माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

६ मे, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'! ५

झंडू कँटीनमधे खेळणे बंद केल्यावर मग आम्ही मुंबईत इतरत्र होणाऱ्या खुल्या स्पर्धेत भाग घेऊ लागलो.खेळ सुधारण्यासाठी काही गोष्टींची अतिशय जरूरी असते. त्यांमध्ये नियमित सराव,खेळलेल्या प्रत्येक डावांचे विश्लेषण,स्पर्धेत भाग घेणे ,तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि सतत ध्यास धरणे अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. ह्यांपैकी विश्लेषण हा भाग जरा जास्तच महत्त्वाचा असतो असे मला वाटते. आपण खेळत असलेला प्रत्येक डाव हा लिहिण्याची आम्हाला आता सवय लागलीच होती.त्यात हरणाऱ्या डावात आपण नेमकी काय चूक केली होती,जिंकलेल्या डावात प्रतिस्पर्ध्याची काय चूक होती,त्याची खेळण्याची पद्धत कशी होती,त्यातली त्याची बलस्थाने,कच्चे दुवे कोणते हे कळू शकते. आपल्या खेळातील बलस्थाने आणि कच्च्या दुव्यांची नव्याने जाणीव होते आणि त्यात सुधारणा करता येतात.

पण इथेच मी कमी पडत होतो. प्रत्येक स्पर्धेत मी माझा डाव लिहून घेत असे;पण त्याचे विश्लेषण करण्यात टाळाटाळ करत असे. ह्याउलट मी असे कितीतरी मोठे खेळाडू बघितलेत की ते मोकळ्या वेळात आपले तेच डाव पुन्हा खेळून बघतात. त्यातल्या स्वतःच्या आणि त्या त्या डावातील प्रतिस्पर्ध्याच्या बलस्थानांची त्रुटींची नोंद ठेवतात. ह्याचे कारण असे आहे की बऱ्याच वेळा तेच तेच प्रतिस्पर्धी आलटून पालटून सर्व स्पर्धांत उतरत असतात. मग कुणाशी कसे खेळायचे त्याचे नीट संयोजन करता येते. आपल्या चुका कमीत कमी कशा होतील;किंबहुना त्या कशा होणारच नाही ह्याची काळजी घेता येते आणि आपल्या विजयाची निश्चिती करता येते.माझ्या आळसामुळे माझ्या खेळात खास अशी प्रगती होत नव्हती. कैक वेळा तर मी जिंकता जिंकता हरत असे. अशा तऱ्हेने मी का हरतो ह्याचे विश्लेषण करावे असेही कैक वेळा ठरवले.मात्र त्याची अंमलबजावणी करू शकलो नाही.

असाच एकदा मी दादरच्या वनमाळी हॉल मध्ये भरलेल्या खुल्या स्पर्धेत भाग घेतला. ह्या स्पर्धेतही ९ डावांची साखळी होती. त्यावेळचे दिग्गज असे बरेचसे राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू त्यात सामील झालेले होते. पहिले तीन डाव अतिशय सहजतेने जिंकत मी नामांकितांच्या यादीत सामील झालो होतो. कधी नव्हे ते माझे नावही वर्तमानपत्रातील छोटेखानी बातमीत इतर आघाडीवीरांसोबत झळकले होते.

ह्या स्पर्धेत तीन गोऱ्या-गोमट्या शाळकरी मुलीही सहभागी झालेल्या होत्या आणि त्यांनीही आपापले पहिले तीनही डाव जिंकलेले होते. ह्या तिन्ही मुली सख्या भगिनी होत्या हे अजून एक विशेष होते. त्यांची वयं अनुक्रमे १०,१२ आणि १४ अशी होती.सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू असायची. तशा ह्या तीनही भगिनी ठेंगण्या ठुसक्या होत्या. त्यातली सर्वात धाकटी तर इतकी छोटी होती की खुर्चीवर दोन उशा ठेवून ती त्यावर बसत असे तेव्हा कुठे तिची मान टेबलाच्या वर दिसत असे. ह्या मुलींची काळजी घेण्यासाठी त्यांची आई जातीने हजर असायची.

तर त्यातल्या मधल्या बहिणीशी माझी ४थ्या डावात गाठ पडली. खरे तर त्या मुलीचे वय आणि छोटी चण बघितल्यावर मला तिच्याशी खेळणे अवघड वाटत होते. एका लहान मुलीशी कसे खेळायचे? तिला हरवण्यात काय मोठा पराक्रम आहे. पण खेळणे भागच होते. तो स्पर्धेचा एक भागच होता म्हणून जरासा बेताबेताने मी खेळायला लागलो. मात्र पहिल्या काही खेळीतच लक्षात आले की मुलगी वयाने लहान असली तरी बुद्धीने महान आहे.तेव्हा तिला बरोबरीचा प्रतिस्पर्धी मानूनच आपल्याला खेळायला हवंय. नाहीतर आपले काही खरे नाही.

त्याप्रमाणे मी माझा धडाका सुरू केला आणि साधारण पुढच्या सातआठ खेळीतच मी माझा वजीर ,एक घोडा आणि एक उंटाचा बळी देत(आमिष देणे म्हणतात)तिच्या संरक्षक फळीचा पुरा धुव्वा उडवला आणि अशा खेळीपाशी आलो की पुढच्याच खेळीला शह आणि मात द्यायची. तिच्या वजीर वगैरे महत्त्वाच्या सोंगट्या पार दुसरीकडे अडकून बसल्या होत्या. मुलगी बिचारी रडवेली झाली होती.तिला हरवण्यात मलाही काही खास सुख वाटत नव्हते;पण स्पर्धेत दयामाया दाखवणे कधीच चालत नाही.मी माझे घड्याळ बंद करत तिचे घड्याळ चालू केले आणि शांतपणे तिच्या खेळीची असे म्हणण्याऐवजी असे म्हणता येईल की तिच्या हार स्वीकारण्याची वाट पाहत बसलो. पाच मिनिटे झाली,दहा मिनिटे झाली,वीस मिनिटे झाली तरी ती मुलगी पटावर नजर खिळवून बसली होती आणि पुढची खेळी करण्याच्या तयारीत दिसत नव्हती. पराभव स्वीकारेल असेही दिसत नव्हती. खरे तर तिला तो स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता;पण ती अत्यंत नि:स्तब्ध अशा अवस्थेत, पटाकडे बघत समाधी अवस्थेत पोचलेली दिसत होती. मी तिला दोन वेळा तशी जाणीव करून दिली तरी तिने काहीच हालचाल केली नाही.माझा धीर सुटत चालला होता. मी विजयी झालोय हे मला कळत होते पण ती पराभव स्वीकारत नव्हती. पाऊण तास झाला तरी ती काहीही करायला उत्सुक दिसत नव्हती. खरे तर वेळ मर्यादेच्या नियमाने मी केव्हाच जिंकल्यात जमा होतो;पण एव्हढ्या लहान मुलीच्या बाबतीत घड्याळासारख्या क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणे मलाही उचित वाटत नव्हते.

मी असा अस्वथपणे प्रतीक्षा करत असतानाच एकदाची ती हालली.पुढे झुकून तिने एक खेळी केली आणि अतिशय प्रसन्नपणे तिने माझ्याकडे पाहत एक स्मितहास्य केले.हार स्वीकार करण्याऐवजी तिने अशी काय खेळी केली की ज्यामुळे ती इतकी प्रसन्न दिसत होती ह्याचा अचंबा करत मी पटाकडे नजर टाकली आणि क्षणात माझ्या सगळे काही लक्षात आले."अरेच्च्या! ही वाचलेली दिसतेय!" माझ्या मनात विचार उमटले!(मानलं बुवा आपण तिला!)तिने केलेली खेळी इतकी बिनतोड होती(माझ्या नजरेतून आणि आडाख्यातून सुटलेली-प्रचंड चूक(ब्लंडर)) की आता मला तिला हरवणे तर दूरच होते ;पण मला स्वतःला वाचवणे अवघड होऊन बसले होते. जिंकण्याच्या कैफात मी माझे महत्त्वाचे मोहरे घालवून बसलो होतो आणि तिच्या त्या एका खेळीने मला आक्रमणाऐवजी संरक्षक भूमिकेत ढकलले होते.

आता काय सांगू आणि कसे सांगू? बाजी पालटली होती. पुढच्या दहाबारा खेळीत अस्मादिकांचा डाव आटोपला होता आणि ती चिमुरडी, छे!चिमुरडी कसली? ती तर साक्षात बुद्धीची देवता सरस्वती वाटली मला!तिने मला हार मानायला भाग पाडले होते.त्याक्षणी हरल्याचे वाईटही वाटले आणि आनंदही वाटला. जिंकता जिंकता हरलो म्हणून वाईट वाटले. इतक्या लहान वयातही माझ्यासारख्या सराइताचा सहजपणे आणि दडपणाला बळी न पडता,विपरीत परिस्थितीतीतून मार्ग काढत पराभव केला हे पाहून आनंदही वाटला. एका लढवय्या खेळाडूकडून हरल्याबद्दल मला स्वतःला स्वत:चाच सन्मान झाल्यासारखे वाटले.ह्या हरण्यातही एक निराळाच आनंद होता. हा प्रसंग विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. आज त्या डावातली ती विशिष्ट खेळी जरी मला आठवत नसली(कारण आता ती कागदपत्र तर केव्हाच हरवली) तरी तो प्रसंग आता इथे घडतोय असे दृश्य क्षणभर डोळ्यांसमोर तरळून जाते.

आता तुम्हाला उत्सुकता असणारच! कोण होती ती 'चिमुरडी'? सांगू?सांगायलाच हवे काय? बरं सांगतो तर!

ती होती 'जयश्री खाडिलकर'! प्रख्यात पत्रकार आणि दैनिक नवाकाळ आणि संध्याकाळचे संपादक श्री नीळकंठ खाडिलकर ह्यांची मधली कन्या. पुढे ती आणि तिच्या त्या दोन्ही भगिनी वासंती(थोरली) आणि रोहिणी(धाकटी) बुद्धिबळ क्षेत्रात खूपच गाजल्या हे आपल्याला माहीत आहेच. भारतातर्फे 'पहिली महिला आंतर्राष्टीय मास्टर' बनण्याचा मान ह्याच जयश्रीला मिळाला. त्यानंतर रोहिणी आणि वासंतीनेही तो मान मिळवला.

आयुष्यात ह्यापुढेही मी अनेक खुल्या स्पर्धेत खेळलो;पण ५०-५५% पेक्षा जास्त गुण मिळवू शकलो नाही. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' म्हणतात! तसेच काहीसे माझे झाले. नाही म्हणायला कार्यालयातील बुद्धिबळ स्पर्धेत सतत तीन वेळा अजिंक्य राहिलो (वासरात लंगडी गाय शहाणी!) आणि तिथे स्पर्धा नाही म्हणून पुढे खेळायचे सोडून दिले. त्यानंतर संगणकाशी खेळून बघितले. त्याच्याही सर्वोच्च पायऱ्यांपर्यंत खेळलो. कधी जिंकलो, कधी हरलोही.पण निर्भेळ असे ,घवघवीत असे यश काही मिळाले नाही. तुम्ही काही म्हणा ! मला असे वाटते की एकेकाची जितकी कुवत असते त्यापेक्षा तो जास्त काही करू शकत नाही.कधी मधी चमक दाखवणे होते;पण ते केवळ अपघाताने असे मला वाटते.आपल्याला काय वाटते?

समाप्त!

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

तुमच्या लेखांच्या आधारे बुद्धीबळ या खेळाचे अंतरंग लक्षात आले. एरवी मी कधी या खेळाच्या वाटेला गेलो नसल्याने त्यातील बारकावे माहित नव्हते, ते तुमच्या लेखांच्या निमित्ताने समजले. धन्यवाद!:-) प्रस्तुत लेखात "चिमुरडी" बरोबर बुद्धीबळाचा डाव खेळण्याचे वर्णन झकास झाले आहे.

Radhika म्हणाले...

अतिशय मिश्किल शैलीतलं वर्णन मनाला आनंद देतं.

जयश्री म्हणाले...

प्रमोद, तुमचे हे बुद्धिच्या बळाचे लेख वाचून तुमचा अजून एक सुप्त(आमच्यासाठी) गुण कळला. अतिशय विनयाने तुम्ही तुमच्या ह्या खेळातल्या प्राविण्याचं वर्णन केलंय. दाद देनीही पडेगी :)
अनुभवकथनाच्या पोतडीतून अजून काय काय येतंय ह्याची उत्सुकता वाढलीये हे मात्र खरं.

Photographer Pappu!!! म्हणाले...

तुमच्या बुद्धीचे बळ वाचताना फार मजा आली. मी ही तुमच्यासारखाच दे धडक बेधडक खेळायचो (कॉलेज नंतर कधी खेळलोच नाही, कारण माझ्यात तेवढे patience नाहीत). तुमचे लेख वाचताना फार मजा आली. बुद्धीबळा सारख्या खेळाचे इतके छान वर्णन करता येऊ शकते याची कल्पनाच नव्हती :)