माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१९ मे, २००८

कधी बहर कधी शिशिर!

’यशवंत देव’ हे मराठी सुगम संगीतातले एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या आजवरच्या सांगीतिक वाटचालीबद्दल लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक कथनाचे शीर्षक आहे ’कधी बहर कधी शिशिर.’

देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ चा.त्यांचे वडील हुशार,चतुरस्र आणि कर्तबगार होते. ते विद्वान तसेच अनेक कलानिपुणही होते. त्यांना गाण्याचाही नाद होता. गाता गळा जरी नसला तरी कान मात्र तयार होता. सतार, पेटी आणि तबला ते तयारीने वाजवत असत.त्यांच्याच तालमीत देवांचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. घरात मोठमोठ्या कलाकारांचे येणेजाणे असल्यामुळे त्यांची गाणी ऐकत ऐकतच देव मोठे झाले. तसंच त्यांच्याकडे असलेल्या फोनोवर तबकड्या ऐकूनही त्यांना रागसंगीतातल्या बर्‍याचशा चिजा पाठ झाल्या होत्या.

बालपणात जरी रागसंगीत आणि नाट्यसंगीताचे संस्कार त्यांच्यावर झाले तरी पुढे जी.एन जोशी,जे.एल रानडे आणि गजाननराव वाटवे इत्यादी गायकांची सुगम गायकीच त्यांना आवडू लागली आणि भविष्यात तेच आपले कार्यक्षेत्र असावे असे त्यांच्या मनाने घेतले.

देवांनी आपल्या संपूर्ण सांगीतिक कारकीर्दीत रेडिओ,दूरदर्शन, नाटक,चित्रपट,संगीतिका,नृत्यनाटिका अशा विविध माध्यमात कामं केली आणि त्यात नावाप्रमाणेच ते ’यशवंत’झाले. आठवणी आणि किश्श्यांच्या स्वरूपात असलेले हे आत्मचरित्र निश्चितच वाचनीय आहे आणि ते खुद्द त्यांच्या शब्दातच वाचणे रंजक होईल.

ठाण्याच्या ’अनघा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकाची किंमत आहे रु. १६०/-