माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ मार्च, २००७

आणि मी मार खाल्ला!...पुढे

एकीकडे काम चालू असतांना मनात चक्र फिरतच होती. उद्या काय करायचे आणि कसे करायचे. संतापाच्या भरात मी दादा आणि चिंटूची मदत घेण्याचे मान्य तर केले होते;पण त्यानंतर पुढे उद्भवणार्‍या संभाव्य धोक्यांचा मी विचारच केला नव्हता! काय होते ते संभाव्य धोके?

दादा हा वृत्तीने दादाच होता. त्याच्या खिशात सतत रामपूरी असायचा आणि त्याने खरेच जर एखाद्याची फुल्टू केलीच तर? तर मग तो आणि त्याच्याबरोबरच मी आणि चिंटू देखिल आत जाणार हे ओघानेच आले. चिंटूही तरबेज मुष्टीयोध्दा आणि नेहमीच मारामारी करायला तयार असल्यामुळे त्याच्याकडून पण असेच काही जीवघेणे घडू शकणार होते आणि मी! एक नाकासमोर चालणारा,कुणाच्या अध्यात ना मध्यात पडणारा सरळमार्गी शक्तिहीन माणूस! आज हे माझे कार्यालयीन मित्र माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातील. त्या ७-८ जणांना अद्दल घडवतील;पण खरेच ह्या सगळ्याची जरूर आहे काय? आज हे दोघे माझ्यासाठी त्यांना मारतील.मग उद्या ते सगळे मिळून परत मला मारतील आणि पुन्हा त्याचा बदला घेण्यासाठी........ छे! हे काही बरोबर वाटत नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसला आला आहे मानापमान? आणि माझ्या मानापमानाची लढाई इतरांनी का लढावी?ती मी स्वत:च्या जोरावर का लढू नये?ह्या लढाईत दादाला आणि चिंटूलाच जर काही लागले तर त्याला मीच जबाबदार असणार! माझ्या साठी त्यांचा का बळी? तेव्हा त्यांना ह्यात गुंतवायचे नाही. मी केले,मी भोगले! अतिशय साधे-सोपे उत्तर आहे त्याचे! त्यासाठी ह्या माझ्या मित्रांना का भरीला घाला.

दिवसभर मनातल्या मनात असा विचार करत असतांना मी एका ठाम निर्णयाशी आलो. आपली लढाई आपण एकट्यानेच लढायची! आपली क्षमता नसेल तर एक वेळ हार पत्करणे परवडले पण अशी दुसर्‍यांची मदत घेऊन आणि त्यांच्यावर जोखीम टाकून आपण फुकटचा मोठेपणा मिरवायचा नाही. माझा पक्का झालेला निर्णय मी दादा आणि चिंटूला सांगितला त्यावर ते दोघेही माझ्यावरच उखडले. "तू असाच ऐनवेळी शेपूट घालणार हे आम्हाला माहित होते. साले तुम्ही सगळे भट ती भेंडीची बुळबुळीत भाजी खाऊन शेवटी पळपुटेपणाच करणार! चांगली अद्दल घडवली असती त्या भो***** ! पण तू पडला गांधी! तुला कसे सहन होणार आमचे उपाय"?

मी त्यांना माझे विचार पटवायचे काही निष्फळ प्रयत्न केले आणि शेवटी काहीसे रागावूनच त्यांनी मला माझ्या पध्दतीने वागायची उदारता दाखवली. स्वभावताच मी काही गांधीवादी किंवा अहिंसावादी वगैरे मुळीच नाही. असलोच तर काही प्रमाणात सावरकरवादी असेन. पण स्वत:ची लढाई स्वत:च्याच ताकदीवर लढायची असा काहीसा माझा स्वत:चा म्हणता येईल असा 'स्ववाद' होता. कदाचित तो आत्मघातकी देखिल असेल तरीपण तसा तो होता.

आता माझ्यापुढे प्रश्न होता की मी नेमके काय करणार होतो?मी काय करू शकत होतो? जर काही करता येण्यासारखे होते तर तसे आजच का केले नाही? खरं तर मी ती विशिष्ठ गाडी,तो डबा टाळूनही ते प्रकरण विसरू शकत होतो; पण खुमखुमी म्हणतात ना तसे काही तरी माझ्याबाबतीत झाले होते. स्वत:च्यात धमक नाही तरी कुणाची मदत घेणार नाही हा अडेलतट्टूपणा होताच !वर प्रकरण विसरून जाऊ द्यावे तर तेही नाही! मग आता काय होणार? म्हणजे करणार?कुणास ठाऊक! पण उद्या तीच गाडी आणि तोच डबा पकडणार आणि पुढे.........?

दुसर्‍या दिवशी मी मालाड स्थानकात पाच मिनिटे आधीच पोचलो. फलाटावर तुफान गर्दी होती. आज चढायला मिळेल की नाही ह्याचीही निश्चिती नव्हती पण प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती. माझ्या ठरलेल्या जागी येऊन गाडीची वाट पाहात उभा होतो.इतक्यात मला मागून हाक आली म्हणून वळून बघितले तर माझे दोनतीन शाळकरी मित्र तिथे आपापसात गप्पा मारत उभे होते. त्यातील एक 'विकी'!शरीरसौष्टवपटू होता आणि ह्या वर्षीच त्याला 'भारत श्री' होण्याचा सन्मान मिळाला होता. त्याला इतक्या वर्षांनी बघून आणि भेटून मला खूप आनंद झाला. आम्ही एकमेकांची चौकशी करेपर्यंत गाडी धाड धाड करत फलाटावर आली. मी ज्या डब्यात ज्या विशिष्ठ ठिकाणी चढणार होतो त्याच्या खिडकीत त्या कंपूची काही मंडळी बसली होती. त्यांच्यापैकी कुणीतरी मला आणि माझ्या 'भारत श्री' मित्राला हातात हात घेऊन बोलतांना(गाडी थांबेपर्यंत) बघितले असावे. माझा मित्र निरोप घेऊन प्रथम दर्जाच्या डब्यात चढला आणि मी कसाबसा माझ्या इच्छित डब्यात चंचूप्रवेश केला.

"आला रे! सांभाळा"! असा जोराचा पुकारा झाला. मी हळूहळू त्या कंपूच्या जवळ पोचलो पण माझ्या पुढे अजून एकदोन जण उभे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज कुणी पत्ते खेळत नव्हते!मी हळूच बघून घेतले.कालचे सगळे हजर होते.बरोबर पेट्याही होत्या पण कुणी खेळत नव्हते.त्यातल्या एकाशी माझी नजरानजर झाली आणि अहो आश्चर्यम! चक्क त्याने माझ्याकडे बघून स्मितहास्य केले!क्षणभर माझा त्यावर विश्वास बसला नाही पण ते दृष्य खरे होते. मी मनात त्याच्या त्या हास्यामागच्या कारणांचा विचार करत असतानाच त्यांच्यापैकी एकाने मला पुढे येण्याची खूण केली आणि माझ्या पुढे उभे असणार्‍या त्या दोघांना उद्देशून म्हटले, " जरा वो साबको अंदर आने दो ना! हमारा दोस्त है"!
माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना! मनात आले, "ह्यांचा हा नवीन डाव तर नाही ना"?
पण मी मुद्दामहून तर ह्या डब्यात चढलोय मग आता घाबरायचं कशाला? असा विचार करून आत गेलो. एकाने उठून मला त्याच्या जागी बसायची विनंती केली. बसावे की न बसावे असा विचार करत असतानाच त्याने मला माझ्या खांद्यांना धरून बसवले.

हे काय आज विपरीत घडतंय असा मनात विचार येत असतानाच एकाने पहिला चेंडू(प्रश्न) टाकला!
" तो प्लॅटफॉर्मवर हातात हात घेऊन बॉडीबिल्डर उभा होता तो तुमचा कोण लागतो"?
आता कुठे माझी ट्युब पेटली. "अच्छा, म्हणजे हा सगळा त्याचा प्रताप आहे तर"! (मी मनातल्या मनात!)
" हो ! तो माझा खास मित्र आहे"! का? तुमची काही हरकत"?
"नाही ! हरकत कसली? पण काल आम्ही जे काही तुमच्याबरोबर वागलो त्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करा हो! आम्ही त्यातले नाही हो! कृपा करून त्याला काही सांगू नका"!
" असे कसे सांगू नका"!
मी खरे तर त्याच्याशी काहीच बोललो नव्हतो पण जरा फिरकी ताणायची आणि मुख्य म्हणजे सूड उगवायची संधी का सोडा असा विचार करून पुढे बोललो. " काल तुमचा दिवस होता आणि आज माझा दिवस आहे! कुणापासून सुरुवात करायची ते सांगा!तुमच्यापासून करायची का ह्या टग्यापासून करायची"?
तो टग्या थरथर कापायला लागला. हात जोडून बोलला, " साहेब माफ करा! एक वार गलती झाली.आता ह्यापुढे कधी नाही होणार अशी गलती"! असे म्हणून त्याने स्वत:चे कान पकडले.
" अहो आम्ही मध्यमवर्गीय घरातली मुले आहोत. काल जरा अतिउत्साहात तुम्हाला मारझोड केली;पण खरे सांगतो,आम्हाला आमच्या कृत्त्याची लाज वाटते हो! तुमचे जे काही नुकसान झाले असेल ते आम्ही भरून देतो पण आम्हाला तुम्ही मारू नका"!

हे मी काय बघत आणि ऐकत होतो? माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना!मी मला एक चिमटा काढून बघितला आणि हे सगळे सत्यात घडते आहे ह्याची खात्री पटली.खरे तर मी ह्यांना काय शिक्षा करणार होतो? मलाच माहित नव्हते आणि आज असे काही घडेल अशीही शक्यता नव्हती. मग केवळ माझ्या विकी बरोबरच्या हस्तांदोलनाने ही किमया घडत होती हे ऐकून तर मलाच मोठी मजा वाटली आणि त्या भेकड लोकांची कीवही आली. आज जर प्रत्यक्ष दादा आणि चिंटू आले असते तर? तर कदाचित त्यांचा तो भीषण अवतार बघूनच एक-दोघेजण जागच्या जागीच गार झाले असते! बरं झालं मला वेळीच सुबुध्दी सुचली आणि मी त्यांना येऊ नका असे सांगितले.

मी असा विचारमग्न असतानाच एकाने खरेच माझे पाय पकडले तेव्हा मला अवघडल्यासारखे झाले. मी त्याला उठवले आणि म्हणालो, " बाबानो,तुम्ही तरूण आहात(मीही तेव्हा तरूणच होतो हो!) पण म्हणून तुमची शक्ति अशी चुकीच्या ठिकाणी वापरू नका. तिचा चांगला वापर करा! मी तुम्हाला काहीही करणार नाहीये. पण तुम्ही ह्या पुढे कधीही अशी दंडेली करून लोकांना त्रास द्यायचा नाही असे कबूल करा"!

त्या सगळ्यांनी ते मान्य केले आणि मग जरा वातावरण निवळले.

तात्पर्य: शेवटी माझी लढाई मी स्वत: न लढताच त्रयस्थाच्या केवळ दर्शनाने अनपेक्षितपणे जिंकलो होतो. म्हणजे मी पुन्हा हरलो!!!

२८ मार्च, २००७

आणि मी मार खाल्ला!

ही कहाणी साधारण २५ वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणेच कार्यालयात जायला उशीर झाला होता म्हणून ९-४७ ची चर्चगेटला जाणारी जलद गाडी कशीबशी मी मालाडहून पकडली. ही गाडी जोगेश्वरी ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान थांबणार नव्हती. त्यामुळे झटपट पोचता येणार होते.आधी दारातच लटकत होतो;पण दमादमाने जोगेश्वरीपर्यंत बराचसा आत पोचलो. गाडीला मरणाची गर्दी होती आणि त्यातच पंखे बंद होते. हे म्हणजे नेहमीसारखेच होते. म्हणजे काय की ऐन थंडीत हे पंखे अगदी सुसाट फिरतात आणि ऐन उन्हाळ्यात संप पुकारतात अगदी तसेच.

उकाड्याने संत्रस्त लोक रेल्वे खात्याला शिव्या देत होते. इथे धड उभे राहायला लोकांना जागा नव्हती आणि तिथे ७-८ जण मांडीवर पेट्या ठेवून पत्ते खेळण्यात रंगले होते. मी माझ्या पुढे असलेल्या लोकांना पुढे सरकायची विनंती केली तेव्हा त्यांनी पुढे जायला जागा नाही असे सांगितले ते ह्या पत्ते कुटणार्‍यांमुळेच. त्यांनी बरीच जागा अडवलेली होती.

मी त्या पत्ते खेळणार्‍यांनाही थोडा वेळ पत्ते बंद करा म्हणून विनंती केली पण एक नाही आणि दोन नाही. कुणी ऐकायलाच तयार नव्हते.मी एक प्रयत्न करावा म्हणून माझ्या पुढच्या माणसाला पुन्हा एकदा पाऊल पुढे टाकण्याची विनंती करून पाहिली पण त्याच्या नजरेनेच मला सांगितले की तो पुढे जाऊ शकणार नाही म्हणून. मग "मी पुढे जातो तू मागे हो" असे सांगून पुढे सरकलो आणि परिस्थिती माझ्या लक्षात आली.

ते ७-८ जण अशा तर्‍हेने एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या अडकवून बसले होते की पुढे एक पाऊलही टाकणे अशक्य होते म्हणून मी पुन्हा त्यांना विनंती केली की त्यांनी पाय मागे घेऊन मला थोडे पुढे जाऊ द्यावे म्हणून. माझ्या कडे त्रासिक नजरेने बघत त्यांनी पुन्हा आपला खेळ पुढे सुरु ठेवला. इथे गर्दीचा रेटा इतका वाढला होता की मी वरती कडीला धरलेला माझा हात सुटला आणि त्या पत्तेकुट्यांच्या पेट्ट्यांवर पडलो आणि त्यांचे पत्ते विखुरले गेले. ही घटना इतक्या अनपेक्षितपणे घडली की माझ्या मागोमाग अजून एक-दोघे माझ्या अंगावर पडले आणि नाईलाजास्तव पत्तेकुट्ट्य़ांना आपला डाव बंद करून आम्हाला जागा द्यावी लागली.

ह्या अपमानाने ते विलक्षण रागावले आणि माझ्याशी वाद घालू लागले. "कडी नीट धरायला काय होते! पडायचेच होते तर हीच जागा बरी सापडली"! वगैरे वगैरे. मी त्यांना समजावून सांगत होतो, " अरे बाबांनो,इथे लोकांना नीट उभे राहता येत नाहीये आणि तुम्ही जागा अडवून आरामात पत्ते खेळताय! तुम्हाला जरा तरी माणूसकी आहे की नाही".. वगैरे वगैरे!

ह्यावर एक त्यातला जरा टग्या होता तो दुसर्‍याला म्हणाला, "तुला सांगतो पक्या, ह्यांना साल्यांना हाणले पाहिजे. लातोंके भूत बातोंसे नही मानते"!
माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याला आव्हान दिले, अरे हाणण्याची भाषा कसली करतोस? माझे हात पण काही केळी खायला गेले नाहीत.तू हात लावून तर बघ"!
झालं! मी आगीत तेल ओतलं होतं! आग धुमसायला लागली. बोलण्याने बोलणे वाढत होते. इथे गाडीनेही चांगला वेग घेतला होता आणि अचानक एकाने मागून माझ्या पाठीत एक जोरदार रट्टा घातला. मी मागे वळलो आणि पुन्हा एक रट्टा पाठीत बसला. परत वळणार तोच चारी बाजूंनी माझ्या वर हल्ला सुरु झाला होता. ह्या सगळ्यांना एका वेळी तोंड देणे माझ्या शक्तीबाहेरचे असल्यामुळे मी लगेच खाली बसलो आणि डोके गुढग्यात घुसवले. मी कोणताही मार सहन करू शकणार होतो पण माझ्या डोळ्यात नेत्रस्पर्शी भिंगे(कॉन्टॅक्ट लेन्सेस) असल्यामुळे मला चेहरा वाचवणे भाग होते.

आता तर मी त्यांच्या पूर्ण तावडीत सापडलो होतो.प्रतिहल्ला होत नाहीये हे पाहून ते सगळे चेकाळलेच होते. आता लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरु झाली होती. मी हूं की चूं न करता तो मार मुकाट पणे सोसत होतो. मन तर पेटले होते. एकेकाचा गळा आवळावा असेही वाटत होते पण मी तसे काहीच करू शकत नव्हतो ही वस्तूस्थिती होती.गाडीत ह्यामुळे संतापाची एकच लहर उठली आणि आता लोक माझ्या बाजूने बोलायला लागले. " अरे एक आदमीको सब मिलके क्यों मार रहेले है? ये तो बहूत नाइन्साफी है! अगर मर्द हो तो एकेक करके लडो"! असा एकाने आवाज उठवल्यावर मग लोक मधे पडले आणि हळूहळू मारहाण बंद झाली.

माझ्या कपड्यांची तर दशाच झाली होती. एक-दोन क्षण मी चाहूल घेतली आणि मोठ्या प्रयासाने मान वर केली तेव्हा १५-१६ हिंस्त्र डोळे माझ्यावर रोखलेले मला दिसले. जणू काहीच झालेले नाही असे दर्शवीत(अंग तर चांगलेच ठणकायला लागले होते) हळूहळू उठून उभा राहिलो. त्या सर्व टग्यांच्या नजरांना नजर भिडवत म्हणालो, "भेकड कुठले! एकाच्या अंगावर सगळ्यांनी हल्ला करण्यात कसली आली आहे बहादुरी? हिंमत असेल तर एकेकट्याने या! नाही पाणी पाजले तर बघा! तुम्ही चर्चगेटला उतरा मग बघतो"(सगळा सुका दम हो! अंगात नाही त्राण आणि तरी माझा रामबाण! असा सगळा तो आव होता.)!


आता गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात शिरत होती. त्या कंपूपैकी दोनजण तिथे उतरून गेले. त्यानंतर ग्रॅंट रोड,चर्नी रोड आणि मरीन लाईन्स स्थानकांवर एकेक करून उतरले आणि शेवटी त्यांच्यापैकी एक जण चर्चगेटला उतरण्यासाठी माझ्या बरोबर राहिला. मी त्याच्या नजरेला नजर देण्याचा प्रयत्न करत होतो तर तो ती चुकवत होता.बहुतेक माझ्या सुक्या दमने घाबरला असावा. त्यातून एकटा राहिला होता ना! काही म्हणा कंपूमधे असताना सगळेच वाघ असतात पण एकेकटे असताना मात्र कुत्र्यासारखी शेपूट घातलेली असते. चर्चगेट स्थानकात गाडी शिरल्या शिरल्या त्या बेट्याने चालत्या गाडीतून उडी मारून सूंबाल्या केले.

मी त्या तशाच अवतारात कार्यालयात पोचलो. माझ्याकडे बघून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.प्रश्नार्थक चेहरे बघून मी जरा स्थिरस्थावर झाल्यावर माझी राम(नव्हे 'मार')कहाणी सांगितली.ती ऐकतानाच दादा आणि चिंटूच्या चेहर्‍यावरचे रंग बदलत गेले आणि त्यांनी मला विचारले, "मालाडला किती वाजताची गाडी?उद्या आम्ही बरोबर टच करतो.एकेकाची फुल्टूच करून टाकतो"!
संतापाच्या भरात( अजूनही मी शांत झालेलो नव्हतो) मी त्यांना त्या विवक्षित वेळी भेटण्याचे कबूल केले आणि मग चहा पिऊन कामाला लागलो.

क्रमश:

२० मार्च, २००७

धंदेवाईक?............२

ब्रह्मांड नायकांचे यथोचित स्वागत झाल्यावर(पाद्यपूजा वगैरे) ते उच्चासनावर आसनस्थ झाले. काही खास शिष्यगणांनी जाऊन त्यांचे चरणकमल स्पर्शून त्यांना वंदन केले. हे बघून काही उपस्थित उच्चभ्रूंनीही त्यांचे अनुकरण केले. महाराजांनी हात उंचावून समस्त भक्तगणांना आशीर्वाद दिले. आता महाराज काय बोलणार ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले.

महाराजांनी डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेऊन ॐकाराचा ध्वनी काढला आणि भक्तगणांनी त्यांचेच अनुकरण केले तेव्हा सगळे वातावरण ॐकारमय होऊन गेले. मग महाराजांनी धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. मलाही उत्सुकता होतीच की हे काय बोलतात म्हणून मी कान टवकारले.

महाराजांनी घोषणा केली, ईश्वरनामाच्या बॅंकेत डिपॉझिट जमा झालंय! किती? माहित आहे?
भक्त म्हणाले, किती?
१४ हजार कोटी! असे म्हणून महाराजांनी एका कौतुकभरल्या नजरेने भक्तांकडे पाहिले. त्या नजरेने भक्त सुखावले,अगदी कृतकृत्त्य झाले.

माझ्या बाजूला बसलेल्या झिलग्या सावताला गप्प बसवले नाही. तो मला म्हणाला, आपानू!(लोक मला हवे त्या संबोधनाने पुकारतात ) तुमका माहित असा हे ईश्वरनाम डिपॉझिट काय असा ता?
नाय बा! माझे उत्तर.
त्यावर त्याने दिलेली माहिती अक्षरश: आश्चर्यजनक आणि तितकीच विचारप्रवण होती. ती माहिती अशी....
बापूंनी(म्हणजे हे महाराज बरं का! ह्यांना भक्तगण बापू,बाबा,सद्गुरू असे काहीही म्हणतात) ईश्वरनामाची एक बॅंक उघडलेय. 'बापूज बॅंक ऑफ रामनाम!' अशा नावाची बॅंक उघडलेय. ह्या बॅंकेची आजपर्यंतची सभासदसंख्या किती आहे महाराजा? तर ती आहे एक लाख दोनशे चौतीस! आणि ह्या सभासदांनी आजपर्यंत ईश्वरनामाच्या रुपाने जमा केलेली अनामत आहे १४कोटी!!
पण ही अनामत जमा कशी करतात? तर त्याची एक खास पध्दत आहे. तुम्ही ह्या बॅंकेत २०रुपये भरून एक खातं उघडायचं. त्याबरोबर तुम्हाला एक वही मिळते. मग तुम्ही ती वही रामनामाने भरायची आणि बॅंकेत जमा करायची. मग पुन्हा नवी वही विकत घ्यायची,लिहायची आणि जमा करायची. आहे की नाही एकदम झकास कल्पना! इतक्या सहजतेने तुमच्या पदरात पुण्य पडणार असेल तर मग तुम्ही मागे का? चला पटापट सदस्य व्हा आणि लागा रामनाम लिहायला.
मग ह्या वह्यांचे काय करत असतील हो? रद्दीत देतात काय? छे!छे! अहो काय तरीच काय? आता त्यापासून पर्यावरणमित्र अशा साडे सहा हजार गणेशमूर्ती बनवण्याचा संकल्प आहे.

हे सर्व ऐकून माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. काय हुशार आहे हा बापू! लोकांच्या भावनांची त्याने किती सहजपणे अर्थशास्त्राशी गाठ घातली आहे बघा. एक लाख भक्त गुणिले २०रुपये= २०लाख(एकवेळचे) रुपये झाले. बघायला गेले तर २०रुपये ही अतिशय क्षुल्लक रक्कम आहे;पण अशा तर्‍हेने किती माया आजपर्यंत साठवली असेल बापूंनी? अजून ते गणपती आहेतच . ते विकून होणारा लाभ आणि ही रामनामाची कधीही न आटणारी गंगा!
ह्या बरोबर अजूनही किती तरी गोष्टींचा व्यापार इथे निर्वेधपणे चालतो. बापूंची छायाचित्रे,बिल्ले,छोट्या-मोठ्या पोथ्या आणि कितीतरी!!!
त्यात अजून एक गोष्ट कळली बापूंच्या सौ. म्हणजे त्याही अवतारी स्त्रीशक्ती(ओघाने आलेच) आहेत. त्या स्वत: सौंदर्यप्रसाधने बनवतात आणि लाखो भक्तिणी त्या मोठ्या श्रध्देने वापरतात. साक्षात भवानी माता सर्व सुंदर बायकांचा मेकप करते असे काहीसे पुलंनी हरितात्या ह्या व्यक्तिचित्रात एका ठिकाणी लिहून ठेवलेय त्याला बळकटी आणणारा हा साक्षात पुरावा बघितला की खरेच मन थक्क होऊन जाते.

कधी मन:शक्तीला तर कधी तुम्हालाच आवाहन करून 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' वगैरे गोंडस आणि सहज पटेल अशा भाषेत त्या 'सद्गुरु जीवनराव' पध्दतीने लोकांना आकर्षित करायचे. आपण जे काही बोलतो त्याच्या ध्वनीफिती,चित्रफिती,पुस्तके आणि असेच बरेच साहित्य लोकांच्या गळी उतरवायचे असा उघड उघड भावनांशी खेळ मांडून त्यातून अर्थप्राप्ती करायची.

कधी बाबा बनून मोठी थोरली सशुल्क योगशिबीरं घेऊन त्यातून गिर्‍हाईकं हेरायची आणि त्यांच्या गळ्यांत स्वनिर्मित आयुर्वेदिक औषधं भरमसाठ किमतींना मारायची. तर कधी आचार्य,महाराज बनून रामकथेच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये गोळा करायचे असा हा फार मोठा नवा आंतरराष्ट्रीय धंदा बनला आहे. सगळीकडे श्रध्देचा नुसता बाजार मांडलाय!

आपली विवेकबुध्दी गहाण टाकलेल्या लोकांच्या कमजोरीचा फायदा उचलणारे असे हे महाभाग सद्या पदोपदी दृष्टीस पडतात आणि लोकही मेंढरांप्रमाणे त्यांच्या मागे जातात. आदिकालापासून सुरू झालेला हा खेळ जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे. मदारी बदलतील पण माकडे तीच असणार आहेत! बाकी ह्या महाभागांची डोकॅलिटी शॉल्लीड आहे हां! एकदा ह्यांचा मेंदू तपासून पहायला हवा. त्यातून काही शोध लागायचा. इतक्या सर्व लोकांना बांधून ठेवायचे म्हणजे काय खायचे काम आहे?

शेवटी म्हटलेच आहे ना! दूनिया झुकती है!लेकिन झुकानेवाला चाहिये!

१५ मार्च, २००७

धंदेवाईक?

मैदान माणसांनी तुडुंब भरले होते. मुंगी शिरायला देखिल जागा नव्हती. भक्तगण ज्यांची आतुरतेने वाट बघत होते ते 'अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु स्वामी बाबा अत्त्यानंद बापू महाराज' हे एकदाचे प्रकट झाले.
कमरेला चौकडीची लुंगी,उघडे बंब,डोळ्याला दिवस-रात्र(डे ऍंड नाईट) चष्मा, खास राखलेली हनुवटीखालची छोटीसी काळी-पांढरी(पांढरीच जास्त!) दाढी,डोक्यावर विरळ झालेले तसेच काळे-पांढरे केस अशा अवतारातल्या(अवतारच तो!) महाभागाला पाहून काही जण शंकित झाले.
अरे हा कसला महाराज? अशी शंका आपापसात व्यक्त करू लागले.
काही नाही हो, सगळा भंपकपणा हल्ली सगळीकडे वाढलाय! इतक्या बाबा-बुवांमधे आणखी एकाची भर झाली म्हणायचे! सगळेच एकजात चोर आहेत! एकेकाचे नखरे पहा काय आहेत ते.

हे उद्गार घेलाशेठला ऐकवेनात. तो लगेच पुढे सरसावला आणि म्हणाला, तुमी घाटी लोक एकदम पागल हाय! अरे हे स्वामी हाय ना ते एकदम चोक्कस हाय! ते शेर बजार बाबत जे सांगते ना ते एकदम फीट्ट असते(शेठजी म्हटला की शेअर बाजारा बद्दलच बोलणार! म्हणतात ना 'भटा,भटा! तुझे वर्म काय? तर, कापसाचे जानवं! तसलाच हा प्रकार). पेला वखताला मी तेचा लेक्चर ऐकला तवा मी ते परमाने शेर बजार मंदी पैसा लावला पन मला घाटा झाला. मला लई दुक झाला. मी स्वामीला प्रायवेटमंदी विचारला तवा तेने मला जे उत्तर दिला ना तवापासून मला लई फायदाच फायदा जालाय. तुमाला घाटी लोकांला तेंचा इंपोटन्स(महत्व) कलनार नाय. जरा तेची भासा नीट समजून घेइल ना तर तुमचा बी कल्याण होऊन जाईल.

घेलाशेठचे अनुभव ऐकून लगेच मी पुढे सरसावलो. शेअर बाजार म्हटल्या बरोबर माझ्याच सारखे अजून काही जण पुढे सरसावले आणि घेलाशेठला चिकटले. मी घेलाशेठला प्रश्न केला, ते म्हाराज काय बोलले आमाला पण सांगा ना!
घेलाशेठ सांगू लागला! अरे तुमाला सांगतो मी स्वामीचा पेली वखत लेक्चर ऐकला ना तवा स्वामी बोलला व्हता की, आज शेर बाजारमंदी शेर विकून टाका. असेल-नसेल तेवडा विका. दोन दिवसांनी परत विकत घ्या कमी भावामंदी!
मी लगेच माज्याजवल्चे समदे शेर विकूनशान टाकले आनि मार्केटमंदी एकदम तेजी आली. माजा लई नुसकान जाला. मी येऊन स्वामीचा पग धरला आनि तेला समदा सांगितला. स्वामीने माज्या डोस्क्यावर हात ठेवला आनि मला बोलला, शेठजी तुमाला आमची भासा कलली नाय. आमी 'विका' असे सांगतो तवा तुमी विकत घ्यायचे असते आनि 'विकत घ्या' असे सांगतो तवा विकायचे असते!
मंग मी तसाच केला तवापासून मला कदी बी घाटा नाय जाला. अरे आपन तर हे स्वामीचा दर्सन घेतल्याबिगर चाय बी पीत नाय. एकदम पॉवरबाज हाय हा स्वामी.

घेलाशेठचे ते स्वामीपुराण ऐकून मी म्हटले, ह्याऽऽ! त्यात काय! माझ्या बाबतीतही हे असेच घडते! मी माझ्याकडचे शेअर्स विकले की बाजार चढतो आणि विकत घेतले की बाजार कोसळतो. हे तर कोणत्याही सामान्य गुंतवणुकदाराच्या बाबतीत अगदी असेच घडते. मी सुध्दा माझ्या मित्रांना सांगतो की, बाबानो मी जसे करेन त्याच्या अगदी उलट तुम्ही करा म्हणजे तुमचा नेहमीच फायदा होईल आणि तसे करणार्‍यांना फायदाही होतो. तेव्हा तुमचा हा स्वामी मला काही पॉवरबाज वगैरे वाटत नाही. माझ्यासारखाच पदोपदी ठेचा खाल्लेला एखादा गुंतवणुकदार दिसतोय. असो. तुम्हाला फायदा होतोय ना, मग घ्या फायदा!

माझ्या ह्या वक्तव्यावर घेलाशेठने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत मौनव्रत धारण केले.

क्रमश:

सामनावीर!

चेंडू-फळी(क्रिकेट) खेळला नाही असा मुंबईकर सापडणार नाही. निदान गल्ली क्रिकेट,गॅलरी-क्रिकेट अशा कुठल्या तरी प्रकारात बसणारे का होईना क्रिकेट खेळला नसेल तर तो अस्सल मुंबईकरच नव्हे अशी माझी मी माझ्यापुरती मुंबईकराची केलेली व्याख्या आहे. त्यामुळे मुंबई आणि क्रिकेट हे शब्द जणू एकमेकांना पूरक असेच आहेत असा मी निष्कर्ष काढून मोकळा झालोय! (आपल्याला कोण अडवणार असा निष्कर्ष काढायला? आपण आपल्या मनाचे राजे! काय मंडळी? बरोबर आहे की नाही?) असो. थोडक्यात काय तर क्रिकेट हा एक खेळ आहे आणि तो मी भरपूर खेळलोय हेच मला सांगायचेय!

आमच्या वाडीत खेळायला भरपूर जागा आणि मुलेही होती. तेव्हा क्रिकेट खेळणे ओघाने आलेच आणि आम्ही तिघे भाऊ (माझ्यापेक्षा एक मोठा आणि एक धाकटा) वाडीतल्या इतर मुलांबरोबर मनसोक्त खेळत असू. तसे आम्ही तिघेही चणीने लहानसेच होतो आणि तसे क्रिकेटच्या कोणत्याच अंगात (गोलंदाजी,फलंदाजी वगैरे) फारसे प्रवीण नव्हतो; पण खेळण्याची खुमखुमी जबरदस्त होती. त्यामुळे मिळेल ती भुमिका वठवायची तयारी असे.

मला जाड भिंगांचा चष्मा असल्यामुळे माझी खूपच पंचाईत होत असे. फलंदाजी करताना बहुतेकवेळा चेंडूचा फळीशी संपर्क साधला जात नसे. गोलंदाजाने टाकलेला चेंडू मला यष्टीरक्षकाच्या हातात गेल्यावरच दिसायचा अथवा त्रिफळा उध्वस्त झालेला दिसायचा! चूकून कधी चेंडू-फळीची गाठ पडलीच तर झेल तरी जायचा अथवा चेंडू तिथल्या तिथेच घुटमळायचा. बाकी चौकार-षटकार वगैरे क्षुल्लक गोष्टीत मी कधीच रस दाखवला नाही.

फलंदाजीत हा असा भीमपराक्रम तर गोलंदाजीबाबत तर बोलायलाच नको. अत्यंत हडकुळी शरीरयष्टी असल्यामुळे (यष्टीच्या जागी मला उभे केले असते तरी चालले असते!) माझ्या खांद्यात अजिबात जोर नव्हता. त्यामुळे टाकलेला चेंडू यष्ट्यांपर्यंत पोचेपर्यंत कधी दोन, कधी तीन टप्पे पडत आणि नंतर बहुधा फलंदाजाने चौकार अथवा षटकारात त्याचे रुपांतर केलेले दिसे. पण मुळातच हार न मानणे हा माझा स्थायीभाव असल्यामुळे मी अजून जीव तोडून (खरेच जीव तूटत असे हो! काय सांगू!) चेंडू टाकीत असे आणि समोर असलेला फलंदाज आता तरी बाद होणारच ह्या आशेने ’आऊट रे!’ हे पालूपद घोळवत असे.

नाही म्हणायला क्षेत्ररक्षण खूपच उजवे होते. मला साधारण फलंदाजाच्या आसपास क्षेत्ररक्षण करायला जमत असे. हे देखिल जाड-भिंगी चष्मा आणि कमकुवत खांदे ह्यामुळेच शक्य झाले. आता कसे म्हणून काय विचारता? दूर उभे केल्यास मला चेंडू माझ्यापर्यंत येईस्तो दिसत नसे आणि तो हातात घेऊन नेमका यष्टीरक्षक अथवा गोलंदाजाकडे फेकता येत नसे. म्हणून जवळच मी उभा राही. जवळचे नीट दिसत असल्यामुळे जमिनीलगतचे झेलही मी अतिशय सहजपणे घेत असे (असतात एखाद्यात गुण! त्याचे एव्हढे काय कौतुक?). तर 'असे हे' माझे क्रिकेटजीवन सुरू होते.

हळूहळू मी वयाने आणि अंगाने वाढत होतो. नियमित खेळून आम्हा तिघा भावंडांचा खेळ बर्‍यापैकी सुधारला होता. माझ्या फलंदाजीत फारशी सुधारणा जरी झाली नव्हती तरी गोलंदाजी करताना चेंडू चक्क एक टप पडून फलंदाजापाशी पोचायला लागला होता. बहुतेकवेळा तो मधल्या यष्टीच्या दिशेने जात असे आणि अधनं-मधनं एखादा फलंदाज माझ्या मेहनतीवर खूष होऊन आपला आपण त्रिफळाचीत होऊन बाद होत असे.

अशातच एकदा आमच्या चाळीच्या मालकांच्या मुलांनी दुसर्‍या वाडीशी सामना ठरवला. त्यात ते चार भाऊ+ अजून तीन दुसरे बंधू आणि त्यांचा एक मित्र असे आठजण आणि आम्ही तिघे बंधू असे मिळून संघ बनला. हे इतर आठजण आम्हा भावांपेक्षा वयाने चांगलेच मोठे होते आणि नोकरी-धंद्यात स्थिरावलेले होते. माझा मोठा भाऊ नुकताच नोकरीला लागला होता आणि त्याने पहिल्या पगारातून क्रिकेटचे साहित्य (यष्ट्या,बॅट वगैरे) आणलेले होते. आम्ही हे साहित्य घेऊन आमच्या शाळेच्या मैदानावर जाऊन खेळत असू. ह्या सर्व साहित्यामुळेच आमचा संघात समावेश झाला होता (हे खाजगी आहे. कुठे बोलू नका!)

तर एका रविवारी सकाळी आठ वाजता आमचे दोन्ही संघ मैदानात एकमेकासमोर उभे ठाकले. ओलीसुकी आमच्या कर्णधाराने जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली. ८३ धावा करून आमचा संघ बाद झाला. त्यात माझ्या मोठ्या आणि धाकट्या भावाचा ५ आणि ३ धावा असा सहभाग होता आणि मी सर्वात शेवटी एक धाव काढून (ही एक धाव मला शतकापेक्षाही मोलाची वाटते) धावबाद झालो.

त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी सुरू झाली. त्यांनी तर मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. बिनबाद ३८ अशी त्यांची झंझावाती सुरुवात बघूनच आमच्या कर्णधाराला काहीच सुचेनासे झाले. आतापर्यंत त्याने वापरलेले त्याचे खास गोलंदाज कोणताच प्रभाव पाडू शकले नाहीत त्यामुळे आता गोलंदाजी कुणाला द्यायची ह्या चिंतेत तो पडला होता. बरं, ह्या आधी आमच्या ह्या मोठ्या खेळाडूनी प्रतिस्पर्ध्याचे झेल टाकण्याची स्पर्धाच लावली होती. त्यामुळे खरे तर गोलंदाजांचा दोष नव्हता; पण हे त्या मोठ्यांना सांगणार कोण? मी आपला मनातल्या मनात मांडे खात होतो. ’माझ्या हातात चेंडू येऊ दे मग बघतो एकेकाला!’
पण माझ्या सारख्या चिल्लर खेळाडूकडे कर्णधार बघतसुध्दा नव्हता. मग आता कसे होणार आमचे? आम्ही हरणार हे तर दिसतच होते.

मी आपली कर्णधाराकडे भूणभूण सुरु केली, मला द्या ना एक दोन षटकं! बघा बळी मिळवतो की नाही!
पण एक नाही आणि दोन नाही. प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या बिनबाद ४९ झाली तशी कर्णधाराचे सगळे अवसान गळाले आणि माझ्या भूणभूणीला यश आले. मोठ्या नाराजीने त्याने चेंडू माझ्याकडे सोपवला.
फक्त एकच षटक बरं का! असे वर म्हणाला.
एक तर एक! मिळाले ना! म्हणून मी खूष!

मी गोलंदाजी करण्याअगोदर कर्णधाराला क्षेत्ररक्षणात काही बदल करायला सुचवला तर माझ्यावरच तापला.
स्वत:ला काय बापू नाडकर्णी की बिशनसिंग बेदी समजतोस? चल चूपचाप गोलंदाजी कर! काय मोठे दिवे लावणार आहेस माहित आहे!
काय करणार? चूपचाप गोलंदाजीसाठी पवित्रा घेतला. जेमतेम ५-६ पावलांच्या चालीनंतर मी पहिलाच चेंडू टाकला तो सरळ फलंदाजाच्या बॅटवरच! तो तर काय मस्तीतच होता. दाणपट्ट्यासारखी त्याने बॅट हवेत फिरवली आणि चेंडूला सीमापार पाठवले. मी कर्णधाराकडे बघायचे टाळले. दुसर्‍या चेंडूवर षटकार!!

कर्णधार माझ्याकडे धावत आला. खाऊ की गिळू अशी त्याची चर्या होती. बहुधा पुढच्या चार चेंडूतच सामन्याचा निकाल लागणार हे सर्वांनीच ताडले आणि मी पुन्हा गोलंदाजीसाठी पवित्रा घेतला. पुढचा चेंडू मी अगदी व्यवस्थितपणे मधल्या यष्टीवर टाकला. फलंदाजाने सरसावत पुढे येत सणसणीत फटका मारला आणि सगळ्यांच्या नजरा सीमारेषेवर खिळल्या; पण चेंडू कुठेच दिसेना. मी डोकं धरून खालीच बसलो. आणि एकच गलका झाला! माझ्या पाठीवर जोरजोरात थापट्या पडल्या आणि मग मला कळले की फलंदाजाच्या बॅटमधून चेंडू हुकला होता आणि त्याचा त्रिफळा उडाला होता. माझाच माझ्या त्या 'करणी'वर विश्वास बसत नव्हता पण ते वास्तव होते आणि मग इतरांच्या बरोबर मी देखिल थोडेसे नाचून घेतले.

एक बाद ५९! दुसरा खेळाडू आला. मी चौथा चेंडू टाकला. त्याने सावधपणे खेळून एक धाव घेतली. एक प्रयोग म्हणून मी कर्णधाराला एक खेळाडू फलंदाजाच्या उजवीकडे अगदी समोर(सिली-मीड-ऑफ) उभा करायला विनंती केली आणि ती चक्क त्याने मानली!! मी पाचवा चेंडू त्याच्या उजव्या यष्टीवर टाकला आणि फलंदाजाने तो तटवायचा प्रयत्न केला. माझा अंदाज अचूक ठरला आणि समोर उभ्या केलेल्या खेळाडूच्या हातात अगदी अलगदपणे जाऊन चेंडू विसावला. पुन्हा आरडा-ओरडा, आनंद व्यक्त करणे वगैरे झाले आणि कर्णधाराने येऊन मला उचलून खांद्यावर घेतले.

मी सहावा चेंडू टाकण्या साठी सज्ज झालो होतो आणि मला जरा अजून एक प्रयोग करावासा वाटला. फलंदाजाच्या उजवीकडे आणि डावीकडे अगदी जवळ (सिली-मीड-ऑफ आणि सिली-मीड-ऑन) असे दोन खेळाडू उभे केले . आता माझ्या सगळ्या सुचना कर्णधार हसत हसत मान्य करत होता. फलंदाजावरचे दडपण अजून वाढवण्यासाठी यष्टीरक्षकाला बोलावून त्याच्याशी गुफ्तगूचे नाटक केले. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि माझ्या सहाव्या चेंडूवर फलंदाज त्रिफळाचित झाला. बिनबाद ५९ वरून ३ बाद
६०! जणू काही सामना जिंकला अशा आविर्भावात आमच्या खेळाडूंनी मला डोक्यावरच घेतले.

माझा हा पराक्रम बघून दुसर्‍या बाजूने गोलंदाजी करणार्‍याला पण जोर आला आणि त्याने त्याच्या षटकात ५ धावांच्या बदल्यात दोन बळी घेऊन प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली. ५ बाद ६५.
आता आमच्या कर्णधाराला देखिल जोर चढला. माझ्या पुढच्या षटकासाठी(एक षटकाच्या बोलीवर दिलेली गोलंदाजी पुढेही जारी ठेवली. म्हणतात ना, खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान!!!!! अशी माझी स्थिती होती.) त्याने सगळ्या खेळाडूंना फलंदाजाच्या अंगावर घातले. चारी बाजूने वेढलेला फलंदाज म्हणजे जणू काही पिंजर्‍यात अडकलेला पोपट अशी अवस्था करून टाकली. त्याचा परिणाम असा झाला की भितीनेच तीन फलंदाज एकाही धावेची भर न घालता माझ्या त्या षटकात बाजूच्या क्षेत्ररक्षकांकडे झेल देऊन तंबूत परतले. ८ बाद ६५.

राहिलेले काम दुसर्‍या गोलंदाजाने पूर्ण केले. त्याबदल्यात ३ धावा दिल्या आणि ६८ ह्या धावसंख्येवर आम्ही प्रतिस्पर्ध्याला चीत केले. माझ्या गोलंदाजीचे पृथ्थकरण होते... २ षटकं, १ निर्धाव, ११ धावा आणि सहा बळी!!!!!!!!! मंडळी आजवरचा माझा खेळ बघता माझ्यासाठीच हे सगळे स्वप्नवतच होते; पण तितकेच ढळढळीत सत्य होते. त्यानंतर दोन दिवस मी तर हवेतच तरंगत होतो.

आमच्या विजयाप्रित्यर्थ आमच्या कर्णधाराने मग आम्हाला उपहारगृहात नेऊन यथेच्छ खाऊ घातले. माझे तर विशेष कौतुक होत होते.
ह्याला आधीच गोलंदाजी द्यायला हवी होती! असे दहादा तरी बोलून दाखवले असेल. नंतर मला त्याने स्वत:च्या खांद्यावर बसवून वाडीभर मिरवणूक काढली होती.

(ह्या भांडवलावर मला निदान रणजीसाठी मुंबईच्या संघात जागा द्यायला हवी होती की नाही????
पण सगळीकडे वशिलेबाजी हो! जाऊ दे झालं! पुढची गोष्ट सांगेन पुन्हा केव्हा तरी!)