माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० मार्च, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग १

मंडळी ह्या पूर्वी एकदा मी माझे दिल्ली पुराण आपल्यासमोर सादर केलं होतं. त्यावेळी मी केवळ एक रात्र-एक दिवस दिल्लीत राहिलो होतो. त्यानंतर पुन्हा एकदा साधारण १९८०-८१ दरम्यान तीन चार वेळा  १५-२० दिवसांचे दौरे झाले. आणि त्यानंतर १९८७ साली मी पुढे दीड वर्ष दिल्लीत बदलीवर काढली...तर ह्याच बदलीदरम्यान आलेले काही अनुभव इथे लिहिण्याचा विचार आहे...

माझे लग्न जरा उशीरानेच म्हणजे वयाच्या पस्तीशीत...१९८६च्या डिसेंबरात झाले. विवाहोत्तर आनंदात विहरत असतांना अचानक एप्रिल १९८७ मध्ये...माझी बदली मुंबईहून नवी दिल्लीला झाल्याचा आदेश निघाला. बदली तशी अचानकच होती...अर्थात कारणं मला माहित होती...तत्कालीन कार्यालय प्रमुखाशी माझी झालेली वादावादी आणि मी त्याच्या भ्रष्टाचाराची केलेली जाहीर वाच्यता...त्यामुळे त्याने काही एक खोट्या प्रकरणात मला गुंतवून माझी दिल्लीला बदली करण्यासंदर्भात केलेली शिफारस दिल्लीश्वरांनी उचलून धरली.

मला दिल्लीला जावेच लागणार हे जवळपास निश्चित झालेले होते तरी मी अजून आशा सोडलेली नव्हती कारण माझी बाजू पूर्णपणे सत्त्याची होती...आजवरचे,  ह्याआधीच्या वरिष्ठांचे माझ्याबद्दलचे सर्वथा अनुकुल मत..जे  माझ्या आजवरच्या प्रत्येक वार्षिक वैयक्तिक अहवालात नोंदले गेलेले होते...तसेच इतर सहकार्यांबरोबरचे स्नेहसंबंध वगैरे लक्षात घेता...माझ्या बाजूने बरेच अनुकुल ग्रह होते ह्याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. म्हणून मी दिल्लीश्वरांकडे माझे निवेदन पाठवले...त्यात सत्य परिस्थितीसोबत इतरही काही गोष्टी त्यांच्या नजरेस आणल्या की ज्यावरून त्यांची खात्री व्हावी की ही बदलीची शिफारस निव्वळ आकसाने झालेली आहे.

माझा अर्ज दिल्लीत पोचला आणि त्यातील मजकूर पाहून त्याची शहानिशा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने पूर्ण शोध घेऊन निकाल माझ्या बाजूने दिला आणि मला जरा हायसे वाटले...आजवर केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधानही झाले. आता बदली रद्द होणार हे नक्की झाले...पण

हा पणच नेहमी आडवा येतो. इथेही असेच झाले. समितीच्या निर्णयाची एकेक प्रत दिल्लीश्वरांनी मला,आमच्या कार्यालयाला तशीच आमच्या दिल्लीतील सर्वोच्च अधिकार्‍याला पाठवली. आमच्या कार्यालयात ती प्रत येताच  माझ्या वरिष्ठाने हा प्रश्न आपल्या प्रतिष्ठेचा बनवला आणि त्याप्रमाणे आमच्या दिल्लीतील सर्वोच्च साहेबांना साकडे घातले. हे आमचे सर्वोच्च साहेब अधून मधून मुंबई दौर्‍यावर यायचे तेव्हा त्यांची आणि माझीही थोडीफार ओळख होतीच...पण आमच्या स्थानिक साहेबांमध्ये एक लोकोत्तर गुण होता...तो म्हणजे चमचेगिरी...आणि ह्या जोरावर आजवर दिल्लीहून आलेल्या कोणत्याही साहेब मजकुरांच्या सरबराईत त्यांनी कधी कुचराई केलेली नव्हती...त्यामुळे दिल्लीश्वरांचीही त्यांच्यावर विशेष मेहेरनजर होती.

योगायोग म्हणजे मी,आमचे स्थानिक साहेब आणि दिल्लीतील सर्वोच साहेब....हे तिघेही मराठी होतो. माझ्याबद्दल आमच्या दिल्लीच्या साहेबांचे वैयक्तिक मत अतिशय अनुकुल होते...हे मला पुढे काही कारणाने त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले..ते येईलच पुढे....
हं तर काय सांगत होतो... आमच्या स्थानिक साहेबांवर वरिष्ठांची असलेली मर्जी...आणि आता तीच त्यांनी वापरायची असे ठरवल्यामुळे...दिल्लीश्वरांना साहजिकपणे त्यांची बाजू घेणे भाग पडले आणि ...नाही,हो...करता माझ्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले..  :(

आजवरच्या माझ्या निष्कलंक चारित्र्य आणि कामातील सचोटी वगैरेचा झालेला तो दारूण पराभव मला पचवणे अत्यंत कठीण होते...पण काय करणार? सरकारी नोकरी करायची तर काही कायदे पाळावे लागतात..ते खरे तर अलिखित आहेत...ते असे की...
साहेब नेहमी बरोबर असतो....तो बरोबर नसला तरी...तो बरोबरच असतो हे लक्षात ठेवायचे.
साहेब आणि गाढव ह्यांच्या पुढे आणि मागे उभे राहतांना सुरक्षित अंतरावर उभे राहावे...आणि
कधीही नकार देऊ नये....नकार देणे हा दंडनीय अपराध आहे....काम करायचे नसेल तरी होकार देऊन काम करू नका...इत्यादि इत्यादि.

आणि मी हे कायदे माहित असूनही पाळणारा नव्हतो. खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणतांना मी कुणाची कधीच भीडभाड बाळगली नव्हती. अर्थात त्याची जी काय असते ती सजा आता मला भोगावी लागतच होती.
काही सहकार्यांनी,हितसंबंधियांनी माझे मन वळवायचा निष्फळ प्रयत्नही करून पाहिला....अरे,जाऊ दे सोडून दे रे,मागून टाक माफी...कशाला उगाच भिंतीवर डोकं आपटतोस..वगैरे वगैरे...पण मी आधीच वैतागलो होतो...असत्याचा सत्यावर होत असलेला ढळढळीत विजय पाहून...त्यात हे असले सल्ले....मी त्यांना सांगितलं...मित्रांनो तुमच्या भावना मला समजतात....तरीही मी जी काही तत्व आजवर पाळत आलोय त्यात हे बसत नाही...आणि भ्रष्टाचार्‍याची माफी...तेही माझी कोणतीही चूक नसतांना मागायची...हे कधीच होणार नाही. ही लढाई आता खर्‍या अर्थाने सुरु झालेय...मी जाईन दिल्लीला आणि तिथून लवकरच विजयी होऊन परतेन...ह्याच्या उरावर बसण्यासाठी...

२३ मार्च, २०१०

भेट...हेमा मालिनीची !


त्यादिवशी आम्ही मित्र मित्र चहा पितांना गप्पा मारत बसलो होतो.  इतक्यात कार्यालयाचा मुख्य दरवाजा उघडून एक तरूण आत आला. दरवाजाजवळ बसलेल्या पाहारेकर्‍याला तो काही विचारत होता. काळा कुळकुळीत पण तकाकणारा रंग, मोत्यासारखे चमकणारे पांढरे शुभ्र दात,  भरपूर तेल लावून चप्प बसवलेले काळेभोर केस,  सडसडीत देहयष्टी आणि साधारणपणे पावणेसहा फूट उंची अशा त्या युवकाकडे पाहताच आमच्या गप्पा थांबल्या आणि ’हा,कोण बरे असेल?’  ह्याबद्दलचा कयास सुरु झाला.
आय ऍम माणिक्यम्म! केम फ़्रॉम मॅड्रास. आय हॅव कम हियर टू जॉईन ड्युटी.

एका दमात त्याने हे म्हटलं आणि आमच्या प्रतिक्रियेसाठी तो क्षणभर थांबला.

ए काल्या, मद्राससे आयेला है क्या तू?...इति पदू.

पारडन? व्हॉट इज ही सेयिंग?

त्याने माझ्याकडे पाहून प्रश्न केला.

पदूने वापरलेले ’काल्या’ हे विशेषण त्याला बहुदा कळले नसावे म्हणून मी त्याला माझ्या धेडगुजरी इंग्लीशमध्ये सांगितले... ए ब्लॅक्या, यू केम फ़्रॉम मद्रास, काय रे?

माझं ते इंग्लीश त्याला कितपत कळलं कुणास ठाऊक पण तो उद्गारला...यास सार.

पुढे जास्त काही न बोलता आम्ही त्याला शिपायामार्फत मोठ्या साहेबाकडे पाठवलं.ए पदू, अरे आल्या आल्या त्या नव्या प्राण्याला तू एकदम ’काल्या’ असं का म्हटलंस. अरे, त्याला हिंदी कळलं नाही म्हणून बरं नाहीतर इथेच वादावादी सुरु झाली असती.

अरे जा रे. तिच्यायला तो पानीकम काय करणार आहे मला.  एका झापडेत आडवा करीन त्याला...पदू .

अरे पण तो आत्ताच आलाय ना, मग निदान त्याची नीट ओळख होईपर्यंत तरी तू थांबायचंस, इतक्यात काल्या, पानीकम वगैरे विशेषणंही लावून मोकळा झालास. बरं दिसतं का ते.

असो.ही होती माणिक्यम्मची आणि आमची पहिली भेट. पण ह्या पहिल्या भेटीतच पदूने त्याला दिलेली नावं पुढे आमच्या तोंडी रुळली.ह्या माणिक्यमला हिंदी अजिबात येत नव्हते त्यामुळे त्याच्या काळ्या रंगावर अगदी प्रच्छन्नपणे टिकाटिपणी होत असायची.

आम्ही त्याच्यावर काहीतरी टिपणी करून हसायचो....तोही आमच्या हास्यात सामील व्हायचा. बिचार्‍याला कुठे माहीत होते आम्ही का हसतो ते.एकदा पदूनेच विषय काढला..त्याने एका हिंदी सिनेमाची..बहुदा ’जॉनी मेरा नाम’ची कहाणी सांगायला सुरुवात केली.  त्याच्या सांगण्यात चित्रपटाची कथा कमी आणि हेमामालिनीचेच वर्णन जास्त होते.

अरे काय सांगू तुम्हाला,  ती हेमा काय चिकनी दिसते रे?  आपण तर तिच्यावर पागल झालोय.  रात्री तिचीच स्वप्ने.. वगैरे वगैरे.

पदूची गाडी सिनेमा सोडून अशी भलतीच वळलेली आम्ही नेहमीच पाहायचो.  आम्हाला त्यात नावीन्य नव्हतेच. आत्तापर्यंत पदूने काय सांगितले ते माणिक्यमला काय कळले कुणास ठाऊक.  कारण पदूच्या बोलण्यात जास्तीत जास्त मराठी, थोडी हिंदी आणि चिमूटभर इंग्लीश...अशी सगळी खिचडी असायची.

पण ’हेमामलिनी’ हे पाच अक्षरी नाव मात्र माणिक्यमला नक्कीच कळले...कारण तिचे नाव जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा हा चक्क लाजत होता. पदू सांगण्यात रंगलेला आणि हा न समजूनही ऐकण्यात रंगलेला...माझ्या लक्षात जेव्हा त्याचे हे लाजणे आले तेव्हा मी आमच्या इतर मित्रांना हळूच ढोसून खुणावले आणि मग आम्ही त्याचे ते ’लाजणे’ मोठ्या रसिकतेने पाहू लागलो.  बर्‍याच वेळानंतर एकदाची पदूची गोष्ट संपली आणि तो शांत झाला तरीही माणिक्यम मात्र अजूनही आपल्याच रंगात होता. त्याला अजिबात न कळू देता आम्ही सगळे तिथून दूर गेलो आणि दूरूनच त्याचे ते भावविभ्रम पाहायला लागलो.


ह्यानंतर माणिक्क्यम आजूबाजूला असला की आम्ही उगाचच हेमामालिनीचा विषय काढायला लागलो. त्यातून आमच्यातला चिंटू तर एक नंबर फेकमास्टर होता.  तो फर्ड्या इंग्लीशमध्ये हेमामालिनी आणि धर्मेंद्रच्या, जितेंद्रच्या, संजीवकुमारच्या असलेल्या नसलेल्या लफड्यांविषयी काही बोलायला लागला की माणिक्क्यम त्याच्याकडे नुसता आशाळभूतासारखा पाहात राहायचा.  हेमामालिनी आणि धर्मेंद्रला आपण कशी मदत केली, त्यांना एकमेकांना गुपचूप कसं भेटवलं वगैरे खोट्या गोष्टी तिखटमीठ लावून चिंटू जेव्हा सांगायला लागला तेव्हा माणिक्क्यमने त्याच्याकडे हट्टच धरला..

आय वॉंट टू मीट हॅमामालिनी. शी इस फ़्राम माय विलेज. प्लीस टेक मी देअर.

हॅ ! शी वोंट मीट यु.  शी डोंट लाईक ब्लॅक कलर....चिंटुने त्याला एका फटक्यात झटकून टाकले.

नो नो ! माय कलर इस ब्लॅक बट आय लव हर व्हेरी मच. प्लीस, वन्स ओन्ली यु टेक मी टू हर. आय वॉंट टू मॅरी हर.

ए काल्या, च्यायला, उगाच दिवास्वप्न पाहू नकोस.  काही झालं तरी ’ती’ आपला माल आहे काय?  उगाच मधेमधे आलास ना तर तंगड्या मोडून ठेवेन. जा जरा आरशात चेहेरा पाहून ये.  म्हणे हेमामालिनीशी लग्न करायचंय.  आम्ही काय इथे रिकामे बसलोय काय?...पदू गरजला.  माणिक्क्यमला त्यातले ’हेमामालिनी’ सोडले तर काहीच कळलं नाही.

आम्हीही हे प्रकरण हसून सोडून दिले. पण माणिक्क्यम चिंटूच्या मागेच लागला.  एकदा तरी भेट घडवून दे रे असे विनवू लागला. एकीकडे आम्हाला त्यात मजाही वाटत होती पण दुसरीकडे चिंटु  वैतागला होता.  आता ह्याचा हा त्रास कायमचा कसा बंद करायचा ह्यावर मग आमचा खल सुरु झाला.एक दिवस शिपायामार्फत माणिक्क्यमला निरोप गेला...मोठ्ठ्या साहेबांनी बोलावलंय म्हणून.
माणिक्क्यम तर एकदम गारच पडला. ततपप करत शिपायाला विचारायला लागला...का बोलवलंय साहेबांनी?
शिपायाला त्याची भाषा कळली नाही तेव्हा तो त्याला आमच्यातल्याच एका खालच्या साहेबाकडे घेऊन गेला आणि त्या साहेबाच्या हवाली करून तो शिपाई निघून गेला.

यस, मिस्टर माणिक्क्यम. व्हॉट इज दि पोब्लेम?.. हा साहेब गुजराथी होता.

सार, ही(शिपाई) टोल्डेड मी दॅट बिग बॉस कॉल्ड मी.  सार,आय हॅव नाट डन येनी मिस्टेक सार.

सिट डाऊन मिस्टर माणिक्क्यम. आय विल टेल यु युवर मिश्टिक.

माणिक्क्यम तर रडायलाच लागला.  आपण नेमकी काय चूक केली ते त्याला अजिबात आठवेना आणि आता हा साहेबच सांगतोय की आपण काही तरी चूक केलेय तेव्हा आपली काही धडगत नाही. तिथे तो बिग बॉस आपल्याला ढुंगणावर लाथ मारून काढूनच टाकणार. ..आता काय करावे? :(

काहीच न सुचून माणिक्क्यमने...नाही पाणीकमने...आता इथे सगळ्यांच्या लक्षात आले की हा माणूस किती घाबरट आहे ते....
 पाणीकमने तर टेबलाच्या खाली जाऊन अक्षरश: साहेबाचे पाय धरले.

सार, प्लीस सेव मी, सार!

भटसाहेबांनी...अरे हो, सांगायचेच राहिले, ह्या गुजराथी साहेबांचे नाव होते भटसाहेब....
तर मग, भटसाहेबांनी त्याला टेबलाच्या खालून बाहेर काढले आणि थोडा उपदेश केला आणि...माफही करून टाकले.

चूक नाही, मग माफी कसली?
चक्रावलात ना? अहो, हा भट आमच्यातलाच, जरासा वरिष्ठ होता. त्याला आम्ही आमच्या नाटकात घेतले होते. माणिक्क्यममध्ये किती पाणी आहे ते जोखण्यासाठी हे सगळे नाटक होते.

संपली गोष्ट?
नाही हो. आता तर खरी गोष्ट सुरु होतेय...ही गण गवळण होती असे समजा.... आता कुठे खर्‍या वगाला सुरुवात होतेय.


त्या दिवसापासून पाणीकम आमच्यात असूनही नसल्यासारखा वागू लागला. तो खूप घाबरलेला होता. कारण भटने त्याला माफ करताना थोडे घाबरवून ठेवले होते. इथे, बाहेरच्या कुणाची भेट घ्यायची असेल तर पहिल्यांदा वरिष्ठांची लेखी परवानगी घ्यावी लागते. तसे नाही केले तर फार मोठा गुन्हा समजला जातो...वगैरे पोकळ धमक्याही त्यात सामील करून ठेवल्या होत्या.

पाणीकमच्या जीवाची तगमग आम्ही पाहातच होतो. हेमामालिनीचे नाव निघताच तो सैरभैर व्हायचा. शेवटी सगळा धीर एकवटून त्याने पुन्हा चिंटुला तिच्याशी भेट घडवून द्यायची विनंती केली.....आला उंदीर सापळ्यात.

चिंटुने त्याला ऑफिस प्रोसिजरची...साहेबाच्या लेखी पूर्व परवानगीची आठवण करून दिली.
मग आता?  तिला भेटायचे तर अर्ज कसा लिहायचा..ह्याची जुळवाजुळव सुरु झाली. आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या, अर्ज कसा लिहायचा ते त्याला सांगायला सुरुवात केली...

हं लिही... रिसपेक्टेड सर, विथ युवर काईंड परमीशन आय विश टू सी फिल्म स्टार हेमामालिनी.....वगैरे वगैरे.

पाणीकमने जमेल तेवढ्या सुवाच्च्य अक्षरात तो अर्ज लिहिला. आता अर्ज साहेबांकडे कसा पाठवायचा? सरळसरळ मोठ्या साहेबांकडे जाण्याची हिंमत कोण करेल? मग भटसाहेबांकडे अर्ज सुपूर्त केला. भट साहेबांनी, आपण अर्ज वाचून मग वर पाठवू.. असे आश्वासन दिले....वर, तुला परवानगी देखिल मिळवून देतो असेही मधाचे बोट लावले.

भटसाहेबांच्या खोलीतून पाणीकम बाहेर आला तोच मुळी आनंदित होऊन.

भटसार इस वेरी वेरी काईंड. गॉड ब्लेस हिम... वगैरे वगैरे बडबडून त्याने त्याची खुशी जाहिर केली.

आम्ही लगेच त्याच्याकडे चहाची पार्टी मागितली. जणू काही परवानगी मिळालीच अशा थाटात त्याने आम्हा सगळ्यांना चहा पाजला आणि भटसाहेबांना स्वत:हून कॉफी नेऊन दिली.


थोड्या वेळाने भटसाहेबांनी त्याला बोलावून घेतले आणि काही असलेल्या...आणि नसलेल्याही स्पेलिंग मिश्टिक दुरुस्त करून पुन्हा अर्ज लिहून आणायला सांगितले. अर्थात अति उत्साहाच्या भरात पाणीकमने ते केले देखिल.


दोनतीन दिवस काहीच घडले नाही. रोज पाणीकम मोठ्या आशेने वाट पाहात होता..त्या परवानगीची.
तिसर्‍या दिवशी भटसाहेबांनी त्याला बोलावले तेव्हा तो मोठ्या आनंदात त्यांच्याकडे गेला...पण येताना अतिशय निराश होऊन हातात अर्ज घेऊन परत आलेला होता...कारण?


अर्जातली भाषा! ती सरकारी नियमात न बसणारी होती. फारच सरधोपट होती. ही अशी भाषा लिहिली म्हणून परवानगी मिळण्याच्या ऐवजी प्रेमपत्र(मेमो) मिळू शकते...असेही वर भटसाहेबांनी वरच्या साहेबांचा हवाला देऊन... सुनावले होते.

मग आता सरकारी भाषेत कसे लिहायचे? भटसाहेबांसकट आम्ही सगळे पडलो तंत्रज्ञ..त्यामुळे आमचा संबंध यंत्रांशी होता... मग आता आणायची कुठून ती भाषा?

मग एका कारकुनाला आम्ही आमच्या कटात सामील करून घेतले आणि सरकारी भाषेत तो अर्ज कसा लिहायचा त्याप्रमाणे पाणीकमकडून तो अर्ज लिहून घेतला. अर्ज घेऊन पाणीकम भटसाहेबांकडे गेला. अर्जावरून एक नजर फिरवून स्मितहास्य करत भटसाहेबांनी त्याला परवानगी मिळवून देतो असे सांगितले.


त्यादिवशी आमची सगळ्यांची बैठक झाली.
भट म्हणाला, अरे वो *त्या पाणीकम, फिरसे अर्जी लेके आया. इतना कैसा बेवकूफ है ये? और उस दिन टेबलके नीचुसे मेरा पाव पकडा उसने. मेरेको तो हॅंसी आ रही थी.  कैसे भी करके रोक ली मैने. लेकिन अभी करनेका क्या? उसको कुछ तो जबाब तो देना पडेगा ना?

’ना’ करके बोल दो उसे.  पर्मीशन नॉट ग्रॅंटेड ऐसे लिखके दे दो....कारकून म्हणाला.

अबे ए *त्या, ऐसे लिखके कैसे दे सकते है?  ये तो अपना खेल है.  सचमूच का कुछ नही है, और हेमामालिनीको मिलनेके लिये उसके पीएसे मिलना चाहिये...अपना क्या काम है इसमें?..भट उवाच

भटसाब, एक काम करो. पाणीकमको बुलाके उसकी जमके खिंचाई करो. बोलो की बडे बॉसने धमकी दी है की ऐसी हरकते दुबारा करोगे तो नौकरीसे हात धोना पडेगा. परमीशन बिर्मीशन नही मिलेगी.

उपरसे ये भी कहो की मैंने(मतलब आपने) बडे बॉसको कैसे भी समझाया है और तुम्हारे तरफसे(पाणीकमसे) आश्वासन दिया है की आयंदासे पाणीकम इस दफ्तरमें हेमामालिनीका नाम भी नही लेगा....दादा म्हणाला.

नही,उससे अच्छा, ऐसा क्यूं न बोले?...मी म्हटलं.

कैसा?...सगळ्यांनी एकसूरात विचारलं.

हेमामालिनीकी शादी तय हो गई है धर्मेंद्रसे और अभी धर्मेंद्रसे परमीशन माँगनी पडेगी...हेमामालिनीको मिलनेके लिये.

कुत्ते,कमीने,मैं तेरा खून पी जाऊंगा...ऐसा जब धर्मेंद्र बोलेगा तब पानीकमका क्या होगा?...हाहाहा...हसतहसत मी म्हणालो.

त्यावर सगळ्यांनी एकसाथ ह्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्यावर पाणीकमच्या प्रतिक्रियेची कल्पना करून जोरदार हसून घेतले.


माणिक्क्यम,कम हियर!
कॉरिडोरमध्येच भटसाहेबांनी पाणीकमला बोलावून घेतले आणि ते आपल्या खोलीत गेले.
आज्ञाधारकपणे आणि अतिशय उत्साहित होत्साता तो त्यांच्या मागून गेला.

यास सार.

कमॉन,सिट.

भटसाहेबांचा गंभीर चेहेरा पाहून पाणीकम घाबरला. घाबरतच तो खुर्चीत बसला आणि आता साहेब काय सांगणार आहेत ह्याची काळजीयुक्त उत्सुकतेने वाट पाहू लागला.

विक्रम गोखलेप्रमाणे थांबत थांबत बोलायला भटसाहेबांनी सुरुवात केली.

सी मिस्टर.... माणिक्क्यम.......आय ऍम......व्हेरी सॉरी..............दॅट....

व्हॉट सार.व्हाय सारी?...पाणीकमची उत्सुकता आणि काळजी दोन्हीही शिगेला पोचली होती.

हेमामालिनी हॅज रिफ्युज्ड टू मीट यू. नाऊ शी इज एंगेज्ड विथ धर्मेंद्रा आणि नाऊ यू हॅव टू टेक परमीशन फ़्रॉम हिम....काय ते धडधडपणे भटसाहेबांनी एकदाचे सांगून टाकले आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला.

पाणीकमचा चेहेरा काळवंडला..आधीच काळा होता आता तो अजून काळा रप्प झाला. पुढे काहीऽऽही न बोलता खाली मान घालून तो त्यांच्या खोलीच्या बाहेर पडला.

( होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा’ मध्ये  पूर्वप्रकाशित)

१ मार्च, २०१०

पोपट झाला रे!

 मंडळी माझा अगदी पोपट झालाय. खरंच सांगतो. हा पोपट कधीचा होईल असे वाटत असतानाच ती वेळ मात्र साधारण महिन्याभराने पुढे ढकलली गेली इतकंच....पण प्रत्यक्ष ग्रहण लागण्याआधी जसे वेध लागतात ना तसेच तो काल म्हणजे हे पोपट होण्याचे वेध होते असे म्हणता येईल.  गोंधळलात? हे पोपट प्रकरण काय आहे समजून घ्यायचंय...तर मग वाचा.

त्याचं काय आहे की साधारण महिन्यापूर्वी मी मिसळपाववर, त्याच संकेतस्थळाचा होळी विशेषांक काढण्यासाठी एक निवेदन दिलं. त्याला बर्‍याच जणांनी फक्त शुभेच्छा दिल्या; सक्रिय सहकार्याचे कुणीही आश्वासन दिले नाही. त्याचप्रमाणे मिपा प्रशासनानेही त्याबाबत कोणताही उत्साह दाखवला नाही. त्यामुळे तो प्रस्ताव साफ बारगळला.

मागे मी स्वतंत्रपणे  ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी विशेषांक काढला होता त्यावेळी जे सहकारी होते त्यांच्याच सहाय्याने मग हा होळी विशेषांक काढायचा निश्चय केला. ह्यावेळी अंकाचा विषय ठेवला विनोद आणि तत्संबंधी साहित्य. मात्र हा विषय ऐकताच बर्‍याच जणांनी माघार घ्यायला सुरुवात केली. गंभीर लिहिणे एक वेळ जमेल पण विनोदी लिहिणे नाही जमणार असे म्हणून एक एक जण पाऊल मागे घ्यायला लागला. लेख पाठवण्याची शेवटची तारीख ठरवली होती १९ फेब्रुवारी २०१० आणि अंक प्रकाशनाची तारीख २८ फेब्रुवारी अशी निश्चित केली होती.

साधारणपणे १०फेब्रुवारीपर्यंत एकही लेख आलेला नव्हता..तेव्हाच ह्या पोपट होण्याचे नक्की झाले...वेध लागले असे म्हणता येईल. म्हणजे नाहीच आले असे नाही म्हणता येणार.. तसे काही लेख आले..पण त्यातले काही विषयाला धरून नव्हते तर काही तसे असूनही पूर्वप्रकाशित असल्यामुळे आमच्या अटीत बसणारे नव्हते. त्यामुळे त्यांना सविनय नकार देऊन पुन्हा नव्याने लेखन करावे असे आवाहन केले गेले. पण त्यांच्यापैकी एकानेही पुन्हा काही लिहून पाठवले नाही. अशा तर्‍हेने पहिला जोरदार तडाखा बसला.  पुढे हळूहळू मित्रांशी प्रत्यक्ष संवाद साधत, काही जणांचे मन वळवण्यात आणि त्यामुळे एकूण ११ लहानमोठे लेख मिळवण्यात मला थोडेफार यश आले  त्यात माझ्या एका लेखाची भर घालून मी अंक तयार केला.

अंकाची नव्या पद्धतीने सजावट आणि पीडीएफ संस्करण करण्याची जबाबदारी ’माझी दुनिया’ने स्वीकारली आणि जुन्या पद्धतीच्या(जालनिशी स्वरूपाच्या) अंकाची बांधणी मी करण्याचे मनावर घेतले. तशातच व्यंगचित्रकार ’मीनानाथ धस्के’ ह्यांनी एक सुंदर व्यंगचित्र काढून दिले...जे मुखपृष्ठ म्हणून उपयोगी पडले. ’कांचन कराई’ने आमच्या अंकाचे ’हास्यगाऽऽरवा’चे ओळखचिन्ह बनवून दिले. अशा तर्‍हेने अंक तर तयार झाला. लेखकांच्या मर्यादित प्रतिसादामुळे संपादनाचे काम खूपच कमी होते त्यामुळे अंक खूपच लवकर तयार झाला. मग २८तारखेपर्यंत वाट का पाहा..म्हणून तो आम्ही २४ तारखेलाच प्रकाशित केला.

त्या तारखेपासून आजवर अंकाला मिळालेला प्रतिसाद अतिशय अल्प प्रमाणात आहे. विशेष करून आमच्याच हिवाळी अंकाला मिळालेला प्रतिसाद पाहता होळी विशेषांक म्हणजे चक्क ’पडेल कामगिरी’ आहे असे म्हटल्यास ते अधिक समर्पक होईल.
वैयक्तिक रित्या, संपादक म्हणून, अंकाची बांधणी, त्यातील साहित्यिक दर्जा  आणि इतर संबंधित गोष्टींबाबत अंक तसा छोटेखानी असला तरीही मी नक्कीच समाधानी आहे. मात्र त्याला वाचकांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता मी हेच म्हणेन....पोपट झाला रे! थोडक्यात वाचकांना आम्ही आकर्षित करू शकलेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे फारशा प्रतिक्रियाही आलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही नेमके कुठे कमी पडलो हे समजण्यास कोणताच मार्ग नाही.

असो. ह्यावेळी होळी विशेषांकाकडे  पाठ फिरवून वाचकांनी आमचा पोपट केला......तरीही आम्ही खचून गेलेलो नाहीये. आजच्या इतक्याच किंबहुना जास्त जोमाने आता ’वर्षा विशेषांका’ची तयारी सुरु  करायला आम्ही कटीबद्ध आहोत...तेव्हा आपण जरूर आमचं जोरदार स्वागत कराल ह्याची खात्री वाटते.

हास्यगाऽरवाच्या सर्व व्यक्त/अव्यक्त वाचकांना, मन:पूर्वक धन्यवाद.