माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

'दिल्लीवर स्वारी!'भाग २

माझ्या अंगाईगीत गाण्याचा परिणाम म्हणून की काय ;) दिन्या चुळबूळ करायला लागला. मनात म्हटले, आता हा काय नवीन प्रताप दाखवतोय कुणास ठाऊक! हळूहळू तो उठून बसला. त्याने इकडेतिकडे बघितले आणि त्याचा उजवा हात सारखा नाकाकडे न्यायला लागला. मी प्रथम लांबूनच निरीक्षण केले. नेमके काय काय करतो ते तर बघूया असा विचार करत होतो. इतक्यात पद्याने दिन्याकडे धाव घेतली आणि त्याला रडत रडत विचारायला लागला, दिन्या,मम्मी खंय गेली रे!
दिन्याला प्रश्न कळला की नाही माहीत नाही. तो आपला एकटक आपल्या नाकाच्या शेंड्याकडे बघत बघत उजव्या हाताने आपले नाक पकडायचा प्रयत्न करत होता,पण ते काही त्याच्या बोटाच्या चिमटीत सापडेना. म्हणून त्याने ओरडायला सुरुवात केली. माझे नाक कुठे गेले, ए बाप्पा(मला तो ह्याच संबोधनाने पुकारत असे) माझे नाक कुठे गेले रे?
मी पुढे सरकलो आणि त्याचा हात नीट धरून तो त्याच्या नाकावर ठेवला आणि म्हटले, हे बघ तुझे नाक. नाक म्हणजे काय पेन किंवा रुमाल आहे हरवायला ?
त्याने बोटाच्या चिमटीत नाक पकडले आणि म्हणाला, साल्या बाप्पा,तू माझा खरा दोस्त आहेस. माझे हरवलेले नाक शोधून दिले! असे म्हणून नाक सोडले आणि मला मिठी मारायला लागला. मी लगेच मागे सरकलो.

मला असल्या लोकांच्या सहवासात राहण्याचा मनस्वी तिटकारा आहे. इथे नाईलाज म्हणून मी थांबलो होतो. शक्य असते तर केव्हाच ह्यांच्यापासून दूर निघून गेलो असतो. पण आता मी परमुलुखात होतो आणि ते सुद्धा ह्या लोकांबरोबर एक मित्र म्हणून आलो होतो. तेंव्हा प्राप्त परिस्थितीला कसेही करून तोंड द्यायलाच हवे होते. मी असा विचार करतोय तोपर्यंत दिन्या पुन्हा आपले नाक शोधायला लागला.
ए बाप्पा पुन्हा हरवले माझे नाक. शोधून देना. तू माझा खरा मित्र आहेस ना, मग पुन्हा शोधून दे ना!
आता मला वैताग आला होता; पण रणांगण सोडून पळ काढणे माझ्या रक्तात नसल्यामुळे मी त्यावर लगेच तोडगा काढला. सुध्याला म्हणालो, सुध्या लेका नुसता हसतोस काय? ह्या दिन्याचे नाक हरवले आहे ते शोध ना!
त्यावर तो अजून हसत सुटला आणि टाळ्या वाजवत मोठ्या-मोठ्याने ओरडू लागला, दिन्याचे नाक हरवले,बरे झाले. पद्याची आई गेली मजा आली!
हे पालुपद त्याने सुरू केले आणि दिन्या आणि पद्याभोवती गोल-गोल फिरायला लागला. दिन्या त्याला आपले 'नाक शोधून दे' म्हणून आर्जव करायला लागला तर पद्याने ’मम्मी खंय गेली!’ हा धोशा लावला.

आता माझ्या लक्षात आले की हे तिघे पूर्णपणे भांगेच्या अमलाखाली गेलेत. अहो माझ्याही आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. आतापर्यंत ऐकून होतो पण आज ह्याची देही ह्याची डोळा अनुभवत होतो. त्यामुळे मी ठरवले आता ह्यांची जरा मजा करूया;म्हणून मी दिन्याला हाक मारली आणि म्हणालो, दिन्या! हे बघ तुझे नाक माझ्या हातात आहे!
लगेच दिन्याने आर्जवं करायला सुरुवात केली, ए बाप्पा,दे ना! दे ना बाप्पा! बाप्पा देना नाक! ए बाप्पा देना नाक!
आणि ह्या आर्जवांची आवर्तनं सुरू झाली. मी त्याच्या जवळ हात नेला की ते नाक घ्यायला तो पुढे सरसावायचा. मी चटकन हात मागे घेतला की पुन्हा आर्जवं सुरू. तिथे सुध्याचे हसणे,टाळ्या वाजवणे आणि चिडवणे सुरूच होते आणि पद्याचे रडगाणे चालूच होते. थोडा वेळ मला पण गंमत वाटली; पण हे किती वेळ चालू राहणार अशी भीतियुक्त शंका देखिल मनात यायला लागली. ह्याच्या नाकाचा काही तरी सोक्षमोक्ष लावावा म्हणून मी ते नाक खिडकीतून बाहेर टाकले असे दिन्याला म्हणालो(लहान मुलांना आपण फसवतो ना अगदी तसेच; बाकी लहान मुले आणि आताचे हे तिघे ह्यांच्यात ह्या घडीला तरी कोणताच फरक नव्हता). मला वाटले तो आता गप्प बसेल;पण कसले काय आणि कसले काय? तो उठला आणि खिडकीच्या दिशेने धावला. त्या खिडक्यांना गज नव्हते. तो त्या खिडकीवर चढायचा प्रयत्न करत होता;त्याला तिथून उडी मारायची होती; नाक शोधायला जायचे होते. क्षणभर मी गडबडलो. पण लगेच पुढे धावत जाऊन त्याला ओढले आणि खिडकीपासून लांब आणून बसवले. आता हा नवीनच ताप झाला होता डोक्याला. दोन-दोन मिनिटांनी तो उठून खिडकीकडे जायचा प्रयत्न करत होता आणि मी त्याला खेचून पुन्हा लांब नेत होतो. शेवटी एक युक्ती केली. त्याला सांगितले की त्याचे नाक सुध्याला लावले आहे. तो लगेच सुध्याचे नाक ओढायला लागला. आपले नाक मागू लागला. आता सुध्याचे हसणे बंद झाले आणि ओरडणे सुरू झाले. दोघे एकमेकांची नाके खेचायला लागले. सगळाच राडा होऊन बसला.

आता ह्यातनं ह्यांना आणि मला कोण वाचवणार म्हणून मी चिंता करत होतो तेव्हढ्यात नेमीचंद अगदी देवदूतासारखा धावून आला. त्याने हे चाळे बघितले आणि प्रथम त्याला ह्याचे हसू आले पण त्या हसण्याची जागा हळूहळू संतापाने घेतली. नेमीचंद हा खरेच एक सरळमार्गी मुलगा होता. अतिशय शांत आणि प्रेमळ होता. त्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड मनस्ताप होत होता. एकीकडे मित्रांना वाईट वाटू नये म्हणून त्यांची मर्जी सांभाळणे आणि दुसरीकडे ह्यातील काहीही वडिलांपर्यंत पोचणार नाही ह्याची खबरदारी घेणे अशा पेचात तो अडकला होता. तो आता आम्हाला चहाला बोलावायला आला होता;पण हे प्रकरण बघून तो मला एकट्यालाच चल असे विनवू लागला. मी दिन्याचे नाक प्रकरण आणि त्यावरून त्याचे खिडकी-उडी नाट्य त्याला सांगितल्यावर त्याने तिथेच चहा पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले आणि तो तिथून निघून गेला. परत मी त्या माकडांच्यात एकटाच राहिलो.

हळूहळू पद्या वळणावर येण्याची चिन्हे दिसू लागली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे रडणे आणि आईचा शोध घेणे बरेच कमी झाले होते. मी बोलत होतो ते थोडे -थोडे त्याच्या डोक्यात घुसायला लागले होते. पण सुध्या आणि दिन्याचा धिंगाणा अजून सुरूच होता. तेव्हढ्यात दिन्याने ओकारी होत असल्यासारखे चाळे करायला सुरुवात केली. पुढच्या कल्पनेनेच मला शिसारी आली. मी पद्याला कसे तरी समजावले आणि त्याने त्याच्या दादाला म्हणजे दिन्याला मोरीकडे नेले आणि दिन्याने भस्सकन ओकायला सुरुवात केली. एक सेकंद जरी उशीर झाला असता तरी त्याने ते 'सगळे' सुध्याच्या अंगावर केले असते. त्या दुर्गंधीने मलाच मळमळायला लागले. काय करावे काहीच सुचेना. अती सुगंध अथवा दुर्गंधाची मला कमालीची ऍलर्जी असल्यामुळे माझ्या जीवाची तगमग सुरू झाली; पण मी मला मोठ्या शिकस्तीने जेमतेम सावरले. तेव्हढ्यात नेमीचंद नोकरासह चहा घेऊन आला. त्याने हे बघितले आणि त्याचे टाळकेच सरकले. तो तसाच चहासकट परत गेला आणि त्या नोकराला ते सगळे साफ करायला सांगितले. मला त्याने खुणेनेच खाली बोलावले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी खाली गेलो.

मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि इतके बरे वाटले म्हणून सांगू! शब्दच तोकडे पडतील! चहा पिऊन,जरा इथे-तिथे पाय मोकळे करून मी पुन्हा माडीवर आलो तोपर्यंत साफसफाई झाली होती. हसण्या-रडण्याचा भर ओसरला होता आणि मंडळी पुन्हा पेंगायला लागली होती. ह्या तिघांव्यतिरिक्त जे अजून चार जण राहिले होते त्यातला तो छायाचित्रकार(४ गोळ्या) अस्ताव्यस्त आडवा पडला होता. जिवंत आहे की मेला आहे अशी शंका वाटावी इतका गाऽऽऽढ झोपला होता. त्यामुळे त्याचा त्रास नव्हता. पण एका गोष्टीची काळजी वाटत होती की हा संध्याकाळच्या वराती पर्यंत शुद्धीवर येतो की नाही. अजून दोन तास बाकी होते पण त्याची हालचाल जाणवत नव्हती. मंदपणे हालणारा छातीचा भाता त्याच्या जिवंतपणाची साक्ष देत होता. एरवी तो ज्या स्थितीत झोपला होता तसाच्या तसा जवळजवळ ५-६ तास झोपून होता. बाकीचे तिघे केश्या,पक्या आणि गोट्या(प्रत्येकी १-१ गोळी) जागृत होण्याची चिन्हे दिसत होती. आता हे तिघे काय गुण उधळताहेत हे कुतूहलही होते आणि दडपण पण होते.

अर्धा एक तासात हे तिघे उठून बसले. आजूबाजूला बघितल्यावर साहजिकच त्यांना अपरिचित वातावरण दिसले. त्यामुळे ते काही वेळ तसेच मंदपणे बसून राहिले. पहिल्यांदा पक्या माझ्याकडे बघून म्हणाला, च्यायला बाप्पा, तू माझ्या घरी कधी आलास? ह्या केश्या आणि गोट्या बरोबर तर नव्हतास?
मी त्याला आठवण करून दिली, लेका पक्या,अरे आपण इथे राजस्थानात नेमीचंदच्या गावी आलोत. हे तुझे घर नाही. ही तुझी भांग बोलते आहे. तुला चढली आहे. जरा शुद्धीवर ये!
लगेच पक्या.... मी शुद्धीवरच आहे. तूच शुद्धीवर नाहीस. च्यायला माझ्या घरी येऊन मलाच दादागिरी दाखवतोस? गोट्या, त्याला घे रे कोपच्यात! आणि केश्या तू पण उठकी लेका! आपल्याला पिक्चरला जायचंय विसरलास वाटते?
केश्याने हळूच मान वर करून बघितले आणि पुन्हा गुडघ्यात मान घालून बसल्या बसल्या पेंगायला लागला.परत पक्या... ए गोट्या,आपण बाप्पाला पण पिक्चरला नेऊ या काय? बोल,तू,तू काय बोलतोस? बोल!
गोट्या उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हता. अजूनही तो संभ्रमित अवस्थेत बसून होता. एकटक आढ्याकडे बघत. एकटा पक्याच पकपक करत होता. त्याच्या बोलण्याला कोणी प्रतिसाद देत नाही असे पाहून त्याने बाजूलाच झोपलेल्या सुध्या आणि दिन्याला ढोसायला सुरुवात केली. ५एक मिनिटांनी ते दोघे उठून बसले आणि आपापसात काहीतरी असंबद्ध बडबडायला लागले. हळूहळू गोंधळ वाढायला लागला.

मला भीती वाटत होती की जर मित्राचे वडील आत्ता ह्या क्षणी आले तर त्यांना तरी हे ओळखतील की नाही? हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. खाली रस्त्यावर(ही माडी रस्त्यावरच होती) माणसांची वर्दळ वाढायला लागली. बँडवाले आलेले जाणवत होते. कारण मधून मधून बासरी किंवा ढोलाचा हळुवार आवाज (पूर्वतयारी चालली असावी) यायला लागला होता. तो आवाज ऐकून दिन्या पेटला. तो खिडकीजवळ जाऊन पुन्हा तिथून खाली उतरायचा प्रयत्न करायला लागला. सगळ्यांना बोलवू लागला, ए, चला चला! गणपतीची मिरवणूक येतेय. चला नाचायला चला!
मी पटकन पुढे झालो आणि त्याला आत ओढला आणि गादीवर झोपवले. मला शिव्या देत,माझ्याशी झटापट करत तो उठायचा प्रयत्न करत होता;पण मेंदूवर भांगेचा अंमल असल्यामुळे त्याला धड उभे सुद्धा राहता येत नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पावले वाजली. मला आता खात्रीच पटली की आतापर्यंत लपवून ठेवलेली ही वार्ता जर नेमीचंदच्या वडिलांना कळली तर आपली काही धडगत नाही. मी धडधडत्या अंत:करणाने येणार्‍या व्यक्तीची वाट बघू लागलो. सुदैवाने तो नेमीचंदच होता आणि आम्हाला वरातीसाठी बोलवायला तो आला होता. छायाचित्रकाराला उठवायचा प्रयत्न फोल ठरला. तो दादच देत नव्हता. इतरांची अवस्था देखिल असून नसल्या सारखीच होती. म्हणून मी एकट्यानेच चलावे असे नेमीचंदने मला सुचवले. मी त्याला दिन्याचा पुन्हा एकदा सुरू झालेला खिडकी पराक्रम सांगितला आणि अशा अवस्थेत मी कसा येऊ म्हणून विचारले. त्याच्या कडे पण उत्तर नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पुन्हा पावले वाजली आणि नेमीचंद लगेच खाली उतरला. त्याचा अंदाज बरोबर ठरला. साक्षात त्याचे वडीलच त्याच्या समोर उभे होते. नजरेनेच त्यांनी इतर सगळे कुठे आहेत म्हणून विचारले आणि नेमीचंदने मान खाली घातली. त्या परिस्थितीत मला त्याची खूप दया आली. पण मी तरी काय करणार? त्याला बाजूला सारून वडील वरती आले. समोरची सोंगे बघून ते हबकूनच गेले. अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या छायाचित्रकाराला त्यांनी लाथेने ढोसून बघितले आणि मला म्हणाले, हे सगळे केव्हापासून चालले आहे? आणि तू एकटा ह्यांच्यात कशाला अडकून राहिला आहेस? चल खाली चल, ह्यांना लोळू दे खुशाल डुकरासारखे !
मी त्यांना दिन्याचा खिडकी-प्रताप सांगितला,आणि म्हणून,कसे येऊ असे विचारले. त्यावर त्यांनी एका भरभक्कम गड्याला बोलावले. खिडक्या बंद करून कुलुपं लावली आणि त्याला देखरेखीसाठी तिथे बसवून मला घेऊन खाली आले.
सचिंत चेहर्‍याने नेमीचंद खाली उभा होता. त्याच्या कडे बघून म्हणाले, अरे कसले मित्र जोडलेस? लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायला. हा एकच मुलगा सज्जन आहे. त्याच्यामुळे आज आपली सर्वांची इज्जत वाचली. त्या दिन्याने खिडकीतून खाली उडी मारली असती तर आज काय प्रसंग ओढवला असता कल्पना करवत नाही. ह्यापुढे हे तुझे इतर दोस्त आपल्या घरी आलेले मला चालणार नाही.

वरातीचा थाट जबरदस्त होता. जयपुराहून खास मागवलेला पोलिस बँड, त्यामागे नटून थटून नाचगाणी करणारे राजस्थानी कलाकार. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या डोक्यावर घेऊन चालणारे ते रुबाबदार फेटेवाले आणि नटले -सजलेले स्त्री-पुरुष-मुले असा मोठा रुबाब होता ह्या वरातीचा. मोठ्या मानाने त्यांनी मला नवर्‍या मुलाच्या घोडी पाठोपाठ असणार्‍या सजवलेल्या मोटारीत नेमीचंदच्या बरोबरीने बसवले आणि वरात धीम्या गतीने वधूच्या घराकडे रवाना झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: