माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० मे, २००७

माती असशी,मातीत मिळशी!

मी ५-६वीत असताना आकाशवाणीवर एक गाणे ऐकले होते. सुप्रसिद्ध गायक गोविंद पोवळे ह्यांनी ते गायले होते. गाण्याचे शब्द होते..........
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या
माझ्या पायाशी.... अशी त्याची सुरुवात होती.ह्या गीताचे कवी कोण हे आता आठवत नाही पण हे गीत मला इतके आवडले की मीही नकळतपणे ते गीत गाऊ लागलो. हळूहळू पाठही झाले. जेव्हा जेव्हा हे गीत आकाशवाणीवर लागत असे तेव्हा मी अतिशय काळजीपूर्वक ते ऐकत असे आणि त्याचे शब्द नीटपणे टिपून ठेवत असे.ह्या गाण्याचा अर्थ अगदी पहिल्यांदा नीटसा कळला नव्हता;पण पुढे पुढे तो समजायला लागला आणि एका वेगळ्याच अर्थाने ते गाणे मला आवडायला लागले.
मला फिरविसी तू चाकावर,घट मातीचे बनवी सुंदर
लग्न मंडपी कधी असे मी कधी शवापाशी

वीर धुरंधर आले गेले,पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी

गर्वाने का ताठ राहसी,भाग्य कशाला उगा नाशसी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी
ह्या सगळ्या गाण्यातील साधे सोपे तत्त्वज्ञान मनाला भिडले आणि मग हे गाणे माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञानच होऊन बसले.हे शरीर ज्या मातीपासून बनले(त्या अर्थी पार्थिव)ते अखेर तिच्यातच सामावले जाणार आहे. काही क्षणांसाठी कुठला एक वेगळा आकार,रूप धारण केले असले तरी त्याचे मूलतत्त्व विसरून कसे चालेल.
मग अशाच गाण्यांचा शोध सुरू झाला तेव्हा अजून काही गाणी मिळाली.पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायलेला कबीराचा अभंग देखिल असेच तत्त्वज्ञान सांगतो.
ए तनू मुंडना बेमुंडना
आखिर मिट्टीमे मिल जाना

मिट्टी कहे कुम्हारको,बे तू क्यों खोदे मुझको
एक दिन ऐसा आवेगा की मै गाडूंगी तुझको

कपडा कहे दर्जीको क्यों तू फाडे रे मुझको
कोई वखत ऐसा आवेगा की मैं ढकाउं तुझको

लकडी कहे सुतारको रे तू क्यों छिले मुझको
एक दिन ऐसा आवेगा की मैं जलाऊ तुझकोराहत्या घराचा शोध घेताना खूप भटकावे लागले होते तेव्हा राहून राहून हे गाणे आठवायचे...
जागा जागा शोधीत फिरसी का वेड्या उन्हात
अखेर तुजला जागा आहे साडेतीन हात,वेड्या साडेतीन हात
....योगायोगाने हे गाणेही गोविंद पोवळे ह्यांनीच गायलेले आहे(आता हे गाणे पूर्ण आठवत मात्र नाही). पुन्हा अतिशय साध्या सोप्या शब्दात मांडलेले जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान.का कुणास ठाऊक पण ही गाणी आणि त्यातील अर्थ माझ्या मनात खोल कुठेतरी जाऊन बसलाय. ह्या क्षणभंगूर जीवनाचा आपल्याला किती सोस असतो;पण अशा ओळी ऐकल्या की खरे चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि आजवर हे आयुष्य सत्कारणी लावले नाही ह्याची खंत वाटते.
अजून बरीच अशी गाणी आहेत पण आता आठवत नाहीत. त्यासंबंधी पुन्हा केव्हातरी!

४ टिप्पण्या:

TheKing म्हणाले...

Nice post!

I like this thing about these old songs. Thodyasha shabdat barich mothi philosophy sangoon jatat.

अनामित म्हणाले...

एका फार छान विषयावर तुम्ही मन:पूर्वक लिहीलं आहे. आवडलं! गाणी आम्ही सगळेच ऐकतो, पण त्या गाण्यांमध्ये जीवन शोधण्याचा तुमचा प्रयत्न प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.

शेवटी तुम्ही लिहिता...,"त्यासंबंधी पुन्हा केव्हातरी!"

ते काही नाही! "त्यासंबंधी पुन्हा लवकरंच" असा हट्ट मी धरतो. तो तुम्ही लवकरंच पूर्ण कराल अशी खात्री आहे:-)

vivek म्हणाले...

देवसाहेब

फारच चांगला विषय निवडला आहेत आपण या लेखासाठी. तत्वज्ञान सहजासहजी पोचवण्याचं काम गाणं किती सुंदररीत्या करु शकतं ना?

पण कधीकधी गाण्याच्या सुंदर चाली मुळे शब्दांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका नजरेआड करता येणार नाही. गाण्याचे शब्द ऎकण्याची सवय मलाही पूर्वी नव्हती. पण आता शब्द आधी आणि चाल मग अशी सवय लावून घेतली आहे.

"माती सांगे कुंभाराला" हे गीत कवी मधुकर जोशी ("रिमझिम झरती श्रावणधारा" फेम) यांचं आहे आणि त्याचं संगीत दिलंय खुद्द गोविंद पोवळ्यांनीच. हे गाणं मलादेखील फार आवडतं.

विषयच निघाला तेंव्हा तत्वज्ञान सांगणार्‍या काही आणखी गाण्यांची चर्चा करायला हरकत नाही. माडगूळकरांच्या अनेक गाण्यात तत्वज्ञान असं सोपं करुन सांगितल्याचं पहाण्यात येईल. त्यांच्या अशा गाण्यांचं ध्रुवपद व त्यातल्या मला आवडलेल्या काही ओळी खाली देत आहे.

१) लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही
माणुस करतो प्रेम स्वत:वर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन सदभावा
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई

२) नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी
जिथे भूमीचा पुत्र गाळिल घाम
तिथे अन्न होऊनी ठाकेल शाम
दिसे सावळे रुप त्याचे शिवारी

३) देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही, देव भरुनिया राही

४) जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला
जो तो पथ चुकलेला
कुणा न ठाऊक सजा किती ते
कोठून आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते
जो आला तो रमला

५) एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे
पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक, तीन प्रवेशांचे

६) उध्द्ववा, अजब तुझे सरकार
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
लबाड जोडिती इमले माडया, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

बाकी उदाहरणं द्यायची झाली तर वंदना विटणकरांचं "शोधीसी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी" हे गाणं पहा.

बाबुराव गोखल्यांचं एक गाणं सुध्दा छान आहे. वसंतरावांनी गायलंय पण आता चाल आठवत नाही

मुशाफिरा ही दुनिया सारी, घडीभराची वस्ती रे
नसे महाली ख्याली खुशाली, ती तर रस्तोरस्ती रे
आज अमीरी, उद्या फकिरी, कुठेही भैय्या टाक पथारी
आलास नंगा, जाशील नंगा, तुझी खुदाला धास्ती रे

तत्वज्ञान सांगणार्‍या गाण्यांचा शोध तुमच्या बाजुनेही जारी राहू दे. मला सापडली तर कळवतोच.

अशाच नवीन नवीन विषयांवर लिहित राहण्याची स्फूर्ती मिळण्यासाठी शुभेच्छा.

विवेक

जयश्री म्हणाले...

प्रमोद,लेख सुरेख झालाय.
जुन्या गाण्यातल्या शब्दातून खरंच इतकं सहज तत्वज्ञान सांगितल्या जायचं ना.....! नाहीतर आताची गाणी !
विवेकनी सुद्धा बरीच यादी दिलीये.......ह्यात अजून भर घालत रहा...!!