माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग५

दादाचे वडील इस्पितळातून घरी आले पण काही दिवसातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. माझ्या बरोबरचे सर्व मित्र त्यांच्या अंत्यसंस्काराला गेले पण माझ्या घाबरटपणामुळे मी मात्र गेलो नाही. दादाच्या त्या दु:खद प्रसंगात मी त्याला भेटायला गेलो नाही म्हणून खरे तर त्याला वाईट वाटायला हवे होते; पण उलट मी तिथे गेलो नाही म्हणून, मला जेव्हा तो ऑफिसात आल्यावर भेटला तेव्हा त्याने समाधानच व्यक्त केले. का? तर म्हणे ते वातावरण मला मानवले नसते!
बघा! म्हणजे त्या तशा वेळी देखिल तो माझ्या बर्‍या-वाईटाचा विचार करत होता. आणि मी?

दादाचे वडील गेले आणि दादा पोरका झाला. सहाजणींपैकी ५ बहिणी(एकीचे लग्न आधीच झाले होते), आई,बायको आणि मुलगी अशा ८ स्त्रियांचे पालनपोषण करण्याची अवघड जबाबदारी त्याच्या शिरावर येऊन पडली. ह्या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम असा झाला की कौटुंबिक बाबींकडे लक्ष देताना त्याला वेळ अपुरा पडू लागला आणि त्याची बाहेरची गुंडगिरी हळूहळू कमी होऊ लागली. स्वभावामध्ये मवाळपणा यायला लागला. बोलण्याची भाषा सौम्य झाली.

ह्याच काळात आमच्यात बर्‍यापैकी मैत्री प्रस्थापित झाली. माझे अनाहूत सल्ले दादा मानायला लागला आणि बर्‍याच वेळा त्याला त्याचा फायदा झाला असेही सांगू लागला(आयुष्यात ही एकच व्यक्ती भेटली की जीने माझा सल्ला मानला आणि मिळालेल्या यशाचे श्रेय मनमोकळेपणाने दिले).

असेच दिवस जात होते आणि एक दिवस आमच्यामध्ये एक नवा प्राणी आला. बुटका,जाडसर,रंगाने सावळा आणि कमालीचा तोतरा. त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने ते सांगायला जे तोंड उघडले ते जवळ जवळ ५ मिनिटे 'ओ' ह्या स्वरूपात उघडे होते पण आवाज फुटत नव्हता. बर्‍याच वेळा प्रयत्न केल्यावर कळले की त्याचे नाव श्शशशश...................... श्याम आहे. मुळचा दिल्लीचा रहिवासी. त्याचा मोठा भाऊ ह्याच ऑफिसात दिल्लीला साहेब आहे आणि त्याच्याच वशिल्याने ह्याचा इथे शिरकाव होऊ शकला होता.

तर असा हा श्याम साहजिकच आमच्या सर्वांच्या चेष्टेचा आणि वेळ घालवण्याचा विषय होऊन बसला. तोतरेपणा कमी म्हणून की काय ह्याचे हस्ताक्षर देखिल अगदी कोंबडीचे पाय ह्या सदरात मोडणारे. बीए ची पदवी आहे असे त्याने आम्हाला सांगितले तेव्हा आम्ही त्यावरून पण फिरकी घेतली.
हा श्याम सर्वच बाबतीत असा 'हा' होता पण कष्टाला कधी कमी पडला नाही. वृत्तीने अतिशय कंजूष असल्यामुळे जिथे काही स्वस्त अथवा फुकट मिळेल तिथे हा पुढे असायचा. दादाच्या डब्यातले खायला नेहमी हावरटासारखा टपलेला असायचा. दादाचा पण त्याच्यावर का एव्हढा जीव जडला हे एक कोडेच होते आणि श्याम देखिल कुणाचीही तक्रार घेऊन त्याच्याकडे जायचा. मग दादा त्यालाच अजून पिडायचा; पण तरी देखिल तो दादालाच धार्जिणा होता.

एकदा काय झाले! आम्ही दोघे म्हणजे मी आणि दादा आमच्या चहावाल्याकडे चहा पीत बसलो होतो. दादाचे तिथे खाते होते. तो सगळे पैसे महिन्याला चुकते करी. मी मात्र नेहमी रोख पैसे देत असे. तेव्हढ्यात श्याम तिथे आला आणि दादाकडे चहा मागू लागला. दादाने चहावाल्याला श्यामला चहा द्यायला सांगितले आणि स्वतःच्या खात्यात लिहायला सांगितले. श्याम चहा पिऊन निघून गेला. आम्ही पण चहा पिऊन आमच्या कामाला लागलो.
पगाराच्या दिवशी चहावाला दादाकडून पैसे घ्यायला आला तेव्हा त्याने सांगितलेला आकडा ऐकून दादा चांगलाच चक्रावला. त्याने खाते बघितले तर रोजच्या दोन चहाऐवजी ४-४ चहा लिहिलेले त्याला आढळले. मग त्याने चहावाल्याला जाब विचारला की एव्हढे चहा रोजचे कसे लिहिलेस. त्यावर त्या चहावाल्याचे उत्तर ऐकून दादाच काय मी पण उडालो.
चहावाला म्हणाला, "साहेब तुमच्या नावावर रोज ते श्यामसाहेब चाय पिऊनशान जातात. तुमीच त्येनलां त्या दिवशी चाय पाजूनशान ते तुमच्या खात्यावर लिवायला सांगतली म्हनूनशान रोज दोन टायमाला ते चाय पिऊनशान तुमच्या नावावर लिवायला सांगतात. म्हनूनशान मी रोजच्या ४-४ चाय लिवल्या. आत्ता मला काय ठाव तुमचा नी त्येंचा खाता वायला वायला लिवायचा ते."
दादाने शांतपणे ते जे काही पैसे झाले होते ते त्याला दिले आणि निक्षून सांगितले की ह्यापुढे खाते बंद आणि सगळा व्यवहार रोखीने होईल. मग माझ्याकडे वळून म्हणाला, "काय पण म्हण! हा माणूस (श्याम) एक नंबरचा चॅप्टर दिसतोय. आता तू पण बघ मी ह्याच्याकडून कसे डबल पैसे वसूल करतो ते."
मी म्हणालो, "दादा,मारामारी नाही करायची. काय वसुली करायची असेल ती युक्तीने कर."
दादाने ते मान्य केले.

मध्यंतरी काही दिवस गेले आणि एका सोमवारी,सकाळी सकाळी ऑफिसात एका अनोळखी इसमाचा दूरध्वनी आला. त्याच्या सांगण्यानुसार श्यामला शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे पोलिसांनी स्त्रियांच्या डब्यातून प्रवास करताना पकडले होते आणि तो सध्या मुंबई सेंट्रल येथील रेल्वेच्या तुरुंगात आहे. १७५ रुपये दंड भरून त्याला सोडवावे अशी त्याने विनंतीही केलेली होती.
हा असा दूरध्वनी येताच साहेबांनी(योगा योगाने हा साहेबही दिल्लीकर होता आणि श्यामचा पाठीराखा होता. श्यामसारखाच कंजूषही होता आणि स्वत:कडचे पैसे न देता ते परस्पर इतरांनी भरावे अशी त्याची अपेक्षा होती) लगेच गजाला आणि दादाला बोलावून घेतले आणि घडला प्रकार सांगितला आणि लगेच पैसे भरून त्याला सोडवून आणा असे सांगितले. श्यामच्या पगारातून ते पैसे कापून घेऊन परत करण्याची जबाबदारी साहेबाने घेतली आणि मगच आम्ही सर्वांनी वर्गणी काढून त्याला सोडवून आणले.

एकदम १७५ रुपये गेल्यामुळे श्याम हबकूनच गेला होता. पै पै चा हिशोब करणार्‍या श्यामला आता ते पैसे परत कसे कमावायचे ह्या एकाच विचाराने झोप लागत नव्हती. सारखी चीड चीड चालायची त्याची. मी आणि दादाने हे बरोबर हेरले आणि मग दादाने त्याच्या चहाच्या पैशांची वसुली करण्यासाठी ही योग्य संधी आहे असे ओळखून एक योजना बनवली. त्यात मलाही सामील करून घेतले.

बोलता बोलता मी श्यामला हळूच म्हणालो, "श्याम, तुम दादाको क्यों नही बोलता तेरा वो १७५रु. वापस लानेको. उसका ससुर्जी इधरही चर्चगेट ऑफिसमे बडा अफसर है! उसकी बातको कोई नही ठुकरा सकता!"
"स्स्स्स्स्स्स्स्स्स्स सच्ची?"
मी हो म्हणालो आणि श्यामने जाऊन दादाचे पायच धरले.
"म्म्म्म्म्म्म्म्म मेरे प्प्प्प्प्पैसे ल्ल्ल्ल्ल्लाके द्द्द्द्देना!"
"तेरे पैसे? कायके पैसे? मैंने कब लिये?" दादाने नाटक केले. मग श्यामला छळून छळून (त्याला नीट बोलता येत नाही हे माहीत असून पुन्हा पुन्हा ते बोलायला लावणे हा छळ नाही तर काय? पण आम्हाला पण त्यात एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असे) शेवटी दादाने त्याचे पैसे आणून द्यायचे कबूल केले. दादा मला चहा प्यायला चल असे म्हटल्याबरोबर श्यामने त्याला एकट्याला नेऊन चहा आणि बरोबर बटाटे वडा खायला घातला(जगातले कितवे आश्चर्य?). जो माणूस स्वतःसाठी खर्च करायला कांकू करत होता त्याने एव्हढे पैसे एकदम खर्च केले हे पाहून आम्ही चक्रावून गेलो; पण मग एका अनुभवी माणसाकडून कळले की हीच दिल्लीकरांची खासियत आहे. आपले काम करून घेण्यासाठी ते वेळप्रसंगी लाच द्यायलाही कमी करत नाही(ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा सर्वसामान्य माणूस लाच घेणे आणि देणे वाईट असे समजत होता).
मग हा सिलसिला महिनाभर चालू राहिला. दादा काहीतरी खोटीनाटी कारणे सांगून वेळ काढत होता आणि रोज श्यामच्या पैशाने कधी चहा, तर कधी बटाटेवडा/समोसा वगैरे वगैरे खात खात पैसे वसूल करत होता. महाकंजूष आणि लालची श्याम रोज मोठ्या आशेने १७५रु. च्या वसुलीसाठी चहा-खाण्यावर पैसे खर्च करत होता(हे कसे घडत होते हे केवळ तो 'श्याम म्हणजे श्रीकृष्ण'च जाणे).
हे पैसे वसूल तर कधीच होणार नव्हते आणि रोज रोज श्यामकडून चहा-खाणे घेऊन दादाही कंटाळला होता. हा खेळ कुठे तरी थांबवायचा होता; पण कसा ते त्याला कळत नव्हते. मग त्याने माझा सल्ला विचारला. मी जरासा विचार केला आणि त्याला सांगितले की आता सासर्‍याचे काम संपले आहे तेव्हा त्याला मारून टाक. ते कसे काय करायचे ते त्याला नीट समजावले आणि मग दादाने सुटकेचा निःश्वास टाकला.

दुसर्‍या दिवशी श्याम माझ्याकडे आला आणि दादा त्याच्याशी काही बोलतच नाही असे सांगायला लागला. म्हणजे नाटक नीट वठत होते हे माझ्या लक्षात आले. मी त्याच्याबरोबर दादाकडे गेलो आणि दादाला काही विचारणार इतक्यात त्याने माझ्या खांद्यावर मान टाकून रडण्याचे नाटक सुरू केले‌. श्यामला हा काय प्रकार आहे ते कळेना. मग मी दादाकडून वदवून घेतले की त्याचा सासरा वारला म्हणून!
ते ऐकताच श्याम रडायला लागला आणि म्हणाला,"म्म्म्म्म्म्म्मेरा प्प्प्प्प्प्प्प्पैसा?"
दादाने आकाशाकडे बोट दाखवले आणि हळूच मला डोळा मारला! आणि अजून जोरात रडायला लागला. त्याचे रडणे बघून तो असा का रडतोय म्हणून श्यामने मला विचारले.
मी म्हणालो, "त्याचा सासरा हुंड्याचे दहा हजार न देताच मेला म्हणून तो अजून जोरात रडतोय."
हे ऐकून श्याम चुपचाप तिथून निघून गेला आणि दादाने एक मोठा सुस्कारा सोडला.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: