माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ ऑगस्ट, २००९

रामप्रहर !

सकाळी सकाळी दिसणारी काही नेहमीची आणि काही बदलणारी दृष्यं.
सकाळी साधारण ६च्या सुमारास घरातून निघतो तेव्हा रस्ता...हमरस्ता असूनही तसा शांत शांत असतो. काही तुरळक रिक्षावाले(मुंबईत ऑटो रिक्षाला ’रिक्षा’ म्हणतात)रस्त्याच्या कडेला आपल्या रिक्षा लावून त्यात अंगाचं मुटकुळं करून झोपलेले असतात. तर काही टॅक्सीवाले टॅक्सीचे मागचे दोन्ही दरवाजे उघडे टाकून चांगले पसरून झोपलेले असतात. रस्त्यावरून एखाद दुसरी बस,रिक्षा किंवा खाजगी मोटार धावत असते. नाही म्हणायला अधून मधून दूधाच्या गाड्या,टॅंकर्स वगैरेंची लगबग दिसून येते. नाक्या नाक्यावर असणार्‍या चहाच्या टपर्‍यांपैकी मोजक्याच सुरु झालेल्या असतात.
घरोघरी दूधाचा रतीब घालणारे दूधवाले(हे बहुतेक करून राजस्थानी मारवाडी असतात. दोन्ही कानात सुंकल्या/रिंगा किंवा फिरकीची छोटी बटणं घातलेली असतात.)सायकलीवरून इथे-तिथे जाताना दिसतात. मधेच एखाद्या ठिकाणी परस्पर विरुद्ध दिशेने जाणारे दोघे दूधवाले थांबून एकमेकांची विचारपूस करतात/तंबाखूची देवघेव करतात.
सायकलींच्या मागे वृत्तपत्रांचे गठ्ठे लादून जाणारी मुलं देखिल अशा वेळी जागोजागी दिसतात.

एका छोट्याश्या दुकानापुढे आठवड्यातील तीन-चार दिवस(एक दिवसाआड) सुमारे ५०-६० लोकांची रांग लागलेली दिसते. आधी कल्पना नव्हती की ही रांग कशासाठी असते....मग कळले की तिथे काविळ उतरवली जाते म्हणून. गेली जवळ जवळ ४-५ वर्षे मी हे अव्याहतपणे चाललेले पाहत आहे. ह्याचा अर्थ मुंबई सारख्या शहरात..जिथे पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून पुरवले जाते....तिथेही बारामाही काविळीचे रोगी आढळावेत ह्यापेक्षा नामुष्की ती कोणती. अशा तर्‍हेने कावीळ खरंच उतरवता येते की नाही?....ह्याबद्दल मला जरी शंका असली तरी तिथली गर्दी मात्र कधीच आटत नाही.

प्रभातफेरीला निघालेली बरीच मंडळी हलके हलके दिसायला लागतात. रोज भेटणार्‍यांत एक असं जोडपं आहे की त्यातला नवरा जवळपास सहा-सव्वासहा फूट उंच आहे आणि बायको मात्र जेमतेम पाच फूट असावी. दोघेही शेलाट्या बांध्याची आहेत. दूरून पाहिले तर कुणी महाविद्यालयीन युवक-युवतीची जोडगोळी येतेय असे दिसते. मात्र जवळ आल्यावर चेहर्‍यावरून कळतं की दोघेही चांगलेच वृद्ध आहेत..अगदी माझ्यापेक्षाही. पण दोघांची चाल मात्र माझ्यापेक्षा खूपच जलद आहे.ह्या प्रभात फेरीला निघालेल्यात सर्व प्रकारची लोकं दिसतात. जाडजूड,महाकाय आकाराच्या व्यक्तींपासून ते अगदी वृद्धपणाने जेरीस आलेल्या आणि कमरेत वाकलेल्या लोकांची हजेरी देखिल लक्षणीय असते.

अजून एक हमखास दिसणारी व्यक्ति म्हणजे एक जाडजूड गुजराथी आजीबाई. त्यांना फार दूरवर नसलेल्या एका देवळात जायचं असतं पण पायी जाण्याऐवजी त्या रिक्षानेच जाणे पसंत करतात. आधी त्या रिक्षावाल्याशी बोलतात,भाव करतात...कारण त्यांना जिथे जायचे असते त्यासाठी कमीत कमी असलेले रिक्षाचे ९ रुपये भाडेही त्यांना जास्त वाटत असते. पाच रुपयात जो रिक्षावाला न्यायला तयार असेल त्याच्याच रिक्षात त्या बसतात. तसा कुणी गडी तयार होईपर्यंत त्या आजीबाई रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक रिक्षावाल्याशी हुज्जत घालायला तयार असतात.

अजून एक हमखास दिसणारा नमुना....हा माणूस टूथब्रशने दात घासत घासत रस्त्याने जात असतो. सगळ्या मुखरसाने तोंड माखलेले असते आणि हनुवटीवरून तो गळत असतो तरी त्याचे दात घासणे जोरजोरात सुरूच असते. तो खूप लांबवरून येत असावा. कारण मला तो नेहमी वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतो. राहतो कुठे आणि नेमका जातो कुठे..ते बाकी माहित नाही.

एक बंगाली बाबू. पन्नाशीचा असावा. गेली जवळपास दहा वर्षे पाहतोय त्याला. तो रोज जॉगिंग करतो. रोज किमान पाचसहा किमी तरी तो धावत असावा पण पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच्या आणि आताच्या त्याच्या अवस्थेत काहीही फरक दिसत नाहीये. उन्हाळा-पावसाळा आणि थंडी असली तरी हा बाबू नित्यनेमाने रस्त्यावरून धावताना दिसणारच दिसणार. पहिले काही दिवस त्याच्या बरोबरीने धावणारे काही उत्साही लोक आता मात्र चुकूनही दिसत नाहीत.

अशीच गंमत जंमत पाहात रमत गमत मी व्यायामशाळेत जातो. साधारण तासभर व्यायाम करून परत यायला निघतो. आता रस्ते वाहनांनी,माणसांनी,शाळकरी,महाविद्यालयीन मुलांमुलींनी तुडूंब भरलेले असतात.शाळांच्या गणवेशाचे ते रंगीबेरंगी प्रकार,त्यातली ती छोटी-मोठी मुलं-मुली म्हणजे जणू रंगीबेरंगी फुलपाखरं वाटत असतात. कुणी आईबरोबर, कुणी बाबांबरोबर, मोठ्या भावा/बहिणी बरोबर हात धरून पाठीवरची दप्तरं, हातातली पाण्याची बाटली, छत्री वगैरे आयुधं घेऊन लगबगीने चालत असतात. आता रस्त्यावर अधून मधून फेरीवालेही बसलेले दिसायला लागतात. केळीवाले,भाजीवाले,चहावाले एकेक एकेक आपापल्या ठरलेल्या जागी स्थानापन्न व्हायला लागतात. काही भिकारीही आपापल्या ठरलेल्या जागांवर बसून बोहनी कधी होते ह्याची वाट पाहात असतात.

आपली धोपटी घेऊन काही न्हावी गिर्‍हाईक शोधण्यासाठी बाहेर निघालेले दिसतात. तर काही भटजीलोक सुस्नात होऊन आणि गंध-टिळे लावून पुजे-अर्चेच्या कामगिरीवर निघालेले असतात. जैन धर्मीय पुरूष तलम रेशमी वस्त्र परिधान करून हातात एक स्टीलची छोटी पेटी घेऊन आणि स्त्रिया डोक्यावर पदर आणि हातात बटवा घेऊन अनवाणी पायाने मंदिरांकडे कूच करत असतात.

हे सगळं पाहात आणि अनुभवत मी घरी परततो. घरात शिरल्यावर मात्र सगळं शांत शांत असतं. बाहेरच्या जगाची चाहूलही इथून लागत नाही. तो गजबजाट,ती लगबग मला आवडतेच आणि ही शांतताही मला आवडते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: