माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ ऑगस्ट, २०१०

पुन्हा एकदा शिवथरघळ !

दिनांक २८ ऑगस्टला पुन्हा एकदा दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ येथे जाण्याचा योग चालून आला. मंडळी, मी काही भाविक वगैरे प्रकारातला माणूस नाही. दासबोध तर सोडाच पण मनाचे श्लोक आणि रामरक्षा लहानपणी कधी तरी पाठ केलेले...आता जवळपास पुर्णपणे विसरलेलो आहे. समर्थ रामदासांच्या अध्यात्मिक नव्हे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी लाभलेला त्यांचा सक्रीय पाठिंबा....जावळीचे मोरे आणि  शिवाजी महाराज ह्यांच्यात  समझोता निर्माण व्हावा ह्यासाठी समर्थांनी इथे खास वास्तव्य केले, अफझलखान इत्यादि आक्रमकांच्या सैनिकी हालचालींची बित्तंबातमी महाराजांपर्यंत पोचवण्यासाठी ठिकठिकाणी मठ स्थापन करून तिथल्या शिष्यांकरवी हेरगिरीचे काम करविले..इत्यादि...हे माझे समर्थांच्याबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण आहे. त्या काळात त्यांनी गावोगावी मारूतीची देवळे स्थापून तरूणांच्यात व्यायामाबद्दल निर्माण केलेल्या जागृतीमुळे  स्वराज्यासाठी विजिगिषू वृत्तीने लढणारी कुमक निर्माण झाली....ह्या गोष्टी मला जास्त मोलाच्या वाटतात...त्यामुळेच असे हे समर्थ कुठे कुठे गेले, कुठे राहिले ह्याबद्दल बर्‍याच गोष्टी ऐकून आहे...त्यातलंच हे एक ठिकाण...चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले, जावळीच्या गर्द खोर्‍यात वसलेले, एका आडमार्गावर असलेली घळी...घळई  म्हणजे शिवथरघळ...जिथे समर्थांनी बराच काळ म्हणजे जवळपास १० वर्षे  वास्तव्य केलं आणि दासबोधासारखा ग्रंथराज निर्माण केला....ह्या घळीत पुन्हा जाण्याचे माझ्यासाठी असलेले सर्वात मुख्य आकर्षण होते...तो म्हणजे त्या घळीच्या शेजारीच असणारा धबधबा....अशा ह्या शिवथरघळीचे  वर्णन समर्थांच्याच शब्दात ....


गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळें ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥१॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्लोळ उठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥२॥

तुषार उठती रेणू । दुसरेरज मातले ।
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रीत धुकटे ॥३॥

दराच तुटला मोठा । झाड खंडेपरोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधें वोघ वाहती ॥४॥

गर्जती श्वापदें पक्षी । नाना स्वरें भयंकरें ।
गडद होतसे रात्री ।ध्वनी कल्लोळ उठती ॥५॥

कर्दमू निवडेना तो । मानसी साकडेपडे ।
विशाळ लोटती धारा । ती खालेरम्य विवरे ॥६।

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणेचर्चा । सार्थके काळ जातसे ॥७॥

ह्या वर्णनातला  "धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।"  ह्या ओळी माझ्यासाठी , मला तिथे पुन्हा जाण्यासाठी उद्युक्त करणार्‍या होत्या. कारण ह्या आधी मी गेलो होतो तेव्हा उन्हाळा होता आणि हा धबधबा अक्षरश: कोरडा होता....पण समर्थांचे ते शब्द..माझ्या मनात नेहमीच रेंगाळत असतात...साहजिकच ही उत्सुकता...की खरंच हा धबधबा जेव्हा वाहात असेल तेव्हा नक्कीच प्रेक्षणीय असणार...तेव्हा ठरवलं की ही आलेली संधी फुकट घालवायची नाही....आणि त्याप्रमाणे मी ती संधी साधू शकलो..ह्याबद्दल मला खचितच आनंद वाटतोय.

शनिवारी सकाळी ६ वाजता घरातून निघालो आणि जिथून मला बसमध्ये बसायचे होते तिथे ६-१५ला पोचलो. बस येईपर्यंत ६-४० झालेले होते...मात्र पाऊस नसल्यामुळे तशी वाट पाहण्याने फार काही त्रास जाणवला नाही. इथे उभे असतांना  एक असे दृष्य पाहिले....जे तसे म्हटले तर रोजचेच आहे...मला मात्र ते थोडे गंमतीदार वाटले....नाक्यावर दोनतीन जण तारेत गुंफलेली मिरची-लिंबू घेऊन उभे होते....तिथे येणार्‍या बहुसंख्य गाड्यांना जुनी सुकलेली गुंफण काढून ती ताजी गुंफण जोडली जात होती...अशा तर्‍हेने आपापल्या वाहनांना वाईट नजरांपासून वाचवणार्‍यात अगदी ट्रक-रिक्षा चालकांपासून ते अगदी कैक लाखाच्या खाजगी गाडयाही होत्या....म्हणजेच दुसर्‍या भाषेत बोलायचे तर अगदी अशिक्षितांपासून ते  उच्चशिक्षितांपर्यंत सगळेजण त्या लिंबू-मिरच्यांमध्ये ओवले गेलेले होते.  एकीकडे आम्ही विज्ञानवादी वगैरे आहोत अशी शेखी मिरवणारे....इथे मात्र निमूटपणे ह्या बंधनात अडकलेले दिसले. असो...जे दिसले ते सांगितले....आता पुन्हा मूळ विषयाकडे वळतो.

आमची बस आली. त्यात चढलो....एकूण २०-२५ जण सहप्रवासी होते. तसे ओळखीचे कुणीच नव्हते...त्यामुळे बराच काळ गप्प बसून राहिलो. त्यानंतर सहजपणे ठाकूर गुरुजींशी ओळख झाली....आणि मग ते बोलत राहिले आणि मी ऐकत राहिलो. आश्रमशाळा, आदिवासी आणि त्यांचं जीवन ह्यात जवळपास संपूर्ण हयात गेलेले ठाकूर गुरुजी त्यांचे एकेक अनुभव सांगत होते आणि मी शांतपणे ऐकत होतो. आपल्याला सहजासहजी मिळणार्‍या कैक गोष्टी...म्हणूनच कदाचित त्याची किंमत आपल्या लेखी नगण्य असते....त्यातलीच एखादी गोष्ट त्या आदिवासींना मिळाली की त्यांचा आनंद कसा बहरून येतो...हे सांगतांना ठाकूर गुरुजींच्या चेहर्‍यावरही एक वेगळाच आनंद दिसत होता.

ह्या गप्पांमध्ये गुंगलेलो असतानाच बस आम्हाला घेऊन पोचली नागोठण्याला...जिथे आमच्या न्याहारीची व्यवस्था केलेली होती. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपास धरणारे बरेच सहप्रवासी होते...त्यामुळे सगळ्यांसाठी सरसकट छानपैकी साबुदाण्याच्या खिचडीचा बेत होता....साखि,त्यावर दही आणि ओलं खोबरं....मग काय विचारता? मंडळींनी आडवा हात मारला...त्यानंतर चहा/कॉफी सेवन झाले आणि आम्ही पुढे निघालो.

तिथून आम्ही महाडला गेलो...महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यासाठी सत्त्याग्रह केला होता त्या ’चवदार तळ्याचे’ दर्शन घेतले. ह्या तळ्याविषयी आजवर जे काही वाचलेले होते की  ज्यामुळे माझी उत्सुकता खूपच वाढलेली होती....पण प्रत्यक्षात माझा खूपच विरस झाला. एक राष्टीय स्मारक म्हणून निगा बर्‍यापैकी राखलेली असली तरी ज्याचा उल्लेख ’चवदार तळे’ असा होतो..त्याचे पाणी पूर्णपणे हिरवट दिसत होते...तसंच त्यात बर्‍याच प्रमाणात कचराही टाकलेला दिसत होता....तळे चारी बाजूंनी व्यवस्थित बांधून काढलेले असले तरी त्याचे पाणी आता कुणी पिण्यासाठी वापरत असेल असे मात्र वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये....त्यामुळेचपाण्याची चव चाखता नाही आली.  :(
हे सगळं उरकेपर्यंत जेवणाची वेळ झालेली...त्यामुळे महाडच्याच जवळ एका ठिकाणी विठ्ठल कामतांच्या उपाहारागृहात आम्ही सगळ्यांनी आपापली क्षुधा शांती करून घेतली...जेवण तसे चांगले होते...पण मराठी पद्धतीचे नसून चक्क पंजाबी पद्धतीचे होते...मराठी लोकांना मराठी पद्धतीचे जेवण आवडत नाही की...उपाहारगृहांमध्ये मराठी पद्धतीचे जेवण बनवण्यासाठी आचारी नसावेत...की अजून काही....कारणं काय असतील मलाही माहीत नाही...पण महाराष्ट्रात देखिल मराठी पद्धतीच्या जेवणाऐवजी इतर पद्धतींचे जेवण मिळण्याच्या ह्या शक्यतेमुळे मला स्वत:ला हा आपला कमीपणा वाटतो हे आवर्जून सांगावेसे वाटले.

तिथून मग थेट आम्ही निघालो ते शिवथरघळीला पोचलो. तिथे पोचेस्तो ३ वाजून गेलेले होते. भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करून मग आम्ही निघालो धबधब्याखाली नाहायला....पण हाय रे दूर्दैवा...धबधबा अशा कारणांसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे...तिथे जाण्याचे सगळे रस्ते पार तारांची कुंपणं घालून बंद केलेल दिसले.
माझा तर एकूणच विरस झाला....ज्यासाठी इतका अट्टाहास करून आलो होतो...तेच करायला मिळणार नाही म्हटल्यावर दुसरं तरी काय होणार?  :(
असो. जी गोष्ट होणे नाही म्हटल्यावर त्याबद्दल जास्त विचार का करा....म्हणून मग सगळी मंडळी निघाली भिजायला ...जिथे कुठे भिजायला मिळेल तिथे....धबधब्यापासून निर्माण होणार्‍या सावित्री नदीच्या प्रवाहाकडे मग सगळ्यांची नजर वळली....पण आधीच तुफान पाऊस पडून गेलेला...त्यामुळे पाण्याचा प्रवाह मात्र खूपच वेगवान दिसत होता...मग पुढे पुढे शोधत जात एका ठिकाणी मंडळींना पाण्यात थोडेफार डुंबता येईल अशी जागा दिसली आणि सगळी उत्साहाने पुढे सरसावली.

मी मात्र धबधबा नाही तर ओला होणार नाही...ह्या माझ्या मतावर ठाम राहिलो....नुसत्या पाण्यात भिजण्यासाठी....पावसाच्या पाण्यात भिजण्यासाठी इतके सव्यापसव्य करून इतक्या लांब कशाला जायची जरूर आहे? मुंबईत काय कमी पाऊस आहे काय भिजायला?...हा आपला माझा विचार....म्हणून मग मी आपल्या प्रग्रामध्ये जमेल तेवढे सृष्टीसौंदर्य साठवून घ्यायला सुरुवात केली.

माझ्या दिव्य दृष्टीला दिसलेले आणि प्रग्रामध्ये कैद करता आलेले काही दृष्यकण आता आपल्यासाठी इथे देत आहे.त्यादिवशी संध्याकाळी साडेसहा ते जवळपास साडेआठ वाजेपर्यंत...संध्याकाळची प्रार्थना होती.. ’ गाड्या बरोबर नळ्याला यात्रा ’  ह्या म्हणीप्रमाणे मीही त्यात सामील झालो....कधीतरी टाळ्या वाजवणे सोडले तर मला काहीच काम नव्हते...बरेच उत्साही भाविक त्यात रंगून गेल्यासारखे दिसत होते...काही अर्धवट, तसे दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते तर काही जमेल तसे सामील झालेले दिसत होते...मीच बहुदा एकटा असावा...जो देहाने तिथे असूनही मनाने इतरत्र वावरत होतो. श्लोकांमागून श्लोक, समासांमागून समास, आरत्या, दासबोधाचे वाचन, मनाचे श्लोक इत्यादि नाना प्रकार त्यात सामावलेले दिसत होते... ते दोन तास मी कसे काढले मलाच माहित नाही...पण कधी एकदा तो प्रकार संपतोय असं झालं होतं...शेवटी  संपलं  एकदाचं आणि मग सगळ्यांना चमचा चमचा प्रसाद वाटण्यात आला.

इथल्या काही गोष्टी मात्र मला आवडल्या. ठराविक वेळी घंटा वाजतात...चहासाठी, जेवणासाठी, प्रार्थनेसाठी इत्यादि. मग इच्छुकांनी त्यात सहभागी व्हायचे असते.
चहा इथे तयार करून एका नळ असलेल्या पिंपात ठेवलेला असतो. बाजुलाच एका ठिकाणी कप मांडून ठेवलेले असतात. आपण आपल्यासाठी कप घेऊन रांगेने जाऊन आपल्यासाठी चहा घ्यायचा असतो...स्वत: नळ सोडून...त्यानंतर चहा पिऊन झाल्यावर बाहेर जाऊन नळावर तो कप धुवून मग पुन्हा तो पूर्ववत जागेवर आणून ठेवायचा...सगळी स्वयंशिस्त...छान वाटला हा उपक्रम...कुणी नोकर नाही, सेवक नाहीत.

जेवणाच्या वेळी, न्याहारीच्या वेळीही असेच. रांगेत जाऊन मांडणीतून ताटे-वाट्या-भांडी आपली आपण घ्यायची...इथे मात्र वाढायला एक दोन स्वयंसेवक असतात....ताट वाढून घेतले की तिथेच असलेल्या सभागृहात खाली मांडी घालून बसायचे आणि जेवायचे....जेवण उरकल्यावर पुन्हा जाऊन ताट-वाटी-भांडं घासून आणून जागेवर ठेवायची....सगळं कसं एकदम शिस्तबद्ध काम चालतं.

त्या रात्री आम्ही तिथेच भक्त निवासात झोपलो...दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून काहीजण काकड आरतीत सामील झाले...अर्थात मी नाही.  :)
त्यानंतर चहा, न्याहारी वगैरे करून मग आम्ही शिवथरघळीतून बाहेर निघालो.
शिवथरघळीला आदल्या दुपारी पोचल्यापासून ते दुसर्‍या दिवशी सकाळी तिथून निघेपर्यंत पाऊस अखंडपणे बदाबदा कोसळत होता...पावसामुळे तसे सगळे वातावारण कुंद आणि सुस्त झालेले होते तरी आजूबाजूचा हिरवा आसमंत, ढगात,धुक्यात हरवलेले डोंगरकडे, धबाबा कोसळणारा धबधबा आणि वळणं घेत घेत वेगात वाहणारी सावित्री नदी....ह्या सर्वांमुळे मला स्वत:ला खूपच समाधान मिळाले...माझ्या प्रग्रामध्ये मी जमेल तसे आणि जमेल तेवढे त्याचे रूप साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.......आणि ह्या संपूर्ण प्रवासाची फलनिष्पत्ती म्हणावी तर हीच की.....हे सगळं मला अनुभवता आलं.....बस्स! त्यामुळे एरवी कैक कारणांनी झालेला विरस जमेस धरला तरी समाधानाचं पारडं जास्त जड आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

इति अलम्‌!

२६ ऑगस्ट, २०१०

काय होणार आहे ह्या देशाचं?

महागाईने सगळे लोक त्रस्त झालेत; लोक प्रतिनिधींनीही आपल्या पोळीवर तूप ओतून घेतलंय...
अहो पण का?
का, म्हणजे काय? त्यांनाही महा घाई आहे ना...
तुम्हाला महा घाई म्हणायचंय की महागाई? एकदा काय ते नेमकं बोला.
सांगतो...त्याचं काय आहे की महागाई तर वाढलेलीच आहे...संघटीत कामगार,सरकारी नोकर इत्यादिंना महागाई भत्त्यात तुटपुंजी का होईना पण वाढ करून मिळतेय...बाकी जनतेचं काहीही होवो...पण ह्या महागाईचा बाऊ करून लोकप्रतिनिधींनाही आपले भत्ते वाढवून...वाढवून म्हणजे किती? ३०० पट!
काय सांगताय काय? इतके?
अहो, हो, चालायचंच मोठ्यांचं सगळंच मोठं असतं ना...मग त्यांची महागाईही  तेवढीच ’महा’ असणार ना!
हं! असं आहे तर...जाऊ द्या झालं...ज्याच्या हाती ससा तो पारधी..म्हणजे ज्याच्या हाती सत्ता तो.....
गरीब दिवसेंदिवस अजून गरीब होतोय..त्यामुळे लाचारी वाढतेय..मग त्या लाचारीतून निर्माण होतोय राग आणि रागातून निर्माण होतोय नक्षलवादासारखा अतिरेकी मार्ग....हे एक दुष्टचक्र आहे. आपलेच कैक भाऊबंध इतक्या हलाखीत जगत आहेत तरी कुणालाच त्याचे सोयर सुतक नाही. हे जे गोरगरिंबाचे आणि जनतेचे प्रतिनिधी असे स्वत:ला म्हणवून घेतात..त्यांना जर महागाईच्या झळा जाणवत असतील तर ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्याबद्दल का नाही हे बोलत..महागाईभत्ते वाढवून घेण्याऐवजी महागाई कमी व्हावी ह्यासाठी का नाही उपाययोजना करत?
हॅ हॅ हॅ ! कायच्या काय बोलता राव तुम्ही. हल्लीच्या जमान्यात कोन कुनाचा नसतो म्हाईत नाय काय तुमाला?
अहो म्हणून काय झालं? निवडणुकीच्या वेळी आपल्याकडेच येतात ना ते मतं मागायला?
राहू द्या, कळलं आता...उगाच जास्त पकवू नका.
बरं बाबा, नाही पकवत.

आता आपण दुसरं काही बोलू या का?
हो, पण काय बरं बोलायचं?
ते जेम्स लेन प्रकरण काय आहे हो...त्यावरून म्हणे आता दादोजी कोंडदेवांचा पुतळाही लाल महालातून हलवणार आहेत.
छे हो, अहो खरं काय आहे माहीत आहे काय? आपल्यातलीच काही छिद्रान्वेषी लोकं खाजगीत काही तरी कुजबुजली आणि ती कुजबुज ह्या जेम्स महाशयांनी  त्यांच्या पुस्तकात छापली...झालं त्यावरून आता रणं माजलेत.
पण काय हो, कुजबुज तरी काय आहे नेमकी?
खरं सांगू, मी काही वाचलेलं नाहीये....हो उगाच खोटं कशाला बोला....पण एकच सांगतो शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे...आणि कुणी एखादा उपटसुंभ त्यांच्याबद्दल कुणाच्या तरी सांगण्याने काही अपशब्द उच्चारत असेल तर त्यामुळे आमच्या मनातील महाराजांच्या प्रतिमेला तडा जाण्याइतपत ती प्रतिमा तकलादू नाहीये. हातात पेन आहे म्हणून कुणी काहीही लिहील...आम्ही त्यामुळे विचलीत होणार्‍यातले नाही. आमच्यातली काही इतिहास अभ्यासू आणि तज्ञ मंडळी अशा लोकांना काय ते उत्तर द्यायला आहेत समर्थ...त्यामुळे आम्ही त्याची फिकीर करत नाही.
अहो, पण आपल्यातलीच काही मंडळी ह्याचा वापर करून आता जातीपातींवर घसरलेत....त्यामुळे हे प्रकरण वेगळेच वळण घेत आहे...त्याचं काय करणार?
दूर्दैवाने हे खरं आहे...छत्रपतींचा वारसा सांगणारे काहीजण आपल्या क्षणिक राजकीय फायद्यासाठी हे सगळं घडवून आणत आहेत...आणि हीच खरी शोकांतिका आहे....असल्या घरभेद्यांशी लढण्यात महाराजांची अर्धी शक्ती खर्च झाली...आजही तेच सुरु आहे...आपल्या आपल्यात लढण्यातच आपली शक्ती खर्च होतेय..
अहो, मग ह्यावर उपाय काय?
तात्कालिक उपाय म्हणाल तर काहीही नाही...तुका म्हणे उगी राहावे,जे जे होईल ते ते पाहावे....अहो साक्षात प्रभू रामचंद्रालाही वनवास चुकला नाही आणि श्रीकृष्णाची तर जन्मत:च जन्मदात्या आईपासून ताटातूट झाली..तिथे तुम्ही आम्ही काय? जे व्हायचे आहे ते होणार, टळणार नाही..कदाचित ह्यातून अजून काहीतरी चांगले उपजेल असा विचार करायचा...इतकंच आपल्या हातात आहे.
अहो, पण जे होतंय ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला?
वाटतं ना! पण काही लोकांची चुकत चुकत शिकण्याची प्रवृत्ती असते....त्याला आपण काय करणार? जाऊ द्या त्यांना आपल्या लायनीप्रमाणे.

अजूनही बरेच बोलण्यासारखे विषय आहेत...पण आपण फक्त बोलूकाकाच आहोत...आपल्या बोलण्याने इकडची काडी तिकडे हलत नाही...त्यामुळे आत्ता इतकंच पुरे.
रामराम!
छ्या! तुम्ही च्यायला नेहमीच शेपूट घालता राव!
अहो, नाही हो, मोडेन पण वाकणार नाही हा आमचा बाणा आहे..आम्ही परकीयांविरुद्ध केव्हाही,कुठेही लढू शकतो..पण आपल्याच लोकांविरुद्ध.... नाही, नाही! आमचे हात नाही उठणार ..मग आमची गर्दन उडाली तरी बेहत्तर...
मग मरा. एक दिवस तुम्हाला हा देशही सोडावा लागेल.
काय तरीच काय बोलता राव. महाराजांचे भक्त आहोत आम्ही...इथल्या मातीतच मरू पण मायभूमीशी कधीच गद्दारी नाय करणार..समजलं काय? वैयक्तिक आमच्या जगण्याने आणि मरण्याने देशाचा काहीच फायदा नुकसान होणार नाहीये हे आम्हालाही माहीत आहे...पण आमची नाळ पुरलेय इथल्या मातीत..त्यामुळे सद्द्याचे अस्थिर राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहून  काळजी मात्र वाटते....काय होणार ह्या देशाचे?  :(
एकीचे बळ काय असते...हे आम्हाला कधी कळणार?
महाराज, पाहता आहात ना!

२४ ऑगस्ट, २०१०

छोटेखानी कट्टा.मंडळी आपले सगळ्यांचे स्नेही , पुण्यनगरी निवासी श्री. सुरेश पेठेसाहेबांचे मुंबईत आगमन झालेले आहे. आज त्यांचे माझ्या घरी येण्याचे नक्की झाल्यावर आपले तरूण मित्र सुहास झेले आणि सचिन उथळे-पाटील ह्यांनाही त्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले गेले.

आज दुपारी दोनच्या सुमारास पेठेसाहेबांचे माझ्या घरी आगमन झाले; थोड्याच वेळात  सचिन आणि सुहासही येऊन दाखल झाले.


थोडा वेळ नमस्कार चमत्कार आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग विषय साहजिकच आपल्या बझ आणि बझकरांकडे वळला. बझकरांबद्दल बोलतांना साहजिकच बोलणे खादाडीवर येऊन ठेपले आणि मग काय खानपानाला सुरुवात झाली. आधी पेठेसाहेबांनी खास पुण्याहून आणलेल्या चितळ्यांच्या बाकरवडीचा समाचार घेणे सुरु झाले....त्या पाठोपाठ कांद्याचा खाकरा(मालाडमध्ये फक्त एकाच दुकानात मिळतो बरं का!), मग बेसन लाडू,पातळ पोह्यांचाचिवडा असे एकामागून एक पदार्थ येत राहिले आणि गप्पांची मैफलही उत्तरोत्तर रंगत गेली. त्यानंतर शेवटी मसाले-चहाने खादंती यज्ञ समाप्त झाला. गप्पांच्या नादात सुहासने आणलेले श्रीखंड मात्र खायचे राहूनच गेले.  :(

त्यानंतर माझ्या लग्नाचा छायाचित्रसंग्रह दाखवण्याचा/पाहण्याचा कार्यक्रम झाला. छायाचित्रं पाहतांना सगळ्यांमध्ये विशेष औत्सुक्य जाणवत होतं...विशेष करून तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी ह्यातला लक्षणीय बदल पाहतांना.  :D

ह्या दरम्यान मधून मधून बझकडे पाहणे सुरु होते. कोण काय बोलतंय,कोण काय म्हणतंय ह्यावर सुहास आणि सचिन बारीक लक्ष ठेवून होते.  ;)

साधारण पाचच्या सुमारास मग गप्पांचा भर ओसरल्यावर आम्ही सगळे बाहेर गेलो...खास सुहास आणि सचिनसाठी कांदा खाकरा खरेदी साठी. सुदैवाने त्यांना दोघांना प्रत्येकी एकेक पुडा मिळाला आणि दोघांचे चेहरे एकदम प्रफुल्लित झाले.  :)

त्यानंतर सचिन आणि सुहास मालाड रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले...पुढे बोरिवलीला जाऊन तिथून एसटी पकडून सचिनला आपल्या बहिणीकडे ठाण्याला रक्षाबंधनाचाठी जायचे  होते...त्याला एसटीत व्यवस्थित बसवून देण्याची जबाबदारी सुहासवर सोपवली गेली होती.    ;)                                                                                                                                 

त्यानंतर मी आणि पेठेसाहेब पुन्हा माझ्या घरी आलो. पेठेसाहेबांना  जालनिशीबद्दलच्या काही बाबी माहिती करून घ्यायच्या होत्या...मला जितकी माहिती होती ती मी त्यांना दिली. त्यानंतर साधारण साडेसहाला पेठेसाहेब गमनकर्ते झाले. अशा तर्‍हेने आमचा एक छोटेखानी कट्टा अतिशय मनमोकळ्या वातावरणात पार पडला.

      
सर्व छायाचित्रं पेठेसाहेबांच्या प्रग्राने(प्रतिमा ग्राहकाने) काढलेली आहेत.


अवांतर: कॅमेरासाठी प्रतिशब्द प्रतिमा ग्राहक...आपले मित्र विनायक रानडे ह्यांनी अतिशय नेमका शब्द मराठीत रुजवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

२३ ऑगस्ट, २०१०

योग,भोग की अजून काही?

काल एका नातेवाईकांकडे सत्यनारायणाच्या पुजेला गेलो होतो. माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही पण नाती राखण्यासाठी,माणसं राखण्यासाठी आपल्याला बर्‍याचदा आपल्याच मनाविरूद्ध काही करावं लागतं त्यातलाच हा एक प्रकार.तिथला पूजा सांगणारा उपाध्याय म्हणजे आपल्या सरळ भाषेत बोलायचं झालं तर भटजी हा एक वयाची तिशी ओलांडलेला तरूण होता. अंगापिंडाने मजबूत,दिसायलाही बर्‍यापैकी,दोन्ही हातांच्या काही बोटात कसल्या कसल्या आंगठ्या,कानात वरच्या बाजूला भिकबाळी,पाळीजवळ डूल अशा अवतारातल्या त्या तरूणाकडे पाहिल्यावर लक्षात आलं की त्याचा भिक्षुकीचा धंदा अगदी व्यवस्थित सुरु आहे.तसा ओळखीतलाच निघाला. त्याचे वडील एकेकाळी आमच्या लहानपणी आमच्या घरी काही धार्मिक कार्यात भटजीगिरी केलेले होते. हल्ली मात्र ते पूर्णपणे नास्तिक झालेत असेही त्याच्याकडून ऐकले. आता काय म्हणावे ह्याला?बर्‍याचदा असे होते की लोक जन्मभर नास्तिक असतात..पण काही कारणाने अचानक आस्तिक बनतात...अशा लोकांची संख्या आपल्याला भरपूर मिळेल.पण हे वरचे उदाहरण त्यामानाने विरळाच. असो...आपल्याला काय त्याचे? आले असतील त्यांना काही विपरीत अनुभव ज्यामुळे त्यांचा विश्वास तुटला असावा.

बघा, हे असं होतंय. मला सांगायचं काही वेगळंच आहे आणि भलतंच काही सांगत राहिलो. हं तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ या.
तर तो तरूण भटजी. आजवर कैक मंगल कार्य,धार्मिक कार्य त्याच्याकडून घडली/घडवली गेली असतील. साम्पत्तिक स्थितीही पूर्वीच्या तथाकथित दरिद्री ब्राह्मणांच्या तुलनेत नक्कीच श्रीमंत वाटावी इतपत. रूप आहेच पण...पण अजून तरी विवाह योग नाही. इतरांचे विवाह लावत असतांना ह्याच्या मनात काय बरं भावना असतील?अमूक ग्रहाची शांती, तमूक व्रतवैकल्य करा म्हणजे मनोकामना पूर्ण होईल असे दुसर्‍यांना सल्ले देणारा आणि त्यामुळे त्या लोकांचे काही प्रमाणात समाधान करणारा हा तरूण स्वत:च स्वत:साठी काय बरं उपाय करत असेल?

माझ्या माहितीत अजून एक गुजराथी भटजी होते...होते म्हणजे आता ते हयात नाहीत.पण एकेकाळी त्यांचा व्यवसाय खूपच तेजीत होता. सर्वप्रकारच्या मंगलकार्य,धार्मिक का्र्यांमध्ये ह्यांना तुफान मागणी होती. झालंच तर पत्रिका बनवणे, मुहूर्त काढून देणे, शांती वगैरे करणे इत्यादि गोष्टीत अगदी हातखंडा असणार्‍या ह्या भटजींना श्वास घ्यायलाही फुरसत नसायची.ह्या भटजींनी किती जणांचे विवाह जुळवले आणि लावले ह्याचीही गणती नसेल.
ह्यांना दोन मुली आणि दोन मुलगे होते....भटजींच्या हयातीतच मोठी मुलगी आणि मुलगा उपवर झाले होते पण भटजी काही त्यांच्यापैकी कुणाचेही लग्न जमवू शकले नाहीत. तसे पाहिले तर मुलगा-मुलगी दोघेही दिसायला नीटनीटके होते. भटजी जाईस्तो..मुलीच्या वयाची तिशी उलटली होती पण तिचे लग्न झालेच नाही...आणि तिच्यापेक्षा एखाद वर्षाने लहान असणार्‍या मुलाचेही लग्न झाले नाही. पुढे मोठ्या मुलाने आपल्या वडीलांची गादी चालवायला प्रारंभ केला..व्यवसाय अगदी उत्तम सुरु राहिला...पण बहिणीच्या अथवा स्वत:च्या लग्नाबाबत तो काहीच करू शकला नाही. पाहता पाहता धाकटी दोन्ही भावंडंही उपवर झाली तरी घरात कुणाच्याही विवाहाचे वारे वाहिले नाही.शेवटी मात्र एक चमत्कार झाला...मोठ्या मुलाने परजातीतल्या एका मुलीशी सूत जमवलं आणि परस्पर विवाह करून पौरोहित्याचा व्यवसायही सोडून दिला.
आता धाकटा चालवतोय ती गादी...अजूनही दोन बहिणी आणि तो स्वत: अविवाहित आहेत.मोठी बहीण पन्नाशी ओलांडलेली आणि ही दोन्ही भावंडही चाळीशी पार केलेली...हे सगळं पाहिल्यावर मनात विचार येतो की...हा काय प्रकार आहे? ह्याला योग म्हणावे की भोग म्हणावे? सगळं काही व्यवस्थित असतांना ह्या लोकांच्या जीवनात विवाह योग का नसावा? ज्यांच्या हातून इतरांचे विवाह संपन्न झाले,वेळप्रसंगी त्यांच्या सल्ल्याने लोकांच्या अडचणी दूर झाल्या...मग ह्यांचा काय दोष म्हणून हे असेच कोरडे राहिले?

अजून असंच एक कुटुंब पाहिलं. दोन बहिणी आणि दोन भाऊ. त्यातल्या मोठ्या बहिणीने प्रेमविवाह केला...पण बाकीचे तिघेही अजूनपर्यंत अविवाहित आहेत...आजच्या घटकेला मोठा भाऊ साठी पार केलेला आणि दुसरे दोघे भाऊ-बहीण साठीच्या उंबरठ्यावर आहेत. आजवरच्या आयुष्यात कैक लोकांच्या लग्नाला ह्यांनी हजेरी लावली असेल...त्यावेळी काय वाटत असेल त्यांना?

जगात असे किती तरी लोक आहेत ज्यांची एक नाही चांगली दोन दोन तीन तीन लग्न झालेली आहेत/होत आहेत. पण असे कैक लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात हा योगच नाहीये. कैक वेळेला आपण पाहातो...अगदी व्यंग असणार्‍या लोकांची...अंध,मूक-बधिर लोकांचीही लग्नं होतांना दिसतात पण ह्या धडधाकट, कामधंदा,व्यवसाय व्यवस्थित सांभाळणार्‍या काही लोकांची लग्न कधीच होत नाहीत?

मी दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ह्यात काही ठिकाणी वैयक्तिक,अनुवंशिक इत्यादी बाबी अशा असतीलही ज्या ह्या लग्न जुळण्याच्या आड येत असतील...तरीही समाजात आज एकूणच अशा अविवाहित लोकांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

काय म्हणावे ह्याला? योग,भोग की अजून काही?

२१ ऑगस्ट, २०१०

माझ्या लग्नाची चित्तरकथा !

इ-बूक चा एक प्रयोग म्हणून हा लेख एकत्रित स्वरूपात इथे टाकत आहे. कसा वाटतोय ते सांगा.

माझा तरूण मित्र सचिन उथळे-पाटील ह्याची ही करामत आहे...तेव्हा त्याचं अभिनंदन करा.

२० ऑगस्ट, २०१०

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !

मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. दिवाळीचे स्वागत आपणही करूया साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी.
तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता.

आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये. लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता.

साहित्य कोणते हवे?
१)दिवाळी अंकासाठी ताजे आणि आत्तापर्यंत अप्रकाशित साहित्यच हवे.
२) आपला दिवाळी अंक प्रकाशित होईपर्यंत आपण इथे पाठवलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत कुठेही...अगदी आपल्या जालनिशी/ब्लॉगवरही प्रकाशित करायचे नाही.


साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.
साहित्य पाठवण्याचा पत्ता... attyanand@gmail.com असा आहे.
साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १५ ऑक्टोबर २०१०


दिवाळी अंक प्रकाशनाची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल.

१४ ऑगस्ट, २०१०

’जालवाणी’ ह्या ध्वनीमुद्रित अंकाचे प्रकाशन!

मंडळी आज मला हे जाहीर करायला आनंद होतोय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि साक्षीने जालवाणी हा पहिला-वहिला ध्वनीमुद्रित अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकात आपल्याला गद्य आणि पद्य अभिवाचन ऐकायला मिळणार आहे.

जालवाणीचा दुवा सगळ्यांसाठी... http://jaalavaani.blogspot.com/


ह्या अंकाचे मानकरी आहेत...संकेताप्रमाणे आधी स्त्रियांची नावं देतो.
१)मीनल गद्रे, २) कांचन कराई ३) श्रेया रत्नपारखी, ४)अपर्णा लळिंगकर, ५)अनुजा पडसलगीकर, ६)अनुजा मुळे उर्फ झुंबर, आणि ७) तन्वी देवडे

आता ह्यानंतर पाळी आहे पुरूष मानकर्‍यांची...
१)विनायक रानडे, २) महेंद्र कुलकर्णी, ३) नरेंद्र गोळे, ४)सुधीर काळे, ५)गंगाधर मुटे, ६)हेरंब ओक, ७) विद्याधर भिसे,८)सोमेश बारटक्के, ९)चेतन गुगळे,१०) अमोघ वाघ, ११)दिनेश कोयंडे,१२)विशाल कुलकर्णी,१३)रोहन चौधरी आणि १४) प्रमोद देव


मित्रांनो आणि मैत्रिणीनोही...
हा अंक तसा काही फार देखणा वगैरे नाहीये. जालनिशीच्या एकाच पानावर एकाच ठिकाणी सगळी ध्वनीमुद्रण ऐकण्यासाठी केलेली एक सोय....इतकेच ह्याचे दर्शनी स्वरूप आहे. तेव्हा पहिल्या प्रथम कदाचित आपला भ्रमनिरास झाला असे वाटू शकेल. :)
पण मंडळी, विश्वास ठेवा..जेव्हा आपण एकेक अभिवाचन ऐकू लागाल, तेव्हा आपले आधीचे मत नक्कीच बदललेले असेल...आपण निश्चितच तृप्त झालेले असाल...ह्याची मला खात्री आहे.

ह्या अंकाच्या निमित्ताने काही तांत्रिक गोष्टी मला शिकायला मिळाल्या हा माझ्यासाठीचा एक वैयक्तिक फायदा. ह्यापुढेही अशाच प्रकारचे अंक आम्ही काढत राहू, तंत्रज्ञान जेवढे आम्ही आत्मसात करू तेवढी त्यात अजून जास्त सफाई, देखणेपणा, आकर्षकपणा इत्यादि येईल ह्याबाबत माझ्या मनात शंका नाही.

जाता जाता एक सांगतो की अंकाला मिळणारा लेखक-अभिवाचकांचा प्रतिसाद सुरुवातीला अतिशय क्षीण असा होता...आणि नंतर हळूहळू वाढत आत्ता शेवटच्या क्षणी मात्र तो अचानक ढगफुटी व्हावा तसा येऊन आदळला. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की पुढच्या अंकाच्या वेळी कृपया असे होऊ देऊ नका. शेवटी आलेली अनेक ध्वनीमुद्रणं वेळेअभावी मी ह्यात समाविष्ट करू शकलेलो नाहीये ह्याबद्दल क्षमस्व...मात्र ही ध्वनीमुद्रण पुढच्या अंकात जरूर प्रकाशित होतील ह्याची खात्री बाळगा.

अजून एक जाता जाता सांगतो की...आमच्या दिवाळी अंकाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून असा....लवकरच त्याबाबतचे निवेदन निघणार आहे.

मीनल गद्रे, कांचन कराई,विद्याधर भिसे ह्यांचे विशेष आभार एवढ्याचसाठी की त्यांनी...इतरांनाही आपला आवाज दिला.

संपादनाच्या छोट्यामोठ्या गोष्टीत साहाय्य केल्याबद्दल श्रेया रत्नपारखी ह्यांचेही विशेष आभार.

कळावे,

आता भेटूया...दिवाळी अंकासोबत.

६ ऑगस्ट, २०१०

मी मार खाल्ला !

ही कहाणी साधारण ३० वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणेच कार्यालयात जायला उशीर झाला होता म्हणून ९-४७ ची चर्चगेटला जाणारी जलद गाडी कशीबशी मी मालाडहून पकडली. ही गाडी जोगेश्वरी ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान थांबणार नव्हती. त्यामुळे झटपट पोचता येणार होते.आधी दारातच लटकत होतो;पण दमादमाने जोगेश्वरीपर्यंत बराचसा आत पोचलो. गाडीला मरणाची गर्दी होती आणि त्यातच पंखे बंद होते. हे म्हणजे नेहमीसारखेच होते. म्हणजे काय की ऐन थंडीत हे पंखे अगदी सुसाट फिरतात आणि ऐन उन्हाळ्यात संप पुकारतात अगदी तसेच...... ऐकायचेय ही कहाणी..तर ऐका.