माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग८

यश जसा दिसायला सुस्वरूप होता तसाच मनाने पण चांगला होता. त्याचे हस्ताक्षर म्हणजे मोत्याचे दाणे जणू आणि सर्किट डायग्रॅम,किंवा मशीन ड्रॉईंग काढण्यातही तो पारंगत होता. त्याचा नीटनेटकेपणाचा गुण सगळ्याच बाबतीत जाणवायचा. अशा ह्या सद्गुणी यशमध्ये दोन ठळक दोष होते ते म्हणजे थापेबाजपणा आणि चोरटेपणा. ह्यातल्या थापेबाजपणाचा तसा कुणाला काहीच त्रास होत नसे‍. झालीच तर लोकांची करमणूक होत असे(फक्त मी सोडून... कारण मला सगळं खरेच वाटायचे).

त्याच्यातल्या चोरटेपणाचा मात्र त्याला एकदा चांगलाच फटका बसणार होता. त्याची मोठी चोरी पकडली गेली होती(मीच पकडली...पुढे ओघाने ती कथा येईलच) आणि त्याला नोकरीतून कमी केले जाऊ शकत होते; पण त्याच्या सुदैवाने आणि साहेबांच्या दयाळूपणामुळे तो त्यातून सुखरूप बाहेर पडला. तरीदेखील त्याचा मूळ स्वभाव मात्र बदलला नाही. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी त्याची गत होती. ही घटना जेव्हा घडली तेव्हा यशचे लग्न झालेले होते आणि तो एका मुलीचा बापही होता. एव्हढी सगळी लफडी करूनसुद्धा लग्न मात्र त्याने त्याच्या आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशीच केले. त्याची बायको सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी होती आणि मोठ्या मालदार घरातली होती. तिच्यातच मग त्याला मुमताज आणि नाही नाही त्या हिरॉईन्स दिसायला लागल्या आणि यश एका अर्थाने मार्गाला लागला.

लग्नानंतर यशला जवळजवळ दोन वर्षे मूलबाळ झाले नाही तेव्हा गजा त्याला 'पावलीकम' असे चिडवत असे. अशाच तर्‍हेने तो एकदा यशला चिडवत असताना योगायोगाने आमचे एक साहेब(हेही मराठीच होते) तिथे आले. गजा पाठमोरा होता आणि यशला मोठमोठ्याने चिडवत होता. तो शब्द त्या साहेबांनी ऐकला आणि त्यांनी गजाला त्याचा अर्थ विचारला. गजा हा बोलण्या-चालण्यात बिनधास्त प्राणी होता म्हणून त्याने साहेबांना सरळ शब्दात त्याचा अर्थ सांगितला.
त्यावर साहेब गजाला म्हणाले,"यशला दोन वर्षात मूलबाळ झाले नाही म्हणून तू त्याला असे चिडवतोस तर मला देखिल लग्नानंतर १४ वर्षांनी पहिले मूल झाले. मग मलाही लोक असेच म्हणत असतील नाही का?"
साहेबांच्या ह्या सरळ प्रश्नामुळे आम्ही सर्व चूप बसलो होतो; पण गजा कसला गप्प बसतोय?
तो सरळ म्हणाला,"हो साहेब तुम्हाला पण सगळे लोक असेच म्हणत असणार."
गजाच्या ह्या स्पष्टीकरणानंतर साहेब स्मितहास्य करत तिथून निघून गेले. आणि... काही दिवसांनी यशने येऊन बातमी सांगितली की तो बाप बनणार आहे म्हणून.. मग त्याच्याकडून पार्टी मागायला पण गजा पुढे होता.

यश बाप झाला. कुटुंबवत्सल झाला आणि आयुष्यात स्थिरावलाय असे वाटते आहे तोवर कळले की आजकाल यश रोज दारू प्यायला लागलाय. आता आमचा त्यावेळचा पगार जेमतेम ५०० रु च्या आसपास होता. रोज दारूचा खर्च आणि घरात बायको-तान्ही मुलगी ह्यांचा खर्च हे सगळे तो ह्या तुटपुंज्या पगारात कसा भागवणार असा प्रश्न माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला पडला; पण यशला त्याची फिकीर नव्हती.

सहसा इलेक्ट्रॉनिक्सचे स्पेअरपार्टस् आणायचे काम पदू करायचा; पण एक दिवस तो गैरहजर असल्यामुळे मला बाजारात जावे लागले. एक विशिष्ट पार्ट शोधताना एका दुकानात मला काही ओळखीचे प्रिंटेड बोर्डस् दिसले. हे असले प्रिंबो माझ्या माहितीप्रमाणे फक्त भारतात(निदान मुंबईत तरी)आमच्या ऑफिसातील विशिष्ट विदेशी बनावटीच्या यंत्रसामुग्रीसाठीच वापरात येत होते. अशा तर्‍हेच्या गोष्टी मी रोजच हाताळत असल्यामुळे मला त्याची पूर्ण खात्री होती. मी ते प्रिंबो त्या दुकानदाराकडून बघायला मागितले आणि त्यावरील ऐवज पाहून माझी पूर्ण खात्री झाली की हे आमच्याकडचेच(आमच्या भांडारात हे त्या यंत्रांबरोबर खास वेगळे मागवले होते) आहेत. मी काही जुजबी प्रश्न त्या दुकानदाराला विचारले तेव्हा माझ्या असे लक्षात आले की ते प्रिंबो कुठल्या यंत्राचे आहेत हे देखिल त्याला माहीत नव्हते आणि केवळ आपण आपल्या एका खास माणसाने हे इथे ठेवायला सांगितले आहे म्हणून ठेवलेत असेही सांगितले. मी त्या दुकानदाराकडून त्याचे दुकानाच्या नाव आणि पत्त्याचे कार्ड मागून घेतले आणि माझे काम आटपून ऑफिसला परत आलो.

माझ्या डोक्यात चक्र फिरत होती. हे प्रिंबो तिथे कसे. त्यावेळी यश भांडाराचा कारभार सांभाळत असे. मी दुरुस्ती आणि देखभालीचे काम करत असे. त्यामुळे दुरुस्तीसाठी सुटे भाग भांडारातून घेण्यासाठी मी तिथल्या नोंदवह्या आणि कपाटं तपासण्याचे ठरवले. माझ्या अंतस्थ हेतूची काहीच कल्पना नसल्यामुळे यश मला ते करू देत होता. मी सर्व तपासणी केल्यावर माझ्या लक्षात आले की काही प्रिंबो जागेवर नाहीत; पण यशला सरळसरळ विचारणे प्रशस्त वाटेना म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पात त्याला गुंतवून मी हळूच त्याला ते दुकानदाराचे पत्त्याचे कार्ड दाखवले. ते बघून तो अगदी सहजपणे म्हणाला,"अरे देवा तुला जर बाजारात कुठेच सुटा भाग मिळाला नाही ना तर तू ह्याच्याकडे जा. हा आपला खास दोस्त आहे आणि तुला पाहिजे तो सुटा भाग आणून देईल."
मला हेच अपेक्षित होते. मग मी त्याला सरळ प्रश्न केला,"यश,समजा आपल्याकडचे हे प्रिंबो संपले तर तुझा हा दुकानदार आपल्याला ते आणून देईल काय?"
"ऑफ कोर्स. अरे नक्की देईल. तू माझे नाव सांग त्याला,तर तुला तो कन्सेशन पण देईल." इति.यश.
आता मी सरळ मुद्यालाच हात घातला. मी त्याला म्हणालो,"यश,मी इतका वेळ कपाटं आणि नोंदवह्या तपासल्या तरी तुला काहीच कळले नाही? मी तुला त्या दुकानाचा पत्ता सांगितला तरी तुला काहीच वाटले नाही? तू मला काय दूधखुळा समजतोस काय? ह्या ठिकाणी ६ प्रिंबो कमी आहेत आणि त्याची परदेशी चलनातली किंमत हजारो पाउंडस् आहे. मला,तुझ्या मुलीची शपथ घेऊन सांग,ते प्रिंबो तूच त्याच्याकडे नेऊन दिलेस की नाही? आता खरे बोलला नाहीस तर मी हे प्रकरण साहेबांकडे घेऊन जाईन."
माझ्या ह्या अनपेक्षित सरबत्तीने यश कमालीचा घाबरला. ततपप करीत त्याने गुन्हा कबूल केला. हे सगळे तो रोजचा दारूचा खर्च भागवण्यासाठी करत होता.मी त्याला दोन तासांची मुदत दिली. त्या अवधीत तो तिथे जाऊन ते प्रिंबो घेऊन आला. मी पूर्णं खात्री करून घेतली आणि ते सर्व कपाटात ठेवले. त्यानंतर त्याच्याकडून भांडाराच्या चाव्या घेऊन मी त्याला आमच्या साहेबांपुढे(हेच ते मराठी साहेब-दयाळू होते म्हणूनच मी त्याला त्यांच्याकडे नेले)उभा करून झालेला वृत्तांत सांगितला. साहेबांनी चार उपदेशपर गोष्टी सांगून त्याला दुसर्‍या कामाला जुंपले जिथे अशा तर्‍हेचा व्यवहार त्याला करता येणार नव्हता.

यशचे नुकतेच सुरू झालेले कौटुंबिक आयुष्य विस्कटू नये म्हणून मोठ्या उदारतेने साहेबांनी त्याला माफ केले; पण यशच्या वर्तनात फारसा काही फरक पडला नाही. आज इतक्या वर्षांनंतरही यश दारूसाठी जमेल तिथे हात मारतच असतो. पकडला गेला तर हातापाया पडून माफी पदरात पाडून घेतो. लाज-लज्जा,इज्जत वगैरे गोष्टींच्या पलीकडे तो गेलाय. मुले मोठी झाली. दोन मुलांची लग्ने झाली. आजोबा झाला पण त्याचा तो रुबाब वगैरे आता औषधाला सुद्धा उरला नाही. एक चांगल्या घरातला मुलगा असा वाया गेलेला बघून वाईट वाटते; पण आपल्या हातात काय आहे? त्याला सुधारण्याचा आम्ही मित्रांनी खूप प्रयत्न केला पण तो आता सुधारण्याच्या पलीकडे गेलाय.
त्याचे ब्रीदवाक्यच जणू असावे 'हम नही सुधरेंगे!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: