माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२२ डिसेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१५

विचार करूनही मला योग्य असा उपाय सापडत नव्हता आणि रतीब लावल्यासारखा माझा तो वर्गबंधू रोज माझ्या नाकावर टिच्चून माझ्या घरात जेवत होता.
एक दिवस अघटित घडले. त्याचा डबा कुणीतरी पळवला. डबा नाही म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला. ज्याला त्याला विचारत सुटला डबा कुणी घेतला ते पाहिले काय म्हणून. खरे तर त्याचा संशय माझ्यावरच होता; पण मी तसे केले नसल्यामुळे मला घाबरण्याचे कारणच नव्हते. मात्र, हे कुणाचे काम असावे ह्याबद्दल उत्सुकता होतीच. ज्याने कुणी केले असेल त्याच्याबद्दल मला उगीचच आपुलकी निर्माण झाली.

डबा मिळत नाही हे पाहून तो शिक्षकांकडे तक्रार करायला गेला. वर्गावर शिक्षक आले आणि त्यांनी सगळ्या वर्गाला ह्या घटनेचा जाब विचारला पण कुणीच काही बोलेना. शेवटी शिक्षकांनी सगळ्यांच्या दफ़्तर आणि बाकांची झडती घ्यायला शिपायाला सांगितले. त्याने सगळ्यांची कसून झडती घेतली पण डबा कुठेच सापडला नाही. शेवटी शिक्षकांनी त्या तक्रार करणार्‍या माझ्या वर्गबंधूचे दफ़्तर तपासायला सांगितले आणि काय आश्चर्य? डबा त्यातच सापडला की हो!डबा आपल्याच दफ़्तरात बघून तोही चक्रावला. त्याने झडप घालून तो डबा शिपायाच्या हातून हिसकावून घेतला आणि चटकन उघडला तर त्यात काहीच नव्हते. सगळा डबा चाटून पुसून साफ केलेला दिसत होता. ते पाहून तो रडू लागला.
आता शिक्षकांना कळत नव्हते की कुणाला शिक्षा करावी? त्यांनी आपली त्याचीच समजूत घातली, " अरे रोजच्या सवयीने तूच खाल्ला असशील डबा आणि विसरला असशील. होते असे कधी कधी. माणूस एखाद्या तंद्रीत नेहमीचे काम उरकतो पण त्याला ते केले असे नंतर आठवत नाही. तेव्हा उगी उगी! आता रडणे थांबव बघू!
"पण तो आपला रडतोच आहे आणि कळवळून सांगतोय की, "मी डबा खाल्लेला नाही. मी हात धुवायला गेलो आणि येऊन पाहिले तो डबा दफ़्तरात नाही. माझ्यावर विश्वास ठेवा!"पण शिक्षकांचा त्याच्यावर विश्वासच बसला नाही. तेव्हढ्यात सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि पुढच्या तासाचे शिक्षक वर्गात आले आणि तेवढ्यापुरते ते प्रकरण मिटले.
मी विचार करत होतो की कोण बरे असावा हा बहाद्दर की ज्याने डबा पळवतानाही कुणाला कळले नव्हते आणि पुन्हा जागच्या जागी ठेवतानाही कळले नव्हते. विचार करताना सहज माझी नजर माझ्या त्या सल्लागार मित्रावर पडली आणि त्याच्या डोळ्यातले भाव पाहून माझी खात्रीच पटली की हाच तो बहाद्दर असणार. मी नेत्रपल्लवीद्वारे त्याच्याशी संवाद साधला आणि त्यानेही मला तसाच प्रतिसाद देत ’हे आपलेच कर्तृत्व’ असल्याचे सुचवले. मी हसून त्याला त्याबद्दल शाबासकी दिली.

त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली. मी वर्गाबाहेर पडण्याआधी आमचा हावरट वर्गबंधू माझ्या घराच्या दिशेने धूम ठोकताना मी पाहिला आणि लक्षात आले की हा उपाय देखिल उपयोगाचा नाहीये. उलट आज तो दोन पोळ्या जास्तच हाणेल हे नक्की. सल्लागार बंधूला शाबासकी देऊन मी घरी आलो तेव्हा आई माझी वाटच पाहत होती. तिला बहुधा आज घडलेले रामायण(डबायण) त्या हावरटाने सांगितले असणारच.
मी हातपाय धुऊन जेवायला बसलो. माझ्या पानात वाढताना तिने मला त्या डब्याबद्दल विचारले, "तू घेतलास काय रे ह्याचा डबा?"
मी "नाही!" म्हणालो.
मी सहसा कधी खोटे बोलत नाही आणि असल्या क्षुल्लक गोष्टीत तर नाहीच नाही हे आई ओळखून होती. उत्तर देताना तिची नजर माझ्या नजरेला भिडली आणि तिची खात्री पटली की हे कृत्य माझे नाही. तिने तो विषय तिथेच थांबवला आणि मग पटापट जेवून मी पुन्हा शाळेत गेलो.

दुसर्‍या दिवशी तो आपल्या आईला घेऊन आला. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईने मला त्या डबा प्रकरणाबद्दल विचारले.
"मी नाही खाल्ला!" असे मी तिला सांगितले.
"मग कुणी खाल्ला?" असा तिचा प्रश्न येताच मला काय करावे हे सुचेना. कुणी खाल्ला हे मला माहीत होते. अशा परिस्थितीत ते "माहीत नाही" असे सांगणे खोटेपणाचे ठरले असते आणि "अमक्याने खाल्ले" असे सांगितले असते तर ती चहाडी ठरली.
मी अशा अवस्थेत असताना माझा सल्लागार मित्र चटकन पुढे आला आणि म्हणाला, "मावशी! मी खाल्ला ह्याचा डबा! हा रोज स्वत:चा डबा खाऊनच्या खाऊन वर ह्याच्या(म्हणजे माझ्या) घरी जाऊन जेवतो. असे करू नको म्हणून सांगितले तरी ऐकत नाही. म्हणून ह्याला धडा शिकवायला मी असे केले त्याबद्दल मला माफ करा."
हे ऐकून त्या मावशींनी त्यांच्या मुलाच्या एक थोबाडीत मारली आणि म्हटले, "अरे तुला मी रोज डबा देते ना? मग असे रोज रोज भिकार्‍यासारखे लोकांच्या घरी जाऊन जेवायला तुला लाज कशी वाटली नाही?"
आपल्या मुलाच्या ह्या असल्या वागण्यामुळे दुखावलेली ती माउली त्याला आमच्या समोर बदड बदड बदडू लागली आणि विचारू लागली, "बोल? पुन्हा असे करशील?"
तेव्हा रडत रडत आईच्या पाया पडत त्याने "आता असे पुन्हा नाही करणार" म्हणून कबुली दिली. त्यानंतर त्या मावशी माझ्या घरी गेल्या आणि त्यांनी आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल माझ्या आईची माफी मागितली.माझ्या आईने त्यांना शांत केले आणि सांगितले, " अहो,जाऊ दे हो! लहान मूल आहे ते. भूक लागते एखाद्याला जास्तीची. तुम्ही असे का नाही करत? त्याला दोन डबे देत जा. बघा, त्याची भूकही भागेल आणि त्याची ही सवयही सुटेल."

माझ्या आईच्या सल्ल्याप्रमाणे त्या दिवसानंतर त्याच्या आईने त्याला दोन-दोन डबे द्यायला सुरुवात केली आणि खरंच त्याची ती सवय कायमची सुटली.पुढे मग हळूहळू आमच्या दोघांची मैत्री झाली . तो त्याच्या डब्यात काही खास पदार्थ असले की मला देऊ लागला. आमच्यातली कटुता केव्हाच संपली होती.

आता आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरू लागलो.

२ टिप्पण्या:

vivek म्हणाले...

सर्वप्रथम शतकी लेखाबद्दल अभिनंदन. तुमची लेखणी अशीच बहरत राहो. आठवण नंबर १४ व १५ फार आवडली. त्यानिमित्ताने शाळेतल्या छोटी सुट्टी (ज्याला आम्ही पाणी प्यायची सुट्टी म्हणत असू) व मोठी सुट्टीच्या आठवणी ताज्यातवान्या झाल्या. माझंही घर शाळेपासून ढेंगभर अंतरावर असल्याने शाळेत डबा नेऊन तो मित्रांबरोबर भागीदारीत खाण्याच्या आनंदाला मी कायमचा मुकलो होतो. तुमच्याप्रमाणेच मीही घरी जेवायला जात असे. पण (माझ्या आईच्या सुदैवाने) तुमच्या मित्रांसारखा एकही खादाड मित्र माझ्या वाटेला आला नव्हता.

अनामित म्हणाले...

प्रमोदकाका, शतकी लेखाबद्दल अभिनंदन!! लवकरच डबल सेंच्युरी होवो!!

शालेय जीवनातील आठवणी खरोखर रम्य आहेत.