माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ३

आम्ही आमच्या इच्छीत स्थळी पोहोचलो. तिथल्या मुख्य अधिकार्‍याला भेटून आमचा परिचय दिला. त्यानेही हसून आमचे स्वागत केले. चहा-पाणी झाल्यावर आमची राहण्याची व्यवस्था केली आणि एका सद्गृहस्थाबरोबर आमची निवासस्थानी पाठवणी केली.

आमची राहण्याची व्यवस्था एका वसतिगृहामध्ये केली होती. आम्हाला दिलेली खोली चांगली प्रशस्त आणि हवेशीर होती. दोन पलंग, दोन टेबल-खुर्च्या वगैरे सर्व जामानिमा व्यवस्थित होता. पण गंमत अशी होती की पलंगावर गाद्या नव्हत्या. आम्ही त्या सद्गृहस्थाला त्यासंबंधी विचारले त्यावर तो म्हणाला , इथे कोणी कायम स्वरुपी कारभारी आणि नोकर नसल्यामुळे आम्हाला हे वसतिगृह व्यवस्थित चालवता येत नाही. म्हणून खराब होऊ शकतील अशा गोष्टी(गाद्या,चादरी वगैरे) आम्ही पुरवत नाही. पण तुम्ही काळजी करू नका . इथे जवळच बाजार आहे. तिथला दुकानदार ह्या सर्व गोष्टी भाड्याने पुरवतो.
आम्ही त्याचे आभार मानले आणि त्याला रजा दिली.

हे वसतिगृह एक मजली होते. आम्हाला वरच्या मजल्यावरची एकदम टोकाची खोली मिळाली होती. प्रत्येक मजल्यावर १२-१२ खोल्या होत्या आणि प्रत्येक मजल्यासाठी ६ न्हाणीघरं-६ संडास अशी व्यवस्था होती. ही व्यवस्था आमच्या खोलीपासून दुसर्‍या टोकाला होती. आम्ही पटापट आन्हिकं उरकून घेतली आणि दुसरे कपडे चढवून बाहेर पडलो. त्या वसतिगृहाच्या तळमजल्यावर एक दवाखाना होता आणि पुढच्या आवारात छानशी हिरवळ राखली होती. त्या वसतिगृहाच्या बाहेर जाताना सगळ्या खाणाखुणा नीट बघून घेतल्या आणि मगच बाहेर पडलो. एकेक गोष्ट बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो तेव्हढ्यात एक छोटेसे उपाहारगृह दिसले. मी पुढे जाऊन नीट चौकशी केली(शाकाहारी की मांसाहारी ह्याची) आणि आम्ही आत शिरलो. आमची जोडी किती विजोड होती हे अगोदरच सांगितले आहे पण आता लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघून मला त्याची प्रकर्षाने पुन्हा-पुन्हा जाणीव होत होती. आमची वेषभूषा आणि अवतार परस्परविरोधी होते. माझ्या अंगात बिनकॉलरचा, पट्ट्यापट्ट्यांचा, अर्ध्या बाह्यांचा टी शर्ट(काही लोक ह्याला बनियन सुद्धा म्हणतात),घट्ट विजार,केस मानेपर्यंत वाढलेले,गळ्यात शबनम पिशवी(ह्यात चश्मा,चाव्या,काड्यापेटी-मेणबत्ती,विजेरी,सुई-दोरा,चाकू वगैरे) आणि पायात कोल्हापुरी चपला. चिंटूचा थाट काही न्याराच होता. पूर्ण हातांचा चौकडीचा शर्ट,त्यावर काळे जाकीट,खाली जीन पँट,पायात हंटर शूज,केस अस्ताव्यस्त,हातात की-चेन(ती अशी फिरवत फिरवत चालण्याची लकब) आणि चेहर्‍यावर मग्रुरी. ह्या सर्व गोष्टींमुळे आम्ही जाऊ तिथे लक्ष वेधून घेत असू. आम्ही स्थानापन्न झाल्यावर मसाला डोसा आणि फिल्टर कॉफी मागवली. एकूण पदार्थ बरे होते पण तितकी मजा नाही आली. कशी का होइना भूक भागली हेही नसे थोडके असे मनातल्या मनात म्हणत पैसे देऊन बाहेर आलो.

आता हळू हळू संध्याकाळ होऊ लागली होती म्हणून पहिल्यांदा त्या गादीवाल्याचा शोध घेतला‍. तसे जास्त शोधावे लागले नाही कारण त्या भागातील तो एकमेव गादीवाला होता. आणि एका माणसाने तर चार पावले आमच्या बरोबर चालून त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचवले. आम्ही त्याचे आभार मानून दुकानात शिरलो. दुकानदाराला गादी-भाडे वगैरे बद्दल विचारले आणि त्याला आमच्या पत्त्यावर दोन गाद्या पोहोचवायला सांगितले. तशी त्याने आम्हाला थांबवले आणि जमीनीवर दोन गाद्या पसरल्या. मग त्याने आम्हाला त्यावर झोपून बघण्याची विनंती केली. आम्हाला हे सगळे विचित्र वाटले म्हणून आम्ही त्याला सांगितले की आम्हाला दोन्ही गाद्या पसंत आहेत . पण त्याचे समाधान होईना म्हणून त्याने त्याच्या नोकराला त्यावर झोपवले. इकडून तिकडे लोळायला लावले. मग त्या नोकराने जेव्हा सांगितले की गाद्या ठीक आहेत तेंव्हा त्या दुकानदाराने मला पुन्हा झोपायची विनंती केली पण मला प्रशस्त वाटेना. बाजूलाच एक महिला गादी घेण्यासाठी आली होती तिने देखिल आम्हाला तसेच सांगितले पण आम्ही त्या गोष्टीला नकार दिला.आम्हाला विचार करायला वेळ देऊन त्याने एक गादी त्या महिलेसाठी अंथरली आणि आश्चर्य म्हणजे ती महिला आम्हा सर्व पुरुषांसमोर सहजपणे त्या गादीवर आडवी झाली. मग मात्र माझा संकोच मिटला आणि मी पण लोळून घेतले आणि त्या दुकानदाराचे समाधान केले. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी पुन्हा असला प्रसंग कधीही अनुभवला नाही.

आम्ही वसतिगृहावर परत आलो तेंव्हा चांगलाच काळोख झाला होता. आवारातले दिवे लागले होते आणि तिथेच पायर्‍यांवर ३-४ लुंगीधारी बसले होते. त्यांच्या हातात कसल्याशा छोट्या पुस्तिका होत्या आणि त्यात बघून त्यांची आपापसात चर्चा चालली होती. आमची चाहूल लागली तशी त्यातला एक जाडजूड लुंगीधारी चटकन उभा राहिला आणि आमच्या कडे बघून ’वणक्कम!’ असे म्हणाला. आमचा थंड प्रतिसाद बघून तो स्वतःहून पुढे आला आणि स्वतःची ओळख करून देत म्हणाला, आय यम रामालिंगम्, आय स्टे इन थिस कोलोनी(बाजूच्या कॉलनीकडे बोट करून), युर नेम प्लीस?
आम्ही(मी आणि चिंटू) एकमेकांकडे पाहिले(काय करायचे ह्या अर्थाने). मग चिंटू पुढे झाला आणि म्हणाला, आय ऍम लुडविग अँड ही इज देवा(चिंटू मला ह्याच नावाने हाक मारायचा).
लगेच रामालिंगमने आम्हाला पुढचा प्रश्न विचारला, व्हेयर फ्रॉम यू कम?
फ्रॉम बाँबे!असे चिंटूने म्हणताच त्या सगळ्यांनी आमच्याकडे 'अजि म्या ब्रह्म पाहिले' अशा विस्फारीत डोळ्यांनी पाहिले. आश्चर्याचा भर कमी झाल्यावर मग त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर गप्पा माराव्यात म्हणून बसण्याची विनंती केली पण आम्ही ती सौम्यपणे नाकारली. आम्हाला आता विश्रांतीची जरूर आहे, आपण उद्या बोलू असे सांगून त्यांचा निरोप घेतला. मागोमाग गाद्या घेऊन गादीवाल्याचा नोकर आला. पलंगावर गाद्या पसरून , हात पाय धुऊन आम्ही अंथरुणावर पडलो. दिवसभराच्या श्रमाने थकलो होतो त्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: