माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ ऑक्टोबर, २०१०

आऽऽग!!!

आज साडेअकराच्या सुमारास मी स्नानाला गेलो. स्नान आटोपून अंग पुसत होतोच इतक्यात काही आवाज यायला लागले. टिकल्या फोडतो ना दिवाळीत असा काहीसा आवाज होता त्यामुळे आधी त्याचे विशेष असे काही वाटले नाही; पण तो आवाज सारखा यायला लागला आणि नीट ऐकल्यावर लक्षात आले की हा ठिणग्या पडण्याचा आवाज असावा. त्याच वेळी काही लोकांच्या ओरडण्याचाही आवाज ऐकला आणि मग नक्की काही तरी वेगळेच घडत असावे ह्याची जाणीव झाली. स्नानघराच्या खिडकीतील झरोक्यातून मी बाहेर झाकून पाहिले आणि...चक्क मला धूर दिसला आणि लक्षात आलं की काहीतरी गंभीर प्रकरण असावे.

मी अंग पुसून तत्काल बाहेर आलो आणि माझ्या सज्जाच्या खिडकीतून जे पाहिले ते खरंच चिंताजनक होते. आमच्या इमारतीपासून ४०-५० फुटावर असलेल्या ८ मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरूनच तो ठिणग्या पडण्याचा आवाज येत होता(अर्थात ठिणग्या दिसत नव्हत्या) आणि त्या घरातून येणार्‍या धुराचे प्रमाण वाढत होते. खाली जमा असणारी मंडळी नुसती एकमेकांना ती घटना,जागा दाखवून आपापसात काही तरी बोलत होती. इमारतीचे सुरक्षारक्षकही इकडून तिकडे धावताना दिसत होते पण त्यापैकी कुणीही त्या घरात जाऊन नेमकं काय झालंय/होतंय हे पाहण्याची हिंमत करत नव्हते.

इकडे धूर वाढतच होता...अजून आग लागलेली दिसत नव्हती. काही लोकांच्या कानाला चिकटलेले भ्रमणध्वनी बहुधा अग्निशमन दलाला आमंत्रण देण्याचे काम करत असावेत. आणि पाहता पाहता अचानक आगीचे लोळ उठले...आता त्या सदनिकेच्या सज्ज्यातील काही गोष्टींनीही पेट घेतला. माझ्या घरातून जे दृश्य दिसत होते ते खूपच भयानक होते. त्यातच त्या सज्ज्यात एक गॅसची टाकी होती(रिकामी की भरलेली..कुणास ठाऊक). ती टाकी पाहूनच माझी मुलगी भिती व्यक्त करत होती...बाबा , ही टाकी फुटली तर..आग अजून भडकेल आणि मग काही खरं नाही...तुम्ही करा ना अग्निशमनदलाला फोन.
मी म्हटलं...अगं इतकी लोकं हातात फोन घेऊन आहेत...नक्कीच त्यांनी कळवलं असेलच त्यांना..येतच असतील ते लोक. तरीही मलाही तिची काळजी योग्य वाटत होती म्हणून मी १०१ क्रमांकावर संपर्क साधला. लगेच तिकडनं विचारणा झाली...
साहेब, मी एन एल हायस्कुलजवळून बोलतोय. माझ्या मागच्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर आग लागलेय.

हो,हो! आम्हाला खबर मिळालेय...थोड्या वेळापूर्वीच ६ गाड्या रवाना झाल्या आहेत...येतीलच इतक्यात.

साहेब, अहो आग खूप जोरात पसरतेय आणि जिथे आग लागलेय तिथेच एक गॅसची टाकी आहे....

किती माळ्याची इमारत आहे?

८ माळ्याची आहे इमारत...आणि आग २र्‍या मजल्यावर आहे.

त्यांनी फोन बंद केला आणि तेवढ्यात गाड्यांचे भोंगे ऐकू यायला लागले...जरा जीवात जीव आला. :)

अग्निशमन दल येऊन तर पोचलं...आग किती झपाट्याने पसरतेय हे तेही पाहत होते...पण का कुणास ठाऊक त्यांच्या हालचाली अतिशय मंद होत्या...निदान मला तरी तसे दिसत होते. थोड्या वेळाने मग त्यांनी त्यांचे जलफवारणी अस्त्र आणलं. दोनदोन जणांच्या दोन जोड्यांनी आपल्या जागा पकडल्या आणि फवारणीला सुरुवात करणार.....तोच खूप जबरदस्त असा स्फोट झाला...अशद(अग्निशमनदल) जवानांसकट सगळे आडोशाला धावले. स्फोट इतका जबरदस्त होता की त्या सज्ज्याच्या काचा,लोखंडी जाळी वगैरे कुठच्या कुठे फेकले गेले. माझ्या खिडकीवरही काही तुरळक तुकडे येऊन आदळले.

ह्या स्फोटातून सावरल्यानंतर मग हळूहळू अशद जवान बाहेर आले आणि मग त्यांनी आग विझवण्यासाठी खालूनच पाण्याची फवारणी सुरू केली. आधी आग फक्त दुसर्‍या मजल्यावरच होती पण स्फोट झाल्यामुळे ती पाचव्या मजल्यापर्यंत पोचली. तिसरा,चौथा आणि पाचव्या मजल्यावरही हळूहळू आग पसरत चाललेली पाहून पुढे काय होणार आहे ह्याची काळजी मी करत होतो...पण तरीही मला अशद जवानांच्या केवळ खाली उभे राहून पाणी मारण्याच्या मागचे प्रयोजन कळले नाही.
खाली उभे राहून फक्त इमारतीच्या बाहेर लवलवणार्‍या आगीच्या ज्वालाच फक्त दिसत होत्या पण इथे तर दुसर्‍या मजल्याच्या सदनिकेच्या आत आग पेटलेली दिसत होती...आणि त्याच वेळी वरच्या काही मजल्यांवरची आगही वाढत होती. अशा वेळी वापरावयाच्या कोणत्याच शिड्या ह्या जवानांजवळ दिसत नव्हत्या...हे खरंच आश्चर्य होते.

असो.त्यांचे काम ते जाणोत. जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ती आग आटोक्यात आली...सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण अर्थात त्या स्फोटाच्यावेळी कुणी जखमी झाले असण्याची दाट शक्यता आहे.वित्तहानी मात्र जबरदस्त झालेय हे नक्की.

आता ह्यानंतर मनात निर्माण झालेले काही विचार...
१)अशा आपत्काली कुणी तरी खमकी व्यक्ती आसपास असावी लागते...जी अशावेळी लोकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकते.
२)इमारतीच्या सुरक्षारक्षकाबरोबरच इमारतीत राहणार्‍यांपैकी काही जणांना अशा आपत्काली पोलिस/अग्निशमनदल वगैरेंची मदत येईपर्यंत किमान काय काळजी घ्यावी/झटपट कारवाई करावी ह्याबद्दलची माहिती असायलाच हवी....कारण आधी नुसत्या ठिणग्या आणि मग धूर येत असताना किमान त्या घरात येणार्‍या विजेचा मूळ स्रोत बंद करायला हवा होता(इलेक्ट्रिकचे मेन स्वीच)...पण हे त्यांनी का नाही केले?

ही इमारत आठ मजल्यांची आहे...म्हणजे मुंबई नगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही सहा मजल्यावरील इमारतीत अग्निशमन करण्यासाठीची यंत्रणा बसवावी लागते..जी कदाचित इथे बसवलेली नसेल...अथवा असूनही त्याचा योग्य तो वापर कसा करावा ह्याबद्दलची जाणकारी सुरक्षारक्षकांसकट कुणालाही नसावी..एरवी आधी क्षुल्लक असलेले ठिणग्या पडणे...आगीच्या लोळापर्यंत पोचलेच नसते.

ता.क.: घटना घडून गेली...आगही विझून आता जवळपास दोन तास झालेत तरीही अजून अग्निशमनदल तिथे पंचनामा,चौकशी इत्यादीत गुंतलेलं आहे...आता होईल पुढची कारवाई...त्यानंतर पुन्हा जैसे थे!
जाता जाता: आमची इमारतही ७ मजल्याची आहे आणि आश्चर्य म्हणजे इथेही अशी काही अग्निशमनाची सोय नाहीये...आता एक आपत्कालीन सभा बोलावून आम्हालाही काही तरी नक्कीच निर्णय घ्यावे लागतील..पाहूया लोक किती गांभीर्याने घेतात ते.


ह्या आगीची आणि त्यानंतरची काही क्षणचित्रे पाहा.८ टिप्पण्या:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

तुम्ही लेखाच्या शेवटच्या भागात जे प्रश्न उपस्थित केलेत ते खूपच महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे या दृष्टीकोनातून इमारती बांधणारे, महानगरपालीकेचे बांधकाम स्विकृत करणारे तसेच त्या इमारतीत रहणारे लोक यांपैकी कुणीच विचार करत नाहीत. आता नशीब ही इमारत तुमच्या इमारतीपासून ४०-५० फुटांवर होती. इतर अनेक ठीकाणी इमारती एकमेकांना चिकटून असतात. दोन इमारती किंवा घरं यांच्या मध्ये जी सेफ्टीसाठी मोकळी जागा हवी तीच नसते. ह्या अशा इमारतींची गणना मी अधिकृत इमारतपट्टी (अधिकृत झोपडपट्टीच्या धर्तीवर) करते. झोपडपट्टीतसुद्धा झोपड्या इतक्या एकमेकांना चिकटून असतात की आग लागली तर ती विझवायला जाण्यासाठी आग्नीशामक दलाच्या गाड्यांना आत शिरायला जागा नसते. वाढती लोकसंख्या आणि बेपर्वा बांधकामे हेच याचे मुख्य करण आहे.

THEPROPHET म्हणाले...

काका,
कुठली हो ही इमारत?
पण डेंजर प्रकार होता...खूपच जवळ होती तुमच्या घराच्या!
आणि हो, आमची इमारत सहा मजली आहे! :)

प्रमोद देव म्हणाले...

महानगरपालिकेचे नियम कसे तोडायचे ते बहुतेक बांधकाम क्षेत्रातले लोक जाणून असतात...आधी ते पाच किंवा सहा मजल्यांचीच परवानगी घेतात...तेवढे बांधून झाले की हळूहळू एकेक वर वाढवण्याची परवानगी मागतात..अशा वेळी सगळे नियम नजरेआड करता येतात...पण तिथे राहणार्‍या लोकांच्या दृष्टीने मात्र हे खूपच भयानक आहे.
पण इथे एक म्हण आहे ना..आंधळं दळतंय अन्‌ कुत्रं पीठ खातंय..तसा प्रकार आहे.

प्रमोद देव म्हणाले...

विद्याधरा, अरे आमच्या अगदी मागेच आहे..चित्रकूट नावाची इमारत...तू इथून गेल्यावरच बहुदा झाली असेल...गणपती मंदिराच्या गल्लीतून आहे तिला प्रवेश.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

बहुतेक करून नुसत्या ठिणग्या उडायला लागल्या तरी लोक इतके घाबरतात की पुढे अघटीत घडू नये म्हणून खबरदारी घेणं त्यांना सुचतच नाही. बांधकामाचे नियम तर हल्ली सहज तोडले जातात. आमच्य बिल्डींगला सुद्धा सहाव्या माळाच्या वरच्या लोकांसाठी फायर एक्झिट आहे पण सहाव्या माळ्यावर रहाणार्‍या लोकांना ती आपल्या **चीच जागा वाटते. तिथे त्यांनी त्यांचं उपयोगात नसलेलं सामान रचून ठेवलं आहे. काही बोललं की म्हणतात, "जागेचा उपयोग व्हायला हवा ना!" इमर्जन्सी यांना सांगू येणार आहे का?
सुशिक्षित लोकच असे वागू लागले, तर का नाही असे अपघात होणार बरं! तुमचा विभागही चांगला गजबजलेल्या वस्तीत आहे. तिकडे किती हाहाकार उडाला असेल, याची फोटोंवरूनच कल्पना येते.

प्रमोद देव म्हणाले...

खरंय कांचन! प्रसंगावधान हे अभावानेच एखाद्यात असतं...त्यामुळे अशा प्रसंगी सामान्य माणसं अगदी घाबरून जातात आणि काहीच करत नाहीत..किंवा नेमकं नको तेच करतात.
बाकी रिकामी असलेली कोणतीही जागा बहुसंख्य लोक ..ही आपल्या बापाचीच आहे..अश्या तर्‍हेने वापरत असतात हे बाकी खरंय.

खरं तर त्या आग लागलेल्या इमारतीला लागूनच(त्याचाच एक भाग म्हण) एक हृद्‌रोग्यांसाठीचे इस्पितळ आहे...तिथे तर प्राणवायुचे सिलिंडर असतात...विचार कर आग तिथे पोचली असती तर?
विचार सहनच होत नाही. :(

Yogesh म्हणाले...

काका....

आपल्याकडे सुरक्षे संबंबधीच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवली जाते..अर्थात यामध्ये बांधमकाम व्यावसायिक व सरकारी बाबु हे संगनमताने सामील असतात.

फ़ार कमी बांधकाम व्यावसायिक हे बांधकामाचा दर्जा अन सुरक्षा याचा विचार करतात.स्लॅब,बीम,कॉलम कास्ट करताना तर जे डिजाइन स्टॅंडर्ड आहे ते बिलकुल पण लक्षात घेतल नाही ...ते फ़क्त त्यांचा फ़ायद्याचा विचार करतात...जर चुकुन कधी काही नैसर्गिक आपत्ती आली तर या सर्व बांधकामांचा दर्जा समजुन येईल...पण अर्थात हे आपल्याला खुप महागात पडेल.

अनामित म्हणाले...

भयंकर आहे काका हा प्रकार एकूणातच....