माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ ऑगस्ट, २०१०

पुन्हा एकदा शिवथरघळ !

दिनांक २८ ऑगस्टला पुन्हा एकदा दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ येथे जाण्याचा योग चालून आला. मंडळी, मी काही भाविक वगैरे प्रकारातला माणूस नाही. दासबोध तर सोडाच पण मनाचे श्लोक आणि रामरक्षा लहानपणी कधी तरी पाठ केलेले...आता जवळपास पुर्णपणे विसरलेलो आहे. समर्थ रामदासांच्या अध्यात्मिक नव्हे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी लाभलेला त्यांचा सक्रीय पाठिंबा....जावळीचे मोरे आणि  शिवाजी महाराज ह्यांच्यात  समझोता निर्माण व्हावा ह्यासाठी समर्थांनी इथे खास वास्तव्य केले, अफझलखान इत्यादि आक्रमकांच्या सैनिकी हालचालींची बित्तंबातमी महाराजांपर्यंत पोचवण्यासाठी ठिकठिकाणी मठ स्थापन करून तिथल्या शिष्यांकरवी हेरगिरीचे काम करविले..इत्यादि...हे माझे समर्थांच्याबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण आहे. त्या काळात त्यांनी गावोगावी मारूतीची देवळे स्थापून तरूणांच्यात व्यायामाबद्दल निर्माण केलेल्या जागृतीमुळे  स्वराज्यासाठी विजिगिषू वृत्तीने लढणारी कुमक निर्माण झाली....ह्या गोष्टी मला जास्त मोलाच्या वाटतात...त्यामुळेच असे हे समर्थ कुठे कुठे गेले, कुठे राहिले ह्याबद्दल बर्‍याच गोष्टी ऐकून आहे...त्यातलंच हे एक ठिकाण...चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले, जावळीच्या गर्द खोर्‍यात वसलेले, एका आडमार्गावर असलेली घळी...घळई  म्हणजे शिवथरघळ...जिथे समर्थांनी बराच काळ म्हणजे जवळपास १० वर्षे  वास्तव्य केलं आणि दासबोधासारखा ग्रंथराज निर्माण केला....ह्या घळीत पुन्हा जाण्याचे माझ्यासाठी असलेले सर्वात मुख्य आकर्षण होते...तो म्हणजे त्या घळीच्या शेजारीच असणारा धबधबा....अशा ह्या शिवथरघळीचे  वर्णन समर्थांच्याच शब्दात ....


गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळें ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥१॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्लोळ उठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥२॥

तुषार उठती रेणू । दुसरेरज मातले ।
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रीत धुकटे ॥३॥

दराच तुटला मोठा । झाड खंडेपरोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधें वोघ वाहती ॥४॥

गर्जती श्वापदें पक्षी । नाना स्वरें भयंकरें ।
गडद होतसे रात्री ।ध्वनी कल्लोळ उठती ॥५॥

कर्दमू निवडेना तो । मानसी साकडेपडे ।
विशाळ लोटती धारा । ती खालेरम्य विवरे ॥६।

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणेचर्चा । सार्थके काळ जातसे ॥७॥

ह्या वर्णनातला  "धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।"  ह्या ओळी माझ्यासाठी , मला तिथे पुन्हा जाण्यासाठी उद्युक्त करणार्‍या होत्या. कारण ह्या आधी मी गेलो होतो तेव्हा उन्हाळा होता आणि हा धबधबा अक्षरश: कोरडा होता....पण समर्थांचे ते शब्द..माझ्या मनात नेहमीच रेंगाळत असतात...साहजिकच ही उत्सुकता...की खरंच हा धबधबा जेव्हा वाहात असेल तेव्हा नक्कीच प्रेक्षणीय असणार...तेव्हा ठरवलं की ही आलेली संधी फुकट घालवायची नाही....आणि त्याप्रमाणे मी ती संधी साधू शकलो..ह्याबद्दल मला खचितच आनंद वाटतोय.

शनिवारी सकाळी ६ वाजता घरातून निघालो आणि जिथून मला बसमध्ये बसायचे होते तिथे ६-१५ला पोचलो. बस येईपर्यंत ६-४० झालेले होते...मात्र पाऊस नसल्यामुळे तशी वाट पाहण्याने फार काही त्रास जाणवला नाही. इथे उभे असतांना  एक असे दृष्य पाहिले....जे तसे म्हटले तर रोजचेच आहे...मला मात्र ते थोडे गंमतीदार वाटले....नाक्यावर दोनतीन जण तारेत गुंफलेली मिरची-लिंबू घेऊन उभे होते....तिथे येणार्‍या बहुसंख्य गाड्यांना जुनी सुकलेली गुंफण काढून ती ताजी गुंफण जोडली जात होती...अशा तर्‍हेने आपापल्या वाहनांना वाईट नजरांपासून वाचवणार्‍यात अगदी ट्रक-रिक्षा चालकांपासून ते अगदी कैक लाखाच्या खाजगी गाडयाही होत्या....म्हणजेच दुसर्‍या भाषेत बोलायचे तर अगदी अशिक्षितांपासून ते  उच्चशिक्षितांपर्यंत सगळेजण त्या लिंबू-मिरच्यांमध्ये ओवले गेलेले होते.  एकीकडे आम्ही विज्ञानवादी वगैरे आहोत अशी शेखी मिरवणारे....इथे मात्र निमूटपणे ह्या बंधनात अडकलेले दिसले. असो...जे दिसले ते सांगितले....आता पुन्हा मूळ विषयाकडे वळतो.

आमची बस आली. त्यात चढलो....एकूण २०-२५ जण सहप्रवासी होते. तसे ओळखीचे कुणीच नव्हते...त्यामुळे बराच काळ गप्प बसून राहिलो. त्यानंतर सहजपणे ठाकूर गुरुजींशी ओळख झाली....आणि मग ते बोलत राहिले आणि मी ऐकत राहिलो. आश्रमशाळा, आदिवासी आणि त्यांचं जीवन ह्यात जवळपास संपूर्ण हयात गेलेले ठाकूर गुरुजी त्यांचे एकेक अनुभव सांगत होते आणि मी शांतपणे ऐकत होतो. आपल्याला सहजासहजी मिळणार्‍या कैक गोष्टी...म्हणूनच कदाचित त्याची किंमत आपल्या लेखी नगण्य असते....त्यातलीच एखादी गोष्ट त्या आदिवासींना मिळाली की त्यांचा आनंद कसा बहरून येतो...हे सांगतांना ठाकूर गुरुजींच्या चेहर्‍यावरही एक वेगळाच आनंद दिसत होता.

ह्या गप्पांमध्ये गुंगलेलो असतानाच बस आम्हाला घेऊन पोचली नागोठण्याला...जिथे आमच्या न्याहारीची व्यवस्था केलेली होती. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपास धरणारे बरेच सहप्रवासी होते...त्यामुळे सगळ्यांसाठी सरसकट छानपैकी साबुदाण्याच्या खिचडीचा बेत होता....साखि,त्यावर दही आणि ओलं खोबरं....मग काय विचारता? मंडळींनी आडवा हात मारला...त्यानंतर चहा/कॉफी सेवन झाले आणि आम्ही पुढे निघालो.

तिथून आम्ही महाडला गेलो...महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यासाठी सत्त्याग्रह केला होता त्या ’चवदार तळ्याचे’ दर्शन घेतले. ह्या तळ्याविषयी आजवर जे काही वाचलेले होते की  ज्यामुळे माझी उत्सुकता खूपच वाढलेली होती....पण प्रत्यक्षात माझा खूपच विरस झाला. एक राष्टीय स्मारक म्हणून निगा बर्‍यापैकी राखलेली असली तरी ज्याचा उल्लेख ’चवदार तळे’ असा होतो..त्याचे पाणी पूर्णपणे हिरवट दिसत होते...तसंच त्यात बर्‍याच प्रमाणात कचराही टाकलेला दिसत होता....तळे चारी बाजूंनी व्यवस्थित बांधून काढलेले असले तरी त्याचे पाणी आता कुणी पिण्यासाठी वापरत असेल असे मात्र वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये....त्यामुळेच



पाण्याची चव चाखता नाही आली.  :(
हे सगळं उरकेपर्यंत जेवणाची वेळ झालेली...त्यामुळे महाडच्याच जवळ एका ठिकाणी विठ्ठल कामतांच्या उपाहारागृहात आम्ही सगळ्यांनी आपापली क्षुधा शांती करून घेतली...जेवण तसे चांगले होते...पण मराठी पद्धतीचे नसून चक्क पंजाबी पद्धतीचे होते...मराठी लोकांना मराठी पद्धतीचे जेवण आवडत नाही की...उपाहारगृहांमध्ये मराठी पद्धतीचे जेवण बनवण्यासाठी आचारी नसावेत...की अजून काही....कारणं काय असतील मलाही माहीत नाही...पण महाराष्ट्रात देखिल मराठी पद्धतीच्या जेवणाऐवजी इतर पद्धतींचे जेवण मिळण्याच्या ह्या शक्यतेमुळे मला स्वत:ला हा आपला कमीपणा वाटतो हे आवर्जून सांगावेसे वाटले.

तिथून मग थेट आम्ही निघालो ते शिवथरघळीला पोचलो. तिथे पोचेस्तो ३ वाजून गेलेले होते. भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करून मग आम्ही निघालो धबधब्याखाली नाहायला....पण हाय रे दूर्दैवा...धबधबा अशा कारणांसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे...तिथे जाण्याचे सगळे रस्ते पार तारांची कुंपणं घालून बंद केलेल दिसले.
माझा तर एकूणच विरस झाला....ज्यासाठी इतका अट्टाहास करून आलो होतो...तेच करायला मिळणार नाही म्हटल्यावर दुसरं तरी काय होणार?  :(




असो. जी गोष्ट होणे नाही म्हटल्यावर त्याबद्दल जास्त विचार का करा....म्हणून मग सगळी मंडळी निघाली भिजायला ...जिथे कुठे भिजायला मिळेल तिथे....धबधब्यापासून निर्माण होणार्‍या सावित्री नदीच्या प्रवाहाकडे मग सगळ्यांची नजर वळली....पण आधीच तुफान पाऊस पडून गेलेला...त्यामुळे पाण्याचा प्रवाह मात्र खूपच वेगवान दिसत होता...मग पुढे पुढे शोधत जात एका ठिकाणी मंडळींना पाण्यात थोडेफार डुंबता येईल अशी जागा दिसली आणि सगळी उत्साहाने पुढे सरसावली.





मी मात्र धबधबा नाही तर ओला होणार नाही...ह्या माझ्या मतावर ठाम राहिलो....नुसत्या पाण्यात भिजण्यासाठी....पावसाच्या पाण्यात भिजण्यासाठी इतके सव्यापसव्य करून इतक्या लांब कशाला जायची जरूर आहे? मुंबईत काय कमी पाऊस आहे काय भिजायला?...हा आपला माझा विचार....म्हणून मग मी आपल्या प्रग्रामध्ये जमेल तेवढे सृष्टीसौंदर्य साठवून घ्यायला सुरुवात केली.

माझ्या दिव्य दृष्टीला दिसलेले आणि प्रग्रामध्ये कैद करता आलेले काही दृष्यकण आता आपल्यासाठी इथे देत आहे.



























त्यादिवशी संध्याकाळी साडेसहा ते जवळपास साडेआठ वाजेपर्यंत...संध्याकाळची प्रार्थना होती.. ’ गाड्या बरोबर नळ्याला यात्रा ’  ह्या म्हणीप्रमाणे मीही त्यात सामील झालो....कधीतरी टाळ्या वाजवणे सोडले तर मला काहीच काम नव्हते...बरेच उत्साही भाविक त्यात रंगून गेल्यासारखे दिसत होते...काही अर्धवट, तसे दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते तर काही जमेल तसे सामील झालेले दिसत होते...मीच बहुदा एकटा असावा...जो देहाने तिथे असूनही मनाने इतरत्र वावरत होतो. श्लोकांमागून श्लोक, समासांमागून समास, आरत्या, दासबोधाचे वाचन, मनाचे श्लोक इत्यादि नाना प्रकार त्यात सामावलेले दिसत होते... ते दोन तास मी कसे काढले मलाच माहित नाही...पण कधी एकदा तो प्रकार संपतोय असं झालं होतं...शेवटी  संपलं  एकदाचं आणि मग सगळ्यांना चमचा चमचा प्रसाद वाटण्यात आला.

इथल्या काही गोष्टी मात्र मला आवडल्या. ठराविक वेळी घंटा वाजतात...चहासाठी, जेवणासाठी, प्रार्थनेसाठी इत्यादि. मग इच्छुकांनी त्यात सहभागी व्हायचे असते.
चहा इथे तयार करून एका नळ असलेल्या पिंपात ठेवलेला असतो. बाजुलाच एका ठिकाणी कप मांडून ठेवलेले असतात. आपण आपल्यासाठी कप घेऊन रांगेने जाऊन आपल्यासाठी चहा घ्यायचा असतो...स्वत: नळ सोडून...त्यानंतर चहा पिऊन झाल्यावर बाहेर जाऊन नळावर तो कप धुवून मग पुन्हा तो पूर्ववत जागेवर आणून ठेवायचा...सगळी स्वयंशिस्त...छान वाटला हा उपक्रम...कुणी नोकर नाही, सेवक नाहीत.

जेवणाच्या वेळी, न्याहारीच्या वेळीही असेच. रांगेत जाऊन मांडणीतून ताटे-वाट्या-भांडी आपली आपण घ्यायची...इथे मात्र वाढायला एक दोन स्वयंसेवक असतात....ताट वाढून घेतले की तिथेच असलेल्या सभागृहात खाली मांडी घालून बसायचे आणि जेवायचे....जेवण उरकल्यावर पुन्हा जाऊन ताट-वाटी-भांडं घासून आणून जागेवर ठेवायची....सगळं कसं एकदम शिस्तबद्ध काम चालतं.

त्या रात्री आम्ही तिथेच भक्त निवासात झोपलो...दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून काहीजण काकड आरतीत सामील झाले...अर्थात मी नाही.  :)
त्यानंतर चहा, न्याहारी वगैरे करून मग आम्ही शिवथरघळीतून बाहेर निघालो.
शिवथरघळीला आदल्या दुपारी पोचल्यापासून ते दुसर्‍या दिवशी सकाळी तिथून निघेपर्यंत पाऊस अखंडपणे बदाबदा कोसळत होता...पावसामुळे तसे सगळे वातावारण कुंद आणि सुस्त झालेले होते तरी आजूबाजूचा हिरवा आसमंत, ढगात,धुक्यात हरवलेले डोंगरकडे, धबाबा कोसळणारा धबधबा आणि वळणं घेत घेत वेगात वाहणारी सावित्री नदी....ह्या सर्वांमुळे मला स्वत:ला खूपच समाधान मिळाले...माझ्या प्रग्रामध्ये मी जमेल तसे आणि जमेल तेवढे त्याचे रूप साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.......आणि ह्या संपूर्ण प्रवासाची फलनिष्पत्ती म्हणावी तर हीच की.....हे सगळं मला अनुभवता आलं.....बस्स! त्यामुळे एरवी कैक कारणांनी झालेला विरस जमेस धरला तरी समाधानाचं पारडं जास्त जड आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

इति अलम्‌!

९ टिप्पण्या:

tanvi म्हणाले...

शिवथरघळीला जायचे हे गेले अनेक वर्ष मनात आहे, जाणे तर झाले नाहीये अजुन पण तुमच्याकडून वर्णन आणि फोटो पाहून आता तरी जाऊन यावे असे वाटतेय :)

प्रमोद देव म्हणाले...

तन्वी जरूर जा आणि पावसाळ्यातच जा...कारण तेव्हाच जास्त आनंद मिळेल.

Yogesh म्हणाले...

काका...सर्व फ़ोटु मस्त आहेत...प्रवास वर्णन छान झाल आहे.

अनाकलनीय म्हणाले...

सविस्तर वर्णनाने सुंदर जमुन आलय सगळ. फोटो छान आलेत.

मुक्त कलंदर म्हणाले...

काका योगायोगाने शिवथरघळीत जाऊन आलो रविवारी...

प्रमोद देव म्हणाले...

योगेश,अनाकलनीय आणि भारत धन्यवाद.
भारत, तू नेमका कधी आला होतास आणि कसा?

सोनाली केळकर म्हणाले...

देवकाका,
मी घळीवर दरवर्षी जायचे, तिथल्या संस्कार शिबीरांमध्ये आधी शिबीरर्थी म्हणून नंतर कार्यकर्ती म्हणून. अतिशय सुंदर आणि पवित्र स्थान आहे.
धबधब्याखाली जावु देत नाहीत कारण त्या पाण्याला प्रचंड वेग असतो आणि पाण्यामुळे कातळ निसरडा झालेला असतो, खूप दुर्घटना घडलेल्या आहेत.

प्रमोद देव म्हणाले...

खरं आहे तुझं सोनाली. तिथे एकदोघेजण मृत्त्यूदेखिल पावलेत असं कळलं.

MAHESH म्हणाले...

सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत
समर्थाचे २८ वर्षे वास्तव्य असलेली शिवकालीन शिवथर प्रांतातील जागा हि सांप्रदायात समर्थांच्या मागे अपरिचित होती. त्या जागेच ऐतिहासिक पुराव्यासोबत संशोधनाचे कार्य श्री अरविंदनाथजी महाराज - आळंदी (देव) यांनी केलें आहे. त्याची माहीती व ऐतिहासिक पुरावे ह्या लिंक वर देत आहे

http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4635985100503934906&OId=5580116005441001346&TName=