माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग ७

यशवंत उर्फ यश ही अजून एक वल्ली. थापा मारण्यात पटाईत. मला ह्याच्या थापा खर्‍याच वाटायच्या कारण त्यावेळी मी जरा 'हा'च (बावळट--सभ्य भाषेत भाबडा) होतो. त्याच्या थापा तरी काय एकेक जबरदस्त होत्या म्हणून सांगू?

यश,त्याचा भाऊ,बहीण आणि आई-वडील असे हे ५ जणांचे कुटुंब होते. बाप प्रिंटींग मास्टर तर आई आर्ट मास्टर(इति.यश). हे सगळे कुटुंब हिंदी सिनेमाचे जबरदस्त शौकीन. कुठलाही नवा सिनेमा लागला की पहिल्या खेळाची, पहिल्या रांगेची(पिटातली) तिकिटे पैदा करून हे अख्खे कुटुंब तो सिनेमा पाहायला जात असे. आल्यावर मग यश त्या सिनेमाची ष्टोरी ऍक्शनसकट सांगायचा. त्या सिनेमाचा जो कोणी हिरो असेल(राजकपूर,देवाअनंद,शम्मीकपूर,राजकुमार वगैरे वगैरे वगैरे)त्यांच्या ऍक्शन्स,बोलण्याची पद्धत(ढब),त्यातली गाणी वगैरे सगळे अगदी तिखट मीठ लावून सांगत असे.

एकदा तो जितेंद्रचा सिनेमा बघून आला तर त्याने दुसर्‍या दिवशी तसाच एकाच रंगाचा पोशाख(सिनेमात जितेंद्रने एकाच रंगाची पँट आणि बुशकोट घातला होता-इति.यश)घालून ऑफिसात जितेंद्रच्या थाटात एंट्री घेतली आणि कुठलेतरी त्याचे गाणे म्हणायला सुरुवात केली. आम्ही सगळे तर ते बघून थक्कच झालो. ह्या यशचे केस इतके सरळ आणि भरपूर होते की तो रोज नवी हेअरस्टाईल करून (त्या त्या नटाप्रमाणे) येत असे आणि त्या त्या दिवशी त्याचे वागणे बोलणे त्या विशिष्ट नटासारखे असे. तर असा हा फिल्मी अंदाज असणारा यश माझ्या आयुष्यात प्रथम आयटीआय मध्ये असताना आला. चांगली दोन वर्षे आम्ही दोघे एकत्र होतो आणि पुढे नोकरीतही एकत्रच राहिलो.

आयटीआय मध्ये असताना तर त्याने माझा अक्षरक्ष: मामा बनवला होता. तो अशा काही गोष्टी सांगे की माझा त्याच्यावर विश्वास बसत असे. मी एकदा त्याला त्याच्या वडिलांबद्दल विचारले,म्हणजे ते काय नोकरीधंदा वगैरे करतात असे तर त्याचे उत्तर तयार होते.
तो म्हणाला,"माय पॉप यू नो(ह्याला निष्कारण इंग्रजी फाडायची..तेही चुकीचे.. सवय होती) ही वेअर इन मॉरिशस. त्यावेळी ते सकाळी विमानाने तिथे जायचे यू नो आणि संध्याकाळी परत विमानाने बॅक टू बाँबे."
मला तर खूपच अप्रूप वाटायचे(खरे तर हा मॉरिशस कुठे आहे आणि कसा आहे..म्हणजे देशात की परदेशात हे सामान्य ज्ञानही नव्हते). अशा मोठ्या माणसाचा मुलगा माझ्या बरोबर शिकायला आहे हे ऐकून स्वत:लाच धन्य वाटायचे.
मग ते तिथून फॉरेनच्या वस्तू कशा आणतात आणि आम्ही सुट्टीत त्यांच्या बरोबर कसे तिथे फिरायला जातो(अगदी चौपाटीवर जाऊन भेळ खाणे जितके सोपे आहे असे दर्शवत) वगैरे गोष्टी रंगवून सांगत असे आणि माझ्यावर इंप्रेशन पाडत असे.

मी दिसायला यथातथाच होतो. बुटका,चष्मीश आणि सुकडा आणि कपडेही साधेच असत. फॅशन बिशन अजिबात कधी केली नाही. त्यामुळे मुलींच्या भानगडीत मी आणि मुली माझ्या भानगडीत कधीच पडल्या नाहीत(नशीब त्या मुलींचं). माझ्या तुलनेत यश चांगलाच उंच,चष्मीश पण रूपाने देखणा,बर्‍यापैकी गोरा आणि स्टायलिश होता आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या बिल्डिंगमधल्या आणि आजूबाजूच्या पोरी त्याच्यावर मरत होत्या. माझा ह्यावरही विश्वास बसत असे कारण माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी म्हणजे अशक्य कोटीतल्याच होत्या. त्यातून यश नेहमी फिल्मी अंदाजात वावरायचा. कधी देवआनंद सारखा गळ्यात मोठा रुमाल आणि ती विशिष्ट कॅप घालायचा तर कधी जितेंद्र नाहीतर राजेश खन्ना स्टाइलचे कपडे आणि ऍक्शन करत वावरायचा. त्यामुळे माझा न्यूनगंड भलताच वाढला आणि यशच्या कोणत्याही कथा मला खर्‍या वाटायला लागल्या.

एकदा त्याने मला त्याच्यावर मरणार्‍या मुलींबद्दल सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला,"अरे माझ्यावर एव्हढ्या मुली मरतात की काय सांगू? रिअली स्पिकींग मी काउंटच करू शकत नाही. अरे मी घरातून कधी बाहेर पडतो ह्याचीच वाट बघत असतात त्या. मी बाहेर पडलो की त्या मला फटाफट येऊन ’किसीकिसी’(हा यशचा खास शब्द) करतात. क्वॉरल करतात इच अदरशी. मग मी त्यांना लाईनीत उभे करतो आणि एकेकीला चान्स देतो."(इथे मला जेम्स बाँडची भूमिका करणार्‍या नटाबद्दल अशाच तर्‍हेच्या ऐकलेल्या आख्यायिकेची आठवण झाली)
मी बावळटपणाने विचारले,"मग त्यातली तुला कोण आवडते?"
यश म्हणाला,"चल हट! अरे अशा पोरींवर कोण मरतोय? माझी एक स्पेशल माल आहे. डिट्टो मुमताज(त्या काळात मुमताज ही नटी फॉर्मात होती). तू बघशील तर पागल होशील." (माझ्या दु:खावर डागण्या)इथे साधी एक पोरगी वळून सुद्धा बघत नाही तिथे मुमताज म्हणजे काय? साक्षात रंभा,उर्वशी नाहीतर मेनका! अशी मुलगी दिसली तर पागल नाही होणार तर काय?(हे आपले मनातल्या मनात... आपण मनातच बोलणार. प्रत्यक्ष बोलायची हिंमत नाही)
"तर व्हॉट आय वॉज स्पोक, शी वेअर लुकींग डिट्टो लाइक मुमताज. ती मॉमेडीअन आहे आणि आमच्याच बिल्डिंग मध्ये राहते. काय वंडरफूल स्माईल आहे यार, तू तर गारच होशील.(हा सारखा सारखा मला का गार करतोय ? मला कळत नव्हते; पण स्पष्ट बोलायची चोरी होती कारण मग तो मला काही सांगणार नाही असे वाटायचे) तर यू सी ती समोरच्या फ्लॅटमध्ये राहते आणि मी तिच्या डिट्टो(हा पण यशचा आवडता शब्द) ऑपोजीट. ऍक्च्युअली काय आहे ना तिची आई तिला घरातून बाहेर पडायला देत नाही. त्यामुळे मी पाइपवरून क्लाईंब करून जातो(परत फिल्मी स्टाइल...इथे धर्मेंद्र पाइपवरून चढून हेमामालिनीच्या खोलीत जातोय वगैरे असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले) आणि तिला किसीकिसी करून येतो. तिच्या आईला कळतच नाही. ती पुढच्या दरवाज्यात बसलेली असते."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: