माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ डिसेंबर, २०१२

रावणकृत शिवतांडव स्तोत्र-गायक रामदास कामत!

महान शिवभक्त दशानन उर्फ लंकापती रावण..ह्यांनी हे स्तोत्र रचलेले आहे. पंडीत रामदास कामतांच्या खड्या आवाजात, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मी हे असंख्य वेळा ऐकलेलं आहे. पण मंडळी जालावर हे स्तोत्र कुठेच ऐकता येत नाही असे कळले...तेव्हा त्याचा शोध घेतांना हे मला कुलटोडवर सापडले....आता इतरांना ते सहज ऐकता यावे म्हणून मी ते डिवशेयरवर चढवून इथे देत आहे.
जटा कटाहसंभ्रमभ्रम न्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम

धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधुर-
स्फुरद्दिगंत संतति प्रमोद मानमानसे
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि

जटा भुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे
मदांध सिंधुरस्फुरत्व गुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि


सहस्रलोचनप्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसूनधूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोरबंधुशेखरः

ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्
सुधामयुखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तु नः

२३ नोव्हेंबर, २०१२

विनायक कारभाटकर....बेकरी व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक!

मध्यंतरी रिलायन्स एनर्जीकडून टाटा पॉवरकडे माझी वीज जोडणी हस्तांतरित करण्यासाठी मी अभय सरमळकर नावाच्या  एका मध्यस्थाची मदत घेतली होती...त्याच्याशी बोलतांना कळले की तो ज्या कंपनीसाठी पूर्णवेळ काम करतोय त्या ’व्हिनस कन्फेक्शनर्स’चे मालक एक हिंदू आणि त्यातूनही मराठी(गोवेकर) आहेत. खरंतर बेकरी धंद्यात ख्रिश्चन,पारशी आणि मुसलमान  ह्या लोकांचाच वरचष्मा आहे...अशा ह्या धंद्यात अपवाद म्हणून का होईना एक हिंदू पाय रोवून उभा आहे.  हे ऐकून माझे कुतूहल जागृत झाले आणि मग मी ठरवले की ह्या व्यक्तीबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष मुलाखतच घ्यावी...

मुलाखत घ्यायचे असे ठरवून मी जरी ’व्हिनस’मध्ये पाऊल टाकले तरी प्रत्यक्षात मुलाखत सुरु होण्याआधी, जणू काही माझीच मुलाखत आहे अशा थाटात समोरच्या सद्गृहस्थांनी...विनायक कारभाटकरांनी....हेच ते व्हिनसचे मालक.... मलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली.  थोडा वेळ माझीच मुलाखत सुरु होती...त्यानंतर गाडी सरकत सरकत राजकारणाकडे आणि हळुहळू समाजकारण आणि एकूणच माणसांची बदललेली प्रवृत्ती इत्यादि विषयांची स्थानके घेत घेत भलत्याच दिशेला जाऊ लागली....नमनालाच घडाभर नव्हे तर पिंपभर तेल गेल्यावर मी हळूच मुद्याला हात घातला......अर्थात हा वेळ फुकट गेला असे मी म्हणणार नाही कारण इतक्या वेळात आमने सामने बसणार्‍या दोन व्यक्तींची एकमेकांशी व्यवस्थित ओळख झाली होती आणि औपचारिकतेचे वातावरण दूर होऊन पुढचा संवाद अतिशय मोकळेपणाने होऊ शकला......

मी : कारभाटकरसाहेब, ह्या धंद्याविषयी बोलण्याआधी थोडेसे आपल्या कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभुमीबद्दल सांगाल काय?

कारभाटकरसाहेब:  माझा जन्म १ मार्च १९३९ रोजी गोव्यात झाला आणि संपूर्ण बालपणही तिथेच गेले. माझं पूर्ण नाव विनायक नवसो कारभाटकर असे आहे.घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आणि शिक्षणाचे म्हणाल तर जेमतेम चार इयत्ताच मी शिकू शकलो...पुढे साधारण १३-१४ वर्षांचा होईपर्यंत काहीच केले नाही.....
तुझ्या वयाची इतर मुले बघ, काही तरी कमावतात....असे रोज वडिलांकडून ऐकून मी कंटाळलो होतो...त्याच तिरमिरीत एक दिवस एका मित्राच्या बरोबर मॅंगेनीज खाणीत दगड फोडायला गेलो. जेमतेम दोन दिवस काम केले आणि हे वडिलांना कळले....त्यांच्या मनाला ती गोष्ट लागली म्हणून त्यांनी ताबडतोब मला त्यांच्या ओळखीच्या एका सद्गृस्थांमार्फत चौगुले कंपनीत नोकरीला लावले. ती शिपायाची नोकरी होती.  ह्या असल्या नोकरीत खरे तर माझे मन रमत नव्हते. तरीही साधारण २ वर्ष तिथे काम करून मग मी ती नोकरी सोडली....पण ह्या नोकरीचा फायदा असा झाला की पत्रव्यवहार कसा करतात, लोकांशी कसे बोलतात ह्या गोष्टी मला शिकता आल्या....
माझ्या आजीला माझे खूप कौतुक होते.. वडिलांच्या मागे लागून तिने मला मुंबईला, माझ्या बहिणीकडे पाठवले. माझ्या भावोजींची (बहिणीचे यजमान) एक लॉंड्री होती. त्यात त्यांनी मला काम दिले. हे काम मी साधारणपणे दीड वर्ष केले..इथे मी कपड्यांना इस्त्री करायचे काम करायला लागलो. एकदा इस्त्री करतांना एकाची पॅंट माझ्या हातून जळाली.  ते माझ्या मनाला लागले आणि मी ते काम सोडून दिले.....त्यानंतर भावोजींच्या ओळखीने मी एका मोटर मेकॅनिकच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली....तिथे चार वर्ष काम केले...ह्या दरम्यान मी रात्रशाळेत जाऊ लागलो आणि मॅट्रिकपर्यंत शिकलो. पुढे मग तो मोटर मेकॅनिक आपला धंदा बंद करून गावाला निघून गेला आणि माझी नोकरी सुटली. मग मी तेच काम स्वतंत्रपणे करायला लागलो......पण काही कारणांमुळे ह्या कामात माझे बस्तान नीटसे बसले नाही.

मी: नेमके काय झाले होते?

कासा: मोटरगाडीत एक गेयरबॉक्स असतो...तो नव्याने बसवल्यावर त्याचे सेटिंग करावे लागते. अशा वेळी तो पुन्हा सुरळीत चालायला थोडा वेळ लागतो...मधल्या काळात तो आवाज वगैरे करतो....दूर्दैवाने, काम चांगले करून सुद्धा काही डिफेक्ट्स गिर्‍हाईकांना समजावण्यात मी बराचसा कमी पडलो आणि त्यामुळे मला त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली...मग ठरवले की हे काम आपले नाही...आणि  ते काम बंद करून मी काहीतरी नवीन  काम शोधायला लागलो....
रात्र शाळेतला माझा एक मित्र  बेकरीमधे काम करत होता. त्याला आपला स्वतंत्र धंदा करायचा होता. त्याने मला विचारले की तू मला बेकरीमधे मदत करशील का? मी त्यास संमती दिली आणि पुढे आम्ही कसे करायचे ते ठरवून धंदा सुरु केला. ..आधी तुझे बस्तान नीट बसू दे आणि मग माझे बस्तान बसवायचे पाहू असे मी त्याला म्हटले....त्यामुळे पगार घ्यायचा नाही, फक्त हातखर्चाला पैसे घ्यायचे असे मी ठरवले. ..फक्त दोन माणसांची कंपनी...केक बनवण्याचे काम त्याचे आणि तो बाजारात नेऊन विकायचे काम माझे...अशी कामाची वाटणी झाली....रोज मी वांद्रे(बांद्रा) ते कुलाबापर्यंत सायकलवरून दुकानदारांकडे जाऊन माल पोचवायला लागलो....दुकानदारांकडून मालाच्या सुधारणेबाबत किंवा नवीन प्रकारांबाबत काही सूचना यायला लागल्या...त्या मी माझ्या मित्राला कळवत होतो....पण माझ्या मित्राच्या कौशल्याला मर्यादा होत्या त्यामुळे तो जे काही करू शकत होता तेवढेच बनवायचा...पुढे प्रगती होण्याची  काहीच शक्यता नव्हती....
मध्यंतरी काही कामानिमित्त हा मित्र चार दिवस गावाला गेला....
माझा मित्र केक कसा बनवायचा हे मी पाहिले होते म्हणून  मी विचार केला की आपणही केक करून पाहावे आणि त्याप्रमाणे केले आणि गंमत म्हणजे मला चक्क ते काम जमले की हो!

मी: आणि इथून तुमच्या ’व्हिनस’ची सुरुवात झाली तर!

कासा: नाही...सुट्टीवरून मित्र परत आला..पुन्हा  आम्ही आपापली जबाबदारी  सांभाळली... मला एका दुकानदाराने सल्ला दिला....विनायक, हातखर्चाच्या पैशातून रोज काहीतरी शिल्लक टाकत जा...सगळे पैसे वापरू नकोस...त्याच्या सल्ल्यानुसार मी रोज माझ्या हातखर्चातून एक रूपया बाजूला काढून ठेवायला लागलो....साठत साठत त्याचे दीडशे रूपये झाले....ह्या दीडशे रूपयातून मी काही साड्या विकत घेतल्या आणि गावी, घरी घेऊन गेलो ..त्यावेळी साड्या ८-१० रूपयांना मिळत....माझ्या आजीला त्याचे खूप कौतुक वाटले. माझ्या मित्राची आईही तेव्हा तिथे आली होती. तिला माझ्या आजीने कौतुकाने त्या साड्या दाखवल्या आणि इथूनच पुढचे वितुष्ट घडले.  माझ्या मित्राच्या आईने भलतीच शंका घेतली...तिला वाटले की मी आमच्या दोघांच्या धंद्यातले पैसे परस्पर लाटले आणि त्यातून ह्या साड्या आणल्या...तिने ते तिच्या मुलाला म्हणजेच माझ्या मित्राला तसे बोलून दाखवले..त्यामुळे त्याच्याही मनात माझ्याबद्दल संशय निर्माण झाला आणि तो माझ्यावर पाळत ठेवू लागला...मला हे कळताच मी खूप दु:खी झालो. त्याच्याकडे जाऊन मी त्याला म्हटले... वरून देव पाहतोच आहे .  जर मी तुला फसवलं असेल तर देव माझे कधीच भले करणार नाही आणि तू जर उगीच माझ्यावर आरोप करशील तर तुझे पण देव कधीच कल्याण करणार नाही....आणि असे म्हणून मी त्याच्याशी संबंध तोडले.

मी: मग पुढे काय झाले?

कासा:  त्यानंतर पुढे ६ महिने बेकारीत काढले. एकदा छेडा नावाच्या एका दुकानदाराने मला म्हटले...विनायक, तू स्वत:च केक बनवायचे  काम का नाही सुरु करत? मला ती कल्पना आवडली आणि मी तशी तयारी दर्शवली. छेडाने मला ४५०रुपये दिले...त्यातून  मी सायकल घेतली. माझ्या बहिणीनेही काही पैसे दिले. त्यातून मी साचे(मोल्ड्स) विकत घेतले...माझ्या एका मित्राच्या ओळखीने मला पावाच्या बेकरीत  भाडेतत्वावर जागा मिळाली आणि हाताशी एक मदतनीस घेऊन मी केक बनवायला सुरुवात केली.... इथून खर्‍या अर्थाने ’व्हिनस’चा जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही...सुरुवातीला अडचणी आल्या..कधी केक कच्चा राहायचा, कधी करपायचा...पण मग हळुहळू त्यावर मात करत प्राविण्य मिळवले....फावल्या वेळात सतत मनन चिंतन चालत असायचे...त्यातूनच नवनवे प्रकार सुचायला लागले आणि बघता बघता त्यातही प्राविण्य मिळवले...धंद्यात जम बसला आणि...
१९७१ सालचं  बांगलादेश मुक्तीचं  भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले....युद्धामुळे  धंद्यावर विपरीत परिणाम झाला...मालाची मागणी एकदम कमी झाली..त्यामुळे कच्चा माल पुरवठादारांची देणी थकली...मी अतिशय चिंताग्रस्त झालो...पण इथेही चांगलाच अनुभव आला....पुरवठादारांनी मला धीर दिला...ते म्हणाले, विनायक, तू आमच्या पैशाची चिंता करू नकोस...तुझ्या धंद्यावर लक्ष दे...आज ना उद्या आमचे पैसे आम्हाला मिळतील ह्याची आम्हाला खात्री आहे.
युद्ध समाप्त झाले..हळूहळू वातावरण निवळले आणि पुन्हा धंद्याने वेग घेतला. सगळी देणी फेडली आणि  पुन्हा एक अडथळा निर्माण झाला....सततच्या उभे राहण्यामुळे, सायकल चालवण्यामुळे पायांवर ताण पडत होता. त्यामुळे माझ्या पायांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरु  झाला आणि हळूहळू तो त्रास इतका वाढला की त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली... हा त्रासाचा कालावधी जवळपास अडीच वर्षांचा होता....ह्यातूनही सावरलो...पण आता सायकलने माल पोचवणे कठीण होऊ लागले म्हणून मग एक तीनचाकी मालवाहतूक गाडी(टेंपो) विकत घेतली.
माल तयार करणे आणि पोचवण्याच्या सततच्या धावपळीमुळे नाही म्हटले तरी थकायला व्हायचे...अशा वेळी मनात एकच विचार यायचा...आपले एखादे दुकान असते तर!

असाच एकदा संध्याकाळी दमून भागून एका दुकानाच्या फळीवर बसलो होतो.. आपले एखादे दुकान असावे हाच विचार मनात घोळत होता आणि काय विलक्षण योगायोग पाहा...ज्या ठिकाणी मी बसलो होतो त्या दुकानाचा मालक मला म्हणाला....तुला दुकान हवेय का?
मी तर हवेतच उडालो. ह्याला कसे काय कळले माझ्या मनातले?
मी लगेच हो म्हटले...त्याने दुकानाची किंमत सांगितली ६५हजार रूपये....माझ्याकडे फक्त दहा हजार होते पण मी त्याच्याकडून आठ दिवसांची मुदत मागून घेतली . आजवर माझ्या गोड बोलण्याने आणि चांगल्या वागणुकीने मी बरेच लोक जोडले होते. त्यांच्याकडे मी मदत मागितली आणि सांगायला आनंद वाटतो की त्यांनीही मला मनापासून मदत केली.... मी ६५हजार रुपये जमवून साक्षीदार म्हणून माझ्या एका सज्जन मित्राला घेऊन दुकानाच्या मालकाकडे गेलो....
मध्यंतरीच्या काळात त्या दुकानासाठी एक अजून गिर्‍हाईक आले होते असे कळले, ज्याने ७० हजार द्यायची तयारी दाखवली होती....आता त्या दुकानदाराची नियत बदलली होती...त्यामुळे मी व्यथित झालो पण आपल्या मनाला कसेबसे समजावले...नशीबात असेल तर मिळेल दुकान.
आम्ही दोघे त्या दुकानदाराकडे पोचलो...तो दुकानदार टाळाटाळ करू लागला..
तुमच्या दोघांच्यात ठरल्याप्रमाणे  विनायकाने ठरलेल्या मुदतीत ६५ हजार जमवून आणलेत..तुला देण्यासाठी. आता तू उगीच अधिक पैशाच्या मोहापायी आपला शब्द फिरवू नकोस...माझ्या मित्राने त्याला सुनावले...
आणि काय सांगू! खरेच, त्या दुकानदाराला उपरती झाली...ठरल्याप्रमाणे ६५ हजार रूपये घेऊन त्याने ते दुकान मलाच दिले....

इथून धंद्याला खर्‍या अर्थाने वेग आला... उत्पादन आणि आता काही प्रमाणात स्वत:च्या दुकानात विक्री असे दोन्ही स्वत: करू शकत असल्यामुळे फायद्याचे प्रमाणही वाढले....पण आता उत्पादनासाठीची जागा कमी पडायला लागली...नवी जागा घेण्याचा विचार सुरु झाला...आणि लवकरच तशी संधी आली....एक प्रशस्त, भाड्याची जागा मिळाली...त्या नव्या प्रशस्त जागेत मग बेकरी हलवली....त्यामुळे आता उत्पादनेही वाढली...म्हणून मग नवे लोक भर्ती केले, नवीन यंत्रे विकत घेतली, नवी मालवाहतूक वाहने खरेदी केली....अशा तर्‍हेने धंदा चारही अंगाने वाढत गेला.

पुढे हीच भाड्याची जागा मूळ मालकाकडून खरेदी करून आता ती आपल्याच मालकीची झालेय...
मुंबईत वरळीपासून ते दहीसरपर्यंत आणि नवी मुंबईत (काही ठिकाणी) मिळून १०० पेक्षा जास्त दुकामदारांना आज ’व्हीनस’चा माल पुरवला जातो.
आजच्या घडीला शंभरच्याही पेक्षा जास्त प्रकार आपण बनवत असतो. प्लम केक, मावा केक, बार केक आणि पॅटिस ही आपली खास वैषिष्ठ्ये आहेत

मी: आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?

कासा:  संपूर्ण मुंबईभर आपले उत्पादन पोचवण्याचे प्रयत्न सद्द्या सुरू आहेत...त्यानंतर पुढे माल परदेशात पाठवण्यासाठीही चाचपणी केली जाईल.
तसंच  आपण व्हिनसची   स्वतंत्र वेबसाईटही सुरु केलेली आहे.
www.venusconfectioners.com


मी: निव्वळ धंदा एके धंदा न करता आपण सेवाभावी कार्यातही रस घेता असं ऐकून आहे..त्याबद्दल काही सांगा ना.

कासा: गोव्यातील मये ह्या गांवी आपण तीन शाळा दत्तक घेतलेत...इमारत दुरुस्ती,शाळेला लागणारे टेबल.खुर्च्या,बाकं इत्यादि सामान अशा स्वरूपात आपण त्यांना मदत करत असतो.( कारभाटकर साहेब स्वत:कडे श्रेय न घेता, मी,आम्ही केले असे शब्द प्रयोग न करता सहजपणाने आपण केले...असे म्हणतात) ज्यात इयत्ता पाचवी ते १२वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील जी मुले उत्तीर्ण होतात त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते..ह्यात आपण तीन विभाग केलेत...केवळ जास्त गुण मिळवणार्‍यांनाच नाही तर कमी गुण मिळवून उत्तीर्ण होणार्‍यांचा देखील ह्यात आपण समावेश करतो. जेणेकरून त्यांची शिक्षणाची जिद्द टिकावी आणि वाढावी अशी त्यामागची भूमिका आहे.. शिष्यवृत्ती मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही आपण सत्कार करून त्यांना काहीतरी गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देत असतो. माझी आई श्रीमती अनुसया नवसो कारभाटकर हिच्या नावाने आपण एक ट्रस्ट स्थापन केलाय आणि त्या ट्रस्टद्वारे हे कार्य केले जाते. ट्रस्टला  चार वर्ष पूर्ण झाली. वर्षाला साधारण ३ लाख रुपयांपेक्षाही जास्त मदत दिली जाते.

सद्गुरू श्री. वामनराव पै ह्यांच्या शिकवणुकीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. त्यांचे सद्विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत ह्यासाठी आपण, त्यांची व्याख्याने, साहित्य इत्यादिंचा जाहिरातीद्वारे प्रचार करण्यासाठी लागणारी आर्थिक जबाबदारी काही अंशी स्वीकारली आहे.

मी: ज्यांना बेकरी व्यवसायात यायचंय अशा आजच्या तरूणांना आपण काय मार्गदर्शन कराल?

कासा: सगळ्यात आधी कष्ट करण्याची,पडेल ते काम करण्याची  तयारी हवी. त्या बरोबर शिक्षण तर हवंच हवं पण शिकतांना नुसती घोकंपट्टी नको तर ज्ञान ग्रहण करायला शिकलं पाहिजे...ज्याला ज्ञान प्राप्त झालं तो कधीच मागे पडत नाही...ज्ञानाने शहाणपण,प्रकृती आणि संपत्ती इत्यादि सर्व आपोआप मिळत राहते, हा माझा जीवनातला अनुभव आहे. आपण ज्या धंद्यात जाऊ त्यातलं ज्ञान सतत अद्ययावत करत राहिलं पाहिजे,  आपण जगाच्या मागे पडू नये म्हणून ती काळजी जरूर घ्यायला हवी.  सचोटी, प्रामाणिकपणा आणि वेळप्रसंगी सहकार्‍यांना, आपल्या हाताखालच्यांना सांभाळून घेणे हे गुणही अंगी बाणवायला हवेत....कामगार लोक आहेत म्हणून आपण आहोत हे कधीही विसरता कामा नये...

कारभाटकर साहेबांना भेटायला जाण्याआधी आम्ही एकमेकांशी अगदीच अपरिचित होतो...पण तिथून बाहेर निघतांना..जणू काही दोन जीवाभावाचे मित्र बर्‍याच काळाने एकत्र आले होते...असं वाटण्याइतपत मोकळ्या गप्पा झाल्या होत्या.
आज वयाच्या ७३ व्या वर्षीही कारभाटकर साहेब एखाद्या तरूणाला लाजवेल अशा तर्‍हेने कार्यरत आहेत.
सकाळी वांद्रे(पश्चिम) येथील दुकानात आणि दुपारनंतर जोगेश्वरी(पश्चिम) येथील त्यांच्या बेकरीत असे दिवसभर ते कामात व्यस्त असतात.....
आपण त्यांना दीर्घायुरोग्य चिंतूया आणि त्यांच्या भावी योजना सफल होवोत अशी सदिच्छा व्यक्त करूया.

***************************************समाप्त**********************************११ ऑक्टोबर, २०१२

क्षयाच्या निमित्ताने....

मंडळी मागच्या लेखात जे म्हटलं होतं....त्याची पुढची कहाणी ऐका...आपलं वाचा.

८ ऑगस्ट २०१२ला माझी सिटी स्कॅनच्या मदतीने बायोप्सी झाली. त्यातून गाठीतून काढलेले दोन नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले....त्यातल्या एकाचा अहवाल आठवडाभरात आला....मला त्यातली तांत्रिक भाषा कळत नाही पण त्याचा सारांश असा होता...त्यात टीबी(क्षय) किंवा सार्कॉईडोसिस (मी हा रोग पहिल्यांदाच ऐकला) ह्यांची शक्यता व्यक्त केली होती.
सार्कॉईडोसिसवर शक्यतो औषधोपचार करत नाहीत ...तो आपोआप बरा होतो असे कळले....मी जास्त खोलात नाही गेलो...ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी कृपया गुगलून पाहावे.  :)
त्यामुळे टीबी(क्षय) असावा असे समजून त्यावर १३ ऑगस्ट २०१२ पासून उपचार सुरु झाले.....

बायोप्सी करून काढलेला दुसरा नमुना कल्चर करण्यासाठी पाठवला होता...त्याचा अहवाल सहा आठवड्यांनी म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात आला....त्यातही क्षयासाठी भक्कम पुरावा सापडला नाही.
हा अहवाल येण्याआधी काही दिवस टीबी गोल्ड नावाची एक रक्त तपासणी केली गेली...त्याचा निष्कर्ष नकारार्थी आला.

अशा तर्‍हेने बहुतेक तपासण्यात काहीच ठोस पुरावा सापडला नाही.
१३ ऑक्टोबरला औषधोपचारांना दोन महिने होतील....काल पुन्हा एकदा छातीचा एक्स-रे काढला...आज तो  एक्स-रे आणि जुना...अगदी सुरुवातीला काढलेला एक्सरे ह्यांची तुलना डॉक्टरांनी करून काही आशादायक बदल झाल्याचे म्हटले आणि एकूण चारपैकी दोन औषधं बंद करण्याचे ठरवलंय...राहिलेली दोन औषधं अजून किमान तीन चार महिने घ्यावी लागतील असेही ते म्हणाले.

इतकं सगळं आजवर झालंय....माझा पहिल्यापासूनचा एकच प्रश्न..जो मी डॉक्टरांना विचारतोय.....मला टीबी झालाय हे  पूर्णपणे सिद्ध झालेलं नाहीये..बहुतेक तपासण्या नकारार्थी निष्कर्ष दाखवताहेत...तरी मला ही औषधं का घ्यावी लागताहेत....

डॉक्टर शांतपणे म्हणतात...बायोप्सीच्या सुरुवातीच्या निष्कर्षात  तशी शक्यता वर्तवलेली होती. त्यामुळे पुढचे निष्कर्ष काही येवोत...केवळ शंका आली तरी टीबीच्या बाबतीत वेळीच जर उपचार नाही केले तर पुढे त्याचा त्रास होतो....वगैरे वगैरे.

मंडळी, एक मात्र झालंय...ज्या सततच्या खोकल्यामुळे मी हे सर्व सोपस्कार...उदा. तपासण्या,औषधं वगैरे करून घेतोय...तो खोकला सुरुवातीच्या आठ-दहा दिवसातच कमी झाला आणि हळूहळू गायब झाला....हा माझ्यासाठी खूप मोठा लाभ आहे.

५ ऑक्टोबर, २०१२

मद्रासमधला एक किस्सा!

१९७७ साली मी तीन महिन्यांसाठी मद्रासला गेलो होतो...त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत माझ्या जालनिशीवर ’मद्रास’ ह्या नावाखाली सापडेल. तर मद्रासला असतांनाचा ह एक किस्सा जरा हटके आहे..ऐका.

४ ऑगस्ट, २०१२

पूर्वसूचना?

मंडळी गेले कैक महिने अधूनमधून मला कोरड्या खोकल्याने सतावलंय हे आपल्याला माहीत आहेच...मध्यंतरी जवळपास सलग तीन महिने माझी बोलतीही बंद होती....बरेच लोक खूशही होते त्यामुळे.  ;)
कारण,कानांना त्रास नव्हता ना?  :)

त्यावेळी बर्‍याच तपासण्या आणि दीर्घकालीन औषधोपचारांनंतर मी बरा झालो..आणि तुमच्या कानांचा त्रासही सुरु झाला होता....हेही तुम्हाला माहीत आहेच. पण आता तोच खोकला पुन: सुरु झालाय....पुन्हा एकदा डॉक्टरांची पायरी चढलोय...आता ह्यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने तपासण्या सुरु आहेत....छाती तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे काही रक्ततपासण्या आणि त्यानंतर सीटी स्कॅन(कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी) करून घेतलंय....रक्ताच्या चाचण्यात काहीच दोष आढळलेला नाहीये....पण सीटी स्कॅनमध्ये श्वसनमार्गात एक गाठ असल्याचं आढळलंय....आता ती गाठ कसली आहे हे शोधण्यासाठी पुन्हा सीटी स्कॅनच्या जोडीने बायोप्सी करून घेण्याचा सल्ला मिळालाय...त्यानंतर मग प्रयोगशाळेत त्या काढलेल्या मांस/पाणी(जे असेल ते) वगैरेची तपासणी  होईल.
आता ही गाठ साधीच असू शकेल, कदाचित क्षय किंवा अस्थमाबद्दलची असू शकेल किंवा अगदी कर्करोगाचीही असू शकेल...त्यामुळे ती कसली आहे हे तपासणी अंतीच कळणार आहे.....

आजपर्यंत...अगदी ह्या क्षणापर्यंत मला एक कोरडा खोकला सोडला तर श्वसनाचा तसा कोणताच त्रास जाणवत नाहीये...त्यामुळे मला स्वत:ला काही फार गंभीर बाब असेल असं वाटत नाहीये...तरीही नेमकं काय आहे ते तपासणी नंतर कळेलच...तोवर वाट पाहूया....पण तसंच काही गंभीर असलं तरी काही हरकत नाही.....जे असेल ते सहजपणाने स्वीकारणं इतकंच मला माहीत आहे.

पुढचा आठवडा थोडा फार धावपळीचा जाणार आहेच ...कारण ह्या तपासण्या करण्यासाठी मला घरापासून बरंच दूर...मुंबईतच जावं लागणार आहे.... असो....माझ्या समस्त हितचिंतकांना माहीती असावी म्हणूनच हे सगळं लिहून ठेवतोय....उगाच अचानक ’धक्का’ नको!  ;)

वैधानिक इशारा: हे सर्व वाचून लगेच ...शुभेच्छा वगैरे देऊ नका....त्या देण्याआधी जरा पक्का विचार करा...कारण तुमच्या शुभेच्छा माझ्या उपयोगी पडल्या तर त्यात तुमचंच नुकसान आहे.  :)))
कसं? अहो, मी ह्यातून व्यवस्थित पार पडलो की लगेच माझं गाणं सुरु होणार आणि मग तुमचे कान आणि माझं गाणं ह्यांची गाठ(माझ्या श्वासमार्गातली नव्हे हो!) आहे हे लक्षात ठेवा......तेव्हा कोणती गाठ हवी त्याचा विचार करूनच सदिच्छांवर शिक्का मारा/मारू नका.  :पी

कुणीसं म्हटलंय तेच म्हणतो.....

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ!   :)))))))))))

२४ जून, २०१२

सैगलसाहेबांची गाणी...माझ्या आवाजात.

स्वर्गीय कुंदनलाल सैगलसाहेब म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो त्यांचा अनुनासिक आणि खर्जातला आवाज...भल्या भल्या गायकांना त्यांच्या आवाजाची आणि शैलीची नक्कल कराविशी वाटली तिथे माझे काय घेऊन बसलात...पण मी प्रयत्नपूर्वक त्यांच्या आवाजाची नक्कल करण्याचं टाळलंय तरी सहजप्रवृत्तीने त्यांच्या आवाजाची नक्कल कुठे तरी डोकावतेच....अर्थात माझाही आवाज आहेच त्याबरोबर :)
आधी मी सैगलसाहेबांची तीन गाणी सैगल-१ मध्ये एकत्रच गायलेली आहेत..तेव्हा मला भारतीय ताल मिळाला नव्हता म्हणून पाश्चात्य ताल वापरून एक प्रयोग करून पाहिलेला...
ती गाणी आहेत...
दिया जलाव+काहे को रार मचाई+ दो नैना मतवाले
आता दोन गाणी सैगल-२मध्ये  सादर करतोय ती ’रूपक ताल’मध्ये गायलेली आहेत.
बालम आये बसो मोरे मनमें + जीवनका सुख आज प्रभू मोरे
ऐकून प्रतिक्रिया जरूर द्या..जमलेत की फसलेत?
सैगल-३
एक बंगला बने न्यारासैगल-४
करूं क्या आश निराश भईसैगल-५
सो जा राजकुमारी!

२३ जून, २०१२

साक्षात्कार!

गेल्या दोनतीन दिवसात मला असा साक्षात्कार झालाय की मला इतकी वर्षं...अहो इतकी म्हणजे काय तर उणीपूरी साठ(६०) वर्ष वाकुल्या दाखवणारा संगीतातला ताल आता माझ्यावर प्रसन्न झालाय आणि आता माझ्या गाण्यात एक नेमकेपणा यायला लागलाय...

होय, हे विधान मी अतिशय गंभीरपणे करतोय...ताल माझ्याशी कसा फटकून वागतो आणि त्यामुळे माझ्या गाण्यात, माझ्या चालीत कसा अस्ताव्यस्तपणा असतो ह्याबद्दल मी स्वत:च इतके दिवस माझी टिंगल-टवाळी करत असे हे आपण सर्वजण जाणून आहातच..ती टिंगल-टवाळी जितकी प्रामाणिक होती तेवढेच मी वर केलेले ताजे विधानही अतिशय प्रामाणिकपणाने करत आहे....माझ्याकडे, माझ्यातल्या चालकाकडे, माझ्यातल्या  गायकाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मला आता प्राप्त झालेला आहे...आशा आहे की आपण सर्व गानरसिकही ह्या गोष्टीची योग्य ती नोंद घ्याल आणि माझे नव्या स्वरूपातले गाणे नक्की ऐकाल.

ह्यापुढे मी जे काही पेश करेन त्याला तालाची जोड असेल..मग तो ताल भारतीय अभिजात संगीतातील असेल अथवा पाश्चात्य संगीतातला असेल...पण तालाच्या बंधनातलं माझं गाणं आपल्याला ऐकायला मिळेल ह्याची खात्री देतो...सद्द्या काही निवडक  जुन्याच रचनांमधून हा बदल आपल्याला ऐकायला मिळेल...तेव्हा जरूर ऐका ह्या बदललेल्या रचना आणि हो...आपल्या चिकित्सक प्रतिक्रियाही जरूर द्या कारण माझ्यात जी काही सुधारणा होते आहे ती केवळ तुमच्यासारख्या चिकित्सक आणि रसिक श्रोत्यांमुळेच हे मी कधीच विसरू शकत नाही.

तालाशिवाय गाणं म्हणजे मुक्तछंद काव्यासारखं आहे असं मला वाटतं...त्यामुळे मला तालात गाता येत नव्हतं तेव्हा मी गंमतीने म्हणत असे की आमचे न्हाणी घराण्याचे सगळे तालच वेगळे आहेत...आम्हाला पट्टी म्हणजे फूटपट्टी आणि ताल म्हणजे बेताल इतकंच कळतं....तालज्ञ रसिकांसाठी मी उगाच अजून काही वात्रटपणा करत असे....
तुमचा तीन ताल तर आमचा तीन ताड!
तुमचा झपताल तर आमचा झापताल!
तुमचा आडा चौताल तर आमचा आडवा-तिडवा चौताल....
तुमच्या तालात १६ मात्रा तर आमच्यात साडेसतरा मात्रा......इत्यादि.

आता वरचं वाचून कधी कधी काही लोकांना वाटायचं की...अरेच्चा,ह्याला तालांची नावं,त्यातल्या मात्रा इत्यादि माहीत आहेत म्हणजे हा उगाच वेड घेऊन पेडगांवला तर जात नाही ना....पण मी खरंच सांगतो बर्‍याच गोष्टी ह्या आपल्याला वाचनामुळे आणि श्रवणामुळे  जुजबी स्वरूपात माहीत झालेल्या असतात...त्यातलं सखोल ज्ञान त्या विशिष्ट गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय कधीच प्राप्त होत नसतं...माझंही वाचन आणि श्रवण बर्‍यापैकी असल्यामुळे ह्या अशा काही जुजबी गोष्टी माहीत होत्या....आपल्या बोलण्यात योग्य ठिकाणी त्या पेरल्या की समोरच्याला उगाच वाटायला लागतं....की हा काही अगदीच ’हा’ नाहीये. ...बस हे इतकंच खरं आहे.

असो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की इतके दिवस माझ्या गाण्यांकडे मी आणि माझ्यामुळे कदाचित/बहुदा तुम्हीही ज्या नजरेने पाहत होता ती आता बदलायला हवी आहे.  आता ह्यापुढे येणारी गाणी ऐकाल तर त्याची निश्चितच खात्रीही पटेल!

धन्यवाद!

२८ मे, २०१२

पत्ता सांगा हो जरा...

मला एक अनुभव हटकून येतो....मी सद्द्या राहातो ती इमारत सात मजली आहे आणि मी सहाव्या मजल्यावर राहतो...इथे एका मजल्यावर पाच सदनिका आहेत...माझ्या मजल्यावर माझ्या सदनिकेचे दार नेहमीच बंद असतं...इतर दोन ठिकाणी घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात....तरीही आमच्या ह्या मजल्यावर कधी कुणी व्यक्ती पहिल्यांदाच आली तर पत्ता विचारण्यासाठी माझ्या बंद दरवाज्याची घंटीच वाजवली जाते...समोर दारं उघडी दिसत असूनही त्यातल्या कुणालाही पत्ता विचारावासा  का वाटत नाही हे मला कोडंच आहे....कारण बहुतेक करून आलेली व्यक्ती ही माझ्या व्यतिरिक्त इतर चार जणांपैकी कुणाकडे तरी आलेली असते...मग तो वाणसामान घेऊन आलेला हमाल असो, हॉटेलातून काही खाद्य पदार्थ घेऊन आलेला पोरगा असो किंवा कुणी पाहुणा असो....
हे कमी म्हणून की काय कैक वेळेला आलेला मनुष्य केवळ इमारतीचे आणि ज्याच्याकडे जायचंय त्याचे नाव इतक्याच भांडवलावर आलेला असतो आणि तो इतर कोणत्याही मजल्यावर न जाता थेट माझ्या मजल्यावर येऊन मलाच पत्ता विचारत असतो.....माझ्या इमारतीत मी सोडून बाकी सगळे गुजराथीच  आणि येणारी व्यक्ती ही त्यांच्यापैकीच कुणाकडे तरी आलेली असते....इमारतीत येतांना इमारतीच्या रखवालदारालाही ते लोक पत्ता विचारू शकतात ना...किंवा खाली असलेली नावांची पाटीही वाचू शकतात ना....पण नाही..थेट माझ्याकडेच येतात....आता तुम्ही म्हणाल की थेट माझ्याकडे कशावरून येतात...इतरांकडेही जात असतीलच..तुम्हाला काय माहीत?
मुद्दा बरोबर आहे तुमचा....मलाही आधी तसंच वाटलं होतं...पण बरेचदा मी असं पाहिलंय की येणारी व्यक्ती ज्यांच्याकडे येते असे लोक समोर असूनही त्यांना पत्ता न विचारताच माझा बंद दरवाजा खटखटवला जातो... आणि मी त्यांना समोरच उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे  निर्देश करतो...आता बोला.
हाच अनुभव मला ह्यापूर्वी जिथे मी राहात असे तिथेही यायचा....
अहो पत्ता विचारण्याबद्दल किंवा चौकशी करण्याबद्दल तक्रार नाही..पण त्याला काही वेळकाळ? ह्या आधी मी जिथे राहायचो तिथे मी तळमजल्यावर राहायचो... एकदा रात्री अडीच वाजता एकाने माझ्या घराची घंटी वाजवली होती आणि मीही अतिशय सहजतेने कोण आहे हे न पाहताच दार उघडले होते...सुदैवाने ते कुणी चोर-दरवडेखोर नव्हते... समोरच्या घरात राहणारे लोक कुठे गेलेत म्हणून चौकशी करणारे त्यांचे नातेवाईकच होते...अर्थात त्या आलेल्या लोकांची आणि माझी साधी तोंडओळखही नव्हती...पण मी आपला सद्गृहस्थ म्हणून त्यांची चौकशी करून उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं आणि वाटेला लावलं....आलेले लोक आमच्याच गावातले म्हणजे स्थानिकच होते...पण त्यांचे नातेवाईक कुठे गेले ते मला माहीत नव्हतं....चौकशीत कळलं की ते लोक असेच सहज फिरत फिरतच आले होते...एका गाण्याच्या कार्यक्रमाहून घरी परत जातांना  आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी....म्हणजे त्यांच्याकडे असे काही गंभीर कारणही नव्हतं अशा अवेळी कुणाचाही दरवाजा ठोठवण्यासाठी...
मी त्यांना विचारलं की अहो, तसं काही गंभीर कारण नव्हतं तर का उगाच मला त्रास दिलात...तर म्हणाले की तुमच्या घरातला दिवा चालू दिसला, म्हणून म्हटलं जागे असाल...आता नाईट लँपच्या प्रकाशामुळेही जर कुणाला असं वाटत असेल की घरातले लोक जागे असतील तर अशा लोकांबद्दल काय बोलणार?
काही नाही, मी कपाळाला हात लावून घेतला.
दुपारच्या झोपेचं खोबरं तर किती तरी लोक करतच असतात...माझ्या झोपेशी लोकांचं काय वाकडं आहे माहीत नाही..पण भली पहाट, टळटळीत दुपार, मध्यरात्र...वेळ कोणतीही असो...मला जेव्हा कमालीची झोप येत असेल तेव्हाच नेमकी घंटी वाजते....
कुणीसं म्हटलंय ना हो...देवाचिये द्वारी,उभा क्षणभरी,त्याने मुक्ती साधियेल्या!  ;)
मला आता माझ्या दरवाज्यावरची माझ्या नावाची पाटीच काढून टाकावी लागणार आहे.. बहुदा देव आडनावाचा दोष असावा हा सगळा...दुसरं काय असू शकतं! 

२७ मे, २०१२

आपलीच भाषा परकी वाटायला लागलेय.....१

बाई!
हा शब्द आपण किती रूपात वापरत आलोय?
बाई म्हणजे स्त्री...असा सरळ एक अर्थ म्हणा,प्रतिशब्द म्हणा!
कोणत्याही स्त्रीच्या नावापुढे बाई लावणं...जसे की लक्ष्मीबाई,पार्वतीबाई,जिजाबाई....इथे बाई हे मानाचे लक्षण समजलं जातं. शाळेतल्या शिक्षिकांनाही आम्ही ’बाई’च म्हणत असू...हल्ली म्हणतात की नाही माहीत नाही.
एकूणच स्त्रीचे नुसते नाव न घेता त्यापुढे बाई हा शब्द जोडणे म्हणजे तिला मान देणे, मोठेपणा देणे हे अभिप्रेत असते असे माझ्या अल्पमतीप्रमाणे मी म्हणू शकतो.
आता घराघरात काम करायला येणार्‍या मोलकरणींनाही बाई म्हणतात...तेही मानानेच.... अमूक बाई बाई,तमूक बाई किंवा नुसतेच बाई इत्यादि एकेरी उच्चारही आपण करत असतो...पण तिथे बाई ह्या शब्दाचा वापर स्त्रीच्या संदर्भातच केला जातो...बाई ह्या शब्दामुळे कुठे उणेपणा आलाय असे आजवर कुणाला वाटले नव्हते.... पण आमच्या घरात जेव्हा इंग्रजी-हिंदी ह्या भाषा घुसल्या तेव्हा ह्या बाई शब्दाची पार अवहेलना सुरु झाली.
बाई शब्द उच्चारताच बर्‍याचशा नवशिक्षित ललना....शीऽऽऽ! बाई कसलं म्हणता? अगदीच गावंढळ वाटतं...त्यापेक्षा नुसत्या नावानेच हाक मारा किंवा मॅडम म्हणा!
आता काय बोलायचं?
हिंदीमध्ये सगळीकडे मान देण्यासाठी नावापुढे जी वापरतात...त्यामुळे जर एखाद्या बाईचा उल्लेख करायचा असेलच तर तो बायजी किंवा बाईजी असा करतात....इंग्लिशमध्ये सरळ नाव घेतात किंवा मान देण्यासाठी मॅडम म्हणतात....
हल्ली मराठी लोकांतही हे शब्द जास्त प्रचलित झालेत....बाईजी म्हटलेलंही हल्ली काही लोकांना चालत नाही हो....तेव्हा आता फक्त मॅडम म्हणा बरं का!
शाळेतल्या शिक्षिकांना हल्ली टिचर, मिस,मॅडम वगैरे म्हणावे लागते.... बाई  शब्द आता फक्त स्त्री शिपाई,सेविकांसाठी वापरला जातो...किती ही प्रगती!  ;)
आपल्याला इतर भाषा थोड्याफार कळायला लागल्या की आपलीच भाषा कशी परकी आणि कम अस्सल वाटायला लागते त्याचे हे एक छोटे उदाहरण!

गुरूजी...हा असाच एक शब्द! आपल्याला शिकवणार्‍या शिक्षकांसाठी आपण हा वापरत असू....पण आता त्याची जागा सर ह्या शब्दाने घेतलेय.
गुरुजी म्हणणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण वाटतं हल्ली....गुरुजींनाही ते आवडत नाही हो!
शिक्षक हा शब्दही आता जाऊन त्याजागी टिचर हा शब्द स्थानापन्न झालाय.
तसे गुरुजी हा शब्द आपण भटजींसाठीही वापरतो...अजून तो तिथे चालतोय बरं का..पण जुन्याकाळचा भटजी(भडजी) हा शब्द कालौघात बाद झाला...आज कुणाला भडजी हा शब्द शिवीसमानही वाटू शकतो....तरी नशीब अजून कुणी त्याला ’फादर म्हणत नाहीये.  ;)

आता महाविद्यालयात...माफ करा कॉलेजात शिकवतात ते प्रोफेसर...अध्यापक,प्राध्यापक इतिहासजमा झालेत.

७ मे, २०१२

’सत्यमेव जयते’च्या निमित्ताने!

अमिरखानचा कालचा कार्यक्रम पाहिला....त्यात माझ्या दृष्टीने दोन गोष्टी धक्कादायक वाटल्या.  त्यातली एक म्हणजे... कुटुंबनियोजनाच्या नावाखाली सरकारनेच स्त्री-भ्रूण हत्येला चालना दिली होती....अर्थात नंतर सामाजिक संस्थाच्या दबावाने सरकारला माघार घ्यावी लागली हे अलाहिदा...पण तिथून ते लोण खाजगी क्षेत्रात जे पसरले ते आज बंदी घालूनही चोरून मारून नव्हे तर राजरोसपणे सुरु आहे...फक्त सांकेतिक भाषेत...आणि आज आपण सारे त्याचे सामाजिक दुष्परिणाम भोगतोय.

दुसरी अशी की हरयाणा.दिल्ली,पंजाब इत्यादि ठिकाणी विवाहयोग्य अशा मुलींची चणचण असल्यामुळे ह्या ठिकाणचे लोक कर्नाटक,आंध्र,बिहार वगैरेसारख्या ठिकाणाहून मुलींना विकत घेऊन त्यांची जबरदस्तीने तिथल्या पुरुषांशी लग्नं लावत आहेत...ह्यात काही ठिकाणी एका स्त्रीवर त्या घरातले सगळे पुरुष अत्याचार करतात तर कधी तिला पत्नीचा दर्जा न देता मोलकरणीचा दर्जा दिला जातो असे निदर्शनाला आलेले आहे.

मंडळी सद्द्याचा स्त्री-भ्रूण हत्येचा प्रकार जर आपण वेळीच थांबवला नाही तर मग...एकेका मुलीशी तीन-चार जणांना विवाह करावा लागेल..महाभारतात द्रौपदीची जी परवड झाली होती तीच परवड आताच्या मुलींना भोगावी लागेल....आताही स्थिती काही फारशी वेगळी नाहीये म्हणा.

बाकी, गरीब लोकांच्यातच हे स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे ,सुशिक्षित वर्गात तेवढे नाही इत्यादि गैरसमजांबद्दल मला आधीच कल्पना होती...नियमित वृत्तपत्रवाचन आणि डोळे/कान उघडे ठेवून समाजात वावरलं तर हे असे गैरसमज कधीच निर्माण होत नाहीत...पण आपले सर्वसाधारण वर्तन असे असते की...आपल्याला काय करायचंय? आपण तर असं काही करत नाही ना? आपल्याला त्रास होत नाही ना..इत्यादि...ह्या आधुनिक तपासण्या नव्हत्या तेव्हाही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीला  कधी दुधात बुडवून तर कधी तिच्या तोंडावर उशी ठेऊन तिला गुदमरून टाकून जीव घेण्याचे प्रकार आपण कथा कादंबर्‍यातही वाचल्याचे आठवत असेलच...ते बहुतेक सगळे प्रकार उच्च वर्णीय , जमीनदार, मालदार वर्गातच होत असत....आजही होतात. ही असली कामं परस्पर दाई अथवा सुईणींच्या हस्ते, त्यांना मोठी बिदागी देऊन करवली जातात. गरीबांकडे कधी असे प्रकार होत नाहीत...त्यांचं एकच म्हणणं असतं...देवाची इच्छा...जे मिळालंय ते स्वीकारण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते.

स्त्री-भ्रूण हत्येमूळे स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळला हे तर निर्विवादच आहे...आणि त्यामुळेच हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार वाढले आहेत असे माझे मत आहे आणि  थोपुवरच्या एका चर्चेत मी ते मांडलेही होते....पण लोकांना ते तितकेसे पटले नाही...कालच्या कार्यक्रमात हरियाणातल्याच एका स्त्री समाजसेविकेने माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलाय...तिने म्हटलंय मुलींची संख्या कमी झाल्यामुळे गावातल्या लग्नेच्छु युवकांची संख्या बरीच वाढलेय पण त्यांच्यासाठी बायको म्हणून मुलीच मिळेनाशा झाल्यामुळे आता तेच युवक आपल्याच ओळखी-पाळखीतल्या स्त्रियांची छेडछाड करायला लागलेत.

कालच्या त्या कार्यक्रमामुळे, ज्या गोष्टींबद्दल कुजबूज ह्या स्वरूपात चर्चा चालत होत्या त्या आता उघड प्रमाणात होतील हे नक्की आणि समाजमनाच्या दडपणामुळे  स्त्री-भ्रूण हत्येच्या संख्येत निश्चितच घट होईल अशी आशा आपण करूया.
जयहिंद!

३१ मार्च, २०१२

आता थांबूया!

जालरंग! जालरंग ह्या नावाने आपण एक आभासी प्रकाशन संस्था  स्थापन  केली आणि पाहता पाहता तिच्या नावाने आजवर १२ अंक प्रकाशित केले की! विश्वास नाही बसत ना! पण हे ढळढळीत वास्तव आहे.आजवर जालरंगने केलेली वाटचाल पाहता काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात...सुरुवात मी एकट्याने केली होती पण लगेच खूप मदतीचे हात आले आणि एकाचे अनेक हात झाले आणि मग प्रस्ताव आला की हे अंक आपण एखाद्या विशिष्ट नावाने प्रकाशित केले तर? प्रस्ताव मान्य झाला..मग अनेकजणांनी अनेक नावं सुचवली आणि निवडणूक प्रक्रियेतून ’जालरंग प्रकाशन’ हे नाव निश्चित झालं....त्यानंतर मग ह्या प्रकाशनाचं एखादं ओळखचिन्ह असावं असा प्रस्ताव आला...अनेकांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे ओळखचिन्ह बनवली...इथेही निवडणूक प्रक्रियेने ओळखचिन्ह ठरवण्यात आलं ते आपलाच एक सहकारी विशाल कुलकर्णीने बनवलेलं होतं...आणि मग लोक उत्साहाने अंक बनवण्यासाठी मदत करू लागले.... ही मदत लेखन स्वरूपातली होती जी अतिशय आवश्यक होती...ज्यामध्ये महाजालावरील प्रथितयश लेखकांनीही आपला सहभाग नोंदवला...पडद्याच्या मागे तांत्रिक मदतीसाठी मात्र फारसे लोक सहभागी होऊ शकले नाहीत...सुरुवातीला जे तीन चार जण होते त्यातले बहुतेक लोक वैयक्तिक व्यस्ततेमुळे पुढे सक्रिय राहू शकले नाहीत...आणि केवळ राहिली ती म्हणजे श्रेया रत्नपारखी...ती अगदी आपल्या ’हास्यगाऽऽरवा २०१२’ ह्या शेवटच्या अंकापर्यंत...आता तिनेही तिच्या वैयक्तिक जबाबदार्‍या वाढल्यामुळे ह्यापुढे काम करण्यास असमर्थता प्रकट केलेय....एकूणात पुन्हा मी एकटाच उरलोय...जिथून सुरुवात केली तिथेच परत आलो..एक वर्तुळ पूर्ण झाले...तेव्हा आता ठरवले..बस्स! इथेच थांबायचे!

अंक काढून काय मिळवलं? ह्याची बरीच उत्तरे आहेत...ज्यातली काही आवडणारी तर काही नावडणारी आहेत...
अंक काढण्यात माझा वैयक्तिक फायदा असा झाला की माझा स्वत:चा वेळ उत्तम गेला आणि अंक संपादनाच्या निमित्ताने साहित्यातील वैविध्यता पुरेपूर अनुभवता आली.
अंकाला लेखकांचा पाठिंबा भरपूर प्रमाणात मिळाला...प्रथितयश लेखकांच्या बरोबरीने नवोदित लेखकांनीही आपली हजेरी लावली हे विशेष नमूद करण्यासारखे आहे.
होळीच्या निमित्ताने निघणार्‍या खास विनोदी साहित्यासाठीच्या ’हास्यगाऽऽरवा’ अंकाला मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी साहित्यपुरवठा झाला....बाकी एरवी इतर अंकांना भरगच्च म्हणावे इतका साहित्यपुरवठा झाला...ह्या अंकांच्या निमित्ताने आपल्यातल्याच काही लोकांना संपादकीय लिहिण्याची विनंती करण्यात आली आणि सांगायला आनंद वाटतो की सगळ्यांनी आपापले संपादकीय अतिशय उत्तम असे लिहिले...अंकांना आलेल्या प्रतिसादांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिसाद ह्या संपादकीयांना आहेत हीच त्याची पोचपावती समजता येईल.....
एकाही पैशाचा व्यवहार नसलेली अशी ही प्रकाशनसंस्था..बहुदा जगाच्या पाठीवरील पहिलीच असावी.  :
इथे एक गंमत सांगायला हरकत नाही.....जालरंगचे नाव वाचून एक दोघांनी ही संस्था व्यावसायिक स्वरूपाची प्रकाशन संस्था आहे असे समजून काही विचारणा केली होती....त्यातली एक विचारणा म्हणजे....एक लेखक म्हणून लेखकाचा त्याच्या लेखनावर किती अधिकार असतो, त्याला मानधन एकरकमी मिळते की काही अन्य पद्धतीने....
आणि दुसरी विचारणा....मला आपल्या अंकात जाहिरात द्यायची आहे....माझी जाहिरात अमूक अमूक इतकी लहान/मोठी आहे तर त्यासाठी किती आकार(पैशांच्या स्वरूपात) द्यावा लागेल?
आता ह्यांना मी काय उत्तर देणार?
मी जेव्हा सांगितले की,"अहो ही आमची आभासी संस्था आहे...आम्ही कुणाला मानधन देत नाही आणि कुणाकडूनही मानधन घेत नाही....जाहिराती वगैरे आम्ही छापत नाही.आमच्या संस्थेत एकाही पैशाचा व्यवहार होत नाही"...तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना!
ही झाली काही आवडणारी उत्तरं...

आता काही नावडणारी..पण वास्तववादी उत्तरं....
अंकाला जितका साहित्यिकांचा भरपूर पाठिंबा मिळाला त्या मानाने वाचकांचा..विशेष करून प्रतिसादकांचा  मिळालेला प्रतिसाद अतिशय असमाधानकारक आहे.
आपल्या साहित्यिकांमध्ये महाजालावर अतिशय लोकप्रिय असे जे जालनिशीकार आहेत त्यांचा सहभाग असूनही...त्या त्या जालनिशीकारांच्या वैयक्तिक वाचक/चाहत्यांना जालरंगकडे आकर्षित करू शकलो नाही...थोडक्यात ह्या लेखकांना ना जालरंगाचा फायदा झाला ना जालरंगाला त्यांच्या लोकप्रियतेचा....एकूण काय तर आपल्या अंकात नामवंत लेखकांचे साहित्य असूनही वाचकांनी आपल्याला दिलेला अत्यल्प प्रतिसाद हा नाऊमेद करणारा आहे...जालरंगने अंकांमध्येही वैविध्य ठेवले होते...ध्वनीमुद्रित स्वरूपाचा ’जालवाणी’सारखा अंक देऊनही आपण रसिक वाचकांना आपल्याकडे आकर्षित करू शकलो नाही....ह्या आघाडीवर आपण कधीच प्रगती करू शकलो नाही....ह्याची कारणमीमांसा कशी करावी हे आजवर मला तरी समजलेलं नाही...माझ्या दृष्टीने हे न सुटलेले एक कोडेच आहे.

गंमतीने असे म्हणावेसे वाटते की....शस्त्रक्रिया यशस्वी झाली....पण रूग्ण वाचू शकला नाही. :)
तसंच काहीसं जालरंगचं झालं. 

म्हणूनच म्हणतो आता इथेच थांबूया!

७ मार्च, २०१२

होळीविशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’चे प्रकाशन!

मंडळी ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता तो आपला होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’ आज होळीच्या दिवशी आम्ही प्रकाशित करत आहोत. विनोदी लेखन ...त्यातूनही ठरवून विनोदी लिहायचे म्हटले की भलीभली सिद्धहस्त मंडळी माघार घेतात ह्याचा अनुभव ह्यावर्षीही आम्हाला आलाय. त्यामुळे हा अंक तसा अगदीच छोटेखानी झालाय ह्याची आम्हाला कल्पना आहे...तरीही हे निश्चित की जे काही आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत त्यामुळे आपले निखळ मनोरंजन होईल ही खात्री आहे...तेव्हा करा सुरुवात वाचायला...आणि जमल्यास प्रतिसादही द्या.
अंकाचा दुवा:
http://holivisheshank2012.blogspot.in/2012/03/blog-post_05.html

७ फेब्रुवारी, २०१२

होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक अर्थातच विनोदी साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... ४ मार्च २०१२ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता  jaalarangaprakaashana@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण: ह्या अंकाचे संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री हेरंब ओक हे लिहिणार आहेत.

५ फेब्रुवारी, २०१२

मौनीबाबा झालाय माझा!

ज्याला जी गोष्ट करायला जास्तीत जास्त आवडते तीच करायला परिस्थितीवशात एखाद्यावर काही काळासाठी बंदी आली तर?
तुम्ही म्हणाल,कसले भलते सलते प्रश्न हल्ली तुमच्या डोक्यात येतात हो....साठी बुद्धी नाठी...दुसरं काय?
चांगलं लिहावं,वाचावं...झालंच तर गप्पा माराव्यात,गाणी म्हणावीत....
झालं! सगळंच मुसळ केरात की हो...अहो मीही तेच सांगत होतो तुम्हाला...गेला आठवडाभर मला खोकल्याने हैराण केलंय... गाणी म्हणणं सोडा हो..नुसतं गाण्याचा मनात विचार आला तरी ढास लागतेय...दोन शब्द बोलायलाही मारामार झालेय....औषधं घेतोय..अगदी वेळच्या वेळी,सगळी काळजीही घेतोय....पाहिलंत ना तोंडावर फडकं बांधलंय ते? पण हा खोकला काही पाठ सोडायला तयार नाहीये....हितचिंतक सल्ला देताहेत त्याला लवकरात लवकर पळवा..लवकर बरे व्हा....मलाही तसंच वाटतंय हो....पण

आता हा पण काय आणखी?
सांगतो हो....काय तो अभंग आहे...आयला आठवायचा प्रयत्न करतोय तर आठवण्याऐवजी खोकलाच येतोय की राव....हं,आत्ता आठवला....
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधियेल्या....असा काहीसा अभंग आहे बघा....
हा खोकला, तशाच मिषाने आला की हो माझ्याकडे...पण आता म्हणतो...नाऽऽही! अजिबात नाही जाणार इतक्या लवकर! मलाही राहायचंय तुझ्याबरोबर! उठसुठ कशाला ती गाणी गायची? जरा आम्हाला पण बागडू दे की तुझ्या मुखी!
आता,हा असा बोलायला लागला तर मलाही प्रश्न पडला की हो....खरा नसलो म्हणून काय झालं आडनावाचा तरी देव आहे ना...मग त्या आडनावाला जागायला नको....भले त्याचा आडफायदा...म्हणजे गैरफायदा हो... तो खोकला घेऊ दे...आपण आपल्या नावाला...त्येच त्ये हो...आड, आडनावाला जागायला नको? म्हणून सद्द्या त्याला म्हटलं..बाबा रे, किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहा...मी पण कैक वर्षात गप्प बसलेलो नाहीये...तेव्हा जरा तेवढंच मौनव्रत पाळतो...तुला जेवढं काही माझ्या मुखात...खरं तर नरड्यात म्हणणार होतो.....वास करायचा असेल...वास म्हणे रहिवास हो...इतकं शिंपल तुमच्यासारख्या जंटलमन लोकांला समजू नये?....हं तर म्हटलं..तुला जितका वेळ वास करायचा असेल कर बाबा...तुही खूश हो! मी आपला मौनीबाबाच बनतो.

असो...तर मंडळी, ह्या मौनामुळे एक फायदा झाला...बोलता येत नाही, गाता येत नाही मग आता करायचं काय हा माझ्यासारख्या बडबड्या माणसापुढे यक्षप्रश्न निर्माण झाला...पण काही नाही..त्यावरही तोडगा निघाला...कुठेतरी वाचलं होतं...समस्येमुळे  तुमचा एक मार्ग बंद झाला असं जरी क्षणभर वाटलं तरी ते तसं नसतं...दुसर्‍या ठिकाणी कुठे तरी वाट सापडते...आपण ती शोधायची असते....माझंही तसंच झालं..काही काळ मी निर्बुद्ध मनाने बसून होतो...मग एका क्षणी साक्षात्कार झाला....अरेच्चा...इतके दिवस आपण चाली लावत होतो, स्वत:च गात होतो....त्या सगळ्याकडे कधी एका त्रयस्थ श्रोत्याच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे काय?
नाही...असेच उत्तर होते....मग? आता कसली वाट पाहतो आहेस...आताचा वेळ लाव सत्कारणी...कर त्या गोष्टींचा विचार....शोध त्यातल्या त्रुटी, शोध त्यातलं सौंदर्य...आणि मी लगेच कामाला लागलो....

मंडळी, खरंच सांगतो....माझ्या काही चाली पुन्हा नव्याने ऐकल्या....बर्‍याचशा आवडल्या..काही अगदीच सामान्य वाटल्या....पण त्यांच्यात सुधारणा करता येईल असेही लक्षात आले.....गाण्याच्या बाबतीत सांगायचे तर ताल...तो आधीपासूनच कच्चा आहे....पण बर्‍याचदा अधेमधे किंचित सूरही घसरतोय....किमान तो तसा घसरता कामा नये.....मनातल्या मनात नोंदी करतोय...पुन्हा नरडं गाण्यालायक झालं की आता ह्या गोष्टीतही नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.....तालाच्या बाबतीत मात्र अजून काही मार्ग दृष्टीपथात दिसत नाहीये...आधी मला माझ्या शरीराचे घड्याळच सुधारावे लागेल...बहुदा त्यातूनच ताल जागेवर येईल....पाहूया...प्रयत्न करणं माझ्या हाती आहे...बाकी यश मिळेल न मिळेल...काहीच माहीत नाही.
(वेळ जात नाही म्हणून काही तरी खरडलंय..फारसं मनावर घेऊ नका.)

३१ जानेवारी, २०१२

मायबोली शीर्षक गीत!


मंडळी, ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता ते मायबोली शीर्षक गीत आज सगळ्यांसाठी जाहीरपणे ऐकायला खुले करण्यात आले आहे...

ह्या गीतामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची यादी....

संपूर्ण श्रेयनामावली
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)

गायक-गायिका:
मुंबई: मुग्धा कारंजेकर, अनिताताई आठवले,  प्रमोद देव,  मिलिंद पाध्ये,  सृजन पळसकर
पुणे: विवेक देसाई, सई कोडोलीकर, पद्मजा जोशी, स्मिता गद्रे, अंबर कर्वे, मिहीर देशपांडे
दुबई (सं. अरब अमिराती):  देविका आणि कौशल केंभावी , सारिका जोशी, दिया जोशी, योगेश जोशी, वर्षा नायर
कुवेतः जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अश्विनी गोरे
अमेरिका: जयवंत काकडे, अनिल सांगोडकर
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योगेश जोशी
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनीमुद्रण तंत्रज्ञः
    नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.

    जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.

    संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.

    मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दिप्ती जोशी (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिल सांगोडकर (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर , नंदन कुलकर्णी ), हिमांशु कुलकर्णी  आणि आरती रानडे
 निर्मिती: maayboli.inc

गीताचे शब्द आणि ते कुणी कसे गायलेत....
 गीतातील गायक क्रमः
[मायबोली.....] (मिलिंद पाध्ये)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई आठवले, योगेश जोशी)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अश्विनी गोरे व जयवंत काकडे)
[विश्वात मायबोली] (मिलिंद पाध्ये) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिल सांगोडकर)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर कर्वे व जयश्री अंबासकर)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई कोडोलीकर) ||२||

[युडलिंग (योगेश जोशी) आणि कोरस (अनिताताई आठवले, मुग्धा कारंजेकर)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व मुग्धा कारंजेकर)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व मुग्धा कारंजेकर)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका केंभावी, कौशल केंभावी, सृजन पळसकर व समूह- विवेक देसाई, मिलिंद पाध्ये, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन पळसकर)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया जोशी व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया जोशी व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा नायर व अनिताताई आठवले)
[मधले संवाद- मिलिंद पाध्ये, मुग्धा कारंजेकर व योगेश जोशी]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर देशपांडे)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर देशपांडे व समूह- विवेक देसाई, मिलिंद पाध्ये, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई आठवले, सई कोडोलीकर, स्मिता गद्रे, पद्मजा जोशी) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योगेश जोशी व सारिका जोशी)
[हार्मनी समूह-मिलिंद पाध्ये, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा जोशी, सई कोडोलीकर, स्मिता गद्रे]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योगेश जोशी, सारिका जोशी व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)आता गीत ऐका...


मंडळी,ह्या गीताचं वैषिष्ठ्य असे की ह्यात लहानात लहान साडेतीन वर्षांची दिया जोशी(योगेश जोशी आणि सारिका जोशी ह्या दांपत्याची कन्या) ते साठीचा मी, प्रमोद देव असे सर्व वयोगटातील मायबोली परिवारातले सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांनी आपला आवाज ह्या गीतासाठी दिलेला आहे. एक दोन अपवाद वगळता सगळेच कलाकार हे हौशी ह्या सदरातलेच आहेत...अशा लोकांकडून हे गीत गाऊन घेणं हे खरं तर अतिशय कठीण काम होतं...पण ते योगेश जोशी ह्या संगीतकाराने अतिशय कुशलतेने केलेलं आहे हे आपल्याला गीत ऐकल्यावर कळेलच.
२९ जानेवारी, २०१२

'साठी’च्या निमित्ताने....

मंडळी कालच म्हणजे २८ जानेवारी २०१२ रोजी माझी ’साठी’ झाली...खरंतर ह्यात माझं स्वत:चं असं काय कर्तृत्व आहे? जन्माला आलेला प्राणी मरत नाही तोवर त्याचे वय वाढतच असतं...त्या न्यायाने मी अजून जिवंत आहे. :D
कालच्या दिवसात माझ्यावर आपल्यासारख्या सुहृदांनी, मित्रमंडळींनी आणि आप्तस्वकीयांनी शुभेच्छांचा जो तुफान वर्षाव केलाय त्याच्या बळावर मी बहुदा ’शंभरी’ देखील साजरी करेन असं उगीच आपलं वाटायला लागलंय....अरेच्चा! कोण तिथे चुकचुकलं? कुणीतरी म्हटल्याचं ऐकू आलं...आयला म्हणजे आमच्या कानपुरात पूर्ण हरताळ केल्याशिवाय काय हा म्हा.....

असो...असे म्हणणारेही आमचे सच्चे मित्रच आहेत...त्यांना आमच्या प्रतिभेची असली/नसली तरी प्रतिमेची नक्कीच काळजी वाटते...काहीही म्हणा, पण त्यांच्यामुळेच सतत सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न होत असतात....आता त्या सुधारणा खरंच होतात की नाही ते आपणच जाणता...आपल्याशिवाय कोण आहेत इथे जाणकार! :)

ह्या साठ वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं? बरंच काही! दोन्हीची यादी खूप मोठी होईल...पण खरोखरंच हिशोब मांडायचा ठरवला तर....तर क गपेक्षा  वरचढ ठरतोय...सदिच्छांची कमाई...कशी कुणास ठाऊक पण प्रचंड आहे. आयुष्यात सुखदु:खाचे असे अगदी टोकाचे अनुभव आले...पण तेव्हाही हितचिंतकांची संख्या विरोधकांपेक्षा नेहमीच खूप जास्त दिसून आली...ह्याबाबतीत मी खरंच सुदैवी आहे...मला वेळोवेळी चांगले मित्र मिळाले...ह्या मित्रांचंही एक वैशिष्ठ्य ठळकपणाने दिसून येतं....

मी तसा विचारांचा पक्का माणूस आहे...म्हणजे असं की एकदा मी ठरवलं की मग त्याबाबतीत तडजोडीला कधीच वाव नसतो...अर्थात तो माझ्याकडूनच...अशा अवस्थेत समोरचा माणूसही तसाच भेटला तर?  तर काय, वादावादी, मारामारी, भांडण...काहीही घडू शकतं....आता तुम्ही सांगा अशा माणसाला मित्रांपेक्षा खरं तर शत्रूच जास्त असायला हवेत की नाही? पण नाही ना! माझे सखेसोबती, मित्रमंडळी वगैरे ही मंडळी स्वत: एरवी आपल्या मतांबाबत कितीही पक्की असली तरी माझ्याशी जुळवून घेतांना त्यांनी त्यांचा स्वत:चा अहंही कैकवेळा बाजूला ठेवलाय...मला नेहमी ह्याच गोष्टीचे आश्चर्य वाटत आलंय...मी इतरांशी जुळवून घेण्यासाठी कधीही माझ्या तत्वांना मुरड घालायला तयार नसतो...पण ही सगळी मंडळी माझ्या त्या दुर्गुणाकडे सहजपणाने काणाडोळा करून माझ्या मनाप्रमाणे करतात...त्यांच्या मनाविरूद्धही अगदी सहजपणाने ते केवळ माझ्यासाठी वागू शकतात...मला खरंच हा प्रकार म्हणजे कोडं वाटत आलाय....कळायला लागल्यापासून ते आत्तापर्यंत हाच अनुभव मी घेत आलोय...कुणी ह्याला माझी पूर्वपुण्याई देखील म्हणेल...पण मी अजूनही त्यामागचं नेमकं कारण समजू शकलेलो नाहीये....

शब्द हे शस्त्र आहे...हे मी कैकवेळा अनुभवलंय...ह्या शस्त्राने मी कैकजणांना जखमीही केलंय...कधीतरी मलाही घायाळ व्हावं लागलंय...पण तरीही जमाखर्च मांडायचा झाला तर...माझ्याबद्दल आपुलकी, सदिच्छा बाळगणारेच अवती-भवती जास्त दिसतात!

माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या म्हणाव्यात अशा लग्न, संसार ह्या गोष्टी उशीरानेच घडलेत...अगदी त्या आपल्या आयुष्यात बहुदा नसाव्यात असे वाटण्यापर्यंत टोकाच्या...पण त्या उशीरा घडल्या तरी लौकिकार्थाने त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या...संसार फार काळ नाही टिकला..पण जितका काळ झाला तो काही अपवाद वगळता सुखावहच झाला!

तुम्हाला एक गंमत सांगतो...प्रत्येक लहान मुलाची जन्मपत्रिका बनवण्याची आपल्यात पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे...आता त्यात किती तथ्य आहे/नाही हे सोडून द्या...हं तर काय सांगत होतो... माझीही जन्मपत्रिका बनवून घेतलेली होती..आमच्या आई-वडिलांनी...त्या पत्रिकेत भविष्यही लिहिलेलं होतं...काय? सांगतो.....

माझं लग्न वयाच्या पंचविशीत होईल आणि मला एक मुलगा असेल.... वास्तवात माझं लग्न झालं वयाच्या पस्तिशीत आणि मला एक मुलगी आहे... ह्यात अजूनही लिहिलं होतं...की मला राजयोग आहे. :D
आता हल्लीच्या युगात राजे-महाराजे राहिलेत कुठे....तर मी राजा होणार? अगदी नाटकातला राजाही नाही झालो....

हे सांगायचं कारण....राजयोग! अहो, ह्या बाबतीत त्या ज्योतिषाचं चुकलं असं आधी जरी मला वाटलं होतं...तरी आता मात्र मला असं वाटतंय...खरंच राजयोग आहे माझ्या नशीबात! एरवी, इतके हितचिंतक, आप्तस्वकीय आणि सुहृद कुठून मिळते? आयुष्यात समर प्रसंग आले, दु:खद प्रसंग आले, संकटं आली...पण एखादा अपवाद वगळता प्रत्येकवेळी त्यात कुणी ना कुणी ज्ञात-अज्ञात व्यक्ती मदतीला धावून आली...त्यामुळे प्रसंगांची तीव्रताही कमी झाली!

हाच! अगदी हाच तो राजयोग असावा!  :)
आपल्यासारख्या सामान्य माणसाला अजून काय हवं असतं हो?

सांगण्यासारखं खूप आहे पण त्याचं सगळ्याचं सार हेच आहे....

जीवनाच्या प्रवासातील......वाटेवर काटे वेचित चाललो.... पण तुम्हा सर्वांमुळे ते.... वाटले जसा फुला-फुलात चाललो.....इतके सुसह्य झालं!

माझ्याबद्दल आपुलकी बाळगणार्‍या सर्वांना हे लेखन अर्पण करतोय!

>

२८ जानेवारी, २०१२

कोई होता जिसको अपना...

किशोरदाच्या धीरगंभीर आवाजातलं हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे...इतके दिवस मला नीट शब्दही माहीत नव्हते...फक्त चालच डोक्यात होती...आज शब्दासकट चाल लक्षात आली....नेहमीप्रमाणेच ह्याचाही रूळ मिळाला आणि मी माझी गाण्याची हौस भागवून घेतली...ऐका आणि ठरवा...जमलंय की फसलंय ते.

२७ जानेवारी, २०१२

क्या से क्या हो गया...

मोहम्मद रफीच्या आवाजातले हे जुने अवीट गोडीचे गाणे...माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीच एक...त्याचा रूळ मिळाला मग मीही जरा घसा साफ करून घेतला....ऐका आणि ठरवा जमलंय की फसलंय ते.

२६ जानेवारी, २०१२

मेरे नैना सावन भादों....

किशोरकुमारच्या आवाजातलं हे अजून एक सुंदर गाणं...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक... माझ्या आवाजात रूळासंगे ऐका....जमलंय/फसलंय ते तुम्हीच सांगा.

२५ जानेवारी, २०१२

जाने कहॉं गये वो दिन...

मेरा नाम जोकर ह्या सिनेमातील मुकेशने गायलेले हे सदाबहार गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकीचे एक...आज तेच गाणं गाण्याचा योग आलाय...एक वाद्यसंगीताचा रूळ मिळाला म्हणून..ऐकून सांगा कितपत जमलंय/फसलंय!

२४ जानेवारी, २०१२

ज्योती कलश छलके...

भाभीकी चुडियॉं ह्या जुन्या सिनेमातील ह्या गीताला सुश्राव्य संगीत दिलंय सुधीर फडके ह्यांनी आणि अर्थातच गाणारा  स्वर्गीय आवाज आहे लतादिदींचा...असं हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकीच असणं हे ओघानेच आलं...प्रभाकर जोग ह्यांनी हेच गाणं वायोलिनवर अतिशय सुरेल असं वाजवलंय..मी त्याचाच रूळ म्हणून वापर करून माझी गाण्याची हौस भागवून घेतलेय....गाणं जमलंय का फसलंय हे जरूर सांगा...मात्र मूळ गाण्याशी..विशेषत: लतादिदींच्या आवाजाशी आणि गाण्याशी ह्याची तुलना करू नये(ती तशी होणेही नाही) ही विनंती.

२३ जानेवारी, २०१२

आनेवाला पल जानेवाला है...

किशोरदाच्या आवाजातलं हे मस्त गाणं आपण नेहमीच ऐकत आलोय...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक...आज त्याचा रूळ मिळाला आणि मग मीही प्रयत्न करून पाहिला...पाहा किती जमलाय/फसलाय ते तुम्ही ऐकून ठरवा.

१८ जानेवारी, २०१२

मायबोली शीर्षक -गीत आणि मी!

२०११च्या मायबोली गणेशोत्सवात मायबोली शीर्षक-गीत लेखनाची स्पर्धा घेतली गेली.ह्या स्पर्धेतील विजेत्या गीताचे अधिकृतरित्या शीर्षक-गीत बनवण्याचे मायबोलीच्या व्यवस्थापनाने ठरवले. गीत निवड समितीत सहभागी एक सदस्य योग उर्फ योगेश जोशी ह्याने ह्या स्पर्धेत यशस्वी ठरणार्‍या गीताला स्वरसाज चढवण्याची तयारी दर्शवली.. त्यानंतर उल्हास भिडे ह्यांच्या ’भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी ... ह्या गीताची निवड झाली आणि मग आधी ठरल्याप्रमाणे त्या गीताला संगीतबद्ध करण्याची कारवाई योगेशने सुरु केली.

हे गीत सर्वस्वी मायबोलीचेच वाटावे म्हणून योगशने अशी कल्पना मांडली की ह्या गीतगायनासाठी प्रथितयश किंवा नामांकित कलाकार न घेता मायबोलीच्या सदस्यांमधूनच गायक/गायिका म्हणून निवड करावी आणि मायबोली व्यवस्थापनाने ती कल्पना मान्य केली. अर्थात ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती; पण सर्व मायबोलीकरांचा ह्या गोष्टीला सक्रिय पाठिंबा मिळेल ह्याबाबत योगेशला जणू खात्री असावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझी योगेशशी ओळख झालेलीच होती. तेव्हा साहजिकच मुंबईत असे कुणी मायबोलीकर गायक-गायिका आहेत का अशी त्याने माझ्याकडे विचारणा केली...मायबोली गणेशोत्सवाच्या वेळी मी काही गीतांना चाली देऊन ती काही लोकांकडून गाऊन घेतली होती...इतकीच खरं तर माझी मायबोलीवरची कामगिरी होती..त्यामुळे मला तसे फारसे मायबोलीकर ओळखत नव्हतेच...वर्षाविहार २०११ला हजेरी लावल्यामुळे त्यातल्या त्यात काही मुंबईकर/पुणेकर माबोकरांशी जुजबी म्हणता येईल अशी ओळख झालेली होती...त्या आधारावर मी काही जणांशी ह्याबाबत संपर्क साधून विचारणा केली पण दूर्दैवाने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.ही गोष्ट मी योगेशच्या कानावर घातली.

खरं तर अशा गोष्टीसाठी मायबोलीवरूनच जाहीर आवाहन करावं असं माझ्या मनात आलं होतं...तसं मी योगेशला सुचवावं असंही मला वाटत होतं...पण मी ते सुचवण्याआधीच मायबोली व्यवस्थापनाने तसे जाहीर आवाहनही केले...आणि मग देशविदेशातल्या मायबोलीकरांनी त्याची दखल घेऊन त्यात जी कलाकार मंडळी होती त्यांनी ह्या प्रकल्पात भाग घेण्याची जाहीर इच्छा प्रदर्शित केली...हुश्श! चला, आपल्याला कुणी दाद दिली नाही तरी आता बरीच मंडळी स्वत:हून पुढे आलेत तेव्हा आता हे कार्य व्यवस्थित मार्गी लागेल हे नक्की...आता मायबोली, योगेश आणि ते कलाकार काय ते जाणोत...आपण आपल्या विश्वात रमूया..असा विचार करून मी स्वस्थचित्त झालो.

अहो पण ते कसं शक्य होतं? मला योगेशचा निरोप आला...काका, तुम्हालाही मी ह्यात गायक म्हणून गृहित धरतोय आणि मुख्य म्हणजे मुंबईतल्या कलाकारांना एकत्र जमवण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवतोय..चालेल ना? विषय माझा आवडीचा असल्यामुळे त्यात न चालण्यासारखे काहीच नव्हते...बाकी आजवर कधीही वाद्यांच्या साथीने, तालासुरात गायलेलो नसल्याने मी गायक म्हणून कितपत चालून जाईन ह्याची मलाच खात्री नव्हती..तसे मी योगेशला बोलूनही दाखवले...त्यावर..ते माझ्यावर सोपवा...असे त्याने म्हटले आणि मग मी सगळा भार त्याच्यावर टाकून निश्चिंत झालो.

मुंबईतल्या ज्या मंडळींनी नावं दिली होती त्यापैकी भुंगा (मिलिंद पाध्ये) ह्याला मी वविपासूनच ओळखायला लागलो होतो...दुसरी रैना..मायबोलीच्या गणेशोत्सव २०११मध्ये तिने माझी एक चाल गायलेली होती म्हणून तिला ओळखत होतो..गऊ २०११मध्ये माझी दुसरी एक चाल गाणारी अगो(अश्विनी)..तिची आई म्हणून अनिताताईंबद्दल ऐकून होतो...अशा तिघांशी संपर्क साधून त्यांना एकत्रितपणे एका ठिकाणी जमवून योगेशने तयार केलेली संगीतरचना सगळ्यांनी मिळून गाण्याचा सराव करणे ही कामगिरी माझ्याकडे सोपवण्यात आली...त्याप्रमाणे आमची पहिली बैठक माझ्याच घरी झाली...दिनांक १५ऑक्टोबर २०११रोजी!
IMG_1152.jpg
योगेश, अनिताताई, रैना आणि भुंगा

ह्या बैठकीला स्वत: योगेशही हजर होताच...आमची सराव बैठक छानच झाली....त्यानंतरची दुसरी सराव बैठक अनिताताईंच्या घरी झाली..त्या बैठकीला मी, योगेश, भुंगा, रैना, अनिताताई आणि माबो शीर्षकगीताचे रचयिता श्री उल्हास भिडेही हजर होते...ही बैठकही उत्तम झाली....दिनांक २४ऑक्टोबर २०११रोजी!
त्यानंतर प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणासाठी वाकोला-सांताक्रुझच्या इम्पॅक्ट स्टुडिओत २ नोव्हेंबर २०११ रोजी आम्ही जेव्हा एकत्र जमलो तेव्हा त्यात अजून एक छोटा कलाकार सहभागी झाला होता...सृजन पळसकर...अमोल पळसकरचा मुलगा. ध्वनीमुद्रणाआधीही आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकत्र सराव करून घेतला आणि त्यानिमित्ताने नरडी साफ करून घेतली...त्यानंतर मग आम्हा सगळ्यांच्या आवाजात दोन ओळी समुहगायनाच्या रूपात ध्वनीमुद्रित करून घेतल्या गेल्या... मग रैना,सृजन आणि अनिताताईंच्या आवाजात वैयक्तिकपणे संपूर्ण गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले...तोवर त्यादिवशीची वेळ संपली होती...मी आणि भुंगा बाकी राहिलो होतो.

DSC07648.JPG
ध्वनीमुद्रण प्रमुख नदीम

IMG_1190_0.jpg
संगीतकार योगेश,संगीतसंयोजक प्रशांत लळित आणि ध्वनीमुद्रण प्रमुख नदीम तांत्रिक चर्चा करतांना...उल्हासजी आणि भुंगा उत्सुकतेने ऐकताहेत.

त्यानंतर पुन्हा एकदा ध्वनीमुद्रणासाठी स्टुडिओ उपलब्ध झाल्यावर मी, भुंगा आणि स्वत: योगेश ह्यांच्या आवाजात वैयक्तिकपणे पूर्ण गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले...माझ्या आयुष्यातील अशा तर्‍हेचा हा पहिलाच अनुभव
असूनही मला स्वत:ला त्याबद्दलचे कोणतेही दडपण जाणवले नाही...मात्र त्याच वेळी आपण जे काही गाणार आहोत ते तालाच्या बंधनात गायचंय हे दडपण मात्र सतत होतं...त्याचा परिणाम म्हणजे माझं गाणं तालात व्यवस्थितरित्या बसलं...पण त्याच वेळी शब्दातल्या भावना मात्र मी नेमकेपणे व्यक्त करू शकलो नाही...गाणं एकूण सपाट झालं होतं.
त्यानंतर पुण्याच्या कलाकारांचं ध्वनीमुद्रण ठरलं...मला आणि भुंग्याला अजून एक संधी मिळाली..ध्वनीमुद्रणाची. मी योगेश आणि भुंगा असे तिघेही दिनांक १८ नोव्हेंबर २०११रोजी भुंग्याच्याच गाडीतून सकाळी दहाच्या सुमारास पुणेमुक्कामी पोहोचलो..तिथे स्मिता पटवर्धनच्या घरी सगळे जमणार होते...तिथे आमच्या आधीच विवेक देसाई,सई कोडोलीकर आणि पद्मजा जोशी असे तिघेजण हजर होतेच..स्मिताला मात्र कामावर जावं लागलं होतं...त्यानंतर इथे पुन्हा आम्ही सगळ्यांनी गाण्याचा वैयक्तिकपणे आणि एकत्रपणे सराव केला....त्यानंतर जेवण झालं..थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग ध्वनीमुद्रणासाठी जाण्याआधी स्मिता आली होती..तिचा सराव करून घेऊन आम्ही निघालो...प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणासाठी एरंडवणे येथील ’साऊंड आयडियाज’ स्टुडिओत.

IMG_1252.jpg
योगेश,सई, पद्मजा, विवेक देसाई आणि भुंगा

IMG_1254.jpg
जेवणाची वाट पाहात आहेत...पद्मजा,सई,गिरीराज, योगेश, भुंगा,विशाल कुलकर्णी आणि विवेक(गिरीराज आणि विशाल आम्हाला खास भेटायला आले होते)

IMG_1280.jpg
ध्वनीमुद्रण प्रमुख जयदीप

इथेही आधी काही विशिष्ठ ओळी सामुहिक रुपात गाऊन ध्वनीमुद्रित केल्या गेल्या...त्यानंतर स्मिता, पद्मजा, सई, विवेक, भुंगा, स्वत: योगेश आणि शेवटी मी...अशा क्रमाने प्रत्येकाच्या आवाजात काही विशिष्ठ ओळी ध्वनीमुद्रित केल्या गेल्या...ध्वनीमुद्रण संपेस्तोवर रात्रीचे साडेबारा झाले होते...तशाही स्थितीत पुणेकरांचा निरोप घेऊन मी, योगेश आणि भुंगा मुंबईला निघालो...भुंग्याने आजची गाण्याची संधी अतिशय उत्तम रितीने साधलेली होती ह्यात तीळमात्र शंका नव्हतीच...पण त्याने इतक्या अपरात्रीही मुंबईपर्यंतचे सारथ्यही अतिशय कुशलतेने केले हे त्याहूनही विशेष म्हणावे लागेल... आधी योगेशला त्याच्या ठाण्याच्या घरी आणि नंतर मला...माझ्या घरी मालाडला सोडून...ह्यावेळी १९ नोव्हेंबर २०११चे पहाटेचे साडेपाच वाजले होते..... मगच भुंगा त्याच्या घरी गोरेगांवला पोचला.

हा झाला गीतासंबंधीचा छोटेखानी वृत्तांत...ज्याच्याशी मी प्रत्यक्षपणे निगडित होतो... आता ह्यातून मला काय फायदा झाला त्याबद्दल थोडेसे....
मी एक हौशी गायक आणि किंचित ’चाल’क आहे हीच माझी आजवरची खरी ओळख ...त्यामुळे आजवर कधीही सूर-ताल वगैरेचा फारसा विचार गांभीर्याने न करताच गात आलेलो आहे,चाली लावत आलोय .. त्यातूनही ताल तर अगदीच बेताल म्हणावा इतका माझ्याशी फटकून वागणारा...अशा परिस्थितीत संगीतकार योगेशने ह्या गीतगायनात मला सहभागी करून घेणे हेच खरे तर आधी माझ्यासाठी मोठे आश्चर्य होते आणि म्हणूनच नंतर ती एक मोठी जबाबदारी होऊन बसली...त्याचा परिणाम म्हणून मग त्याने पाठवलेले नमुना गीत मी हजारो वेळा ऐकलं आणि त्यामुळेच की काय मी ते गीत बर्‍याच प्रमाणात आत्मसात करू शकलो...मी इथे दोन गोष्टी नमूद करू इच्छितो..१)ह्या संपूर्ण गीतामध्ये माझ्या वैयक्तिक आवाजातली किमान अर्धी ओळ जरी समाविष्ट झालेली असेल तर ते माझ्या दृष्टीने खूप मोठे इनाम ठरेल.
२) ह्या गीत गायनाच्या निमित्ताने माझ्यातला तालाबाबतचा बराचसा (अजून पूर्णपणे म्हणता येणार नाही) न्युनगंड दूर झालाय असे मी म्हणेन...आणि त्याचे संपूर्ण श्रेय मी योगेशलाच देईन...त्याने मला ह्यात गायनाची संधी दिली नसती तर कदाचित असा बदल माझ्यात घडलाही नसता....म्हणूनच माबो शीर्षकगीतामुळे झालेला हा माझा सर्वोच्च फायदा आहे असे मी मानतो.

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा: पूर्ण गीत लवकरच ऐकायला मिळेल..तोवर ह्यावर समाधान माना.


झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलिंद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिकाची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

खोया खोया चांद, खुला आसमान...

रफीसाहेबांनी गायलेलं हे अजून एक सदाबहार गीत....काला बाजार सिनेमातलं आहे....माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक...त्याचा रूळ मिळाला आणि मीही आपलं नरडं साफ करून घेतलं...फक्त दोनच कडवी म्हणण्याइतका रूळ आहे त्यामुळे तेवढीच गायलेत....ऐका आणि सांगा हा प्रयत्न जमलाय की फसलाय?

१७ जानेवारी, २०१२

देव देव्हार्‍यात नाही....

’झाला महार पंढरीनाथ’ ह्या चित्रपटातील गदिमा रचित हे एक सुंदर गीत...ह्याची संगीतरचना केलेय सुधीर फडके आणि गायलंयलही त्यांनीच....माझ्या आवडत्या गीतांपैकी हे एक....प्रभाकर जोग ह्यांनी त्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेले हे गीत मी ऐकले आणि मग त्याचाच रूळ बनवून मीही माझा घसा साफ करून घेतला...ऐका आणि सांगा..हा प्रयत्न किती जमलाय/फसलाय?

१४ जानेवारी, २०१२

कोई सागर दिलको बहलाता नही...

शकील बदायुनी ह्यांची ही रचना, नौशादसाहेबांचे संगीत, रफीसाहेबांच्या आवाजातली ही एक अतिशय सुंदर आणि दर्दभरी गझल...माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हेही एक...जालावर ह्याचा रूळ सापडला आणि मग मलाही मोह आवरला नाही आपलं नरडं साफ करण्याचा....ऐका आणि तुम्हीच ठरवा...जमलाय की फसलाय हा प्रयत्न.


पुन्हा एकदा केलाय प्रयत्न...ऐकून सांगा...जमलाय की फसलाय?

शब्दावाचून कळले सारे......

कविवर्य मंगेश पाडगांवकरांचं गीत,पुलंचं संगीत आणि पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायलेले हे गीत माझ्या आवडत्या गीतांमधलं एक आहे....संजय देशपांडे ह्यांनी हेच गीत सतारीवर वाजवलंय....त्यांनीही अतिशय छान वाजवलंय ते...मूळ चाल न बदलता तरीही स्वत:चं असं काही तरी...त्यामुळे ते डोक्यात चटकन बसत नव्हतं...आमचं काय हो...आम्ही अभिषेकीबुवांनी जसं गायलंय तसंच गाण्याचा प्रयत्न करत असतो...त्यामुळे डोक्यात तेच सूर,त्याच जागा दिसत असतात...त्यामुळे ह्या सतारीवर वाजवलेल्या गीताचा रूळ बनवून गाण्याचा माझा प्रयत्न म्हणावा तेवढा यशस्वी होत नव्हता...त्यातून ते ठाय लयीत होतं...मग काय थोडी लय वाढवली आणि केला प्रयत्न....डोक्यात अभिषेकी आणि प्रत्यक्ष सतारीबरोबर...म्हटलं तर अगदी साधंच गायचंय...तेव्हा थोडाफार गोंधळ नक्कीच उडालाय..तरी आवडेल आपल्याला हा प्रयत्न असं वाटतंय...ऐका आणि आपणच ठरवा काय ते.

१३ जानेवारी, २०१२

दिवाना हुआ बादल...

काश्मीर की कली ह्या चित्रपटातील रफीसाहेब आणि आशाताईंनी गायलेलं हे सुंदर गीत...रफीसाहेबांचा मधाळ, अवखळ आणि नखरेल स्वर तर आशाताईंचा मधाळ आणि लाडिक आवाज..दोन्हीही एकमेकांना अतिशय पुरक असेच आहेत...आता हे गीत मी गायचे म्हणजे पीडाच की हो...माझ्या दृष्टीने नव्हे... मी काय वाट्टेल ते गाऊ शकतो. ;) ते मी तुम्हा श्रोत्यांच्या भूमिकेतून म्हणालोय मी. :ड पण काय करणार अशोक वायगणकरसाहेबांनी मेंडोलिनवर वाजवलेलं हे मस्त गाणं मिळालं...मग बनवला त्याचाच रूळ आणि धावडवली माझी गाण्याची एक्स्प्रेस..त्यावरून...अगदी सुसाट... आता इथे आलाच आहात तर ऐका हो... :)

ये है मुंबई, मेरी जान!

मंडळी खरं तर हे गाणं असं आहे...अय दिल है मुश्किल जीना यहॉं, जरा हटके , जरा बचके, मेरी बॉम्बे, मेरी जान! ... मोहम्मद रफी आणि गीता दत्तने गायलेलं आणि अतिशय गाजलेलं...लहानपणापासूनच माझंही आवडतं गाणं आहे हे...अशोक वायगणकरने माऊथ ऑर्गन आणि मेंडोलिनचा वापर करून हे गाणं मस्त वाजवलंय...मग मी त्याचाच रूळ बनवून माझी गाण्याची हौस भागवून घेतली....एक मात्र आहे...त्या बॉम्बेचे आता मुंबई असं अधिकृत नामकरण झालेलं असल्यामुळे मी ते ’मुंबई’ असंच सगळीकडे गायलंय...म्हणून शीर्षकही...ये है मुंबई, मेरी जान’ असंच दिलंय...गाणं ऐका आणि ठरवा कितपत जमलंय/फसलंय ते.

१२ जानेवारी, २०१२

है अपना दिल तो आवारा...

हेमंतकुमारच्या आवाजात गाजलेलं हे माझ्या लहानपणचं गीत...आज ते मला अशोक वायगणकरांनी माऊथ ऑर्गनवर वाजवलेलं मिळालं..मग काय त्याचाच रूळ बनवून मीही  माझी हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..जमलंय की फसलंय ते.

११ जानेवारी, २०१२

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई...

माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असा हा संत तुकारामांचा  अभंग श्रीनिवास खळेसाहेबांनी संगीतबद्ध केलाय आणि लतादिदींच्या सुरेल आवाजात आपण नेहमीच ऐकत असतो...प्रभाकर जोग ह्यांनी तो त्यांच्या गाणार्‍या वायोलिनवर वाजवलाय...मी आपला मग नेहमीप्रमाणेच त्याचा रूळ बनवून माझ्या गाण्याची हौस भागवून घेतली...आता कितपत जमलाय/फसलाय हे तुम्हीच ठरवा...ऐकून.

या डोळ्यांची दोन पाखरे

पाठलाग ह्या जुन्या चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील हे एक गाजलेले गाणे...संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेले मला मिळाले..मग काय त्यालाच रूळ बनवून मीही केला गाण्याचा प्रयत्न!

१० जानेवारी, २०१२

जे वेड मजला लागले...

सुधीर फडके आणि आशा भोसले ह्यांच्या आवाजातलं हे सुरेल युगुलगीत खरं तर मी एकटा कसा गाणार? पण ह्यात आशाताईंचा सहभाग अगदी कमी आहे(तरीही अतिशय मोहक असाच आहे)...तरीही मी तो  भाग नाईलाज म्हणून वाद्यासाठीच सोडून दिला...
संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेल्या ह्या गीताचा रूळ बनवून मी हे गीत गायलंय...ऐकून सांगा जमलंय/फसलंय का?

६ जानेवारी, २०१२

चौदवीका चांद हो...

माझ्या बालपणात बिनाका-मालावर लागणार्‍या त्या काळच्या सुप्रसिद्ध आणि अवीट गोडीच्या गाण्यांपैकी एक हे...चौदवीका चांद हो...मोहम्मद रफीने काय नखरेलपणे हे गाणे गायलंय...आज इतक्या वर्षांनी मला ह्या गाण्याचा रूळ सापडला आणि मग मीही माझं नरडं साफ करून घेतलं...मंडळी..एक सांगायचंच राहिलंय..मी तसा तालात मुळातच कच्चा आहे त्यामुळे ह्या गाण्याबरोबरच इतर गाण्यातही बरेचसे ’हलेडुले’ झाले असण्याची दाट शक्यता आहे..तेव्हा विनंती आहे की ज्यांना ताल कळतो त्यांनी इथे मी गायलेल्या गाण्यातल्या त्या चुका अगदी बिनधास्तपणे सांगाव्यात...नेमक्या जागा सांगितल्या तर अजूनच मदत होईल मला...असो,आता गाणं ऐका.


आधीच्या गाण्यात थोडी सुधारणा केली आहे...खरंच तशी ती झालेय का? ऐकून सांगा.

चांद सी मेहबुबा हो मेरी!

हिमालयकी गोदमे ह्या जुन्या चित्रपटातील मुकेश ह्यांच्या आवाजातले हे गीत त्याकाळी अतिशय लोकप्रिय असे होते...आज त्याचा रूळ सापडला आणि मीही त्यावर गायचा प्रयत्न केलाय...

४ जानेवारी, २०१२

एक धागा सुखाचा!

जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील ग.दि. माडगुळकर लिखित ,गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्या आवाजातील ’एक धागा सुखाचा’ हे गीत माझे अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे. संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेले हे गीत मिळताच मी त्याचा रूळ बनवून त्यावर आपलं नरडं साफ करून घेतलंय...ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय.

३ जानेवारी, २०१२

सुहानी रात ढल चुकी!

’सुहानी रात ढल चुकी’ हे मोहम्मद रफी ह्यांनी गायलेले गाणे माझे खूप आवडते आहे...कैक दिवसांपासून ते माझ्या नरड्यातून हवे तसे निघत नव्हते...अनायासे जालावर त्याचा रूळ मिळाला मग काय केला प्रयत्न...आज शेवटी एकदाचे बर्‍यापैकी जमलंय असं वाटतंय...ऐकून कसे ते आपणच ठरवा.

त्या फुलांच्या गंधकोषी!

सूर्यकांत खांडेकर ह्यांचे गीत,संगीत आणि आवाज हृदयनाथांचा..एक सुंदर गीत...हे सतारीवर वाजवलंय संजय देशपांडे ह्यांनी..मी त्याचाच वापर रूळ म्हणून करून माझी गाण्याची गाडी त्यावरून चालवलेय...ऐका आणि सांगा..कितपत जमलंय/फसलंय.

२ जानेवारी, २०१२

झिमझिम झरती श्रावणधारा!

मधुकर जोशी ह्यांचे शब्द,दशरथ पुजारी ह्यांचे संगीत आणि सुमनताईंचा आर्त आवाज...अजून एक वेड लावणारं गाणं...प्रभाकर जोगसाहेबांनी वायोलिनवर अतिशय सुरेल वाजवलंय...मग काय त्याचाच रूळ बनवून मीही माझी गाण्याची हौस भागवून घेतलेय...माझ्या आवाजात ती आर्तता नाही जाणवणार...जी सुमनताईंच्या आवाजात आहे..तरीही ऐकून सांगा...कसा वाटला प्रयत्न.

श्रावणात घन निळा बरसला!

’श्रावणात घन निळा बरसला’ कविवर्य मंगेश पाडगांवकरांचे शब्द,खळेसाहेबांची चाल आणि लतादिदींचा आवाज...असा त्रिवेणी संगम साधला गेलेले हे गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे...हेच गीत प्रभाकर जोग ह्यांनी त्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलंय...जोगसाहेबांनी हे गीत त्याची लय वाढवून वाजवलंय...म्हणून मी त्याची लय कमी करून मूळ गीताच्या लयीशी मेळ खाईल अशी ठेवलेय...खरंतर,हे गीत माझ्यासारख्याच्या भसाड्या आवाजासाठी मुळीच नाहीये ह्याची मला पूर्ण कल्पना आहे..तरीही हे गीत मला खूप आवडते म्हणून जसे जमेल तसे गायचा प्रयत्न केलाय...मूळ गीताशी त्याची तुलना होणे शक्यच नाही आणि कुणी करूही नये..तेव्हा मी निदान दोन-पाच टक्के जरी व्यवस्थित गाऊ शकलो असे आपणास वाटले तरी केलेला प्रयत्न सार्थकी लागला असे वाटेल...तर ऐका...खरंच सांगतो..हे गीत माझ्या आवाजात ऐकायला सिंहाची छातीच हवी. :D
नवीन वर्षातले माझे हे तिसरे रूळ-गायन आहे

विसरशील खास मला!

प्रभाकर जोग ह्यांनी वायोलिनवर वाजवलेल्या ’विसरशील खास मला’ ह्या गीताचा रूळ वापरून मी ते गाणं गायलंय...ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय ते.