माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

'दिल्लीवर स्वारी!'भाग १

नमस्कार मंडळी. बंगलोर, मद्रास नंतर आपण आता जाणार आहोत दिल्ली दौर्‍यावर. ही दिल्लीवारी खरे तर बंगलोर(१९७३) आणि मद्रास (१९७७) ह्यांच्या मधल्या काळात म्हणजे १९७५ साली मी माझ्या काही जुन्या शाळकरी मित्रांबरोबर केली होती. तर आता ऐका त्याबद्दलची गंमत.

माझा एक शाळकरी वर्गमित्र नेमीचंद हा राजस्थानी जैन. तो माझ्यापेक्षा ३-४ वर्षाने मोठा होता. त्याचे लग्न देखील झाले होते आणि आता त्याच्या धाकट्या भावाच्या, लखीचंदच्या लग्नाला त्याने आम्हा सर्व खास मित्रमंडळीला बोलावले होते. लग्न राजस्थानातील एका खेडेगावात. तिथे जाण्याच्या तिकिटभाड्याचे पैसे त्यानेच भरले आणि आम्ही ६-७ मित्र त्याच्या घरच्या ४०-५० मंडळींबरोबर तिथे जायला निघालो. निघायच्या अगोदर आम्ही ३-४ मित्रांनी असे ठरविले होते की आपण लग्न आटोपल्यावर तिथूनच दिल्लीला जाऊ आणि आसपासचा परिसर पाहून दिल्लीहूनच परतीची गाडी पकडू. आम्ही राजस्थानला जायला निघालो तेव्हा फेब्रुवारी जवळ जवळ संपत आलेला होता. त्यामुळे थंडी वगैरेचा प्रश्न नव्हता आणि म्हणून दिल्लीला जायला हरकत नाही असे सर्वांचेच मत पडले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व वर्‍हाडी एका खास आरक्षित रेल्वे डब्यातून राजस्थानला निघालो. अंगात तरुणाईची मस्ती असल्यामुळे एकमेकांची टिंगलटवाळी,फिरक्या घेणे वगैरे चालू होते. लखीचंद आणि नेमीचंद आमच्यात अधून-मधून सामील होत असत. तसेच त्यांची समवयस्क चुलत-मावस-मामे-आते वगैरे भावंडे आमच्यात थट्टामस्करी करण्यासाठी सामील होत. ह्यातील काहींची नवीनच लग्ने झालेली होती म्हणून मधून-मधून आपल्या गृहलक्ष्मीला भेटून येत. प्रवास रात्रीचा होता पण आमच्या साठी मात्र ती रात्र नव्हतीच. प्रत्येकाला बोलण्याचा इतका सोस होता की किती बोलू आणि किती नको अशीच सगळ्यांची परिस्थिती झाली होती. शाळा सोडल्यानंतर जवळ-जवळ ७वर्षांनी आम्ही असे सगळे एकत्र जमलो होतो त्यामुळे इतक्या वर्षांच्या गप्पा साठलेल्या होत्या आणि ह्या गप्पाष्टकामुळे कुणालाच झोप येत नव्हती‌. संपूर्ण प्रवास आम्ही डोळे टकटकीत उघडे ठेवूनच केला‍. झोपेचे नाव सुध्दा येऊ दिले नाही. दुसर्‍या दिवशी दुपारी आम्ही त्याच्या गावाला पोहोचलो. तिथे जाई पर्यंत जेवणाची वेळ झाली होती आणि तिकडचे लोक जेवण तयार ठेवूनच आमची वाट पाहात होते. गेल्या-गेल्या हात-पाय धुऊन जेवायला बसवले. भुकेच्या पोटी दोन घास जरा जास्तच गेले आणि मग जिचा इतका वेळ विसर पडला होता ती 'झोप' आली आणि आम्ही तिच्या स्वाधीन कधी झालो कळले सुध्दा नाही.


नेमीचंद आम्हाला उठवायला आला तेंव्हा संध्याकाळचे ६वाजले होते आणि वातावरणात गारवा जाणवत होता. आम्हाला खरे तर उठावेसे वाटत नव्हते; पण आम्ही त्या गावचे पाहुणे होतो आणि आमच्या बरोबर चहा-पाणी घेण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी खोळंबली आहेत असे कळले म्हणून नाइलाजाने उठावे लागले. हे सर्व आम्हाला अगोदर माहीतच नव्हते. वर्‍हाडाबरोबर काही खास नवर्‍या-मुलाची मुंबईकर मित्रमंडळी येणार आहेत तेव्हा त्यांचे आगत-स्वागत मोठ्या इतमामातच झाले पाहिजे हा तिकडचा जणू अलिखित कायदा होता असे काहीसे असावे त्यामुळे आम्हाला तिथे फार सन्मानाने वागवले जात होते. आमच्या ६-७ जणांसाठी एका प्रशस्त माडीवर राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. गुबगुबीत गाद्या-गिरद्या,अतिशय सुबक अशा रजया. तसेच खास राजेशाही खुर्च्या वगैरे सरंजाम बघितला आणि आम्ही वेडावूनच गेलो. अहो आम्ही सर्व कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसं होतो. आम्ही ह्या गोष्टी फक्त सिनेमातच बघितल्या होत्या आणि इथे साक्षात त्या सर्वांचा उपभोग घेण्याचे सुख आम्ही अनुभवत होतो;अशाने माणूस वेडावणार नाही तर काय? ह्या वेडात भर म्हणून की काय अजून एक गोष्ट घडली. राजस्थानातच नाही तर एकूणच उत्तर हिंदुस्थानात (हिंदी भाषिक पट्टा म्हणूया) 'भांग' सेवनाचे बरेच प्रस्थ आहे. आपल्याकडे जसे घाटावरचे लोक तोंडात दाढेखाली तंबाखूची गोळी ठेवतात तशीच इथली बरीच मंडळी भांगेची गोळी तोंडात ठेवतात. काहीजण थंडाईच्या स्वरूपात घेतात. जसजशी सवय वाढते तसतशी गोळ्यांची(सेवनाची) संख्या वाढते. आणि त्यातच मोठेपणा मानण्याची सवय लागलेली. त्यावर पैजा देखील लागतात... एका वेळी जास्त गोळ्या कोण खातो म्हणून.

तर असेच काही भांगेकस तरुण आम्हाला भेटायला आले. बोलता बोलता भांगेच्या गोळ्यांचा विषय निघाला. मग कोण किती गोळ्या पचवतो ह्यावर थापा-गप्पा झाल्या. मग हळूच एकाने पिलू सोडले. तुमच्यापैकी कोणाची आहे काय हिंमत आमच्या बरोबर स्पर्धा करायची? ह्यात भर घालायला नेमीचंदची काही चुलत-मावस भावंडे देखिल होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १-२ गोळ्यांनी काहीच होत नाही. ३-४ तरी घ्यायला पाहिजे तेव्हाच खरी मजा येते. मी ह्या सर्व भानगडींपासून पहिल्या पासूनच चार हात दूर होतो त्यामुळे मैदानात राहिले ६ मित्र आणि एक आमच्या बरोबर खास मुंबईहून लग्नाचे फोटो काढण्यासाठी आणलेला छायाचित्रकार(हा नेमीचंदचा कौटुंबिक छायाचित्रकार) असे सात जण. त्या सगळ्यांनी ते आव्हान स्वीकारले. ह्यातले काही पट्टीचे 'पिणारे' होते. त्यांना वाटले आपण 'ते' पितो त्यापुढे 'ह्याची' काय मातब्बरी.
मी आपला सगळ्यांना समजावत होतो की, बाबांनो असं काही करू नका. तुमच्या ह्या अशा करण्यामुळे आपल्या सर्वांची बदनामी होईलच पण आपल्या मित्राच्या वडिलांची सुध्दा नाचक्की होईल(ह्या गावात ते अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जायचे). आपण इथे लग्नाला पाहुणे म्हणून आलो आहोत ह्याचे भान ठेवा आणि हे रंगढंग आपापल्या घरी गेल्यावर करा.
पण माझे कोणीच ऐकेना. हा कार्यक्रम दुसर्‍या दिवशी सकाळी करायचे त्या सगळ्यांनी ठरवले. गोळ्यांचा बंदोबस्त ते गाववाले करणार होते. रात्री जेवणाच्या वेळी ही गोष्ट मी नेमीचंदच्या कानावर घातली म्हणून त्याने ही सर्वांना समजवायचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. मित्रांनी त्याचे बोलणे थट्टेवारी नेले आणि ’तसे काही होणार नाही, उगीच घाबरू नकोस’ वगैरे मुक्ताफळे उधळली.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नवर्‍या मुलाची घोडीवरून वरात निघून ती नवरीच्या घरी जायची होती आणि त्यात आमची उपस्थिती अत्यंत आवश्यक होती. ह्या वरातीच्या वेळी आम्ही हजर राहायचे आहे हे आम्हाला त्याच्या वडिलांनी बजावून सांगितले. आम्ही सर्वांनी होकारही भरला होता. सकाळी नास्त्याचे वेळी ह्या सर्वांनी तिथे असणार्‍या वडील मंडळींचा डोळा चुकवून, कुणी एक,कुणी दोन तर कुणी तीन अशा गोळ्यांचे सेवन केले. नंतर दुपारच्या जेवणापर्यंत काहीच कार्यक्रम नव्हता म्हणून आम्ही माडीवर परत आलो. तास दोन तास मंडळी गप्पा मारण्यात रंगली आणि बोलता बोलता एकेक जण झोपायला लागला‍. जेवणाची वेळ झाली तरी कोणी उठवूनही उठेना म्हणून मग मी एकटाच जेवायला गेलो. मला बघितल्यावर नेमीचंदच्या वडिलांनी बाकीचे कुठे आहेत म्हणून विचारले. ते येतातच आहेत असे सांगून मी नेमीचंदला शोधायला पळालो. तो सापडल्यावर मी त्याला झाला प्रकार सांगितला. नेमके काय झाले असावे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने ७-८ ताटे भरून परस्पर माडीवर पोहोचवायला सांगितली. आम्ही दोघे माडीवर आलो आणि पुन्हा ह्या सर्वांना उठवायचा प्रयत्न केला पण कोणी उठेचना. ताटं तशीच झाकून ठेवली आणि आम्ही दोघे जेवायला खाली गेलो.

जेवण उरकून तासाभरानं आम्ही दोघे परत आलो. त्यांना उठवायचा प्रयत्न केला. जेमतेम ते उठले,कसे तरी अन्न पोटात ढकलले आणि पुन्हा झोपले. नेमीचंदने कपाळावर हात मारून घेतला, म्हणाला, कशाला मी ह्यांना बोलावले असे वाटतंय. आता माझ्या वडिलांना हे कळले तर एकेकाला हंटरने फोडतीलच आणि बरोबर मलाही चोपतील. निदान संध्याकाळी वराती पर्यंत शुध्दीवर आले तर नशीब म्हणायचे.
विषण्ण मनाने तो निघून गेला आणि मी त्या कुंभकर्णांच्या सहवासात एकटा पडलो. काय करावे मला सुचेना. वेळ जात नव्हता. कोणी उठण्याचे नाव घेत नव्हते. वाट बघण्या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नव्हते.बर्‍याच वेळाने एकजण हालचाल करू लागला. हा पद्या होता. माझा वर्गमित्र दिन्याचा धाकटा भाऊ. त्याने एकच गोळी खाल्ली होती. उठल्या उठल्या तो रडायला लागला. मला कळेना हा रडतोय का? मी त्याला विचारलं तर तो सांगायला लागला, मला आईची आठवण येतेय! आणि मोठमोठ्याने आईला हाका मारायला लागला, मम्मी तू खंय असा? मम्मी तू खंय असा?

हा प्राणी गोंयकार होता आणि एरवी मराठीत बोलणारा हा कोंकणी बोलत होता(घरी कोंकणीच बोलतात). मी त्याला समजावून सांगतोय, अरे बाबा, आपण इथे राजस्थानात लखीचंदच्या लग्नाला आलोत,इथे तुझी आई कशी येणार?
पण एक नाही आणि दोन नाही. ह्याचे आपले रडगाणे सुरूच, मम्मी तू खंय असा?
ही रडारड ऐकून 'सुध्या'(२गोळ्या) जागा झाला. मला जरा बरे वाटले. चला एक माणूस तरी मदतीला आला. पण कसले काय आणि कसले काय! तो उठला तो हसायलाच लागला. हसत हसत काही तरी असंबध्द बोलत होता. मी त्याला गदगदा हालवले आणि म्हटले, अरे सुध्या, लेका हसतोस काय? हा पद्या बघ रडतोय आईची आठवण काढून. तू जरा त्याची समजूत घाल. सांग त्याला जरा वस्तुस्थिती समजावून सांग!
त्यावर तो पुन्हा हसायला लागला आणि पद्याकडे बघून जोरजोरात हसत हसतच ओरडू लागला, पद्याची आई नाही, पद्याची आई नाही!
ह्यामुळे पद्या अजून पिसाळला आणि रडू लागला आणि सुध्या टाळ्या वाजवत हसू लागला.

आता मला (एकही गोळी न घेता) गरगरायला लागले. कळेना ह्या लोकांबरोबर मी का आणि कसा आलो. वाटले हे झोपले होते तेच बरे होते . आता झोपलेत त्यांनी असेच झोपून राहावे म्हणून मी जोरजोरात अंगाईगीत गायला लागलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: