माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

४ ऑक्टोबर, २००६

गज़लनवाज़!
दादर आले. नेहमीप्रमाणे मी उठून माझी जागा समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला दिली.(ऑफिसला जाताना मालाड ते चर्चगेट असा प्रवास न करता नेहमीच मालाड-बोरिवली चर्चगेट असा प्रवास करावा लागत असे.) मनांतल्या मनात काही विचारचक्र चालू होते. त्या तशाच अवस्थेत सहज म्हणून लक्ष गेले आणि जाणवले त्या व्यक्तीचे ते वळणदार आणि सुरेख अक्षर. त्याचे डायरी चाळणे चालू होते आणि दिसणार्‍या प्रत्येक पाना-पानावर त्या सुरेख अक्षरामध्ये काही कविता लिहिल्या असाव्यात असा अंदाज आला. त्या अक्षरांनी मला जणू संमोहित केले होते त्यामुळे एकटक मी तिथेच बघत होतो. डायरी चाळता चाळता त्याने पहिले पान उघडले आणि (पुसटसे) मला काही तरी नाव वाचता आले. त्या नावाचा संदर्भ लावण्यात माझे मन गुंतले असताना माझे लक्ष आता त्या व्यक्तीकडे गेले(इतका वेळ ते डायरीतच गुंतले होते) आणि कुठे तरी दिवा पेटला. ह्या व्यक्तीला आपण कुठे तरी पाहिलेले आहे. कुठे बरे?

गाडीच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने माझा मेंदू काम करत होता आणि एका नावावर त्याने शिक्कामोर्तब केले. त्या व्यक्तीकडून त्या गोष्टीची शहानिशा करावी असे वाटत होते पण मन कच खात होते. असे अचानक ओळख पाळख नसताना (कुणीसं म्हटलंय 'ओळख ना पाळख आणि माझे नाव टिळक') कोणालाही आपण अमुक अमुक तर नव्हे ना? असे विचारणे प्रशस्त वाटेना.
पण मन शांत बसू देईना त्यामुळे सगळा धीर एकवटून मी त्यांना प्रश्न केला.
"आपणच 'भीमराव पांचाळे' आहात काय?"(ह्यांना मी ह्या आधी जवळ जवळ १० वर्षापूर्वी दूरदर्शनवर एका कार्यक्रमात दोन गीते सादर करताना पाहिले होते)
त्यांना एकदम धक्काच(सुखद असावा) बसला.
ते अतिशय नम्रपणाने ते उद्गारले,"होय, मीच भीमराव पांचाळे. आपली ओळख?"
मी म्हणालो,"एक रसिक श्रोता. माझे नाव सांगून आपल्याला कोणताही बोध होणार नाही."(तरी आग्रहास्तव नाव सांगितले)
त्यांचा पुढचा प्रश्न. "तुम्ही मला कसे ओळखले?मी एव्हढा काही प्रसिद्ध माणूस नाही."
मी: आपल्या डायरीतले 'पांचाळे' हे एव्हढेच मला पुसटसे दिसले आणि माझ्या माहितीप्रमाणे(आठवणीप्रमाणे) हे आडनाव मी एकदाच ऐकलेले होते. त्यानंतर माझे लक्ष आपल्याकडे गेले आणि थोडा डोक्याला ताण दिल्यावर लक्षात आले की काही वर्षापूर्वी आपल्याला दूरदर्शनवर गाताना पाहिले होते.

माझे उत्तर ऐकून ते चकितच झाले आणि म्हणाले, "इतक्या वर्षानंतर एव्हढ्या क्षुल्लक गोष्टीवरून तुम्ही असा निष्कर्ष (योग्य)काढू शकता म्हणजे कमाल आहे तुमची."
मी: "अहो अंदाजाने एक दगड मारला आणि तो नेमका लागला त्यात काय कमाल?"

असो. तर मित्रहो ही माझी गज़लनवाज़ भीमराव पांचाळे ह्यांच्याशी झालेली पहिली भेट! पुढे आमच्या नेहमीच भेटी होत गेल्या आणि त्याचे मैत्रीत रुपांतर झाले(हा त्यांचा मोठेपणा). आतापर्यंत मला 'गज़ल' म्हणजे काय? हे देखील माहिती नव्हते ते त्यांनी समजावून सांगितले. माझा असा एक गैर(गोड म्हणा)समज होता की गज़ल ही फक्त उर्दूमध्येच लिहिली जाते आणि अर्थ समजायला जरा कठीणच असतो. तसेच मयखाना,इष्क,मोहोब्बत,वगैरे वगैरे शब्दांची लयलूट केली की झाली गज़ल. पण त्यांनी मला समजेल अशा भाषेत स्पष्टीकरण केले आणि मराठीत देखिल गज़ल कशी आणि केव्हापासून लिहिली जात आहे. तसेच आता नवोदित गज़लकार देखिल कशा ताकदीने लेखन करत आहेत ह्याबद्दलची माहिती दिली. एव्हढेच नव्हे तर स्वतःच्या काही ध्वनिफिती देखिल स्वाक्षरी करून मला भेट म्हणून दिल्या. ह्या सर्व गोष्टीनी मी तर भारावूनच गेलो.

भीमरावांनी दिलेल्या ध्वनिफिती केंव्हा एकदा ऐकतोय असे झाले होते. त्यामुळे घरी गेल्या गेल्या कपडे न काढताच मी माझा मोर्चा टेपरेकॉर्डरकडे वळवला. पत्नीला आश्चर्य वाटले. तिने विचारले देखिल, पण मी तिला फक्त 'ऐक' अशी खूण केली. टेपरेकॉर्डर चालू झाला आणि एक मुलायम आणि हळुवार आवाजातली तान कानावर पडली आणि अंगावर रोमांच उभे राहिले. गाणं सुरू झालं आणि त्यांच्या स्वरातली जादू माझ्यावर आपला प्रभाव दाखवू लागली. पत्नीने कॉफी आणली तरी मी त्या सुरांमध्येच गुरफटलो होतो.
त्या गज़लचे शब्द होते.... 'घर वाळूचे बांधायाचे,स्वप्न नव्हे हे दिवाण्याचे.'
गज़ल संपताच पत्नीने टेरे बंद केला आणि विचारले, "कोण हो हे? काय मस्त आवाज आहे?"
आधीचा वृत्तांत मी तिला सांगितला होताच पण भीमरावांचे गाणे तिने ऐकलेले नसल्यामुळे तिला हा प्रश्न पडणे साहजिकच होते. मग मी तिला (आज) गाडीत घडलेली हकीकत सांगितली .
ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "एव्हढ्या मोठ्या माणसाने तुम्हाला अशी भेट दिली म्हणजे तुम्ही पण ग्रेटच दिसता! नशीबवान आहात!"
मी म्हटले,"आहेच मुळी! ही भेट माझ्यासाठी लाखमोलाची आहे आणि दुधात साखर म्हणजे तुझ्यासारखी रसिक बायको पण आहे जोडीने ऐकायला आणि तो आनंद वाटून घ्यायला!"

मग काय म्हणता! आमची श्रवणभक्ती सुरू झाली. मी तर त्यांच्या सुरेलपणात हरवून जात असे. अहो गज़लेत शब्दांना जास्त वजन असते हे माझ्या गावीच नव्हते. माझे सर्व भान त्या सुरेलपणात, पण माझी पत्नी अतिशय रसिकतेने त्यातल्या शब्दांची कलाकुसर अनुभवत असायची. मी आणि ती दोघेही एकाच वेळी दाद देत असू; पण तिची दाद शब्दांना असायची आणि माझी सुरांना. हे तिने माझ्या लक्षात आणून दिले आणि मला म्हणाली,"जरा शब्दांकडे लक्ष द्या. किती अर्थपूर्ण शेर आहेत बघा"....'ज़खमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने, 'तो'
मोगरा असावा!'
माझ्यासाठी हा नवाच अनुभव होता. कारण? सांगतो. काय आहे की माझी पत्नी(मराठीच आहे) इंग्लिश माध्यमात शिकलेली. इंग्रजी कथा-कादंबर्‍या,इंग्लिश गाणी(मायकेल जॅक्सन बिक्सन)ह्यांची आवड असलेली आणि मी पूर्णपणे मातृभाषेत शिकलेला,आपल्या संस्कृतीचा अभिमान वगैरे बाळगणारा‌. अहो मला एव्हढा धक्का(सुखद)बसला म्हणता? पण तिच्या बोलण्यात दम होता हे मान्य करावेच लागेल. कारण मी गज़ल ऐकत होतो, ख्याल ऐकत नव्हतो हे तिने मला लक्षात आणून दिले आणि त्या दिवसानंतर भीमरावांना ऐकताना माझा आनंद द्विगुणित होत गेला. मला हे कळायला लागले की ते नुसते सुरेल गातच नाहीत तर त्या गज़लेचा अर्थ ओतप्रोतपणे आपल्या पर्यंत पोहोचवतात. मला जणू आनंदाचा गाभा सापडल्यासारखी माझी अवस्था झाली. मी त्यांचा 'पंखा'च झालो.

आतापर्यंत मी तीन भीमांचा भक्त होतो. एक, साक्षात बलभीम(मधला पांडव) दोन, भीमराव(बाबासाहेब) आणि तीन, भीमसेन(स्वरभास्कर). आणि आता त्यात ह्या चौथ्या भीमाची(गज़लनवाज़) भर पडत होती. खरे पाहायला गेले तर भीमराव(गज़लनवाज़) शरीराने किरकोळ,आवाज मृदू मुलायम,वागणं विनम्र. म्हणजे भीम ह्या शब्दार्थाचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे मला प्रश्न पडला ह्या मुलाचे नाव त्याच्या माता-पित्यांनी भीम का बरे ठेवले असेल. पण जेव्हा भीमरावांचे मराठी गज़ल
( गायन,प्रसार आणि प्रचार)बद्दलचे उदंड प्रेम,आस्था आणि भक्ती बघितली आणि अखंडित ३० वर्षाहूनही जास्त काळ केलेले कार्य बघितले की लक्षात येते की बहुधा त्यांना ह्या मुलाचे भविष्य माहीत असावे. ह्या कार्यानेच त्यानी भीमराव हे नाव सार्थ केले आहे. मी तर त्यांना मराठी गज़ल क्षेत्रातला धृवतारा च म्हणेन. गज़लसम्राट सुरेश भटांनी भीमरावांच्या ह्याच गुणांवर खूश होऊन त्यांना "गज़लनवाज़" अशी उपाधी दिली.
कोणत्याही बुजुर्ग गायकाला ऐकायचे असेल तर ते मैफिलीतच, असे जाणकार लोक म्हणतात. ध्वनिमुद्रिका अथवा ध्वनिफितीमधील त्यांचे गाणे म्हणजे सिनेमाच्या भाषेत म्हणायचे तर 'ट्रेलर' आणि मैफिलीतील गाणे म्हणजे संपूर्ण सिनेमा होय.
भीमरावांच्या बाबतीत तीच गोष्ट माझ्या अनुभवाला आली. ध्वनिफितीतील गज़ल ऐकून मी नादावलो होतोच. आणि जेव्हा पहिली मैफल ऐकायचा योग आला तेंव्हा मी हरखूनच गेलो. एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखे ते रसिकांकडून वाहवा!वाहवा! चे मुजरे घेत घेत मैफिल सजवत होते. एकेका शेरचा भावार्थ निरनिराळ्या तर्‍हेने गाऊन दाखवत आणि त्याला अनुलक्षून अजून काही(तोच भाव व्यक्त करणारे) शेर पेश करत होते. मित्रांनो ह्या सर्व गोष्टी शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. त्यासाठी त्यांच्या मैफिलीतच शरीक व्हायला पाहिजे. मला खात्री आहे माझ्यासारखेच कैक लोक त्यांचे पंखे असतील आणि त्यांचा अनुभव देखिल असाच असेल. ज्यांनी अजूनपर्यंत हा अनुभव घेतला नसेल त्यांनी तो जरूर घ्यावा आणि माझ्या बोलण्याची प्रचिती घ्यावी.

ह्या गज़ल गायनाच्या कार्यक्रमाबरोबरच ते गज़ल लेखनाच्या कार्यशाळा,मुशायरे असे कार्यक्रम आयोजित करतात. नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'गज़ल सागर प्रतिष्ठान' ची स्थापना केली आहे. बाबा आमटे ह्यांच्या आनंदवन च्या मदतीसाठी देखील काही कार्यक्रम सादर केले आहेत‌. सर्वार्थाने गज़लमय झालेल्या,गज़ल ज्याच्यावर प्रसन्न झाली आहे अशा ह्या अवलियाला भविष्यात त्याने योजलेल्या सर्व योजना सफल होवोत अशा शुभेच्छा व्यक्त करुन इथेच थांबतो

२ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

तुमच्यामुळे माझा भीमराव पांचालांशी परिचय झाला. त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय.... पण त्यांना ऐकायचा योग मात्र अजून आला नाही. गझलनवाजांशी ओळख करुन दिलीत........आभार!!

धोंडोपंत म्हणाले...

वा वा वा वा,

अतिशय सुंदर पंत. क्या बात है. फारच आवडला लेख.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत