माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ जानेवारी, २०१२

मायबोली शीर्षक गीत!


मंडळी, ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता ते मायबोली शीर्षक गीत आज सगळ्यांसाठी जाहीरपणे ऐकायला खुले करण्यात आले आहे...

ह्या गीतामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची यादी....

संपूर्ण श्रेयनामावली
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)

गायक-गायिका:
मुंबई: मुग्धा कारंजेकर, अनिताताई आठवले,  प्रमोद देव,  मिलिंद पाध्ये,  सृजन पळसकर
पुणे: विवेक देसाई, सई कोडोलीकर, पद्मजा जोशी, स्मिता गद्रे, अंबर कर्वे, मिहीर देशपांडे
दुबई (सं. अरब अमिराती):  देविका आणि कौशल केंभावी , सारिका जोशी, दिया जोशी, योगेश जोशी, वर्षा नायर
कुवेतः जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अश्विनी गोरे
अमेरिका: जयवंत काकडे, अनिल सांगोडकर
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योगेश जोशी
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनीमुद्रण तंत्रज्ञः
    नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.

    जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.

    संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.

    मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दिप्ती जोशी (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिल सांगोडकर (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर , नंदन कुलकर्णी ), हिमांशु कुलकर्णी  आणि आरती रानडे
 निर्मिती: maayboli.inc

गीताचे शब्द आणि ते कुणी कसे गायलेत....
 गीतातील गायक क्रमः
[मायबोली.....] (मिलिंद पाध्ये)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई आठवले, योगेश जोशी)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अश्विनी गोरे व जयवंत काकडे)
[विश्वात मायबोली] (मिलिंद पाध्ये) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिल सांगोडकर)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर कर्वे व जयश्री अंबासकर)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई कोडोलीकर) ||२||

[युडलिंग (योगेश जोशी) आणि कोरस (अनिताताई आठवले, मुग्धा कारंजेकर)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व मुग्धा कारंजेकर)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व मुग्धा कारंजेकर)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका केंभावी, कौशल केंभावी, सृजन पळसकर व समूह- विवेक देसाई, मिलिंद पाध्ये, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन पळसकर)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया जोशी व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया जोशी व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा नायर व अनिताताई आठवले)
[मधले संवाद- मिलिंद पाध्ये, मुग्धा कारंजेकर व योगेश जोशी]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर देशपांडे)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर देशपांडे व समूह- विवेक देसाई, मिलिंद पाध्ये, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई आठवले, सई कोडोलीकर, स्मिता गद्रे, पद्मजा जोशी) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योगेश जोशी व सारिका जोशी)
[हार्मनी समूह-मिलिंद पाध्ये, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा जोशी, सई कोडोलीकर, स्मिता गद्रे]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योगेश जोशी, सारिका जोशी व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)आता गीत ऐका...


मंडळी,ह्या गीताचं वैषिष्ठ्य असे की ह्यात लहानात लहान साडेतीन वर्षांची दिया जोशी(योगेश जोशी आणि सारिका जोशी ह्या दांपत्याची कन्या) ते साठीचा मी, प्रमोद देव असे सर्व वयोगटातील मायबोली परिवारातले सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांनी आपला आवाज ह्या गीतासाठी दिलेला आहे. एक दोन अपवाद वगळता सगळेच कलाकार हे हौशी ह्या सदरातलेच आहेत...अशा लोकांकडून हे गीत गाऊन घेणं हे खरं तर अतिशय कठीण काम होतं...पण ते योगेश जोशी ह्या संगीतकाराने अतिशय कुशलतेने केलेलं आहे हे आपल्याला गीत ऐकल्यावर कळेलच.
२९ जानेवारी, २०१२

'साठी’च्या निमित्ताने....

मंडळी कालच म्हणजे २८ जानेवारी २०१२ रोजी माझी ’साठी’ झाली...खरंतर ह्यात माझं स्वत:चं असं काय कर्तृत्व आहे? जन्माला आलेला प्राणी मरत नाही तोवर त्याचे वय वाढतच असतं...त्या न्यायाने मी अजून जिवंत आहे. :D
कालच्या दिवसात माझ्यावर आपल्यासारख्या सुहृदांनी, मित्रमंडळींनी आणि आप्तस्वकीयांनी शुभेच्छांचा जो तुफान वर्षाव केलाय त्याच्या बळावर मी बहुदा ’शंभरी’ देखील साजरी करेन असं उगीच आपलं वाटायला लागलंय....अरेच्चा! कोण तिथे चुकचुकलं? कुणीतरी म्हटल्याचं ऐकू आलं...आयला म्हणजे आमच्या कानपुरात पूर्ण हरताळ केल्याशिवाय काय हा म्हा.....

असो...असे म्हणणारेही आमचे सच्चे मित्रच आहेत...त्यांना आमच्या प्रतिभेची असली/नसली तरी प्रतिमेची नक्कीच काळजी वाटते...काहीही म्हणा, पण त्यांच्यामुळेच सतत सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न होत असतात....आता त्या सुधारणा खरंच होतात की नाही ते आपणच जाणता...आपल्याशिवाय कोण आहेत इथे जाणकार! :)

ह्या साठ वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं? बरंच काही! दोन्हीची यादी खूप मोठी होईल...पण खरोखरंच हिशोब मांडायचा ठरवला तर....तर क गपेक्षा  वरचढ ठरतोय...सदिच्छांची कमाई...कशी कुणास ठाऊक पण प्रचंड आहे. आयुष्यात सुखदु:खाचे असे अगदी टोकाचे अनुभव आले...पण तेव्हाही हितचिंतकांची संख्या विरोधकांपेक्षा नेहमीच खूप जास्त दिसून आली...ह्याबाबतीत मी खरंच सुदैवी आहे...मला वेळोवेळी चांगले मित्र मिळाले...ह्या मित्रांचंही एक वैशिष्ठ्य ठळकपणाने दिसून येतं....

मी तसा विचारांचा पक्का माणूस आहे...म्हणजे असं की एकदा मी ठरवलं की मग त्याबाबतीत तडजोडीला कधीच वाव नसतो...अर्थात तो माझ्याकडूनच...अशा अवस्थेत समोरचा माणूसही तसाच भेटला तर?  तर काय, वादावादी, मारामारी, भांडण...काहीही घडू शकतं....आता तुम्ही सांगा अशा माणसाला मित्रांपेक्षा खरं तर शत्रूच जास्त असायला हवेत की नाही? पण नाही ना! माझे सखेसोबती, मित्रमंडळी वगैरे ही मंडळी स्वत: एरवी आपल्या मतांबाबत कितीही पक्की असली तरी माझ्याशी जुळवून घेतांना त्यांनी त्यांचा स्वत:चा अहंही कैकवेळा बाजूला ठेवलाय...मला नेहमी ह्याच गोष्टीचे आश्चर्य वाटत आलंय...मी इतरांशी जुळवून घेण्यासाठी कधीही माझ्या तत्वांना मुरड घालायला तयार नसतो...पण ही सगळी मंडळी माझ्या त्या दुर्गुणाकडे सहजपणाने काणाडोळा करून माझ्या मनाप्रमाणे करतात...त्यांच्या मनाविरूद्धही अगदी सहजपणाने ते केवळ माझ्यासाठी वागू शकतात...मला खरंच हा प्रकार म्हणजे कोडं वाटत आलाय....कळायला लागल्यापासून ते आत्तापर्यंत हाच अनुभव मी घेत आलोय...कुणी ह्याला माझी पूर्वपुण्याई देखील म्हणेल...पण मी अजूनही त्यामागचं नेमकं कारण समजू शकलेलो नाहीये....

शब्द हे शस्त्र आहे...हे मी कैकवेळा अनुभवलंय...ह्या शस्त्राने मी कैकजणांना जखमीही केलंय...कधीतरी मलाही घायाळ व्हावं लागलंय...पण तरीही जमाखर्च मांडायचा झाला तर...माझ्याबद्दल आपुलकी, सदिच्छा बाळगणारेच अवती-भवती जास्त दिसतात!

माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या म्हणाव्यात अशा लग्न, संसार ह्या गोष्टी उशीरानेच घडलेत...अगदी त्या आपल्या आयुष्यात बहुदा नसाव्यात असे वाटण्यापर्यंत टोकाच्या...पण त्या उशीरा घडल्या तरी लौकिकार्थाने त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या...संसार फार काळ नाही टिकला..पण जितका काळ झाला तो काही अपवाद वगळता सुखावहच झाला!

तुम्हाला एक गंमत सांगतो...प्रत्येक लहान मुलाची जन्मपत्रिका बनवण्याची आपल्यात पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे...आता त्यात किती तथ्य आहे/नाही हे सोडून द्या...हं तर काय सांगत होतो... माझीही जन्मपत्रिका बनवून घेतलेली होती..आमच्या आई-वडिलांनी...त्या पत्रिकेत भविष्यही लिहिलेलं होतं...काय? सांगतो.....

माझं लग्न वयाच्या पंचविशीत होईल आणि मला एक मुलगा असेल.... वास्तवात माझं लग्न झालं वयाच्या पस्तिशीत आणि मला एक मुलगी आहे... ह्यात अजूनही लिहिलं होतं...की मला राजयोग आहे. :D
आता हल्लीच्या युगात राजे-महाराजे राहिलेत कुठे....तर मी राजा होणार? अगदी नाटकातला राजाही नाही झालो....

हे सांगायचं कारण....राजयोग! अहो, ह्या बाबतीत त्या ज्योतिषाचं चुकलं असं आधी जरी मला वाटलं होतं...तरी आता मात्र मला असं वाटतंय...खरंच राजयोग आहे माझ्या नशीबात! एरवी, इतके हितचिंतक, आप्तस्वकीय आणि सुहृद कुठून मिळते? आयुष्यात समर प्रसंग आले, दु:खद प्रसंग आले, संकटं आली...पण एखादा अपवाद वगळता प्रत्येकवेळी त्यात कुणी ना कुणी ज्ञात-अज्ञात व्यक्ती मदतीला धावून आली...त्यामुळे प्रसंगांची तीव्रताही कमी झाली!

हाच! अगदी हाच तो राजयोग असावा!  :)
आपल्यासारख्या सामान्य माणसाला अजून काय हवं असतं हो?

सांगण्यासारखं खूप आहे पण त्याचं सगळ्याचं सार हेच आहे....

जीवनाच्या प्रवासातील......वाटेवर काटे वेचित चाललो.... पण तुम्हा सर्वांमुळे ते.... वाटले जसा फुला-फुलात चाललो.....इतके सुसह्य झालं!

माझ्याबद्दल आपुलकी बाळगणार्‍या सर्वांना हे लेखन अर्पण करतोय!

>

२८ जानेवारी, २०१२

कोई होता जिसको अपना...

किशोरदाच्या धीरगंभीर आवाजातलं हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे...इतके दिवस मला नीट शब्दही माहीत नव्हते...फक्त चालच डोक्यात होती...आज शब्दासकट चाल लक्षात आली....नेहमीप्रमाणेच ह्याचाही रूळ मिळाला आणि मी माझी गाण्याची हौस भागवून घेतली...ऐका आणि ठरवा...जमलंय की फसलंय ते.

२७ जानेवारी, २०१२

क्या से क्या हो गया...

मोहम्मद रफीच्या आवाजातले हे जुने अवीट गोडीचे गाणे...माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीच एक...त्याचा रूळ मिळाला मग मीही जरा घसा साफ करून घेतला....ऐका आणि ठरवा जमलंय की फसलंय ते.

२६ जानेवारी, २०१२

मेरे नैना सावन भादों....

किशोरकुमारच्या आवाजातलं हे अजून एक सुंदर गाणं...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक... माझ्या आवाजात रूळासंगे ऐका....जमलंय/फसलंय ते तुम्हीच सांगा.

२५ जानेवारी, २०१२

जाने कहॉं गये वो दिन...

मेरा नाम जोकर ह्या सिनेमातील मुकेशने गायलेले हे सदाबहार गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीचे एक...आज तेच गाणं गाण्याचा योग आलाय...एक वाद्यसंगीताचा रूळ मिळाला म्हणून..ऐकून सांगा कितपत जमलंय/फसलंय!

२४ जानेवारी, २०१२

ज्योती कलश छलके...

भाभीकी चुडियॉं ह्या जुन्या सिनेमातील ह्या गीताला सुश्राव्य संगीत दिलंय सुधीर फडके ह्यांनी आणि अर्थातच गाणारा  स्वर्गीय आवाज आहे लतादिदींचा...असं हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकीच असणं हे ओघानेच आलं...प्रभाकर जोग ह्यांनी हेच गाणं वायोलिनवर अतिशय सुरेल असं वाजवलंय..मी त्याचाच रूळ म्हणून वापर करून माझी गाण्याची हौस भागवून घेतलेय....गाणं जमलंय का फसलंय हे जरूर सांगा...मात्र मूळ गाण्याशी..विशेषत: लतादिदींच्या आवाजाशी आणि गाण्याशी ह्याची तुलना करू नये(ती तशी होणेही नाही) ही विनंती.

२३ जानेवारी, २०१२

आनेवाला पल जानेवाला है...

किशोरदाच्या आवाजातलं हे मस्त गाणं आपण नेहमीच ऐकत आलोय...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक...आज त्याचा रूळ मिळाला आणि मग मीही प्रयत्न करून पाहिला...पाहा किती जमलाय/फसलाय ते तुम्ही ऐकून ठरवा.

१८ जानेवारी, २०१२

मायबोली शीर्षक -गीत आणि मी!

२०११च्या मायबोली गणेशोत्सवात मायबोली शीर्षक-गीत लेखनाची स्पर्धा घेतली गेली.ह्या स्पर्धेतील विजेत्या गीताचे अधिकृतरित्या शीर्षक-गीत बनवण्याचे मायबोलीच्या व्यवस्थापनाने ठरवले. गीत निवड समितीत सहभागी एक सदस्य योग उर्फ योगेश जोशी ह्याने ह्या स्पर्धेत यशस्वी ठरणार्‍या गीताला स्वरसाज चढवण्याची तयारी दर्शवली.. त्यानंतर उल्हास भिडे ह्यांच्या ’भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी ... ह्या गीताची निवड झाली आणि मग आधी ठरल्याप्रमाणे त्या गीताला संगीतबद्ध करण्याची कारवाई योगेशने सुरु केली.

हे गीत सर्वस्वी मायबोलीचेच वाटावे म्हणून योगशने अशी कल्पना मांडली की ह्या गीतगायनासाठी प्रथितयश किंवा नामांकित कलाकार न घेता मायबोलीच्या सदस्यांमधूनच गायक/गायिका म्हणून निवड करावी आणि मायबोली व्यवस्थापनाने ती कल्पना मान्य केली. अर्थात ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती; पण सर्व मायबोलीकरांचा ह्या गोष्टीला सक्रिय पाठिंबा मिळेल ह्याबाबत योगेशला जणू खात्री असावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझी योगेशशी ओळख झालेलीच होती. तेव्हा साहजिकच मुंबईत असे कुणी मायबोलीकर गायक-गायिका आहेत का अशी त्याने माझ्याकडे विचारणा केली...मायबोली गणेशोत्सवाच्या वेळी मी काही गीतांना चाली देऊन ती काही लोकांकडून गाऊन घेतली होती...इतकीच खरं तर माझी मायबोलीवरची कामगिरी होती..त्यामुळे मला तसे फारसे मायबोलीकर ओळखत नव्हतेच...वर्षाविहार २०११ला हजेरी लावल्यामुळे त्यातल्या त्यात काही मुंबईकर/पुणेकर माबोकरांशी जुजबी म्हणता येईल अशी ओळख झालेली होती...त्या आधारावर मी काही जणांशी ह्याबाबत संपर्क साधून विचारणा केली पण दूर्दैवाने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.ही गोष्ट मी योगेशच्या कानावर घातली.

खरं तर अशा गोष्टीसाठी मायबोलीवरूनच जाहीर आवाहन करावं असं माझ्या मनात आलं होतं...तसं मी योगेशला सुचवावं असंही मला वाटत होतं...पण मी ते सुचवण्याआधीच मायबोली व्यवस्थापनाने तसे जाहीर आवाहनही केले...आणि मग देशविदेशातल्या मायबोलीकरांनी त्याची दखल घेऊन त्यात जी कलाकार मंडळी होती त्यांनी ह्या प्रकल्पात भाग घेण्याची जाहीर इच्छा प्रदर्शित केली...हुश्श! चला, आपल्याला कुणी दाद दिली नाही तरी आता बरीच मंडळी स्वत:हून पुढे आलेत तेव्हा आता हे कार्य व्यवस्थित मार्गी लागेल हे नक्की...आता मायबोली, योगेश आणि ते कलाकार काय ते जाणोत...आपण आपल्या विश्वात रमूया..असा विचार करून मी स्वस्थचित्त झालो.

अहो पण ते कसं शक्य होतं? मला योगेशचा निरोप आला...काका, तुम्हालाही मी ह्यात गायक म्हणून गृहित धरतोय आणि मुख्य म्हणजे मुंबईतल्या कलाकारांना एकत्र जमवण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवतोय..चालेल ना? विषय माझा आवडीचा असल्यामुळे त्यात न चालण्यासारखे काहीच नव्हते...बाकी आजवर कधीही वाद्यांच्या साथीने, तालासुरात गायलेलो नसल्याने मी गायक म्हणून कितपत चालून जाईन ह्याची मलाच खात्री नव्हती..तसे मी योगेशला बोलूनही दाखवले...त्यावर..ते माझ्यावर सोपवा...असे त्याने म्हटले आणि मग मी सगळा भार त्याच्यावर टाकून निश्चिंत झालो.

मुंबईतल्या ज्या मंडळींनी नावं दिली होती त्यापैकी भुंगा (मिलिंद पाध्ये) ह्याला मी वविपासूनच ओळखायला लागलो होतो...दुसरी रैना..मायबोलीच्या गणेशोत्सव २०११मध्ये तिने माझी एक चाल गायलेली होती म्हणून तिला ओळखत होतो..गऊ २०११मध्ये माझी दुसरी एक चाल गाणारी अगो(अश्विनी)..तिची आई म्हणून अनिताताईंबद्दल ऐकून होतो...अशा तिघांशी संपर्क साधून त्यांना एकत्रितपणे एका ठिकाणी जमवून योगेशने तयार केलेली संगीतरचना सगळ्यांनी मिळून गाण्याचा सराव करणे ही कामगिरी माझ्याकडे सोपवण्यात आली...त्याप्रमाणे आमची पहिली बैठक माझ्याच घरी झाली...दिनांक १५ऑक्टोबर २०११रोजी!
IMG_1152.jpg
योगेश, अनिताताई, रैना आणि भुंगा

ह्या बैठकीला स्वत: योगेशही हजर होताच...आमची सराव बैठक छानच झाली....त्यानंतरची दुसरी सराव बैठक अनिताताईंच्या घरी झाली..त्या बैठकीला मी, योगेश, भुंगा, रैना, अनिताताई आणि माबो शीर्षकगीताचे रचयिता श्री उल्हास भिडेही हजर होते...ही बैठकही उत्तम झाली....दिनांक २४ऑक्टोबर २०११रोजी!
त्यानंतर प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणासाठी वाकोला-सांताक्रुझच्या इम्पॅक्ट स्टुडिओत २ नोव्हेंबर २०११ रोजी आम्ही जेव्हा एकत्र जमलो तेव्हा त्यात अजून एक छोटा कलाकार सहभागी झाला होता...सृजन पळसकर...अमोल पळसकरचा मुलगा. ध्वनीमुद्रणाआधीही आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकत्र सराव करून घेतला आणि त्यानिमित्ताने नरडी साफ करून घेतली...त्यानंतर मग आम्हा सगळ्यांच्या आवाजात दोन ओळी समुहगायनाच्या रूपात ध्वनीमुद्रित करून घेतल्या गेल्या... मग रैना,सृजन आणि अनिताताईंच्या आवाजात वैयक्तिकपणे संपूर्ण गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले...तोवर त्यादिवशीची वेळ संपली होती...मी आणि भुंगा बाकी राहिलो होतो.

DSC07648.JPG
ध्वनीमुद्रण प्रमुख नदीम

IMG_1190_0.jpg
संगीतकार योगेश,संगीतसंयोजक प्रशांत लळित आणि ध्वनीमुद्रण प्रमुख नदीम तांत्रिक चर्चा करतांना...उल्हासजी आणि भुंगा उत्सुकतेने ऐकताहेत.

त्यानंतर पुन्हा एकदा ध्वनीमुद्रणासाठी स्टुडिओ उपलब्ध झाल्यावर मी, भुंगा आणि स्वत: योगेश ह्यांच्या आवाजात वैयक्तिकपणे पूर्ण गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले...माझ्या आयुष्यातील अशा तर्‍हेचा हा पहिलाच अनुभव
असूनही मला स्वत:ला त्याबद्दलचे कोणतेही दडपण जाणवले नाही...मात्र त्याच वेळी आपण जे काही गाणार आहोत ते तालाच्या बंधनात गायचंय हे दडपण मात्र सतत होतं...त्याचा परिणाम म्हणजे माझं गाणं तालात व्यवस्थितरित्या बसलं...पण त्याच वेळी शब्दातल्या भावना मात्र मी नेमकेपणे व्यक्त करू शकलो नाही...गाणं एकूण सपाट झालं होतं.
त्यानंतर पुण्याच्या कलाकारांचं ध्वनीमुद्रण ठरलं...मला आणि भुंग्याला अजून एक संधी मिळाली..ध्वनीमुद्रणाची. मी योगेश आणि भुंगा असे तिघेही दिनांक १८ नोव्हेंबर २०११रोजी भुंग्याच्याच गाडीतून सकाळी दहाच्या सुमारास पुणेमुक्कामी पोहोचलो..तिथे स्मिता पटवर्धनच्या घरी सगळे जमणार होते...तिथे आमच्या आधीच विवेक देसाई,सई कोडोलीकर आणि पद्मजा जोशी असे तिघेजण हजर होतेच..स्मिताला मात्र कामावर जावं लागलं होतं...त्यानंतर इथे पुन्हा आम्ही सगळ्यांनी गाण्याचा वैयक्तिकपणे आणि एकत्रपणे सराव केला....त्यानंतर जेवण झालं..थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग ध्वनीमुद्रणासाठी जाण्याआधी स्मिता आली होती..तिचा सराव करून घेऊन आम्ही निघालो...प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणासाठी एरंडवणे येथील ’साऊंड आयडियाज’ स्टुडिओत.

IMG_1252.jpg
योगेश,सई, पद्मजा, विवेक देसाई आणि भुंगा

IMG_1254.jpg
जेवणाची वाट पाहात आहेत...पद्मजा,सई,गिरीराज, योगेश, भुंगा,विशाल कुलकर्णी आणि विवेक(गिरीराज आणि विशाल आम्हाला खास भेटायला आले होते)

IMG_1280.jpg
ध्वनीमुद्रण प्रमुख जयदीप

इथेही आधी काही विशिष्ठ ओळी सामुहिक रुपात गाऊन ध्वनीमुद्रित केल्या गेल्या...त्यानंतर स्मिता, पद्मजा, सई, विवेक, भुंगा, स्वत: योगेश आणि शेवटी मी...अशा क्रमाने प्रत्येकाच्या आवाजात काही विशिष्ठ ओळी ध्वनीमुद्रित केल्या गेल्या...ध्वनीमुद्रण संपेस्तोवर रात्रीचे साडेबारा झाले होते...तशाही स्थितीत पुणेकरांचा निरोप घेऊन मी, योगेश आणि भुंगा मुंबईला निघालो...भुंग्याने आजची गाण्याची संधी अतिशय उत्तम रितीने साधलेली होती ह्यात तीळमात्र शंका नव्हतीच...पण त्याने इतक्या अपरात्रीही मुंबईपर्यंतचे सारथ्यही अतिशय कुशलतेने केले हे त्याहूनही विशेष म्हणावे लागेल... आधी योगेशला त्याच्या ठाण्याच्या घरी आणि नंतर मला...माझ्या घरी मालाडला सोडून...ह्यावेळी १९ नोव्हेंबर २०११चे पहाटेचे साडेपाच वाजले होते..... मगच भुंगा त्याच्या घरी गोरेगांवला पोचला.

हा झाला गीतासंबंधीचा छोटेखानी वृत्तांत...ज्याच्याशी मी प्रत्यक्षपणे निगडित होतो... आता ह्यातून मला काय फायदा झाला त्याबद्दल थोडेसे....
मी एक हौशी गायक आणि किंचित ’चाल’क आहे हीच माझी आजवरची खरी ओळख ...त्यामुळे आजवर कधीही सूर-ताल वगैरेचा फारसा विचार गांभीर्याने न करताच गात आलेलो आहे,चाली लावत आलोय .. त्यातूनही ताल तर अगदीच बेताल म्हणावा इतका माझ्याशी फटकून वागणारा...अशा परिस्थितीत संगीतकार योगेशने ह्या गीतगायनात मला सहभागी करून घेणे हेच खरे तर आधी माझ्यासाठी मोठे आश्चर्य होते आणि म्हणूनच नंतर ती एक मोठी जबाबदारी होऊन बसली...त्याचा परिणाम म्हणून मग त्याने पाठवलेले नमुना गीत मी हजारो वेळा ऐकलं आणि त्यामुळेच की काय मी ते गीत बर्‍याच प्रमाणात आत्मसात करू शकलो...मी इथे दोन गोष्टी नमूद करू इच्छितो..१)ह्या संपूर्ण गीतामध्ये माझ्या वैयक्तिक आवाजातली किमान अर्धी ओळ जरी समाविष्ट झालेली असेल तर ते माझ्या दृष्टीने खूप मोठे इनाम ठरेल.
२) ह्या गीत गायनाच्या निमित्ताने माझ्यातला तालाबाबतचा बराचसा (अजून पूर्णपणे म्हणता येणार नाही) न्युनगंड दूर झालाय असे मी म्हणेन...आणि त्याचे संपूर्ण श्रेय मी योगेशलाच देईन...त्याने मला ह्यात गायनाची संधी दिली नसती तर कदाचित असा बदल माझ्यात घडलाही नसता....म्हणूनच माबो शीर्षकगीतामुळे झालेला हा माझा सर्वोच्च फायदा आहे असे मी मानतो.

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा: पूर्ण गीत लवकरच ऐकायला मिळेल..तोवर ह्यावर समाधान माना.


झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलिंद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिकाची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

खोया खोया चांद, खुला आसमान...

रफीसाहेबांनी गायलेलं हे अजून एक सदाबहार गीत....काला बाजार सिनेमातलं आहे....माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक...त्याचा रूळ मिळाला आणि मीही आपलं नरडं साफ करून घेतलं...फक्त दोनच कडवी म्हणण्याइतका रूळ आहे त्यामुळे तेवढीच गायलेत....ऐका आणि सांगा हा प्रयत्न जमलाय की फसलाय?

१७ जानेवारी, २०१२

देव देव्हार्‍यात नाही....

’झाला महार पंढरीनाथ’ ह्या चित्रपटातील गदिमा रचित हे एक सुंदर गीत...ह्याची संगीतरचना केलेय सुधीर फडके आणि गायलंयलही त्यांनीच....माझ्या आवडत्या गीतांपैकी हे एक....प्रभाकर जोग ह्यांनी त्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेले हे गीत मी ऐकले आणि मग त्याचाच रूळ बनवून मीही माझा घसा साफ करून घेतला...ऐका आणि सांगा..हा प्रयत्न किती जमलाय/फसलाय?

१४ जानेवारी, २०१२

कोई सागर दिलको बहलाता नही...

शकील बदायुनी ह्यांची ही रचना, नौशादसाहेबांचे संगीत, रफीसाहेबांच्या आवाजातली ही एक अतिशय सुंदर आणि दर्दभरी गझल...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हेही एक...जालावर ह्याचा रूळ सापडला आणि मग मलाही मोह आवरला नाही आपलं नरडं साफ करण्याचा....ऐका आणि तुम्हीच ठरवा...जमलाय की फसलाय हा प्रयत्न.


पुन्हा एकदा केलाय प्रयत्न...ऐकून सांगा...जमलाय की फसलाय?

शब्दावाचून कळले सारे......

कविवर्य मंगेश पाडगांवकरांचं गीत,पुलंचं संगीत आणि पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायलेले हे गीत माझ्या आवडत्या गीतांमधलं एक आहे....संजय देशपांडे ह्यांनी हेच गीत सतारीवर वाजवलंय....त्यांनीही अतिशय छान वाजवलंय ते...मूळ चाल न बदलता तरीही स्वत:चं असं काही तरी...त्यामुळे ते डोक्यात चटकन बसत नव्हतं...आमचं काय हो...आम्ही अभिषेकीबुवांनी जसं गायलंय तसंच गाण्याचा प्रयत्न करत असतो...त्यामुळे डोक्यात तेच सूर,त्याच जागा दिसत असतात...त्यामुळे ह्या सतारीवर वाजवलेल्या गीताचा रूळ बनवून गाण्याचा माझा प्रयत्न म्हणावा तेवढा यशस्वी होत नव्हता...त्यातून ते ठाय लयीत होतं...मग काय थोडी लय वाढवली आणि केला प्रयत्न....डोक्यात अभिषेकी आणि प्रत्यक्ष सतारीबरोबर...म्हटलं तर अगदी साधंच गायचंय...तेव्हा थोडाफार गोंधळ नक्कीच उडालाय..तरी आवडेल आपल्याला हा प्रयत्न असं वाटतंय...ऐका आणि आपणच ठरवा काय ते.

१३ जानेवारी, २०१२

दिवाना हुआ बादल...

काश्मीर की कली ह्या चित्रपटातील रफीसाहेब आणि आशाताईंनी गायलेलं हे सुंदर गीत...रफीसाहेबांचा मधाळ, अवखळ आणि नखरेल स्वर तर आशाताईंचा मधाळ आणि लाडिक आवाज..दोन्हीही एकमेकांना अतिशय पुरक असेच आहेत...आता हे गीत मी गायचे म्हणजे पीडाच की हो...माझ्या दृष्टीने नव्हे... मी काय वाट्टेल ते गाऊ शकतो. ;) ते मी तुम्हा श्रोत्यांच्या भूमिकेतून म्हणालोय मी. :ड पण काय करणार अशोक वायगणकरसाहेबांनी मेंडोलिनवर वाजवलेलं हे मस्त गाणं मिळालं...मग बनवला त्याचाच रूळ आणि धावडवली माझी गाण्याची एक्स्प्रेस..त्यावरून...अगदी सुसाट... आता इथे आलाच आहात तर ऐका हो... :)

ये है मुंबई, मेरी जान!

मंडळी खरं तर हे गाणं असं आहे...अय दिल है मुश्किल जीना यहॉं, जरा हटके , जरा बचके, मेरी बॉम्बे, मेरी जान! ... मोहम्मद रफी आणि गीता दत्तने गायलेलं आणि अतिशय गाजलेलं...लहानपणापासूनच माझंही आवडतं गाणं आहे हे...अशोक वायगणकरने माऊथ ऑर्गन आणि मेंडोलिनचा वापर करून हे गाणं मस्त वाजवलंय...मग मी त्याचाच रूळ बनवून माझी गाण्याची हौस भागवून घेतली....एक मात्र आहे...त्या बॉम्बेचे आता मुंबई असं अधिकृत नामकरण झालेलं असल्यामुळे मी ते ’मुंबई’ असंच सगळीकडे गायलंय...म्हणून शीर्षकही...ये है मुंबई, मेरी जान’ असंच दिलंय...गाणं ऐका आणि ठरवा कितपत जमलंय/फसलंय ते.

१२ जानेवारी, २०१२

है अपना दिल तो आवारा...

हेमंतकुमारच्या आवाजात गाजलेलं हे माझ्या लहानपणचं गीत...आज ते मला अशोक वायगणकरांनी माऊथ ऑर्गनवर वाजवलेलं मिळालं..मग काय त्याचाच रूळ बनवून मीही  माझी हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..जमलंय की फसलंय ते.

११ जानेवारी, २०१२

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई...

माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असा हा संत तुकारामांचा  अभंग श्रीनिवास खळेसाहेबांनी संगीतबद्ध केलाय आणि लतादिदींच्या सुरेल आवाजात आपण नेहमीच ऐकत असतो...प्रभाकर जोग ह्यांनी तो त्यांच्या गाणार्‍या वायोलिनवर वाजवलाय...मी आपला मग नेहमीप्रमाणेच त्याचा रूळ बनवून माझ्या गाण्याची हौस भागवून घेतली...आता कितपत जमलाय/फसलाय हे तुम्हीच ठरवा...ऐकून.

या डोळ्यांची दोन पाखरे

पाठलाग ह्या जुन्या चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील हे एक गाजलेले गाणे...संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेले मला मिळाले..मग काय त्यालाच रूळ बनवून मीही केला गाण्याचा प्रयत्न!

१० जानेवारी, २०१२

जे वेड मजला लागले...

सुधीर फडके आणि आशा भोसले ह्यांच्या आवाजातलं हे सुरेल युगुलगीत खरं तर मी एकटा कसा गाणार? पण ह्यात आशाताईंचा सहभाग अगदी कमी आहे(तरीही अतिशय मोहक असाच आहे)...तरीही मी तो  भाग नाईलाज म्हणून वाद्यासाठीच सोडून दिला...
संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेल्या ह्या गीताचा रूळ बनवून मी हे गीत गायलंय...ऐकून सांगा जमलंय/फसलंय का?

६ जानेवारी, २०१२

चौदवीका चांद हो...

माझ्या बालपणात बिनाका-मालावर लागणार्‍या त्या काळच्या सुप्रसिद्ध आणि अवीट गोडीच्या गाण्यांपैकी एक हे...चौदवीका चांद हो...मोहम्मद रफीने काय नखरेलपणे हे गाणे गायलंय...आज इतक्या वर्षांनी मला ह्या गाण्याचा रूळ सापडला आणि मग मीही माझं नरडं साफ करून घेतलं...मंडळी..एक सांगायचंच राहिलंय..मी तसा तालात मुळातच कच्चा आहे त्यामुळे ह्या गाण्याबरोबरच इतर गाण्यातही बरेचसे ’हलेडुले’ झाले असण्याची दाट शक्यता आहे..तेव्हा विनंती आहे की ज्यांना ताल कळतो त्यांनी इथे मी गायलेल्या गाण्यातल्या त्या चुका अगदी बिनधास्तपणे सांगाव्यात...नेमक्या जागा सांगितल्या तर अजूनच मदत होईल मला...असो,आता गाणं ऐका.


आधीच्या गाण्यात थोडी सुधारणा केली आहे...खरंच तशी ती झालेय का? ऐकून सांगा.

चांद सी मेहबुबा हो मेरी!

हिमालयकी गोदमे ह्या जुन्या चित्रपटातील मुकेश ह्यांच्या आवाजातले हे गीत त्याकाळी अतिशय लोकप्रिय असे होते...आज त्याचा रूळ सापडला आणि मीही त्यावर गायचा प्रयत्न केलाय...

४ जानेवारी, २०१२

एक धागा सुखाचा!

जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील ग.दि. माडगुळकर लिखित ,गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्या आवाजातील ’एक धागा सुखाचा’ हे गीत माझे अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे. संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेले हे गीत मिळताच मी त्याचा रूळ बनवून त्यावर आपलं नरडं साफ करून घेतलंय...ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय.

३ जानेवारी, २०१२

सुहानी रात ढल चुकी!

’सुहानी रात ढल चुकी’ हे मोहम्मद रफी ह्यांनी गायलेले गाणे माझे खूप आवडते आहे...कैक दिवसांपासून ते माझ्या नरड्यातून हवे तसे निघत नव्हते...अनायासे जालावर त्याचा रूळ मिळाला मग काय केला प्रयत्न...आज शेवटी एकदाचे बर्‍यापैकी जमलंय असं वाटतंय...ऐकून कसे ते आपणच ठरवा.

त्या फुलांच्या गंधकोषी!

सूर्यकांत खांडेकर ह्यांचे गीत,संगीत आणि आवाज हृदयनाथांचा..एक सुंदर गीत...हे सतारीवर वाजवलंय संजय देशपांडे ह्यांनी..मी त्याचाच वापर रूळ म्हणून करून माझी गाण्याची गाडी त्यावरून चालवलेय...ऐका आणि सांगा..कितपत जमलंय/फसलंय.

२ जानेवारी, २०१२

झिमझिम झरती श्रावणधारा!

मधुकर जोशी ह्यांचे शब्द,दशरथ पुजारी ह्यांचे संगीत आणि सुमनताईंचा आर्त आवाज...अजून एक वेड लावणारं गाणं...प्रभाकर जोगसाहेबांनी वायोलिनवर अतिशय सुरेल वाजवलंय...मग काय त्याचाच रूळ बनवून मीही माझी गाण्याची हौस भागवून घेतलेय...माझ्या आवाजात ती आर्तता नाही जाणवणार...जी सुमनताईंच्या आवाजात आहे..तरीही ऐकून सांगा...कसा वाटला प्रयत्न.

श्रावणात घन निळा बरसला!

’श्रावणात घन निळा बरसला’ कविवर्य मंगेश पाडगांवकरांचे शब्द,खळेसाहेबांची चाल आणि लतादिदींचा आवाज...असा त्रिवेणी संगम साधला गेलेले हे गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे...हेच गीत प्रभाकर जोग ह्यांनी त्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलंय...जोगसाहेबांनी हे गीत त्याची लय वाढवून वाजवलंय...म्हणून मी त्याची लय कमी करून मूळ गीताच्या लयीशी मेळ खाईल अशी ठेवलेय...खरंतर,हे गीत माझ्यासारख्याच्या भसाड्या आवाजासाठी मुळीच नाहीये ह्याची मला पूर्ण कल्पना आहे..तरीही हे गीत मला खूप आवडते म्हणून जसे जमेल तसे गायचा प्रयत्न केलाय...मूळ गीताशी त्याची तुलना होणे शक्यच नाही आणि कुणी करूही नये..तेव्हा मी निदान दोन-पाच टक्के जरी व्यवस्थित गाऊ शकलो असे आपणास वाटले तरी केलेला प्रयत्न सार्थकी लागला असे वाटेल...तर ऐका...खरंच सांगतो..हे गीत माझ्या आवाजात ऐकायला सिंहाची छातीच हवी. :D
नवीन वर्षातले माझे हे तिसरे रूळ-गायन आहे

विसरशील खास मला!

प्रभाकर जोग ह्यांनी वायोलिनवर वाजवलेल्या ’विसरशील खास मला’ ह्या गीताचा रूळ वापरून मी ते गाणं गायलंय...ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय ते.

१ जानेवारी, २०१२

उठि श्रीरामा पहाट झाली!

प्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेल्या ’उठि श्रीरामा पहाट झाली’ ह्या गीताचा रूळ म्हणून वापर करून मी आपलं नरडं साफ करून घेतलं....नवीन वर्षातलं हे पहिलंच गाणं.