माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० ऑक्टोबर, २००८

राडा!

ही गोष्ट आहे साधारणपणे ३० वर्षांपूर्वीची. मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या मालाडमध्ये आणि आजच्या मालाडमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा वस्ती जेमतेम काही हजारात होती. आज ती दहा लाखांच्याही वर आहे.तर अशा त्या विरळ वस्ती असणार्‍या,घनदाट वनराई असणार्‍या काळातील ही घटना आहे.

त्या काळी मी दूरचित्रवाणीसंच दुरुस्तीची कामं करायचो. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच अशी सरकारी नोकरी आणि नंतर पूर्ण संध्याकाळ ते साधारण रात्री दहा-साडेदहा पर्यंत दूचिसंच दुरुस्ती असा एकूण माझा त्यावेळचा रोजचा कार्यक्रम असे. नोकरीसाठी मी रोज चर्चगेटला जात असे, मात्र दूचिसंच दुरूस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि मध्य रेल्वेवर कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत कुठेही जात असे.त्यामुळे मला घरी पोचायला बर्‍याचदा रात्रीचे १२ वाजत असत. त्या काळात दूरचित्रवाणीवर फक्त दोनच वाहीन्या होत्या.एक म्हणजे डीडी१ आणि दुसरी डीडी २. ह्या दोन्ही सरकारी वाहिन्या होत्या आणि त्याकाळात रात्री दहा-साडे दहाला बंद होत असत. त्यानंतर घरी पोचायला साहजिकच उशीर होत असे.

असाच एकदा मी माझ्या कामगिरीवरून परत येत होतो. दिवस थंडीचे होते. रात्री बाराचा सुमार होता. थंडीही मस्त पडलेली होती.(हो! तेव्हा मुंबईत थंडीही बर्‍यापैकी पडायची!)गाडीतून उतरलो आणि स्थानकाबाहेर आलो.सगळीकडे नीजानीज झालेली होती. नुकताच चित्रपटाचा शेवटचा खेळ संपून गेलेला असल्यामुळे स्थानकाच्या आसपास थोडीफार गर्दी होती. दूचिसंच दूरुस्तीसाठी लागणारे साहित्य असलेली साधारण ७ किलो वजनाची ब्रीफकेस सावरत आणि तोंडाने गाणे गुणगुणत माझी स्वारी मी राहात असलेल्या गल्लीपाशी पोचली. गल्लीत चिटपाखरूही नव्हते पण गल्लीच्या टोकाला लांबवर आमच्या वाडीच्या प्रवेशद्वारी बरीच माणसे जमलेली दिसत होती. इतक्या रात्री ही गर्दी कसली असा अचंबा व्यक्त करत मी हळूहळू तिथे पोहोचलो. जवळ गेल्यावर लक्षात आले की तिथे काही तरी खेळ सुरु असावा. कारण लोक दाटीवाटीने रिंगण करून उभे होते आणि जे काही चालू होते ते त्या रिंगणाच्या आत चालू होते. पण हे सर्व लोक अत्यंत भयभीत झालेले दिसत होते आणि सगळे जण पुढे काय होणार हे पाहात स्तब्धपणे उभे होते.
मी आत पाहण्याचा एक दोन वेळा निष्फळ प्रयत्न केला पण मला तर काहीच दिसले नाही. मग मी त्यातल्याच एक दोघांना विचारण्याचा प्रयत्न केला पण मला कुणीच उत्तर दिले नाही.माझ्या वाडीत शिरण्याचा रस्ताच ह्या गर्दीने रोखलेला असल्यामुळे मला वाडीतही शिरता येईना. मग मी माझ्या जड ब्रीफकेसचा वापर करत एकदोघांना ढोसले आणि कसेबसे स्वत:ला गर्दीत घुसवले.
गर्दीत घुसून मी आता अशा ठिकाणी आलो की जिथून त्या रिंगणात काय चाललंय ते मला स्पष्टपणे दिसत होते. ते दृष्य पाहून माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. माझ्यापासून दहा-पंधरा पावलावर एक माणूस भर रस्त्यात झोपलेला होता आणि त्याच्या पोटावर पाय दिलेला आणि हातात लखलखता रामपुरी चाकू घेतलेला त्यावेळच्या मालाडमधला नामचीन गुंड संभादादा उभा होता. गर्दीतल्या एकाचीही संभादादाच्या तावडीतून त्या माणसाची सुटका करण्याची हिंमत नव्हती. आमच्या वाडीच्या तोंडाशीच नगरपालिकेने नव्यानेच लावलेल्या मर्क्युरी व्हेपर लॅंपच्या शुभ्र प्रकाशात तर ते पाते विलक्षण चमकत होते. ते पाहूनच माझेही पाय लटलट कापू लागले. इतका वेळ त्या माणसाच्या नुसते पोटावर पाय ठेऊन उभ्या असलेल्या संभादादाने जोरात आवाज दिला आणि त्या माणसाला उद्देशून तो काही तरी बोलला. तो माणूस अतिशय लीनदीन होऊन हात जोडून संभादादाकडे अभय मागत होता पण दादा काही त्याचे ऐकत नव्हता. काही तरी देण्या-घेण्यावरून त्या दोघांच्यात बोलणे झाले आणि अत्यंत संतप्त होऊन संभादादाने तो रामपुरी असलेला हात उंच उचलला आणि वेगात खाली आणला....

त्याच वेळी त्या लखलखत्या पात्याने भयभीत होऊन माझ्या तोंडून क्षीणपणे(?) शब्द उमटले...पोलिस! पोलिस! पोलिस! आणि संभादादा त्या माणसाला सोडून समोरच्या दिशेला पळाला. लोकांचीही पांगापांग झाली. तो रस्त्यावर पडलेला माणूसही ही संधी साधून नेमका आमच्या वाडीत पळाला. क्षणार्धात तो आसमंत एकदम निर्मनुष्य झाला. वास्तवतेचे भान आल्यावर मी घाबरत घाबरत वाडीत पाऊल टाकले. एकतर वाडीत काळामिट्ट अंधार होता आणि अंधारात पळालेल्या त्या माणसामुळे वाडीतले यच्चयावत कुत्रे पार पेटलेले होते. भुंकून भूकून त्यांनी वाडी डोक्यावर घेतलेली होती. मला भिती अंधाराची नव्हती तर त्या पळालेल्या माणसाची आणि भुंकणार्‍या कुत्र्यांची होती. अंधारात त्यांनी(कुत्र्यांनी) मला ओळखले नसते तर माझी काही खैर नव्हती. आणि त्या माणसाला मारण्यासाठी संभादादा पुन्हा येणारच नाही ह्याची काय शाश्वती? तो माणूसही नेमका आमच्याच वाडीत लपण्यासाठी पळालेला असावा ना! पण माझे सुदैव हे की कुत्र्यांच्या त्या प्रचंड भुभुत्कारामुळे अर्धी अधिक वाडी जागृत झाली होती आणि काही घरातले दिवेही फटाफट लागले होते. माझ्याकडे विचित्र नजरेने पाहणार्‍या वाडकरांकडे दूर्लक्ष करत आणि त्यांच्या घरातल्या दिव्यांच्या बाहेर येणार्‍या थोड्याफार उजेडात त्या कुत्र्यांना चुचकारत चुचकारत मी कसाबसा एकदा घरात पोचऽऽलो.

१ ऑक्टोबर, २००८

शंकरराव! १

नाव काय तुमचं?
शंकर!
चहा घेऊन आलेला पोर्‍या नवीनच दिसत होता. चंदूशेठ चहावाल्या कडे आजवर कितीतरी मुलं काम करून गेली होती. ती बहुतेक सगळीच त्याच्या गावची असायची. शंकरही त्यातलाच.
किती शिकलात?
नाय! काय बी नाय शिकलो.
मग गावात इतकी वर्ष काय करत होता?
म्हशी चर्‍याला नेयाचा. सकाली भाकरी बांधून घेयाची आनि म्हशींना घेऊन चर्‍याला जायाचे.
वय किती तुमचे?
काय म्हाईत!
अहो तुमची जन्मतारीख कोणती?
जनमतारीक?त्ये काय आस्ते?
कमाल आहे. तुम्हाला जन्मतारीख माहीत नाही? बरं मला अंदाजाने सांगा तुमचं वय किती असेल?
माला काय म्हाईत? तुमीच समजून घ्या आता.
अहो, पण तुमचा जन्म कधी झाला हे मला माहीत नाही तर तु्मचे वय तरी मी कसे ओळखणार?
त्ये आमच्या अप्पाच्या म्हैशीला वासरु झालं व्हतं नाय का?
मग त्याचं काय ?
त्येला लई वर्स झाली. त्येच्या दुसर्‍या दिवशी मी जलमलो..आसं माजी आय सांगायची.
कधी झालं त्ये वासरू सांगु शकाल काय? म्हणजे साधारण किती वर्षांपूर्वी झालं?
वासरू ना? माझ्या जलमाच्या आदी एक दिस झालं.
मी कपाळाला हात लावला. ह्या माणसाशी ह्या विषयावर जास्त बोलण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यात तिथे बापूशेठ आला. हा बापू चंदूशेठकडे बर्‍याच वर्षांपासून कामाला होता.
मामा,अरे किती येल हिथंच बसला हाईस? जा. चंदूशेठ बलावतोय.
अच्छा. म्हणजे हा शंकर बापूचा मामा तर...मी स्वत:शीच बोललो.
ओ बापूशेठ, इकडे या जरा. हा शंकर तुमचा खराच मामा आहे काय?
व्हय. माझ्या दुसर्‍या आईचा चुलत भाव हाय त्यो. म्हंजी मामाच न्हवं काय?
बरोबर,मामाच आहे तुमचा. पण ही दुसरी आई काय भानगड आहे?
माझ्या बापाची पहीली बायकु ..म्हंजी माजी सक्की आय. माजा बाप लई जंक्शान मानूस. एका बायकुने भागंना म्हनून बापाने पाट लावला त्यो ह्या शंकर मामाच्या भैनीशी.
अच्छा. म्हणजे ही तुझी सावत्र आई आहे तर आणि हा मामाही सावत्रच आहे ना?
बरोबर. पन माज्या सक्क्या आयपेक्षा हीच आय माज्यावर जास्त प्रेम करते आनि हा मामा बी लई भोळा हाई.
बरं मला सांगा हा तुमचा शंकरमामा किती वर्षांचा असेल?
मामा ना? ३०वर्सांचा तरी आसेल. मीच आता २५ वर्सांचा हाय. माज्या पेक्षा मोटा हाय त्यो.

ही माझी आणि शंकरची पहिली भेट.

आमच्या कार्यालयात चहा बनवण्यासाठी दोनजणांना भरती करायचे होते असे कळले. कुणी ओळखीतले असतील तर या घेऊन..असे साहेबांनी मला सांगितले. सर्वात आधी मी चंदूशेठ आणि त्याचा धाकटा भाऊ नामदेवलाच विचारले. पण ते दोघे नाही म्हणाले. इथे मी ’चंदूशेठ’ असा उच्चार करतोय म्हणून असे समजू नका की चंदू हा खरोखरीचाच शेठ होता म्हणून. चहाची टपरी चालवून कसेबसे आपले आणि आपल्या कुटुंबाचे तो पोट भरत होता इतकेच. मला कुणालाही एकेरी हाक मारणे सहजासहजी जमत नाही म्हणून मी चंदूला चंदूशेठ म्हणत असे आणि माझे ऐकून हळूहळू सगळेच त्याला चंदूशेठ म्हणायला लागले. नामदेवाला मी नामदेवराव आणि बापूला बापूशेठ म्हणायचो.
नंतर मी बापूशेठ आणि शंकरमामाला विचारले. त्यात बापूशेठनी तयारी दाखवली आणि शंकरमामानी शेपटी घातली म्हणून मग त्याच वेळी आमच्याकडे हंगामी सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या गोंविंदाला पुढे केले आणि त्या चहावाल्याच्य़ा दोन जागा भरल्या गेल्या. सरकारी पगार आणि चंदूशेठकडे मिळणारा पगार ह्यात जमीन अस्मानाचे अंतर होते. चंदूशेठ पोरांना एकवेळचे जेवण आणि दिवसातून दोन चहा व्यतिरिक्त फक्त ५००रूपये पगार देत असे. अर्थात तो त्याच्यासाठी जास्तच होता म्हणा. पण इथे आमच्या कार्यालयात पोरं भरती झाली तीच मुळी २०००+पगारावर. त्यामुळे बापूशेठ तर मला अन्नदाताच समजायला लागला. शंकरमामाला नंतर जेव्हा बापूशेठला मिळणारा पगार कळला तेव्हा त्याला खूपच चुटपुट लागून राहीली. पण हातची संधी केव्हाच गेली होती.