कॉफी पिऊन खाली उतरणार होतोच,तेवढ्यात भटक्या वाजला...कन्या म्हणत होती...बाबा कुठे आहात? आम्ही आता माल रोडवर आलोय.
मी इथेच आहे माल रोडवर..इथे कोपर्यावरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे. आत्ताच कॉफी प्यायली,आता उतरतोच खाली आणि येतो दोन मिनिटात.
मनालीच्या त्या गजबजलेल्या मालरोडवर मंडळींना शोधायला जरा वेळ लागला खरा...पण शोधलं ! मंडळी एका रस्त्यावरच्या दुकानाबाहेर उभी राहून पाणीपुरी खात होती. त्यांचं पाणीपुरी खाऊन झाल्यावर मग मंडळी ’मोमोज’ शोधायला लागली...तेही मिळाले ...मग तिथे दहापंधरा मिनिटं घालवली...मोमोज..हा प्रकार मी पहिल्यांदा ऐकला...काय तर म्हणे... मोदकाचा चिनी अवतार...त्यातही शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकार असतात म्हणे...असंही कळलं.
मला पाणीपुरी कधीच खावीशी वाटत नाही आणि मोमोज वगैरेसारख्या आधी कधीच न ऐकलेल्या/खाल्लेल्या प्रकारांच्या वाटेलाही मी कधी जात नाही...खाण्यात प्रयोग करण्याच्या मी विरुद्ध आहे अशातला भाग नाहीये...पण आजवर खात आलेल्या पारंपारिक पदार्थांनीच मला इतकं समाधान दिलंय की अजून नवीन काही खाऊन पाहावं असं अजिबात वाटत नाही....कदाचित त्यामागे दुसरीच भिती ही असावी...वशाट असण्याची. असो...पण तिथे मात्र त्या त्या दुकानांबाहेर गिर्हाईकांची अगदी झुम्मड उडालेली दिसत होती....एकेकाच्या चेहर्यावरचे ते तृप्ततेचे आणि कृतकृत्यतेचे भाव टिपण्यात(प्रग्रात नव्हे) मला मजा वाटत होती.
मनालीच्या मालरोडवर आम्ही तासभर हिंडलो. मला स्वत:ला काहीच खरेदी करायची नव्हती पण बरोबरची मंडळी..खास करून स्त्रीवर्ग...हे बघ,ते बघ! कुठे भाव विचार! कुठे भाव करत...पण काहीही न घेता पुढे पुढे सरकत होती...मी तिथे आलेल्या आमच्यासारख्याच इतर प्रवासी मंडळीतलं वैविध्य पाहात होतो. स्थानिक मंडळी आणि प्रवासी मंडळी ह्यांच्यातला फरक मात्र चटकन कळून येत होता....आमच्यासारखेच गटागटाने,रेंगाळत चालणारे,दुकानात डोकावणारे बहुसंख्य हे प्रवासीच होते आणि विक्रेते,फेरीवाले,ठेलेवाले,इत्यादि बहुतेक स्थानिकच होते....मोठ्या दुकानात मात्र पंजाबी आणि सरदारजी लोकांची मालकी दिसत होती.
फिरून फिरून मंडळी थकली होती. आमची गाडी जिथे उभी केली होती तिथून आम्ही कितीतरी दूर आलेलो...मग काय चालकाला भ्रमणध्वनीवरून आमचा पत्ता कळवला आणि गाडी तिथेच आणायला सांगितली. दहा-पंधरा मिनिटात गाडी आली....आम्ही त्यात आम्हाला कोंबलं आणि निघालो आमच्या वसतीस्थानाकडे.
ही आमची मनालीतली आणि एकूणच प्रवासातली शेवटची रात्र होती. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून चंडीगढकडे प्रस्थान ठेवायचं होतं(मनाली-चंडीगढ ३२० किमीचा,साधारणपणे १० तासांचा प्रवास होता)...
उशीरा निघालात तर रस्त्यात रहदारीत अडकून पडाल...हे आमच्या पहिल्या चालकाचे शब्द आमच्या कानात गुंजत होते. दुसर्या दिवशी संध्याकाळी ७.२० चे विमान पकडायचं होतं आणि उशीरात उशीरा ६-४०ला विमानतळावर पोचणं गरजेचं होतं...त्याआधी चंडीगढात पोचून काही स्थानिक खरेदी करण्याचा मंडळींचा मनसुबा होता... त्यामुळे ह्या चालकाला गाडी सकाळी सहा वाजता आणायला सांगून आम्ही हॉटेलात परतलो...गरमागरम आणि स्वादिष्ट जेवण आमची वाट पाहात होतेच....त्याचा रसास्वाद घेत जेवण उरकलं आणि आपापल्या खोल्यात दाखल झालो.
मी पुन्हा एकदा खोलीच्या सज्जातून समोर दिसणारे दृश्य टिपायचा प्रयत्न केला...खरं तर आता अंधाराचेच साम्राज्य होते...पण तरीही दूरवर दिसणारी हिमशिखरं अका अनामिक प्रकाशाने चमकत होती...प्रग्रा आपल्याला काहीही दाखवो पण एक मात्र खरं की आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते तसंच्या तसं प्रग्रात कधीच कैद होत नसतं...प्रग्राचे तंत्रज्ञान कितीही अद्ययावत का असेना अजूनही आपल्या डोळ्याशी ते बरोबरी करू शकलेले नाहीये हे माझे प्रांजळ मत आहे.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही सगळी आन्हिकं उरकून,चहापाणी घेऊन तयार झालो पण गाडीचालकाचा पत्ताच नव्हता....त्याच्याशी संपर्क साधण्याचा एक दोन वेळा केलेला प्रयत्न फोल ठरला...हा माणूस असा मध्येच कुठे गायब होतो कुणास ठाऊक? काहीच कळायला मार्ग नव्हता...होता होता सात वाजता तो हजर झाला...आम्ही पटापट गाडीत सामानासह आम्हाला कोंबून घेतलं आणि गाडी निघाली.... मनालीला टाटा करून..चंडीगढकडे.
वाटेतली तीच निसर्गदृश्ये पुन्हा डोळ्यात साठवत,काही प्रग्रात टिपत आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वातावरण खूपच आल्हाददायक होते. सोबतीला बियास होतीच....जातांना ती आमच्या उजव्या अंगाला होती...आता डाव्या. तिची विविध रूपं आता मला जवळून टिपायला संधी मिळत होती...ती मी कशी सोडणार?
मध्ये एका ठिकाणी आम्ही एका ढाब्यावर न्याहारीसाठी थांबलो....गरमागरम पराठे आणि कॉफीचा आस्वाद घेऊन पुन्हा पुढचा प्रवास सुरु केला. अधून मधून आमच्या पहिल्या चालकाचा फोन येत होता...तो मंडीला आमची वाट पाहात उभा होता....तिथून थेट चंडीगढ विमानतळावर नेऊन सोडेपर्यंत तो आमच्याबरोबर राहणार होता...तो आमची केव्हापासून तिथे वाट पाहात उभा होता....त्याच्या अंदाजानुसार आम्ही तिथे आत्तापर्यंत पोचायला हवे होतो....पण आधीच निघायला उशीर झालेला आणि त्यातही रस्त्यावरची रहदारी थोडीफार वाढलेली असल्यामुळे....आम्ही न्याहारीसाठी वाटेत अर्धा तास थांबल्यामुळे...अशा एकूणच सगळ्यांमुळे उशीर वाढत चाललेला होता.
शेवटी एकदाचे आम्ही मंडीला पोचलो...साधारण नऊ वाजल्यापासून तो आमची वाट पाहात होता आणि आम्हाला पोचायला वाजले होते पावणेअकरा! दोन्ही चालकांचे आपापसात काही तरी गुफ्तगु झाले...सूत्रबदल झाला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली...चालकाचे काय बिनसले होते कुणास ठाऊक तो थोड्या थोड्या वेळाने आम्हाला सुनावत होता..इतका उशीर केलात,आता रहदारीत नक्की फसणार...तुम्हाला पोचायला उशीर झाला तर माझ्याकडे दोष नाहीये.....मनालीहून निघतांनाच चालक एक तास उशीरा आला वगैरे आम्ही सांगूनही तो आपले तेच पालूपद ऐकवत बसला...आता उशीर झाला तर मला दोष देऊ नका.
शेवटी मी त्याला सुनावले....तू तुझे काम कर निमूटपणे...जे काही घडलं त्याला कोण जबाबदार वगैरे बाबी दे सोडून...जे व्हायचं ते होईल...चल पुढे!
तेव्हा कुठे तो गप्प बसला आणि आपल्या कामाकडे नीटपणे लक्ष देऊ लागला.
रस्त्यावर तशी खूप काही वर्दळ नव्हती पण आमच्या पुढे चालणार्या वाहनांमुळे गाडीच्या वेगावर मर्यादा येत होती..कारण अधून मधून उलट्या दिशेने येणार्या काही वाहनांमुळे कधी कधी चालकाला गाडी पुढे काढता येत नव्हती....तसा चालक कुशल होता त्यामुळे त्यातूनही तो वाट काढत गाडी दामटत होता....वाटेत भेटलेल्या कैक वाहनांना मागे टाकत तो आपल्या कुशल सारथ्याचे प्रदर्शन करत होताच... त्यामुळे माझी खात्री होती की गाडी अशीच धावत राहिली तर आम्ही निश्चितपणे चार साडेचारपर्यंत चंढीगढ शहरात पोचू.
गाडी आता भरधाव धावत होती..वेळेवर पोचू आणि हवी ती खरेदी करायलाही थोडा वेळ नक्की मिळेल याबाबत आम्ही सगळेच आता आश्वस्त झालो होतो...थोड्याच वेळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली की समोरच्या बाजूने येणारी वाहने अदृश्य झालेत आणि आम्ही ज्या दिशेने निघालो होतो त्या दिशेला तोंड करून बरेच मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभे आहेत...आमची गाडी मात्र पुढे पुढे जात होती...इतका वेळ भरधाव जाणार्या गाडीला आता आपल्या पुढे बर्याच छोट्या गाड्या रांगेत हळूहळू चालताहेत हे दृश्य दिसलं आणि पुढे काहीतरी आक्रित घडले असण्याची पुसटशी शंका मनात डोकावायला लागली.
डाव्या बाजूला ट्रकची रांग लागलेलीच होती...त्यातले चालक-साथीदार खाली उतरून निवांतपणे गप्पा हाणत होते...आता शंकेचं रुपांतर खात्रीत झालं...पुढे नक्कीच अपघात झाला होता...ट्रकचालकांकडून कळलं...पुढे एखाद किलोमीटर दूर, एक ट्रक रस्त्यातच आडवा होऊन पडलाय आणि त्यामुळे रस्ता अडवला गेलाय....पण त्यातही एक आशेचा किरण दिसत होता..छोटी वाहनं हळूहळू का होईना त्यातून निसटू शकत होती...होता होता एक क्षण असा आला की छोटी वाहनंही जागची हालेनात...दोन्ही दिशांनी येणार्या छोट्या वाहनांनी त्या चिंचोळ्या रस्त्याचा ताबा घेऊन अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी निर्माण केली होती...कुणीच मागे हटायला तयार नव्हते कारण दोन्ही बाजूंना आता मागे लांबच लांब, वाहनांची रांग लागलेली होती....आता मागे जाणे अथवा पुढे जाणे शक्यच नव्हते....आम्हीही गाडीच्या बाहेर निघून हातपाय मोकळे करून घेतले....गाडीत इतका वेळ वातानुकुलनात बसलेलो..आता तळपत्या उन्हात ,उन्हाचे चटके खात उभे राहिलो...दुसरा पर्यायच नव्हता...गाडी थांबलेल्या अवस्थेत वाकु यंत्रणा सुरु ठेवता येत नव्हती....आता इथे किती वेळ थांबावं लागणार कुणास ठाऊक?
थोड्या वेळापूर्वी मनात रचलेले सगळे मनसुबे हवेत विरले...आता निदान विमान गाठण्यासाठी तरी वेळेवर पोचता येऊ दे...अशी इच्छा आम्ही आपापसात व्यक्त करू लागलो.
आता त्या घाटरस्त्यावर झालेला असा हा अपघात...ह्याबाबत पुढे कोण आणि कशी आणि कधी कारवाई करणार ह्या चिंतेत आम्ही बूडून गेलो....मग बातमी आली की लष्कराला पाचारण केलं गेलंय...त्यांच्या पथकासोबत एक क्रेनही येतेय..ती लवकरच मार्ग मोकळा करेल.
मला प्रश्न पडला की आता हे लष्करी पथक इथे येणार तरी कसे? दोन्ही बाजूचे रस्ते तर वाहनांनी पूर्ण भरलेले आहेत...रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसर्या बाजूला खोल खोलपर्यंत उतार...मग हे लोक काय हेलीकॉप्टरने येणार आहेत काय? अहो,माणसं येऊ शकतील हो हेकॉने पण क्रेन कशी आणणार?
ही लष्कराची तुकडी आमच्या मागून येणार आहे की समोरच्या बाजूने? ह्याबाबतही परस्परविरोधी मतं होती...कुठूनही येऊ देत...पण त्यांच्यासाठी रस्ता कुठे होता?
चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना!
मी मनातल्या मनात,पुलंच्या म्हैस कथेतला संवाद घोळवत बसलो...दुसरं करणार तरी काय अशावेळी?
तेवढ्यात थोडी धावपळ झाली...जो तो आपापल्या गाडीत जाऊन बसू लागला..आम्हीही बसलो...गाड्या चार पावलं...आपलं चार चाकं पुढे गेल्या आणि पुन्हा थांबल्या...आता मात्र पुढे जाईनात..पुन्हा लोक बाहेर पडले...आम्हीही बाहेर पडलो.
साधारण अर्धा तासाने पुढच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवायला लागली....काही लष्करी जवान आणि वाहतूक पोलिस चालत येतांना दिसले...जरा हायसं वाटलं. :)
पण नंतर लक्षात आलं की लष्करी जवान म्हणताहेत...एकेकाने गाड्या थोड्या थोड्या मागे घ्या(सुदैवाने डाव्या बाजूला थांबलेल्या ट्रकवाल्यांनी प्रत्येक दोन ट्रकमध्ये जी जागा सोडलेली होती त्यात जेमतेम एकेक छोटी गाडी मावू शकत होती)...तर वापु म्हणत होते की गाड्या थोड्या थोड्या पुढे घ्या!
दोघांच्यात अजिबात सामंजस्य दिसत नव्हतं..पण गाडीचालकांनी प्रसंगावधान राखून आपापल्या गाड्या दोन ट्रकांच्यामध्ये कशाबशा कोंबल्या....आणि थोड्याफार साफ झालेल्या रस्त्यावरून समोरच्या बाजूने लष्कराच्या तीनचार बस आणि एक क्रेन हळूहळू येतांना दिसल्या....त्यांनी आपली कामगिरी संपवलेली होती..ट्रकला रस्त्याच्या एका कडेला सरकवून...रस्त्याचा एक पदर सुरु केलेला होता आणि आता तिथे वापुची नेमणूक करून आलटून पालटून दोन्ही बाजूच्या दहा दहा गाड्या सोडायला सुरुवात केलेली होती... आता गाड्या हळूहळू हलायला लागल्या...आमची गाडी प्रत्यक्ष अपघातस्थळापाशी पोचायलाच अर्धा तास लागला....पण कसे का असेना...शेवटी तिथून बाहेर पडलोच....पुढेही भरपूर रहदारी असल्यामुळे वेगावर मर्यादा होतीच....वाटेत अडकलेले...रांगेत उभे असलेले शेकडो ट्रक कैक किलोमीटर दूरपर्यंत आम्हाला भेटत होते...त्यावरून असं अनुमान काढता येईल की हा अपघात बराच आधी झालेला असावा....असो. आम्ही निघालो बुवा एकदाचे त्यातून...सहीसलामत!
पुढे साधारण दहा-पंधरा किलोमीटर गाडी अतिशय धिम्या गतीने जात होती...तिथल्या एका गावातून गाडी बाहेर पडली आणि मग रस्ता एकदम साफ मिळाला....मग काय चालक महाशयांनी अशी काय गाडी हाणली की यंव रे यंव!
गाडी जोवर हिमाचलच्या परिसरात होती तोवर सगळा रस्ता डोंगराळ होता...पण तिथून जेव्हा पंजाबात शिरली तेव्हा रस्ता एकदम सपाट दिसायला लागला. मध्ये दूभाजक असलेला लांबरूद रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरपर्यंत पोचलेला सपाट प्रदेश! रस्त्याच्या एका बाजूने संथपणे वाहणारा भाक्रा-नान्गलचा पाट आणि त्या पाण्यावर होणारी शेती...दूरदूरपर्यंत...पाहावे तिथे शेतजमीनच दिसत होती.....हिमाचलमध्ये होतो तोवर हवा गरम असली तरी वारे थंड होते आता इथे हवा आणि वारेही गरम जाणवू लागले..गाडीची वाकु यंत्रणा व्यवस्थित सुरु होती म्हणून ठीक, नाहीतर काही खैर नव्हती.
पंजाबात शिरलो तेव्हा साधारण साडेतीनचा सुमार झालेला...पोटात भूक उसळलेली म्हणून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली....गाडीतून बाहेर आल्याक्षणी उन्हाचा चटका बसला...ढाब्यावर हात धुवायला नळाखाली हात धरला आणि पुन्हा एकदा जोराचा चटका बसला...वरून सूर्य आग ओकत होता,अंग नुसते भाजून निघत होते..त्यावेळचे किमान तापमान ४५ अंशाच्या खाली नक्कीच नसावे...आमच्यासारख्या मुंबईकरांना हा अनुभव नवीनच होता...पण उपायही नव्हता....कसेबसे हात धूवून आत गेलो...जेवणाची मागणी नोंदवली आणि ते येण्याची वाट पाहात बसलो....अचानक आठवण झाली...जेवण येईपर्यंत लस्सी मागवूया...तेवढीच जीवाला शांती मिळेल...बैर्याला पुन्हा बोलावून सगळ्यांसाठी लस्सी मागवली....शिमल्यापासून माझ्या कन्येला लस्सी प्यायची होती...पण तिथला पहिलाच अनुभव खास नव्हता(पाणीदार ताक होते हो...साखर घातलेले) म्हणून मी तिला म्हटलं होतं की आपण पंजाबात पोचलो की तिथे पिऊया....त्यांच्याकडे मस्त लस्सी मिळते...म्हणून तो बैरा जातांना मला त्याला सांगायचं होतं...बाबा रे लाज राख तुझ्या पंजाबची....इथे पंजाबात लस्सी खास असते असे ऐकून आहे...पण पूर्वी
दिल्लीत सरदारजीच्या ढाब्यावर प्यायलेल्या लस्सीने माझी चांगलीच फसगत केलेली होती.
लस्सी खरंच मस्त होती...पहिल्याच घोटात अंतरात्मा शांत झाला....नंतर जेवणही आलं...तेही उत्तम होतं...दोन प्रकारच्या भाज्या,दाल-फ्राय आणि तंदुरी रोटी असा सगळा बेत होता...सोबत कांदा-मुळा-गाजरही होतंच...लस्सीचे घोट घेत घेत जेवतांना मजा आली....तिथल्या त्या विलक्षण गरम हवेलाही आम्ही काही क्षण विसरलो.
जेवण झालं...सगळेजण तृप्त मनाने गाडीत जाऊन बसले...गाडी सुरु झाली...वाकुही सुरु झाले आणि आता पंजाबच्या त्या मोकळ्या आणि प्रशस्त मार्गावरून गाडी भन्नाटपणे धावू लागली....चंढीगढ अमूक किमी...असे अधून मधूने मैलाचे दगड दिसत होते....आम्ही चंढीगढच्या जवळ जवळ जात होतो...चालक इथल्या रस्त्यांबद्दल जाणकार होता .. मध्येच एक रेल्वे-फाटक आले होते..फाटक बंद असल्यामुळे तिथे वाहनांची रांग लागलेली होती आणि रेल्वेगाडी अजून यायची होती....तेव्हा त्याने लगेच आपली गाडी वळवून दुसर्या एका आडवाटेने काढून पुन्हा गाडी मूळ मार्गावर आणली आणि वेळ वाचवला....पाहता पाहता आम्ही चंढीगढमध्ये शिरलो....संध्याकाळचे सव्वापाच वाजून गेले होते....आम्ही जिथून चंढीगढमध्ये शिरलो...त्याच्या दुसर्या टोकाला विमानतळ होता...त्यामुळे संपूर्ण चंढीगढ पार करूनच तिथवर पोचायचे होते....आता संध्याकाळ झाल्यामुळे रस्त्यावरची रहदारीही वाढलेली होती आणि शहरातील वेगमर्यादेमुळे साहजिकच गाडीचा वेगही मंदावलेला होता...चंढीगढमध्ये काहीही खरेदी करण्यासाठी आता वेळ नव्हताच; पण निदान आता आम्ही वेळेवर विमानतळावर पोचणार होतो...हेही कमी नव्हतं....
शेवटी एकदाचे पोचलो विमानतळावर तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते....
खरंच आमचं सुदैव म्हणून त्या वाहतूक खोळंब्यातून आमची वेळेवर सुटका झाली होती..एरवी आम्ही खूप मोठ्या विचित्र संकटात सापडलो असतो...असो...त्यानंतर मग पुन्हा सगळ्या तपासण्या वगैरे करून विमानात बसलो...विमान वेळेवर मुंबईला पोचलं....रात्रीची झगमगती मुंबई विमानातून पाहतांना जणू सूवर्णनगरीच वाटत होती....
विमानतळावरून रिक्षा पकडून घरी पोचलो....
हुश्श! किती बरं वाटलं म्हणून सांगू! कसंही असलं तरी..शेवटी आपल्या घराची सर कशालाच नाही हेच खरं!
इति अलम्!