माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जुलै, २०१०

पोलिसी खाक्या !

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.........ऐका हा अजून किस्सा.

२९ जुलै, २०१०

भीमटोला !

भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.

२८ जुलै, २०१०

पुनर्जन्म!

मित्रहो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात माझी पुरी हयात गेली तरीही आज मी पूर्णपणे एक सामान्य व्यक्ती म्हणून जगतोय. म्हणजे असं की जेव्हा जे करायचं ते हिरीरिने केलं,त्यात बर्‍याच अंशी प्राविण्यही मिळवलं; मात्र आता ते सगळं सगळं जाणीवपूर्वक विसरलोय. राहिलेत फक्त काही कडू-गोड आठवणी. त्यातलीच एक इथे सांगतोय. पाहा तुम्हाला आवडते का?

२७ जुलै, २०१०

छोमा

हे अभिवाचन आहे एका छोट्या मुलीच्या हुशारीचे...ऐका तर खरं.

२५ जुलै, २०१०

सामनावीर

सामनावीर ह्या माझ्या ह्या आधी लिहिलेल्या किस्स्याचे  अभिवाचन ऐका. ज्यांना वाचण्याऐवजी ऐकायला आवडतं अशांच्या सोयीसाठी मी ह्यापुढे वेळोवेळी आणखी इतर किस्स्यांचे अभिवाचनही सादर करणार आहे.

पावसाचे गाणे

ही कविता मी चक्क पाडलेय...आपल्याला का नाही जमत बरं कविता? असा विचार करत करत शब्द एका पाठोपाठ मांडत गेलो,पुसत गेलो,पुन्हा मांडत गेलो आणि त्यानंतर जे काही तयार झालं ते आपल्या पुढे ठेवलंय. आता तुम्हीच ठरवा की ह्याला कविता म्हणायच की नाही ते.

२० जुलै, २०१०

कांदे-पोहे

संजय, अरे ए संजय. कुठे आहेस?

ताई, मी इथे आहे,झाडांना पाणी घालतोय.

अरे,पाणी कसलं घालतो आहेस....चल,लवकर. आपल्याला आत्ताच्या आत्ता जायचंय.

कुठे? आणि इतक्या घाईत...अगदी लगीनघाई असल्यासारखी तू मागे लागलेस?

अरे बाबा, आता घाई करायलाच हवी...लग्न काय होणारच आहे....पण आधी मुलगी नको पाहायला?

कोणती मुलगी? कुणाची मुलगी आणि कुणासाठी पाहायचीय?

त्याच्या डोक्यात टपली मारत ताई म्हणाली....ह्या,ह्या आमच्या बावळट बंधूराजांसाठी. चल आता येतोस की बाबांना हाक मारू?...ओ बाबा, हा बघा....

ताई, ताई असं नको ना करूस. बाबांना कशाला हाक मारते आहेस? मी येतो ना....

हाहाहा...बाबा नाहीचेत मुळी घरात...ते केव्हाच गेलेत.

गेलेत? कुठे?

कुठे म्हणजे काय? वेंधळाच आहेस की तू.....चार दिवसांपूर्वीच नाही का ते समेळकाका म्हणत होते...त्यांच्या माहितीतली एक मुलगी आहे लग्नाची....तिलाच पाहायला जायचंय आपल्याला....बाबा, गेलेत समेळकाकांना आणायला....तेही असणार आहेत आपल्या बरोबर.


समेळकाकांना घेऊन बाबा आले आणि मग आपला कथानायक निघालाय मुलगी पाहायला...बरोबर ताई आणि तिचे यजमानही आहेत बरं का. आपल्या लाडक्या भाऊरायासाठी बायको कशी अगदी अनुरुप पाहिजे नाही का...तेव्हा तिची  पसंती सर्वात आधी...आणि घरात सगळ्यांनीही ते मान्य केलंय. 

हॅलो, मी समेळ बोलतोय. आम्ही आलोय आपल्या घराच्या आसपास. यायचं का त्यांना घेऊन.

समेळसाहेब, जरा अर्धा-एक तास कुठे तरी थांबू शकाल काय? काय आहे.....

काय झालं नानासाहेब? काही गंभीर अडचण?

अहो नाही हो, सुकन्याला पाहायला आत्ताही एक मुलगा येऊन बसलाय....त्याच्याच तजविजीत व्यस्त आहे सद्द्या. तेव्हा जरा तुमच्या बरोबरच्या मंडळींना कुठे तरी फिरवून आणा ना....त्यानिमित्ताने थोडेसे मुंबई दर्शनही होईल...हा हा हा....नानासाहेबांनी तेवढ्यात एक माफक विनोद करून घेतला.

बरं,बरं नानासाहेब. करतो तशी व्यवस्था.

समेळसाहेबांनी,चक्रधराला गाडी चौपाटी कडे घ्यायला सांगितली.मंडळी चौपाटी पाहून आणि त्याहूनही तिच्यापुढे पसरलेला अथांग सागर पाहून भारावून गेले.

समेळसाहेब....अहो, इथे कुठे आणलंत? आपल्याला मुलीच्या घरी जायचं होतं ना?

बाबासाहेब, काय आहे....समेळसाहेब चांचरले.

अहो, काय ते स्पष्ट सांगा...असे चांचरू नका.

बरं सांगतो.  अहो, त्या मुलीला पाहायला अजून एकजण येऊन बसलाय...तिकडे त्यांचा कांदे-पोह्यांचा कार्यक्रम उरकला की आपला सुरु होईल...असे नानासाहेब म्हणत होते....म्हणून थोडा वेळ आपण इथे आलोय.

असं आहे काय? बरं, हरकत नाही. बाकी एका अर्थाने तेही बरंच झालं...एरवी ही विशाल चौपाटी आणि हा अथांग सागर आमच्यासारख्या छोट्या गावात राहणार्‍यांना कधी हो पाहायला मिळणार होता.

बाबासाहेबांनी समजुतीने जरी घेतले तरी संजय भडकलाच....हे काय समेळकाका, आपल्याला वेळ देऊनही बाहेरच्या बाहेर असे ताटकळत  ठेवणे शोभते का तुमच्या त्या नानासाहेबांना?
मी आता त्या मुलीला पाहणारच नाही....माझा निश्चय पक्का झाला.

अरे भाऊ, असं रे काय? लगेच डोक्यात का राख घालून घेतो आहेस?

ते मला काही माहीत नाही. ते लोक स्वत:ला काय समजतात?

भाऊराया, अरे जरा सबूरीने घे रे.

हे काय? तुम्ही मलाच का सांगताय सगळे? खरे तर त्या मुबाला(मुलीच्या बापाला) तुम्ही चांगले झापायला हवंय...त्याऐवजी मलाच गप्प बसायला सांगताय? ते काही नाही...मला त्या मुलीला पाहण्याची अजिबात इच्छा नाहीये.

बाबासाहेबांनी फक्त संजयकडे एकदा करड्या नजरेने पाहिले आणि....

बरं. तुम्ही आता म्हणताय तर पाहीन म्हणतो.....बाबासाहेबांच्या नजरेतला आज्ञार्थी भाव ओळखून संजयने लगेच नांगीच टाकली.

संजयने मग हळूच ताईला इशारा करत बाजूला नेले...समुदाच्या पाण्यात पाय ओले करण्याच्या निमित्ताने ते त्या सगळ्यांपासून जरा दूर आले. लगेच संजयने ताईला निक्षून सांगितले....बाबांच्या आज्ञेमुळे मी माझा निर्णय जरी बदललेला असला तरी ह्या मुलीला मी अजिबात पसंत करणार नाही...मग ती तुला आवडो अथवा भले ती कितीही सुंदर असो...माझा निर्णय पक्का आहे....ही मुलगी मला नापसंत आहे.

बरं बाबा..तुला जे करायचंय ते कर. पण आता हे बाबांसमोर बोलू नकोस बरं का.
चल, आता बाबा बोलावताहेत.


नानासाहेबांचा संदेश मिळताच गाडी तिकडे वळवण्याचा आदेश चक्रधराला देत समेळ साहेबांनी एक सुटकेचा नि:श्वास सोडला. थोड्याच वेळात ते सगळेजण तिथे पोहोचले. स्वागताला खुद्द नानासाहेब ह्जर होते. झाल्या प्रकाराबद्दल बाबासाहेबांकडे दिलगिरी प्रदर्शित करत नानासाहेब त्या सगळ्यांना आत घरात घेऊन आले.
सुरुवातीचे ओळखीचे सोपस्कार पार पडल्यानंतर मग मंडळी थोडीशी सैलावली. मोठ्या माणसांच्या हवा-पाण्याच्या आणि राजकारणाच्या गप्पा सुरु झाल्या...ज्या कारणासाठी इथे ते सगळे जमलेत ते सगळं विसरून.

इथे संजय मात्र वैतागलेलाच होता. अजूनही त्याचा राग धुमसत होता. आपल्या ताईला तो सारखा सांगत होता...ए ताई, बाबांना सांग ना....आपण आता निघूया म्हणून. बस्स झाले हे सौजन्याचे नाटक.

अरे,वेडा आहेस काय तू? अजून मुलीला कुठे पाहिलंय ? आणि कांदे-पोहे खायचे नाहीयेत का? ;)

ताईच्या त्या तसल्या मिस्किल बोलण्यामुळे एरवी जरी संजय लाजला असता तरी ह्यावेळी मात्र तो तिच्यावर चांगलाच उखडला होता....मी आधीच सांगितलंय ना तुला....मला ह्या मुलीला अजिबात पाहायचे नाहीये...मग कशाला उगाच हा देखावा?

हे सगळं बोलणं कुजबुजीच्या स्वरूपातच सुरु होतं....कारण बाबासाहेबांसमोर संजयची कोणतीच मात्रा चालू शकत नव्हती...पण ही कुजबुज पाहून नानासाहेबांना जाणवलं की मुलगा मुलीला पाहण्यासाठी फारच अधीर झालाय...तेव्हा आता जास्त उशीर नको म्हणून त्यांनी आत आवाज देत म्हटलं.....अहो, ऐकलंत का. मुलाकडची मंडळी खोळंबलेत....जरा मुलीला पाठवा पाहू.

नानासाहेबांच्या त्या आज्ञेमुळे माजघरातली लगबग एकदम वाढली. स्वयंपाक घरातून कपबशांचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. इथे संजय अजूनच अधीर झालेला....कधी एकदा ह्यातून सुटका होतेय ह्याची वाट पाहात निमूटपणे बसण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीच नव्हतं....तरीही उगाच काही तरी चाळा म्हणून कधी कपाळावरचा घाम पूस ...तर कधी चश्म्याच्या काचा साफ कर अशा अस्वथतेच्या निदर्शक हालचाली त्याच्याकडून होत होत्या.

आणि जिची आतुरतेने सगळेजण वाट पाहात होते ती....मुलगी...घरातल्या इतर वडिलधार्‍या स्त्रियांबरोबर हातात  कांदे-पोह्याच्या बशा असलेले तबक घेऊन आली तेव्हा ... ताईने तिला पाहताच वहिनी पसंत करून टाकली. सगळ्यांच्या नजरा जरी मुलीकडे असल्या तरी संजयने आपली नजर मात्र जमिनीवरच  स्थिरावलेली होती...मुलीला पाहायचं नाही....हा त्याचा ठाम नि:श्चय अजूनही कायम होता. ताईने त्याला कोपराने ढोसले तरीही त्याने तिची दखल घेतली नाही.

मुलगा लाजतोय...असाच अर्थ इतरेजनांनी काढला आणि ते सगळे गालातल्या गालात हसू लागले. मुलीच्या आईने मुलीला इशारा केला....दे,ती कांपोची बशी त्यांला दे....आणि आज्ञाधारकपणाने मुलीने ती बशी मुलासमोर धरत म्हटलं....घ्या ना!!!

तो किणकिणाट ऐकून नकळत संजयची नजर वर गेली...क्षणभर चार डोळ्यांची दृष्टभेट झाली आणि....पुढे काय झाले ते दोघांनाही कळलंच नाही....काही तरी इथून तिथे गेले आणी तिथून इथे आले....असा भास दोघांनाही एकाच वेळी झाला....

संजयच्या ऊरात एक बारीकशी कळ  ऊठली....अरेच्चा...हीच ती...रोज स्वप्नात येते...तीच ही....आणि हिला मी न पाहताच जाणार होतो? छे, छे, छे. भलतंच...किती मोठी चूक मी करणार होतो....बरं झालं....बाबांनी दमात घेतलं ते...बरं झालं ताईने समजावलं ते.....नाहीतर उगाच चांगली सोन्यासारखी संधी.......हा हा हा...अरे खरंच की ’सोन्या’ सारखीच आहे... संधी नव्हे हो....माझी.....
मनातल्या मनात विचार करतांनाही संजय लाजलेला आणि ते त्याच्या चेहर्‍यावर उमटलेलं ताईने हळूच पाहिलं....तिलाही कळलं.....विकेट पडली म्हणून.  :D

हिच्याशी एकांतात बोलायला मिळेल? हिला देखिल आपण पसंत पडू? काहीही असो, पण हिच्याशी बोलण्याची संधी आज साधायलाच हवी....आता नाही तर कधीच नाही....तेव्हा ही संधी सोडायची नाही....

संजयने हळूच ताईला....आणि ताईने हळूच बाबांना....संजयची इच्छा आपोआप नानासाहेबांपुढे पोचली.

बरं का मुलांनो....तुम्हाला आपापसात काही बोलायचं असेल तर आतल्या खोलीत बसा तुम्ही....नानासाहेबांनी इशारा केला. संजय उतावळेपणाने खुर्चीतून उठतांना धडपडला...ताईने हळूच त्याला चिमटा काढत....इतकं काही उतावीळ व्हायला नकोय हं....असं म्हटल्याने तो अधिकच बावरला....पण मुलीच्या भावाने त्याला हाताचा आधार देत  आतल्या खोलीकडे अंगुलीनिर्देश केला.

आतल्या खोलीत संजय आणि सुकन्या समोरासमोर बसलेले...संजयने धीर करून काही विचारण्यासाठी तोंड उघडले आणि तेव्हढ्यात मुलीचा भाऊ....तोच तो आधार देणारा आणि मुलीचा काका....असे दोघेही येऊन त्या दोघांच्यात बसले...संजयचे शब्द घशातल्या घशातच अडकले.  ;)

तुम्ही काय करता?...मुलीच्या भावाचा प्रश्न

मी, अमूक अमूक क्षेत्रात काम करतो.....

अरे वा...मी ही त्याच क्षेत्रातला....

मग काय? संभाषणाचा ताबा मुलीच्या भावानेच घेतला आणी संजय फक्त...हो...नाही...अशी उत्तरं द्यायला लागला...मधून मधून त्याचं लक्ष सुकन्येकडे जात होतं...तीही डोळ्यांच्या कोपर्‍यातून सांडणारं हसू लपवत संजयची तारांबळ पाहात होती आणि मनोमन म्हणत होती....सापडला गं सापडला....हाच तो....असाच भोळा सांब मला हवा होता.घरी परत येतांना गाडीत बाबा मोठ्यानेच म्हणाले.....काय मग ताई, त्यांना नकार कळवायचा ना?
बाबा.....

ताई पुढे काही बोलण्याच्या आतच संजयने....ही शेवटची संधी...आत्ता नाही तर केव्हाच नाहीच्या अभिनिवेशात  ओरडून सांगितले........बाबा, मुलगी मला पसंत आहे...कळवा त्यांना.

सगळ्याच्या हास्यकल्लोळात आता संजयही सामील झाला.


ही एक सत्यकथा आहे...प्रत्यक्ष नायक-नायि्केच्या तोंडून ऐकलेली....मात्र ह्यातीत व्यक्तिरेखांची नावे,स्थलकाल वगैरे गोष्टी जाणीवपूर्वक बदललेल्या आहेत.

१६ जुलै, २०१०

शाही खिचडी.मंडळी मी आज एक रोजचाच पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर करतोय...त्याचं नाव आहे शाही खिचडी. नाव वाचूनच एकदम खूश झालात ना...आता बनवून आणि मग खाऊन पाहा....अजून खूश व्हाल.

साहित्य: दोन वाट्या तांदूळ
१ वाटी मुगाची सालवाली डाळ
एक बटाटा + एक कांदा (कांदा उभा चिरलेला,बटाटा बारीक चिरलेला)
तिखट,हळद,मीठ,गोडा मसाला,एक चमचा तूप,हिंग,जिरे इत्यादि.

कृती: सर्वप्रथम एका पातेल्यात एक चमचा तुपात हिंग-जिरे-हळद युक्त फोडणी करावी.
त्यात कांदा घालून तो थोडासा लालसर परतावा. नंतर त्यात बटाटे घालून ते मिश्रण सारखे करावे.
त्यानंतर त्यात धूवून घेतलेले डाळ-तांदूळ घालावेत...हे सगळं मिश्रण एकजीव करावे. मग त्यात
चवीनुसार,तिखट,गोडा मसाला आणि मीठ घालावे. त्यानंतर त्यात जरूरीपुरते पाणी घालून शिजवावे.

अशा तर्‍हेने तयार झालेला हा पदार्थ आहे शाही खिचडी. आता, तुम्ही म्हणाल... हॅ! ह्यात शाही असं काय आहे? उगाच आपलं काहीतरी म्हणायचं झालं!
हं, मला माहीत आहे. शाही असं काही म्हटलं की तुमच्या मनात लगेच काजू,बदाम,पिस्ते,मनुका,बेदाणे  वगैरेयुक्त असे काहीसे चित्र उभे राहते. ;)
पण नाही...तुम्हाला जसे वाटते तसे हे नक्कीच नाही....ही आहे आम्हा गरीबांची शाही खिचडी  ;)
 एकदा चव घेऊन पाहाच... मग बोटे चाटत राहाल...माझी नाही हो....तुमचीच...आणि मग नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे.
एकदा करून पाहाच आणि मग बोला....नक्कीच म्हणाल...खिचडी खावी तर ती शाही खिचडीच.

*
लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीही वापरू शकता...ती तशी वापरायची असेल तर उभी चिरून फोडणीतच घालावी...मस्त चरचरते आणि खिचडीला एक वेगळीच खुमारी येते.
*गोड लिंबाचं लोणचं, लसणीची चटणी आणि गोडसर दही ह्या सगळ्यांसोबत ही खिचडी खातांना अजूनच लज्जत वाढते...बघा, आपल्याला आवडते की नाही ते.  :)

५ जुलै, २०१०

मुंबई-पुणे-मुबई....३६तास.

शनिवार दिनांक ३जुलै २०१० रोजी सकाळी अचानक ठरले पुण्याला जायचे...मग काय झटपट तयारी केली आणि निघालो घराच्या बाहेर....बोरिवलीला मेट्रोलिंकच्या कार्यालयात पोचलो तेव्हा घड्याळात वाजले होते सव्वा नऊ. तिथे कळलं की आता साडेनऊची एक बस आहे...मग तिचेच तिकिट काढले आणि बसची वाट पाहायला लागलो...बस आली ९-४०ला... त्या बसमध्ये चढणारा मी सगळ्यात पहिला आणि एकमेव प्रवासी होतो...त्यामुळे ही बस कधी सुटेल ह्याबद्दल निश्चिती वाटत नव्हती...पण आश्चर्य म्हणजे बस जेमतेम पाच मिनिटातच निघाली देखिल.....मला एकट्याला घेऊन...मी पुण्याला माझ्या साडूंना भटक्यावरून मी येत असल्याचे कळवलं...तेही "जेवायला थांबतो,अवश्य या म्हणाले."

हीच ती मुंबई-पुणे प्रवासाला सहा तास लावणारी बस.(मेट्रोलिंकवाले हल्ली कोंडुसकरांच्याही गाड्या वापरतात.)

नंतर  एकेकाळी मुंबईकर असलेले आणि हल्लीच पुणेकर झालेले आमचे परममित्र सुधीर कांदळकरांनाही मी येत असल्याचं सांगितलं. ते हळहळले....म्हणाले, "अरेच्चा, तुम्ही इथे येताय,आणि मी मुंबईला जायला निघतोय...एका मित्राच्या लग्नाला...म्हणजे आपली भेट नाही होणार. :(  तेव्हा तुम्ही रविवारी पुण्यातच राहा...मी रविवारी दुपारपर्यंत परत येतो...आपण संध्याकाळी नक्की भेटूया."
मी म्हटलं....ते शक्य नाही...रविवार संध्याकाळपर्यंत मला मुंबईला पोहोचायला हवंय...म्हणजे ह्या वेळी आपली भेट शक्य नाहीये...जाऊ द्या, पुढच्या वेळी भेटू."


उड्डाण पूल ओलांडून बस पश्चिम द्रूतगती मार्गावर आली आणि मग वेगात धावू लागली...मनात म्हटलं चला आता बस नक्कीच वेळेवर पोचेल....मध्यंतरी वाटेवर इतर ठिकाणाहून चढणारे प्रवासी घेणार हे तर नक्कीच होते तेव्हा मुंबईबाहेर पडायला किमान  साडेअकरा तरी वाजतील असा मी मनाशी अंदाज बांधला. बोरिवलीच्या  राष्ट्रीय उद्यानापाशी  काही जण चढले...पुढे एकेक थांब्यावर प्रवासी चढत गेले...मधेच पाऊस सुरु झाला...मी आपलं ते भोवतालचं ओलं विश्व पाहात विचारात गढून गेलो...वांद्र्यापर्यंत बस पोचली तोवर अर्ध्यापेक्षा जास्त बस भरली होती....म्हणजे अजून बरेच प्रवासी भरायचे होते....घड्याळात पाहिले तर इथे येईपर्यंतच अकरा वाजलेले होते....अजून मुंबईचा बराच भाग शिल्लक राहिलेला होता ....म्हणजे अजून निदान एक तास तरी जाणार होता.....पुढे धारावी,शीव,चेंबूर,मानखुर्द करून होईपर्यंत चक्क साडेबारा वाजलेले होते....अजूनही वाशीचा पूल ओलांडलेला नव्हता. मी भटक्यावरून पुन्हा एकदा साडूंशी संपर्क साधून त्यांना मला यायला उशीर होईल, तस्मात,तुम्ही जेवून घ्या, माझ्यासाठी थांबू नका असे सांगून टाकले....बस ठरलेल्या वेळेपेक्षा नक्कीच उशीरा पोचणार हे आता सूर्यप्रकाशाइतके सत्य होते.  :(

पुढे वाशी,नेरूळ,कळंबोली वगैरे समस्त नवी मुंबई दर्शन करत एकदाची बस पूर्ण भरली....आणि मग बशीने गती घेतली...खालापूरला  जेवणासाठी बस थांबली तेव्हा साधारण पावणे दोनचा सुमार झालेला....त्यानंतर हले-डुले  करत समस्त प्रवासी मंडळी जेवण करून येईपर्यंत सव्वा दोन तिथेच वाजले.....तिथून एकदाची कशीबशी बस सुटली...मनात म्हटलं आता पुढे तरी गाडी न थांबता  लवकरात लवकर पुण्यात दाखल होईल...पण तसं होण्याची काही चिन्हं दिसेना....कारण डायवर साहेब ....कोणतीही घाई नसल्यासारखी...जणू आपण वेळेच्या खूपच  आधी पोहोचू असे समजून गाडी अगदी आरामात चालवत होते. त्यातच मधे एका ठिकाणी डिझेल भरण्यात पंधरा-वीस मिनिटे गेलीच.  ;)

पुढे पुण्याच्या परिसरात बस पोचल्यावर मग एकेक प्रवासी आपापल्या गंतव्य स्थानानुसार उतरायला सुरुवात झाली....गाडी शेवटच्या थांब्यापर्यंत...हा होता आयडियल कॉलनीचा थांबा....ह्याच्या पुढे मोठ्या बशी जायला हल्ली मनाई आहे म्हणे.....दुपारचे चार वाजले होते....मला तिथूनच जवळ असलेल्या नळ स्टॉपला जायचं होतं....तिथून मग साधारण दहा मिनिटांनी एक छोटी गाडी घेऊन आम्हा काही प्रवाशांना त्यात बसवून ती गाडी निघाली...ह्या डायवर साहेबांना मी मला नळ स्टॉपला उतरायचंय...तो आल्यावर सांगा म्हटलं...त्यावर त्यांनीही मान डोलावली....मधेच ही गाडीदेखिल डिझेल भरायला थांबली...त्यात दहा-पंधरा मिनिटं गेली...मग पुन्हा डायवर सायेबांनी गाडी सुरु केली आणि पुण्याच्या त्या भरगच्च रहदारीतून प्रत्येक लाल दिव्यापाशी थांबत थांबत आमचा प्रवास सुरु झाला.....मी ह्या पूर्वी एकदा-दोनदा इथे येऊन गेलोय...तरीही मला तो  परिसर नीटसा लक्षात नव्हता..पण तरीही काही तरी चुकल्या-चुकल्यासारखे वाटायला लागले होते म्हणून मी आमच्या डायवर साहेबांना पुन्हा नळ स्टॉपची आठवण दिली...तेव्हा ते शांतपणे उत्तरले....नळ स्टॉप मागे राहिला की....पण हरकत नाही....तुम्ही इथे उतरा आता ...इथून फारसा लांब नाही तो...मी आपला पडत्या फळाची आज्ञा घेऊन खाली उतरलो....एकही ओळखीची खूण दिसेना...पण तो रस्ता कर्वे मार्ग आहे...ह्याची खात्री करून माघारी फिरलो...चालतोय,चालतोय तरीही कुठेही ओळखीची खूण सापडेना...कुणाला विचारावं? म्हणून मग मी मग एका दुकानात गेलो...तिथे काही खाऊ घेतला आणि त्या दुकानदाराला सहजपणे विचारलं....अहो इथून तो नळ स्टॉप किती दूर आहे?
तो म्हणाला...अजून पाच-दहा मिनिटे चालत गेलात की येईल....
मी म्हटलं...अहो मी पुण्यात तसा नवखा आहे...आत्ताच अमूक एका बसने आलो...मग त्यांच्या छोट्या गाडीतूनच ते पुढे घेऊन आले....अमूक एका पुलापाशी थांबवून मला ...जास्त लांब नाही..जवळच आहे असे सांगितले....वगैरे वगैरे पाढा वाचला.
तेव्हा तो दुकानदार उत्तरला...अरेच्चा...तुम्ही तिथून चालत आलात? तो डेक्कन विभाग आहे...गरवारे पुलाजवळचा ....असा कसा तो ड्रायव्हर? असो, आता इथून खरंच जास्त लांब नाहीये...तुम्ही पोचलाच आहात जवळ जवळ...वगैरे बोलता झाला.
मंडळी, अशी मजल दरमजल करत पाच-दहा मिनिटातच मग मी माझ्या इच्छित स्थळी पोहोचलो...तेव्हा घड्याळात वाजले होते....संध्याकाळचे पाच....म्हणजे बोरिवली ते पुणे अशा प्रवासाला मला सात तास लागलेले होते.

ही झाली मुंबई-पुणे प्रवासाची कहाणी....
त्यानंतरचा काळ माझा अतिशय मजेत गेला..शनिवारची रात्र तिथेच काढून सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मग मी आमचे जालीय मित्र-मंडळी सर्वश्री रानडेसाहेब,कांदळकरसाहेब आणि जयंतराव कुलकर्णीसाहेब...ह्या तिघांशी संपर्क साधून एकत्ररित्या कुठे भेटायचे ते ठरवले....जयंतरावांनी डेक्कन विभागातल्या वाडेश्वर ह्या उपाहारगृहाजवळ सगळ्यांनी ११ वाजता भेटा असे सांगितले...कांदळकर साहेबांनी आपला मुंबई दौरा स्थगित करून मला भेटायचे ठरवले..त्यामुळे तेही यायला निघाले....मी निघायच्या आधी आमच्या बझवरचा तरूण मित्र योगेश मुंढेने माझ्याशी संपर्क साधला...त्यालाही तिथे बोलावून घेतले....रानडेसाहेब  खराडीसारख्या दूरवरच्या भागातून खास मला घेऊन जायला आले...त्यांनी त्यांच्या स्कुटीवरून मला वाडेश्वरला नेले....तिथे आधीच सगळी मंडळी येऊन उभी होती....मग नमस्कार-चमत्कार करण्यात काही वेळ जातोय..तोच एक तरूणी  कुणाला तरी हात करून बोलावते आहे असे दिसले....माझ्या बाजूलाच योगेश उभा होता...त्याचीच कुणी मैत्रीण असेल असे वाटल्यामुळे मी त्याचे लक्ष तिकडे वेधले....तो गोंधळलेला दिसला...ती त्याच्या परिचयाची नसल्याचे म्हणाला.....काका,ती तुम्हालाच हात करतेय असेही वर म्हणाला....माझ्या चटकन काही लक्षात येईना...इथे अशा ठिकाणी मला ओळखणारी कोण बरे असेल? इतक्यात माझी ट्यूब पेटली....अरेच्चा, ही प्राजू तर नव्हे? थोडासा पुढे गेलो...आणि मग खात्रीच झाली....ती तिथे रानडे साहेबांशी बोलत होती आणि त्यांच्या सांगण्यावरून आमच्या दिशेला हात करून आमचे लक्ष वेधत होती....अशा तर्‍हेने आमच्या गप्पांत अजून एकीची भर पडली...मग आम्ही आमचा मोर्चा उपाहारगृहाकडे वळवला....मी थोड्याच वेळात येते असे सांगून प्राजू गेली ....खाता खाता आमच्या गप्पा सुरु झाल्या....कांदळकरसाहेब  आणि रानडेसाहेब ह्यांना ह्या आधी मी भेटलेलो होतो....पण जयंतराव आणि योगेश ह्यांना मी पहिल्यांदाच भेटत होतो...गप्पा सुरु असतांना खाणेही आले...आणि मग खाता खाता गप्पा सुरु राहिल्या...मग थोड्या वेळाने प्राजूही आमच्यात सामील झाली...तिने तिचे ड्रायव्हिंगचे काही अफलातून किस्से सांगून चांगलीच खसखस पिकवली....काय? ते किस्से सांगू म्हणता? नाही हं...ते आमचं शीक्रेट आहे...प्राजूच त्याबद्दल कधी तरी सवडीने लिहिल तिच्याच पद्धतीने...तोवर जरा कळ काढा.  ;)
प्राजूच्या कॅमेर्‍यात मग आमच्या छब्या टिपल्या गेल्या.....हो,हो...अहो दाखवणार ना...पण प्राजूने त्या माझ्याकडे पाठवायला तर हव्या...तेव्हा तिने पाठवल्या की लगेच दाखवतो...काय?   :)
आमच्या खाद्यंतीचे ह्यावेळचे प्रायोजक होते जयंतराव....त्यांनीच मग बिलाची वासलात लावली.  :)


असो..हास्यविनोदात दोन अडीच तास कसे गेले ते कळले नाही...पण मला आता वेध लागले होते...मुंबईकडे प्रस्थान ठेवण्याचे...तेव्हा सगळ्यांचा निरोप घेऊन मी,कांदळकरसाहेब आणि योगेश असे तिघे एकत्र निघालो...मला मुंबईच्या बशीत बसवण्यासाठी...छे छे...पोचवण्यासाठी  ;)  ह्या दोघांची नेमणूक झालेली होती.

एका ठिकाणी चौकशी केल्यावर आम्ही ठरवले की स्वारगेटला गेलो तर अर्ध्या अर्ध्या तासाने बशी सुटतात...तेव्हा तिथेच जायचे...योगेशकडे स्कुटी होती, पण त्यावर आम्ही तिघे कसे जाणार? मग आम्ही कांदळकरांना तिथेच निरोप दिला आणि ते गमनकर्ते झाले.

स्वारगेटला योगेशच्या स्कुटीवरून पोचलो तेव्हा दुपारचे पावणे दोन वाजले होते...तिथून बोरिवलीसाठी सुटणारी शिवनेरी अडीच वाजताची होती...म्हणून तिची वाट पाहणे सुरु झाले...अडीच वाजून गेले तरी तिचा पत्ताच नव्हता...शेवटी पावणे तीन वाजता ती आली एकदाची. आम्ही लगबगीने तिच्या जवळ पोचलो आणि...
कंडक्टर साहेबांनी सांगितलं....सगळी आसनं आधीच आरक्षित आहेत...तेव्हा दुसरी गाडी बघा....तरीही गाडी निघेपर्यंत..सव्वातीन वाजेपर्यंत तिथेच आशाळभूतासारखा  वाट पाहात होतो...एकाच आसनाचा तर प्रश्न होता...एखादी व्यक्ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येणार नाही किंवा आपले आरक्षण रद्द करेल म्हणून...पण नाही,शेवटी मला घेतल्याशिवायचे ती गेली. त्यानंतर मग आम्ही आमचा मोर्चा वळवला निम-आराम गाडयांकडे...पण त्याही भरलेल्या होत्या...मग एशियाडकडे.....तिथेही तीच अवस्था...मग आपल्या लाल डब्याकडे....अहो तिलाही दया नाही आली हो....मग काय करायचं आता? शेवटी एक लाल डबा पुण्याच्या बाहेरून आलेला दिसला..बराच रिकामा झाला...बोरिवलीलाच जाणार होता...कंडक्टरला विचारलं...तर म्हणाला ..बिनधास्त बसा...गाडी खालीच आहे.....हुश्श....चला एकदाची आसनाची तर सोय झाली....असे म्हणेपर्यंत डायवर साहेबही आले...आता गाडी सुटणार ह्याची खात्रीही झाली....पण कसले काय? पुन्हा कंडक्टर साहेब आले....म्हणाले...गाडी बिघडलेय...वरकशॉपला जातेय...समद्यांनी उतरून घ्या .  :(
घशाला कोरड पडली होती...म्हणून मग काही तरी थंड प्यावे म्हणून एका स्टॉलवर गेलो...तिथे थंडगार अ‍ॅप्पी प्यायलं,प्रवासात लागेल म्हणून एक पाण्याची शीलबंद बाटलीही घेतली....ह्याचे प्रायोजकत्व योगेशने स्वीकारले....पुण्यात मला एकही पैसा खर्च करावा लागू नये अशीच जणू सगळ्या पुणेकरांनी शपथ घेतली असावी असे राहून राहून वाटायला लागले.  :)

हे सगळं होईपर्यंत साडेतीन वाजलेले होते....एसटी स्टॅंडच्या बाहेर जाऊन खाजगी बशींची चौकशी करून आलो...पण सगळ्याच फुल्ल.....आणि एखाद्या बशीत जागा असण्याची शक्यता आहे नाही..हे पाहायचे असेल...तर कोथरूडला जा असेही वर सांगायला लागले..कारण गाड्या तिथूनच सुटतात....योगेश बिचारा प्रत्येक बोरिवली पाटी असलेली बस दिसली रे दिसली का जाऊन त्यातल्या डायवर-कंडक्टरांपैकी कुणाला तरी विचारायचा....काका, ह्या गाडीत एक सीट मिळेल काय? पण माझं नशीब त्यावेळी इतकं बलवत्तर होतं ;) की त्याला प्रत्येक ठिकाणी नकारच मिळत गेला. :(
शेवटचा उपाय म्हणून मग मी आमच्या साडूंशी संपर्क साधला....त्यांच्याशी झालेला संवाद...

पोचलात?

कुठे?

मुंबईला!

नाही हो, अजून इथेच आहे तुमच्या राज्यात, स्वारगेटला. सगळ्या गाड्या भरलेल्या आहेत...कुठेच प्रवेश मिळत नाहीये.

मग राहा आज इथेच.

नाही हो...ते शक्य नाही...त्यातून उद्या भारत बंद आहे..तेव्हा आजच जायला हवे.

बरं मग एक पंधरा मिनिटं थांबा...मी चौकशी करून सांगतो..

ठीक आहे, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही...मी थांबतो....


दहा मिनिटातच मग त्यांचा फोन आला...पाच वाजताच्या बसचे तिकीट आरक्षित केलंय...लगेच कोथरूडला अमूक अमूक ठिकाणी पोचा आणि तिकिट ताब्यात घ्या....
मग काय,योगेशने त्यांच्याकडून नेमकी जागा जाणून घेतली आणि पुण्यातले सगळे सिग्नल चुकवत गल्ली बोळातून गाडी पळवली... आणि जेमतेम दहा-बारा मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो...तिकिट ताब्यात घेतले आणि मगच हुश्श केले....संध्याकाळचे चार वाजून गेलेले...तरीही अजून पाऊण तासापेक्षा जास्त वेळ होता....


मग आम्ही थोडा वेळ घालवावा म्हणून गेलो दूर्गाची कोल्ड कॉफी प्यायला......माझ्यासाठी ह्या योगेशने त्याचे अमूल्य तास फुकट घालवले होते...अहो, कसे म्हणजे काय?
हल्लीच,नव्यानेच त्याचे लग्न झालंय...तिथे बायको आतुरतेने वाट पाहात असतांना हा माणूस माझ्यासारख्या एका नवपरिचित  म्हातार्‍याच्या सरबराईत गुंतलेला होता....अगदी मनापासून....जणू काही मी त्याचा सख्खा काका असावा असे त्याचे एकूण वागणे होते...त्याच्या ह्या आदरातिथ्याची एक छोटीशी पोचपावती म्हणून मला त्याला ती कोल्ड कॉफी पाजावी असे वाटले होते...ती संधीही त्याने मला दिली नाही.  :(


बस सुटेपर्यंत योगेश तिथून अजिबात हलला नाही...आजची सगळी दुपार त्याने त्याच्या स्कुटीवरून मला समग्र पुणे दर्शन घडवलं, मला त्याबद्दल त्याचे कौतुकही वाटत होते....पण त्याच वेळी स्वत:बद्दल मनात एक अपराधीपणाची भावनाही जागत होती...त्याच्या नवपरिणीत आयुष्यातले महत्वाचे क्षण मी नकळतपणे व्यापलेले होते.  :(

असो. मी एकदाचा योगेशचा निरोप घेऊन बसमध्ये प्रवेश केला...त्यानंतरच तो तिथून निघून गेला. निघतांना मी त्याचे आभार मात्र जाणीवपूर्वक मानले नाहीत....त्याने जे काही केले ते निव्वळ प्रेमापोटी आणि निरपेक्ष भावनेने केलेले मला पदोपदी जाणवत होते , आभार मानण्यामुळे कदाचित त्याचे मन दुखावले गेले असते....त्याऐवजी मी त्याच्या ऋणातच राहणे पसंत केले आणि त्याचा निरोप घेतला.

येतांना मात्र बस त्यामानाने व्यवस्थित आली....मी रात्री दहाला घरी पोचलो.
अशा रितीने शनिवार सकाळी १० ते रविवार रात्री १० ह्या ३६ तासांच्या मुंबई-पुणे-मुंबई प्रवासात मला शारीरिक दगदग,कालहरण इत्यादि गोष्टींमुळे झालेला मन:स्ताप हा... पुण्यातला पाहूणचार, तिथे भेटलेले सगळे आप्त, मित्रमंडळी ह्या सगळ्यांच्या प्रेमाच्या वर्षावामुळे खूपच सूसह्य वाटला. ह्या वेळच्या  पुण्याच्या वास्तव्यातले हे सोनेरी क्षण माझ्या मनात सदैव ताजेच राहतील हे निश्चित.