माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ मार्च, २००८

सातत्याचा विक्रम!

मंडळी आज गुरुवार! दत्ताचा वार!
चक्रावलात ना! माझ्यासारख्या नास्तिक(आडनावाने देव आहे म्हणून काय झाले.... नाव सोनुबाई.... ही म्हण उगीच नाही केली आपल्या पूर्वजांनी) माणसाकडून हे असले काही ऐकले की सूर्य आज पश्चिमेला तर नाही ना उगवला.. असे वाटायचे तुम्हाला. मी हे असले काही बोललो म्हणून तुमच्या भुवया उंचावलेल्या दिसताहेत. पण थांबा. नाही! अहो, मला काहीच झालेलं नाहीये. मी अगदी व्यवस्थित आहे. मग? मी असा का बोलतोय? जाणून घ्यायचंय? बरं तर ऐका!

काय आहे, की मी आज सकाळी लवकर उठलो.
आता लवकर उठलात! त्यात काय विशेष? असते एकेकाला अशी सवय!
अहो पण मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या ना! असा मध्ये मध्ये हाल्ट करू नका बॉ! उगाच विसरायला होते. हां! तर आज गुरुवार! मी सकाळी लवकर उठलो.
च्या मारी(काय ती घ्या म्हणतो एकदाची)! तुमची तबकडी अजून तिथेच अडकलेय की! काय ते एकदा सांगून टाका ना. कशाला उगाच नमनालाच वाटीभर(कोण म्हणाला तो घडाभर? )तेल फुकट घालवताय?
बरर्र्! सांगतो. आता एकदम विषयालाच हात घालतो.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील 'मुंबई ब'(आता 'अस्मिता) ह्या वाहिनीवरून रोज सकाळी मंगलप्रभात हा कार्यक्रम सादर होत असतो. ह्या कार्यक्रमात भक्तिगीते सादर होत असतात. साधारणपणे ज्या देवाचा वार(उदा. सोमवार=शंकर,मंगळवार=गणपती...वगैरे वगैरे) असेल त्या देवाची गाणी लावण्याची प्रथा सुरुवातीपासूनच चालत आलेली आहे आणि ती इमाने-इतबारे पाळली देखिल जाते. तर आज गुरुवार म्हणून दत्ताची गाणी लावणे हेही साहजिकच आहे म्हणा. तर तशी ती लावली गेली होती. पण प्रत्येक वारी त्या त्या देवांची गाणी लागणे आणि गुरुवारी दत्ताची गाणी लागणे ह्याचे खास असे वैशिष्ठ्य आहे. एरवी जी इतर देवांची गाणी लागतात ती गाणारी कलाकार मंडळी हवी तेव्हढी आहेत. गानकोकिळा लताबाईं,आशा भोसले,भीमसेन जोशी,सुधीर फडके अशां सारख्या दिग्गजांपासून ते आता नव्यानेच उदयाला येणार्‍या अनेक गायक-गायिकांकडून आपण ही गाणी सदैव ऐकतच असतो. पण दत्ताची गाणी गाण्याचा जणू काही मक्ता एखाद्याच व्यक्तीकडे असावा.... आहे असे म्हणा हवे तर अशा तर्‍हेने चटकन ओठावर येणारे नाव म्हणजे "रघुनाथ उर्फ आर.एन्.पराडकर" हेच होय. ह्याचा अर्थ इतर कुणी दत्ताची गायलेली नाहीत किंवा गात नाहीत काय? गातात की! नाही कोण म्हणतंय! मग "आर्.एन." ह्यांचेच नाव मी का घेतो?
त्याला कारण आहे ते म्हणजे गेली कैक वर्षे.....५० हून जास्त वर्षे अखंडपणे दर गुरुवारी आर.एन. ह्यांची ही दत्तगीते सादर होत असतात आणि हा एक विक्रम आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

माझ्या बालवयापासून मी ही दत्त-भक्तिगीते ऐकत आलेलो आहे. साधी सोपी रचना,प्रासादिक शब्द असे ह्या गीतांचे स्वरूप आहे. अतिशय सुस्पष्ट शब्द,सुगम अशा चाली आणि मधुर आणि आवाजात फारसे चढउतार नसलेल्या पद्धतीने पराडकरांनी ही गीते गायलेली आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्या गाण्यांची गोडी अवीट आहे. इथे दत्त+पराडकर+आकाशवाणी असे त्रिकुट बनलेले आहे . आजही ते अतूट आहे आणि येणारी अनेक वर्षे हे अबाधित राहील ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

विसु: मी (स्वतःचा सोडून)कोणत्याही देवाचा भक्त नाही हेलक्षात असू द्या. संगीतालाच (मुलगी नव्हे. उगाच विचित्र नजरेने पाहू नका)मी देव मानतो.

२२ मार्च, २००८

चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा!

मी सद्या ज्या इमारतीत राहतोय तिथे येऊन मला जेमतेम चारच वर्षे झालीत.मात्र ह्या इमारतीत गेली कैक वर्षे राहिलेली कुटुंबे एकमेकांना फारशी ओळखतही नाहीत ह्याची जाणीव झाली आणि ठरवले की ह्यावर काही तरी तोडगा काढायलाच हवा. ह्या वर्षी मी आमच्या इमारतीच्या कार्यकरिणीचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सुत्र हाती घेतली. माझ्याप्रमाणेच नवनिर्वाचित सचिव आणि खजिनदार अशा आम्ही तिघांनी मिळून आमच्या इमारतीतील सर्व कुटुंबियांचे एक स्नेहसंमेलन कार्यकारिणीच्याच खर्चाने २६ जानेवारी २००८ रोजी आयोजित करण्याची घोषणा केली. सर्वांनी त्याला अनुमोदनही दिले आणि "कोई आनेवाला नही"(ह्या ठिकाणी मी एकमेव मराठी माणूस आहे;बाकी सगळे गुजराथी) अशी वर प्रतिक्रिया देखिल व्यक्त केली. आम्ही तिघांनी त्यामुळे खट्टू न होता जोमाने तयारी सुरु केली. जसजसा तो दिवस जवळ येऊ लागला तसतसे लोक आपणहून पुढे यायला लागले आणि सांगायला आनंद वाटतो की समारंभ अगदी झोकात साजरा झाला. झाडून सगळी लहानथोर मंडळी त्या दिवशी प्रथमच इमारतीच्या खाली घातलेल्या मंडपात जमा झाली. खेळ खेळली. जेवली, लोकांनी एकमेकांशी ओळखी करून घेतल्या . आम्हा तिघांचे पुन:पुन्हा अभिनंदन करून असेच समारंभ वरचेवर व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली गेली.
लगेचच येणार्‍या होळीला असाच काही कार्यक्रम करावा अशी काही तरूण मंडळींनी गळ घातली आणि त्यासाठी स्वत:हून रुपये ३००० तिथल्या तिथे जमा करून खजिनदारांकडे सूपूर्त केले. होळीच्या दिवशी असे काही आयोजन असू नये असे माझे वैयक्तिक मत मी व्यक्त केले आणि इतर दोघेजणही माझ्याशी सहमत दिसले. मात्र होळी साजरी करायची असेल तर त्याबाबतचा पुढाकार तरूणांनीच घ्यावा असे मी आवाहन केले.मी स्वत: मात्र सहभागी होऊ शकणार नाही पण इतरांनी तो आनंद जरूर लुटावा असेही सांगितले.त्या वेळेस सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि नंतर आम्ही आमच्या रोजच्या धबडग्यात हे विसरूनही गेलो.

आज दिनांक २२ मार्च २००८. सकाळची साडेनऊची वेळ. दाराची घंटी वाजली. मी दरवाजा उघडून पाहिले तर आमचे तरूण मंडळ हातात रंगांच्या पुड्या घेऊन मला आवाहन करायला आलेल्या.
"अंकल,(हल्ली काका का म्हणत नाहीत कुणास ठाऊक) अंकल आईये ना होली खेलने!"
"मी रंग खेळत नाही त्यामुळे मी त्यात भाग घेणार नाही. तुम्ही तुमचा आनंद आपापसात साजरा करा ." असे मी त्यांना म्हटले. काही वर्षांपूर्वीच माझ्या दोन्ही डोळ्यांवर मोतिबिंदुची शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे तर मी साधा गुलालही लावून घेत नाही.
पण त्यांचा आग्रह मला मोडवला नाही म्हणून "फक्त टिळा लावणार असाल तरच दरवाजा उघडतो" असे म्हटले. त्यांनी ते मान्य केले आणि मी बाहेर पडलो. कबूल केल्याप्रमाणे त्या पाच सहा जणांनी मला टिळा लावला आणि ते निघून गेले. मी त्यांचा आणि त्यांनी माझा मान राखल्यामुळे दोघेही खुश झालो.
दहा एक मिनिटाने पुन्हा घंटी वाजली. त्या मागोमाग आवाजही आला "प्रमोदभाय! आओ! दरवाजा खोलो!"
जाऊन पाहतो तो आमचे सचिव रमेशभाई आणि खजिनदार हिरेनभाई मला बोलवायला आले होते. स्वत: ते नखशिखान्त रंगलेले होतेच.
मी पुन्हा माझी डोळ्यांची अडचण सांगितली. त्यावर त्यांनीही समजूतदारपणे "आपको हम रंग नही लगायेंगे.खाली टिका लगायेंगे. लेकीन आप हमारे साथ नीचे आईये. आप नही आयेंगे तो मजा नही आयेगी!" असे म्हटल्यावर माझा नाईलाज झाला आणि मग मीही त्यांच्याबरोबर मैदानात उतरलो.
खाली गेलो तर बायका,मुले,पुरूष सगळे हजर होते.कुणीही ओळखू येणार नाही असे एकेकाचे चेहरे आणि कपडे रंगलेले होते. एकमेकांवर रंग आणि पाणी उडवण्याची स्पर्धा चाललेली होती. कुणी स्वखुशीने तर कुणी नाईलाजाने आपापले चेहरे रंगवून घेत होते. माझ्या तिथे जाण्यामुळे त्यांना "नवा बकरा" सापडल्याच्या आनंदात काही जण आले मात्र माझी परिस्थिती कळल्यावर मग रंग चेहर्‍याला नाही तर मग अंगावर उडवला तर चालेल असे मानून(माझीही त्याला हरकत नव्हती) रंगांची उधळण करून मलाही रंगवले. काही जणांनी(मला विचारून) अंगावर पाणीही उडवले. मी मात्र कुणालाच रंगवले नाही. रंगवण्यापेक्षा रंगण्यात म्हणा किंवा रंगवून घेण्यात मला जास्त आनंद वाटतो. मी त्या सगळ्यांसोबत तास-दीड तास तिथे उभा राहिलो आणि मग घरी परतलो.

मंडळी आता तुम्ही म्हणाल, "ह्या! ह्यात काय विशेष असे सांगण्यासारखे आहे? आम्ही तर दरवर्षी हा आनंद मुक्तपणे अनुभवत असतो!"
खरं आहे तुमचे. म्हटले तर विशेष नाहीच आहे.पण...
मी माझी शालांत परीक्षा १९६८ साली पास झालो. त्यावर्षी मी जी धुळवड साजरी केली होती त्यानंतर आज बरोबर चाळीस वर्षांनी धुळवड साजरी केली.तीही दुसर्‍यांच्या आग्रहाखातर आणि आनंदाखातर! मधल्या काळात ती साजरी न करण्याच्या मागे म्हटले तर कोणतेही संयुक्तिक कारण माझ्याकडे नाहीये. नंतर वापरात आलेले ऑईल-पेंट, रासायनिक रंग वगैरे अशी कारणे आहेत. नाही असे नाही. पण दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. माझा हट्टी स्वभाव(नाही म्हणजे नाही; अजिबात नाही) हे कदाचित त्याचे कारण असू शकेल.
पण आज इतक्या वर्षांनंतर कुणाच्या तरी विनंतीला मान दिल्यामुळे त्यांना झालेला आनंद आणि त्या आनंदात माझेही काही क्षण आनंदात गेले असे मला वाटले आणि ह्यात आपलीही सोबत असावी म्हणून हा लेखन प्रपंच.

वय वाढले की हट्टीपणा कमी होतो की वाढतो? हा मात्र एक संशोधनाचा विषय ठरावा.

२१ मार्च, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ८

त्या कत्तलीनंतरची पहिली सकाळ ही अपार उजेड घेऊन आली. गोंधळलात ना! मी असा वेड्यासारखा अर्थहीन काय बोलतोय असेही वाटले असेल तुम्हाला. अहो असे व्हायचेच. माझेही तसेच झाले. कारण एरवी जो लख्ख सूर्यप्रकाश आमच्या पर्यंत पोचायला सकाळचे ७-७.३० वाजायचे तोच आज सकाळी ६च्या सुमारास दिसू लागला. सुर्यकिरणांच्या वाटेत येणारे, ते गर्द पानेफुले आणि फळांनी लगडलेले वृक्ष, आता त्यांची वाट अडवायला नव्हते.त्यामुळे मी जेव्हा अंथरुणातून उठलो तेव्हाच जाणवले की आजचा दिवस काही वेगळाच दिसतोय.सूर्यप्रकाश इतका प्रखर होता की क्षणभर डोळे दिपून गेले. हळूहळू त्या प्रकाशाचीही मग सवय झाली.
असेच दिवस जात होते. आम्ही लावलेल्या बर्‍याचशा फांद्यांनी मान टाकलेली होती.एक तर मुळे नसलेल्या आणि निर्दयपणे कापल्या गेलेल्या त्या फांद्या जगल्या असत्या तरच नवल वाटले असते.मात्र आमचे श्रम अगदीच काही फुकट गेलेले नव्हते.
पानं सुकलेल्या अवस्थेतही, घरटी निदान एखादं दुसर्‍या फांद्यांमध्ये अजूनही हिरवटपणा दिसत होता.आशेला जागा होती आणि हीच मोठी सुखकारक गोष्ट वाटत होती. मालकांची बाग असताना आमच्या कुणाच्याही दारात स्वत:चे असे कोणतेही रोप अथवा झाड नव्हते त्यामुळे झाडे जगण्यासाठी,खरे तर जगवण्यासाठी काय करावे लागते हे आम्हा कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे जे होईल ते निसर्गावर सोपवून आम्ही निर्धास्त होतो.

आठवडाभरात उरली सुरली झाडे(फांद्या) देखिल पार सुकून गेली.होळी जवळ आलेली त्यामुळे वातावरणात इतका उकाडा निर्माण झाला होता की झाडाला घातलेले पाणी पाचच मिनिटात दिसेनासे होऊन तिथली जमीन कोरडी ठणठणीत दिसायला लागायची. अशा अवस्थेत एका सकाळी मला अतिशय उत्साहवर्धक असा अनुभव आला. घराच्या बाहेर, ओट्यावर नेहमीप्रमाणे मी दात घासत बसलो होतो. आजूबाजूचे निरीक्षण करत असताना नजर एके ठिकाणी स्थिरावली. मातीत रोवलेल्या निष्पर्ण अशा एका काडीवर मला एक हिरवा ठिपका दिसला. आधी काय असावे ते कळले नाही पण मग नीट निरखून पाहिले आणि मला अक्षरश: अत्यानंद झाला. मी नाचत नाचत घरात गेलो आणि सगळ्यांना बळेच बाहेर घेऊन आलो. ते दृश्य पाहिल्यावर सगळेच खूश झाले पण.... ती काडी म्हणा अथवा खुंट म्हणा कोणत्या झाडाचा असावा ह्याबद्दल काहीच अंदाज येत नव्हता. कोणते बरे झाड असावे? सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता आणि त्याचे उत्तर मिळायला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार होती.
त्याचाही उलगडा पुढच्या काही दिवसात झाला. मंडळी ती होती मोगर्‍याची काडी, हे त्याला फुटलेल्या पालवीवरून समजले आणि माझ्या दारात लावलेल्या त्या मोगर्‍याच्या काडीला अतिशय लोभस अशी पालवी फुटलेली पाहून नकळत मला ज्ञानेश्वरांच्या 'मोगरा फुलला,मोगरा फुलला!' ह्या ओळी आठवल्या. आता कुठेशी नुसती पालवी फुटलेली असताना मी 'मोगरा फुलला' असे का समजत होतो? कारण मलाही माहीत नाही पण आपल्या हातांनी रोवलेल्या फांद्यांमधील मोगर्‍याची फांदी सर्वप्रथम रुजावी ही भविष्यकाळातील सुगंधाची जणू नांदी असावी असेच मला वाटले होते त्यामुळे मी स्वत:वरच खूप खूश होतो.
आणि मंडळी पुढे जणू वसंतोत्सव सुरू झाला असावा अशा तर्‍हेने हळूहळू प्रत्येकाच्या दारात मृतप्राय वाटणार्‍या त्या खुंटांना एकामागून एक पालवी फुटायला लागली ते पाहिल्यावर तर मला बालकवींची(त्यांचीच ना?) 'मरणात खरोखर जग जगते' ही काव्यपंक्ती आठवली.

सिंध्याने झाडं तोडणी झाल्यावर इमारतीच्या बांधकामाला जलदगतीने सुरुवात केली. सुरुवातीलाच आठदहा कामाठ्यांची कुटुंबे तिथे वसतीला आली त्यांनी काही तासातच त्यांच्यासाठी तिथे पाचसहा झोपड्या उभ्या केल्या.जागेची मोजणी मापणी झाली. त्यावर चुन्याने रेषा आखल्या गेल्या आणि एक दिवस मुहूर्तासाठी वाडीतील यच्चयावत सगळ्या लोकांना आमंत्रण दिले गेले. तो सिंधी आपल्या बायका-मुलांसह प्रत्येकाच्या घरी जाऊन आग्रहाचे आमंत्रण देऊन गेला. झाले गेले विसरून बहुतेकांनी हजेरी लावली. पुजा वगैरे आटोपल्यावर जमिनीवर नारळ फोडला गेला आणि सिंध्याने जमिनीत पहिली कुदळ मारली. खान-पान झाल्यानंतर समारंभ संपला. पुढच्याच पाच सहा दिवसात पुरुषभर उंचीचे ८-१० खड्डे खणून झाले.त्यात पाणी लागले. मग ते काढण्यासाठी मोटारी लावल्या. अशा सगळ्या धबडग्यात होळी आली. होळीसाठी दोन दिवस काम बंद ठेवलेले. बागेशिवायची ही आमची पहिली होळी. आम्हा मुलांना होळीच्या वेळी आजवर लाकूडफाटा,सुकलेला पाला-पाचोळा पुरवणारी बाग ह्या वेळी नव्हती ह्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा मन विषण्ण झाले. पण ती कसर आम्ही सिंध्याने बांधकामासाठी आणलेले बांबू,फळ्या वगैरे पळवून भरून काढली. होळी नेहमी प्रमाणे दणक्यात साजरी केली.


ह्या होळीला आम्हाला अजून एक नवा अनुभव मिळाला. तो म्हणजे त्या कामाठ्यांनी काढलेली सोंगे. कुणी राम,तर कुणी सीता,कुणी हनुमान अशी सोंगे धारण करून ते सगळे वाडीभर फिरत होते. लोक जे काही पैसा,धान्य देत ते आनंदाने घेत घेत पुढे जात होते. त्यांच्या मागून आम्ही सगळी वाडीतली बाळगोपाळ मंडळी त्यांची वानरसेना बनून चालत होतो. ढोलकीच्या तालावर त्यांच्या बरोबर आम्हीही नाचत होतो.ते लोक त्यांच्या भाषेत काही गाणीही म्हणत होते,नाचत होते. आम्हाला भाषा जरी कळत नव्हती तरी गाण्याची उडती चाल आणि त्याबरोबरचा ढोलकीचा ठेका आम्हालाही नाचायला प्रवृत्त करत होता. खूपच धमाल केली त्या दिवशी. त्यानंतर किती तरी दिवस आम्ही ती गाणी वाट्टेल ते शब्द घालून म्हणत नाचत असू.
त्या कामाठ्यांचा मुकादम 'बागाण्णा' आम्हा बालगोपालांवर खूप खूश होता. आम्ही त्याच्याशी आमच्या भाषेत बोलायचो आणि तो त्याच्या भाषेत.कुणाचा कुणाला पत्ता नाही. मग काय? खाणाखुणा करून बोलायचो. तीच तर खरी गंमत होती.संवाद साधण्यासाठी भाषेची आडकाठी असते असे निदान आम्हाला तरी त्याक्षणी जाणवले नाही.

दुसर्‍या दिवशीची धूळवडही दणक्यात झाली. आतापर्यंत आम्ही एकमेकांना मातीत लोळवून ती साजरी करायचो; पण ह्या वेळी आम्हाला आयते खणलेले आणि पाण्याने भरलेले खड्डे मिळाले होते. मग एकेकाला त्यात ढकलून देण्यातला आनंद अनुभवण्यात वेगळीच मजा आली. शेवटी शेवटी तर सगळेच खड्ड्यात! अशी परिस्थिती निर्माण झाली. मग काय विचारता? कुणी कुणाची तंगडी खेचतोय,तर कुणी कोणाला पाण्यात बुडवतोय असले आसुरी आनंद मिळवणारे खेळ सुरू झाले. बरं त्यातून बाहेर पडावे तर खड्डे खोल असल्यामुळे वर चढण्यासाठी शिडी शिवाय तरणोपाय नव्हता. पण ती आणणार कोण?
इतक्यात एकाने दुसर्‍याचा हात इतक्या जोरात धरून खेचला की तो खाली पडला आणि त्याच्या नाका-तोंडात पाणी गेले आणि तो घाबराघुबरा झाला. हे पाहून दुसरा जोरजोरात आरडाओरड करायला लागला. मग काय? बागाण्णा तिथे धावत आला त्याने ते पाहिले मात्र,धावत जाऊन त्याने शिडी आणली आणि मग तिच्या साहाय्याने एकेक करून सगळे बाहेर पडले. पण एकजण शिडीने बाहेर यायला तयार नव्हता. त्याने बागाण्णाकडे हात मागितला. नाईलाज म्हणून बागाण्णाने खाली वाकून त्याला हात देऊन वर ओढण्याचा प्रयत्न केला पण त्या व्रात्य मुलाने बागाण्णालाच खाली खेचले आणि चिखलात लोळवले. बागाण्णा खाली पडताच लगेच तो मुलगा शिडीने झरझर वर आला आणि इतर हसणार्‍या मुलांच्यात सामील झाला.
सगळ्यांना वाटले की आता बागाण्णा त्याला पकडून मारणार म्हणून सगळे जरा दूर जाऊन उभे राहिले. तो ही मनोमन घाबरलेला होता. पण...
नखशिखांत चिखलाने माखलेला बागाण्णा शिडी चढून वर आला आणि हसत हसत विहिरीकडे गेला. विहिरीतून पाणी काढून त्याने स्वतःवर ओतून घेतले,अंगावरचा चिखल धुऊन काढला आणि कुणावरही न रागावता तडक आपल्या झोपडीत निघून गेला. बागाण्णाच्या वर्तनाने अचंबित झालेला तो ही त्याच्या मागोमाग गेला. थोड्याच वेळात त्याला घेऊन बागाण्णा विहिरीकडे गेला आणि विहिरीतून पाणी काढून त्याने त्याला यथेच्छ न्हाऊ घातले. हे पाहून इतरही मुले पुढे सरसावली. बागाण्णाने त्यांनाही असेच न्हाऊ घातले आणि मग बागाण्णाचा जयघोष करत सगळेजण आपापल्या घरी निघून गेले.
तो व्रात्य मुलगा कोण होता हे तुम्ही ओळखले असेलच.

१६ मार्च, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ७ (कत्तल!)

दादांचे वडील की आजोबा(नक्की माहीत नाही) मामलेदार होते. त्यामुळे आमची वाडी आणि अशाच अनेक वाड्यांचा मिळून एक मोठ्ठा भूभाग.... ज्या सबंध भागाला 'मामलेदार वाडी' असे संबोधत ती त्यांच्या मालकीची होती. प्रचंड अशी जायदाद त्यांनी गोळा केलेली होती. त्यांचे सगळे वारसदार (दादा आणि दादांचे बरेचसे सख्खे, चुलत/मावस वगैरे नातेवाईक) तिथेच आजूबाजूला त्यांच्या त्यांच्या बंगल्यात राहत असत. त्यापैकीच एकाच्या मुलाशी(जो नात्याने दादांचा नातू लागत होता)बेबीचे सूत जुळले. खरे तर बेबी त्याची 'आत्या' लागत होती; पण तो भाचा(की पुतण्या) असला तरी तिच्यापेक्षा वयाने मोठा होता. बेबीच्या हट्टामुळे नाईलाजास्तव तिचे त्याच्याशी लग्न लावावे लागले आणि ह्या धसक्याने दादा जे आजारी पडले ते त्यातून कधीच न उठण्यासाठी. काही महिन्यातच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने आणि बेबीच्या कृतीने ताई देखिल हवालदिल झाल्या आणि त्याही आजारी पडल्या. त्यांचे ते दरबार भरवणे खूपच कमी झाले. त्या कधी -मधी पडवीत बसलेल्या असल्या तरी आता कुणाशीही बोलत नसत. कुणी त्यांच्या तब्येतीची चौकशी केलीच तर जुजबी बोलून त्याला वाटेला लावत. दिवसभर विमनस्क स्थितीत बसलेल्या आणि शून्यात दृष्टी लावलेल्या ताईंना बघायची कुणालाच सवय नव्हती; पण आता सगळेच चित्र बदललेले होते.

ताईंच्या अशा अवस्थेमुळे त्यांचे कारभारात खास लक्ष लागेना आणि मग हळूहळू त्यांनी सगळा कारभार गुंडाळायला सुरुवात केली.
आधी त्यांनी त्यांच्या जायदादीच्या वाट्यातील ती बाग विकायला काढली जी आम्हा सगळ्यांसाठी एक आकर्षण होते. हा हा म्हणता ती बातमी वाडीभर पसरली आणि लहानथोर अशा सगळ्या वाडी-करांमध्ये एक प्रकारचे नैराश्य आले. ती बाग म्हणजे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेली होती. रोज सकाळी उठल्यावर प्रथमत: त्या बागेचे दर्शन घडत असे की ज्यामुळे दिवसभर अतिशय प्रसन्न वाटायचे. डौलात डुलणारे ते उंचच उंच ताडमाड, ते सळसळणारे वड-पिंपळ, फळा-फुलांनी लगडलेली ती सर्व लहान-थोर झाडे, तो जाई-जुईचा सुगंध, रातराणीचा धुंद करणारा सुवास, प्राजक्ताची ती नाजूक आरक्त देठयुक्त सुवासिक फुले... आणि अजून कितीतरी... हे सगळे सगळे आता नष्ट होणार! ह्यापुढे ह्या सगळ्यांशिवाय आपल्याला जगावे लागणार.. ह्या कल्पनेनेच आम्हा सगळ्यांना नैराश्य आले. काही भाडेकरूंनी ताईंना कळकळीची विनंती केली की त्यांनी ती बाग विकू नये म्हणून; पण ताईंना आता पैलतीर खुणावत होते. मागे कुणी वारस नव्हता. एकुलत्या एका मुलीशी संबंध तोडून टाकलेले. मग कुणाच्या जीवावर हे सगळे आता निभवायचे? भाडेकरूंना नकार देताना त्यांच्याही जीवावर आले होते पण दुसरा मार्गच नव्हता. आपण जिवंत आहोत तोवर सगळी निरवा-निरव त्यांना करायची होती. मोठ्या कष्टाने त्यांनी सगळ्यांची विनंती अव्हेरली

ती बाग एका सिंध्याने विकत घेतली होती आणि मग एक दिवस तो सिंधी काही माणसांना घेऊन आला ... ज्यांच्या हातात कुर्‍हाडी,करवती अशी हत्यारे होती आणि मोठ-मोठे दोरखंड होते. आम्हा मुलांत कुतूहल निर्माण झाले की हा काय प्रकार आहे?
आणि जेव्हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा तर आम्ही पार थिजून गेलो होतो. ह्या सिंध्याला तिथे इमारत बांधायची होती आणि म्हणून त्याने इथली सगळी झाडे तोडायला ही सगळी फौज आणलेली होती. इतकी वर्ष ज्यांनी ह्या झाडांची जीवा-भावाने मशागत केली होती ते माळीदादा नि:स्तब्ध होते. माडाच्या झाडावर जेव्हा पहिली कुर्‍हाड पडली तेव्हा त्यांना ते बघवले नाही. मुसमुसत आणि डोळ्याला रुमाल लावत, जडावलेल्या पावलांनी ते तिथून निघून गेले. आम्हा मुलांचीही तीच अवस्था झाली होती.आम्ही हताश होऊन त्या अमानुष हत्या पाहत होतो आणि डोळ्यांतून अखंड धारा पाझरत होत्या.काही जण मुक्त कंठाने रडत होते. मोठ्या माणसांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. ताईंनी तर त्या दिशेला असलेली खिडकीच बंद करून टाकली. सगळ्या वाडीवर सुतकी कळा पसरली होती.

एक एक वृक्ष धराशायी होताना पाहून काळीज तिळतीळ तुटत होते. फुलझाडे,वेली ह्यांची कत्तल करताना त्या लोकांना फार कष्ट नाही पडले; सटासट होणार्‍या विळ्या-कोयत्यांच्या वाराने त्या नाजूक वेली आणि फुलझाडे निमूटपणे मान टाकत होत्या; पण ते मोठ-मोठे वृक्ष पाडताना मात्र एकेकाचे घामटे निघाले. सतत सात दिवस ही कत्तल चालली होती. आम्ही मुले सकाळी शाळेत जाताना जे काही दिसेल ते डोळे भरून पाहून घेत होतो. शाळेतून घरी आल्यावर काही दिसेल ना दिसेल ह्याची शाश्वती नव्हती. आंबा,चिकू,पेरू सारखी मोठी झाडे तोडताना आधी त्यांच्या फांद्या तोडून टाकल्या जात होत्या. त्या फांद्यांना लागलेल्या छोट्या कैर्‍या,चिकू,पेरू वगैरे जे हाताला लागेल ते आम्ही जमेल तितके तोडून घेत होतो. ती फळे खाण्याच्या लायकीची असोत नसोत. निदान अजून काही दिवस तरी आम्ही त्यांच्या सहवासात अशा तर्‍हेने राहू शकणार होतो... ही भावनाच खूप मोठी होती. फुलझाडे,वेली वगैरेच्या फांद्या जितक्या उचलता आल्या तितक्या सर्व लोकांनी उचलल्या आणि आपापल्या दारात लावल्या. त्यातून काही जगल्या तर निदान तो सहवास आम्हाला हवाहवासा वाटत होता.