माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ डिसेंबर, २००७

भविष्य,डायेट आणि कुत्रा!

सीता आणि गीता ह्या दोन्ही मैत्रिणी बरेच दिवसांनी भेटताहेत.दोघी तशा मिश्किल आहेत. एकमेकांची थट्टा करण्यात मागेपुढे बघत नाहीत. बोलण्यातून बोलणे कसे बदलत जाते त्याचे हे एक गमतीदार उदाहरण ! गीताचा ज्योतिष शास्त्रावर थोडाफार विश्वास आहे आणि सद्या तिच्या राशीला मंगळ वक्री आहे असे तिचे म्हणणे आहे.

सीता: काय म्हणतोय तुझा मंगळ्या?
गीता: मंगळ्याच काय, आता तू सुद्धा वाकड्यांत शिरलीस ?
सीता: काय गं? काय केलं मी? ठीक आहेस ना? आज सकाळी सकाळी काय?गीता: वृत्तपत्रात वाचलं नाहीस काय? शनी पुढचे १४० दिवस वक्री आहे ते! सगळे कसे आमच्याच राशीला आलेत समजत नाही.
सीता: हाहाहा! "सर्वे गुण: कांचनम् आश्रयन्ते" असे काहीसे वचन आहे ना!
गीता: गंमत म्हणजे तो शनी जो वक्री झालाय ते स्थान माझ्या पत्रिकेत भाग्योदयाचे आहे...
सीता : वा! वा!
गीता : वा! वा! काय? तो वाकड्यात शिरल्याने सगळंच त्रांगडं होऊन बसलंय!म्हणजे इथून तिथून आम्ही अभागीच.
सीता: ए पत्रिका बदलून घे बघू!
गीता: अगं, पत्रिका बदलून नशीब बदलत असतं तर...काय हवं होतं !
सीता: तेही खरंय म्हणा! अगं पण तुझे नशीब तूच बदलू शकतेस! तुझे ते सद्गुरू नाही का सांगत "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!" वगैरे वगैरे.
गीता : (हसत हसत)ते म्हणतात, तूच "माझ्या" जीवनाचा शिल्पकार.
सीता: हाहाहा!अगं मग शनीला म्हणजे मारुतीला तेल वाहा की!
गीता: मी आता विचार करतेय की सगळ्या ग्रहांची आता होलसेल मध्ये शांती करावी का काय ? सीता: तसं नको. मग खास ग्रहांना राग येईल ना. त्यांनाही इतरांच्या मापाने मोजल्याबद्दल.
गीता: सगळ्या ग्रहांना गृहीत धरल्याबद्दल सगळेच एकदम वाकड्यांत शिरताहेत. मंगळ झाला, गुरुचे भ्रमण चालू आहे, शनी नुकताच शिरलाय, गेलाबाजार राहू तर गेले १७ वर्ष खनपटीला बसलाय. त्यातल्या त्यात एकच सुदैव म्हणजे साडेसाती चालू नाही ते.. नाही तर कुत्र्याने सुद्धा हाल खाल्ले नसते.
सीता: (नाटकीपणे) मुली! घाबरू नकोस! आता तु्झा वाईट काळ संपणार आहे. ही शेपटाची वळवळ चालू आहे. इतके धीराने सहन कर बघू. मग बाईसाहेब! पुढे तुमचेच राज्य आहे. आणि बरं का, कुत्रा हाडं खातो होऽऽ! हाल नाही खात म्हटलं!
गीता: मला बघून माझ्यात हाडं असतीलसं वाटतं का ?
सीता: ता खरा! ता मात्र खरा हां! हाहाहा.
गीता : त्यामुळे तो ही वाटेला जायाचा नाय. काय समजला?
सीता: तू त्याला नुसते "हाऽऽड, हाऽऽड" केलंस तरी तो शेपूट हालवेल.
गीता: हाड मिळेलसं वाटूनऽऽऽ ?
सीता: हो! पण मग त्यासाठी आजपासून डायेट कर म्हणजे छानपैकी बारीक होशील आणि तुझी हाडेही दिसायला लागतील.
गीता: उगाच बारीक बिरीक झाले तर! नको गं बाई...नवरा हाकलून द्यायचा अशाने.
सीता: का गं? कमी खाल्ल्याने तू बारीक झालीस तर उलट त्यांचे पैसे वाचतील की! म्हणजे मग "मनी सेव्हड् इज मनी गेन्ड" असे समजता येईल ना! हाहाहा!
गीता: (हसत हसत) काही न करता, बारीक होता आलं असतं तर आधीच नसते का झाले? त्यामुळे तळवळकरांची पोटं भरल्याशिवाय काही यश नाही.. म्हणजे, कमी खाल्ल्याने वाचणारा पैसा उगाचच तळवळकरांना(जिमनॅशियम) जाणार... मग काय डोंबऽऽल, "मनी सेव्हड् इज मनी गेन्ड?" त्यापेक्षा नवरा म्हणेल, "तू खाऽऽऽ! निदान मी उपाशी ठेवतो असा तरी कोणी समज करणार नाही."
सीता: एक बेस्ट सझेशन आहे. मग असे कर! जिथे रस्ते उंच सखल आहेत ना तिथे चालायला जा. म्हणजे रस्ते आपोआप सपाट होतील आणि तूही बर्‍यापैकी बारीक होशील. म्हणजे तु्झी हाडं दिसायला लागतील आणि भविष्यात जरूर पडलीच तर कुत्रा तुझे हाल(हाडं) खाईल. हा हा हा!
गीता : हां..........ही आयडियाची कल्पना बाकी भारी हाय! चला त्यामुळे कुत्र्याचीही सोय होईल. हाहाहा! सीता: आणि रस्ते सपाट केल्याचे तेवढेच समाजकार्यही घडेल तुझ्याकडून!
गीता: हो, स्वार्थ आणि परमार्थ... सपाट रस्ते आणि एका कुत्र्याला जगवल्याबद्दल... त्याची आयुष्यभराची ददात मिटेल.
सीता: मग आता गुरुजींकडून एखादा शुभ मुहूर्त काढून घे बघू. किंवा नव्या वर्षाचा संकल्प म्हणून ही योजना अमलात आण.
गीता: हां...पण गुरुजींना सध्या टाइम नाय हाय. ते सध्या त्यांच्या आमराईच्या चिंतेत हायेत.
सीता:(हसत) म्हणजे आप "कतार"मैं है की कुवेतमे?
गीता: ????????
सीता: आप कतार मैं है की कुवेतमे? ह्यातला विनोद तुझ्या डोक्यावरून गेलेला दिसतोय. अग "कतारमे(क्यू)!" कळलं काय आता? गुरुजींना वेळ नाही सद्या असे म्हणालीस म्हणून तसे म्हटले.
गीता: हाहाहा. सहीऽऽऽऽ!कशाच्या संदर्भात ते आधी कळलेच नाही... हं! मग कतारमे च म्हणायला लागेल.त्यांना सद्या पत्रिका बघायला वेळ आणि मूड नाही म्हणतात. पण ते क्यू प्रकरण जुने च हाय की "एमटीएनएल"चे. एमटीएनएल चा फुल फॉर्म माहीत आहे की नाही ? "मेरा टेलिफोन नही लगता." पण आता अशी परिस्थिती राहिली नाहीये बघ. खूप सुधारलेय एमटीएनएल. तसाच "बीपीएल" चा माहीत आहे का ?
सीता: नाही गं! बीपीएल म्हणजे काय?
गीता: "बहोत पछतायेगा लेकर."
सीता: हाहाहा! हुशार आहेस! (विषय बदलून)अजून काय नवल विशेष?
गीता: आज आमच्या प.पू सासूबाईंचा वाढदिवस आहे.
सीता: अरे वा ! मग आज गोड काय आहे ? पुपो की गाह?
गीता: मी गुलाबजाम करणार होते पण त्यांनीच चितळ्यांचे श्रीखंड आणले काल. गाह नेहमीच असतो... म्हणजे गेली काही वर्षे तेच करत होते... कारण या सीझनला गाजरं चांगली मिळतात. संध्याकाळी मिसळ आहे.
सीता: हं! मजा आहे तुमची सगळ्यांची!
गीता: उद्या हाटेलात जाऊ....विकेण्ड ला....नणंद ही येईल...सहपरिवार. माझी कसली गंऽऽ मजा ?
सीता: अगं त्यानिमित्ताने गोड खायची संधी तुलाही मिळाली ना!
गीता: म्हणूनच म्हटलं डाएट बिएट ची भानगड माझ्याकरता नाही. उगाच या लोकांच्या पोटावर पाय...मी खाणं सोडलं तर. हाहाहा!
सीता: तो नव्या वर्षातला संकल्प आहे. ३१डिसेंबर पर्यंत हवे ते खाऊन घे.
गीता: आम्हाला नवीन बिवीन काऽऽही नाही... वर्ष बदललं तरी आपलं आयुष्य..मागीलं पानावरून पुढे चालू.
सीता: तेही खरंच की ! पण मघाशी कुत्रे किती खूश झाले होते. आता ते पुन्हा निराश होतील ना!
गीता: हाहाहा! अगं पण आहे ते मेंटेन करीनच की आणि एखाद्याला पोशीन...सगळ्यांचा काही मक्ता नाही घेतला मी.
सीता: (नाटकीपणे) नकोऽऽ गं तू त्यांना असे निराश करूस. दत्त गुरुंनाही क्लेश होतात बघ . मग सांग बघू, अशाने तुझा भाग्योदय कसा होईल ते?
गीता: अरे बापरे ! असं म्हणतेस? इथेही भाग्य आडवं आलंच का ?
सीता: गुरु महाराजांची अवकृपा होऊ देऊ नकोस. बाकी काऽऽहीही होऊ दे!
गीता: छे ! त्यांच्याशी वाकडं घ्यायची काय बिऽशाद!
सीता: जरा धोरणीपणाने वाग.
गीता: म्हणजे कसे बाईऽऽ?
सीता: म्हणजे कुत्र्यांशी प्रेमाऽऽने वाग!
गीता: चावऽलं तरी ?
सीता: चावू द्यायचे नाही. इथेच तर धोरणीपणा दाखवायचाय.
गीता: बरं बरं.
सीता: ए चल बाई! निघते उशीर झाला खूप! पण मजा आली. भेटेन पुन्हा अशीच कधी तरी! टाऽऽटा!
गीता: टाऽऽऽऽऽऽटा!

२२ डिसेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१५

विचार करूनही मला योग्य असा उपाय सापडत नव्हता आणि रतीब लावल्यासारखा माझा तो वर्गबंधू रोज माझ्या नाकावर टिच्चून माझ्या घरात जेवत होता.
एक दिवस अघटित घडले. त्याचा डबा कुणीतरी पळवला. डबा नाही म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला. ज्याला त्याला विचारत सुटला डबा कुणी घेतला ते पाहिले काय म्हणून. खरे तर त्याचा संशय माझ्यावरच होता; पण मी तसे केले नसल्यामुळे मला घाबरण्याचे कारणच नव्हते. मात्र, हे कुणाचे काम असावे ह्याबद्दल उत्सुकता होतीच. ज्याने कुणी केले असेल त्याच्याबद्दल मला उगीचच आपुलकी निर्माण झाली.

डबा मिळत नाही हे पाहून तो शिक्षकांकडे तक्रार करायला गेला. वर्गावर शिक्षक आले आणि त्यांनी सगळ्या वर्गाला ह्या घटनेचा जाब विचारला पण कुणीच काही बोलेना. शेवटी शिक्षकांनी सगळ्यांच्या दफ़्तर आणि बाकांची झडती घ्यायला शिपायाला सांगितले. त्याने सगळ्यांची कसून झडती घेतली पण डबा कुठेच सापडला नाही. शेवटी शिक्षकांनी त्या तक्रार करणार्‍या माझ्या वर्गबंधूचे दफ़्तर तपासायला सांगितले आणि काय आश्चर्य? डबा त्यातच सापडला की हो!डबा आपल्याच दफ़्तरात बघून तोही चक्रावला. त्याने झडप घालून तो डबा शिपायाच्या हातून हिसकावून घेतला आणि चटकन उघडला तर त्यात काहीच नव्हते. सगळा डबा चाटून पुसून साफ केलेला दिसत होता. ते पाहून तो रडू लागला.
आता शिक्षकांना कळत नव्हते की कुणाला शिक्षा करावी? त्यांनी आपली त्याचीच समजूत घातली, " अरे रोजच्या सवयीने तूच खाल्ला असशील डबा आणि विसरला असशील. होते असे कधी कधी. माणूस एखाद्या तंद्रीत नेहमीचे काम उरकतो पण त्याला ते केले असे नंतर आठवत नाही. तेव्हा उगी उगी! आता रडणे थांबव बघू!
"पण तो आपला रडतोच आहे आणि कळवळून सांगतोय की, "मी डबा खाल्लेला नाही. मी हात धुवायला गेलो आणि येऊन पाहिले तो डबा दफ़्तरात नाही. माझ्यावर विश्वास ठेवा!"पण शिक्षकांचा त्याच्यावर विश्वासच बसला नाही. तेव्हढ्यात सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि पुढच्या तासाचे शिक्षक वर्गात आले आणि तेवढ्यापुरते ते प्रकरण मिटले.
मी विचार करत होतो की कोण बरे असावा हा बहाद्दर की ज्याने डबा पळवतानाही कुणाला कळले नव्हते आणि पुन्हा जागच्या जागी ठेवतानाही कळले नव्हते. विचार करताना सहज माझी नजर माझ्या त्या सल्लागार मित्रावर पडली आणि त्याच्या डोळ्यातले भाव पाहून माझी खात्रीच पटली की हाच तो बहाद्दर असणार. मी नेत्रपल्लवीद्वारे त्याच्याशी संवाद साधला आणि त्यानेही मला तसाच प्रतिसाद देत ’हे आपलेच कर्तृत्व’ असल्याचे सुचवले. मी हसून त्याला त्याबद्दल शाबासकी दिली.

त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली. मी वर्गाबाहेर पडण्याआधी आमचा हावरट वर्गबंधू माझ्या घराच्या दिशेने धूम ठोकताना मी पाहिला आणि लक्षात आले की हा उपाय देखिल उपयोगाचा नाहीये. उलट आज तो दोन पोळ्या जास्तच हाणेल हे नक्की. सल्लागार बंधूला शाबासकी देऊन मी घरी आलो तेव्हा आई माझी वाटच पाहत होती. तिला बहुधा आज घडलेले रामायण(डबायण) त्या हावरटाने सांगितले असणारच.
मी हातपाय धुऊन जेवायला बसलो. माझ्या पानात वाढताना तिने मला त्या डब्याबद्दल विचारले, "तू घेतलास काय रे ह्याचा डबा?"
मी "नाही!" म्हणालो.
मी सहसा कधी खोटे बोलत नाही आणि असल्या क्षुल्लक गोष्टीत तर नाहीच नाही हे आई ओळखून होती. उत्तर देताना तिची नजर माझ्या नजरेला भिडली आणि तिची खात्री पटली की हे कृत्य माझे नाही. तिने तो विषय तिथेच थांबवला आणि मग पटापट जेवून मी पुन्हा शाळेत गेलो.

दुसर्‍या दिवशी तो आपल्या आईला घेऊन आला. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईने मला त्या डबा प्रकरणाबद्दल विचारले.
"मी नाही खाल्ला!" असे मी तिला सांगितले.
"मग कुणी खाल्ला?" असा तिचा प्रश्न येताच मला काय करावे हे सुचेना. कुणी खाल्ला हे मला माहीत होते. अशा परिस्थितीत ते "माहीत नाही" असे सांगणे खोटेपणाचे ठरले असते आणि "अमक्याने खाल्ले" असे सांगितले असते तर ती चहाडी ठरली.
मी अशा अवस्थेत असताना माझा सल्लागार मित्र चटकन पुढे आला आणि म्हणाला, "मावशी! मी खाल्ला ह्याचा डबा! हा रोज स्वत:चा डबा खाऊनच्या खाऊन वर ह्याच्या(म्हणजे माझ्या) घरी जाऊन जेवतो. असे करू नको म्हणून सांगितले तरी ऐकत नाही. म्हणून ह्याला धडा शिकवायला मी असे केले त्याबद्दल मला माफ करा."
हे ऐकून त्या मावशींनी त्यांच्या मुलाच्या एक थोबाडीत मारली आणि म्हटले, "अरे तुला मी रोज डबा देते ना? मग असे रोज रोज भिकार्‍यासारखे लोकांच्या घरी जाऊन जेवायला तुला लाज कशी वाटली नाही?"
आपल्या मुलाच्या ह्या असल्या वागण्यामुळे दुखावलेली ती माउली त्याला आमच्या समोर बदड बदड बदडू लागली आणि विचारू लागली, "बोल? पुन्हा असे करशील?"
तेव्हा रडत रडत आईच्या पाया पडत त्याने "आता असे पुन्हा नाही करणार" म्हणून कबुली दिली. त्यानंतर त्या मावशी माझ्या घरी गेल्या आणि त्यांनी आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल माझ्या आईची माफी मागितली.माझ्या आईने त्यांना शांत केले आणि सांगितले, " अहो,जाऊ दे हो! लहान मूल आहे ते. भूक लागते एखाद्याला जास्तीची. तुम्ही असे का नाही करत? त्याला दोन डबे देत जा. बघा, त्याची भूकही भागेल आणि त्याची ही सवयही सुटेल."

माझ्या आईच्या सल्ल्याप्रमाणे त्या दिवसानंतर त्याच्या आईने त्याला दोन-दोन डबे द्यायला सुरुवात केली आणि खरंच त्याची ती सवय कायमची सुटली.पुढे मग हळूहळू आमच्या दोघांची मैत्री झाली . तो त्याच्या डब्यात काही खास पदार्थ असले की मला देऊ लागला. आमच्यातली कटुता केव्हाच संपली होती.

आता आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरू लागलो.

२१ डिसेंबर, २००७

बालपणीचा काळ सुखाचा! २

माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. लहानपणी खूप बडबड्या होता. सतत गाणी म्हणायचा. गोष्टी सांगायचा. नकला करायचा. पण साधारण पाच सहा वर्षांचा असेपर्यंत खूप बोबडा होता. त्याच्याबद्दलची आई-वडिलांनी सांगितलेली ही एक आठवण.

माझ्या मामाकडे त्या काळात फोनो(चावीचा रेकॉर्ड प्लेयर आणि त्याला पुढे लावलेला भोंगा) होता. त्यावर रेकॉर्ड्स लावल्या की त्या आम्ही ऐकत असू. ह्यातून येणार्‍या आवाजाचा मालक (गायक-गायिका) ह्यात आतमध्ये कसे शिरतात? बरे शिरतात तर शिरतात पण शिरताना दिसत कसे नाहीत आणि इतक्या छोट्याश्या जागेत मावतात कसे? असले प्रश्न नेहमी मला सतावायचे. पण माझा भाऊ(त्याला मी दादा म्हणतो) मात्र त्या गाण्यांचे मोठ्या भक्तीने श्रवण करायचा आणि घरी आला की मग आमच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर बसून ती गाणी तो आपल्या बोबड्या बोलीत जोरजोरात ऐकवायचा. ऐकणार्‍यांना खूप गंमत वाटायची कारण बहुतेक सगळेच शब्द उलटे पालटे झालेले असत. नेमके गाणे काय तेही समजत नसे.
एखाद्याने हे गाणे तू कुठे ऐकलेस असे विचारले की लगेच तो सांगायचा, "मोघुमामातले तवा दाद्दा होता ना!" (मधुमामाकडे तवा (रेकॉर्ड) लागला होता ना!) गाणे काय तर .... अले नुत्ता हाताय हाताय , तय तय लादे तवंदी तायला तिताय तिताय मग बर्‍याच प्रयत्नांनी आईच्या लक्षात यायचे ते गाणे...... अरे नाखवा हाकार हाकार, चल चल राधे करवंदी खायला चिकार चिकार... असे काहीसे ते गाणे होते. ह्याच्या आधी आणि पुढे काय होते ते आता आठवत नाही. पण त्याची टकळी चालूच असायची.

माझ्या लहानपणी आमच्या आजूबाजूला भरपूर वनसंपदा होती. त्यामुळे खूप सारी फुलपाखरे, चतुर, मधमाशा वगैरे असे उडणारे कीटक दिसत तसे लाल मुंग्या,काळ्या मुंग्या,डोंगळे,मुंगळे वगैरे वगैरेंचीही रेलचेल होती. ह्या माझ्या दादाला डोंगळे खायची सवय लागली. कशी ती माहीत नाही; पण दिसला डोंगळा की तो उचलून लगेच तोंडात टाकायचा. चावण्याची भिती वगैरे काहीच नव्हती. ही सवय मोडण्यासाठी आईने जंग जंग पछाडले पण तिचा डोळा चुकवून तो आपला कार्यभाग साधून घेत असे.मात्र एकदा एक डोंगळा त्याच्या जिभेला असा काही करकचून चावला की त्या दिवसापासून त्याची ती सवय आपोआप सुटली.

माझ्या धाकट्या भावाचे पराक्रम तर काही विचित्र होते. हे किस्से तो तीन-चार वर्षांचा असतानाचे आहेत. माझ्या वडिलांना तपकिरीचे व्यसन होते. ती तपकीरही साधीसुधी अथवा सुगंधी तपकीर नसायची. त्या काळात ’मंगलोरी’ ह्या नावाने मिळणारी अती कडक(स्ट्रॉंग) अशी ती तपकीर असायची. तपकिरीची डबी सदैव त्यांच्याजवळ असायची. थोड्या थोड्या वेळाने त्यातली चिमूटभर तपकीर ते नाकात कोंबत. हे सगळे माझा धाकटा भाऊ नेहमी पाहत असे. एकदा वडील काही कामात असताना त्यांचे लक्ष चुकवून ह्या माझ्या भावाने तपकिरीची डबी पळवली आणि आडोशाला जाऊन ती डबी उघडून त्यातील सगळी तपकीर आपल्या नाकात ओतली.जे व्हायचे तेच झाले. फटाफट शिंका यायला लागल्या आणि तो घाबराघुबरा झाला. आई-वडील आपापली कामे सोडून धावत पळत त्याच्याकडे गेले आणि त्याची सुश्रुषा करायला लागले. त्याला ह्या शिंका अचानक कशा यायला लागल्या हे आधी कळलेच नाही पण बाजूलाच पडलेली तपकिरीची डबी पाहिली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्याचे वय अतिशय लहान असल्यामुळे त्याला ओरडून काहीच उपयोग नव्हता म्हणून आईने वडिलांनाच दोन शब्द सुनावले. पण त्या परिस्थितीत वडील शांत राहिले म्हणून पुढे बोलणे वाढले नाही.

ह्यानंतरचा पराक्रम तर काही और आहे. त्या काळात कोळसा आणि रॉकेल ह्यांचा वापर जळणासाठी करायचे. आमच्याकडे वीज नव्हती त्यामुळे चिमण्या-कंदील हे रॉकेलचे दिवे असत. तसेच रॉकेलचे स्टोव्ह असत. त्या सर्वांमध्ये रॉकेल भरण्याचे काम रोज चालत असे. हा माझा धाकटा भाऊ आईच्या अवतीभवतीच असायचा. डब्यातनं रॉकेल बाटलीत काढणे आणि बाटलीतनं ते स्टोव्ह,दिव्यांमध्ये भरणे ह्या गोष्टीचे रोज त्याचे निरीक्षण चाले. रॉकेलचा डबा,बाटली वगैरे सामान एरवी स्वयंपाकघरात एका कोपर्‍यात ठेवलेले असे. एक दिवस आई बाहेरच्या खोलीत कचरा काढत असताना हे महाशय स्वयंपाकघरात खेळत होते. खेळता खेळता त्याचे लक्ष त्या रॉकेलच्या बाटलीकडे गेले. ती अर्धी भरलेली होती. त्याने ती तशीच उचलली आणि तोंडाला लावली. त्यातले बरेच रॉकेल त्याच्या नाकातही गेले आणि जोराचा ठसका लागला. त्याचा तो विचित्र आवाज ऐकून आई धावत आली आणि तिने ते पाहिले मात्र. तिने कपाळाला हात मारून घेतला. पटापट त्याला तिथून उचलून बाहेर आणले. मिठाचे पाणी प्यायला लावून ओकून सगळे पोटातले रॉकेल बाहेर काढले तेव्हा कुठे तो नीट श्वास घेऊ लागला. आई मनातनं घाबरली होती पण प्रसंगावधान राखून तिने ते सगळे सोपस्कार केले म्हणून बरे नाहीतर फार गंभीर प्रसंग ओढवला असता.त्यानंतर आई त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली आणि झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. डॉक्टरांनी त्याला नीट तपासले आणि काही काळजीचे कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांनी माझ्या आईच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.त्यानंतर आई प्रत्येक गोष्टीत काटेकोर झाली. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी त्याच्या हाती लागू नये म्हणून वर फळीवर ठेवायला सुरुवात केली.

आठवणी!शालेय जीवनातल्या!१४

माझी शाळा अगदी घराजवळच होती. त्यामुळे शाळा भरल्याची,सुटल्याची, इतकेच काय प्रत्येक तास संपल्याची घंटा देखिल घरात ऐकू येत असे. शाळा भरल्याची घंटा वाजली की मी घरातून निघत असे आणि प्रार्थनेची सुरुवात होण्याच्या आधीच आपल्या जागेवर स्थानापन्न झालेला असे. मात्र ६वी पासून माझी वर्णी प्रार्थना म्हणणार्‍यांत लागल्यामुळे मला १० मिनिटे आधीच शाळेत पोचावे लागे.
प्रार्थनेला आमचे गाडगीळ सर पेटीवर साथ करत. शाळा तिमजली होती आणि आम्ही पहिल्या मजल्यावरच्या मार्गिकेमध्ये उभे राहून प्रार्थना म्हणायचो. सुरुवातीला शाळेत ध्वनिक्षेपकाची सोय नव्हती त्यामुळे प्रार्थना सगळ्या वर्गात ऐकू जायची नाही. म्हणून प्रार्थना सुरु होण्या आधी आणि नंतर, घंटेचा एक टोल वाजत असे. माझ्या समावेशामुळे प्रार्थना बर्‍याच वर्गात ऐकू जाऊ लागली असे बर्‍याच शिक्षकांकडून कळले. त्याबद्दल माझे आणि माझ्या आवाजाचे कौतुकही झाले. माझ्या पहाडी आवाजाचा हा असाही एक फायदा झाला.

आम्हाला दोन मधल्या सुट्ट्या असत. एक १५ मिनिटांची आणि दुसरी ३० मिनिटांची.
पहिल्या सुट्टीत पाणी पिण्यासाठी ही झुंबड उडायची म्हणून मी घरी येऊनच पाणी पीत असे. हळूहळू माझ्याबरोबर माझे वर्गमित्रही यायला लागले. मग हे प्रकरण इतके वाढले की आईने ओट्यावर एक नळ असलेला माठ आणि दोनचार भांडी ठेऊन सगळ्यांची सोय केली.

दुसर्‍या सुट्टीत मी जेवायला घरीच येत असे. जेमतेम दहा मिनिटांत जेवून उरलेला वेळ पुन्हा शाळेत जावून खेळण्यात घालवत असे. एकदिवस ह्या सुट्टीत मी घरी जाताना एक वर्गबंधू माझ्या बरोबर घरी आला. माझ्याबरोबर आईने त्यालाही जेवायला वाढले. त्यानंतर मग तो येतच राहिला . इतका की एखादे वेळेस मी घरी उशीरा पोचत असे पण हा माझ्या आधीच जावून पाटावर बसलेला असे. मला अस्सा राग यायचा त्याचा की काही विचारू नका. "रोज रोज कशाला रे येतोस माझ्या बरोबर जेवायला?" असे मी त्याला विचारले तरी तो काहीच उत्तर देत नसे. निमूटपणे जेवायचा आणि शांतपणे निघून जायचा. जेवण आटोपल्यावर तो माझ्या, बरोबर येण्याची देखिल वाट पाहात नसे.

मी आईला कितीतरी वेळा सांगितले की "तू त्याला जेवायला देत जावू नकोस. तो हावरट आहे. त्याचा डबा आधीच्या सुट्टीत खातो तेव्हा मलाही काही देत नाही आणि दुसर्‍या कुणालाही काही देत नाही. पक्का आप्पलपोटा आहे. रोज त्याच्या डब्यात छान छान पदार्थ असतात. शीरा,उपमा,थालीपीठ,घावनं,तुपसाखर पोळी,गुळसाखरपोळी तर कधी कधी पुरणपोळी देखिल असते; पण हा कुणाला त्याचा वासही देत नाही. ह्या अशा मुलाला तू कशाला लाडावून ठेवतेस? मला तो अजिबात आवडत नाही."

आई आपली नेहेमी एकच सांगायची, " अरे कसा ही असला तरी तुझा मित्रच आहे ना?"
मी, "नाही"! म्हणायचो. पण एक नाही आणि दोन नाही.
"अरे, दिल्याने आपले काऽऽही कमी होत नाही. भुकेलेल्याला अन्न आणि तहानेलेल्याला पाणी दिले की पुण्य लागते."
"तो काही भुकेलेला बिकेलेला नाही. चांगला चापून येतो स्वत:चा डबा आणि इथे येवून फुकट मध्ये खात असतो. त्याच्यापेक्षा एखाद्या भिकार्‍याला जेवायला घाल तू रोज. मी काही म्हणणार नाही."

पण माझ्या बोलण्याचा,त्रागा करण्याचा ना आईवर परिणाम व्हायचा ना त्या वर्गबंधूवर. माझ्या पुढे गहन प्रश्न पडला. आता ह्याला ह्या पासून परावृत्त कसे करायचे? काहीतरी युक्ती केली पाहिजे. पण काय करणार? शारिरीक दृष्ट्या मी दुबळा होतो त्यामुळे त्याला माराची भिती दाखवणे शक्य नव्हते आणि असे काही मी केले असे आईला कळले असते तर माझीच पाठ शेकली गेली असती. मग करावे तरी काय? बराच विचार केला पण काही सुचेना. मग मी हे माझ्या दुसर्‍या एका वर्गबंधुला विश्वासात घेऊन सांगितले आणि त्यावर त्याचे मत मागितले. तो चटकन म्हणाला, "आयला,त्यात काय आहे? तू त्याचा डबा खा मग बघ कशी खोड मोडेल ती."
"अरे पण त्याच्या डब्याला तो हात तरी लावू देईल काय? मग खाणे तर दूरच राहिले."
"तू पण ना चम्याच आहेस(खरे तर पम्याच). इतके कसे कळत नाही तुला की तो डबा खाण्याआधी हात धुवायला जातो, तेव्हाच त्याचा डबा लांबवायचा आणि शाळेच्या मागे जाऊन गुपचुप खायचा."
"अरे पण हे कसे शक्य आहे? तो शिक्षकांकडे तक्रार करेल ना माझी आणि मग इथे शिक्षक आणि घरी गेल्यावर आई माझी पाद्यपुजा करेल त्याचे काय? नाय बाबा. आपल्याला हे जमणार नाही."
"मग रडत बस." असे म्हणून त्या मित्राने माझा नाद सोडला. मी देखिल काय करावे आणि कसे करावे ह्या विवंचनेत गढून गेलो.

११ डिसेंबर, २००७

समिधा: एक मनमोकळे आत्मकथन!


वेदशास्त्रसंपन्न घुले घराण्यातील,अतिशय सनातन वातावरणात वाढलेली एक सुंदर तरूणी आणि दाढी, जटा,कफनी व दंडधारी,आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतलेला एक संन्यासी ह्यांच्यातील ही प्रेमकथा आहे. पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि वयात भरपूर अंतर असूनही विवाहबद्ध होतात. ह्यातील ती सुंदर तरुणी म्हणजे सौ.साधनाताई आमटे आणि तो संन्यासी म्हणजे मुरली देवीदास उर्फ बाबा आमटे हे सांगितल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ही सत्यघटना आहे.

सुखवस्तु, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून दारिद्र्य आणि खाचखळग्यांनी भरलेले आयुष्य जाणिवपूर्वक स्वीकारणे हे येरा-गबाळाचे काम नोहे हेच खरे. बाबा आमट्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाची मर्जी सांभाळत, वेळप्रसंगी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्या समाजसेवी कामात सर्वस्वी झोकून देणे म्हणजे एक प्रकारचे असिधारा व्रतच होय आणि हेच व्रत सौ. साधनाताई आजवर अखंडपणे पाळत आलेल्या आहेत. त्यातील सर्व घटनांचे त्रयस्थपणे केलेले निवेदन "समिधा" ह्या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहे.

लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ हा प्रणयाराधनेत गेल्यानंतर हळूहळू बाबांच्या अलौकिक कार्याला साधनाताईंनी डोळसपणे वाहून घेतले. पहिला कुष्टरुग्ण पाहिल्यावर झालेली बाबांच्या मनाची अवस्था,त्याची सेवा करण्यासाठी साधनाताईंनी दिलेले अनुमोदन आणि प्रत्यक्ष सहभाग ह्याचे वर्णन वाचले की कळते की शिव-शक्तीचे मीलन म्हणजे काय असते. बाबा म्हणजे कामाचा झपाटा. त्यात चूक झालेली त्यांना अजिबात चालत नाही. अशा वेळी साक्षात जमदग्नीचा अवतार असलेल्या बाबांची मर्जी सांभाळणे आणि त्यावेळी त्यांच्या रोषाला पात्र ठरलेल्या व्यक्तिला पाठीशी घालून ती चूक आपल्यावर ओढवून घेणे; ही सगळी तारेवरची कसरत करणार्‍या साधनाताई म्हणजे साक्षात मायमाऊलीच होत.

जसजसा व्याप वाढत गेला तसतशी कामे वाढत गेली. सगळ्यांचा स्वयंपाक करणे(रुग्ण आणि इतर साथीदार), भांडी घासणे ही कामे साधनाताई एकट्यानेच करत. वर चार चार गाईंचे दुध काढणे, कुणाचे दुखले-खुपले बघणे, आपापसातील वाद सोडवणे आणि बाबांची सेवा करणे वगैरे असंख्य कामे त्या न थकता, न कंटाळता सतत हसतमुख राहून करतात हे वाचले की जाणवते की श्रमासारखा खरा आनंद दुसरा कशात नाही. अर्थात हे सगळे त्याच करू जाणे. सामान्य माणसाचे ते काम नाही.

उजाड, ओसाड जागी बस्तान बसविणे, साप,विंचूंचे आगर असलेल्या ठिकाणी सहजपणे वावरणे हे आपल्यासारख्या शहरात वाढलेल्या पांढरपेशांना कसे जमेल? पण लाडा-कोडात आणि सुखवस्तु वातावरणात वावरलेली ही स्त्री किती धिटाईने ह्या सर्व प्रसंगात वागते हे पाहिले की मग घरातल्या पाली-झुरळांना घाबरणार्‍या आपल्यासारख्यांना आपलीच कींव करावीशी वाटते. साधनाताईंच्या आणि बाबांच्या बाबतीत मात्र जितकी परिस्थिती विपरीत तितकाच काम करण्याचा उत्साह वाढतो हे पदोपदी जाणवते.

साधनाताईंचा हा जीवनप्रवास वाचताना पदोपदी आपण थक्क होत जातो. डॉ.प्रकाश आणि डॉ.विकास ह्या मुलांचे बालपण, डॉ.प्रकाशची पत्नी डॉ. मंदा ह्यांच्याबद्दलची कृतज्ञता, प्रकाश-विकास ह्यांनी बाबांचे समर्थपणे पुढे चालवलेले कार्य, बाबांचे भारत-जोडो अभियान, मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन वगैरे वगैरे आणि त्या अनुषंगाने येणारी माहिती देखिल ह्या आत्मकथनात वाचायला मिळेल. तसेच बाबांची नियमित आजारपणं,त्यावेळची झालेली साधनाताईंची धावपळ आणि मनाची घालमेल, त्यातून बाबांचे सही सलामत वाचणे हे सगळे वाचताना आपणही नकळतपणे त्यात सामील होतो.

प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. त्यात किंचित बदल करून मी म्हणेन की "प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक ’कर्तबगार’ स्त्री असते. अशा कर्तबगार स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पुरुष उच्चपदी पोचू शकणार नाही हे मात्र नक्की.

बाबा आमटे ह्यांचे आजवरचे लोकोत्तर समाजकार्य तर जगजाहीर आहेच. ह्या कार्यात तितकीच समर्थपणे साथ देणार्‍या साधनाताईंची ही सगळी कहाणी साहजिकच बाबांच्या भोवतीच गुंफलेली आहे. बुद्धिमान आणि कर्तबगार पती असलेल्या पत्नींच्या आत्मचरित्रात पतीकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिलेले आढळेल. त्या तुलनेत हे आत्मचरित्र खूपच वेगळे आहे.

प्रत्येकाने हे आत्मकथन जरूर वाचावे असे मी आवाहन करतो.

५ डिसेंबर, २००७

मी दुर्गा खोटे!

हिंदी-मराठी चित्रपट आणि मराठी नाटकात गाजलेल्या जुन्या पिढीतील एक स्त्री कलाकार म्हणजे श्रीमती दुर्गा खोटे. हे नाव उच्चारताच दुर्गाबाईंचे ते खानदानी रुप डोळ्यासमोर दिसू लागते.
अतिशय लाडाकोडात आणि ऐश्वर्यात वाढलेली लाडांच्या घरातली ही माहेरवाशीण लग्नानंतर खोट्यांच्या घरात गेली. खोट्यांचे घराणेही तितक्याच तोलामोलाचे होते. पण व्यापारात खोट बसून असलेले सगळे वैभव पार धुळीला मिळाले आणि खोटे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. माहेरच्या मदतीमुळे राहाण्याची सोय झाली तरी मानी बानूला(बानू हे दुर्गाबाईंचे माहेरचे घरगुती नाव) बापाच्या जीवावर जगणे अमान्य होते. ऐष आरामात लोळणार्‍या नवर्‍याला कमावण्याची अक्कल नव्हती त्यामुळे मग दुर्गाबाईंनाच हातपाय हलवावे लागले. त्यातून पदरात दोन मुलेही होती. ह्या अशा परिस्थितीमुळे आणि निव्वळ योगायोगामुळे दुर्गाबाईंनी तोंडाला रंग फासला आणि एका सुमार चित्रपटात भूमिका केली. पहिलाच अनुभव इतका भयाण होता की घरच्यांनी त्यांना ह्यापुढे चित्रपटात काम करायची बंदी केली. पण पुन्हा एक संधी प्रभातच्या व्ही. शांताराम ह्यांच्याकडून मिळाली आणि मग दुर्गाबाईंच्या वडिलांच्या सर्व वकिली अटी मान्य करून प्रभातने त्यांच्याशी करार केला. इथून मग दुर्गाबाईंनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.हा सर्व इतिहास खुद्द दुर्गाबाईंच्या तोंडून ऐकण्यात गंमत आहे.
बालगंधर्व हे नाट्य सृष्टीचे चालते बोलते दैवत होते. त्यांच्याबद्दल दुर्गाबाई भरभरून बोलतात. तसेच समकालीन नट,नट्या ह्यांच्याबद्दलच्या आठवणींही त्यांनी शब्दबद्द केलेत.दुर्गाबाईंची दोन लग्ने झाली. त्यासंबंधीही त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यांची दोन मुले बकुल आणि हरीन ह्यांच्याबद्दलही भरभरून लिहिलेय. त्यांची एक सून विजया हरीन खोटे(पुर्वाश्रमीच्या विजया जयवंत आणि सद्याच्या नामवंत दिग्दर्शिका आणि अभिनेत्री श्रीमती विजया मेहता)ह्यांच्या अनुषंगानेही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.दुर्गाबाईंचे दुसरे पती श्री.रशीद ह्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती देखिल ह्यात आहे.
दुर्गाबाईंनी कधी एकटीने तर कधी सिनेसृष्टीतील शिष्ठमंडळाबरोबर केलेल्या प्रवासाचे साद्यंत वर्णन वाचताना आपण त्यात रंगून जातो.आपली संपूर्ण चित्रपट आणि नाट्य कारकीर्द दुर्गाबाईंनी अतिशय समर्थ शब्दात उभी केलेय. ती त्यांच्याच शब्दात वाचण्यातली मजा काही औरच आहे. एकदा हातात घेतलेले हे पुस्तक पूर्ण वाचून होईस्तो खाली ठेववत नाही ह्यातच त्याचे यश सामावलेले आहे.