व्यापारी संस्था/बँका वगैरेंना डीपी(डिमॅट प्रोव्हायडर) असे म्हणतात. अशा ठिकाणी एखाद्याने डिमॅट खाते उघडले की आपल्याकडे असणारी शेअर्स सर्टिफिकेट्स ह्या डीपींच्यामार्फत डिमॅट स्वरूपात करून मिळतात‍ म्हणजेच आपल्या खात्यात जमा होतात.
२)ट्रेडींग अकाउंटः आपल्या खात्यातले शेअर्स आपल्याला शेअर बाजारात विकायचे असतील अथवा अजून काही खरेदी करायचे असतील तर ते आपल्याला शेअर दलाला मार्फत करावे लागते. ह्याठिकाणी आपल्याला खरेदी/विक्री करण्याची सोय मिळवण्यासाठी शे.द.कडे एक खाते उघडावे लागते त्याला ट्रेडींग अकाउंट असे म्हणतात. आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे काही शेअर्स विकतो तेंव्हा आपल्याला आपल्या डिमॅट खात्यातील त्या कंपनीचे तेव्हढेच शेअर्स आपल्या ट्रेडींग अकाउंट मध्ये जमा करावे लागतात जेणे करून आपला शेअर दलाल पुढील कारवाई करून आपल्याला विक्रीची किंमत (दलाली कापून ) देतो. ह्याच्या उलट जर आपण काही शेअर्स विकत घेतले तर त्यांची किंमत (अधिक दलाली )आपल्याला दलालाला द्यावी लागते. त्यानंतर दलाल ते शेअर्स आपल्या डिमॅट खात्यात जमा करतो. खरेदी-विक्रीचा हा व्यवहार चेक(धनादेश)द्वारेच होतो आणि म्हणूनच त्यासाठी एक सेविंग्ज खाते असणे जरूरीचे आहे. ही पध्दत(वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी खाती उघडणे आणि त्यातून व्यवहार करणे) थोडीशी किचकट आणि वेळखाऊ आहे. म्हणुनच अशा तर्‍हेच्या तीनही खात्यांची सुविधा एकत्र देणार्‍या(उद. आयसीआयसीआय बँक) ठिकाणी ही खाती उघडावीत.
(ह्या संबंधीची विस्तृत माहिती इथे तसेच http://www.nse-india.com ह्या ठिकाणी पहावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: